२६/०५/२०१७

Using Mobile Phone and Caring Your Kids

मोबाईलचा वापर आणि मुलांची काळजी
     
       मोबाईलचे आगमन झाले तेंव्हा बोलण्याचे दर आणि मोबाईलची किंमत दोन्ही मध्यमवर्गीयास परवडेल अशा नव्हत्या. हळू हळू या क्षेत्रात क्रांती झाली. सर्व सामान्य जनते जवळ सुद्धा मोबाईल आले. “अँन्ड्रॉइड” मोबाईल आल्यापासून तर मोबाईल धारकांचे प्रमाण फारच वाढले. घरातील प्रत्येका जवळ मोबाईल आला. लहान मुले सुद्धा मोबाईल सराईतपणे वापरू लागली. अभिमन्यू जसा गर्भातच चक्रव्युहात प्रवेश करणे जाणला होता तसेच आताच्या बालकांवर मोबाईलचे गर्भसंस्कारच झाले आहेत असे म्हणायला हरकत नाही. कारण या मुलांची आई त्यांची अपत्ये गर्भात असतांना मोबाईल हाताळत होती. या बालकांच्या मोबाईल हाताळण्याचे त्यांच्या पालकांना फार कौतुक असते “आमचा बाब्या मोबाईल मध्ये सर्व काही करतो” अशा स्वरूपाची वर्णने आपण ऐकतच असतो. माझ्या मते ज्या ज्या काळात जी जी “गॅजेट्स” अवतरली त्या त्या काळातील बाल्यावस्थेतील पिढीला ती “गॅजेट्स” हाताळणे त्यांच्यापेक्षा वडीलधा-यांपेक्षा  जास्त चांगले जमत असते. उदाहरण म्हणजे “टेप रेकॉर्डर” , “व्हिसीआर” जेंव्हा अवतरले होते तेंव्हा त्या काळातील मुले ती हाताळणे त्वरीत शिकले होते. त्यामुळे कुणी लहान मुलगा एखादे “गॅजेट” उत्कृष्टरित्या हाताळतो याचे फार कौतुक नसावे असे वाटते. जिथे जी उपलब्ध साधने असतात तेथील मुले ती साधने सहजरित्या हाताळणे शिकतात म्हणजे खेड्यातील लहान मुलगा बैलगाडी सहज हाकतो, प्रिंटींग प्रेस मधील लहान मुले ऑफसेट मशीन हाताळतात. मेडिकल दुकानांवरील जास्त शिक्षण न झालेली मुले तेथील संगणक व त्यावरील प्रणाली सहज व जलद गतीने हाताळतात. मोटार दुरुस्तीच्या दुकानावर काम करणारा एखादा लहान मुलगा सर्व प्रकारच्या गाड्या चालवू शकतो. त्याचप्रमाणे आपल्या घरातील भ्रमणध्वनी आपली मुले सहज हाताळू शकतात त्यामुळे त्याचे फार अप्रूप किंवा कौतुक नसावे. आता मोबाईल वापरतात म्हणजे त्यावर काय करतात? हा एक मुद्दा उपस्थित होतो. तर गेम खेळणे, व्हॉटस ऍप, फेसबुक यावर वेळ घालवणे याचेच प्रमाण अधिक असते. काही ठिकाणी तर अतिरेक असतो, अनेकांना त्यांची मुले किती वेळ मोबाईलवर वेळ व्यतीत करतात याची माहिती नसते. मोबाईल हे आजच्या काळातील उपयुक्त असे कम्युनिकेशन साधन” आहे परंतू त्याचे घातक परिणाम सुद्धा मनावर आणि शरीरावर होत असतात. आपल्याला त्याचा वापर करणे अपरिहार्य झाले आहे व सोबतच मुलांची काळजी सुद्धा घेणे आहे. जपान मध्ये मुलांनी मोबाईल पासून दूर कसे रहावे याचे म्हणे क्लासेस घेतले जातात. सतत मोबाईल घेऊन बसल्याने वेळेचे, भुकेचे भान रहात नाही त्यांनी शरीरावर परिणाम होतो, एकलकोंडेपणा वाढतो, सर्वांमध्ये असूनही संवाद मात्र कमी असतो, विस्मरण सुद्धा वाढते आणि इतरही अनेक परिणाम होतात. एक मुलगा रात्रभर संगणकावर “प्रोजेक्ट” करतो असे सांगून संगणकावर काम करीत बसे इंटरनेट मुळे त्याला संगणकाचे व्यसनच जडले तो तहानभूक, इतर शरीरधर्म विसरून जात असे. एकदा त्याच्या पालकांनी रात्री त्यास पाहिले तर तो खुर्चीवर बसल्या- बसल्याच झोपी गेला होता आणि त्याला तेथेच लघुशंका झाली होती. आज तो एका मानसोपचारतज्ञाचे उपचार घेत आहे. पालक बंधुंनो तुम्ही खुशाल तुमच्या मुलाला मोबाईल वापरण्यास द्या परंतू त्याच्या मोबाईल वापरण्यावर काही बंधने घाला. लक्ष ठेवा. आज-कालच्या मुलांमध्ये सहनशीलता कमी असते त्यामुळे मुल बिथरणार नाही याची सुद्धा काळजी घ्या. त्याला एखादा खेळ किंवा संगीत शिकवा. मोबाईलमुळे काय परिणाम होतात हे सांगणारी अनेक संकेतस्थळे इंटरनेट वर उपलब्ध आहे त्याचे अवलोकन करा. आपला पाल्य “टेक्नो सॅव्ही” असावा असे सर्वांनाच वाटते पण तो “टेक्नो सॅव्ही” होण्याऐवजी  “टेक्नो एडीक्ट” तर होत नाही आहे ना याचे भान ठेवा.

१६/०५/२०१७

How people looted Alphonso mango rather saving wounded truck driver and cleaner

ज्यादाकी नाही लालच हमको, थोडेमे गुजारा होता है | 
     या लेखाचे शीर्षक म्हणजे भारतातील लोकांची, ते कसे राहतात, कसे आदरातिथ्य करतात, त्यांची दुस-याकडून शिकण्याची वृत्ती , दुस-याला आपले करण्याची वृत्ती, स्वार्थासाठी अन्नाची पूजा न करणे  याची महती करणा-या थोर कवी शैलेन्द्र यांच्या एका गीताची ओळ आहे हे जाणकारांच्या लक्षात आले असेलच. भारतातील लोक कसे आहेत याचे समर्पक वर्णन या गीतात केले गेले आहे. मुकेशच्या आवाजातील हे गीत ऐकताना अंगावर रोमांच येतात. परंतू दुदैवाने आता या देशातील लोक या गीतात जसे वर्णन केले आहे तसे वागताना क्वचितच दिसून येतात. याची प्रचीती मागील आठवड्यात घडलेल्या घटनेमुळे आली. नाशिक जिल्ह्यात रत्नागिरी तालुक्यातील लांजा येथील एक मिनी ट्रक हापूस आंबा घेऊन येत असतांना त्यास अपघात झाला. सुदैवाने चालक आणि त्याचा सहकारी दोघेही बचावले परंतू जख्मी झाले. ट्रक उलटल्यामुळे त्यातील हापूस आंब्याच्या पेट्या खाली पडल्या. ते दोघे जख्मी आणि आंब्याच्या पेट्या यापैकी रस्त्यावरील येणा-या जाण्या-यांच्या मनात “लालच बुरी बला” असूनही “ज्यादा की लालच” आलीच आणि त्यांनी जख्मी माणसांकडे जाण्याऐवजी प्राधान्य हापूस आंब्याला दिले. कुणीही चालक आणि त्याच्या सहका-याकडे लक्ष दिले नाही. ते दोघे मदतीची याचना करीत राहिले आणि त्यांच्या डोळ्या देखत त्यांच्याच अडीच ते तीन लाखांच्या हापूस आंब्याच्या पेट्या लोकांनी पळवून नेल्या. लोकांची ही कृती सांगतांना चालक रडला. कारण त्याने अनेक विनवण्या करूनही कुणी त्याला मदत केली नाही.बहुतांश वेळी असे निदर्शनास आले आहे की खाद्य पदार्थाच्या गाडीला अपघात झाला तर लोक माल पळवतात. परंतू एखादा जख्मी व्यक्ती तुम्हाला मदतीची याचना करीत असतांना तुम्ही त्याच्या मालाचे चौर्यकर्म करीत असतांना तुमच्या डोक्यात जराही मानवतेचे विचार येत नाही. एरवी शेतक-याचा कळवळा दाखवता आणि ज्या तुकाराम महाराजांचे गोडवे गाता त्याच तुकाराम महाराजांनी स्वत:च्या लेकरांकरीता आणलेली अर्धी अधिक ऊसाची मोळी रस्त्यावरील मुलांना वाटून टाकली होते हे विसरून दुस-याचे हापूस आंबे पळविता ! का घडत आहे असे आपल्या देशात ? आपल्या संत परंपरा असलेल्या महाराष्ट्रात ? कुठे हरवली ती आपल्याजवळील सर्व लोकांना वाटण्याची तुकाराम महाराज आणि इतर संतांसारखी संवेदनशीलता ? दुस-यांबद्दल आता आपल्याला काही वाटेनासेच झाले आहे. आपण कधीही हा विचार करीत नाही की आपण त्या आंबेवाल्याच्या जागी असतो तर? पण आता इतका विचार करण्याचा वेळ सुद्धा कुणाजवळ नाही. ही घटना घडली , आणि या घटनेमुळे  माणसाची संवेदनशीलता, दुस-याप्रतीची कणव नाहीशी होत असल्याचे पाहूनच आठवले की कुठे गेली ती आपल्या ओठांवरची “सच्चाई” , आणि हृदयातील “सफाई” ? शैलेन्द्र म्हणतो
मेह्माँ जो हमारा होता है वो जानसे प्यारा होता है |
ज्यादा की नही लालच हमको थोडेमे गुजारा होता है |

मात्र आंबे पळविण्याच्या या घटनेतून याची प्रचीती आली की आता आम्हाला “ज्यादा की लालच” आहेच आणि  “थोडे मे गुजारा” काही आमच्याकडून होऊ शकत नाही. आमची लालच एवढी वाढली आहे की हापूस आंबा मिळतो आहे ना , तो सुद्धा फुकट मग एखादा मरे का ना ,आम्हाला तमा नाही आम्ही प्रथम आमची लालच पूर्ण करू.

Triple Talaq issue and B.R. Chopra Movie "Nikah"

तलाक च्या निमित्ताने “निकाह” ची आठवण
गेल्या काही महिन्यांपासून ‘तलाक’ हा विषय चर्चिल्या जात आहे. मुस्लिम समाजात ‘तलाक’ हा शब्द तीन वेळा उच्चारल्यास पती आपल्या पत्नीस विभक्त करू शकतो, घटस्फोट देऊ शकतो. मुस्लिम महिला आता या प्रथे विरोधात जागृत झाल्या आहेत आणि जाहीररित्या भाष्य करीत आहेत. मुस्लिम कायद्यानुसार या पद्धतीने तलाक दिला जातो आणि ते योग्य आहे असे मानणारे सुद्धा अनेक लोक मुस्लिम समाजात आहेत. तलाक बाबत आता खुल्या चर्चा होत आहेत परंतू अनेक वर्षांपूर्वी हा विषय चित्रपटाद्वारे  समाजा समोर आणला तो सामाजिक भान ठेवून चित्रपट निर्माण करणा-या बी.आर.चोप्रा यांनी.चोप्रा यांच्या इतर चित्रपटांची चर्चा येथे केल्यास या लेखाची लांबी फार मोठी होईल. बी.आर.फिल्म्सचे सर्वच चित्रपट सामाजिक जाणीव असलेले आणि अर्थपूर्ण होते. निकाह हा सन 1982 मध्ये आलेला चित्रपट त्यापैकीच एक. या चित्रपटात एका मुस्लीम तरुणीची तलाक मुळे होणारी व्यथा दिग्दर्शकाने मोठ्या खुबीने चित्रित केली आहे. सलमा आगा या अभिनेत्रीने या मुस्लीम तरुणीची भूमिका वठवली होती. "दिलके आरमाँ आसूओमे बह गये" हे गाजलेले गीत आणि रवी व गुलाम अली यांचे संगीत ही सुद्धा या चित्रपटाची वैशिष्ट्ये होती. या तरुणीचा “निकाह” एका शीघ्रकोपी आणि कामाचा फार व्याप असणा-या नबाबाशी होतो. एका क्षणिक रागाच्या प्रसंगात “तलाक तलाक तलाक “ असे नवाब तिला म्हणतो ती उध्वस्त होते. तिचा पुनर्विवाह होतो परंतू या नवीन पतीला तिच्या आधीच्या विवाहा संबंधी माहिती होते आणि तिचा पूर्वाश्रमीचा पती तिच्याशी पुनश्च एकत्र होऊ इच्छितो हे समजते. मग काय त्या पहिल्या पतीसाठी हा दुसरा पती पुन्हा तिला तलाक देण्याच्या तयारीत असतो. तिचा एखाद्या वस्तू प्रमाणे वापर करीत असल्याबद्दल ती दोघानाही खडसावते आणि दुस-या पती सोबतच राहण्याचा निश्चय प्रकट करते. आज 2017 मध्ये “तलाक” च्या बाबतीत उहापोह सुरु आहे परंतू 1982 मध्येच बी.आर.चोप्रा यांनी काळाच्या पुढे असणारा हा चित्रपट निर्माण केला होता. त्यांनी सुरुवातीला या चित्रपटाचे नामकरण “तलाक तलाक तलाक “ हेच ठरवले होते परंतू काही वाद किंवा विरोध होऊ नये म्हणून “निकाह” हे नामकरण करण्यात आले. आज “तलाक” मुळे अनेक मुस्लिम भागीनींवर आकस्मिक संकट ओढवले जाते. अनेक पुरुषांनी या प्रथेचा गैरवापर अनेकदा केला आहे. कुणी फोनवर , कुणी मनातल्या मनात तीन वेळा तलाक म्हणून तलाक दिला आहे, चहाचा कप हातातून सटकल्याच्या कारणाहून सुद्धा तलाक दिल्याचे उदाहरण आहे. तर एकाने चक्क कोर्टात तलाक देऊन पोबारा केला आहे. शिया पर्सनल लों बोर्डाने तिहेरी तलाक बंदीचे समर्थन केले आहे. आता सुप्रीम कोर्टात या बाबतच्या सुनावणीला गती मिळाली आहे.शायरा बानो, नूरजहां नियाज, आफरीन रहमान, फरहा फैज आणि इशरत जहाँ या महिलांनी तीन तलाक प्रथा बंद करण्यासाठी याचिका दाखल केली होती.मुस्लीम पर्सनल लों बोर्डचा याला विरोध आहे. महिला मग ती कोणत्याही समाजातील असो तिच्यावर अन्याय होऊ नये. सर्वांचे “निकाह” कायम राहोत. सुप्रीम कोर्टातील या प्रकरणाचा काय निकाल लागतो त्याकडे मुस्लीम समाजातील  तलाक पिडीत महिला तसेच भारतातील सर्व सुजाण आणि महिला हित पाहणा-यांचे लक्ष लागले आहे. 

१०/०५/२०१७

"Hariyali Aur Rasta"....a article about making roads and cutting trees

हरियाली और रास्ता      
          सध्या वयाच्या सत्तरीत असलेल्यांना याच शीर्षकाचा एक गाजलेला सिनेमा त्यांच्या तरुण वयात म्हणजे 60 च्या दशकात झळकला होता याचे स्मरण झाले असेलच. रस्त्याच्या सोबतीला हिरवळ असतेच असा आशय. फार जुनी गोष्ट नाही. अगदी 1980 च्या दशकापर्यंत कुठेही जा एक लहान रस्ता असायचा त्यावरून केवळ राज्य परिवहन मंडळाची मोटार धावायची. खाजगी मोटारींचे जाळे फोफावले नव्हते, मोटार सायकलीचे प्रमाण सुद्धा आता इतके नव्हते आणि हो! अॅटोंचा सुद्धा सुळसुळाट नव्हता. रस्त्यांवर जास्त धावायच्या त्या राज्य परिवहन मंडळाच्या प्रवासी मोटारी, मधूनच एखादी “शानदार सवारी ,जानदार सवारी” असलेली राजदूत किंवा बुलेट नाहीतर “बुलंद भारत की बुलंद तसवीर” बजाज स्कूटर जात असे. कापसाने किंवा स्थानिक पिकाने भरलेल्या बैलगाड्या बैलांच्या गळ्यातील घंट्या वाजवीत जात असत. विदर्भात तर कापूसच जास्त असे. बाहेरगावी जाताना तर प्रवासी मोटारी व माल मोटारी व्यतिरीक्त क्वचितच एखादी दुचाकी किंवा अॅटों दिसत असे. सर्वात जास्त दिसत त्या दुचाक्या अर्थात सायकली.वाहने कमी त्यामुळे “सिंगल” रस्ता पुरेसा होता. तसेच रस्ते सर्वदूर होते.परंतू या सर्वांसह त्या रस्त्याला सोबत करणारी त्याची एक सखी होती आणि ती म्हणजे हरियाली अर्थात हिरवळ.खेड्यातील पाऊलवाट असो वा राज्य किंवा राष्ट्रीय महामार्ग असो यांची सोबत ही हिरवळ करायची.रस्याच्या बाजूला एखाद्या महावृक्षाच्या सावलीत गुरे विसावा करतांना दिसत, मध्येच कुठेतरी एखाद्या वृक्षाच्या छायेत सहभोजन सुरु असतांना दिसत असे. कुठे एखाद्या वृक्षाच्या मोठ्या फांदीला बांधलेल्या झोक्यावरून “ऊंच माझा झोका” करतांना मुले-मुली दिसत. तर कुठे “डाब-डुबली”, “सूर पारंब्या” असे खेळ होताना दिसत. पक्षांचा किलबिलाट ऐकू येई. परंतू हे चित्र पुसले गेले.नरसिंहराव यांच्या कारकिर्दीत देश बदलू लागला नवीन आर्थिक वारे आले , कर्ज देण्याच्या स्पर्धा सुरु झाल्या आणि त्यामुळे मग वाहने मोठ्या प्रमाणात वाढली, एवढी की त्यांना रस्ता पुरेनासा झाला आणि त्यातूनच मग वळण मार्ग आणि रुंदीकरणे सुरु झाली आणि सोबतच सुरु झाल्या विकासाच्या नावाखाली वृक्षांच्या कत्तली. या तथाकथीत विकासाने रस्त्याची सखी हिरवळ त्याच्यापासून दूर केली. पुढचे प्रत्येकच सरकार मग रस्त्यांचे कार्य हाती घेऊ लागले. “एक्स्प्रेस हायवे” , “सहापदरी”, “चार पदरी” , “उड्डाण पूल” हे नवीन चित्र आकारात येऊ लागले. मोठ मोठे वृक्ष गेले आणि त्यांच्या जागी “वृक्षारोपण करा” , “पर्यावरणाचे रक्षण करा”,“सडके देश को जोडती है”,“सडके विकास का जरिया है”,अशा आशयाचे निव्वळ जनतेला “ब्रह्मज्ञान” शिकविणारे फलक महामार्गावर ठराविक अंतराने दिसू लागले. वाढते अपघात,वाहनांची संख्या यासाठी रुंद रस्ते आवश्यक आहेत हे जरी खरे असले तरी रस्ते रुंद करतांना रस्त्या भोवर्तीच्या वृक्षराजींचा मात्र काहीही एक विचार केल्या जात नाही आहे. शिवाजी महाराजांवर स्वत:चा हक्क दाखविणारे सर्वच राजकारणी शिवाजी महाराज वृक्षांप्रती किती सावध होते हे दर्शविणारे महाराजांचे आज्ञापत्र मात्र साफ विसरले आहेत. अनेक ठिकाणी रस्ते रुंद झाले आहेत तेथे सावलीचा मागमूसही दिसत नाही. अनेक ठिकाणी रस्ता रुंदीकरणासाठी मोठ-मोठ्या झाडांची सर्रास कत्तल करून वर्षे उलटून गेली परंतू अद्याप तेथे ना रस्ता झाला ना रुंदीकरण.आघाडी सरकारच्या काळापासून काम सुरु असलेला खामगांव-जालना मार्ग किती वर्षे लोटली तरी जैसे थे आहे. हा रस्ता तर धड नाहीच शिवाय एकही वृक्ष सावलीला सापडत नाही.अमरावती जिल्ह्यातील वरुड-अमरावती हा रस्ता आता रुंद होणार आहे. या रस्त्यावर हजारो कडूनिंबाची झाडे आहेत, आता त्या झाडांवर खुणा झाल्या आहेत, त्यांना आता त्यांचे मरण जवळ आल्याचे दिसत आहे. परंतू विकासापुढे या वृक्षांना कोण विचारतो? आणि विकासाकरिता म्हणून बनविलेले यांचे रस्ते लगतच्या पावसाळ्यातच वाहून जातात, खड्डे पडतात , दुभाजकावर लावलेली छोटी झुडपी झाडे वाळून जातात. विकास होतो तो फक्त रस्ते बनविणा-या मंडळीचा. ठेकेदार,टोल वाले गब्बर होतात.आपला कार्यभाग साधला गेला ना, मग देशाचे काय? तो जावो ना का त्याच रस्त्यावरच्या खड्यात अशी त्यांची निगरगट्ट मानसिकता झाली आहे. हे ना रस्ते धड बनवत ना त्याच्या आजू बाजूला वृक्ष संगोपन करत. प्रवासी, वाटसरू मात्र त्या रस्त्यांच्या भोवताली “हरियाली” आणि रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये “रास्ता” शोधत बसतात.