२६/०१/२०२४

Article about the celebration after Ram Mandir inauguration at Ayodhya

अनुपम्य सुख सोहळा

कणखर नेतृत्व असलेले , संख्याबळ असलेले सरकार असल्याने हा सोहळा निर्विघ्नपणे पार पडला. 22 जानेवारी ही तारीख जगाच्या इतिहासात नोंदली गेली.

खरे तर तुकाराम महाराजांच्या अभंगातील अनुपम्य सुख सोहळा या ओळीचा शीर्षकात म्हणून आज दुस-यांदा वापर करीत आहे. हेच शिर्षक असलेला लेख जेंव्हा संभाजीनगर येथील रामकृष्ण मिशन मंदिराचे उद्घाटन झाले होते तेंव्हा लिहिला होता आणि आज अयोध्या राम मंदिराचे लोकार्पण झाल्यावर व समस्त भारतीयांची स्वप्नपुर्ती झाल्यावर लिहीत असलेल्या या लेखाच्या शीर्षकात सुद्धा त्याच ओळीचा वापर करावासा वाटला. कारण संपूर्ण भारतात ज्याला खरेच कशाचीही उपमा देता येऊ शकत नाही असा अनुपम्य सोहळा राम मंदिर लोकार्पण होतांना देशभर साजरा झाला. 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्या येथे गेल्या पाचशे वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या, देशवासीयांचे श्रद्धास्थान असलेल्या राम मंदिराचे भव्य लोकार्पण झाले. मंदिर बनायेंगे पर तारीख नही बतायेंगे असे हिणवणाऱ्या लोकांना सुद्धा 22 जानेवारी ही लोकार्पणाची तारीख ज्ञात झाली होती. बरोबर त्याच दिवशी मुहूर्ताच्या वेळी राम लल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. टेन्ट मध्ये राहणा-या प्रभू रामाला मंदिर मिळाले. देशभर यानिमित्ताने विपुल लिखाण, माहिती, राम मंदिराचा इतिहास, मंदिराबद्दलची माहिती लोकांनी एकमेकांना पाठवली. सगळीकडे कसा आनंदी आनंद झाला. आनंदाचे डोही आनंद तरंग असे सर्वांचे झाले व 22 जानेवारीला देशभरात मोठा उत्सव साजरा झाला सर्व लोक उत्साहात होते. राम नामाचा काय महिमा आहे हे या दिवशी सर्वांना कळून चुकले. अयोध्या, देशभरातील शहरे व ग्रामीण भाग आनंदाने, उत्साहाने, श्री रामप्रभूंवरील प्रेमाने भारावून गेले होते. खेडी शहरातील अनुपम्य सुख सोहळा असे म्हणण्याचे कारण हेच. याच खेडेगावांमधील एक गाव म्हणजे निपाणा.


बुलढाणा जिल्ह्यातील निपाणा या गावात साजरा झालेल्या 22 जानेवारी या दिवसाचे उदाहरण इथे सांगावेसे वाटते. खामगाव तालुक्यातील निपाणा या छोट्याशा गांवात नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. 22 जानेवारीला या गावातील लोकांनी ग्रामभोजन देण्याचे ठरवले होते आणि या भोजनात मिष्टांन्न म्हणून हरभऱ्याच्या डाळीचे लाडू वाटप करण्याचे ठरवले होते. त्या अनुषंगाने घरोघरी अर्धा किलो लाडू बनवून आणण्याचे सांगण्यात आले. सर्व घरी लाडू बनू लागले व  भोजनाच्या नियोजित वेळेच्या आधी जेंव्हा नागरिकांनीच बनवलेले हे लाडू जमा करण्यासाठी म्हणून आणले गेले तेव्हा हे लाडू अपेक्षेपेक्षाही अधिक जमा झालेले दिसले. प्रत्येक घरी अर्धा किलो लाडू बनवण्याचे आवाहन केले होते तरी प्रत्येक घरी एक ते दोन किलो लाडू बनवल्या गेले. गावातील 100 टक्के घरात लाडू बनवले गेले. ग्रामस्थांना एकूण दोन क्विंटल लाडू बनतील अशी अपेक्षा होती. पण प्रत्यक्षात मात्र पाच क्विंटल लाडू जमा झाले. या लाडूंचे भोजनासोबत प्रसाद म्हणून वितरण करण्यात आले. सर्व ग्रामस्थांनी मिळून शोभायात्रा काढली सर्व ग्रामस्थांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या, झेंडे ,पताका, दिवे लावले गेले ज्याला जे शक्य होते ते सर्व या ग्रामस्थांनी केले. निपाणा गावाजवळील भालेगांव

या गावात सुद्धा असाच उत्साह दिसून आला. निपाणा व भालेगाव या दोन खेडेगावांप्रमाणे भारतातल्या इतर सर्व खेडे, शहरांत याचप्रकारे राम मंदिर लोकार्पणाचा आनंदोत्सव साजरा झाला. 

खेडोपाडी अल्पउत्पन्न असलेली, सर्वसामान्य जनता राहत असली तरी रामावरील प्रेमापोटी, बहुप्रतिक्षित राम मंदिर निर्मितीच्या आनंदा पोटी त्यांनी हात आखडता घेतला नाही ही बाब अस्सल भारतीयत्व काय आहे हे स्पष्ट करणारी आहे. अयोध्या येथे मान्यवरांनी दिलेली भाषणे सुद्धा खूप प्रभावी होती राम नामातील ऊर्जा, भारताचे स्वत्व, राम मंदिराचा महिमा, स्थान हे सर्व सांगणारी सर्वच मान्यवरांची भाषणे दीर्घकाळपर्यंत लक्षात राहतील अशीच होती. समर्थ रामदास स्वामींनी छत्रपती शिवाजी महाराजांचे जसे वर्णन केले त्याच "निश्चयाचा महामेरू बहुत जनांशी आधारु..." या शब्दांत गोविंदगिरी महाराज यांनी नरेंद्र मोदी यांचे वर्णन केले ते सुद्धा सर्वांना आवडेल व मोदींना सुद्धा शोभेल असेच होते. राम मंदिर लोकार्पणाचा आनंदोत्सव जल्लोषात साजरा होण्यासाठी सर्वांना जणू त्यांच्या हृदयातील अंतस्थ रामानेच प्रेरणा दिलेली दिसली. या उत्सवामुळे रामावर भारतीयांचे किती प्रेम, किती श्रद्धा आहे हे जगाला दिसून आले. काही लोक मंदिर, देव आदी गोष्टींना सतत नाके मुरडत असतात, हकनाक दोष देत असतात त्यांना इथे सांगावेसे वाटते की अयोध्येतील राम मंदिर लोकार्पण प्रसंगी भारतभर सव्वा लाख कोटी रुपयांचा व्यवहार झाला. या व्यवहारात करोडो लघु व्यवसायिकांचा फायदा झाला. एकट्या दिल्लीत 40 हजार कोटींची उलाढाल झाली. विद्युत रोषणाई, पणत्या, भगवे झेंडे अशा लहान लहान वस्तूंची मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री झाली. एका मंदिरामुळे एवढी मोठी उलाढाल होण्याची हि पहिलीच वेळ होती. राम मंदिर लोकार्पणाची दृश्ये सर्वांना पाहायला मिळावी म्हणून चौका-चौकात मोठे दृक श्राव्य माध्यम, भले मोठे पडदे लावले होते. अयोध्येला अनेक संत, महात्मे, दिग्गज, नामांकित लोक, अभिनेते, उद्योगपती, सामान्य नागरीक यांची मांदियाळीच झाली होती. एकूणच कणखर नेतृत्व असलेले, मोठे संख्याबळ असलेले सरकार असल्याने हा सोहळा निर्विघ्नपणे पार पडला. 22 जानेवारी हि तारीख जगाच्या इतिहासात नोंदली गेली व अयोध्या नगरीत रामलल्लाचे आगमन, त्या प्रित्यर्थ झालेला हा सोहळा संत जसे वर्णन करतात तसाच  अनुपम्य सुख सोहळा ठरला.

६ टिप्पण्या: