२०/०६/२०२४

Article about Nalanda University inauguration by PM Modi

हम करे राष्ट्र आराधन !

बख्तीयार खिल्जी विद्यापीठ पेटवत आहे, सर्वत्र हाहा:कार माजला आहे, प्रचंड ग्रंथसंपदा पेटल्याने धुराचे लोट उठत आहे, त्या धुरातून जणू मोठा ज्ञानाचा खजिना आकाशात विलीन होत आहे, सर्वत्र आक्रोश होत आहे असे दृश्य  माझ्या डोळ्यासमोर तरळत होते.

आता काही दिवसांपूर्वी टीव्हीवर काही विशेष कार्यक्रम नसल्यामुळे मी झी क्लासिक ही जुन्या सिनेमांची वाहिनी लावली. पडद्यावर नालंदा स्टेशन दिसले. "ओ मेरे राजा खफा ना हो ना" हे गीत पडद्यावर सुरू होते. हे गीत नालंदा विद्यापीठात चित्रीत झाले आहे. गीतात नालंदा विद्यापीठाचे अवशेष पाहून मला ते गौरवशाली विद्यापीठ, तिथे विदेशातून आलेले विद्यार्थी, तिथले भव्य बहु मजली ग्रंथालय, तिथले विहार, ध्यान केंद्रे, तिथे चालणारी चर्चासत्रे, तिथले ज्ञानदान करणारे शिक्षक, हो ज्ञानदानच तर होते तेंव्हा ! आता तर "advance fee भरावी लागेल" असे वाक्य नर्सरी ते पिजी पर्यंतच्या सर्वच शैक्षणीक ठिकाणी ऐकू येते. ज्ञानदान हा केवळ शब्द उरलेला आहे. पुढे मला नालंदा येथील ज्ञानदान करणा-या श्रेष्ठ शिक्षकांचे स्मरण झाले. हे जगविख्यात ज्ञानकेंद्र, हे विद्यापीठ, या भारतभूमीचा गौरव वाढवणारे हे शांतीचे, विद्यार्जनाचे स्थान उध्वस्त करणारा, जाळून टाकणारा तो कृरकर्मा तुर्क-अफगाणिस्तानचा सुलतान बख्तीयार खिल्जी पेटवत आहे, सर्वत्र हाहा:कार माजला आहे, प्रचंड ग्रंथसंपदा पेटल्याने धुराचे लोट उठत आहे, त्या धुरातून जणू मोठा ज्ञानाचा खजिना आकाशात विलीन होत आहे, सर्वत्र आक्रोश होत आहे असे दृश्य माझ्या डोळ्यासमोर तरळत होते. तत्क्षणी मला कुणी पाहिले असते तर त्याला मी मस्त चित्रपट गीत एन्जॉय करतो आहे असे वाटले असते, परंतु माझी नजर केवळ पडद्यावरील त्या गीताकडे होती  परंतु मनात मात्र नालंदा विद्यापीठाचा गौरवशाली इतिहास व ते उध्वस्त होणे हे उपरोक्त विचार पडद्यावरील त्या गीतात दिसलेल्या नालंदा विद्यापीठाचे अवशेष पाहून येत होते. 

    काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नालंदा विद्यापीठ पुनर्निर्माण करून राष्ट्राला समर्पित केल्यामुळे वरील प्रसंगाची आठवण झाली. नालंदा विद्यापीठाचे हे पुनरुज्जीवन करणे हे एक मोठे कार्य झाले आहे. स्वा. सावरकरांचे एक वाक्य आहे की "ज्या देशातील लोक त्या देशाचा इतिहास विसरतात त्या देशाचा भूगोल बिघडतो" या वाक्याचा आपल्याला चांगलाच अनुभव आलेला आहे. भारताचा भूगोल अनेक वेळा बिघडला आहे, भारताचे अनेक तुकडे पडले आहेत. आजही आपल्याला आपला गौरवशाली इतिहास म्हणावा तितका ठाऊकच नाही आणि म्हणूनच नालंदाचा जीर्णोद्धार होणे ही समस्त भारतवासीयांसाठी आनंदाची, गौरवाची बाब ठरली आहे. गुप्त साम्राज्याच्या काळात मगध राज्यात पाचव्या आणि सहाव्या शतकात कुमारगुप्त या गुप्त वंशातील राजाच्या काळात नालंदा विद्यापीठाची स्थापना झाली. नालंदाचा अर्थ ना+अलम+दा अर्थात "ज्ञानाची भेट देणारे" असा होतो. हा एक महाविहारच होता. या महाविहारातील श्रेष्ठ, ज्ञानी शिक्षक हे विद्यार्थ्यांना व्याकरण, वेद, औषधी शास्त्र, ग्रहताऱ्यांचे शास्त्र इत्यादी विषय शिकवत असत. इथल्या महाग्रंथालयात संस्कृत भाषेतील अनेक ग्रंथ होते, जे विदेशी विद्यार्थ्यांनी त्यांच्यासोबत नेल्याचे सांगितले जाते. ह्यू-एन-त्संग हा चिनी प्रवासी सुद्धा नालंदा विद्यापीठाचा विद्यार्थी होता. हा सुद्धा अनेक ग्रंथ आपल्या सोबत घेऊन गेला असे म्हटले जाते. राजगृह आजचे राजगीर येथे हे नालंदा विद्यापीठ आता पुन्हा कार्यान्वित होणार आहे ही जरी आनंदाची बाब असली तरी नालंदा व देशातील इतरही विद्यापीठात पूर्वीप्रमाणेच ज्ञानदानाचे कार्य निष्ठेने होणे अपेक्षित आहे.  आज आपण शिक्षणात झालेले बाजारीकरण, व्यापारीकरण पाहत आहोत. बहुतांश लोक या  अविरत पैशाचा ओघ सुरू राहतो या हेतूने या व्यवसायात आल्याचे चित्र आज दिसते आहे. शिक्षण महर्षी जाऊन शिक्षण सम्राट निर्माण झाले आहेत. यातूनच मग पेपर फुट,  परीक्षेआधी पेपर खरेदी करणे, परीक्षेला दुसरे विद्यार्थी बसवणे असे गैरप्रकार घडत आहेत. नुकत्याच झालेल्या नीट परीक्षांमध्ये गैरप्रकार झाला. यात तीस लाख रुपयांमध्ये नीट चा पेपर विकला गेल्याचे उदाहरण ज्या बिहार राज्यात नालंदा विद्यापीठ आहे त्याच बिहारात घडले आहे. नालंदा विद्यापीठाच्या पुनर्निर्माणाच्या औचीत्याने सरकारने, संस्थाचालकांनी व सर्वांनीच भारतातील शैक्षणिक वारसा टिकवून ठेवण्याचा, या क्षेत्रातील निष्ठा, पावित्र्य जपून ठेवण्याचा संकल्प करायला हवा असे म्हणावेसे वाटते. भारतामध्ये शिक्षणाची गौरवशाली परंपरा आहे. येथे महान गुरु शिष्य होऊन गेले आहे, येथील गुरूंनी निस्पृहतेने  ज्ञानदानाचे कार्य केले आहे.  प्राचीन काळातील शिक्षकांनी उत्कृष्ट असे विद्यार्थी घडवले. इथे ज्ञानाचे दान होत असे, पैसा दुय्यम होता. असा आपला शैक्षणिक वारसा आहे. काल पंतप्रधान मोदींच्या हस्ते नालंदा विद्यापीठ राष्ट्राला समर्पित होत असतांना मनास आनंद वाटत होता. या प्रसंगी 17 देशांचे राजदूत उपस्थित होते. ही बातमी आता जगात सर्वत्र पसरली असेल. आज जगात सुद्धा भारताचा दबदबा निर्माण झाला आहे. आक्रमकांनी उध्वस्त केलेली आपली स्वस्ती स्थाने पुनश्च निर्माण होत आहे, या निमित्ताने राष्ट्र नवनिर्माणच होत आहे. हे सर्व टिकवून ठेवण्यासाठी राष्ट्रीय विचारांच्या जनतेला एकत्र राहणे, सुयोग्य उमेदवार निवडून देणे याकडे सजग राहून पुढे येणे ही काळाची गरज आहे. तमाम जनतेने राष्ट्र प्रथम अशी विचारसरणी ठेऊन राष्ट्र आराधना जर केली तर पुन:श्च नालंदा सारखी एक काय अनेक दर्जेदार विद्यापीठे स्थापन होतील, जगात या देशाचा पुन:श्च  गौरव होईल म्हणूनच याप्रसंगी "हम करे राष्ट्र आराधन" हे गीत आठवते.

1 टिप्पणी: