२९/०२/२०२४

Article about abusing to burocrats and politicians by allegater's leader.

बाष्कळ पणे बोलू नये, तोंडी शिवी असू नये |


शीर्षकातील समर्थांच्या श्लोकातल्या ओळी तर सर्वांसाठीच अनुकरणीय आहेत परंतू या ओळींचे अनुसरण हे सांप्रतकालिन नेत्यांनी, आंदोलकांच्या नेत्यांनी सर्वप्रथम करावे असे वाटते.

भारत देश व देशातल्या विविध राज्यात आजकाल शेकडो आंदोलने होत आहेत. अनेक नागरिक त्यांना हव्या असलेल्या तथाकथित हक्कांसाठी रस्त्यावर उतरतात, सार्वजनिक संपत्तीची सुद्धा हानी करतात व वरतून सरकारने नोंदवलेले गुन्हे मागे घेण्यास सुद्धा भाग पाडतात असे चित्र गेल्या काही वर्षात देशांमध्ये दिसत आहे. नागरिकांच्या न्याय्य हक्कांसाठी आंदोलन करणे हे योग्यच आहे परंतु अशा हक्कांची मागणी करतांना डोके ठिकाणावर असणे सुद्धा जरुरी असते, आपण काय बोलतो आहे याचे भान असणे जरुरी असते. कोणतेही सरकार असो त्या सरकारला आंदोलकांच्या मागण्या पूर्ण करताना इतरही जनतेचे हित ध्यानात ठेवणे सुद्धा तितकेच आवश्यक असते. त्यामुळे आंदोलकांनी आपलाच तेवढा हेका पूर्ण झाला पाहिजे असा बालहट्ट ठेवणे योग्य नाही. आजकाल तर या आंदोलकांवर सुद्धा म्हणावा तितका विश्वास ठेवता येत नाही कारण की यांना कुणीतरी राजकारण्यांनीच आंदोलन करण्यास उद्युक्त केले असते. यांना जनतेच्या, समाजाच्या हिताशी काहीही घेणे-देणे नसते. हल्लीच्या आंदोलकांना कुणीतरी प्रायोजित केलेले असते. तसे अनेक वेळा उघडकीस सुद्धा आले आहे. गत काळात झालेल्या शेतकरी आंदोलनास  विदेशातून टुल-किट आली होती हे सर्वांनीच पाहिले आहे. आंदोलन करणे हे योग्य असले तरी आंदोलन व त्यांच्या नेत्यांनी कोणतेही भाष्य करतांना सुयोग्य शब्दप्रयोग केले पाहिजे. आंदोलकांचे काही नेते तर कधी अधिकाऱ्यांना शिवीगाळ करतात तर कधी थेट मंत्र्यांना सुद्धा शिवीगाळ करतात. मोठ्या-मोठ्या थोर पुरुषांच्या पुतळ्यासमोर आंदोलन करताना यांची अर्वाच्य भाषा पाहून समाजातील सर्वच सुज्ञांना मोठे आश्चर्य वाटते. आंदोलनाच्या स्टेजवरून थोर पुरुषांच्या पुतळ्यासमोर आई-बहिणी वरून शिव्या देतांना यांना मोठे गाजवल्यासारखे वाटते, अशा नेत्यांना आपण अधिकारी, मंत्री यांना शिव्या देतो म्हणजे आपण किती बेधडक, धडाकेबाज आहोत असे त्यांच्या समर्थकांना दर्शवायचे असते. परंतु अशा तथाकथित नेत्यांना नेते म्हणून अल्पकाळच मान्यता मिळत असते. असे लोक कोणत्याही समाजाचे दीर्घकाळ नेतृत्व करू शकत नाही. भविष्यात असे नेते कुणाच्या खिजगणतीतही राहत नाही. यांना लोकमान्यता सुद्धा मिळत नाही, लोक यांना ओळखून घेतात. शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात त्यांचे अनुयायी म्हणवून घेणारे आंदोलनकर्ते कुणाची आई-बहिणी काढतात हे कितपत योग्य आहे ? याप्रसंगी गौतम बुद्धांची एक गोष्ट आठवते गौतम बुद्ध एकदा परिभ्रमण करीत असताना त्यांना एक व्यक्ती खूप शिव्या देतो शिव्यांची लाखोली वाहतो परंतु गौतम बुद्ध मात्र त्याला काहीच प्रत्युत्तर देत नाही कुणीतरी गौतम बुद्धांना विचारते की तुम्ही त्याला काही बोलत का नाही? तर गौतम बुद्ध म्हणतात की त्याच्या जवळ जे होते ते मला दिले आता त्याला देण्यासारखे माझ्याजवळ काही नाही म्हणून त्याने मला जे  दिले ते सर्व मी त्याला परत करतो. या कथेचे स्मरण आज या लेखाच्या निमित्ताने झाले. हा देश, हे महाराष्ट्र राज्य सुसंस्कृत देश आणि राज्य म्हणवले जाते, या देशातील जनता, आंदोलक, नेते विशेषतः नेतृत्व करणारे सर्वजण यांनी आपल्या जिभेवर लगाम ठेवणे अत्यंत आवश्यक असते. अन्यथा नेत्यांचेच अनुकरण तरुण वर्ग व समाज करत असतो. शिवीगाळ, असभ्य भाषा वापणारे नेते जर समाजात असतील तर भविष्यातील समाज सुद्धा तसाच होऊ शकतो, असे नेते असलेला समाज सुद्धा चुकीच्या दिशेने जाऊ शकतो. आपल्या देशात इंग्रजांच्या काळात सुद्धा अनेक आंदोलने झाली परंतु इंग्रज परकीय असूनही त्यांना तत्कालीन भारतीय आंदोलनकर्त्यांनी शिव्या दिल्याचे मात्र कधीही ऐकीवात किंवा वाचनात नाही. या लेखाचा हाच उद्देश आहे की तुम्ही खुशाल मागण्या करा, आंदोलने करा परंतु सार्वजनिक ठिकाणाहून थोर पुरुषांच्या पुतळ्यासमोरून शिवीगाळ करताना,  आई-बहिणी वरून शिवीगाळ करतांना दहा वेळा विचार करा. एकदा शिव्या दिल्यानंतर मग कितीही वेळा दिलगिरी व्यक्त केली तरी मग नंतर काही उपयोग होत नाही. कारण की धनुष्यातून सुटलेला बाण जसा वापस घेता येत नाही तसा तोंडातून निघालेला शब्दही वापस घेता येत नाही. आंदोलने करा, मागण्या करा परंतु शिव्या देऊन नव्हे तर सुयोग्य शब्दात व सुज्ञतापूर्वक आपले मत मांडा आपल्या मागण्या करा. आपले राज्य हे संतांचे राज्य आहे, मोठी संत परंपरा या महाराष्ट्राला लाभली आहे , जातपात विरोधी कार्य या संतांनी केले आहे. नाथ महाराजांनी आपल्या घरी श्राद्ध घातले तेंव्हा तत्कालीन काळात अस्पृश्य असलेल्या लोकांना पंक्तीला बसवले होते. तेंव्हा जातीवाचक शिव्या आपल्या तोंडावाटे निघू नये. रामदास स्वामींनी सुद्धा म्हटले आहे

बाष्कळ पणे बोलू नये, तोंडी शिवी असू नये |

समर्थांच्या श्लोकातील वरील ओळी तर सर्वांसाठीच अनुकरणीय आहेत परंतू या ओळींचे अनुसरण हे सांप्रतकालिन नेत्यांनी, आंदोलकांच्या नेत्यांनी सर्वप्रथम करावे असे वाटते म्हणून हा लेखन प्रपंच.

४ टिप्पण्या: