२२/०२/२०२४

RIP Ameen Sayani

पायदान नंबर एकचा उद्घोषक

अमीन सयानी आज इहलोक सोडून गेले आहेत. स्वर्गामध्ये कोणती उद्घोषकांची मालिका असेल तर त्या मालिकेतल्या पायदान क्रमांक एक वर ईश्वराने अमीन सयानी यांनाच बसवले असेल.

एक काळ असा होता की, बुधवारी रात्री आठ वाजता श्रोतावर्ग रेडिओला कान लावून बसलेला असे, आपल्या प्रिय उद्घोषकाच्या "बहनो, भाईयो बिनाका गीतमाला मे आपका स्वागत है"  हा आवाज ऐकण्यासाठी. या कार्यक्रमाचे लोक इतके चाहते होते की बिनाका गीतमाला मधील विविध पायदानांवरील गीते ऐकण्यासोबतच त्यांना अमीन सयानी या उद्घोषकाचा आवाज सुद्धा ऐकायचा असे. अमीन सयानीचा आवाज 50- 60 च्या दशकापासून रेडिओवर घरोघरी ऐकला जात होता. घरोघरी अमीन सयानीचे फॅन झाले होते. रेडिओ म्हटला की अमीन सयानी. जणू काही रेडिओला पर्यायी शब्दच ! असे अमीन सयानीचे नांव झाले होते. मला आठवते 80 च्या दशकामध्ये बिनाका गीतमाला मी सर्वप्रथम रेडिओवर ऐकला होता. अमीन सयानी हे नांव मला तेंव्हा परिचित झाले. मग त्यांचे कित्येक कार्यक्रम मी ऐकले होते. बिनाकाचा सिबाका गीतमाला असे झालेले नामकरण सुद्धा मला स्मरते. मला आठवते आमच्या लहानपणी सुद्धा टीव्हीचा विशेष सुळसुळाट झालेला नव्हता प्रत्येकाच्या घरी रेडिओ मोठ्या प्रमाणावर ऐकला जायचा. रामानंद सागर यांचे रामायण जेव्हा 80 च्या दशकात दूरदर्शनवर झळकले होते तेंव्हा ही रामायण मालिका दर रविवारी लोक आवर्जून पाहत असत आणि रस्त्यावर संचारबंदी सदृश स्थिती दिसत असे. अगदी त्याचप्रमाणे 50 ते 80 पर्यंतच्या दशकात रात्री आठ म्हटले की रसिक श्रोतावर्ग हा आवर्जून बिनाका गीतमाला ऐकत असे. त्यातही रेडिओची खासियत अशी की श्रोतावर्ग हा कार्यक्रम घरी, दुकानात, रस्त्याने, चालता, फिरतांना, प्रवासात ऐकू शकत असे. फक्त सिनेगीत ऐकायला मिळावीत म्हणून लोक हा कार्यक्रम ऐकत नसत तर अमीन सयानी यांचे जादूई, ईश्वर आशीर्वाद प्राप्त असे स्वर त्यात असल्यामुळे त्या कार्यक्रमाला मोठी लोकप्रियता लाभली होती. अमीन  सयानी जेव्हा रेडिओ उद्घोषित झाले त्यानंतर अल्पावधीतच त्यांनी विविध कार्यक्रमांद्वारे लोकप्रियता प्राप्त केली. विविध भारती,  सिलोन आदी रेडिओ केंद्रांवर त्यांचे कार्यक्रम सादर होत असत. अनेक प्रत्यक्ष कार्यक्रम त्यांनी सादर केले आहेत. आपल्या अनोख्या अशा आवाजात ते सादरीकरण करीत असत. उद्घोषणा देतांना वाक्यानुसार चढ-उतार, आवाजाचा कमी जास्तपणा यामध्ये ते लिलया बदल  करीत असत. "पायदान नंबर एक का गीत" असे त्यांचे शब्द ऐकल्यावर खरोखरच ते गीत एक नंबरचेच आहे याची श्रोत्याला खात्री पटत असे. पायदन हा शब्द गीताला वापरणे हे तेंव्हा बालपणी काही लक्षात आले नाही परंतु आता लेख लिहितांना यावर बराच विचार केला कारण अनेक बातम्या व लेख यात पादान असे लिहिलेले वाचनात आले होते. मराठीत पायदान हा शब्द आपण वेगळ्या अर्थाने वापरतो म्हणून मग माझे मित्र डॉ खान व माझा रेडिओ उद्घोषक राहिलेला विद्यार्थी या दोघांची मदत घेतली. या दोघांनीही पायदान हा शब्द, गीत कोणत्या पायरीवर आहे या अर्थाने अमीन सयानी वापरत असत असे खात्रीने सांगितले. पायदान शब्दाची खात्री झाल्यावर पुढील लिखाण हाती घेतले. अमीन सयानी यांचा स्वर थोडा अनुनासिक असला तरी त्या स्वराने श्रोत्यांवरती जादू केली होती. असे म्हणतात अमिताभ बच्चनला सुद्धा त्यांनी अपॉइंटमेंट दिली नव्हती. आता काही वर्षांपूर्वी  सयानी यांची चित्रे माध्यमांवर प्रसारित झालेली आठवते. अमीन सयानी यांनी रेकॉर्ड ब्रेक अशी कारकीर्द केलेली आहे. त्यांच्या नावाने विविध रेकॉर्ड्स आहेत. लिमका बुक ऑफ रेकॉर्डमध्ये सुद्धा त्यांचे नाव नोंदले गेलेले आहे. चित्रपटसृष्टीतील अनेक तारे-तारका, गायक हे सुद्धा अमीन सयानी यांचे चाहते होते. ज्याप्रमाणे लता मंगेशकर या गायन क्षेत्रातील सम्राज्ञी आहेत तसेच अमीन सयानी सुद्धा रेडिओ उद्घोषकांमध्ये सम्राटच म्हणावे लागतील. आज विविध रेडिओ बँड उपलब्ध आहेत, एफ. एम. चॅनल उपलब्ध आहेत परंतु श्रोत्यांना आकर्षून घेईल असा रेडिओ जॉकी चा आवाज मात्र अभावानेच दिसतो. अमीन सयानी काल अचानक वयाच्या 91 व्या वर्षी आपल्यातून श्रोत्यांच्या मनाला चटका लावून गेले. कालपासून समाज माध्यमांवर त्यांच्याबद्दल बरेचसे लिखाण होत आहे, त्यांची चित्रे प्रसारित होत आहेत , त्यांना श्रद्धांजली अर्पण करीत आहेत यावरून जनतेचे त्यांच्यावर किती प्रेम होते हे दिसून येते. अमीन सयानी आज इहलोक सोडून गेले आहेत. स्वर्गामध्ये कोणती उद्घोषकांची मालिका असेल तर त्या मालिकेतल्या पायदान क्रमांक एक वर ईश्वराने अमीन सयानी यांनाच बसवले असेल. अमीन सयानी यांना ही शब्दरुपी श्रद्धांजली व विनम्र अभिवादन.

1 टिप्पणी: