२८/०७/२०१६

Salman khan got relief from killing Chinkara case.....some student attached on dog ....whats this happening ? where is the love about animal ?

तुका म्हणे ऐशा नरा.......
विविधतेत एकता असलेल्या आपल्या देशात विचित्र,समाज कंटक. नियमांना धाब्यावर बसवून कायद्याचे उल्लंघन करणा-या लोकांची सुद्धा कमी नाही आहे.आपल्या देशात एका पाठोपाठ एक अशा कायदा मोडणा-या, काहीही बरळण्याच्या, दुष्कृत्ये करण्याच्या,कायदा मोडून सही सलामत सुटण्याच्या अनेक घटना अशा लोकांकडून घडत असतात.सर्वसामान्यांना याचे अप्रूप वाटत असते.आता परवाच १९९८ मधील काळवीट शिकार प्रकरणी आरोपी असलेल्या महान अभिनेता,जनतेच्या लाडका,दिखावा म्हणा किंवा शिक्षा कमी व्हावी म्हणून मानलेल्या बहिणीचा लाडका भाऊ,तसेच शिक्षा सौम्य व्हावी म्हणून “बिइंग ह्युमन” सामाजिक संस्था सुरु करणारा सलमान ह्यास काळवीट प्रकरणातून निर्दोष मुक्त केले.काय तर म्हणे ज्या गोळ्या काळविटास लागल्या त्या महान सलमान महोदय यांच्या बंदुकीतून सूटलेल्या नव्हत्या. मग गोळ्या कुठून सुटल्या? याचा अर्थ जंगलात इतर शिकारी सुद्धा होते, म्हणजेच शिकारी होत आहेत, आता वन विभागाने मग त्या अज्ञात शिका-यांविरुद्ध गुन्हा दाखल करावा.कारण न्यायालयाच्या निर्णयाने हे निश्चित झाले आहे की शिकार झाली आहे मग आता ज्याच्या बंदुकीतून गोळ्या सूटल्या त्याला पकडा कारण वाघ,बिबट्या किंवा इतर हिंस्त्र श्वापद काळविटास बंदुकीने तर नाही मारणार.सलमान भाऊ आपले अतिशय लाडके त्यांनी मद्यधुंद होऊन बेदरकारपणे गाडी खाली लोकांना चिरडून टाकावे,वन्य प्राण्यांना मारावे,बलात्काराचा दाखला देऊन स्वत:च्या चित्रपटाचे “प्रमोशन” करण्याच्या प्रयत्न करावा त्यांना कुणी काहीही नाही म्हणणार. उलट त्यांचे चित्रपट आम्ही डोक्यावर घेऊन त्यांनाच करोडो रुपये मिळवून देवू.
काहीही बरळण्या-या लोकांचे सुद्धा असेच. दयाशंकर यांनी मायावती संबंधी अनुद्गार काढून कुणाचीही नसती आफत ओढवून घेतली. काय गरज काहीही बरळण्याची? सत्तेच्या धुंदीत तोल सुटतो आणि मग नंतर कारकिर्दीवर गंडांतर. हे असे काहीही वक्तव्ये करणारे नेते यांना सुबुद्धी कधी प्राप्त होणार?

विविध दुष्कृत्ये करणा-यांचे सुद्धा तेच. काही एक विचार न करता केवळ “सोशल मिडीयावर” प्रसिद्धी मिळविण्याच्या नादात हे तरुण आज-काल काय करतील याचा नेम नाही. कुत्रीला गच्ची वरून काय फेकले, चार- पाच मुलांनी कुत्र्याच्या पिलांना जिवंत काय जाळले,वरून त्याचे चित्रीकरण सुद्धा केली काय ही विकृतता.कुत्रा पोळी घेऊन पळाला तर संत नामदेव कुत्र्याच्या घशाला कोरड पडेल म्हणून त्याच्या मागे तुपाची वाटी घेऊन निघाले होते. संत एकनाथानंनी गंगेचे पाणी गाढवाला पाजले होते. अशा संतांच्या देशात प्राण्यांशी असे वागले जाते. विविध देवी देवतांची वाहने विविध प्रकारचे प्राणी आहेत. हे यासाठीच की आपण प्राणीमात्रांवर प्रेम करावे. परंतू आता संत त्यांची शिकवण याचा कोण विचार करते? आता फक्त हवी सवंग प्रसिद्धी म्हणूनच सलमान स्त्रियांबद्दल अनुद्गार काढतो ,हरणाला मारतो,उच्चशिक्षित तरुण कुत्रीला तीस-या माळ्यावरून खाली फेकतात,शाळकरी मुले कुत्र्याच्या पिलांना जिवंत जाळतात.अशाच नराधमांना उद्देशून संत शिरोमणी तुकाराम महाराज म्हणाले होते "तुका म्हणे ऐशा नरा, मोजूनि माराव्या पैजारा' आता तर पैजारा ऐवजी “...माराव्या गोळ्या” असेच म्हणावेसे वाटते कारण गोळ्या दुस-या कोणत्या तरी बन्दुकीतून सुटल्या हे सिद्ध करता येवू शकते. 

२१/०७/२०१६

Pakistan celebrating Black Day after the death of Terorrist Burhaan Wani

बुरी नजर वाले तेरा मुंह काला
बुरी नजर वाले तेरा मुंह काला,अगदी साधे वाक्य लहानपणापासुनच सगळ्यांनाच माहित असलेले. ट्रकच्या मागे हमखास आढळणारे हे वाक्य.बुरहान वाणी याला भारतीय जवानांनी जहन्नूम मध्ये धाडल्यावर 20 जुलै काळा दिवस पाळणा-या पाकडयांचेच तोंड जगात काळे झाले आहे.सारे जग जाणते की दहशतवादास खतपाणी पाकेस्तानातूनच मिळते तरीही आम्ही दहशतवादास पाठबळ देत नाही असा डांगोरा जागतेक स्तरावर आणि युनोमध्ये पाकडे नेहमीच पिटत असतात मात्र एका दहशतवाद्यास शहीद म्हणवून आणि त्याच्या मरणा-यावर काळा दिवस पाळून पाकने जागतिक स्तरावर मात्र स्वत:चेच तोंड काळे करून घेतले आहे.“एक ना एका दिवस पापाचा घडा भरतोच” , “शिशुपालाचे शंभर अपराध भरल्यावर केशवाने त्यावर सुदर्शन सोडले होते” अशा प्रकारची वाक्ये आपण एखाद्या पापी व्यक्ती बद्दल बोलतांना बरेच वेळा ऐकत असतो.परंतू काळतोंड्या पाकच्या पापाचा घडा काय कधीच भरणार नाही का? पाक देशाचे नांव सुद्धा उच्चारावे वाटत नाही, काय तर म्हणे पाकिस्तान,पाकिस्तान म्हणजे पवित्र भूमी असा अर्थ.परंतू “नांव मोठ आणि लक्षण खोट”. १९४७ या वर्षी भारतापासून विभक्त होऊन निर्माण झालेल्या या छोट्याश्या तुकड्याने मोठ्या दिमाखाने पाकिस्तान हे नांव धारण केले आणि तेंव्हापासूनच भारतानेच दिलेल्या ५५ कोटी रुपयांच्या जोरावर कोटी-कोटी  अपवित्र कृत्ये करण्यास सुरवात केली ती आजतायागत सुरूच आहे.भारतीय संस्कृती आणि येथील अनेक पंथ हे शतकानुशतके सहिष्णू आहेत.शांततेचा संदेश देणारे आहेत.भारताने सदैव पाकेस्तान बाबत शांततेचे धोरणच ठवले आहे.भारत सदैव माणुसकीच्या भावनेतून वागतो.दोन वर्षांपूर्वी काश्मीरला बसलेल्या जबरदस्त तडाख्याच्या वेळी या ‘अलगाववादी’ म्हणजेच फुटीरतावादी आणि इतर नागरिकांना भारतीय जवानांनी कसे सहकार्य केले,स्वत:चा जीव धोक्यात घालून जीवदान दिले. आणि त्याच सैन्यावर संचारबंदी असूनही बाहेर निघून दगडफेक करणा-या या पिलावाळीस काहीच कसे वाटत नाही?यांची स्वत:ची मुले विदेशात आरामात राहतात, शिकतात आणि दुस-याच्या मुलांना फितवून त्यांना हे नतद्रष्ट हकनाक बळी पाडतात.यांच्या अशा कृत्यांवरून भविष्यात येणा-या परिस्थितीची कल्पना येते.ज्याप्रमाणे काश्मिरी पंडितांना हाकलून लावले त्याच प्रकारे जवानांवर दगडफेक कर-यापर्यंत यांची मजल गेली आहे.पुढच्या धोक्याची चाहूल लागलेली आहे काही भाग तर आधेच “POK झाला आहे त्यातील काही भाग “घरी नाही दाणा आणि मला बाजीराव म्हणा” या वृत्तीने वागणा-या पाकडयांनी चीनला सुद्धा दिलेला आहे. स्वत:ची अर्थव्यवस्था पोकळ आणि भारताची भूमी परस्पर चीनला ! पाणी डोक्यावर चालले आहे भारताला या बाबत अमेरिका वा इतर शक्तीना न जुमानता कठोर पावले उचलावीच लागतील.अहिंसा तत्वाच्या अतिरेकामुळे कृष्ण,अर्जुन,चाणक्य,शिवाजी महाराज, राणा प्रताप,पृथ्वीराज चव्हाण यांची शिकवण आपण विसरूनच गेलो आहोत.“किशन ने कहा अर्जुनसे ना प्यार जता दुष्मनसे युद्ध कर”. खूप झाली शांतता, पुरे झाले शाली आणि साड्या देणे,पुरे झाले त्यांना अचानक भेटी देणे, पुरे झाले त्यांच्या कलाकारांना नाचवणे, पुरे झाले खेळातून मैत्री.मान्य आहे ‘इन्सानियत का दायरा’, मान्य आहे ‘पडोसी बदलते नाही आते’ परंतू शेजारी आपल्या घरात अतिक्रमण करूनच राहिला,आपल्या घराची शांतता भंग करूनच राहिला आणि आपण आपल्या जवानांना बळी देऊनच राहिलो.आता ‘आँख मी आँख डाल के बात’ झालीच पाहिजे.नाहीतर अण्वस्त्रे केंव्हा दहशतवाद्यांच्या हाती  जातील नेम नाही आणि मग वेळ निघून गेली असेल. त्यांचे तोंड तर काळे झालेच आहे आपण सुद्धा जगात तोंड दाखवू नाही शकणार.   

१४/०७/२०१६

Article about Marathi TV series and vamp roles shown

घरात घुसलेल्या “व्हॅम्प”
काही वर्षांपूर्वी दूरदर्शनच्या मराठी वाहिनीवर “कुंकू टिकली” हा सासू आणि सुनेच्या एकमेकीवर कुरघोडी करण्याच्या कार्यक्रम प्रसारित होत असे. यात सासू सुनेतील वाद विनोदात्मक पद्धतीने चित्रित केलेला असे. परंतू नंतर मग हिंदीमध्ये मा. मंत्री महोदयांची “क्यों की.....” आणि “कहानी घर घर की” सारख्या जितु काकांच्या मुलीच्या एकता कपूरच्या मालिकांनी घरा-घरांमध्ये एका खाष्ट, कपटी सासू किंवा स्त्रीचा शिरकाव करून दिला. भारतीयांमध्ये अथवा त्यांच्या कुटुंबांमध्ये अशा स्त्रिया नव्हत्या असे काही नाही. खाष्ट आणि कपटी स्त्रिया तर मंथरे पासून तर “ध चा मा” करणा-या आनंदीबाई आणि अगदी आताच्या स्वत:च्याच मुलीला मारून टाकणा-या “इंद्राणी मुखर्जी” पर्यंत अनेक खाष्ट स्त्रिया होऊन गेल्या आणि आहेत.
”सीतेला झाला सासुरवास परोपरी तिने तो वाटून दिला घरोघरी”
त्यामुळे स्त्रिया आणि सासुरवास, भांड्याला भांडे लागणे हे वर्षानुवर्षे सुरूच आहे. परंतु या दूरचित्रवाहीन्यांनी मात्र कहरच केला आहे. यांच्या मालीकातील स्त्रिया आनंदीबाई, मंथरा आणि इंद्राणी मुखर्जी या सर्वानाही मागे टाकतील अशा रंगविलेल्या दाखवतात. या मालिकांचे निर्माते, दिग्दर्शक तर सोडाच मालिका बघणारे दर्शक सुद्धा साधा विचार करीत नाही की या मालिका त्यांच्या समवेत बसून त्यांची पुढची पिढी सुद्धा पाहते आहे. या नवीन पिढीवर बालपणापासून या मालीकांतील कपटी, कजाग स्त्रिया वाईट संस्कार करीत आहेत. आजची लहान मुले जी अशा मालिका नेहमी पाहत आहेत त्यांच्या बालमनावर नक्कीच याचा मोठा परीणाम होतो. मग ती मुले उद्धट, न ऐकणारी, द्वाड बनत आहे. अनेक लहान लहान मुलांनी आत्महत्या केल्याच्या घटना कितीतरी घडल्या आहेत. परंतू दुर्दैवाने या मालीकांबाबत शासन, सामाजिक कार्यकर्ते, समाज काहीही आक्षेप घेतांना दिसत नाही. सर्व आनंदाने आपल्या कुटुंबियांसमवेत या निरर्थक मालिकांचा आस्वाद घेत असतात (माझे कुटुंब सुद्धा अपवाद नाही) आणि निर्माते त्यांचे गल्ले भरीत आहेत. पूर्वी संध्याकाळची वेळ म्हणजे गोष्टींची वेळ असे. रोज सायंकाळी दिवे लागले, देवाची प्रार्थना झाली की आजीच्या अवती भवती  लहान लहान नातवंड जमा होत. आजी/ आजोबा मग त्यांना रामायण, महाभारत, थोरा मोठ्यांच्या गोष्टी सांगत. या गोष्टींचा लहानग्यांवर चांगला परिणाम होत असे. ती मुले संस्कारी. आज्ञाधारक, सुशील, गुणवान बनत. लहानपणीच त्यांना घरची आणि घरच्या परिस्थितीची जाणीव होत असे. आता तर आजी, सून, नात आणि सर्व घरच सायंकाळी “आदेश भावोजी” “होम मिनिस्टर” करीत येतात तेंव्हा पासून तर मुलगी पसंत केल्यावर मग तिला कसा त्रास होईल निव्वळ याचाच विचार चोवीस तास करणा-या सासूची “पसंत आहे मुलगी” व शिव आणि गौरी जोपर्यंत घरी जात नाही तो पर्यंत त्या “इडीयट बॉक्स” च्या समोर ठिय्या मांडून असतात. पुढे मग “चला हवा येऊ द्या वाले “ आहेतच असे करत करत “रात्रीस खेळ चाले” सुरु राहतोच. जेवण सुद्धा तिथेच. भविष्यात परसाकडे सुद्धा एखाद्याने टीव्ही लावल्यास नवल नाही. कोण म्हणते मराठी अस्मिता नाही म्हणून, मराठी माणसे  जागृत नाहीत म्हणून ? मराठी माणसे जागृत आहेत ती फक्त सासू सुना, कपटी, कजास,खाष्ट, कारस्थानी स्त्रियांच्या मालिका पाहण्या बाबत. बरेच ठिकाणी माणसे सुद्धा हा “मेलोड्रामा” मोठ्या आवडीने पाहतात.पूर्वी काही चित्रपटांमध्ये अशा “व्हॅम्प” भूमिका, पात्रे असत.परंतु आता मात्र अशा व्हॅम्पचे पीक आले आहे आणि हि व्हॅम्प काही मालीकांमधली किंवा फिल्मी व्हॅम्प नसून तुमचे घर तुमची पिढी बिघडवणारी व्हॅम्प आहे. सावधान ! 

०७/०७/२०१६

Article describes about decreasing no of small workers,road artists and hawkers etc in Maharashtra

चक्कू छुरीया तेज बनालोSSSSS
काल ब-याच वर्षांनी तो दिसला.परंतु पक्के लक्षात आहे होता तोच ज्याला मी 30-35 वर्षांपूर्वी नेहमी पाहत असे हल्ली तो क्वचितच दिसतो.पूर्वीची “हिप्पी कट” आता थोडी कमी झाली होती.पँटची बॉटम सुद्धा आता पूर्वीसारखी “बेल बॉटम” नव्हती.त्याची तीच सायकल.त्या सायकलच्या मागच्या चाकावरून एका बेल्टवर फिरणारे सायकलच्या हँडलवर बसवलेले व उभ्या असलेल्या सायकलचे पॅडल मारल्यावर फिरणारे ते एक छोटे चाक.प्रदूषणरहित पर्यावरणपूरक यंत्र. त्या हँडलवरच्या चाकावर गल्लीत एका ठिकाणी तो सायकल उभी करून कुणाच्या तरी चाकू,सु-यांना धार लावत होता.तो आपल्या कामात मग्न आणि त्याला पाहून मी विचारात मग्न झालो. “Use And Throw” च्या आजच्या काळातही पोटाची खळगी भरण्यासाठी तो त्याचा तोच जुना व्यवसाय पुढे नेत होता.तो धार लावण्यासाठी उभ्या असलेल्या सायकलला जोरात पॅडल मारीत होता आणि त्याचे ते हँडलवरील चाक जोरात फिरत होते तसेच किंबहुना त्या चाकापेक्षाही अधिक वेगात फिरत होते माझे विचारचक्र.मी भूतकाळात केंव्हा गेलो मलाही कळले नाही.त्याच्या आज अचानक दिसण्याने अनेक जुन्या कारागिरांची आठवण येण्यास सुरुवात झाली.“जाते पाते टाक र बाई” अशी आरोळी आठवली. दळणाचे घरगुती जाते टाकून(नवीन पिढीतील वाचकांनी टाकून या शब्दाचा फेकून असा अर्थ घेऊ नये) देण्यासाठी “पाथरवट” बायका अशी आरोळी ठोकत असत.त्यापाठोपाठ लगेच आठवली विशिष्ट शैलीतील “कल्हSSSSSई” अशी पितळी भांडयांना चकाकून देणा-या कारागिराची आरोळी.विचारचक्र अजून पुढे सरकले आणि मग एका उंच बांबूवर कसलातरी चिकट खाद्य पदार्थ घेवून लहान मुलांना मोर, बदक असे प्राणी करून ते खाण्यासाठी म्हणून विकणा-या बंगाली मिठाई विक्रेत्याची.तो हाताला थुंकी लावून मिठाई बनवतो अशी काहीशी अफवात्मक चर्चा लहानग्यांमध्ये चालायची.विचार पटलावर नंतर आला तो दारोदारी पटलाच्या ऐवजी “अॅल्युमिनियम”च्या डब्यात मुलांना तोंड घालून सिनेमा दाखवणा-या “बायोस्कोप” वाला. (अॅल्युमिनियमसाठी तत्कालीन प्रचलित शब्द होता ‘जर्मन’.अॅल्युमिनियम जर्मन का म्हणत? त्याचे जर्मन देशाशी काही नाते होते का हे कोडे कधी उलगडले नाही,आणि कुणी कुणाला विचारण्याच्या भानगडीत सुद्धा पडले नाही) हे असे व्यावसायिक काळाच्या ओघात गायब झाले.ते व त्यांच्याशी संबधित शब्द आजच्या पिढीला कदाचित ठाऊक सुद्धा नसतील.अस्वल घेऊन दारोदारी खेळ करणारा “दरवेशी” हा शब्द व “पाथरवट” सारखे शब्द आता फक्त एखाद्या चांगल्या प्रतीच्या वर्तमानपत्रातील शब्दकोड्यातच आढळतात.त्याचे धार लावण्याचे चाक आणि  माझ्या डोक्यातील विचारचक्र फिरतच होते.वरील सर्व छोटे-मोठे फेरीवाले म्हणा किंवा कारागीर म्हणा हे गायब का झाले?असे काय घडले की आता हे लोक क्वचितच कुठेतरी आढळतात.तर यास “काळ” हेच उत्तर आहे.काळ बदलण्यास वेळ लागत नसतो.आपल्या डोळ्यादेखत अनेक नव्या गोष्टी येत असतात आणि जुन्या गोष्टी काळाच्या ओघात गायब होत असतात.काल ज्याला अतिशय महत्व असायचे आज ते अडगळीत जाऊन पडलेले असते.वस्तूच काय तर जुन्या पिढीला सुद्धा टाकाऊ समजून दूर सारणारे नवीन पिढीत अनेक आहेत.१९८० नंतर काळ झपाट्याने बदलण्यास सुरुवात झाली.त्यानंतर मुक्त अर्थ व्यवस्था,उदारीकरण यांमुळे नवीन बाजारपेठ उदयास आली.जुने,परंपरागत छोटे-मोठे उदयोग करून पोट भरणारे मग लोप पावण्यास सुरुवात झाली.सरकारच्या “वोट बँक” केंद्रित धोरणामुळे गोर गरिबांना सर्व काही “मोफत” वाटपाच्या अनेक योजना सूरु झाल्या.जगातील वस्तूंचा भारतीय बाजापेठेत शिरकाव आणि सरकारी “मोफत” वाटपाची धोरणे यांमुळे मग मजुर मिळेनासे झाले आणि लोक आळशी बनून त्यांचे परंपरागत रोजगारचे कार्य त्याग करते झाले.या व्यावसायिकांचे समाजात मोठे स्थान होते.सिनेमामध्ये समाजाचेच प्रतिबिंब उमटत असते.“पैसा फेको तमाशा देखो“ असे बायोस्कोप व्यवसाय करणा-या मुमताजवर चित्रित केलेले गीत “दुश्मन” सिनेमात होते.”जिंदगी है खेल कोई पास कोई फेल” धरम-हेमाचे डोंबा-याचा खेळ करतांनाचे गीत.तर “चक्कू छुरीया तेज बनालो” असे म्हणत चाकू सु-यानां धार लावून देण्याचे काम करणा-या “जंजीर” मधील जया भादुरीचे गीत. एव्हाना त्याचे काम संपले होते.त्याने “चक्कू छुरीया तेज बनालोSSSS” शी आरोळी ठोकली तेंव्हा माझी तंद्री भंग झाली.त्याचे हँडलवरील फिरणारे चाक थांबले परंतु त्याच्या आणि तत्कालीन इतर किरकोळ व्यापर उदीम करून पोट भरणा-यांच्या आणि त्यांचे पोट भरणारे व्यवसाय बंद करणा-या काळाच्या विचारात माझ्या विचारांचे चाक मात्र वेगाने फिरतच राहिले.

०१/०७/२०१६

Shivaji The Great Maratha Emperor worte "Aadnyaptr" (Order Letter) regarding saving tree before 400 years....article based on saving tree

झाडे वर्षा दो वर्षांनी होतात ऐसे नाही
अकोला–खामगाव असा प्रवास करतांना झाडे तोडल्याने भोंडा झालेला रस्ता पाहून मन खिन्न झाले. खेड्यातली पाउलवाट असो किंवा शहरातील एखादी गल्ली.शेतातून जाणारा गाडरस्ता असो किंवा एखादा राष्ट्रीय महामार्ग.या रस्त्यांच्या दुतर्फा जर वृक्षवल्ली असतील तर प्रवास सुखदायी होतो किंवा प्रवास लांबचा जरी असला तरी कंटाळवाणा वाटत नाही.परंतू आता “हरियाली और रास्ता” यांचे जरी अतूट बंधन असले तरी आता मात्र लांबच लांब रस्ता दिसतो ‘हरियाली’ काहीच नाही.सरकार एकीकडे वृक्ष लागवडीची मोहीम हाती घेत आहे,अभियान राबवीत आहे तर स्वत: सरकारच सर्र्रास झाडे तोडीत आहे.परवाच्या बातमीनुसार मागील वर्षात सरकारने ५६ हजार झाडे तोडली.”सडके देश को जोडती है” हे जरी खरे असले तरी काय रस्ते निर्मिती करतांना मोठ-मोठ्या झाडांची जी सर्रास कत्तल सुरु आहे त्यामुळे “ग्लोबल वार्मिंग” सारखे फटके बसणारच आहेत.ज्या प्रमाणात झाडे तोडली जातात त्याच प्रमाणात नवीन झाडे मात्र लावली जात नाहीत.लावली तरी त्या झाडांची जोपासना होतांना दिसत नाही.नवीन रस्ते निर्माण करतांना मोठी डेरेदार,कवेत मावणार नाही असे भक्कम बुंधे असलेली झाडे तोडून कन्हेरा सारखी छोटी झुडपी झाडे लावली जातात.रस्ते निर्मितीचा जसा धडाका घेतला आहे तसा पर्यावरण खात्याने सुद्धा झाडे लावण्याचा धडाका हाती घ्यावा.वृक्ष लागवडी साठी प्रोत्साहन,उत्तेजना द्यावी जे अश्याप्रकारचे कार्य करतात त्यांचा गौरव करावा.तर लोक झाडे लावण्यासाठी प्रेरित होतील.झाडे लावण्याच्या मोहिमेत शाळा,शिक्षक यांचे समवेत सर्वच कार्यालये,व्यापारी यांना सुद्धा उद्युक्त करावे. वातानुकलन यंत्र(ए सी) घर थंड करते परंतु उष्णता बाहेर फेकते.त्यामुळे ते  वातावरणातील उष्णता वाढवते.या यंत्राच्या किमती वाढवाव्यात,त्यावर कर लावावा,त्याच्या विक्रेत्यांना ग्राहकांना वातानुकलन यंत्रासोबत किमान दोन झाडे तरी लावण्यास द्यावी. अशा पर्यावरण बचावाच्या उपाययोजना अत्यावश्यक झाल्या आहेत. शिवाजी महाराजांनी सुद्धा स्वराज्यात रस्ते निर्मिती केली होती रस्त्यात येणा-या झाडांची सर्रास कत्तल केली नव्हती.त्यांच्या आज्ञापत्रात ते म्हणतात
“हि झाडे वर्षा दो वर्षांनी होतात ऐसे नाही रयतेने हि झाडे लाऊन लेकरांसारखी बहुत काल जतन करून वाढविली. ती झाडे तोडीयल्यावरी त्यांचे दू:खास पारावार काये ?”
यावरून त्यांची दूरदृष्टी व पर्यावरण प्रेम दिसून येते.आपण त्यांची जयंती साजरी करतो,त्यांच्या जयन्तीहून वाद करतो,राज्याभिषेक दिन साजरा करतो,त्यांचे स्मारक उभारतो त्यांची शिकवण मात्र अनुसरत नाही.राष्ट्रीय महामार्गांच्या रुंदीकरण्याच्या व नवीन महामार्ग निर्मितीच्या कार्यात लक्षावधी झाडांची कत्तल झाली आणि होत आहे.सरकारच्या मनात आले तर सरकार काहीही करू शकते.सध्याची जी झाडे आहेत त्यांच्या बाजूने भूमी अधिग्रहित करून या सध्याच्या झाडांचाच दुभाजक बनवून नवीन रस्ता सुद्धा सरकार करू शकते परंतु हे सरकारला आणि नोकरशहांना का सुचत नाही देव जाणे.रस्ते निर्मिती करा, विकास करा परंतू सोबतच पर्यावरण संरक्षणाचा सुद्धा धडाका घ्या.कारण जी झाडे तुम्ही तोडत आहात ती काही “वर्षा दो वर्षांनी होतात ऐसे नाही.”