तुमच्या संपत्तीचे विश्वस्त व्हा, मालक नव्हे !
परवाच्या वर्तमानपत्रात एक वृत्त वाचले. वृत्त कर्नाटकातील होते. कर्नाटकातील रायचूर येथील 60 वर्षीय भिकारीण रंगम्माने एका मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी एक लाख त्र्यांशी हजारांचे दान केल्याचे ते वृत्त होते. हे वृत्त वाचून आश्चर्य व कौतुक दोन्ही वाटले. अनेक दानशूर व्यक्तींच्या कथा, नांवे आठवली. आणखी एक किस्सा आठवला तो म्हणजे रॉकफेलर आणि स्वामी विवेकानंदांच्या भेटीचा.
भारतात स्वामी विवेकानंद माहीत नसतील असा मनुष्य विरळाच असेल. परंतु स्वामी विवेकानंद म्हटले की एक योगी, अगाध ज्ञानी, योद्धा संन्यासी असे चित्र डोळ्यासमोर येते तसेच त्यांचे अमेरिकेत धर्मसभेसाठी जाणे, ती धर्मसभा जिंकणे आणि हिंदू धर्माचे पताका विश्वभर फडकवणे अशा काही जुजबी गोष्टीच ज्ञात असतात परंतु स्वामीजींच्या अनेक प्रेरणादायी अशा कथा, त्यांच्या जीवनातील प्रसंग आहेत की जे आजही मनुष्याला प्रेरणा देऊन जातात, अंतर्मुख करतात. अमेरिकेत त्यांचे झालेले हाल, त्यांना झालेला त्रास, कोलंबो ते अल्मोडा या भ्रमणातील अनुभव हे आजही काही निवडक, मोजक्याच लोकांना माहीत असावेत. स्वामीजींनी काही लोकांना केलेल्या मार्गदर्शनाच्या त्यांच्या जीवनात बदल घडवून आणण्याच्या सुद्धा काही गोष्टी आहेत, ज्या आजही तितक्याच प्रासंगिक आणि उपयुक्त आहेत. स्वामीजींनी गडगंज संपत्ती असलेल्या रॉकफेलरला केलेल्या अशाच एका मार्गदर्शनाची कथा इथे आज देत आहे.
अमेरिकेत असताना स्वामी विवेकानंदांमध्ये अनेक शक्तींचा विकास झाला होता केवळ दुसऱ्यांच्या डोळ्यात पाहून त्यांच्या मनातल्या गतीविधींची ओळख किंवा जाणीव त्यांना होत असे. ज्यांना कोणाला स्वामीजी या गोष्टी सांगत असत ते लोक त्यांचे शिष्य होऊन जात असत. स्वामीजींनी ज्यांचे मन ओळखले होते त्यापैकी एक व्यक्ती होता जॉन डी. रॉकफेलर. हा मनुष्य अमेरिकेतील तत्कालीन स्टॅंडर्ड ऑइलचा संस्थापक होता. आज हीच कंपनी एक्सान मोबाईल नावाने ओळखले जाते. व्यापारातील अनिष्ट कृत्ये आणि एकाधिकारशाही या जोरावर रॉकफेलरने मोठी धनसंपत्ती अर्जित केली होती. रॉकफेलरला पुढे अनेक शारीरिक समस्या निर्माण झाल्या, त्याची प्रकृती खालावत जात होती. त्याला आपला मृत्यू समिप आला आहे असेही वाटू लागले होते. रॉकफेलर यांस मग स्वामी विवेकानंद यांना भेटण्याची प्रेरणा झाली कारण ज्या काही लोकांच्या घरी स्वामीजींनी वास्तव्य केले होते ते रॉकफेलरचे मित्र होते व त्यांनी रॉकफेलरला स्वामीजींच्या योग शक्ती बाबत सांगितले होते. रॉकफेलर स्वामीजींच्या भेटीस आला तेव्हा स्वामीजींनी त्याला त्याच्या जीवनातील अनेक गोष्टी सांगितल्या ज्या केवळ त्यालाच ठाऊक होत्या. त्या गोष्टी ऐकून रॉकफेलर प्रभावित झाला. स्वामीजींनी त्याला म्हटले की, "तू जे धन मिळवलेले आहे ते केवळ तुझे नाही तर ते इतरांचे भले करण्यासाठी आहे. मनुष्य हा त्यानी मिळवलेल्या धनाच्या विश्वस्त असतो मालक नाही" रॉकफेलरला हे ऐकून संताप आला त्याला प्रथमच कोणी असा उपदेश करत होते. तो तिथून बाहेर पडला.
परंतु एक आठवड्याने तो स्वामीजींकडे परत आला आणि एका संस्थेला मोठे दान करीत असल्याचा एक कागद किंवा चेक म्हणा तो स्वामीजींचे पुढे ठेवला आणि म्हणाला आता तुम्हाला संतोष वाटत असेल आता तुम्ही मला धन्यवाद द्या. तेंव्हा स्वामीजी म्हणाले की, "तुम्हीच मला धन्यवाद द्या कारण तुम्ही दान केलेल्या रकमेपेक्षा जास्त समाधान, अनमोल असा मानसिक आनंद तुम्हाला या दानामुळे प्रथमच मिळाले आहे. तुम्ही ज्यांना दान केले त्यांच्यापेक्षा तुमचेच अधिक कल्याण झाले आहे.
यानंतर रॉकफेलरचे हृदय परिवर्तन झाले पुढे तो एक दानशूर व्यक्ती म्हणून ओळखला जाऊ लागला त्याने पुढील काळात अनेकांना मदतीचा हात दिला. अनेक विश्वविद्यालय, दवाखाने यांना त्यानी मदत केली त्याच्यामध्ये सकारात्मक बदल झाला त्याची प्रकृती सुद्धा सुधारली आणि तो वयाच्या 97 व्या वर्षापर्यंत जगला.
कर्नाटक मध्ये भिकरिणीने केलेल्या दानाच्या बातमीमुळे ही रॉकफेलरची वरील गोष्ट आज आठवली. भगवद्गीते मध्ये सुद्धा
यज्ञो दानं तपश्चैव न त्याज्यं इतीचापरे ||
यज्ञ, दान आणि तप ही कर्मे मनुष्याने कधीही त्यागू नयेत. बदलत्या जीवनशैलीमुळे यज्ञ आणि तप करणे सामान्य माणसाला कठीण आहे परंतु तो दान करून मात्र मनाचे मोठे समाधान तसेच पुण्य प्राप्त करू शकतो कारण स्वामीजी म्हणाले होते की "वोही जीते है जो दुसरोके लिये जिते है" त्याचप्रमाणे स्वामीजींनी रॉकफेलरला जसे "तुम्ही तुमच्या संपत्तीचे विश्वस्त आहात मालक नव्हे" हा संदेश समस्त मानवजातीला सुद्धा लागू पडतो.