०२/०५/२०२४

Article about maratha worrier great bajirao peahwe

 जो जीता वो बाजीराव 

सिकंदर तो विदेशी था, हम उसको याद रखते पर मुघलो को डरानेवाले, 41 युद्ध जितनेवाले पेशवा बाजीरावजी को हम याद नही रखते|

यंदाची 28 एप्रिल तारीख जवळ येत होती थोरले बाजीराव पेशवे यांचा 28 एप्रिल हा स्मृतिदिन असल्याने त्या दिवशी काहीतरी अभिवादनपर कार्यक्रम घ्यावा का ? किंवा व्याख्यान घ्यावे का? असे काहीसे वाटू लागले होते परंतु दैनंदिन कार्य व जबाबदाऱ्या यामुळे अनेक वेळा संकल्पित केलेल्या, विचाराधीन असलेल्या गोष्टी मागे पडून जातात. 28 एप्रिल जवळ येत होती तेवढ्यात माझे मित्र धनंजय टाले हे पुण्याहून आले व त्यांनी ओंकारेश्वरला जाण्याची तीव्र इच्छा प्रकट केली. मी व्यस्त असल्यामुळे त्यांनी 28 एप्रिल हीच तारीख सुचवली. त्या दिवशी रविवार पण होता. मला ओंकारेश्वर पासून 41 किलोमीटर अंतरावर असलेल्या श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे या महापराक्रमी पुरुषाचे समाधी स्थळ खुणावू लागले. आमच्या ओंकारेश्वरच्या यात्रेमध्ये रितेश काळे व विशाल देशमुख हे सुद्धा सहभागी झाले. आम्ही सर्वांनी मिळून ओंकारेश्वर, रावेरखेडी आणि सियाराम बाबाजींचे भट्टयाण या स्थळांना जाण्याचे नक्की केले. सकाळी पाच वाजताच म्हणजे "पौ फटनेसे पहले" अर्थात पहाट होण्यापूर्वी. हिंदीत भल्या पहाटेस "पौ फटनेसे पहले" असे म्हणतात. ज्या सूर्यासम बाजीराव पेशव्यांचे तेज होते त्या सूर्यनारायणाची किरणे अद्याप भूमातेवर पडायचीच होती आणि आमची गाडी ब-हाणपूरच्या रस्त्याने लागली.

ब-हाणपूर, अशीरगढ किल्ला म्हणजे  "दख्खन का दरवाजा", मुघलांच्या ताब्यातील तत्कालीन मुख्य शहर, संभाजी महाराजांनी लुटलेले. अशा आठवणी मनात येत होत्या. कुठल्याही ऐतिहासिक स्थळी जातांना माझ्या मनात आपले राजे, महाराजे, सरदार, सैन्य हे धर्मरक्षणासाठी ऊन, वारा, पावसात कसे जात असतील ? जंगल, पहाडी भागातून जाणा-या अशा बिकट वाटेतून ते कसे जात असतील ?, आज आपल्याला 20 रू मध्ये कुठेही पाणी मिळते, आपल्या त्या महान पुर्व जांना सर्व सैन्य, हत्ती, घोडे, बैल यांच्या पिण्याच्या  पाण्याच्या सोयीसाठी नदी आल्याशिवाय मुक्काम ठोकता येत नसेल. असे विचार माझ्या मनात नेहमीच घोळावतात. ओंकारेश्वरच्या दिशेने आम्ही आगेकूच करीत होतो. प्रवासास लवकरच सुरुवात केल्यामुळे रस्त्याने वाहनांची वर्दळ अतिशय कमी होती. सुखकर प्रवास करून आम्ही लवकरच ओंकारेश्वरला पोहोचलो. तिथे दर्शन झाल्यानंतर मग आम्ही रावेरखेडीला प्रयाण केले. ओंकारेश्वर ते रावेरखेडी हा 41 किलोमीटरचा रस्ता आहे. रावेरखेडीला पोहोचल्यावर आम्हाला कळले की  तिथे नुकताच बाजीराव पेशवे यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम होऊन गेला होता. त्या कार्यक्रमास मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्री येऊन गेले होते. रावेरखेडीला माझी ही दुसरी भेट होती पण माझ्या समवेतच्या मित्रांची मात्र ही पहिलीच भेट होती त्यामुळे ते तिघे तर जास्त उत्सुक व उत्साही दिसत होते. आम्ही त्या अशा एकमेवाव्दितीय महान अपराजित योद्धयाच्या समाधीचे दर्शन घेतले की जो 41 मैदानी लढायांमध्ये हारला नव्हता. एकही सैनिक न गमावता बाजीरावांनी जिंकलेली पालखेडची लढाई तर आजही विदेशी इतिहासात शिकवली जाते. अशा बाजीरावांच्या समाधीच्या जवळच्याच पेशवा टी स्टॉलच्या दयाराम पवार यांनी स्वतःहून दिलेली रक्त पुष्पे बाजीरावांच्या समाधी स्थळी अर्पण करून त्यांना नमन केले नंतर आम्ही आजूबाजूचा परिसर न्याहाळला.

"गंगा पुण्य कनखले, सरस्वती कुरुक्षेत्रे

ग्रामे वा अरण्ये, रेवा सर्वत्र पुज्यते"

अशा नर्मदा नदीच्या विस्तीर्ण पात्रावरून दृष्टी हटत  नव्हती. तिथून निघणार तोच आम्हाला बाजीरावांचे चित्र टी-शर्ट वर असलेले काही तरुण दिसले. माझी उत्सुकता वाढली, मी चौकशी केली असता, "जय बाजीराव, मैं संतोष तिवारी, आफ्रिकासे आया हुं |" माझी उत्सुकता आणखी वाढली अधिक चौकशी केली असता त्यांनी सांगितले की, "मै कई सालोसे बाजीरावजी की समाधीपर उनकी पुण्यतिथी के दिन रावेरखेडी को आफ्रिका से आता हुं| वैसे मैं भिलाई से हुं|" असे त्यांनी सांगितले. त्यांच्या समवेतच्या काही तरुण व किशोरवयीन मुलांनी सुद्धा बाजीरावांचे चित्र असलेला टी-शर्ट परिधान केला होता. त्यातील मथुरेच्या एका तरुणानी मला सांगितले की आम्ही एक नवीन नारा बनवला आहे तो म्हणजे "जो जीता वो बाजीराव" त्यांनी आमच्याकडून तसे म्हणवून सुद्धा घेतले. "सिकंदर तो विदेशी था, हम उसको याद रखते पर मुघलो को डरानेवाले, 41 युद्ध जीतनेवाले पेशवा बाजीरावजी को हम याद नही रखते" अशी अत्यंत समर्पक पुष्टी त्यांनी केली. त्यांचे म्हणणे अगदी खरे होते थोरल्या बाजीराव पेशव्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचा विस्तार केला. भारतभर मराठा साम्राज्य प्रस्थापित केले, मुघलांना जेरीस आणले, एकही लढाई हरले नाही अशा बाजीरावांची महाराष्ट्रात मात्र नेहमीच उपेक्षा झाली आहे. बाजीरावांबद्दल अत्यल्प अशी माहिती महाराष्ट्रवासीयांना आहे. त्यांची समाधी रावेरखेडी येथे आहे हे सुद्धा अनेकांना ठाऊक नाही. परंतु त्याच वेळी देशाच्या इतर राज्यातून आलेले अमराठी तरुण मात्र बाजीरावांच्या पराक्रमाने भारावलेले असे दिसत होते. गत काही वर्षात महाराष्ट्रात झालेल्या राजकारणामुळे महाराष्ट्रातील थोरपुरुष, महापुरुष, लढवय्ये ऐतिहासिक पराक्रमी पुरुष यांना विविध जातींमध्ये विभागले गेले. परंतु महाराष्ट्रातील पराक्रमी लोकांबद्दल इतर राज्यातील अमराठी लोकांना मात्र नितांत आदर आहे. याचे अजून एक उदाहरण म्हणजे सावरकरांवरील सिनेमा. सावरकर हा सिनेमा हरियाणातला रणदीप हुडा काढतो आणि महाराष्ट्रातीलच काही नतद्रष्ट मात्र उगीच सावरकरांची अवहेलना करीत असतात. त्याचप्रमाणे बाजीरावांच्या पुण्यतिथीला देशाच्या इतर राज्यातून तरुण येतात परंतु महाराष्ट्रातले तरुण मात्र तिथे अभावानेच आढळतात. संतोष तिवारी यांना मी त्यांच्या समाज माध्यमांवरील खात्याबद्दल विचारले असता त्यांनी त्यांच्या फेसबुक खात्याचे नाव "बाजीराव बल्लाळ" आहे असे सांगितले. हे ऐकून तर मी अवाकच झालो. मला त्यांच्याबद्दल अधिकच आदर वाटू लागला. श्री तिवारी फेसबुक या समाज माध्यमाचा उपयोग बाजीरावांचा महिमा, त्यांची कीर्ती जगापुढे यावी म्हणून करीत आहे हे किती कौतुकास्पद आहे, नाही का ? समाधी स्थळाचा कारभार पाहणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुद्धा त्यांनी काही सूचना दिलेल्या आम्हाला दिसल्या. या ठिकाणी एका आश्रमात आम्हाला चविष्ट असे बाजीराव भोजन सुद्धा मिळाले. झुणका आणि पोळी असे ते साधे जेवण मोठे रुचकर लागले. पत्रावळीवर ते भोजन करतांना मला हातावर हुर्डा खाणारे व पुढच्या मोहिमेवर जाणारे बाजीराव आठवत होते. भोजनोपरांत काशीबाई यांच्यासाठी बाजीरावांनी बांधलेल्या शिवमंदिराचे दर्शन घेऊन आम्ही सियाराम बाबा यांच्या भट्टयाण या ठिकाणी गेलो. तपमान भरपूर होते आणि वेळ पण सकाळी ज्याचे आगमन होण्यापूर्वी आम्ही निघालो होतो त्या सुर्यास्ताची झाली होती. अंगात ताप  असतांना नर्मदा नदीत कशाची तमा न बाळगता बाजीराव पोहण्यासाठी झेपावले होते त्याच नर्मदा मायीत बाजीरावांचे स्मरण करत, त्यांना वंदन करीत आम्ही सुद्धा झेपावलो. क्षणात सर्व उष्मा दूर झाला. मासोळ्या अंग चाटून जाऊ लागल्या, नर्मदेच्या त्या थंडगार पाण्यातून बाहेर निघावे वाटत नव्हते. नर्मदेच्या त्या पाण्यामुळे  अंगी नवचैतन्य आले, थकवा लांब पळाला आणि "जो जीता वो बाजीराव" हा मंत्र ध्यानी घेऊन आम्ही  गच्छंतीचा प्रवास सुरू केला.

1 टिप्पणी: