०१/०२/२०२४

Article about actor Ashok Saraf

सम्राट अशोक

अशोक सराफ हा अभिनेता इतका जवळचा वाटतो, इतका घरगुती वाटतो, त्याच्या पडद्यावरच्या सहज शैलीने तो आपला जुना परिचित किंवा स्नेही असाच वाटत आलेला आहे आणि म्हणून अशोक आज वयाच्या सत्तरीत असला तरी त्याचा उल्लेख हा आपण सर्व नेहमी एकेरीतच करत आलेलो आहोत.

अशोक सराफ यांना काल महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला. तमाम महाराष्ट्रवासियांना आनंद झाला अशी ही घोषणा होती. किशोर वयात असतांना अशोक सराफ हे नांव माहीत झाले. अशोक सराफ म्हणजे विनोदी भूमिका अत्यंत सुरेख पद्धतीने साकारणारा अभिनेता. केवळ विनोदीच नव्हे तर विविधरंगी भूमिका अशोकने वठवल्या आहेत. स्टेट बँकेत नोकरी , नंतर नाटक व पुढे सिनेमा असा त्याचा अभिनयाचा प्रवास आहे. शेवटी त्याचा असा हा शब्द वापरून एकेरी उल्लेख करणे भागच पडले. कारण अशोक सराफ हा अभिनेता इतका जवळचा, घरगुती सदस्या सारखा व त्याच्या पडद्यावरच्या सहज शैलीने आपला जुना परिचित किंवा स्नेही असाच वाटत आलेला आहे आणि म्हणून अशोक आज वयाच्या सत्तरीत असला तरी त्याचा उल्लेख हा आपण सर्व नेहमी एकेरीतच करत आलेलो आहोत. तर किशोर वयात असतांना अशोक सराफ हे नांव ज्ञात झाले त्याचा सर्वात प्रथम पाहिलेला सिनेमा कोणता याचे काही आता स्मरण नाही पण घरीच दूरदर्शनवर  रंजना या नटी सोबतच्या कुठल्यातरी सिनेमात किंवा गाण्यात त्याला पाहिले होते. त्याच्या मुद्राभिनयाने तेंव्हाच आकर्षित केले होते, लक्ष वेधून घेतले होते. पुढे 90 च्या दशकात त्याचे अशीही बनवाबनवी आणि धुमधडाका हे दोन चित्रपट पाहण्यात आले. तसे त्याचे इतरही अनेक चित्रपट पाहिले आहेत पण या चित्रपटातील त्याच्या भूमिका चिरस्मरणीय अशा आहेत. धुमधडाका हा जुन्या प्यार किये जा या सिनेमाची कॉपी होती. त्यात किशोरकुमारने जी भूमिका साकारली होती ती भूमिका धुमधडाका सिनेमात अशोक सराफने साकारली पण अशोक सराफने त्या भूमिकेत त्याचे स्वतःचे असे अनेक रंग, पैलू जोडले की ती भूमिका खूपच सुंदर झाली. अशीही बनवाबनवी मधला धनंजय माने तर आजही लोकांच्या लक्षात आहे. धनंजय बनलेला अशोक सराफ व तो काम करीत असलेल्या दुकानाची मालकीण अश्विनी भावे यांच्यातील प्रेम भावना दिग्दर्शकाने खूपच हळुवारपणे व गमतीने चित्रित केल्या आहे. अश्विनी भावेने सुद्धा खुप सुंदर अभिनय साकारला आहे. या दोघांचे पुढील काही प्रसंग जसे झुरळ, धनंजयचा मालकिणीने पकडून ठेवलेला हात, लिंबू कलरची साडी हे खुपच चांगले चित्रीत केले आहे. या प्रसंगात अशोक व  अश्र्विनीचा अभिनय लाजवाब. धनंजय मानेच्या छोट्या-छोट्या रील्स आजही फेसबुकवर इंस्टाग्रामवर प्रचंड लोकप्रिय ठरलेल्या आहेत. माझा पती करोडपती मधील सुप्रियाच्या  नकली कॅप्टन पतीची भूमिका तर अशोक सराफनी जबरदस्तच वठवली आहे. अशोक सराफने काही संवेदनशील अशा भूमिका सुद्धा साकारल्या. कळत-नकळत मधला लहान मुलांचा मामा त्याने खूपच सुरेख वठवला आहे. त्याची वजीर सिनेमातील भूमिका, मसन जोगीची भूमिका, हिंदी सिनेमांमध्ये त्यानी केलेल्या भूमिका या सर्व भूमिका रसिकांना खूप आवडल्या व त्यांच्या दीर्घकाळपर्यंत लक्षात राहतील अशाच आहे. आत्ता काही वर्षांपूर्वी सिंघम सिनेमामध्ये छोटीशी कॉन्स्टेबलची भूमिका त्याने उत्कृष्टरित्या वठवली. अशोक सराफचे वैशिष्ट्य म्हणजे अचूक टायमिंग साधत केलेली संवादफेक व त्यासोबतच त्याचा मुद्राभिनय. हिंदीतील जॉनी लिव्हर हा अभिनेता खरे तर अशोक सराफच्या खूप नंतर चित्रपटसृष्टी आलेला विनोदी अभिनेता आहे. त्याची पण स्वतःची अशी स्वतंत्र शैली आहे परंतु बरेच वेळा तो जेव्हा मुद्राभिनय करतो तेव्हा त्याच्यावर अशोक सराफची छाप जाणवते. अशोक सराफच्या अभिनय कारकीर्दीला काही विशिष्ट वर्षे पूर्ण झाल्यानंतर एका वाहिनीवर अशोक सराफच्या चित्रपटा संबंधीचा व त्याच्या कारकिर्दी संबंधीचा खूपच रंगतदार असा कार्यक्रम सादर झाला होता. त्या कार्यक्रमाचे शीर्षक मोठे समर्पक होते ते शीर्षक होते "सम्राट अशोक" आणि खरोखर अशोक सराफ हा अभिनयाचा  सम्राटच आहे. 90 च्या दशकात प्रदर्शित झालेल्या जवळपास सर्वच विनोदी चित्रपटात अशोक सराफ हा होताच. खरे तर त्याचे अनेक चित्रपट पाहण्यातच नाही आले. पांडू हवालदार सारखा त्याचा गाजलेला चित्रपट सुद्धा कधी पाहिला नाही गोष्ट धमाल नाम्याची व इतरही काही ग्रामीण पार्श्वभूमी असलेले त्याचे चित्रपट कधी पाहण्यात आले नाही. परंतु त्या चित्रपटातील त्याची गाणी मात्र पाहिली. गाण्यांवरती अभिनय व नृत्य करताना सुद्धा अशोक सराफने त्याची एक स्वतंत्र शैली दर्शकांना दाखवलेली आहे. विशेषतः त्याचे सर्वात लक्षात राहिलेले गाणे म्हणजे अश्विनी तू ये ना. किशोर कुमारने मराठीत गायलेले हे पहिलेच गाणे होते. या गाण्यामध्ये अशोक सराफने धमाल केलेली आहे तसेच इतरही गाण्यांमध्ये त्यानी धमाल उडवलेली आहे. एकूणच अशोक सराफ या अभिनेत्याने दर्शकांचे खूप मोठे मनोरंजन केलेले आहे, दर्शकांना त्यांच्या जीवनातील समस्या व दुःखे विसरायला लावलेली आहेत, त्यांच्या ओठांवर हास्य फुलवलेले आहे. सरकारने दर्शकांसाठी याची परतफेड अशोक सराफला महाराष्ट्र भूषण देऊन केलेली आहे हे खूपच अभिनंदनीय असे आहे. तमाम महाराष्ट्रवासियांना आनंदाची अनुभूती देणारी ही पुरस्काराची घोषणा आहे. अशोक सराफ यांचा सेंटीमेंटल नावाचा सिनेमा लवकरच झळकणार आहे. त्यात सुद्धा अशोक सराफ यांनी चांगलेच काम केले असेल यात शंका नाही. अशोक सराफ यांना दीर्घायुष्य लाभो व त्यांच्या अधिकाधिक भूमिका सिनेरसिकांना पाहायला मिळतो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

1 टिप्पणी: