भावपुर्ण "टाटा"
भारतात जन्म झालेल्या प्रत्येक बालकास बोलणे यायला लागल्यानंतर त्याला सर्वात प्रथम कोणत्या कंपनीचे नाव ठाऊक होत असेल तर ते म्हणजे टाटा हे नाव होय. टाटा हे पारसी समुदायातील अडनाव आणि हा शब्द भारतामध्ये एकमेकांचा निरोप घेतेवेळी म्हणण्याची पद्धत रूढ आहे. निरोप घेतेवेळी हे असे टाटा ( बाय ) म्हणणे कसे काय रूढ झाले कोण जाणे. परंतु एकमेकांचा निरोप घेतेवेळी आजही अनेक लोक टाटा म्हणत असतात अशी या टाटा शब्दाची करामत आहे. जमशेदजी टाटा यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात मुहूर्तमेढ रोवलेल्या टाटा उद्योग समूहाने भारतात उद्योग क्षेत्रात मोठी गरुडझेप घेतली. याच उद्योग समूहाचे 2016-2017 मध्ये अंतरीम अध्यक्ष राहिलेले रतन टाटा यांचे काल निधन झाले आणि देश हळहळला. टाटा हे नांव उद्योग क्षेत्रात एक विश्वसनीय असे नांव, असा ब्रँड म्हणून नावलौकिक प्राप्त झालेले नांव आहे. या देशाच्या उभारणीत टाटाचा मोठा वाटा आहे. मीठापासून तर लोह उद्योग, वाहने असे जवळपास सर्वच उद्योग क्षेत्रात विविध उत्पादने असणा-या या उद्योग समूहात 1962 मध्ये रतन टाटा यांनी कार्यभार स्विकारला. शॉप फ्लोवर पासून उद्योगक्षेत्रातील विविध बारकावे शिकत ते पुढे वाटचाल करू लागले. लाजाळू, अंतर्मुख स्वभावाचे, दूरदृष्टीचे रतन टाटा हे टाटा समूहास अधिक अग्रेसर कसे करता येईल हे व्हिजन ठेऊन पुढे वाटचाल करू लागले. 1990 मध्ये ते टाटा गृप व टाटा सन्सचे अध्यक्ष झाले. 2012 पर्यंत त्यांच्याकडे ही धुरा होती. रतन टाटा यांची मेहनत, साधी राहणी कपंनीला पुढे घेऊन जाण्याची जिद्द, कर्मचारी, कामगार यांना आपल्या परिवारातील सदस्य समजणे, त्यांच्या हिताचे निर्णय घेणे, समाज हिताकडे सुद्धा लक्ष देणे व त्यासाठी अनेक प्रकारच्या देणग्या, आर्थिक मदत ग्रामीण भागातील संस्था, शैक्षणिक संस्था व इतरही अनेक प्रकारच्या संस्थांना करणे ही रतन टाटांची वैशिष्ट्ये होत. कोरोना काळात देशाला केलेली 500 कोटी रुपयांची मदत कुणी कशी काय विसरेल. 1990 च्या दशकात टाटांच्या इंडिका या कारने खुप लोकप्रियता मिळवली होती. त्यानंतर इंडिगो, सफारी आणि इतर अनेक विदेशी मॉडेल्सच्या तोडीस तोड अशी मॉडेल्स टाटा कंपनीने लाँच केली व त्यांनी मोठी लोकप्रियता सुद्धा मिळवली. गरिबांना सुद्धा कार घेता यावी हे स्वप्न रतन टाटांनी पाहिले होते व म्हणून त्यांनी नॅनो ही कार आणली होती. सुरुवातीच्या काळात ही गाडी मोठ्या प्रमाणात विकल्या गेली होती. रतन टाटांच्या कारकीर्दीत जग्वार हा जगप्रसिद्ध विदेशी ब्रँड टाटांनी अँक्वायर केला ही केवळ टाटा कंपनीसाठीच नव्हे तर कधी काळी उद्योग क्षेत्रात जागतिक पातळीवर अत्यंत पिछाडीस असलेल्या भारतासाठी सुद्धा अभिमानास्पद बाब होती. जग्वारच नव्हे तर इतरही काही विदेशी ब्रँड टाटाने खरेदी केले आहेत. रतन टाटा यांना अनेकदा अपयश आले, त्यांचे काही निर्णय चुकले पण त्यांनी हार मानली नाही व पुढे वाटचाल करीत राहिले. नवल टाटा यांचा हा पुत्र रतनजी टाटा यांचा नातू व जमशेदजी टाटा यांचा पणतू नम्र, साधा व दानशूर होता आणि म्हणून तमाम भारतवासियांच्या ह्रुदयात त्यांनी स्थान मिळवले होते.
आता सुमारे दोन तीन वर्षांपूर्वी त्यांचा मांडी घालून खाली बसलेला फोटो, त्यांचा वाढदिवस झाला त्यावेळी एक छोटासा केक कापतांनाचा फोटो, असे फोटो माध्यमांवर झळकले होते तेंव्हा सर्वानाच त्यांचा तो साधेपणा भावला होता. धन ही अशी गोष्ट आहे की ते वाजवीपेक्षा जास्त असेल की त्याची हवा डोक्यात शिरते, मनुष्य त्याचा गर्व करू लागतो, त्याची वागणूक बदलते परंतू भारतातील सर्वात जुन्या, नामांकित, विश्वप्रतिष्ठित अशा टाटा समूहाचे अध्यक्ष असूनही रतन टाटांच्या डोक्यात संपत्तीची हवा शिरली नाही. टाटा मोटर्स मधील माझ्या एका मित्राने आज रतन टाटा यांच्याविषयी बोलतांना त्याने प्रत्यक्ष अनुभव घेतलेला किस्सा व काही आठवणी सांगितल्या तो म्हणाला, "रतन टाटा साहेब हे जेंव्हा त्यांच्या उद्योग कंपन्यांना भेटी देत तेंव्हा कामगारांच्या कॅन्टीन मध्ये रांगेत उभे राहून जेवण घेऊन कामगारांसह भोजन घेत, मशीन मधील ज्ञान सुद्धा त्यांना अफाट होते, कामगार अधिकारी यांना ते आपले मित्र समजत असत." म्हणूनच ते लोकप्रिय होते. अफाट पुस्तक संग्रह आणि अनेक कुत्री असलेल्या फ्लॅट मध्ये ते बॅचलर जीवन जगत होते. टाटा म्हणजे पारशी, इराण मधून निष्कासित झालेला झोराष्ट्रियन अर्थात पारशी लोकांना भारताने आश्रय दिला. ते इथेच रुळले त्यांनी या देशाला आपले मानले इथे शिक्षण, उद्योग, वैद्यकीय सेवा यांची अनेक केंद्रे उभारली व या देशाच्या उभारणीत कुणी कधीही विसरू शकणार नाही अशी कामगिरी केली. रतन टाटा त्यापैकीच एक.
सुरुवातीस म्हटल्याप्रमाणे टाटा या नावाची भारतात एवढी जादू फिरली की निरोप घेतेवेळी सुद्धा लोक एकमेकांना "टाटा" असे म्हणतात आणि म्हणूनच आज रतन टाटा यांच्या बाबतीत भावपुर्ण श्रद्धांजली असे लिहिण्याऐवजी भावपुर्ण "टाटा" असे लिहावेसे वाटले.
Prataksha pahilele Dev to aamchya manatun kadhich TATA honar nahi
उत्तर द्याहटवाThanks for your nice post. THE GREAT TATA.
उत्तर द्याहटवा