डीजेच्या गोंगाटात लुप्त झाले "हर बोलाsss..... हर महादेवsss"
यंदाचा श्रावणातल्या शेवटच्या सोमवारी प्रकृती ठीक नसल्याने मी घरीच होतो. दुपारनंतर डीजेचा भला मोठा आवाज कानावर आदळू लागला. तो आवाज कावडयात्रेतील डीजेचा आहे याचे स्मरण सौ. ने करून दिले. मी घरीच असल्यामुळे माझे मन भूतकाळात गेले. मला पुर्वीच्या कावड यात्रांचे स्मरण झाले.
साधारणतः 35 ते 40 वर्षांपूर्वीचे ते दिवस असतील श्रावणात आई घरीच महादेवाला "शिवा शिवा महादेवा माझी मुठ ईश्वरा देवा..." असे पुटपुटत शिवमुठ वाहायची. सकाळी सकाळी बेsssलपुडाsss अशी आरोळी गल्ली गल्लीत धूमू लागे. पुर्वी मोजक्याच असलेल्या परंतू प्राचीन अशा महादेव मंदिरात लोक आपापला भाव घेऊन दर्शनाला जात, एक लोटा जल चे स्तोम हे आताआताचे. श्रावणात शंकराच्या पूजेचे महात्म्य असते हे बालवयात कळायला लागले. सकाळी शाळा किंवा शिकवणीस जातांना कधी एखाद-दोन तर कधी चार-पाचच्या घोळक्यात खांद्यावरील बांबूला छोटे पितळी तांबे किंवा तांब्याचे भांडे बांधून गावात येणारे युवक दिसत. ते दिसण्यापुर्वीच त्यांची "हर बोलाsss हर महादेवsss" अशी महादेवाला भक्ती भावाने घातलेली साद लांबूनच ऐकू येऊ लागायची. हे युवक पादचाऱ्यांचे लक्ष वेधून घेत असत. हे कावडधारी युवक नदीचे पवित्र जल आणून गावातील शिव मंदिरात शंकराच्या पिंडीवर अर्पण करतात असे पुढे ज्ञात झाले होते. आता नद्यांचे जल किती निर्मळ, शुद्ध आहे हे महादेवचं जाणे. पण किती साधी-सरळ भक्ती होती पूर्वी. किती शुद्ध भाव होता. पण आता मात्र या शुद्ध भावाचे किंवा भक्तीचे स्वरूप मोठ्या प्रमाणात बदललेले आहे आजच्या कावड यात्रांचे स्वरूप पाहता ती भक्तांची एक "मनी शुद्ध माझ्या असे भाव भोळा" अशी यात्रा आहे की, निव्वळ डीजेच्या कान फाडणा-या, शरीरात कंप निर्माण करणाऱ्या भल्या मोठ्या आवाजाच्या तालावर गोंगाट, कोलाहल करीत जाणारा, सण म्हणजे सुद्धा एन्जॉय समजणारा केवळ एक जत्था आहे असे सामान्यजनांना वाटू लागते.
हिंदू धर्मामध्ये पूर्वापार अनेक सणसमारंभ, रितीरिवाज चालत आलेले आहेत. हे सणसमारंभ चलीरीती, परंपरा अत्यंत साध्या पद्धतीने पार पाडले जात असत. शंकर भगवान हे पूर्वीपासूनच भोळे म्हणून ओळखले जातात. वनातील कोणतीही पत्री त्यांना वाहिली तरी चालते असेच आपण सर्व लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत. कुण्या एका शंकराच्या पुस्तकात एक मनुष्य रात्री जंगलात काही आसरा नसतांना शंकराच्या पिंडीवर पाय देऊन रात्रभर त्या झाडावर बसतो. बसल्या-बसल्या एक-एक पान तोडून खाली टाकतो. ते पान नेमके खालच्या पिंडीवर पडते. पिंडीवर बिल्व पत्राचा आपसूकच अभिषेक होतो व त्यामुळे भगवान शंकर त्याला प्रसन्न होतात अशी एक कथा आहे. या कथेवरून समजते की शंकर इतका भोळा आहे की, त्याच्याच पिंडीवर पाय देऊन चढलेल्या आणि सहज रात्री काही काम नाही म्हणून झाडावरून एक एक पान खाली टाकणा-याचे पान पिंडीवर पडले म्हणून त्याला सुद्धा तो प्रसन्न झाला. परंतु आता मात्र शंकराला बेलच पाहिजे, हे पान नको अन् ते फुल नको असे उगीचच सांगितले जाते. झेंडूचे फुल नको असे नवीन ऐकायला मिळत आहे. पण काही भक्त झेंडूचे हार शंकराच्या पिंडीला घालतात आणि झेंडूचे फुल मात्र नको म्हणतात. हरतालिकेला तर पत्री अर्थात कोणत्याही झाडांची पाने तोडून भोळ्या शंकरास वाहात असतात. तसेच अनेक लोक भक्ती भावाने मंदिरे उभारतात. त्या मंदिरांमुळे एकता स्थापित होणे गरजेचे आहे. परंतु बरेच वेळा दुर्दैवाने तसे न होता वाद होत असल्याचे दिसते. असो ! हा भाग वेगळा परंतु आताशा भक्तीचे अवडंबर होतांना दिसत आहे. भगवंताच्या आराधनेमध्ये भक्तीपेक्षा दिखावाच जास्त दिसून येत आहे. श्रावणात निघणाऱ्या कावडयात्रांमध्ये मोठमोठे, देखावे आणि तत्सम इतर अनेक गोष्टींचे प्रमाण फार फोफावले आहे. सणांमुळे हिंदू समाज एकत्रित येतो, सामाजिक सलोखा, एकोपा वाढतो तसेच अर्थव्यवस्थेला चालना मिळते आणि सामाजिक संघटन निर्माण होते. हे सर्व जरी खरे असले तरी कुठेतरी हे सण समारंभ सुव्यवस्थितपणे इतरांना त्रास न होतील अशा पद्धतीने, नशा विरहित, अमली पदार्थ विरहित पद्धतीने साजरे व्हावे असे वाटते. मोठी मिरवणूक काढण्यास काही हरकत नाही परंतु कर्णकर्कश्श असे डीजे मात्र टाळायलाच हवे. भगवान शंकराचे कुठलेही चित्र आपण बघितले तर आपल्याला एकांतात, कैलास पर्वतावर ध्यानात बसलेले देवांचे देव महादेव हेच चित्र आठवते. या चित्रावरून असे बोधित होते की भगवान शंकराला शांतता प्रिय आहे. कोलाहलापासून त्यांना दूर राहणे आवडते. अशा शांतताप्रिय निळकंठाच्या कावडयात्रेमध्ये हल्ली मात्र मोठ्या प्रमाणात गोंगाट वाढलेला आहे. असा गोंधळ भगवान सदाशिवाला आवडेल का ? तशी भक्ती शंकराला प्रिय होईल का ? असा प्रश्न साहजिकच पडतो. त्यामुळे यावर तरुणांनी व त्यांना प्रोत्साहित करणाऱ्यांनी अवश्य विचार करावा असे वाटते. परंतु आजकाल हा सर्व विचार केला जात नाही. लोकशाहीमध्ये संख्येला जास्त महत्त्व आहे. त्यामुळे जिथे संख्या आहे तिथे राजकारणी सुद्धा त्या संख्येच्या बाजूने कललेले दिसतात. 35-40 वर्षांपूर्वी अत्यंत कमी संख्येने जाणारे कावडधारी दिसले की मनाला प्रसन्न वाटे. त्यांना पाहून नागरिकांचा भक्ती भाव सुद्धा जागृत होत असे. तसेच त्यांनी दिलेली "हर बोला हर महादेव" ही आरोळी सुद्धा भगवान महेशाचे स्मरण येणाऱ्या जाणाऱ्यांना करून देई. परंतु आता मात्र भल्यामोठ्या कावड यात्रांच्या मधून मार्ग काढत नागरिक कसेबसे जातात, डीजेपासून अंतर राखून किंवा कानात बोटे घालून जातात. त्यांना ना शंकराचे स्मरण होत असावे, ना त्यांच्या मनात भक्तीभाव जागृत होत असावा किंवा प्रसन्नता सुद्धा वाटत नसावी.
बऱ्याच वेळाने मला ऐकू येत असलेला डीजेचा आवाज आता थांबला होता. मी मनोमन त्या केदारनाथास, त्या ओंकारेश्वरास नमन केले. मनात प्रश्न आला की, काळाच्या ओघात डीजेच्या कर्णकर्कश्श अशा आवाजात कुठेतरी हरवलेली "हर बोला हर महादेव" ही घोषणा पुन्हा ऐकू येईल का ?.
खुप छान सत्य परिस्थिती आहे.
उत्तर द्याहटवा