३१/१२/२०१५

Article on 'Importance of Time ('वक़्त') on the occasion of New Year 2016

पचास साल का 'वक़्त'
   बघता बघता 2015 हे वर्ष सुद्धा सरले.तोंडातून निघालेला शब्द,धनुष्यातून सुटलेला बाण,ओसरलेले तारुण्य आणि निघून गेलेली वेळ अर्थात 'वक़्त' या गोष्टी एकदा निघून गेल्या की पुन्हा वापस येत नाहीत.यंदाच्या दिवाळीत एक घरपोच पुस्तकांची लायब्ररी चालवणारे एक गृहस्थ घरी आले होते.त्यांनी सर्व माहिती दिली स्वतःची रामकथा सुद्धा सांगितली त्यांच्यावर आलेल्या परिस्थिती बाबत बोलताना ते हताशपणे उद्गारले "काय करता बुवा? बी आर चोप्राचा 'वक़्त' आहे. 1960 च्या दशकात शिक्षण घेणाऱ्या या माणसाला त्याच्यावरील परिस्थितीने त्याच्याच तरुणपणी म्हणजे 1965 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'वक़्त' या सिनेमाची बरोबर आठवण झाली.हा सिनेमा आहेच तसा कोणावर कशीही वेळ येवू शकते हे सांगणारा.वडिलांनी या चित्रपटाची अनेकदा तारीफ केली होती त्यामुळे मी सुद्धा हा चित्रपट पहिला.काहीतरी चांगला 'मेसेज' देऊन जाणारे चित्रपट पाहणे म्हणजे एखादे चांगले पुस्तकच वाचण्यासारखे असते.असे चित्रपट यश चोप्रा व तत्सम प्रतिभावान दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केलेले असत.या चित्रपटाचे निर्माते बी.आर.चोप्रा सुद्धा विचारवंत,पत्रकार होते.त्या घरपोच लायब्ररीवाल्या माणसाने या चित्रपटाच्या स्मृती पुनश्च करून दिल्या अन लक्षात आले की या चित्रपटाला प्रदर्शित होउन तर "पचास साल का 'वक़्त' हो गया".परंतु अजूनही हा चित्रपट त्याच्या कथानकामुळे, संवादामुळे,अभिनयामुळे अनेकांच्या स्मरणात आहे.हल्ली असे सामाजिक जाणीव किंवा प्रेक्षकांना काहीतरी चांगला संदेश देणारे चित्रपट कमी निघतात.रसिक प्रेक्षक असे चित्रपट पाहून जेंव्हा चित्रपटगृहाच्या बाहेर पडतात तेंव्हा त्यांना त्या चित्रपटाच्या कथानकातून खूप काहीतरी मिळालेले असते.'वक़्त' सुद्धा याच प्रकारातला सिनेमा.लाला केदारनाथ(बलराज सहानी) याला तीन मुलगे(राजकुमार,सुनील दत्त, शशी कपूर) असतात. लाला म्हणजे सहकुटुंब मोठ्या हवेलीत राहणारी शहरातील एक बडी असामी त्यामुळे अंगी थोडा अभिमान असतोच.सदाबहार गीत 'ऐ मेरी जोहाराजबी' झाल्यावर लाला आपल्या पत्नीला म्हणतो की, "लक्ष्मी मै तुम्हारे लिये एक शानदार बंगला बनाउंगा, एक गाडी खरीदुंगा उसमे तुम मै और हमारे शाह्जादे जाएंगे तो लोग कहेंगे वो देखो, वोssssss जा राहा ही लाला केदारनाथ" असे म्हणण्याचा अवकाश की भूकंप होतो.एका क्षणात सर्व होत्याचे नव्हते होते.लालाच्या सगळ्या इच्छा, अभिमान, संपत्ती सर्व एका क्षणात नाहीसे होते.कुटुंबाची ताटातूट होते, लाला केदारनाथ रस्त्यारच येतो. इकडे प्रेक्षकांना सुद्धा एकदम धक्का बसतो.पत्नी, तिन्ही मुले एकमेकांपासून दुरावतात.'लोंस्ट एन्ड फाउंड' फार्म्युल्याचा आणि मल्टिस्टार असा कदाचित हा पहिलाच सिनेमा असावा.मदनपुरीचा चाकू परत त्याच्या हातात देवून "ये कोई बच्चोके खेलनेकी चीज नही"तसेच रहमान या खलनायकाला "चिनाय सेठ जिनके अपने घर शिशेके हो वो दुसरोपर पत्थर नही फेंका करते"सारखे राजकुमारचे संवाद रसिकांना आवडले.सुनील दत्त,शशी कपूर व इतर सर्वानीच चांगला अभिनय केला आहे.शशी कपूरने तर गरीब,बेरोजगार, 'मजबूर' सुशिक्षित तरुणाची भूमिका अगदी हुबेहूब वठवली आहे."आगे भी जाने ना तू", नुकत्याच निवर्तलेल्या रूपसंपन्न साधनाचे "कौन आया की निगाहोमे" तसेच "दिन है बहारके" अशा संगीतकार रवीने संगीतबद्ध केलेल्या श्रवणीय "ऑल टाइम हिट"  गाण्यांसोबत अनेक वळणे घेत चित्रपटाचा शेवट सुखावह होतो. लाला केदारनाथ व त्याचे सर्व दुरावलेले कुटुंबीय सुनांसह परत एकमेकांना भेटतात.मोठा मुलगा लाला केदारनाथला म्हणतो,"आगे देखिये अब क्या होता है.. सारे शहरपे हमारा राज होगा"लाला त्याला अडवतो व म्हणतो "नही बेटे एकबार मैने भी ऐसाही कुछ कहा था वक़्त ने ऐसा तमाचा मारा मेरे मुंह पर सब तिनका-तिनका करके बिखर दिया, क्यू? , ये बतानेके लिये की वक़्तही सबकुछ है, वक़्त हि बनाता है और वक़्तही बिगाड्ता है".आज वर्ष अखेर आहे.आपल्या जीवनातील सुद्धा एक वर्षाचा "वक़्त" निघून गेला आहे. "न्यू इयर रीजोलुशन" करताना वेळेचे महत्व आपण सर्व जाणून घेऊया.२०१६ पासून कोणाचा 'वक़्त" कसा होता व आता कसा आहे हा विचार मनात ठेवूया.वृथा अभिमान, तोरा, गर्व, मग्रुरी सोडून देण्याचा संकल्प करूया.बरेच लोक टीवीचे चनल "सर्फ" करता-करता एखादा जुना सिनेमा दिसला की चटकन चनल बदलतात.'जुने जाउद्या मरणा लागुनी' असे जरी एका कवीने म्हटले असले तरी सर्वच जुने काही अगदी टाकाऊ नसते.'वक़्त' या सिनेमाला 50 वर्षे झाली.तो सिनेमा म्हणजे आता नवीन "स्मार्ट" पिढी साठी जुनाट झाला असेल परंतु या सिनेमाने दिलेला"वक़्तही सबकुछ है,वक़्त हि बनाता है और वक़्तही बिगाड्ता है"हा संदेश मात्र कालातीत आहे.नवीन वर्षाची सुरुवात करताना आपण सुद्धा वेळेचे महत्व जाणून घेऊया.वेळच सर्व काही आहे हे समजून घेऊन आपली वर्तणूक ठेवूया.

विनय विजय वरणगावकर

१६/१२/२०१५

Article about Bajirao First regarding the release of movie "Bajirao Mastani"

“इतिहास म्हणेल की बाजीराव जेवत होते ”

बुन्देलखंडाचा राजा छत्रसालाने  मो.बंगश याच्या आक्रमणाप्रसंगी मदत मागितली होती. ज्यावेळी निरोप बाजीराव महाराजांपर्यंत आला त्यावेळी ते जेवत होते. असे म्हटले जाते की त्यावेळी हातचा घास तसाच ठेवून बाजीराव उठले आणि उद्गारले "उशीर झाल्यामुळे जर छत्रसाल हरले तर इतिहास हेच म्हणेल की बाजीराव जेवत होते." आणि छत्रसालांच्या मदतीला धावून गेले.
‘बाजीराव मस्तानी ’ या संजय लीला भंसाली यांच्या चित्रपटामुळे थोरले बाजीराव हे नांव निदान आठवले तरी गेले नाहीनतर  बाजीराव व त्यांचा पराक्रम ज्ञात असलेले जन अत्यल्प आहेत. यातील गाणे "पिंगा" प्रदर्शित झाले आणि हा सिनेमा चर्चेत आला. बाजीरावाची चरित्रसंपन्न, गुणी, नखशिखांत अंग झाकून राहणारी पत्नी काशीबाई या  
मस्तानीबाई सोबत नृत्य करतांना दाखवले आहे. होय मस्तानीबाईच ! कारण त्या सुद्धा बाजीरावांच्या द्वितीय पत्नी होत्या  त्यामुळे त्यांच्याविषयी सुद्धा मान ठेवूनच बोलायला नको का ? त्या नृत्यकलेत निपुण होत्या एवढेच. परंतू सदैव त्यांचे वर्णन एखाद्या दरबारी नर्तकी सारखे केले गेले. काशीबाई आणि मस्तानीबाई यांच्या सहनृत्याचा विचार सुद्धा कुणी करू शकत नाही आणि बाजीरावांनी सुद्धा तसा केला नसेल. अगदी स्वप्नातही केला नसेल. असा विचार फक्त गल्लाभरू चित्रपटवालेच करू शकतात. एखादी गोष्ट चालली की त्या गोष्टीचे भूत या फिल्मवाल्यांच्या डोक्यातून जोवर मोठी आपटी खात नाही तोवर उतरत नाही. देवदास मध्ये "डोला रे डोला रे " सहनृत्य गाजले. त्याचे भूत अजूनही भंसालीच्या डोक्यातून काही गेले नाही. मग त्याच प्रकारात त्याने पिंगा गाणे चित्रित केले. आता प्रेक्षकांंनी पिंगा गीत सहन करायचे आणि वर सहिष्णूता कमी झाली आहे अशी ओरड या फिल्मवाल्यांंनीच करायची. वास्तववादी काय आहे ते दाखवायला हवे उगीच आपल्या वैयक्तिक फायद्यासाठी कल्पनेच्या भरा-या मारून आपल्याच महापराक्रमी प्रतिष्ठीत राजे, महाराजे, सरदार व त्यांच्या गोतावळीचा अपमान होईल असे काही करू नये. मल्हारी या गाण्यात चक्क थोरल्या बाजीरावांना सुद्धा नाचतांंना दाखवले आहे. असली नृत्ये, गाणी पाहून खरे इतिहासप्रेमी अतिशय दु:खी झाले आहेत. छत्रपती शाहू महाराजांनी ज्याचे गुण हेरून अल्प वयात पेशवे (पंतप्रधान) पद दिले ज्यांना घोड्यावरून खाली उतरायला वेळ नव्हता ते आणि नाच गाणी ? काहीही दाखवायचे ...! थोरले बाजीराव आपल्या अवघ्या 21 वर्षांच्या कारकिर्दीत मोठा पराक्रम गाजवून गेले त्यांना दुसरे शिवाजी राजे म्हणत. बाजीरावांनी सर्वच्या सर्व मैदानी लढाया जिंकल्या आहेत. याप्रसंगी बाजीरावांच्या पराक्रमा सोबत त्यांनी तत्परता व ते कुणाच्या मदतीसाठी कसे धावून जात अशी एक गोष्ट आठवते. बुन्देलखंडाचा राजा  छत्रसालाने  मो.बंगश याच्या आक्रमणाप्रसंगी मदत मागितली होती. ज्यावेळी निरोप बाजीराव महाराजांपर्यंत आला  त्यावेळी ते जेवत होते. असे म्हटले जाते की त्यावेळी हातचा घास तसाच ठेवून बाजीराव उठले आणि उद्गारले "उशीर झाल्यामुळे जर छत्रसाल हरले तर इतिहास हेच म्हणेल की बाजीराव जेवत होते." आणि छत्रसालांच्या मदतीला धावून गेले. ते वेळेवर पोहोचले विजय मिळवला असा हा मर्द मराठा गडी. होय मराठाच !...  आपण सर्वच महाराष्ट्रात राहणारे मराठेच तर आहोत ना ! छत्रसालाने खुश होऊन त्यांना मुलगा मानले , त्यांना काही राज्य दिले, आपली सुंदर गुणी कन्या मस्तानीबाई सोबत विवाह करून दिला. बाजीरावांचे दुर्दैव हे की सतत घोड्यावर असणा-या महापराक्रमी पंतप्रधानाच्या पराक्रमापेक्षा त्यांचे मस्तानीबाईंंवरील प्रेम यालाच जास्त महत्व दिले गेले . घोड्यावर बसल्या बसल्याच तलवारीने कणीस कापून हातावरच हुर्डा मळून खाणा-या व सतत  एका मोहिमेवरून दुस-या मोहीमेवर जाणा-या बाजीरावांचा पराक्रम उपेक्षिल्या गेला.इतिहासानी त्यांच्यावर अन्याय केला. मस्तानीबाई  यांची आई मुस्लीम असल्याने त्यांना व बाजीरावांना तत्कालीन रूढी परंपरेनुसार घरून आणि समाजातून प्रचंड विरोध झाला. एका मोहीमेवर असतांना ओंकारेश्वर जवळील रावेरखेडी या नर्मदा तीरावरील सध्याच्या मध्यप्रदेशातील गावात बाजीरावांचा मुक्काम होता. याच ठिकाणी त्यांना ज्वराने का उष्माघाताने ग्रासले. असे म्हणतात की त्याही स्थितीत या महारथीने नर्मदेत पोहोण्याची पैज लावली  व याचा त्यांना अधिकच त्रास झाला आणि त्याच ठिकाणी त्यांच्यावर काळाने झडप घातली. त्यांच्यावर चित्रपट निघाला तोही हिंदी खूप आनंद वाटला. असे वाटले थोरल्या बाजीरावांनी त्रिखंडात गाजवलेला पराक्रम त्रिखंडाला पुनश्च दिसेल परंतू "पिंगा" , "मल्हारी " गाण्यात काशीबाईना व बाजीरावांना नाचतांना  दाखवलेले पाहून प्रत्येक मराठी मनाला वेदना झाल्या. पण चित्रपटाला विरोध आणि निदर्शने अतिशय तुरळक ठिकाणी झाली कारण बाजीरावांना इतिहासातून जनतेच्या मनामनात  पोहोचवलेच गेले नाही. आपण सर्वानी बाजीरावांचा पराक्रम विसरून त्यांची उपेक्षा केली आणि या चित्रपटाने त्यात भर टाकली. आपल्या पराक्रमी पूर्वजांना असे चित्रित केलेले पाहून पेशवे वंशज व मस्तानीबाई वंशज यांनी तक्रारी केल्या आहेत. संजय लीला भंसाली यांच्या कारकीर्दीवर भविष्यात कुणी चित्रपट बनवला व त्यात आपल्या कल्पनेने "लीला" दाखवल्या तर भंसाली कुटुंबियांची प्रतिक्रिया तीव्रच राहील ना !

०३/१२/२०१५

About the century of my articles, on this occassion remembered Great "Lokhitwadi" Gopal Hari Deshmukh and his marathi article series "Shatpatre"

शतपत्रे 

जन-निनाद मधील स्तंभास सुरुवात करून दोन वर्षे होत आहेत.लेखन प्रपंच सुरु केला त्यावेळी असे वाटले नव्हते की आपण इतके लिहू.परंतु वाचकांचा उदंड प्रतिसाद, वेळोवेळी मिळणाऱ्या प्रतिक्रिया, प्रेरणा यामुळे आजच्या या शंभराव्या लेखापर्यंत येउन पोहचलो.प्रतिसादाबद्दल खामगाव परिसरातील वाचकवर्ग तसेच वृत्तपत्राची इंटरनेट आवृत्ती, ब्लॉग आणि फेसबुकच्या माध्यमातून वाचणारे तसेच जन-निनाद संपादक आणि कर्मचारीवृन्दांचे आभार.
           डिसेंबर 2013 पासून सुरु केलेल्या लेखन प्रपंचास दोन वर्षे होत आहेत.दोन वर्षातील हा शंभरावा लेख.लेख लिहिण्यास सुरुवात केल्यावर असे वाटले नव्हते की आपण इतके लिहू.परंतु 'वाढता वाढे' करीत लेखांची संख्या आज शंभरवर जाउन पोहचली.हि पण एक 'सेंच्युरी' झाली.परंतु या 'सेन्च्युरीला' काही क्रिकेटच्या सेंच्युरी सारखे कौतुक मिळणार नाही.कारण वाचनप्रेमी हे क्रिकेटप्रेमीपेक्षा कमीच आहेत.येथे क्रिकेट लेखन,वाचन अशी तुलना किंवा तत्सम भाष्य करणे योग्य नाही.वाचन असो क्रिकेट असो ज्याचा त्याचा आपापल्या आवडीचा विषय आहे.परंतु एखादा मोठा आकडा गाठला की एक समाधान होत असते.मग तो अंक वाढत्या वयाचा असो,कंपनीच्या उत्पादनाने गाठलेला उच्चांक असो,,,, परीक्षेतील गुणांचा उच्चांक असो,, क्रिकेटच्या धावांचा उच्चांक असो , शेतीतील भरमसाठ पिकवलेल्या धान्याचा उच्चांक असो,. असा उच्चांक गाठणाऱ्यास काहीतरी निर्मितीचा किंवा उद्दिष्टपुर्तिचा आनंद मिळत असतो.असा आनंद कोणत्याही भौतिक सुखातून मिळणाऱ्या आनंदापेक्षा निशितच सुखदायी असतो.आणि या आनंदाचा आस्वाद तो उच्चांक गाठणारा व्यक्तीच घेऊ शकतो. त्यालाच तो समजू शकतो.शंभराव्या लेखास शीर्षक काय द्यावे? असा प्रश्न भेडसावू लागला आणि शंभर, हंड्रेड, शत ,सेंच्युरी असे शब्द डोक्यात 'पिंगा' घालू लागले.(संजय भन्सालींच्या सुपीक डोक्यातील 'पिंगा' नव्हे ). शत शब्दाहून शतपत्रांची आठवण झाली  होय 'शतपत्रे' ! 'लोकहितवादी' गोपाळ हरी देशमुख यांनी प्रभाकर या साप्ताहिकात 'शतपत्रे' लिहिली होती.त्यांनी एकूण 108 पत्रवजा लेख तत्कालिन समाजव्यवस्था, प्रथा, परंपरा यांबद्दल लिहिले होते. साधारणता: १० ते १२ वर्षापूर्वी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना हे वाचनात आले होते. स्पर्धा परीक्षांमध्ये काही यश मिळाले नाही परंतु कोणतीही गोष्ट वाया जात नसते. या अभ्यासातून माहिती आणि ज्ञानप्राप्ती झाली हे सुद्धा थोडके नव्हे.शतपत्रे काही वाचनात आली नाही परंतु ती लिहिणारे गोपाळ हरी देशमुख कायम स्मरणात राहिले. मग वाटले आपल्या शंभराव्या लेखास 'शतपत्रे' हेच शीर्षक का देवू नये? मनात अजूनही खळबळ आहे कि हे शीर्षक द्यावे कि नाही? कारण कुठे ते लोकहितवादी आणि कुठे आपण? लोकहितवादींच्या लिखाणातील ओंजळभर.जरी लिखाणकला आपल्यामध्ये आली तरी खूप झाले.मग परत विचार केला की मनात जे आले ते कुणाविषयी व्यक्तिगत द्वेषभावना, आकस न बाळगता निर्भीड आणि नि:पक्षपणे लिहित गेलो.लिहिता-लिहिता शंभर लेख झाले 'शत' हा आकडा गाठला.या 'शत' वरून मग 'शतपत्रे' आठवली आणि 'शतपत्रे' हेच शीर्षक लेखास योग्य आहे असे वाटले.कदाचित लोकहितवादिंची सुद्धा आशीर्वादरूपी मान्यता किंवा संकेत असेल. लेखांची हि शंभरी गाठतांना अनेक वाचक,सोशल मिडियावरिल वाचक,मित्र,आप्तेष्ट,संपादक व इतर सहकारी यांचा उदंड प्रतिसाद मिळत गेला.संपादकांनी लिखाणासाठी 'मुक्त हस्त' ठेवले.लेखन स्वतंत्रता अबाधित ठेवली.वाचकांचे फोन व संदेश यांमुळे लेख लिहिण्यास प्रेरणा मिळत गेली. एखाद्या सडेतोड लेख असला की वाचक फोन करून आनदाने बोलतात कारण अन्यायाबद्दल, चुकीचे जे आहे त्या विरुद्ध लिहिल्याबद्दल ज्या मनातील भावना जाहीर बोलता येत नाही तशा भावना कुणीतरी लेखांमधून व्यक्त करीत आहे असे समाधान त्यांना झाल्याचे त्यांच्या बोलण्यातून कळते.एखादा 'छंद मनाला जडला की तो पिसे लावतोच' तसेच झाले 2013 पासून लिखाण छंद सुरूच आहे. अनेकांनी विचारले 'तुम्ही कसे लिहिता?', 'किती वेळ लागतो एक लेख लिहायला?' , "कसे काय सुचते ?" यावर मिर्झा बेग यांच्या कवितेतील एक ओळ आठवली ते म्हणतात की मी कविता करू शकतो कारण 'तो माझा ज्ञानेश्वर आणि मी त्याचा रेडा" तसेच हे सर्व "तो" लिहून घेतो. 2013 मध्ये कुण्या नतद्रष्टांनी सावरकरांची पुस्तके जाळली दु:ख वाटले आणि त्या विरोधात सर्वात पहिला लेख लिहिला शंभराव्या लेखाच्या वेळी "लोकहितवादिंचे" व त्यांच्या "शतपत्रांचे" स्मरण  झाले.प्रथम लेख आणि आजचा शतकी लेख दोन्ही थोर देशभक्त, प्रज्ञावंतांशी  संबंधित असे झाले . हा एक दैवी योगायोगच म्हणावा लागेल. लेखांची शंभरी गाठण्याचे श्रेय वाचकांचे आहे. त्यांच्या प्रतिसादाने हे शक्य झाले. वाचक, आप्तेष्ट, मित्र मंडळी तसेच जन-निनाद संपादक आणि  परिवार सर्वांचेच आभार.