२९/०८/२०२४

Article about falling if Shivaji Maharaj statue and politics and allegation

पक्ष कार्यकर्ते की गुंडांची टोळकी ?

इथे एका गोष्टीचे मोठी खंत वाटते की, ज्या शिवरायांनी समस्त महाराष्ट्रीयन जनतेला अर्थात अठरा पगड जातींच्या लोकांना भगव्या झेंड्याखाली एकत्र आणले त्याच छत्रपतींच्या महाराष्ट्रात, त्यांच्याच किल्ल्यावर हिंदू लोकच एकमेकांशी झगडत होते.

राजकोट किल्ल्यावरचा आठ महिन्यांपूर्वी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते अनावरण झालेला छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळला आणि एकच गदारोळ महाराष्ट्रात सुरू झाला. ज्या छत्रपतींचे किल्ले अद्यापही शाबूत आहे त्याच छत्रपतींचा पुतळा इतक्या अल्पावधीत कोसळावा ही खरोखरच दुर्दैवी आणि महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी अशी गोष्ट आहे. हा पुतळा कोसळल्यावर तो कोणी उभारला ?  मूर्तिकार कोण ? कंत्राटदार कोण ? लोखंड किती वापरले गेले होते ? आदी बाबींवर उहापोह होण्यास सुरुवात झाली. या गोष्टीचे राजकारण जर झाले नाही तर नवलच आणि ते राजकारण पण सुरू झाले. काल राजकोट किल्ल्यावर मोठे महानाट्य झाले. ठाकरे गट आणि भाजपा मध्ये राजकोटच्या पवित्र भूमीत मोठी हाणामारी झाली. राजकोटला प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी नारायण राणे, विजय वडेट्टीवार, आदित्य ठाकरे असे नेते पोहोचले. जयंत पाटील सुद्धा होते. या नेत्यांच्या गटांकडून महाराष्ट्राला अशोभनीय अशा अर्वाच्य भाषेत एकमेकांना , एकमेकांच्या नेत्यांना हिणवण्याचा प्रयत्न झाला. पेंग्विन, कोंबड्या चोर, अंगार, भंगार अशी घोषणाबाजी झाली. आमचा इतिहास ठाऊक नाही का ? ( या वाक्यात ते अप्रत्यक्षरीत्या स्वतःच सांगत आहे की ते कोण होते ) , एकाही घरात जाता आले नसते, घरात घुसून एकेकाला मारून टाकेन, शिवसेना राडे करूनच पुढे आली , उद्धव ठाकरे यांना काही समजत नव्हते , आदित्य शेंबडा होता. असेही राणे यांनी धमकावले व हिणवले. नारायण राणे यांनी आव्हान दिल्यावर आणखीनच तणावाची परिस्थिती निर्माण झाली. इथे एका गोष्टीचे मोठी खंत वाटते की, ज्या शिवरायांनी समस्त महाराष्ट्रीयन जनतेला अर्थात अठरा पगड जातींच्या लोकांना भगव्या झेंड्याखाली एकत्र आणले त्याच छत्रपतींच्या महाराष्ट्रात, त्यांच्याच किल्ल्यावर हिंदू लोकच एकमेकांशी झगडत होते. हा गदारोळ पाहून महाराजांच्या आत्म्याचा किती तळतळाट झाला असेल, त्यांना किती वेदना झाल्या असतील. बरं, महाराजांचा पुतळा कोसळला म्हणून हे कार्यकर्ते तिथे गोळा झाले होते त्याच ठिकाणी, महाराजांच्या राजकोट किल्ल्यावरच यांच्या हमरीतुमरीने, झटापटीमुळे, लोटपोटिने किल्ल्याची सुद्धा हानी झाली, मोडतोड झाली, किल्ल्याला क्षती पोहचली. या गोष्टीचे मोठे अप्रूप वाटते की, पुतळा कोसळला म्हणून तेथे एकत्र यायचे आणि किल्ल्याची हानी करायची. हे असे कसे यांचे छत्रपतींवरचे प्रेम ! जनतेने तमाम राजकीय पक्ष, कार्यकर्ते यांना आता पुरते ओळखले आहे म्हणून लोकसभेच्या गत निवडणूकीत मतदार मतदान केंद्राकडे फिरकलाच नाही. महाराष्ट्रातील सद्य परिस्थिती पाहता आगामी विधानसभा निवडणूकीत सुद्धा संमिश्र असे निकालच पाहायला मिळतील असे वाटते. पूर्वीच्या राजकारणात आणि आताच्या राजकारणात मोठा फरक आहे आताची पिढी ही हुशार आहे, त्यांना राडे नको आहे तर त्यांना विकास पाहिजे आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी आत्मपरीक्षण करायला हवे आणि आपल्या पक्षाची ध्येयधोरणे काय आहेत, देशाचा विकास करायचा आहे की निव्वळ फुकटचे पैसे वाटून मते मिळवायची आहेत आणि सत्ता उपभोगायची आहे यावर त्यांचे चिंतन होणे जरुरी आहे, कारण देशाचा खजिना लुटून मध्यमवर्गीयांनी आणि व्यापाऱ्यांनी भरलेल्या कराचे पैसे खुशाल उधळणे हे देशाच्या भवितव्याच्या दृष्टीने योग्य नाही. सत्तेसाठी महाराष्ट्रात चाललेले राजकारण सुज्ञ जनतेस पटलेले नाही याचे सर्वच पक्षाच्या नेत्यांनी चिंतन करायला हवे. त्यांनी संयमित राहणे जास्त शोभानीय आहे व त्यांनी संयमित भाषा वापरायला हवी, तोलून मापून बोलायला पाहिजे. जरांगेंनी जेष्ठ नेत्यांबाबत बोलतांना अरे-तुरेची भाषा वापरणे सुरू केले. आता सर्वच नेत्यांनी एकमेकांना अरे-तुरेत बोलणे सुरू केले आहे. सुसंस्कृत महाराष्ट्रात हे योग्य नव्हे. या अशा प्रकारच्या वागण्यामुळे नेत्यांच्या भाषेमुळे कार्यकर्ते सुद्धा भरकटले, नेत्यांची आजची एक भूमिका आणि उद्याची वेगळी यामुळे ते संभ्रमात पडत आहे. आपल्या नेत्याची तुला पाहून घेईल, तू राहशील नाहीतर मी या प्रकारची धमकीवजा वक्तव्ये पाहून या तरुण कार्यकर्त्यांचेही  भान हरपत आहे, त्यांचे हात शिवशिवत आहेत. त्यांच्या अंगातील जोमाला, जोशाला आपले नेते गुंडगिरीकडे वळवण्याचे काम करीत आहेत. कालच्या राजकोटला सर्वच मोठ्या पक्षांच्या उपस्थिती झालेल्या राड्यामुळे महाराष्ट्रातील तमाम जनतेला हे असे राडे करणारे राजकीय पक्ष कार्यकर्ते आहेत की गुंडांच्या टोळ्या असा प्रश्न पडला आहे. या प्रश्नाचे उत्तर सुद्धा जनतेनेच त्यांच्या मतदानाच्या अधिकारातून आगामी निवडणुकीद्वारे या नेत्यांना दिले पाहिजे.

०८/०८/२०२४

Article about Khamgaon water problem.

खामगांव पाणी पुरवठा यंत्रणा
ज्ञानगंगा धरणात बुडवून टाका

भारतीय क्रिकेट बोर्ड किंवा संघ समुद्रात बुडवून टाकावा आणि भारत स्वतंत्र झाल्यावर काँग्रेस पक्ष विसर्जित करावा अशी दोन प्रसिद्ध विधाने आहेत. या दोन्ही विधानांप्रमाणे खामगाव पाणीपुरवठा यंत्रणा सुद्धा ज्ञानगंगा धरणात बुडवून टाकावी असे खेदाने म्हणावेसे वाटते.

पाणी समस्या ही खामगावकरांच्या पाचवीला पुजलेली आहे. आजरोजी पावेतो खामगावच्या पाणी समस्येबद्दल माझे अनेक लेख लिहून झाले आहेत. खामगाव शहरात असलेल्या पक्क्या पाण्याच्या अशा वीस विहिरींची यादी सुद्धा वृत्तपत्रातून जाहीर केलेली आहे तसेच ती नगर परिषद माजी मुख्याधिकारी यांना सुध्दा दिली होती. परंतु तरीही या लेखांनी विशेष असा काही परिणाम झाल्याचे जाणवले नाही. नागरिकांनी तेवढे कौतुक केले खरे परंतु प्रशासनाने मात्र त्या लेखांची काहीही एक दखल घेतल्याचे दिसले नाही. (पाणी समस्यांचे माझे इतर लेख माझ्या ब्लॉगवर वाचक शोधू शकतात.) यंदा पावसाळा चांगला सुरू आहे. या चांगल्या सुरू असलेल्या पावसाळ्यात चातकाची तहान नक्कीच भागली असेल पण खामगांवकर मात्र नळाच्या पाण्याची चातकाप्रमाणे वाट पहात बसलेले असतात, स्थानिक वृत्तपत्रात येणाऱ्या पाणीपुरवठाच्या वेळापत्रकाकडे डोळे ठेवून असतात. उन्हाळ्यात पण तेच आणि पावसाळ्यात पण तेच. नागरिक पाण्याअभावी अगदी हवालदिल होऊन गेलेले आहेत परंतु कोणी काही बोलत नाही. गेल्या 10 दिवसांपासून खामगावचा पाणीपुरवठा विस्कळीत झालेला आहे. नेहमीप्रमाणेच यंत्रणेत बिघाडाचे कारण सांगितले जात आहे. आमच्या भागातील पाणीपुरवठा हा 28 जुलै रोजी झाला होता त्यानंतर वेळापत्रकाप्रमाणे आजरोजी पर्यंत नळाला पाणी आलेले नाही. खामगावच्या पाणीपुरवठा यंत्रणेत एवढा बिघाड कसा काय होत राहतो ? हा एक संशोधनाचा विषय झालेला आहे. कधी बूस्टर पंपात बिघाड तर कधी पाणीपुरवठा यंत्रणेत बिघाड, कधी विद्युत पुरवठ्याचे कारण तर कधी पाईपलाईन फुटल्याचे. पाणीपुरवठा जेव्हा विस्कळीत होतो तेव्हा अशी नाना कारणे सांगितली जातात. मला आश्चर्य वाटते की मुंबई, पुणे वा आणखी इतर मोठ्या शहरांमध्ये पाणीपुरवठा कसा होत असावा? तिथे  कधी  खामगाव शहरात येतात तशा व तितक्या पाणीपुरवठ्याच्या नाना प्रकारच्या समस्या येत असल्याचे कधी काही ऐकिवात आले नाही. शहरातील माझ्या मित्रांशी याबाबत बोललो असता त्यांनी सुद्धा धरणात जर का पाणी असेल तर आमच्याकडे व्यवस्थित पाणी येत असल्याचे सांगितले. माझ्या एका अमेरिकेत स्थायिक झालेल्या मित्राला मी एकदा विचारले की तिकडे पाणीपुरवठा कसा होतो ? तो तिथे गेल्या अनेक वर्षापासून राहतो. त्याने माझ्या प्रश्नाचे उत्तर दिल्यावर मला आश्चर्य वाटले. तो म्हणाला की, "रोज नळ येतात पण पाईपलाईन कुठून आहे, नळाला पाणी कोण सोडते, कुठून सोडते हे अजूनही आम्हाला कळलं नाही, कधी कुठे पाईपलाईन दुरुस्तीचे कामही दिसले नाही किंवा कधी कुठे पाईपलाईन फुटलेली ही दिसली नाही फक्त आमच्याकडे नळाला पाणी मात्र नियमित येत असते एवढे आम्हाला पक्के माहित आहे. पण आपल्या भारतात आणि त्या अनुषंगाने खामगावात धरणामध्ये पाणी असून सुद्धा नागरिकांना भीषण पाणी टंचाईला तोंड द्यावे लागते. खामगावसारख्या काही ठिकाणी तर पाणी समस्या इतकी अंगवळणी पडली आहे की आता तर लोकांना 15-15, 20-20 दिवस पाणी आले नाही तरीही काही वाटत नाही. खामगाव शहराला पूर्वी जनुना तलावावरून पाणीपुरवठा होत असे. ती पाईपलाईन अद्यापही आहे, ती कार्यान्वित सुद्धा होऊ शकते व शहराच्या अगदी लगतच्या मोठ्या जलसाठ्याचा लाभ खामगांवकरांना होऊ शकतो. पण त्याकडे प्रशासनाचे साफ दुर्लक्ष आहे. सध्या ज्ञानगंगा धरणातून खामगावला पाणीपुरवठा सुरू आहे. आता खामगावची लोकसंख्या वाढली, पाण्याची मागणी अधिक होऊ लागली आहे. पण पंधरा-वीस वर्षांपूर्वी खामगावला भीषण पाणीटंचाई निर्माण झाली होती म्हणून तेंव्हा आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा होऊ लागला तो आजतायागात कायमच आहे. त्यातच कधी बूस्टर पंप खराब होणे तर कधी पाईपलाईन फुटणे, विद्युत तारांवर झाडे कोसळल्याने किंवा फांद्या कोसळल्याने धरण परिसरातील विद्युत पुरवठा खंडित होणे व त्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत होणे, तर कधी बिबट्याच्या धाकाने कर्मचाऱ्यांचे पाणीपुरवठा कार्यासाठी न जाणे, यंत्रणेत बिघाड होणे अशा अनेक समस्या खामगावचा पाणीपुरवठा करताना येत असतात. त्या जाहीर झाल्यावर नागरिक मूकपणे आप-आपली पाण्याची व्यवस्था करतात. कुणी टँकर, कोणी कॅन तर कुणी लीक झालेल्या व्हॉल्व वरून आपली पाण्याची गरज भागवतात. पूर्वी पाणी नसले की घागर मोर्चा, महिलांचा मोर्चा असे किमान ऐकू तरी यायचे, वृत्तपत्रातून पिण्याच्या पाण्याच्या समस्यांच्या बातम्या वाचनात यायच्या, सुरळीत पाणीपुरवठा व्हावा असे गा-हाणे मांडले जायचे पण आता खामगांवकरांना विस्कळीत पाणी पुरवठा इतका अंगवळणी पडला आहे की उपरोक्त मागण्या सुद्धा आताशा होणे बंद झाले आहे. 

भारतीय क्रिकेट बोर्ड का संघ हा समुद्रात बुडवून टाकावा अशा आशयाचे विधान बिशनसिंग बेदी यांनी एकदा केले होते तसेच भारत स्वतंत्र झाल्यावर काँग्रेस पक्ष सुद्धा विसर्जित करावा असे विधान गांधीजींनी केले होते. या दोन्ही विधानांप्रमाणे तसेच खामगाव पाणीपुरवठ्यात येणाऱ्या नाना अडचणींमुळे व कुचकामी यंत्रणेमुळे खामगाव पाणीपुरवठा यंत्रणा सुद्धा खामगावला पाणीपुरवठा करणाऱ्या ज्ञानगंगा धरणात बुडवून टाकावी असे खेदाने म्हणावेसे वाटते.