Click "Follow" Button below To Follow this Blog

२०/०४/२०२३

article about mafia in UP , Encounter of Asad and killing of Atik and Ashraf

खळांची व्यंकटी सांडो 

गुन्हेगार मग तो कुणी का असेना त्याची व्यंकटी ही सुटलीच पाहिजे.  गुन्हेगारांचा "विनाशायच दुष्कृताम" याप्रमाणे नायनाट हा व्हायलाच हवा तेंव्हाच इतरांना सुद्धा कायद्याचा धाक वाटेल व ते दुष्कृत्ये करण्यास धजावणार नाही व त्यामुळे  या विश्वातील सर्व जीवांचे मैत्र जडेल. अशीच प्रार्थना माऊली करतात. 

गत आठवड्यात उमेश पाल हत्याकांडातील आरोपी असद अहमद याचा झांशी येथे एसटीएफच्या चकमकीत अंत झाला. त्याला पकडून देणा-यास पाच लाखाचे बक्षीस सुद्धा जाहीर करण्यात आले होते. तदनंतर पोलिसांच्या ताब्यात असलेले त्याचे वडील अतिक अहमद व काका अशरफ अहमद या अनेक गुन्ह्यांचे दोषारोपण माथ्यावर असलेल्या दोघांवर माध्यमांचे चित्रीकरण सुरु असतांना व पोलिसांच्या ताब्यात असतांना तीन मारेक-यांनी पत्रकारांच्या वेषात येऊन अगदी जवळून गोळ्या झाडून त्यांना यमसदनी पाठवले व स्वत: पोलिसांना शरण आले. हे मारेकरी सुद्धा गुन्हेगारच असल्याचे कळते. असद, अतिक, अशरफ या गुन्हेगार, माफियांचा अशाप्रकारे अंत झाल्यावर समाज माध्यमे, वृत्तवाहिन्या, वृत्तपत्रे यांच्यातून बातम्यांना ऊत आला व अतिक आणि त्याच्या कुटुंबियांच्या गुन्ह्यांचे अनेक किस्से जनतेसमोर आले. अनेक गुन्ह्यात आरोपी असूनही बीबीसी या "वृत्तवाहिनीने मात्र माजी आमदाराची हत्या" असे शीर्षक असलेली अशी बातमी दिली. यावरून बीबीसीचा खरा दिसून येतो. अतिक हा आपल्या दबदब्याच्या जोरावर निवडून सुद्धा आला होता. अतिक हा अगदी तरुण वयातच गुन्हेगारी जगतात शिरला. त्याच्या वडीलांचा टांग्याचा व्यवसाय होता. अगदी तरूण असतांना म्हणजे केवळ 17 वर्षाचा असतांना चांदबाबा नावाच्या एका डॉनचा दबदबा होता. या चांदबाबाशी अतिकने टक्कर देणे सुरु केले व त्यामुळे त्याच्या मागे अनेक लोक उभे राहिले. पुढे अतिकवर अनेक हत्यांचे आरोप झाले, लोकांच्या जमिनी त्याने बळकावल्या असे अनेक प्रकारचे उपदव्याप त्याने सुरु केले. गुन्हेगार व राजकारण यांचे संबंध कसे येतात व ते चांगले प्रस्थापित कसे होतात हा एक प्रश्नच आहे. एखाद्या सिनेमाच्या कथानकाला शोभेल असा या अतिकचा गुन्हेगारी जीवनपट आहे. अतिक पुढे राजकारणात सक्रिय झाला व 1989 या वर्षी चक्क आमदार सुद्धा झाला. केवळ एकदाच नव्हे तर वर्ष 2004 पर्यंत तो पाचवेळा आमदार झाला, संसदेवर सुद्धा निवडून आला. पुढे ज्यावेळी चांदबाबाची हत्या झाली व संशयाची सुई अतिककडे फिरली होती. प्रयागराज पोलीस खात्यात अनेक गुन्हे अतिक व त्याच्या कुटुंबीयांवर पोलिसांनी लावले.  राजकारणात गुन्हेगारांचा शिरकाव होणे व त्याला कोणत्या का मार्गाने होईना समाजमान्यता मिळणे ही आपल्या लोकशाहीची शोकांतिकाच आहे. 2006 मध्ये राजू पालची हत्या व यातील साक्षीदार उमेश पाल याची 2023 मध्ये हत्या हा सर्व कट अतिकनेच रचला होता. परवा अतिक व त्याच्या भावाची हत्या झाली आणि अतिकची गुन्हेगारी संपुष्टात आली. अतिकमुळे त्याचे सर्व कुटुंबीयच एक माफिया कुटुंब झाले. त्याचा एक मुलगा अद्यापही तुरुंगातच आहे. अतिकची बायको शाईस्ता परवीन ही सुद्धा एक लेडी डॉनच आहे. सध्या ती फरार आहे. अतिकच्या स्थावर मालमत्ता आणि सावकारी प्रकरणे व काळ्या पैशांचा व्यवहार शाईस्ताच पाहते असे म्हटले जाते. शाईस्ताची नणंद सुद्धा नेमबाज असल्याचे बोलले जाते. आज शाईस्ता तोंड लपवत इकडे तिकडे फिरत आहे. प्रत्येक गोष्टीला अंत हा असतोच. तसेच कर्म चांगले असो वा वाईट त्याचे फळ मिळणे हे क्रमप्राप्तच असते. असदवर 101 गुन्हे आहे. भगवंताने शिशुपालचे सुद्धा १०० अपराध माफ केले होते. त्याने जेंव्हा 101 वा अपराध केला तेंव्हा भगवंताने त्याचा शिरच्छेद केला होता. असदचा सुद्धा 101 अपराधांचा घडा भरला व तो फुटला.  अनेक लोक याचा संबंध मा. योगी हे मुख्यमंत्री असल्याने धर्माशी जोडत आहे व अतिकचा मुलगा असदला मारायला नको होते अशी ओरड त्याचे शेजारी पाजारी करीत आहेत परंतू गुन्हेगार हा गुन्हेगार असतो त्याला कोणता धर्म नसतो. अतिक या गुन्हेगाराविषयी सहानुभूती बाळगणा-यांनी अतिकने ज्यांच्या हत्या केल्या, ज्यांच्या जमिनी बळकावल्या त्यांच्या नातेवाईकांवर काय परिस्थिती आली असेल याचा सुद्धा विचार करावा. 1985 पासून सुरुवातीला किरकोळ गुन्हे, अपहरण, हत्येचे कट करणे,  हत्या करणे, खंडणी व नंतर जमिनी बळकावून आपले गुन्हेगारी विश्वाचे साम्राज्य उभे करणा-या असदला त्याच्या  कर्माचे फळ हे मिळाले. माऊलींनी विश्वाच्या कल्याणाकरीता जे पसायदान मागितले आहे त्यात ते हेच म्हणतात की 

जे खळांची व्यंकटी सांडो 

तया सत्कर्मी रती वाढो

अर्थात खल म्हणजे दुष्ट, व्यंकटी म्हणजे वाकडेपणा. म्हणजे सर्वप्रथम दुष्टांचे दुष्टपण सुटावे त्यांना सत्कर्माची आवड उत्पन्न व्हावी.

    गुन्हेगार मग तो कुणी का असेना त्याची व्यंकटी ही सुटलीच पाहिजे. गुन्हेगारांचा "विनाशायच दुष्कृताम" याप्रमाणे नायनाट हा व्हायलाच हवा तेंव्हाच इतरांना सुद्धा कायद्याचा धाक वाटेल व ते दुष्कृत्ये करण्यास धजावणार नाही व त्यामुळे  या विश्वातील सर्व जीवांचे मैत्र जडेल. अशीच प्रार्थना माऊली करतात. 

१३/०४/२०२३

Article about use of an old nostalgic song in a advertise of male undergarments

 ह्रदयस्पर्शी गाण्यांचा खून

जुन्या श्रवणीय, हृदयस्पर्शी अशा गीतांचा वापर हा अंतर्वस्त्रांच्या जाहिरातीत करणे, त्यात तोकड्या कपड्यातील कलाकारांना विक्षिप्त आविर्भाव प्रकट करतांना दाखवणे  म्हणजे त्या परीश्रमपूर्वक व प्रसंगानुरूप बनवलेल्या गीतांचा खूनच करणे नाही का ? 

आम्ही हायस्कूल मध्ये शिकत असतांना माझ्या बहिणी संगीत शिकत असत. त्यांच्या संगीत क्लास मध्ये कुण्या विद्यार्थ्याने गायनात हरकती घेतांना चुका केल्या तर त्यांचे संगीत शिक्षक त्या विद्यार्थ्याला उद्देशून "तू गाण्याचा खून केला" असे वाक्य म्हणायचे. या वाक्याची आठवण काल झाली. परंतू आजच्या लेखात ज्या गीतासंबंधी लिहीत आहे त्या गाण्यात अथवा गायनात कुठे चूक झालेली नसून एका जुन्या श्रवणीय, हृदयस्पर्शी गीताचा वापर चुकीच्या पद्धतीने करून मूळ गाण्यात प्रेमाची जी उत्कट भावना व्यक्त झाली आहे तीला छेद देऊन त्या शब्दांचा उपयोग वेगळ्याच भावनांसाठी व्यक्त होतांना दाखवला आहे. म्हणून गाण्याचा खून हा त्या संगीत शिक्षकांचा शब्दप्रयोग लेखात व शीर्षकात करावासा वाटला.  

आजकालच्या सिनेमातून क्वचितच चांगली गाणी ऐकायला मिळतात. जी जुनी चांगली गीते आहेत त्यांचे "टिन कनस्तर पीट पीट कर गला फाड कर चिल्लाना"  या पठडीत नव्याने निर्माण केलेले रिमिक्स व्हर्जन्स व तशीच काहीशी नवीन गीते असे आजकालच्या गीतांचे स्वरूप असते. दुर्दैवाने गीते, चित्रपट, साहित्य, नाटके यांची उत्तमोत्तम अशी निर्मिती दिवसागणिक कमीच होत आहे. जाहिरात क्षेत्रात सुद्धा तेच. आपल्या उत्पादनाचा खप व्हावा म्हणून निर्माते जाहिराती करतात , जाहिरातीचे युगच आहे असे म्हटले जाते. जाहिरातीस काही विरोध नाही परंतू जाहिराती तयार करतांना जाहीरात निर्मात्यांच्या कल्पनाशक्तीच्या भरा-या पाहून आश्च्रर्य वाटते. लहान मुलांच्या गोळ्यांच्या जाहिरातीत एक माणूस टीव्हीवर त्या गोळ्यांची जाहिरात पाहतो व "टेम्पटेशन" होऊन टीव्हीलाच चाटतो असे दाखवले आहे. दुस-या एका चॉकलेटच्या जाहिरातीत एक वृद्ध इसम लहान मुलाला चॉकलेट न देता त्याच्या हातातून चॉकलेट हिसकावून घेतांना दाखवले आहे. तो वृद्ध म्हणजे त्या मुलाचे आजोबाच असावेत. आपल्या भारतात आजी आजोबा हे नातवंडांना दुधावरची साय समजून त्यांच्यावर स्वत:च्या मुलांपेक्षाही अधिक  प्रेम  करतात. काही जाहिरातीत हिंदू देवी देवता सुद्धा व्यंगात्मक पद्धतीने चित्रित केलेले दाखवले आहे. आणखी एका जाहिरातीत "Thank You यार तुने कूछ नही किया" असा संवाद आहे. "They only live who live for others" अशी शिकवण देणा-या स्वामी विवेकानंदांच्या या देशात दुस-यासाठी काहीतरी करावे, दुस-याच्या मदतीस जावे, कर्म करून योग साधावा अशी शिकवण  दिली जात असतांना हे "Thank You यार तुने कूछ नही किया" म्हणजे कर्म न करणे चांगले असेच काहीसे  नवीन पिढीच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे हेतुपुरस्सर आहे का असा प्रश्न पडतो. अंतर्वस्त्रांच्या जाहिराती करतांना तर जाहिरात निर्मात्यांच्या कल्पनेच्या भरा-या उत्तुंगतेच्या सीमा गाठतात. अशा या जाहिराती असतात. आता जाहिरातीत झालेल्या गाण्याच्या खूनाच्या मुद्द्यावर येऊ. परवा बातम्या पाहतांना ब्रेक मध्ये एक पुरुषांच्या अंतर्वस्त्रांची जाहिरात लागली. तसे तर अंतर्वस्त्रे म्हणजे खाजगी बाब पण त्यांच्या जाहिरातीने लिहीण्यास भाग पाडले. पुरुष अंतर्वस्त्रे एका ललनेस आकर्षित करतात हे दाखवतांना जाहिरात बनविणा-याने त्या जाहिरातीत 50 च्या दशकातील यहुदी चित्रपटाच्या एका श्रवणीय, हृदयस्पर्शी व आजही हिट असलेल्या मुकेशने गायलेल्या एका गीताचा वापर केला आहे.  हे गीत म्हणजे "ये मेरा दिवानापन है या मोहोब्बत का सुरूर". अंतर्वस्त्रांच्या जाहिरातीत या गीताचा वापर म्हणजे या गीताचा खूनच म्हणता येईल. यहुदी म्हणजे माझ्या जन्माच्याही 25 वर्षे अगोदरचा सिनेमा तो पाहिला नाही परंतू जुनी सिनेगीते अमर आहेत, त्यांचा गोडवा अमीट आहे त्यामुळेच ती आजच्या पिढीला सुद्धा माहीत आहे. 

"ये मेरा दिवानापन है या मोहोब्बत का सुरूर

 तू न पहचाने तो ये है तेरी नजरोका कुसूर " 

हे गीत कित्येकदा ऐकले आहे. प्रेमात ठोकर खाल्लेला एक यहुदी युवक आपल्या प्रेमाच्या तरल भावना या गीतातून व्यक्त करतो. 

दिल को तेरीही तमन्ना, दिल को है तुझसेही प्यार

 चाहे तू आये ना आये , हम करेंगे इंतजार 

आपल्या प्रेमिकेला तो म्हणतो की तू ये किंवा नको येऊ मी तुझी वाट बघतच राहील. काळाच्या ओघात हे असे प्रेम नष्ट झाले. गुलाब दिला की आठवड्याभरातच ब्रेक अप पण होते. अशा या पिढीला ही गीते व त्यातील भावना, त्या गीताचा दर्जा, गीतकाराची काव्य प्रगल्भता ती काय समजणार ? आणि म्हणूनच याच पिढीतील या जाहिरात निर्मात्यांना अंतर्वस्त्रांच्या जाहिरातीसाठी या उपरोक्त गीताचा वापर करावासा वाटतो. "गाढवाला गुळाची चव काय" ही म्हण या उपरोक्त जाहिरात निर्मात्यांना तंतोतंत लागू पडते. या गीताप्रमाणे इतरही अनेक जुन्या गीतांचा वापर जाहिरातीत चुकीच्या पद्धतीने अनेक वेळा केल्या गेला आहे. मागे एका अंतर्वस्त्राच्या जाहिरातीवर सरकारने बंदी सुद्धा आणली होती. माहिती व प्रसारण खात्याने उपरोक्त जाहिरातीप्रमाणे असणा-या इतरही अनेक जाहिरातींवर बंदी आणून अशा जाहिरात निर्मात्यांच्या थोबाडीत लगावली पाहिजे. गीत गायन करतांना एकवेळेस हरकती घेतांना झालेल्या चुका क्षम्य आहे परंतू जुन्या श्रवणीय, हृदयस्पर्शी अशा गीतांचा वापर हा अंतर्वस्त्रांच्या जाहिरातीत करणे, त्यात तोकड्या कपड्यातील कलाकारांना विक्षिप्त आविर्भाव प्रकट करतांना दाखवणे म्हणजे त्या परीश्रमपूर्वक व प्रसंगानुरूप बनवलेल्या गीतांचा खूनच करणे नाही का ? 

👉 जुन्या गीतांच्या चाहत्यांसाठी गाण्याची लिंक 

 https://www.youtube.com/watch?v=jBxDcoFVdVQ              

३०/०३/२०२३

Article about Orange City Warud city( California of Vidarbha Region) of Amravati District, Maharashtra, India

विदर्भाचा कॅलिफोर्निया - वरुड 


अत्युत्कृष्ट,सुमधुर असलेल्या संत्र्यांमुळे वरुडला विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून ओळखतात. संत्रे म्हटले की नागपुरी संत्र असे म्हटले जाते. परंतू वरुड मध्ये पिकणारी संत्री हीच सर्वात चविष्ट असल्याचे जाणकार व जुनी माणसे सांगतात. एकदा एका स्वामीजींना मी वरुडची संत्री अर्पण केल्यावर त्यांनी ती आनंदाने भक्षण केली होती व वरुडच्या संत्र्याचे महत्व सांगितले होते.

वरुड,अमरावतीच्या पुढे 80-85 किमी अंतरावरील गांव. मध्यप्रदेशच्या सीमेलगतचे एक छोटे परंतू टुमदार गांव. अमरावतीहून नागपूरला जायचे असेल तर कोंढाळी, कारंजा घाटगे या मार्गाप्रमाणेच मोर्शी-वरुड-काटोल या मार्गाने सुद्धा जाता येते. अमरावती- नरखेड रेल्वे मार्ग झाल्यानंतर अमरावती जिल्ह्यातील तालुका स्थान असलेले हे शहर रेल्वेच्या नकाशावर सुद्धा आले. या शहराशी माझा संबंध आला तो 25/26 वर्षांपुर्वी, माझ्या बहिणीच्या विवाहोपरांत. हे शहर सुद्धा नात्यात आले, काहींशी चांगले मैत्र्य जडले. तत्पूर्वी वरुड हे नांव केवळ ऐकिवात होते. अमरावती, नागपूर या शहरांत गेलो होतो मात्र मोर्शी, वरुड या भागांत मात्र जाण्याचे कधी काही कामच पडले नव्हते. नंतर मात्र कित्येकदा जाणे झाले. आता काही दिवसांपूर्वी विदर्भाच्या कॅलिफोर्निया म्हटल्या जाणा-या वरुडला जाणे झाले. अमरावती मागे टाकून बस वरुड रस्त्याला लागली होती, नुकत्याच सुरु झालेल्या उन्हाळ्यात नैसर्गिक थंड वारा खिडकीतून सुखद दिलासा देत होता. प्रवासात एकटाच असल्याने वरुड, वरुडच्या आठवणी , रम्य परिसर असे  विचार मनात घोळत होते. अमरावती- वरुड मार्ग आता काही वर्षांपुर्वी चांगला सिमेंटचा, रुंद व गुळगुळीत झाला. मला पुर्वीचा 

हिरवी श्यामल भवती शेती , पाऊलवाटा अंगणी मिळती 

नव फुलवंती , जुई शेवंती , शेंदरी आंबा सजे मोहरू 

अशा वरुडच्या वाटा आठवू लागल्या. दोन्ही बाजूंनी गर्द कडूनिंबांची झाडे, हिरवीगार शेती  व संत्रा बगीचे असलेला. (शेती अगदी लुप्तच झाली असेही नाही) तेंव्हा सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्यावर रस्ता सुरक्षेबाबतची अनेक चांगली अशी घोषवाक्ये सुद्धा लिहिलेली होती. रस्ता रुंदीकरणाच्या वेळी कैक वर्षे जुन्या असलेल्या त्या भल्या मोठ्या कडूनिंबांच्या झाडांवार यांत्रिक करवती कराकरा फिरल्या होत्या त्यावेळी मन खिन्न झाले होते. रस्त्या वरून मला बोरांग आठवले. या भागात गाडरस्त्याला बोरांग म्हणतात. मला बस मध्ये हे आठवत होते. अमरावती सोडले की माहुली या गावाच्या पुढे गेलो की आजूबाजूने संत्र्यांच्या बागा दिसू लागतात. रात्रीच्या शेवटच्या बसने मी जात होतो. अंधार असला तरी मला बसच्या हेडलाईटमुळे  बरेच ठिकाणी रस्त्याच्या आजूबाजूला नवीन वृक्षारोपण झालेले दिसले, परतीच्या , दिवसाच्या प्रवासात ही किशोरवयीन झाडे पाहून मला फार आनंद झाला. पुनश्च हा रस्ता पूर्वीसारखाच boulevard  होईल असे वाटले. यंदाच्या माझ्या वरुड प्रवासात वरुड शहरात मला खुप बदल झालेले जाणवले. मी एकटाच असल्याने व माझा प्रवास हा कोणतेही कारणरहित सहज व निचंतीचा असल्याने हे बदल मी निरक्षित होतो. अमरावतीहून वरुडला येत असतांना वरुडच्या अगदी अगोदर जरुड हे गांव येते नंतर वरुड. वरुडच्या पंचक्रोशीत येताच काही शासकीय निवासस्थाने व शासकीय विश्राम गृह आपल्याला दिसते.  याच भागात 25 वर्षांपुर्वी संत्रा बागा दिसत त्यांची जागा आता नवीन ले-आऊट ने घेतलेली दिसली , काही ठिकाणी नवीन घरे सुद्धा झालेली दिसली. दिवसागणिक NA/ आकृषक  जमिन वाढतच चालली आहे किंवा करवून घेतल्या जात आहे. लाखो करोडोंची उलाढाल होते आहे. NA , ले आऊट , बांधकाम क्षेत्र , यांमुळे पुर्वाश्रमीच्या कास्तकाराकडे बक्कळ पैसा आला. परंतू काही कास्तकार एकरकमी आलेल्या या लक्ष्मीचा चांगला विनियोग करु शकले नाहीत व ते देशोधडीला लागल्याच्या बातम्या वाचल्याचे मला स्मरले. या सर्वांमुळे व शेतीबाबत अनुत्साही असलेल्या तरुण पिढीमुळे शेत जमिनीचे भविष्य काय ? हा प्रश्न मनाला शिऊन गेला. हा रस्ता राज्य परीवहन मंडळ बस स्थानकाकडे जातो. एक सहप्रवासी एका थांब्यावर उतरल्याने माझ्या विचारांत खंड पडला. आता हा रस्ता चांगलाच रुंद झालेला दिसला. विश्राम गृहाजवळून गावाकडे जाणारा एक जुना रस्ता सुद्धा आहे. या ठिकाणी आता "I Love Warud" अशी विद्युत दिव्यांची पाटी लावलेली दिसली. बस स्थानक ते गावाकडे जाणा-या रस्त्याने आता आधुनिक स्वरूप धारण केले आहे. मोठ्या मोठ्या शो रूम, दिमाखदार अशी मोठाली व आकर्षक दुकाने,  दवाखाने , पेट्रोल पंप, मोठ्या इमारती असे दृश्य आता दिसते. पुर्वी हा रस्ता विरळ होता. येथूनच गावाकडे जातांना एक रस्ता नागपूर, एक भिलाई तर डावीकडचा एक मुलताईकडे जातो. वरुड हे रोड जंक्शन आहे. अनेक गावांना जोडणारे रस्ते इथून जातात. गावात केदारेश्वर मंदिर , देशबंधू दास वाचनालय , विठ्ठल मंदिर अशी काही जुनी प्रतिष्ठाने आहेत. तर गावाजवळ सालबर्डी, नागठाणा अशी निसर्गरम्य देवस्थाने आहेत. गावात प्रवेश केल्यावर केदार टॉकीज म्हणजेच केदार चौक आहे. टॉकीज आता राहिली नाही, मोठे व्यापारी संकुल झाले आहे. अनिल कपूरचा कुठलातरी सिनेमा या टॉकीज मध्ये पाहिल्याची आठवण मला उगीचच त्या व्यापारी संकुलाकडे पाहिल्यावर झाली. एकेकाळी हजारोंचे मनोरंजन करणारा, लाखोंची तिकीट विक्री व मनोरंजन कर भरणारा टॉकीज व्यवसाय बघता बघता डबघाईस गेला. रात्री भोजनोपरांत विश्राम केला. सकाळी आन्हीके आटोपल्यावर सहज म्हणून गच्चीवर गेलो. इथे गच्चीला गच्चा असे म्हणतात. अनेक शब्दांचे उच्चारण इथे थोडे वेगळ्या पद्धतीने करतात.  वरूडला गेलो की बरेचदा गच्चीवर जातोच. यंदा तर ब-याच दिवसांनी वरुडला जाणे झाले होते. वरून चौफेर नजर फिरवल्यावर सकाळी बाजारपेठेत झालेला बदल दिसलाच होता व आता गच्चीवरून वरुड शहरातील घरांमध्ये झालेला लक्षणीय बदल सुद्धा जाणवला. नव्या घराच्या मागे लगतच बहिणीचा जुना माडीचा वाडा दिसतो. 

चौकटीवर बाल गणपती , चौसोपी खण स्वागत करती , 

झोपाळ्यावर अभंग कातर , सवे लागती कड्या करकरू     

असा तो वाडा जावाई बुवा व त्यांच्या बंधूंनी अजूनही चांगला राखून ठेवला आहे. झोपाळा म्हणजेच बंगई सुद्धा आहे. याच बंगईवर बहिणीचे रुबाबदार सासरे गोपाळराव लोहकरे बसत असत. गच्चीवरून दूरवर सातपुड्याच्या पर्वत रांगा दिसतात. कौलारू घरे व त्याच्या पार्श्वभूमीला सातपुडा पर्वत व आदित्यराजाच्या  सांजवेळीच्या रंगछटा असे ते दृष्य मोठे विलोभनीय दिसत असे. पुर्वी दिसणा-या कौलारू घरांची जागा आता सिमेंटच्या घरांनी घेतलेली दिसली. पुर्वी दिसणा-या कौलारू घरांचेच दृश्य मला अधिक भावत असे परंतू बदलाला कोण रोखू शकते. दूरवर दिसणा-या त्या निळसर सातपुड्याच्या रांगांचे निरीक्षण करता करता 

"आठवणींच्या आधी जाते जिथे मनाचे निळे पाखरु , 

खेड्या मधले घर कौलारू 

या गदिमांच्या कवितेच्या ओळी व कविता आठवली. आता वरुड मध्ये अत्यल्प झाली असली तरी लगतच्या खेड्यांमध्ये मात्र आजही जुनी कौलारू घरे दिसतात. अत्युत्कृष्ट, सुमधुर

असलेल्या संत्र्यांमुळे वरुडला विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून ओळखतात. संत्रे म्हटले की नागपुरी संत्र असे म्हटले जाते. परंतू वरुड मध्ये पिकणारी संत्री हीच सर्वात चविष्ट असल्याचे जाणकार व जुनी माणसे सांगतात व खाणा-याला सुद्धा त्वरित लक्षात येते. एकदा एका स्वामीजींना मी वरुडची संत्री अर्पण केल्यावर त्यांनी ती आनंदाने भक्षण केली होती व वरुडचीच संत्री सर्वोत्तम असल्याचे सांगीतले होते, माझ्याकडे ती कशी आली याची विचारणा केली होती. अशी ही वरुडची संत्री. शहरांचे आकर्षण, जागतिक उष्णता वाढ, जगात  झपाट्याने होणा-या बदलांसोबत बदलत जाणारे वरुड मी न्याहाळले. आज येथील नवीन पिढी शिक्षण , नोकरी अनुषंगाने दूरदेशी गेली आहे. 

"माजघरातील उजेड मिणमिण , वृद्ध कांकणे करिती किणकिण

किणकिण ती हळू, ये कुरवाळू दूरदेशीचे प्रौढ लेकरू   

नोकरी निमित्त येथून गेलेले शहरी, विदेशी चमकधमक भावलेले  तरुण पुनश्च येथे येतील का ? हा विचार सुद्धा मनी दाटला. माझी आता वरुड भेट संपुष्टात आली होती. मी बस मधे बसलो. वरुड शहराचा काही भाग न्याहाळता न्याहाळताच माझी बस गावापासून खुप लांब आली. ज्याप्रमाणे वरुड मधील कौलारू घरे लुप्त झाली तसे आगामी काळात होणा-या बदलांमुळे येथील संत्रा बागांचे सुद्धा काय होणार ? माझ्या मनात भीतीयुक्त शंका आली . एवढ्यात हिवरखेड गावाजवळच्या एका संत्र्याच्या मोठ्या नर्सरीत मला काही लहान मुले संत्र्याची रोपे घेऊन जात असलेली दिसली व हा संत्रा आगामी काळात सुद्धा बहरतच राहील असा सकारात्मक विचार माझ्या मनात चमकून गेला. शासनाने सुद्धा संत्रा बागायतदारांसाठी पुढाकार घ्यावा असे वाटले. वरुड केंव्हाच मागे पडले होते. 25 वर्षांपूर्वीचे वरुड व आताचे बदललेले वरुड अशी स्मृतीचित्रे आणि वरुडची संत्री सोबत घेतलेल्या मला ती बस माझ्या  गंतव्यस्थानाकडे घेऊन धाऊ लागली.  

✍️विनय वि. वरणगांवकर©

1 नवीन पिढीसाठी 

गदिमा - गजानन दिगंबर माडगुळकर (प्रख्यात कवी, लेखक,  गीत रामायण रचयिते)

boulevard = दुतर्फा झाडे असलेला रस्ता


२३/०३/२०२३

Article about Lambretta , a old scooter.

 आठवण एका स्कूटरची


 स्कूटर म्हटली की तुम्हाला बजाजची आठवण येणार , परंतू ही स्कूटर बजाजच्याही कित्येक वर्षे आधीची अशी स्कूटर आहे. आजच्या पिढीतील अनेकांना ही स्कूटर व तीचे हे नांवही माहीत नसेल.  अनेकांना जुना काळ, Antic जुन्या गोष्टी , यांचे बाबत जिव्हाळा आहे . आजकालच्या use and throw च्या काळात त्यांच्या पूर्वीच्या पिढीने या वस्तूंची , वाहनांची जीवापाड घेतलेली काळजी त्यांनी पाहिलेली आहे.  त्यांना हे सारे हृदयस्पर्शी वाटते. त्यांचेसाठीच ही आठवण. 

    स्कूटर म्हटली की तुम्हाला बजाजची आठवण येणार , परंतू ही स्कूटर बजाजच्याही कित्येक वर्षे आधीची अशी स्कूटर आहे. आजच्या पिढीतील अनेकांना ही स्कूटर व तीचे नांवही माहीत नसेल. हे नांव आठवण्यास निमित्त घडले ते समाज माध्यमावर पाहिलेल्या एका जुन्या छायाचित्राचे. जेष्ठ अभिनेता धर्मेंद्र, माला सिन्हाचे कृष्ण धवल असे हे चित्र होते. हे चित्र पाहिले आणि स्कूटर या विषयाची एक किक बसली, अनेक आठवणींची ट्रॅफिक डोक्यात सुरू झाली. विचारांनी पिक अप घेतला. शाळकरी विद्यार्थी असतांना माझ्या काकांनी माझ्या मोठ्या भावासाठी एक वेगळीच स्कूटर आणली. तेंव्हा बजाजची स्कूटर चांगलीच जोरात होती. राजदूत ही मोटर सायकल सुद्धा होती. त्या काळात ही वेगळीच लांब आकाराची स्कूटर पाहून आम्हाला आश्चर्य वाटले होते. पुढे या स्कूटरचे नांव लॅम्बरेटा आहे असे कळले. आम्ही ती स्कूटर खूप न्याहाळत असू. 4 गियर, समोरच्या सिट खाली छोटासा टुल बॉक्स व त्याच्या दोन्ही बाजूला कॉक व चोक, हॅंडल हालवल्यावर केवळ समोरचे चाक हालत असे त्यावरील मडगार्ड स्थिर असे, ते बॉडीलाच जोडलेले असे. नंतर आलेल्या बजाज स्कूटरचे मात्र तसे नव्हते. लॅम्बरेटाचे इंजिन हे मधोमध होते म्हणजे चालक व मागे बसणा-याच्या सिटच्या खाली. त्यामध्ये दुरूस्ती किंवा देखभाल करायची असल्यास दोन्ही बाजूची पॅनल उघडावी लागत असत.  या पॅनलच्याच बाजूने गाडीलाच जोडलेले असे फुटरेस्ट होते. मागे स्टेपनी लावण्यासाठी जागा होती. मला तऱ आमच्या त्या लॅम्बरेटाचा नंबर सुद्धा अजून लक्षात आहे. MMA 7178 असा तो नंबर होता. आम्ही तिला 7178 असेच म्हणत असू. माझा भाऊ ती गाडी मोठी जोरात चालवत असे तो महाविद्यालयातून घरी आला की दुरूनच जोरात टीर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्र असा हॉर्न वाजवत असे मग आम्ही लगेच फाटक उघडायला धावत असू व तो झोकात गाडी अंगणात आणून उभी करत असे. त्याच्या त्या अशा थाटात एन्ट्रीचा आम्हालाच मोठा आनंद होत असे. मग आम्ही सारे एकमेकांकडे पाहून दिलखुलास हसत असू. 


    मध्यंतरी सोशल माध्यमांवर अनेक लॅम्बरेटा स्कूटर असलेले असे एक चित्र झळकले होते त्यात नव्या को-या अशा कित्येक लॅम्बरेटा स्कूटर जतन करून ठेवलेल्या दिसत होत्या. एकदा शम्मी कपूरच्या एका जुन्या गाण्यात नायक व त्याचे मित्र हे लॅम्बरेटावर बसून जात आहेत असे चित्रण केलेले दिसले होते  तर सदाबहार देव आनंदच्या गाजलेल्या तेरे घर के सामने चित्रपटात नायिकेला भेटायला म्हणून नायक दिल्ली ते सिमला असा लॅम्बरेटा ने प्रवास करतो असे दाखवले होते. खरे तर हे सर्व जेंव्हा पाहिले होते तेंव्हाच लॅम्बरेटा बद्दल लिहायचा विचार मनात डोकावला होता परंतू लॅम्बरेटा जशी मागे पडली तसा तो विषय सुद्धा मागेच पडून गेला. परवा जेंव्हा पुन्हा धर्मेंद्र, माला सिन्हाचे लॅम्बरेटावरचे कृष्ण धवल चित्र पाहण्यात आल्यावर हा विषय कागदावर उतरवलाच. आमच्या बालपणी आमच्याकडे तर लॅम्बरेटा होतीच तशीच ती गांवातील काही प्राध्यापक वृंदांकडे सुद्धा होती. घन सर, लिमये सर, अणे सर, व्यापारी बालकीसनदासजी पुरवार उपाख्य श्रीमानजी व इतर काही लॅम्बरेटा तेंव्हा आमच्या गर्दीहीन शहरात दिमाखाने फिरत असत. त्यावेळी लॅम्बरेटा ब्रॅंड, तिची कंपनी कोणत्या देशात उत्पन्न होते याबाबत काहीही माहिती नव्हती व तसा विचारही कधी मनात आला नाही. आजच्या पिढीतील लहान मुलांना मात्र नवीन गाड्या त्यांचे उत्पादन करणारे देश व कंपन्या  मुखोद्गत असतात. जाहिरातीमुळे नवीन पिढी बरीच चतुरस्त्र झाली आहे. पुढे मात्र लॅम्बरेटा म्हणजे इटली देशात उत्पादन होणारी इनोसेंटी या कंपनीची गाडी असल्याचे वाचनात आले होते. इटली मधील मिलान मधील लॅम्बरेट या जिल्ह्याच्या नांवावरून या स्कूटरचे  लॅम्बरेटा असे नामकरण केले होते. मला मात्र  बालसुलभ वयात लॅम्बरेटा या गाडीच्या लांब आकारावरूनच  काहीतरी जुळवून लॅम्बरेटा असे नामकरण केले असावे असे उगीचच वाटत असे. फर्डीनांडो इनोसेंटी या गृहस्थाने 1922 मध्ये  इनोसेंटी ही कंपनी स्थापन केली होती आणि दुस-या महायुद्धानंतर  लॅम्बरेटा हे स्कूटर उत्पादन करण्याचे ठरवले होते. प्रत्यक्षात तीचे उत्पादन 1947 मध्ये सुरू झाले होते. त्याच सुमारास व्हेस्पा या स्कूटरचे सुद्धा  उत्पादन सुरू झाले होते. तत्कालीन आर्थिक  दृष्ट्या कमजोर असलेल्या भारतात 1950 च्या सुमारास API (Automobile Products of India)  ने  लॅम्बरेटाचे असेंम्ब्लिंग सुरू केले होते. 1972 मध्ये इनोसेंटी कडून संपूर्ण हक्क घेऊन उत्तर प्रदेश मध्ये SIL ( स्कूटर इंडिया लिमिटेड ) ने लॅम्बरेटा सारखीच विजय डिलक्स ही स्कूटर बाजारात आणली होती.  व तद्नंतर बजाज स्कूटर भारतीय बाजारात उपलब्ध झाली. परंतू  सरकारने आता गाड्यांचे आयुर्मान 15 वर्षे ठरवले व त्यानंतर अनेक गाड्या भंगारात जाऊ लागल्या. आज बाजारात अनेक जुन्या गाड्या विक्रीस असतात. जुन्या/ नव्या कार विक्रीच्या अँप वरून कुणी व्यापारी अब्जाधीश सुद्धा झाला आहे म्हणे, असो !  वास्तविक पाहता तुम्ही कोणत्याही गाडीचा योग्य रखरखाव, देखभाल म्हणजेच Maintanance केले तर ती गाडी पंधराच काय तर अनेक वर्षे चांगली चालू शकते. आजही अनेक Ambessador, Fiat, मारुति 800 रस्त्यावर धावतांना दिसतात. जुनेच तेवढे चांगले असेही नाही अनेक नवीन, प्रवाशांच्या सुरक्षिततेची अत्यंत काळजी असलेल्या गाड्या आज बाजारात आहेत. काळाच्या ओघात अनेक गाड्या मागे पडल्या त्या खराब होत्या म्हणून मागे पडल्या असेही मात्र नाही.  परवा  धर्मेंद्र , माला सिन्हाचे लॅम्बरेटा वरचे ते कृष्ण धवल चित्र पाहून लॅम्बरेटाच्या या स्मृती जागृत झाल्या. स्मृतींच्या या प्रवासात तुम्हाला सुद्धा घेऊन जावेसे वाटले म्हणून हा लेखन प्रपंच. आजकाल जुने कोणाला आवडते ?  आज जुन्या माणसांचीच किंमत केली जात नाही तर वस्तूंची तर दूरच. वृद्धाश्रमांची संख्या वाढतेच आहे, जेष्ठ नागरीक एकाकी होत आहे , प्रसंगी त्यांचेवर हल्ले होत आहेत, त्यांची फसवणूक होत आहे अशा या काळात जुन्या माणसांचीच किंमत नाही तर जुन्या वस्तू आणि वाहने तर कुणाच्याच खिजगणतीतच नसणार. तरीही अनेकांना जुना काळ, Antic जुन्या गोष्टी , यांचे बाबत जिव्हाळा आहे . आजकालच्या use and throw च्या काळात त्यांच्या पूर्वीच्या पिढीने या वस्तूंची , वाहनांची जीवापाड घेतलेली काळजी त्यांनी पाहिलेली आहे.  त्यांना हे सारे हृदयस्पर्शी वाटते. त्यांचेसाठीच ही लॅम्बरेटाची आठवण. 



२२/०३/२०२३

Article about educational condition since last 30 years in Buldhana District

बुलढाणा जिल्ह्यातील शैक्षणिक स्थित्यंतरे 

शिवराय घडविण्याची जबाबदारी शैक्षणिक संस्थांंवर

तरुण भारत अकोला आवृत्ती वर्धापन दिन विशेष

बुलढाणा जिल्हा मातोश्री जिजामाता यांचे माहेर. या माऊलीने शिवरायांना जसे शिक्षण दिले, नैतिक शिक्षण दिले तसा आदर्श जिल्ह्यातील शैक्षीन संस्थांनी घेऊन शिवरायांसारखे आदर्श तरुण निर्माण करण्याचा वसा घेतला पाहिजे

शिक्षण विषय हा भारतातील एक महत्वाचा असा विषय आहे. या भारतवर्षात पुर्वी हजारो वर्षांपासून शिक्षणाची परंपरा सुरु आहे. ज्ञानाधिष्ठित अशी ही गुरुकुल परंपरा ऋषीमुनींच्या काळापासून सुरु आहे. नालंदा, तक्षशीला सारखी विद्यापीठे इथे होती, परदेशातील विद्यार्थी इथे शिकण्यासाठी येत, मोठी ग्रंथसंपदा इथे होती. परंतू परकीय आक्रमकांनी हे सर्व उध्वस्त केले परंतू तरीही ईश्वरचंद्र विद्यासागर, माष्टर महाशय, महर्षी कर्वे, भगिनी निवेदिता, टिळक, आगरकर, फुले दाम्पत्य यांनी हा वसा घेतला व ही ज्ञानज्योत तेवती ठेवली. पुढे स्वातंत्र्योत्तर काळात मात्र मेकॉलेच्या धोरणानुसार शिक्षण देणे सुरु झाले. यात आपण आपला "स्व" विसरलो व आजच्या आपल्या शिक्षण प्रणालीचे स्वरूप आपल्या सगळ्यांच्याच डोळ्यासमोर आहे. स्वातंत्रोत्तर काळात देशातील अनेक भाग हे अविकसित असेच होते, दुर्गम होते, दळणवळणाची साधने अत्यल्प होती. अशाच या अविकसित भागांपैकी एक जिल्हा म्हणजे बुलढाणा जिल्हा.

    बुलढाणा शहराला जिल्हा बनवण्याचे कारण म्हणजे गो-या साहेबांना मानवणारी व आवडणारी थंड हवा. खामगांव हे बुलढाणा शहरातील सर्वात मोठे शहर. स्वातंत्र्यपुर्व काळात या जिल्ह्यातील शैक्षणिक स्थिती ही इतर ठिकाणी होती तशीच होती. काही शासकीय शाळा या जिल्ह्यात त्या काळात होत्या. मात्र या लेखात आपण इंग्रजकालीन बुलढाणा जिल्ह्याच्या शैक्षणिक स्थितीचे मुल्यांकन किंवा स्थिती वगैरे पाहणार नसून आजपासून सुमारे तीस वर्षांपुर्वीची बुलढाणा जिल्ह्यातील शैक्षणिक स्थिती व आजच्या स्थितीबाबत चर्चा करणार आहोत. तरीही स्वातंत्र्यपुर्व काळात खामगांव शहरात राष्ट्रीय शाळेची स्थापना झाली होती. या शाळेस अनेक स्वतंत्रता सेनानी व इतर मान्यवरांनी भेटी दिल्या आहेत. व येथील अनेक माजी विद्यार्थी समाजात उत्कृष्ट कार्य करित आहेत. खामगांव या एकेकाळच्या कापसाच्या मोठ्या बाजारपेठेच्या ठिकाणी गोविंदराम सक्सेरिया यांच्या मोठ्या आर्थिक मदतीने गो.से. महाविद्यालय स्थापन करण्यात आले त्याच सुमारास बुलढाणा येथे जिजामाता महाविद्यालय व तद्नंतर चिखली, मलकापूर, जळगांव जामोद, मेहकर याठिकाणी सुद्धा महाविद्यालये सुरु झाली परंतू ही सर्व महाविद्यालये ही कला, विज्ञान व वाणिज्य शाखेची होती. जिल्ह्यात अभियांत्रिकी, विधी, वैद्यकीय महाविद्यालये मात्र नव्हती. खामगांव येथे 1960 च्या दशकात शासकीय तंत्रनिकेतन मात्र सुरु झाले. काही तालुक्यात औद्योगिक प्रशिक्षण केंद्रे होती व खामगांव येथे पंचशील होमिओपॅथी महाविद्यालय सुद्धा त्याच काळात सुरु झाले होते. या महाविद्यालयात सुद्धा महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून विद्यार्थी येत असत व येतात. काही परदेशी विद्यार्थी सुद्धा इथे शिक्षण घेण्यासाठी पुर्वी यायचे. 80 च्या दशकात शेगांव येथे संत गजानन महाराज संस्थानचे अभियांत्रिकी महाविद्यालय सुरु झाले. प्राथमिक शिक्षणासाठी जिल्हा परिषद व नगर परिषदांच्या अनेक मराठी शाळा होत्या. बुलढाणा जिल्ह्यातील ही अशी शैक्षणिक स्थिती 1990 च्या दशकापर्यंत होती. अशी स्थिती असली तरी जिल्ह्यातील तत्कालीन अनेक विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेण्यासाठी शहरांकडे धाव घेतली व उच्चविद्याविभूषित सुद्धा झाले. जिल्ह्यात शिकलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी मोठ मोठ्या पदांवर सरकारी व खाजगी क्षेत्रात नोक-या केल्या. कुलगुरू, पोलिस अधिकारी, न्यायाधीश यांसारखी अनेक पदे बुलढाणा जिल्ह्यात शिकलेल्या विद्यार्थ्यांनी विभूषित केली आहेत तर काही आजही कार्यरत आहेत. आजपासून सुमारे तीस/पस्तीस वर्षांपूर्वी मात्र जिल्ह्यात विकासाची गती वाढली. जिल्ह्यातील अनेक शहरात विविध उद्योगधंदे सुरु झाले, शेतीमध्ये आधुनिक तंत्र आले व शिक्षण क्षेत्र सुद्धा झपाट्याने आगेकूच करू लागले. जिल्ह्यात अनेक ठिकाणी नवीन महाविद्यालये सुरु झाली, अनेक खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरू झाल्या, इंग्रजी माध्यमांच्या शेकडो शाळा सुरु झाल्या. या इंग्रजी माध्यमांच्या प्राथमिक शाळांमुळे अनेक मराठी शाळा बंद पडल्या व काही बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. आज प्रत्येक पालकास आपला पाल्य हा इंग्रजी माध्यमाच्या शाळेतच शिकावा अशी भावना दिसून येत आहे. ही परिस्थिती तर सर्वदूर आहे. आज बुलढाणा जिल्ह्यात अनेक नवीन महाविद्यालये आहेत, अभियांत्रिकी, विधी, तंत्रनिकेतन अशी अनेक महाविद्यालये आहेत. आज शैक्षणिक संस्था अमाप झाल्या आहेत विद्यार्थ्यांना तिथपर्यन्त पोहोचण्यास दळणवळणाची साधने विपुल प्रमाणात आहेत. आज शिक्षण क्षेत्रात पुर्वीपेक्षा कैकपटीने अत्याधुनिक शैक्षणिक साधने सुद्धा उपलब्ध आहेत. पुर्वी जसे जिल्ह्यातील लहान गावातील विद्यार्थ्यास तालुक्याच्या ठिकाणी शिक्षणासाठी म्हणून यावे लागत होते आज तसे नाही. सुरु झालेल्या अनेक संस्था ह्या ग्रामीण भागाला लागूनच आहेत शिवाय यातील काही संस्था तर अगदी "KG To PG" आहेत, त्यांच्याकडे चांगले "इन्फ्रास्ट्रक्चर" आहे. आज "इन्फ्रास्ट्रक्चर"कडे संस्थाचालकांचे पुरेपूर लक्ष असते कारण आज पालक सोयी सुविधा पाहूनच आपल्या पाल्याचा प्रवेश त्या संस्थेत करण्याचे पाहत असतात. पुर्वी "इन्फ्रास्ट्रक्चर" काहीच नसायचे परंतू संस्थांचा जो मुख्य हेतू आहे तो मात्र उच्चकोटीचा होता. पुर्वीच्या नगर कौलारू , पावसाळ्यात ठिकठीकाणी गळणा-या शाळा , बसायला पट्ट्या हे सर्व जाऊन आता शैक्षणिक संस्था कशा झकपक झाल्या आहेत शाळा/ महाविद्यालये यांचे बाह्यांग अत्यंत देखणे असे आहे परंतू अंतरंग , शिक्षणाचा दर्जा मात्र पुर्वीसारखा राहिला नसल्याचे अनेक जेष्ठ, सेवानिवृत्त व पालकांचे म्हणणे आहे. आज जिल्ह्यात अनेक संस्थात अनेक अत्याधुनिक शैक्षणिक कोर्सेस उपलब्ध आहेत परंतू पदे भरण्यास मात्र मान्यता नसते, जिल्ह्यातील या अनेक महाविद्यालयातून तासिका तत्वावर शिकवणारे व नुकतेच पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेऊन बाहेर पडलेले अननुभवी विद्यार्थीच शिक्षक म्हणून दिसतात. विद्यापीठ , शासन यासंबंधीत सर्वांनी अनुभवी व कायमस्वरूपी शिक्षक प्राध्यापक वृंद कसे नियुक्त कर्ता येतील याबाबत विचार करणे अत्यावश्यक झाले आहे. बहुतांश वेळी तासिका तत्वावर शिकवणारे शिक्षक हे त्यांच्या विद्यार्थ्यांचे सिनियर असतात व त्यामुळे विद्यादानाचे कार्य हे तितकेसे उत्कृष्टपणे होतांना दिसत नाही. आज जिल्ह्यात कित्येक शाळा, महाविद्यालये, तांत्रिक विद्यालये, कौशल्य विद्यालय अशा शैक्षणिक संस्था आहेत परंतू या शैक्षणिक संस्थांतील दर्जा हा अत्युत्कृष्ट असा असावा निव्वळ कारखान्यातून उत्पादन बाहेर येते त्याप्रकारे या शैक्षणिक संस्था या सुशिक्षित विद्यार्थ्यांचे उत्पादन बाहेर काढणा-या संस्था ण व्हाव्यात तर स्वामी विवेकानंद यांना अभिप्रेत अशा "मनुष्य निर्माण" करणा-या Man Making Education असणा-या असाव्यात. बुलढाणा जिल्हा मातोश्री जिजामाता यांचे माहेर. या माऊलीने शिवरायांना जसे शिक्षण दिले, नैतिक शिक्षण दिले तसा आदर्श जिल्ह्यातील शैक्षीन संस्थांनी घेऊन शिवरायांसारखे आदर्श तरुण निर्माण करण्याचा वसा घेतला पाहिजे. शैक्षणिक संस्थांची नुसती संख्या वाढवून, त्यांचे जाळे वाढवून आपला जिल्हा प्रगत झाला असे म्हणणे योग्य होणार नाही तर या संस्थांतून किती विद्यार्थी देशासाठी आगेकूच करत आहे ? सेवा भावनेने एखादे व्रत हाती घेत आहे ?, सामाजिक जाणीवा त्यांना आहेत काय ?, ते देशाचे आदर्श नागरीक आहेत काय ?, त्यांना जीवनाची दिशा या संस्था देतात काय ? हे सर्व पाहणे याचे चिंतन करणे सुद्धा तितकेच गरजेचे आहे. यातील काही संस्था निश्चितच अपवाद आहेत परंतू असे अपवाद अधिकाधिक वाढावेत तरच तो खरा विकास ठरेल , खरी प्रगती ठरेल.

विनय वि. वरणगांवकर 

खामगांव

7588416238