१३/०६/२०२४

Article about Ganesh Damodar Savarkar

भगूरचे बलराम


स्वातंत्र्यवीर सावरकर व बाबाराव सावरकर आणि  श्रीकृष्ण व बलराम या बंधुंमध्ये लहान्याने मोठ्यापेक्षा उत्तुंग भरारी मारलेली दिसते.

आज 13 जून एका जुन्या पोस्टची फेसबुकने आठवण करून दिली. ती पोस्ट होती गणेश उपाख्य बाबाराव दामोदर सावरकर यांच्या जयंतीची. बाबाराव सावरकर म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे ज्येष्ठ बंधू. सावरकर कुटुंबीय हे आपल्या देशातील एकमेवाद्वितीय तसेच देशभक्तीने, त्यागाने ओतप्रोत असलेले असे कुटुंब आहे. त्याच परिवारातील सर्वात ज्येष्ठ व्यक्ती म्हणजे बाबाराव सावरकर. बाबारावांचा जन्म  नाशिक जिल्ह्यातील भगूर या ठिकाणी झाला.  लहानपणापासूनच त्यांच्या अंगी सुद्धा संघटनात्मक चातुर्य होते, तल्लख बुद्धिमत्ता होती. त्यातूनच स्वातंत्र्यवीर सावरकरांसोबत मित्रमेळा, अभिनव भारत या संघटनांच्या स्थापनेमध्ये त्यांचाही पुढाकार होता. त्यांनी विपुल लेखन सुद्धा केले आहे. हिंदुराष्ट्र - पूर्वी-आता-पुढे, शिवरायांची आग्र्यावरील गरुडझेप, ख्रिस्त परिचय अर्थात ख्रिस्ताचे हिंदुत्व यांसारखी त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांचे वाचन अफाट होते. ते व्यासंगी होते तबला, फलज्योतिष, औषधीशास्त्र यातही त्यांना आवड होती. स्वातंत्र्यवीर सावरकरांना  शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे, त्यांच्या शिक्षणासाठी स्वतः कष्ट करणे, प्लेगच्या साथीत परिवाराची देखभाल करणे ही जबाबदारी बाबारावांनी घेतली लहान बंधू नारायणराव हे  प्लेगग्रस्त असतांना रुग्णालयात भरती होते तेव्हा त्यांची देखभाल बाबारावच करत होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांना महाविद्यालयीन शिक्षण, क्रांतिकार्य, विदेशात जाणे यासाठी सुद्धा बाबारावांनी प्रेरणा व पाठबळ दिले. त्यांच्या पत्नी येसूबाई यांचा सुद्धा कुटुंबासाठी खूप मोठा त्याग आहे. बाबाराव आणि येसूबाई यांनी खूप कष्ट सहन केले आहेत. बाबाराव व स्वातंत्र्यवीर सावरकर दोघेही बंधू इंग्रजांच्या ताब्यात असतांन  त्यांच्या घरावर जप्ती आली होती तेव्हा येसूबाई व  स्वातंत्र्यवीरांच्या पत्नी यमुनाबाई दोघींनाही अपरिमित असा त्रास, असे कष्ट झाले होते की जसे की ज्याची तुलना नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी जेव्हा 1857 चे स्वातंत्र्य समर हे ब्रिटिशांनी बंदी घातलेले पुस्तक भारतामध्ये पाठवले तेव्हा त्या पुस्तकाच्या प्रति वाटत असतांना बाबाराव सावरकरांना अटक झाली व त्यांना अंदमान येथे काळ्या पाण्याची शिक्षा भोगण्यास पाठवण्यात आले. या सर्व गोष्टींपासून स्वातंत्र्यवीर सावरकर अनभिज्ञ होते. पुढे मार्सेलिस बंदरावर फ्रान पोलिसांनी पकडून ब्रिटिशांच्या ताब्यात दिल्यावर स्वातंत्र्यवीर सावरकरांची सुद्धा अंदमानला रवानगी करण्यात आली. तिथे एक दिवस स्वातंत्र्यवीरांना त्यांच्या जेष्ठ बंधूंचे ओझरते असे दर्शन अन्दमानच्या तुरुंगात झाले. दोघाही बंधूंना आश्चर्य वाटले बाबाराव तुम्ही सुद्धा इथे कसे? असा प्रश्न सावरकरांना पडला. पुढे सर्व स्पष्ट झाले. काही वर्षानंतर दोघांचीही मुक्तता झाली. पुन्हा सामाजिक कार्यात दोघेही मग्न झाले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मोठी लोकप्रियता लाभली त्यामानाने बाबाराव सावरकर मात्र मागे पडले. नुकत्याच झळकलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटात एक दृश्य खूप काही सांगून जाणारे आहे. या दृश्यात स्वातंत्र्यवीर सावरकरांची लोक मिरवणूक काढतात त्या मिरवणुकीत बाबाराव सावरकर मात्र एका बाजूला एकटेच पडलेले दिसतात, त्यांच्याकडे गर्दीतील कुणाचेही लक्ष नसते. हे दृश्य पाहून प्रेक्षकांचे मन द्रवित होते. आजही बाबाराव सावरकरांबद्दल समाजामध्ये उदासीनता आहे. त्यांच्याबद्दल अनेकांना अल्पशी माहिती आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरां प्रमाणेच बाबारावांना सुद्धा अंदमानात काथ्या कुटणे, कोलू फिरवणे अशी यमयातनादायी कामे करावी लागली होती. ते आजारी असताना सुद्धा जेलर बारी त्यांच्याकडून काम करून घेत असे. स्वातंत्र्यवीर सावरकर, बाबाराव सावरकर तसेच कित्येक क्रांतीकारकांनी या देशासाठी हालअपेष्टा  सोसल्या परंतु त्यापैकी अनेकांची नांवे आज लोकांना ठाऊक सुद्धा नाही. महाराष्ट्रातील क्रांतिकारकांबद्दल सुद्धा अत्यल्प अशी माहिती लोकांना आहे.  हल्लीची नेते मंडळी नेहमी त्यांच्या मतपेट्या सुरक्षित रहाव्या म्हणून काही ठराविक लोकांचाच महाराष्ट्र आहे असे वारंवार म्हणत असतात. ज्यांची नावे ते मते मिळावीत म्हणून वारंवार घेतात त्या महान प्रभृती प्रमाणेच  महाराष्ट्रात, देशात इतरही अनेक थोर पुरुष,शिक्षण तज्ञ व क्रांतिकारक होऊन गेलेत मग हा महाराष्ट्र त्यांचा सुद्धा  नाही आहे का ? असा प्रश्न अनेकांना पडत असतो. अनेक थोर पुरुष क्रांतिकारक यांच्या नावाचा समाजाला पडत असलेला विसर पाहून तीव्र वेदना होतात. बाबाराव सावरकर सुद्धा त्यांपैकी एक उपेक्षित असे क्रांतीवीर आहे.  16 मार्च 1945 मध्ये बाबारावांचे निधन सांगली येथे झाले. त्यांची प्रकृती खालावली असल्याचा संदेश जेंव्हा स्वातंत्र्यवीरांना मिळाला तेंव्हा धीर गंभीर धीरोदात्त अशा कनिष्ठ बंधूनी जेष्ठाला जे अंतिम सत्य आहे त्यास समर्पित होऊन जावे असे सुचित केले होते. यावरून या दोघाही भावांची महत्ता लक्षात येते. सांगलीला बाबारावांचे स्मारक आहे श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांनी त्याचे अनावरण केले आहे. त्या ठिकाणी पंचधातूंची बाबारावांची मूर्ती सुद्धा आहे. आज त्यांच्या जयंती निमित्त हा लेख लिहिण्याची स्फूर्ती झाली हा सुद्धा एक योगच म्हणावा किंवा त्यांच्याविषयी लिहिण्याचे भाग्यच म्हणावे लागेल. आज आपल्या युवा पिढीला आदर्श अशा थोर पुरुषांच्या कथा त्यांचे गुणगान, त्यांचा त्याग, त्यांचे देश प्रेम, त्यांची निस्वार्थी वृत्ती हे सर्व सांगण्याची मोठी गरज निर्माण झाली आहे. आज आपल्या युवा पिढीसमोर भौतिक सुखांची रेलचेल आहे ती नसावी असे सुद्धा नाही परंतु या भौतिक सुखांसोबतच त्यांना बाबारावांसारख्या थोर पुरुषांची पुस्तके किंवा त्यांच्याबद्दलची माहिती सुद्धा उपलब्ध करून द्यावी हेच आज बाबाराव सावरकर यांच्या जयंतीदिनी सांगावेसे वाटते. 

    शेवटी इथे नमूद करावेसे वाटते की, भगवान श्रीकृष्णाचे कार्य कितीही मोठे असले तरी बलराम सुद्धा तितकेच पूजनीय व महान आहे.  स्वातंत्र्यवीर सावरकर व बाबाराव सावरकर आणि  श्रीकृष्ण व बलराम या बंधुंमध्ये लाहन्याने मोठ्यापेक्षा उत्तुंग भरारी मारलेली आहे.  सावरकरांची स्वातंत्र्य चळवळीतील कामगिरी जितकी उत्तुंग आहे , तितकेच  बाबरावांचे  कार्य सुद्धा महान आहे तसेच स्वातंत्र्यवीरांना जी प्रेरणा मिळालेली दिसते त्या मागे सुद्धा बाबरावच आहे. म्हणूनच बाबारावांना भगूरचे बलराम असे म्हणण्यात काही वावगे वाटत नाही. बाबारावांना विनम्र अभिवादन.

1 टिप्पणी:

  1. बाबाराव सावरकर यांच्या बद्दल तुमच्या या लेखातून खूप छान माहिती मिळाली

    उत्तर द्याहटवा