मोक्ष मिळवून देणारा मृत्यू
रामलीलेत दशरथाची भूमिका वठवणाऱ्या अमरेश महाजन यांचा दशरथाची भूमिका करतांनाच मृत्यू झाला. अमरेश महाजन हे तसे काही देशभर ओळखले जाणारे व्यक्ती किंवा अभिनेते नव्हते. पण तरीही ईश्वरी कार्य करतांना त्यांच्या मृत्यू झाला त्यामुळे त्या विषयी लिहावेसे वाटले.
रामायणात राजा दशरथाचा शोकावस्थेत मृत्यू झाला होता. त्याच दशरथ राजाची रामलीलेत भूमिका करणाऱ्या अमरेश महाजन यांचा काल रामलीलेत अभिनय करतांनाच मृत्यू झाला. कोणाचा मृत्यू हा केव्हा आणि कसा होईल हे कोणालाही सांगणे अशक्य आहे. मृत्यूचे वर्णन अनेक लेखकांनी व कवींनी केलेले आहे. कुणी मृत्यूला कविता म्हटले आहे तर कुणी मृत्यूला एक गाढ निद्रा असे संबोधले आहे. रामदास स्वामींनी सुद्धा
एक मरे त्याचा दुजा शोक वाहे
अकस्मात तोही पुढे जात आहे
असे मृत्यूबाबत म्हटले आहे.
जन पळभर म्हणतील हाय हाय मी जाता
राहील कार्य काय
ही भा. रा. तांबे यांची कविता सुद्धा प्रसिद्ध आहे. मृत्यूनंतर काहीही उरत नाही. सर्व नातेवाईक, मित्रमंडळी संपत्ती इथेच सोडून मनुष्य अंतिम प्रवासाला जातो. मनुष्याचा अंत होण्याच्या सुद्धा अनेक पद्धती आहेत. कुणी अपघाती मृत्यू पावतो, तर कुणी नैसर्गिकरित्या मृत्यू पावतो. हल्ली तर ताण तणाव आणि सकस अन्न खायला मिळत नसल्याने ऐन तारुण्यात सुद्धा अनेकांचे निधन होतांना आपण बघतच आहोत. अशाच एका मृत्यूची हिमाचल प्रदेशातील चंबा या ठिकाणची ही कथा आहे. या ठिकाणच्या रामलीलेमध्ये अमरेश महाजन नामक अभिनेते गेल्या चाळीस वर्षांपासून दशरथ राजाची भूमिका वठवतात. अमरेश महाजन हे तसे काही देशभर ओळखले जाणारे व्यक्ती किंवा अभिनेते नव्हेत. ते स्थानिक पातळीवरचे अभिनेते होते परंतु तरीही त्यांच्या मृत्यू बाबत लिहावेसे वाटले कारण की त्यांचे निधन हे ईश्वरा संबंधित कार्य म्हणजेच नाट्य म्हणजेच रामलीला सुरू असतांना झाले आणि म्हणून त्याबाबत लिहिणे महत्वाचे वाटले. चंबा येथे यंदाची रामलीला आयोजित झाली होती. लीला सुरू झाली दशरथ राजाच्या भूमिकेतील अमरेश महाजन आपली भूमिका वाठवू लागले, संवाद म्हणू लागले. अयोध्या नगरी, प्रजा यांविषयी त्यांची संवादफेक सुरू होती. आपल्या संवादात ते एका ठिकाणी भरलेल्या दरबाराच्या दृश्यात "मैं अपनी प्रजा के लिये अपने प्राण तक न्योच्छावर कर दुंगा" हा संवाद म्हणू लागले आणि शेजारच्या पात्राच्या खांद्यावर त्यांनी आपले डोके टेकवले. थोडा वेळ सर्वत्र शांतता झाली. दर्शकांना व सहपात्रांना सुद्धा ते पुढचा संवाद म्हणतील असे वाटू लागले पण या "प्राण तक न्योच्छावर कर दुंगा" संवादा बरोबरच त्यांचे प्राण पाखरू उडून गेले होते. सुरुवातीला प्रेक्षकांना व सहकलाकारांना अमरेश महाजन हे अभिनयच करत आहे असे वाटले पण त्यांचे डोके त्या सह कलाकाराच्या खांद्यावर वाजवीपेक्षा जास्त वेळ राहिल्याने काहीतरी वेगळे होत आहे हे उपस्थितांच्या लक्षात आले. रामलीलेत प्राण तक न्योच्छावर कर दुंगा असे म्हणत असतांनाच अमरेश महाजन यांचे निधन झाले. आता वर लिहिल्याप्रमाणे अमरेश महाजन यांच्या मृत्यूबाबत लिहिणे का महत्त्वाचे वाटले ते पाहू.
आपल्या भारतीय संस्कृतीत असे म्हटले आहे की मृत्यूच्या क्षणी व्यक्ती जर का नामस्मरणामध्ये किंवा साधन भजन भक्ती मध्ये रत असेल किंवा ईश्वर चिंतन करीत असेल तर त्याला मोक्ष मिळतो. म्हणूनच नामस्मरण करण्याबाबत सर्वच संतांनी सत्पुरुषांनी आपल्याला सांगितले आहे. गोंदवलेकर महाराजांनी सुद्धा नामस्मरणाचे महात्म्य सांगितले आहे. पुराणांमध्ये अजामेळाच्या कथेत सुद्धा अजामेळ हा त्याच्या मृत्यूच्या क्षणी त्याच्या मुलाचे "नारायण" असे नांव घेतो आणि त्याचा मृत्यू होतो. त्याच्या मुलाचे नांव नारायण म्हणजेच ईश्वराचे नांव आहे आणि त्यामुळे त्याला मुक्ती मिळते अशी कथा आहे.
अजमेळा पापराशी तोही नेला देवा वैकुंठासी
असे संत शिरोमणी तुकाराम महाराज यांनी म्हटलेच आहे.
अमरेश महाजन हे रामलीला मध्ये गेल्या अनेक वर्षापासून दशरथ राजाची भूमिका वठवत होते. रामायणात राजा दशरथाचा पुत्र वियोगाने मृत्यू होतो आणि चंबा येथील रामलीलेत दशरथाची भूमिका वठवणाऱ्या अमरेश महाजन यांचा दशरथाची भूमिका करतांनाच मृत्यू झाला यात कुठेतरी साधर्म्य वाटले. दशरथ राजाची भूमिका वठवतानाच काल त्यांचे निधन झाले त्यामुळे अमरेश महाजन यांना सुद्धा मुक्तीच मिळाली. अमरेश महाजन हे रामलीलेच्या निमित्ताने एकप्रकारे ईश्वरी कार्यात मग्न होते म्हणजेच त्यांचा मृत्यू हा त्यांना मोक्ष मिळवून देणारा असा आहे. अमरेश महाजन यांच्या अशा मृत्यूमुळे मृत्यू, मुक्ती, नामस्मरण, अजामेळ याचे स्मरण झाले आणि ते वाचकांसमोर मांडावेसे वाटले म्हणून हा लेखन प्रपंच.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा