Click "Follow" Button below To Follow this Blog

३१/१०/२०२४

Pre election condition of khamgaon

 मतदार बुचकाळ्यात !

खामगांव मतदारसंघाची निवडणूक कधी नव्हे अशी रंगणार असे तूर्तास तरी दिसत आहे,    एकाच विचारधारेचे आकाश फुंडकर भाजपा कडून तर वि.हिं.प.चे माजी विदर्भ प्रांत सह मंत्री  अमोल अंधारे हे अपक्ष असे उभे ठाकले आहे तसेच दिलीपकुमार सानंदा हे सुद्धा एका दशकानंतर "शड्डू ठोकून" मैदानात उतरले आहे. 

20 नोव्हेंबरला होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आता संपली आहे. खामगांव विधानसभा मतदारसंघात एकूण 26 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते, त्यातील चार अर्ज हे अपात्र ठरले त्यामुळे आता एकूण 22 उमेदवार हे खामगांव विधानसभा मतदारसंघाच्या रिंगणात उभे ठाकले आहे. राज्यातील यंदाची निवडणूक ही जरांगे आंदोलन, 70 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप झाल्यानंतर अजित दादांचे युतीत दाखल होणे,  मविआचे आरोप आणि त्यांची आपापसात असलेली चढाओढ, लाडकी बहिण, कर्मचारी जुनी पेन्शन यांसारख्या मुद्द्यांमुळे जशी चांगलीच रंगणार आहे तशीच खामगांव मतदारसंघाची निवडणूक सुद्धा कधी नव्हे अशी रंगणार असे तूर्तास तरी दिसत आहे, खरे चित्र हे चार नोव्हेंबर नंतर स्पष्ट होईल कारण उमेदवारी अर्ज मागे घेण्याची ही अखेरची तारीख आहे. खामगांवात दाखल झालेले अर्ज पाहता सद्यस्थितीत तरी खामगाव मतदार संघातील मतदार हे बुचकाळ्यात पडल्यासारखे दिसत आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे हिंदुत्ववादी पक्ष भाजपकडून आकाश फुंडकर यांना उमेदवारी मिळाली तर विश्व हिंदू परिषदेचे विदर्भ प्रांत सह मंत्री राहीलेले आणि ब-याच काळापासून आमदार पदासाठी ईच्छूक असल्याचे म्हटले जाणारे अमोल अंधारे यांनी सुद्धा अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. 

     बजरंग दलातून पुढे आलेले अमोल अंधारे हे उच्चविद्यावभूषित असून तरुणांमध्ये लोकप्रिय असा चेहरा आहे. मतदार संघातील विविध गावात बजरंग दलाच्या शाखा उघडल्यामुळे मोठा तरुण वर्ग त्यांच्या पाठीशी आहे. या तरुण वर्गात सर्वच जाती, धर्मातील तरुण आहेत हे सुद्धा उल्लेखनीय आहे. 

     दुसरीकडे विविध कारणांमुळे नेहमीच चर्चेत राहिलेले माजी आमदार दिलीपकुमार सानंदा हे सुद्धा दहा वर्षानंतर निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. नगरसेवकापासून तर आमदारापर्यंत पोहोचलेल्या सानंदा यांचा एक वेगळा चाहता वर्ग आहे तसेच त्यांची एक विशिष्ट मतपेढी आहे. उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी निघालेल्या त्यांच्या मिरवणूकीत कुण्या एका कार्यकर्त्यांनी शड्डू ठोकून एक प्रकारे भाजपाला आव्हानच दिले आहे. दहा वर्षानंतर निवडणुकीच्या रिंगणात येत असल्यामुळे सानंदा हे पूर्ण प्रयत्न करतील अशी चर्चा आहे.

     त्याचवेळी दहा वर्षापासून आमदार असलेले ॲड.आकाश फुंडकर यांनी सुद्धा खामगाव मतदार संघात अनेक विकास कामे केलेली आहेत. सुशिक्षित, उच्चविद्याविभूषित, भाऊसाहेबांचा राजकीय वारसा, सुशिक्षित तरुण वर्गाचा पाठींबा, सुशिक्षित महिला वर्गात लोकप्रियता या जमेच्या बाजू असलेला हा चेहरा असून त्यांचा सुद्धा एक मोठा चाहता वर्ग मतदारसंघात तयार झाला आहे. सुरुवातीच्या कार्यकाळानंतर आकाश फुंडकर हे बरेच कार्यशील झालेले सर्वांनी बघितले आहे विधानसभेत सुद्धा त्यांनी अनेक वेळा विविध प्रश्न उपस्थित केले आहे.

वरील प्रमाणे या प्रमुख तीन उमेदवारांची स्थिती  आहे. या तिघांव्यतिरिक्त बसपा, मनसे, एमआयएम, वंचित, रिपब्लिक सेना, मुस्लिम लीग अशा आठ पक्षांचे व अमोल अंधारे यांच्यासह 11 उमेदवार हे अपक्ष उभे आहेत. अशा प्रकारच्या उमेदवारीमुळे मतांचे विभाजन नक्कीच होणार आहे असे सद्यस्थितीत वाटत आहे.

अमोल अंधारे, दिलीप सानंदा आणि आकाश फुंड कर या तीन उमेदवारांमध्ये मोठी चुरस निर्माण होणार आहे. इतर 19 उमेदवार खामगांव मतदार संघात विशेष परिचित असे उमेदवार नाही. परंतु तरीही जातीपातीच्या धर्माच्या नावावर हे उमेदवार काही मते खातीलच अमोल अंधारे व आकाश फुंडकर हे दोघेही एकाच विचारधारेचे, त्यामुळे फुंडकरांच्या सगळ्याच नाही परंतू अनेक मतदारांसमोर पेच निर्माण झाला आहे. हिंदुत्ववादी उमेदवारास मत देतांना कोणास मतदान करावे हा संभ्रम तूर्तास तरी निर्माण झाला आहे. लोकशाहीत पात्र व्यक्तीस निवडणूकीत उभे राहण्याचा अधिकार आपल्या संविधानाने दिलेला आहे पण अमोल अंधारे व आकाश फुंडकर हे दोघेही एकाच विचारधारेचे आहे आणि तरीही अमोल अंधारे यांनी उमेदवारी अर्ज कसा काय दाखल केला असा प्रश्न नागरिक एकमेकांना विचारत असल्याचे आणि तशा चर्चा सर्वत्र होत असल्याचे दिसून येत आहे. खामगाव मतदारसंघाच्या निवडणुकीचे खरे चित्र उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या तारखेनंतर म्हणजेच चार नोव्हेंबर नंतर मतदारांना दिसणार आहे तोपर्यंत खामगाव मतदारसंघातील मतदार हे बुचकाळ्यातच पडलेले राहणार आहे.

👉 Picture used in article is edited by my daughter Shalaka 

१७/१०/२०२४

Article on the occasion of World Food Day

मुखी घास घेता करावा विचार...


भारतातील लोकांना जरी अन्नाचे महत्व असले, अन्नात ते भगवंत बघत असले तरी  संतुलित आहाराबाबत मात्र ते निष्काळजी आहेत. कुपोषणाबाबत त्यांना म्हणावी तितकी चिंता नाही. अन्नाची नासाडी पण भारतीय खुप करतात. नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात कॉफी, समोसे, चिप्स आदी पदार्थांचे भारतात मोठ्या प्रमाणात सेवन केले जाते व त्यामुळे भारतात मधुमेहींची संख्या झापाट्याने वाढत आहे असा निष्कर्ष निघाला आहे.
 
काल दिनांक 16 ऑक्टोबर हा दिवस जागतिक अन्न दिन जगभर साजरा झाला. आपल्या भारतीय संस्कृतीत आपण अनादी अनंत काळापासून अन्नाला महत्व देत आलेलो आहोत. अन्नास आपण देव समजत आलेलो आहोत म्हणून आपण अन्नाचा अपमान सुद्धा करीत नाही. भारतातील थोर ऋषी मुनींनी आपल्याला अन्नास, अन्न उत्पादन करणा-या कृषीवलास, त्याला मदत करणा-या वृषभास सन्मान देण्याची शिकवण दिली आहे. तसे अनेक दाखले सुद्धा आहे. 

ॐ ब्रह्मार्पणं ब्रह्म हविर्ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतं ब्रह्मैव तेन गन्तव्यं ब्रह्म कर्म समाधिना' 

हा भोजन मंत्र, रामदास स्वामींनी म्हटलेले 

अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदरभरण नोहे जाणिजे यज्ञ कर्म 

अशा कितीतरी ऋचा, मंत्र, श्लोक यातून आपणास अन्नाची महती कळते. परंतू काळ झपाट्याने पुढे सरकला. पंक्ती बसण्याऐवजी उभ्याने जेवण करण्याची इंग्रजी पद्धत अगदी ग्रामीण भागात सुद्धा रूढ झाली. वेगवान जीवनशैलीमुळे घरोघरी जेवणाला बसण्यापूर्वी म्हटले जाणारे उपरोक्त  भोजन मंत्र, श्लोक हे आता कालबाह्य होत चालले आहेत. भोजनापूर्वी अन्नास नमस्कार करून व चित्रावती घालून जेवणास आरंभ केला जात असे. या चित्रावतीत शेतकरी, अन्न बनवणारी गृहिणी व उपाशी लोक, कृमी कीटक यांची आठवण करून काही शिते ताटाच्या बाजूला ठेवली जात. परंतू आता मात्र भारतात अन्नाला पुर्वी जसा सन्मान होता तसा सन्मान राहिलेला नाही असेच दुर्दैवाने म्हणावे लागते. आज मुलांना पानात अन्न टाकले तर काहीही म्हटले जात नाही, वडीलधारी मंडळी त्यांना हटकत नाही. पुर्वी चांगले तूप अगदी निपटून खायला लावत, तूप मोरीत गेले नाही पाहिजे असे सांगत. अशी काही कारणे सांगून मुलांना पानातील सर्व अन्न संपवण्याचे शिकवले जायचे. आमचे आजोबा जेवतांना आमच्यासोबत कुणाच्याही ताटात एकही शीत उरले नाही पाहिजे अशी शर्यत लावत व म्हणून मग आम्हाला पानात न टाकण्याची सवय जडली, जी आजही कायम आहे. आता मात्र हे सर्व लुप्त होत चालले आहे.  पुर्वी पैसा कमी असायचा त्यामुळे वस्तू , अन्न, पाणी सुनियोजित पद्धतीने वापरले जायचे. आज लोकांच्या हाती पैसा आहे , अपत्य एकच आहे त्यामुळे मग चैन आणि उधळपट्टी होत आहे. बाहेर खाण्याचे प्रमाण वाढले आहे. लग्न व इतर कार्यात बुफे जेवण पद्धती असते. या इंग्रजी पद्धतीत हल्ली यजमान नाना प्रकारची व्यंजने ठेवतात. आमंत्रित लोक सर्वच पदार्थ पानात वाढून घेतात आणि मग एवढे सारे अन्न पदार्थ खाणे मोठे मुश्कील होते आणि अन्न पानात टाकून दिले जाते. बुफे जेवण पद्धतीचा सर्वात मोठा दोष म्हणजे या पद्धतीत अन्नाची मोठी नासाडी होते.  ब-याच लग्न कार्यालयात 

उतनाही लो थालीमे की व्यर्थ न जाये नाली मे |

अशाप्रकारची घोषवाक्ये अन्न वाया घालवू नये म्हणून  लावलेली असतात. पण या घोषवाक्यांकडे साफ कानाडोळा केला जातो, ती केवळ नावापुरतीच असतात. ज्या भारतात अन्नाला भगवंत समजले जाते, ज्या देशात अन्नास, अन्न पिकविणा-यास, अन्न बनवणा-यास मोठा सन्मान दिला जातो त्याच देशात आज अन्नाची मोठ्या प्रमाणात नासाडी होताना पाहून खंत वाटते. आजही या देशात अनेक लोक एकच वेळ जेवतात , त्यांना दोन वेळचे भोजन मिळत नाही. अनेकांना संतुलित आहार मिळत नाही व त्या अभावी ते कुपोषित राहतात, दुर्गम भागात कुपोषणामुळे बालकांचे मृत्यू होतात. हा चिंतेचा विषय आहे.  1981 पासून FAO अर्थात फुड अँड अँग्रिकल्चर ऑर्गनायझेशन ही संस्था जागतिक अन्न दिन साजरा करीत आहे. अन्न, आहार, कुपोषण आदींबाबत जागृती म्हणून हा दिवस साजरा करतात. भारतातील लोकांना जरी अन्नाचे महत्व असले, अन्नात ते भगवंत बघत असले तरी संतुलित आहाराबाबत ते निष्काळजी आहेत. कुपोषणाबाबत त्यांना म्हणावी तितकी चिंता नाही. नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात कॉफी, समोसे, चिप्स आदी पदार्थांचे भारतात मोठ्या प्रमाणात सेवन केले जाते व त्यामुळे भारतात मधुमेहींची संख्या झापाट्याने वाढत आहे असा निष्कर्ष निघाला आहे. अन्न दिनाच्या पार्श्वभूमीवर आपण भारतवासियांनी यावर विचार करणे क्रमप्राप्त आहे. शेगांव या गजानन महाराजांच्या भूमीत महाप्रसाद बारीत भली मोठी  अन्नपूर्णेची मुर्ती आहे , 


 गजानन महाराज उष्ट्या पत्रावळीवरील शिते वेचून खात आहे अशी प्रतिमा आहे. तरीही अनेक भक्त हल्ली पानात प्रसाद टाकून देतांना दिसून येतात. ज्या गजानन महाराजांनी अन्न वाया घालवू नये त्याचा सन्मान करावा असे आपणास शिकवले आहे त्याच गजानन महाराजांच्या शेगांवात लोक अन्न वाया घालवतांना पाहून दु:ख होते. इतरही अनेक तीर्थस्थळी, भांडारे, महाप्रसाद, लग्नकार्ये यात मोठ्या प्रमाणात अन्न वाया जाते. जागतिक अन्न दिन हा शाळा, महाविद्यालये यातून सुद्धा साजरा करण्यात यावा जेणे करून विद्यार्थ्यांना अन्नाचे महती पटेल. शाळांतून जे मध्यान्ह भोजन वितरीत केले जाते यात सुद्धा अनेक विद्यार्थी खिचडी पानात टाकून देत असतील. अन्न दिन जर शाळेत साजरा झाला तर मध्यान्ह भोजनाची सुद्धा नासाडी होणार नाही असे वाटते. जागतिक अन्न दिनाच्या पार्श्वभूमीवर अन्नग्रहण हे देशसेवेसाठी सुद्धा व्हावे असे सांगणा-या खालील ओळी सुद्धा स्मरतात 

मुखी घास घेता करावा विचार , 

कशासाठी हे अन्न मी सेवणार

घडो माझिया हातून देशसेवा

म्हणूनी मला शक्ती द्यावी देवा.   

जागतिक अन्न दिनापासून आपण सर्व अन्नाचा सन्मान करण्याचा, अन्न वाया न घालविण्याचा आणि नवीन पिढीला सुद्धा अन्नाची महती पटवून देण्याचा संकल्प करूया. 

१०/१०/२०२४

Tribute to Ratan Tata Sir

भावपुर्ण "टाटा"


टाटा या नावाची भारतात एवढी जादू फिरली की निरोप घेतेवेळी सुद्धा लोक एकमेकांना "टाटा" असे म्हणतात आणि म्हणूनच आज रतन टाटा यांच्या बाबतीत भावपुर्ण श्रद्धांजली असे लिहिण्याऐवजी भावपुर्ण "टाटा" असे लिहावेसे वाटले.

भारतात जन्म झालेल्या प्रत्येक बालकास बोलणे यायला लागल्यानंतर त्याला सर्वात प्रथम कोणत्या कंपनीचे नाव ठाऊक होत असेल तर ते म्हणजे टाटा हे नाव होय. टाटा हे पारसी समुदायातील अडनाव आणि हा शब्द भारतामध्ये एकमेकांचा निरोप घेतेवेळी म्हणण्याची  पद्धत रूढ आहे. निरोप घेतेवेळी हे असे टाटा ( बाय ) म्हणणे कसे काय रूढ झाले कोण जाणे. परंतु एकमेकांचा निरोप घेतेवेळी आजही अनेक लोक टाटा म्हणत असतात अशी या टाटा शब्दाची करामत आहे. जमशेदजी टाटा यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात मुहूर्तमेढ रोवलेल्या टाटा उद्योग समूहाने भारतात उद्योग क्षेत्रात मोठी गरुडझेप घेतली. याच उद्योग समूहाचे 2016-2017 मध्ये अंतरीम अध्यक्ष राहिलेले रतन टाटा यांचे काल निधन झाले आणि देश हळहळला. टाटा हे नांव उद्योग क्षेत्रात एक विश्वसनीय असे नांव, असा ब्रँड म्हणून नावलौकिक प्राप्त झालेले नांव आहे. या देशाच्या उभारणीत टाटाचा मोठा वाटा आहे. मीठापासून तर लोह उद्योग, वाहने असे जवळपास सर्वच उद्योग क्षेत्रात विविध उत्पादने असणा-या या उद्योग समूहात 1962 मध्ये रतन टाटा यांनी कार्यभार स्विकारला. शॉप फ्लोवर पासून उद्योगक्षेत्रातील विविध बारकावे शिकत ते पुढे वाटचाल करू लागले. लाजाळू, अंतर्मुख स्वभावाचे, दूरदृष्टीचे रतन टाटा हे टाटा समूहास अधिक अग्रेसर कसे करता येईल हे व्हिजन ठेऊन पुढे वाटचाल करू लागले. 1990 मध्ये ते टाटा गृप व टाटा सन्सचे अध्यक्ष झाले. 2012 पर्यंत त्यांच्याकडे ही धुरा होती. रतन टाटा यांची मेहनत, साधी राहणी कपंनीला पुढे घेऊन जाण्याची जिद्द, कर्मचारी, कामगार यांना आपल्या परिवारातील सदस्य समजणे, त्यांच्या हिताचे निर्णय घेणे, समाज हिताकडे सुद्धा लक्ष देणे व त्यासाठी अनेक प्रकारच्या देणग्या, आर्थिक मदत ग्रामीण भागातील संस्था, शैक्षणिक संस्था व इतरही अनेक प्रकारच्या संस्थांना करणे ही रतन टाटांची वैशिष्ट्ये होत. कोरोना काळात देशाला केलेली 500 कोटी रुपयांची मदत कुणी कशी काय विसरेल. 1990 च्या दशकात टाटांच्या इंडिका या कारने खुप लोकप्रियता मिळवली होती. त्यानंतर इंडिगो, सफारी आणि इतर अनेक विदेशी मॉडेल्सच्या तोडीस तोड अशी मॉडेल्स टाटा कंपनीने लाँच केली व त्यांनी मोठी लोकप्रियता सुद्धा मिळवली. गरिबांना सुद्धा कार घेता यावी हे स्वप्न रतन टाटांनी पाहिले होते व म्हणून त्यांनी नॅनो ही कार आणली होती. सुरुवातीच्या काळात ही गाडी मोठ्या प्रमाणात विकल्या गेली होती. रतन टाटांच्या कारकीर्दीत जग्वार हा जगप्रसिद्ध विदेशी ब्रँड टाटांनी अँक्वायर केला ही केवळ टाटा कंपनीसाठीच नव्हे तर कधी काळी उद्योग क्षेत्रात जागतिक पातळीवर अत्यंत पिछाडीस असलेल्या भारतासाठी सुद्धा अभिमानास्पद बाब होती. जग्वारच नव्हे तर इतरही काही विदेशी ब्रँड टाटाने खरेदी केले आहेत. रतन टाटा यांना अनेकदा अपयश आले, त्यांचे काही निर्णय चुकले पण त्यांनी हार मानली नाही व पुढे वाटचाल करीत राहिले. नवल टाटा यांचा हा पुत्र रतनजी टाटा यांचा नातू व जमशेदजी टाटा यांचा पणतू नम्र,   साधा व दानशूर होता आणि म्हणून तमाम भारतवासियांच्या ह्रुदयात त्यांनी स्थान मिळवले होते. 

आता सुमारे दोन तीन वर्षांपूर्वी त्यांचा मांडी घालून खाली बसलेला फोटो, त्यांचा वाढदिवस झाला त्यावेळी एक छोटासा केक कापतांनाचा फोटो, असे फोटो माध्यमांवर झळकले होते तेंव्हा सर्वानाच त्यांचा तो साधेपणा भावला होता. धन ही अशी गोष्ट आहे की ते वाजवीपेक्षा जास्त असेल की त्याची हवा डोक्यात शिरते, मनुष्य त्याचा गर्व करू लागतो, त्याची वागणूक बदलते परंतू भारतातील सर्वात जुन्या, नामांकित, विश्वप्रतिष्ठित अशा टाटा समूहाचे अध्यक्ष असूनही रतन टाटांच्या डोक्यात संपत्तीची हवा शिरली नाही. टाटा मोटर्स मधील माझ्या एका मित्राने आज रतन टाटा यांच्याविषयी बोलतांना त्याने प्रत्यक्ष अनुभव घेतलेला किस्सा व काही आठवणी सांगितल्या तो म्हणाला, "रतन टाटा साहेब हे जेंव्हा त्यांच्या उद्योग कंपन्यांना भेटी देत तेंव्हा कामगारांच्या कॅन्टीन मध्ये रांगेत उभे राहून जेवण घेऊन कामगारांसह भोजन घेत, मशीन मधील ज्ञान सुद्धा त्यांना अफाट होते, कामगार अधिकारी यांना ते आपले मित्र समजत असत." म्हणूनच ते लोकप्रिय होते. अफाट पुस्तक संग्रह आणि अनेक कुत्री असलेल्या फ्लॅट मध्ये ते बॅचलर जीवन जगत होते. टाटा म्हणजे पारशी, इराण मधून निष्कासित झालेला झोराष्ट्रियन अर्थात पारशी लोकांना भारताने आश्रय दिला. ते इथेच रुळले त्यांनी या देशाला आपले मानले इथे शिक्षण, उद्योग, वैद्यकीय सेवा यांची अनेक केंद्रे उभारली व या देशाच्या उभारणीत कुणी कधीही विसरू शकणार नाही अशी कामगिरी केली. रतन टाटा त्यापैकीच एक.

  सुरुवातीस म्हटल्याप्रमाणे टाटा या नावाची भारतात एवढी जादू फिरली की निरोप घेतेवेळी सुद्धा लोक एकमेकांना "टाटा" असे म्हणतात आणि म्हणूनच आज रतन टाटा यांच्या बाबतीत भावपुर्ण श्रद्धांजली असे लिहिण्याऐवजी भावपुर्ण "टाटा" असे लिहावेसे वाटले.

०३/१०/२०२४

Article about feliciting of Mithun Chakraborty by Dadasaheb Phalke award.

एका नक्षलवादयाने मारलेली मजल.

 एक नक्षलवादी पुढे अभिनेता आणि अनेक पुरस्कार ही त्याची स्टोरी. मनुष्याने जर ठरवले तर तो नक्कीच चांगल्या मार्गावर येऊन गगन भरारी सुद्धा घेऊ शकतो हे त्याने दाखवून दिले आहे. त्याची ही स्टोरी नक्षलवादी व इतरांनाही नक्कीच प्रेरणादायी राहील.

सत्तरच्या दशकाच्या अखेरीस त्याने भारतीय चित्रपटसृष्टीच्या मायानगरीत प्रवेश केला. दिसायला सर्वसाधारणच, काळा-सावळा आणि विशेष आकर्षित करणारे व्यक्तिमत्व नसलेला असा हा तरुण. पदार्पणातच तो आला, त्याने पाहिले आणि त्याने जिंकले या उक्तीनुसार तो लोकांना काही आकर्षित करू शकला नाही परंतु पहिल्याच सिनेमात त्याला राष्ट्रीय पुरस्कार मात्र प्राप्त झाला आणि त्याचे अभिनयाच्या क्षेत्रात बस्तान बसण्यास सुरुवात झाली. पुढे त्याने अनेक व्यवसायिक चित्रपट केले त्यातले बहुतांश चित्रपट हे सुमार दर्जाचे होते परंतु एक अभिनेता म्हणून तो चांगलेच पाय रोवून ऊभा राहिला आणि स्थिरावला. त्याच्या समकालीन अशा अनेक अभिनेते व अभिनेत्रींसोबत त्याने भूमिका वठवल्या. काही भूमिकातून त्याने अभिनयाचा चांगला ठसा उमटवला. दर्शकांचे लक्ष वेधून घेणारा त्याचा पहिला सिनेमा म्हणजे डिस्को डान्सर त्या काळात सिनेमांमध्ये पाश्चात्य नृत्याचा वापर फारच कमी होत असे. मेहमूद हा हास्य अभिनेता रॉक अँड रोल हे नृत्य करीत असे. पण पाश्चात्य शैलीचा अधिकाधिक वापर सुरू झाला तो डिस्को डान्सर या चित्रपटानंतर. सत्तरच्या दशकातील तरुण पिढी या शैलीकडे आकर्षित झाली आणि मिथुन चक्रवर्ती स्टार झाला. पुढे त्याने अनेक बी ग्रेड, सी ग्रेड चित्रपट केले त्यातले कित्येक चित्रपट साफ कोसळले त्याच्या काही चित्रपटांमध्ये अनेक अविश्वसनीय, अचाट अशी दृश्ये त्याच्यावर चित्रीत करत की, तसे प्रत्यक्ष जीवनात कुणीही कधीही करू शकणार नाही. ती दृश्ये इतकी अशक्यप्राय अशी असत की दर्शक अवाक होऊन जात असे. दवाखान्यात भरती असताना देखील बेडसह लिफ्ट मध्ये जाऊन तिथून निसटण्याचा प्रयत्न करणे, किल्ल्यावर/भिंतीवर बिना आधाराचे घोरपडीप्रमाणे चढणे या प्रकारची ती दृश्ये असत. हे मिथुनच करू जाणे. परंतु काही चित्रपटांमधून मिथुनने त्याच्या अभिनयाची चूणूक दाखवून दिलेली आहे. त्याला पद्मश्री, पद्मभूषण असे पुरस्कार सुद्धा मिळालेले आहेत. अतिशय कमी बजेटमध्ये त्याचे चित्रपट निर्माण होत असत म्हणून त्याला गरिबांचा अमिताभ सुद्धा म्हटले जात असे. उटी या ठिकाणी त्याची काही प्रतिष्ठाने आहेत. या ठिकाणी तो  निर्मात्यांना अतिशय कमी दरात शूटिंगसाठी जागा उपलब्ध करून देत असे. मिथुन चक्रवर्ती सामाजिक कार्यात सुद्धा अग्रेसर असल्याची वृत्ते अनेक वेळा झळकली आहे. हिंदू व मुस्लिमांना यात्रांसाठी जाण्यासाठी तो मदत करतो असे ऐकिवात आहे. त्या काळात अनेक तरुण हे मिथुनचे चाहते होते ते मिथुनची स्टाईल मारत असत. टी-शर्ट त्यावर उघडा शर्ट, गळ्यात लंबी पट्टी , घट्ट अशी पॅन्ट आणि मोठे वाढलेले केस  अशी शैली त्या काळात अनेक तरुणांनी स्वीकारली होती. चित्रपटात बंबैय्या भाषा  मिथुनच्याच तोंडी जास्त वापरली आहे. खूपच भडक कपडे घातलेल्या तरुणाला कॉलेजमध्ये मिथुन चक्रवर्ती म्हणून संबोधत. टेलिव्हिजन वाहिन्यांचा सुळसुळाट नसण्याच्या काळात सिनेमागृहांमध्ये व व्हिडिओ गृहात मिथुनदांचे चित्रपट एकापाठोपाठ एक झळकत असत. मुद्दत, डिस्को डान्सर, प्यार झुकता नही, वतन के रखवाले,  हम पांच,  प्रेम प्रतिज्ञा, घर एक मंदिर, प्यार का देवता, गुलामी, अग्निपथ यासारख्या अनेक चित्रपटांनी 80 च्या दशकात चांगलाच गल्ला कमावला होता. मो अजीज, किशोर कुमार यांनी आवाज दिलेली मिथुनची काही गाणी आजही हिट आहेत. सिनेसृष्टीला शंभर कोटी रुपयांचा व्यवसाय प्रथमच करून देणारा चित्रपट सुद्धा मिथुनदांचाच. तो चित्रपट म्हणजे डिस्को डान्सर. हा चित्रपट हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील शंभर कोटी रुपयांचा व्यवसाय करणारा सर्वात पहिला चित्रपट असल्याचे म्हटले जाते. योगिता बाली सोबत त्याचा विवाह झाला पुढे श्रीदेवी सोबत नांव जुळले गेले होते. त्याच्या मुलाचा मिमोहचा एकच सिनेमा झळकला व आपटला. काश्मीर फाईल हा मिथुनचा अलीकडचा सिनेमा त्यातील त्याची भूमिका वाखणली गेली. दादासाहेब फाळके पुरस्कार हा आजपर्यंत चित्रपट क्षेत्रातील अनेक चतुरस्त्र, दिग्गज अभिनेते, अभिनेत्री व इतर नामांकित व्यक्ती जसे प्राण, देव आनंद, मन्ना डे, आशा पारेख, विनोद खन्ना,  आशा भोसले, कवी प्रदीप यश चोप्रा इ एकाहून एक महानुभाव अशा व्यक्तींना प्राप्त झाला आहे. मिथुनला हा पुरस्कार मिळाला त्यावेळी अनेकांनी आश्चर्याने तोंडात बोटे घातली. अद्यापही सिनेसृष्टीत अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ अभिनेते व इतर कलाकार असतांना मिथुन चक्रवर्तीची या पुरस्कारासाठी कशी काय निवड झाली ? असा प्रश्न अनेकांना पडला. गतकाळात मिथुन चक्रवर्ती यांची सत्ताधाऱ्यांशी वाढलेल्या जवळीकीमुळे त्याची या पुरस्कारासाठी वर्णी लागली असेही अनेकांना वाटत आहे. ते काहीही असो पिटातील प्रेक्षकांना मात्र मिथूनने अनेकवेळा दैनंदिन धकाधकी, ताणतणाव यापासून दूर नेऊन मनोरंजित केले आहे. त्यामुळे तळागाळातील त्याचे चाहते हे उच्चशिक्षित व कधीकाळी नक्षलवादी असलेल्या त्यांच्या मिथुनदाला दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाल्याने "अबे sss ए sss , सुना क्या ? अपने मिथुनदा को फाळके पुरस्कार मिल गया बे , आयी बात समज मे ? कोई शक ? असेच सांगत असतील. 

     एक नक्षलवादी पुढे अभिनेता आणि हा फाळके पुरस्कार ही मिथुनदांची स्टोरी. मनुष्याने जर ठरवले तर तो नक्कीच चांगल्या मार्गावर येऊन गगन भरारी सुद्धा घेऊ शकतो हे मिथुनदांनी दाखवून दिले आहे. टीकेकडे दुर्लक्ष करून तो मार्गक्रमण करीत राहिला. त्याची ही स्टोरी नक्षलवादी व इतरांनाही नक्कीच प्रेरणादायी राहील.

टीप - नक्षलवादी असल्याचा संदर्भ 01/10/24 रोजीच्या दैनिक तरुण भारत मधून घेतला आहे.

०३/०९/२०२४

Article about Khamgaon Silver business history

खामगांव एक चंदेरी शहर


खामगावात चांदीचा व्यवसाय चांगलाच वृद्धिंगत झाला, येथे चांदीच्या अनेक वस्तू, दागिने बनविण्याचे छोटे-मोठे असे कित्येक कारखाने आहेत. या कारखान्यांमुळे शेकडो लोकांना रोजगार मिळाला आहे. खामगावात बनलेल्या भरवशाच्या चांदीच्या वस्तू, दागिने खरेदीसाठी देश-विदेशातून लोक, देवस्थाने, कंपन्या, सेलिब्रिटी खामगावला येतात.

 खामगाव महाराष्ट्राच्या विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील एक छोटेसे परंतु टुमदार शहर कापसाच्या अमाप उत्पादनामुळे व बाजारपेठेमुळे संपूर्ण भारतात नावलौकिक प्राप्त झालेले गाव "कॉटन सिटी" म्हणून ओळखले जात असे. "खामगांव नामे तालुक्यात | व्यापार चाले जेथ मोठा ||" असा उल्लेख दासगणू महाराजांनी गजानन महाराजांच्या पोथीत सुद्धा केला आहे. यावरून खामगांव शहर हे फार पुर्वी पासून व्यापारा बाबत  प्रसिद्ध असल्याचा दाखला मिळतो. प्राथमिक शाळेच्या भूगोलच्या पुस्तकात सुद्धा खामगाव आणि कापसाची बाजारपेठ असा उल्लेख पूर्वी असायचा. कापसाच्या या मोठ्या व्यापारउदीमामुळे परतंत्र भारतात मुख्य रेल्वे लाईन पासून खामगाव पर्यंत अशी रेल्वे लाईन त्या काळात निर्माण केली गेली. मात्र शासनाची नवीन धोरणे, कापूस एकाधिकार योजना यामुळे कापसाचा हा व्यवसाय घटत गेला. शेतकरी सुद्धा कापूस अर्थात पराटीचे पिक कमी घेऊ लागले. एक-एक करून खामगावच्या जिनिंग प्रेसिंग फॅक्टरी बंद झाल्या. आज एका हाताच्या बोटावर मोजता येतील एवढ्याच जिनिंग फॅक्टरी खामगावात आहे.

    कापसाच्या मोठ्या व्यापाराच्या त्या काळात खामगावात आणखी एक पांढऱ्याच वस्तूचा व्यवसाय बाळसे धरत होता, तो व्यवसाय म्हणजे चांदीचा व्यवसाय. पुढे याच व्यवसायामुळे चांदीच्या खाणी जरी खामगाव पासून शेकडो मैल अंतरावर असल्या तरीही मुंबई येथून चांदी आणून उत्कृष्ट प्रतीच्या चांदीच्या वस्तू दागिने खामगांवात बनवल्या जाऊ लागल्या. आता खामगांव "सिल्व्हर सिटी" म्हणून ओळखले जाते. खामगावच्या जुन्या सराफा भागात सोनार मंडळींनी सोन्या चांदीची छोटी-छोटी दुकाने त्या काळात सुरू केली होती. आजही तो जुना सराफा अस्तित्वात आहे. प्रचंड रहदारी आणि बाजार असलेल्या या भागात म्हणूनच पोस्ट ऑफिसने सुद्धा एक शाखा सुरू केली होती. आता ती पुर्वीची सोन्या-चांदीची दुकाने ही खामगावच्या मेन रोडवर स्थलांतरित झाली आहे. या हमरस्त्यावर आता सोन्या-चांदीची अनेक मोठी दुकाने आधुनिक व आकर्षक स्वरूपात उभी आहेत. भारतीय चित्रपट सृष्टीच्या इतिहासात ज्याप्रमाणे शोले सिनेमा वगळताच येणार नाही अगदी तसेच खामगावची चांदी म्हटली की जांगीड हे नाव सुद्धा वगळताच येणार नाही.  जांगीड यांचे 50 करोड रुपयांची वार्षिक उलाढाल असलेले विश्वकर्मा सिल्वर हाऊस आज देशभर प्रसिद्ध आहे. चांदी आणि जांगिड ही नांवे जणू समरसच झाली आहेत त्यामुळे खामगांव येथे चांदी व्यवसायाची मुहूर्तमेढ कशी झाली ?, इथला नावलौकिक कसा वाढला ?  हे सांगतांना जांगीड परिवाराचा इतिहास येथे सांगणे क्रमप्राप्तच आहे. 

    जांगीड यांच्या चार पिढ्यांच्या पूर्वी म्हणजे 1889 मध्ये, 135 वर्षांपूर्वी श्री केशवरामजी जांगीड हे राजस्थानातील चुरी जिल्ह्यातील रामगड या गावावरून खामगावात आले. केशवरामजी जांगीड यांची कथा मोठी रंजक आहे. त्यांचे वडील शिवरामजी जांगीड हे रामगड येथे सुतारीचा व्यवसाय करत. त्यांना तीन मुले होती केशवरामजी, बालूरामजी, आणि गुलाबजी. केशवरामजी आणि बालूरामजी हे दोघे बंधू उत्कृष्ट असे कारागीर होते. त्या काळात त्यांनी रामगड येथील राजासाठी जेवणाच्या गोलाकार अशा मेज वरती फिरणारी चांदीची आगगाडी तयार केली होती. चांदीचे कारंजे सुद्धा त्यांनी तयार केले होते. त्या काळात इंग्रज लोक भारतीय शिल्पे उध्वस्त करीत, कारागीरांवर जुलूम करीत. कुणीतरी त्यांना असे सांगितले की,  इंग्रजांना तुमची ही कुशल कारागिरी जर का माहित पडली तर ते तुमचे हात तोडून टाकतील. म्हणून केशवरामजी आणि बालूरामजी हे दोघे बंधू दूर कुठेतरी राहण्याच्या बेताने रामगड सोडून निघाले. केशव रामजी यांच्या पत्नी जवळ काही तुटपुंजी रक्कम होती त्या अल्पशा जमापुंजीवर हे दोघे बंधू त्यांच्या राहत्या घरापासून शेकडो मैल अंतरावर असलेल्या खामगावला मजल-दरमजल करीत दाखल झाले, आणि इथलेच झाले. कालांतराने बालूरामजी मात्र परत निघून गेले. केशवरामजी मात्र खामगावला तन-मन-धनाने, झोकून देऊन चांदीच्या दागिन्यांच्या व्यवसाय करू लागले. त्यांची पत्नी घरोघरी जाऊन लोकांना त्यांच्या व्यवसायाची माहिती देत व काम मिळवत असे. "Every cloud has a silver border" या इंग्रजी म्हणीप्रमाणे अनेक संकटे झेलत आपल्या जन्मभूमीपासून दूर खामगाव सारख्या छोट्या गावात तुटपुंजी रक्कम सोबत घेऊन आलेल्या केशवरामजी जांगिड यांना सुद्धा खामगावात चांदीच्या दागिन्यांच्या व्यवसायामुळे यशाची चंदेरी किनार लवकरच प्राप्त झाली. परंतु दुर्दैवाने केशवरामजी यांना अपत्यप्राप्ती काही झाली नाही. त्यांनी आपला पुतण्या जवाहरमल यांना दत्तक घेतले. जवाहर यांनी सुद्धा वडिलांचा व्यवसाय चांगला प्रस्थापित केला. जवाहरमलजी नंतर त्यांचे पुत्र चिरंजीलालजी यांनी सुद्धा हा व्यवसाय  वृद्धिंगत केला आणि 1937 मध्ये जुन्या सराफ्यातून नवीन सराफ्यात हमरस्त्यावर "विश्वकर्मा सिल्वर हाऊस (SVSH)" स्थापन केले. चिरंजीलाल जांगिड यांनी त्या काळात व्यवसाय वाढीसाठी खामगावातील धनिक श्री सोनी यांच्यासोबत भागीदारी केली आणि 39 हजार रुपयांचे भाग भांडवल मिळाल्यावर व्यवसाय आणखी वाढवला त्यांची ही भागीदारी 2007-2008 पर्यंत कायम होती. नंतर त्यांनी मैत्रीपूर्ण पद्धतीने ही भागीदारी बंद केली. चिरंजीलाल यांच्यानंतर त्यांचे पुत्र जगदीशप्रसाद जांगिड यांनी या व्यवसायात आधुनिकता आणून आपला व्यवसाय अधिक पुढे  नेण्यास सुरुवात केली. जगदीशप्रसाद हे दूरदृष्टी असलेले असे गृहस्थ होते. त्यांनी भारतातील वेगवेगळ्या शहरातून आणि राज्यातून कारागीर आणले.  शुद्ध चांदी ग्राहकांना कशी मिळेल याकडे लक्ष दिले. विश्वकर्मा येथील चांदी ही 99.50% शुद्ध असते. विश्वकर्मा सिल्वर हाऊसने हॉलमार्कला सुद्धा नाकारले. याचे कारण असे की हॉलमार्क 92.50% शुद्ध चांदीला प्रमाणित करते पण विश्वकर्माची चांदी मात्र त्याही पेक्षा जास्त शुद्ध असते. जगदीशप्रसाद जांगिड यांनी अनेक नवनवीन प्रयोग या व्यवसायात केले प्लास्टिकच्या डब्यांवरती चांदीचे आवरण हे त्याचे उत्कृष्ट उदाहरण आहे. हे डबे लोकांना खूप आवडले आणि लोक ते भेट म्हणून एकमेकांना देऊ लागले. जगदीशप्रसाद यांनी नागपूरच्या महानुभाव मंदिरात सुद्धा चांदीचे दागिने दिले. त्यानंतर अनेक मंदिरांमध्ये विश्वकर्मा सिल्वर हाऊसने चांदीचे दागिने व इतर वस्तू करून दिलेल्या आहेत. महानुभाव मंदिर नागपूरने जेव्हा चांदीचे दागिने वितळवण्यासाठी विश्वकर्मा ज्वेलर्सला विकले तेव्हा त्यातील काही चांदीच्या वस्तू या चांदीच्या नसून सोन्यावर चांदीचा मुलामा असल्याच्या दिसल्या तेंव्हा जगदीशप्रसाद यांनी त्या सोन्याच्या वस्तूंची किंमत महानुभाव मंदिराला दिली. हे जगदीशप्रसाद यांचे व्यापारातील प्रामाणिकतेचे (Business Ethics) एक उत्कृष्ट उदाहरण आहे.  जगदीश प्रसाद जांगिड यांना अनेक पुरस्कार सुद्धा मिळाले आहेत शिवाय व्यापारा संबंधीच्या एका "केस स्टडी" च्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पुस्तकात त्यांच्यावर आयर्न मॅन नावाचा मोठा लेख जांगिड कुटुंबीयांच्या वंशावळी सहित प्रकाशित झालेला आहे. तसेच इतरही अनेक वृत्तपत्रातून खामगावच्या चांदीबाबत लेख प्रकाशित झालेले आहेत.

आज विश्वकर्मा सिल्वर हाऊस हे जगदीश प्रसाद यांचे पुत्र डॉ. कमल जांगिड व नातू राहुल जांगीड हे पुढे नेत आहे. डॉ कमल जांगीड हे एम.बी.बी.एस. असूनही त्यांनी आपला वडिलोपार्जित व्यवसाय पुढे नेण्यासाठी म्हणून वैद्यकीय क्षेत्र सोडून याच व्यवसायात कार्यरत झाले. कमल जांगीड यांचे बंधू अजय जांगिड हे "विश्वकर्मा सिल्वर एम्पोरियम" या नावाने मुंबईमध्ये व्यवसाय सांभाळतात. विश्वकर्माचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथील चांदीवरती विश्वकर्माचे एक चिन्ह निर्माण केले जाते व पुन्हा कितीही वर्षांनी ती वस्तू मोड म्हणून द्यायची असल्यास त्या वस्तूची घटाई लावली जात नाही असे वैशिष्ट्य क्वचितच इतरत्र आढळते. खामगावच्या विश्वकर्मा सिल्वर हाऊसने आज रोजी पर्यंत अनेक नामांकित व्यक्ती व संस्थांना चांदीच्या वस्तू, दागिने बनवून दिलेल्या आहे. यामध्ये इन्फोसिस, व्हिडिओकॉन सारख्या नामांकित कंपन्या,  नागपूरचे टेकडी गणेश मंदिर, महानुभाव मंदिर, अंबादेवी संस्थान अमरावती, वैष्णव देवी मंदिर कटरा जम्मू, सिद्धिविनायक मंदिर मुंबई, नांदेडचे गुरुद्वारा तसेच राजकारणी लोकांना, विदर्भ क्रिकेट असोसिएशनला आणि देशातील अनेक दागिन्यांच्या दुकानांना पुरवलेल्या आहेत. विशेष उल्लेखनीय गोष्ट म्हणजे महानायक अमिताभ बच्चन हे सुद्धा विश्वकर्मा सिल्वर हाऊसचे ग्राहक आहे. यंदाच्या जालना येथील गणेशोत्सवासाठी जी 40 किलो वजनाची चांदीची मुर्ती बसवणार आहेत ती सुद्धा विश्वकर्मा सिल्व्हर हाऊस येथेच बनवली गेली आहे. जांगिड यांच्यापासून प्रेरणा घेऊन खामगावला अनेक चांदीचे व्यवसायिक व्यवसाय करत आहेत. तसेच अनेक कारागीर विविध कारखान्यांमधून काम करत आहेत.  

   या ठिकाणी खामगांवकरांना विशेष अभिमानास्पद अशी गोष्ट नमूद नाही केली तर हा लेख अपुरा राहील. ती विशेष उल्लेखनीय गोष्ट म्हणजे भारताने दोन वर्षापूर्वी यशस्वीरित्या प्रक्षेपित केलेल्या चांद्रयानासाठी  चांदीचे रॉड आवश्यक होते तेंव्हा ते रॉड सुद्धा खामगांव येथील शेखर भोसले यांच्या श्रद्धा रिफायनरीने सप्लाय केले आहेत. त्यावेळी देशभरात खामगांव चे नांव झळकले. खामगांवच्या चांदीची ख्याती चंद्रापर्यंत गेली.

     आज खामगावात चांदीचा व्यवसाय चांगलाच वृद्धिंगत झाला आहे. येथे चांदीच्या अनेक वस्तू आणि दागिने बनविण्याचे छोटे-मोठे असे कित्येक कारखाने आहेत. या कारखान्यांमध्ये शेकडो लोकांना रोजगार मिळाला आहे आणि खामगावात बनलेल्या भरवशाच्या चांदीच्या वस्तू खरेदी करण्यासाठी म्हणून देश-विदेशातून लोक, देवस्थाने, कंपन्या, सेलिब्रिटी खामगावला येतात. केशवरामजी जांगीड यांनी मुहूर्तमेढ केलेल्या या चांदीच्या व्यवसायाच्या इवल्याश्या रोपट्याच्या वेलूला त्यांच्या पुढील पिढ्यांनी गगनावरी नेले आहे आणि ते  सुद्धा व्यवसायातील प्रामाणिकतेचे खत-पाणी घालून. खामगांवचे चांदी व्यवसायिक सचोटीने दर्जेदार, उत्कृष्ट वस्तू व दागिने सातत्याने निर्मिती करत असल्याने खामगांव शहर सिल्व्हरसिटी म्हणजेच चंदेरी शहर हे बिरूद मोठ्या अभिमानाने मिरवत आहे.  

विनय वि. वरणगांवकर©

खामगांव

9403256736