२५/०४/२०२४

Article about constitution and it's features

स्मरण घटनेच्या वैशिष्ट्यांचे


सध्या  सत्ताधारी व विरोधक यांच्या घटना बदलाच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या शाब्दिक चकमकीच्या निमित्ताने घटनेच्या वैशिष्ट्यांचे विशेषतः एका वैशिष्ट्याचे प्रकर्षाने स्मरण होत आहे.

खरे तर आपण सर्व शालेय जीवनात घटनेची वैशिष्ट्ये शिकलो आहोत पण तरीही शाळेत शिकलेल्या अनेक बाबींचे जीवनाच्या रहाटगाडग्यात विस्मरण होत असते. या बाबी पुनश्च आठवल्यावर मात्र अनेक गोष्टींचा उलगडा होत जातो आणि त्या गोष्टींचा खुलासा होण्यास मदत होते. यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने घटना बदलाबाबत बराच उहापोह व मोठा गदारोळ होत आहे म्हणून या पार्श्वभूमीवर स्मरण होते ते आपल्या घटनेच्या वैशिष्ट्यांचे. या निवडणुकीत भाजपाने अबकी बार 400 पार असा नारा दिला आहे व म्हणून विरोधी पक्ष काँग्रेस 400 चा आकडा हा घटनेत बदल करण्यासाठी म्हणून सत्ताधा-यांना हवा आहे असा कांगावा करीत आहे. तसे पाहिले तर स्वातंत्र्योत्तर काळात आजरोजीपावेतो कित्येक वेळा राजकीय फायदा होईल या हेतूने घटनेत बदल केले गेले आहेत. नितीन गडकरी यांनी त्यांच्या एका भाषणात घटनेत 80 वेळा बदल झाल्याचे सांगितले आहे. विरोधकांच्या घटना बदलाच्या कांगाव्यास सत्ताधारी पक्ष पुन्हा सत्तेत आल्यास "घटनेत बदल करणार" , ही विरोधकांनी पसरवलेली अफवा आहे असे म्हणत आहे. दोन्ही पक्षांचे दावे-प्रतिदावे हे काही असू देत. भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव बाबासाहेब आंबेडकर व त्यांच्या घटनेच्या मसुदा समिती मधील चमूने अथक प्रयत्न करून, विविध देशांच्या घटनांचा अभ्यास करून सर्वांग सुंदर, जगातील सर्वात मोठी लिखित अशी घटना आपल्या देशाला अर्पण केली आहे व या घटनेचा सर्वच भारतीयांना अभिमान आहे. या समितीमध्ये एकाहून एक बुद्धिजीवी, अभ्यासू असे सात सदस्य होते. तसेच संविधान सभेतील एकूण 289 सभासदांपैकी 15 सभासद ह्या गार्गी, मैत्रेयी या विदुषीं प्रमाणे बुद्धिमान असलेल्या हुशार महिला सुद्धा होत्या. घटना समिती, मसुदा समिती, संविधान सभा यांच्या अथक प्रयत्नातून निर्मित आपल्या घटनेची अनेक वैशिष्ट्ये आहेत. त्या वैशिष्ट्यांबाबत विस्तृतपणे लिहायला गेलो  तर मोठा प्रदीर्घ लेख होईल म्हणून त्या वैशिष्ट्याचा थोडक्यात आढावा इथे घेऊ आणि नंतर आज घटना बदलाच्या उहापोहाच्या अनुषंगाने सुरु असलेल्या विरोधक आणि सत्त्ताधारी पक्षांच्या आरोप प्रत्यारोपामुळे ज्या वैशिष्ट्याची विशेष आठवण झाली असे आपल्या घटनेला काळानुरूप अधिक प्रगत किंवा आजच्या भाषेत update/upgrade करता येईल अशा आपल्या घटनेच्या एका मोठ्या वैशिष्ट्याबाबत सुद्धा पाहू. 

     जगातील सर्वात मोठी व लिखित अशी आपली राज्यघटना आहे. राज्यघटनेची निर्मिती ही विविध स्त्रोतांपासून झाली आहे. लोककल्याणकारी राज्य अपेक्षित असणारी व नागरिकांना मूलभूत हक्क प्रदान करणारी तसेच नागरिकांची काही मूलभूत कर्तव्ये सुद्धा असल्याचे सांगणारी आणि मार्गदर्शक तत्वे सांगणारी, संसदीय शासनपद्धतीचा अवलंब करणारी व न्यायव्यवस्थेस स्वतंत्रता प्रदान करणारी, आणि न्यायव्यवस्थेस महत्वाचा दर्जा देणारी, आपल्या देशात ज्यामुळे प्रजेच्या हाती सत्तेची चावी आलेली आहे ती प्रजासत्ताक पद्धती असणारी अशी आपल्या घटनेची मुख्य वैशिष्ट्ये आहेत. 

      या वैशिष्ट्यांशिवाय ज्या एका महत्वाच्या वैशिष्ट्याचे घटना बदलाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी व विरोधक यांच्यात सुरू असलेल्या शाब्दिक चकमकीच्या निमित्ताने प्रकर्षाने स्मरण होत आहे त्या विषयी थोडक्यात पाहू. घटनेचे ते वैशिष्ट्य आहे "घटनेची लवचिकता". आपली राज्य घटना ही पुरेशी लवचिक व ताठर अशी आहे. अमेरिकन राज्यघटना ही ताठर आहे त्यामुळे त्या घटनेत बदल करणे किंवा ती बदलणे हे कठीण आहे. पण आपली राज्यघटना ही स्वत: घटना निर्मात्यांनी पुरेशी लवचिक अशी बनवली आहे म्हणजे भविष्यात घटनेत काही ना काही तरी बदल करणे आवश्यक असल्यास ते करता येऊ शकतील अशी दूरदृष्टी त्यांची होती. म्हणूनच पुरेशी लवचिकता हे आपल्या राज्यघटनेचे एक महत्वाचे वैशिष्ट्य आहे. घटनेत भविष्यात बदल करावे लागतील अशी खुद्द घटना निर्मिती करणा-या कुशाग्र, तीक्ष्ण बुद्धिमत्ता असलेल्या  बाबासाहेबांना व तशाच त्यांच्या हुशार सहकाऱ्यांना नक्कीच ज्ञात होते. मग जर पुरेशी लवचिकता हे आपल्या राज्यघटनेचे महत्वाचे असे वैशिष्ट्य आहे तर घटनेत बदल होतो आहे असा कांगावा करणे म्हणजे जनतेची एक प्रकारे दिशाभूल करणे असेच कृत्य आहे. तसेच घटनेत मुळीच बदल करणार नाही असे म्हणणे सुद्धा चुकीचेच नाही का ? काळानुरूप आवश्यक, सर्व जनतेस हितकारक, राष्ट्रहिताचे असे काही बदल हे होतच असतात किंवा करावे लागतात असे अनेक थोर व्यक्ती व राष्ट्रपुरुषांनी सुद्धा म्हटले आहे. असे बदल भविष्यात करावे लागतीलच म्हणूनच कदाचित आपल्या घटनेस "पुरेशी लवचिक" अशी बनवली आहे.

     विरोधक म्हणत असलेल्या घटना बदलाच्या पार्श्वभूमीवर वरील सर्व बाबींचे स्मरण झाले. त्यातही "पुरेशी लवचिक" या आपल्या घटनेच्या  महत्वपुर्ण अशा वैशिष्ट्याचे स्मरण झाले म्हणून ते वाचकांसमोर प्रकट करावेसे वाटले त्यामुळे कोणी काहीही म्हटले तरी जनतेने सुज्ञतेने, अभ्यासू पद्धतीने लोकप्रतिनिधींच्या वक्तव्यांवर विचार करावा हेच या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अभिप्रेत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा