२९/०६/२०१७

"Time Please" Remembering childhood games played in Maharashtra

टॅम्प्लीज...      
       बालपणीचा काळ सुखाचा या शीर्षकाचा एक पाठ आम्हाला हायस्कूल ला असतांना होता. लेखक काही स्मरणात नाही परंतू लहानपणीच्या अनेक आठवणींचे वर्णन या पाठात होते. आता काही दिवसांपूर्वी आमच्या मुख्याध्यापिका म्हणून सेवावानिवृत्त झालेल्या मामी प्रवरा नाईक ह्या आल्या होत्या.त्यांनी माझ्या भाच्यांना मामाकडे म्हणजे माझ्याकडे मोबाईलमध्ये गर्क असलेले पहिले आणि त्यांना त्यांचे भाचे म्हणजे आम्ही, लहान असतांना मामाकडे जळगावला गेल्यावर कसे पुस्तके वाचत असू, किती खेळत असू याची आठवण झाली. त्यांनी ही आठवण बोलून दाखवली आणि मग मन भूतकाळात गेले. दिवसभर वाचन आणि संध्याकाळी खेळ असा दिनक्रम असे. वाचनाच्या त्या आठवणीबरोबर 80 च्या दशकातील अनेक खेळ सुद्धा आठवले. लगो-या, नदी की पहाड,द्स्ती (रुमाल),एक सहेली रो रही थी,चिकट मासोळी सुटली,डोंगराला आग लागली,विष-अमृत,धब्बाकुटी,डाबडुबली,कुरघोडी,खिळा खुपसणी आणि श्रावणात झोके.असे हे सर्व खेळ व सवंगडी           “वो खेल वो साथी वो झुले वो दौडके कहना आ छुले, हम आज तलक भी ना भुले” 
या प्रमाणे एका पाठोपाठ एक आठवत गेले. हे खेळ सायंकाळच्या वेळी प्रत्येक गल्लीत सुरु असतांना दिसायचे.मुलांचा एकच गलका होत असे.फुरसतीत घराच्या पाय-यांवर बसणारी मंडळी हे खेळ पहात त्यांचे बालपण आठवत बसे.हे खेळ खेळतांना अनेक शब्द असे उच्चारले जात की त्यांचा अर्थ त्यावेळी कळत नसे.मोठे झाल्यावर त्यावर विचार केल्यावर तो शब्द काही वेगळा असल्याचे लक्षात येई.हे खेळ खेळतांना थोड्या वेळाचा विश्राम कुणाला हवा असल्यास तर्जनीला मोडून त्याला जीभ लावून “टॅम्प्लीज...” असे म्हणत.मग तशी कृती   करणा-याला थोडा वेळ मिळत असे. याच शब्दाला मराठीत “थुज्जा” असेही म्हणत.बालवयात “टॅम्प्लीज...” म्हणजे काय ? आणि “थुज्जा” म्हणजे काय ? आणि ते तर्जनी मोडून तिला जिभेने चाटूनच का म्हणतात? हे ब्रह्मदेवालाही विचारले तर सांगता येणे अवघड.याचा शोध कुणी लावला ?,कसा लागला ? ते जाऊ द्या पण तशी प्रथा तेंव्हा सर्वच बालके पाळीत. “टॅम्प्लीज...” म्हणजे “टाईम प्लिज” असते हे सुद्धा कित्येकांना कळलेच नसावे. मराठीतील “थुज्जा” या बाबतचा शोध अजून लागणे बाकी आहे. लगो-या या खेळात लागो-या मांडल्या की त्या रचल्यावर “इस्पेअर...” अशी आरोळी लगो-या रचणारा द्यायचा.तो “स्पेअर” असा शब्द आहे,स्पेअर या शब्दाला “इ” कसा काय चिकटवल्या गेला देव जाणे. ब-याच इंग्रजी शब्दांना “इ” हे बिरूद लागलेले पाहून इंग्रजही चक्रावतील. लगो-यांना फोडण्याने फोडत. खेळता-खेळता चेंडू कधी नालीत जात असे, दोन बोटांनी उचलून मग तो मातीने पुसला की पुन्हा खेळ सुरु.लगो-या लावणा-याला चेंडू पाठीत मारत असत कधी कधी मग नालीतल्या चेंडूचा ठसा पाठीवर घेऊन घरी गेले की घरी खाण्याच्या धपाट्याऐवजी प्रथम पाठीत “धपाटा” मिळे. लागो-या खेळतांना चेंडू नसलाच तर काही अडत नसे पाय लगो-यांचा पर्याय असे. द्स्ती म्हणजे रुमाल,या रुमालाला गाठ बांधून त्याला फेकून तो पकडणे हा खेळ सुद्धा खूप रंगत असे. प्रत्येक खेळाचे वर्णन येथे करू गेल्यास लेखन मर्यादेची अडचण भासेल.तेंव्हा क्रिकेटचा इतका सुळसुळाट  झाला नव्हता,सर्वच मुले क्रिकेट खेळत अशी परिस्थिती नव्हती.वर उल्लेखित विविध खेळ सुद्धा खेळले जात असत.खेळता-खेळता मुले भांडत,पडत, “पडे झडे माल वाढे” असे म्हणत लागलेल्या ठिकाणी माती लावून पुन्हा खेळण्यास तयार होत.आता मुलांचे खेळणे किती कमी झाले आहे.प्रत्येक पालकाला मुलांची काळजी असते परंतू आताशा अतिकाळजीने मुले नाजूक होत आहे त्यांच्यातील खिलाडू वृत्ती आणि सहनशीलता कमी होत आहे.सर्व मुलांसोबत खेळल्याने,बागडल्याने सर्वांगीण शारीरिक आणि मानसिक विकास होतो. टीव्ही, मोबाईल दिवसभर शाळा आणि क्लासेस या सर्व भारामुळे मुलं कशी कोमेजून गेलेली दिसतात.त्यांच्यावर अतिरिक्त भार पडत चालला आहे हे समजूनही त्याला काही पर्यायच राहिला नाही आहे.निव्वळ एखाद्या कारखान्यात कच्चा माल टाकला की पलीकडून पक्का माल तयार तसे आपण आपल्या मुलांना शिक्षणाच्या आणि क्लासेसच्या कारखान्यात भरडत आहोत इतके की त्यांच्या मनात सुद्धा थोड्या विश्रामासाठी “टॅम्प्लीज...” म्हणावे असे आहे परंतू ते कितीका “प्लिज“ म्हणोत ना पालकांजवळ सुद्धा त्यांना जाणून घेण्यास “टाईम” नाही. 

२३/०६/२०१७

Article on Sharad Pawar statement in Pune about King Shivaji and his history


इतिहास मत पुछो ....
     काल पुण्यातील एका कार्यक्रमात आताचे जाणते राजे म्हणवले जाणारे खरे जाणते राजे राजा शिवछत्रपती हे मुस्लिमांचे विरोधी नसून प्रस्थापित राज्याला विरोध करणा-यांच्या विरोधात होते असे बोलले. अफझलखान हा मुस्लीम होता म्हणून त्याचा कोथळा काढला असे नसून तो शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या राज्याला विरोध करणारा होता म्हणून त्यांनी त्याचा वध केला. तसेच पूर्वी शिक्षण देण्याचे काम ज्या विशिष्ट वर्गाकडे होते त्यामुळे त्यांनी हवा तसा इतिहास मांडला असे ते म्हणाले. विशिष्ट वर्ग म्हणजे कुणाकडे इशारा आहे हे काही सांगण्याची आवश्यकता नाही.शिकविण्याचे कार्य कुणाकडेही असो सर्व शिक्षक ईमानेइत्बारे आपले विद्यार्थी घडविण्याचे ध्येय बाळगून असतात. आपल्याकडून काही चुकीचे शिकवले जाऊ नये म्हणून ते अभ्यास करीत असतात. अभ्यास करूनच आपल्या विद्यार्थ्यांसमोर ते प्रकट होत असतात. प्रश्न असा आहे की महाराष्ट्रातीलच काय तर देशातील जनता ज्यांना आताच्या काळातील जाणता राजा म्हणून ओळखते त्या राजाला असली रयतेत भेद करणारी विधाने करण्याचे काय प्रयोजन ? तर याला उत्तर म्हणजे सत्तेपासून दूर राहण्याची आलेली वेळ. सत्तेत असतांना अशा गोष्टी का नाही आठवल्या? हे सर्व आताच का आठवत आहे ? 
शिवाजी राजांनी लहानपणापासूनच ते राजे नसतांना सुद्धा आणि राजे झाल्यावर सुद्धा रयतेत कधी भेदभाव केला नाही. सर्व रयतेला पुत्रासमान मानले तुम्ही उघड उघड रयतेत भेदाभेद करीत आहात. हे जाणत्या राजास शोभेसे नाही. तुम्ही म्हणता की पूर्वी जसे वाटेल तसे इतिहास लेखन केल्या गेले. मग आता जे इतिहास लेखन होत आहे ते सुद्धा स्वत:ला हवे तसेच होत असेल असे सुद्धा होऊ शकते. इतिहास माहीत असावा परंतू त्यातून काहीतरी बोध घ्यावा. तुमच्या म्हणण्याप्रमाणे शिवाजी महाराज जसे त्यांनी स्थापन केलेल्या राज्यासाठी झटले मग तुम्ही का नाही करत काही? शिवाजी राजांनी जसा त्यांच्या स्वराज्याला विरोध करणा-यांचा बिमोड केला तसे तुम्हाला दहशतवाद आणि नक्षलवाद यांचा बिमोड नाही का करावा वाटत ? तुम्ही तर संरक्षण मंत्री सुद्धा राहेलेले आहात ना ! ज्या विशिष्ट वर्गाने पूर्वी इतिहास शिकवला त्यांनी शिवाजींच्या मुस्लीम सहका-यांबद्द्ल सुद्धा शिकवलेच आहे. शहाजी राजे,शिवाजी राजे संभाजी राजे त्यांचे प्रस्थापित राज्य यांच्या विरोधात तर त्यांचे आप्तस्वकीय सुद्धा होते. परंतू आता असे काही म्हटले तर तो चुकीचा इतिहास म्हटला जातो. तसे पहिले तर आताच्या पिढीतील किती विद्यर्त्यांना विद्यार्थ्यांना इतिहासात रस आहे हो ? 95 % विद्यार्थ्यांचा ओढा तर अभियांत्रिकी आणि वैद्यकीय क्षेत्राकडेच असतो. या  विद्यार्थ्यांना इतिहासात काही रस नाही. त्यांना जर शिवाजी महाराजांच्या भावाचे नाव विचारले तर ते सुद्धा येत नाही, राजांच्या आजोबाचे नांव ठाऊक नसते,मग काय करत आहे तुमचे आताचे शिक्षक? या पिढीला तंत्रज्ञान शिकून विदेश गाठायची पडली आहे. त्यांना तुमच्या या फुटीरतावादि राजकारणाचा अगदी वीट आला आहे. येथे मातृभाषा मराठी आणि इतिहासापासून कोसो दूर चाललेल्यांना वीट म्हणजे कंटाळा सुद्धा सांगावे लागेल. आता या गोष्टी सोडा शिवाजी राजे जनतेत फुट पाडणारे राजे नव्हते तुम्ही ज्या अर्थी एका विशिष्ट वर्गाकडे शिकविण्याचे काम होते असे विधान करता ते रयतेत भेद करणारे विधान आहे आणि जाणता राजा रयतेत भेद करणारा नसतो. शिवाजी राजे “गोब्राम्हण प्रतिपालक होते तसेच कुळवाडीभूषण. क्षत्रीय कुलवंतास सुद्धा होते. त्यांनी जसे बेरजेचे राजकारण केले तसे तुम्ही करा रयतेत भेद करणे आता पुरे झाले. इतिहास सोडा किंवा त्यातून चांगले तेवढे घ्या. शिवाजी राजे कुणाच्या विरोधात होते कुणाच्या नव्हते हे सांगण्यापेक्षा त्यांनी रयतेसाठी कसे कार्य केले ते सांगा, आतंकवाद आणि नक्षलवाद यांचा गनिमाकाव्याने काही बिमोड करता येईल का याची योजना आखा राजांनी जशी त्यांची रयत भेदभाव न करता सांभाळली ,राज्य सांभाळले तसे तुम्ही सांभाळा. इतिहास विचारू नका , शिकवू नका त्यातून बोध घ्या. नाहीतर तुमचे ओमर अब्दुल्ला म्हणालेच होते की आता 2019 ची नव्हे तर 2024 ची तयारी करा हे विधान प्रत्यक्षात येईल . 





१५/०६/२०१७

Article about Shivsena's current condition

सेनेने लहान भाऊ श्रीकृष्ण आठवावा 
शेवटी शेतक-यांना कर्ज मिळाले. श्रेय कुणाचे का असोना बोर्ड मात्र लगेच लागले.राज्याच्या तिजोरीवर आता बोजा पडणार.सातवा वेतन आयोग सुद्धा उंबरठ्यावर आलेला आहेच.उत्तर प्रदेश मध्ये कर्जमुक्ती झाल्यावर “लोन” मुक्तीचे लोण सर्वत्र पसरले.शेतक-यांना कर्ज मुक्त करतांना देश आणि राज्यांच्या आर्थिक बाबींना बासनात गुंडाळले गेले.शेतक-यांना कर्ज मुक्त करू नये किंवा त्यांच्या मागण्या पूर्ण करू नये असेही मत नाही.शेतकरी काय तर सर्व जनतेचे हित जोपासणे हे शासनाचे कर्तव्यच आहे.असे हित जोपासण्यासाठीच जनेतेने सरकार स्थापन करण्याची संधी दिली असते.भारतीय लोकशाहीत सत्तेची मधुर फळे चाखण्यासाठी अनेक वेळा विविध विचारसरणी असलेलेले एकत्र आले आहेत आणि त्यांनी सरकार चालवले आहे.यात वरकरणी देशहितासाठी एकत्र आलो असे हे पक्ष दाखवत असले तरी हित कुणाचे होते हे जनता जाणून असते.महाराष्ट्रात सुद्धा “नैसर्गिक मित्र” या नात्याने भाजप व शिवसेना एकत्र आले असले तरी शिवसेना ही सत्तेत राहूनही सतत विरोधी पक्षासारखे वर्तन करीत आहे.महाराष्ट्रातील जनतेला शिवसनेकडून हे अपेक्षित नाही.शिवसेनेने नैसर्गिक मित्र या नात्याने भाजपशी जुळवून घ्यावे असे अनेकांना वाटते.अनेकांनी तसे बोलून सुद्धा दाखवले आहे परंतू शिवसेनेला महाराष्ट्रात तरी मोठ्या भावाचा सन्मान हवा आहे. एखाद्या घरात लहान भाऊ कर्तुत्ववान असतो तर मोठा भाऊ तसा नसतो तेंव्हा मोठ्या भावाला जुळवून घ्यावे लागते. बरे मोठा–छोटा करता करता शिवसनेने भाजप व आतापर्यंत सर्वाधिक लोकप्रिय ठरलेल्या पंतप्रधान नरेंद्र ,मोदी यांच्या वर तोंडसुख घेऊन जनतेची थोड्या प्रमाणात का होईना निराशा केली आहे.एकीकडे “अफझलखानाची फौज” सारखे हिणवून दुसरीकडे केंद्रात व राज्यात त्यांच्याच फौजेत स्थान मिळवले आहे.लोकसभा,विधानसभा आणि मुंबई महापालिकेच्या निवडणुकांच्या वेळी भाजप-सेना यांच्यातील वाकयुद्ध मोठे रंगले होते.या निवडणुका जिंकल्यावर सभागृहात सुद्धा एकीकडे मोदी-मोदी तर दुसरीकडे बाळासाहेबांच्या नावाचा जयघोष असे चित्र सर्वानी पाहिले.नंतर पारदर्शक व्यवहार होतो की नाही यासाठी पहारेकरी तयार झाले आणि महापालिकेचा कारभार सुरु झाला.बाळासाहेबांनी स्थापन केलेल्या सेनेने मराठी आणि हिंदुत्व या मुद्द्यांमुळे एक लोकप्रिय पक्ष म्हणून झपाट्याने प्रगती केलेली सर्वानी पहिली.जात-पात सोडून राजकारण केले अनेकांना शिवसेनेमुळे सत्तेचे गोड फळ चाखावयास मिळाले.परंतू गत दोन वर्षांपासून शिवसेनेची काही तारांबळ उडालेली दिसते.केंद्रात सत्तेत सोबत आहे तरीही केन्द्रावर टीका,राज्यातही तेच मराठा मोर्च्याच्या वेळी संभ्रम तर शेतकरी मोर्चाच्या वेळी एकीकडे सत्तेत आणि दुसरीकडे शेतक-यांसाठी वातानुकुलीत सभा कुठे आंदोलन.सत्तेत सहभागी असूनही स्वत:चे वेगळे अस्तित्व दाखवण्यासाठी शिवसेनेची सतत सुरु असलेली धडपड पाहून शेतकरी आणि जनता सुद्धा चकीत झाली आहे.शेतक-यांनी शिवसेना खासदारांशी बोलतांना सर्व काही उघड केले आहे आणि तसा व्हीडीओ सुद्धा व्हायरल झाला होता.शिवसेना ही आता पूर्वी सारखी मुद्द्यांवर ठाम राहतांना का दिसत नाही?राजीनामे खिशात आहे,भूकंप होईल अशा स्वरूपाच्या पोकळ घोषणा शिवसेनेतील काही नेते का देत असतात? प्रमोद महाजन यांनी एका भाषणात म्हटले होते की,”बाळासाहेब म्हणजे जगातील एकमेव असे नेते आहे की ते एकदा जे बोलले की त्यावर ठाम राहणारे नेते आहेत त्यांनी कधीही ‘मी असे बोललोच नाही’ असे म्हटलेच नाही.त्यांच्या पोटात जे आहे तेच त्यांच्या ओठांवर असते.” महाराष्ट्रातील जनतेला शिवसेना तशीच हवी आहे जशी ती पूर्वी होती.एकेकडे सत्तेची मधुर फळे चाखण्याची मनीषा तर दुसरीकडे सरकार विरोध असे होतांना पाहून सामान्य नागरिक आणि शिवसैनिक सुद्धा चक्रावला आहे.दिल्लीत गेलेले काही नेते तर निव्वळ पोकळ घोषणा देत असतात. मध्यंतरी विमानप्रवासात कर्मचा-याशी हुज्जत घालून त्याला पंचवीस वेळा चप्पल मारल्याची कबुली देणा-या खासदार गायकवाड यांचा किस्सा हा सुद्धा शिवसेनची प्रतिमा मलीन करणारा ठरला.नंतर गायकवाड यांनी लोकसभेत घुमजाव केले.आता जनतेला असे मग्रूर  लोकप्रतिनिधी आवडत नाहीत.आपण भाजपा पेक्षा काही वेगळे आहोत हेच जर सिद्ध करायचे असेल आणि तेही त्यांच्याच सोबत सत्तेत राहून. तर काही निराळा पवित्रा घ्यावा लागेल नाही तर सेनेचेच हसे होत राहणार.केंद्र,राज्य,महापालिका सर्वच निवडणुकांत व इतरवेळी सुद्धा दोन्ही पक्षांनी रामायण महाभारत यांमधील पात्रांचे दाखले देऊन एकमेकांवर कुरघोड्या करण्याचे काम केले परंतू आधी सांगितल्याप्रमाणे कधी कधी कनिष्ट बंधू सुद्धा कर्तुत्ववान असू शकतो महाभारत,इतर ऐतिहासिक दाखले सतत देतांना शिवसेना हे विसरली की भगवान श्रीकृष्ण बलरामाचे लहान भाऊ होते तरी मान मात्र सतत श्रीकृष्णाला मिळत गेला.यात बलरामाने कुठे कमीपणा मानला नाही. शिवसनेने सुद्धा जनमताचा आदर करावा,आदर्श विचारसरणी असल्याचे दाखवणा-या व जनतेने सुद्धा आदर्श राहावे असे व्हँलेंटाइन डे व इतर भारतीय संस्कृती अथवा सणांबाबत भाष्य करणा-या शिवसनेने स्वत: सुद्धा राजकारणात आदर्श असल्याचे दाखवावे.आपल्या मावळ्यांना शिवसेनेच्या धनुष्यातून शाब्दिक बाण सोडणे कमी करायला लावावे आणि आगामी निवडणुकांत स्वबळावर सत्तेत यावयाचे असेल्यास त्या निवडणुकांची तयारी बलरामानुज श्रीकृष्णासारखे  राजकारण करून व त्याच्यासारखीच आदर्श वागणुकीने करावी व मोठ्या भावाचे स्थान पुनश्च प्राप्त करावे. 

०८/०६/२०१७

Story of Drugs Addiction.... A Brilliant student got addicted by drug and now in Police custody

नशा करी दुर्दशा 
      नशेमुळे अनेक कुटुंबाची वाताहत झाली आहे, जीव गेले आहेत. नशेच्या धुंदीत बुद्धी भ्रष्ट होऊन  भलतीच कृत्ये सुद्धा अनेकांकडून घडली आहेत. महाभारतात युधिष्ठीरास सुद्धा दयुताच्या नशेत गेल्यावर सर्वस्व डावावर लावावे लागले. शेवटी काही उरले नाही म्हणून मग स्वत:चे भाऊ आणि पत्नीला सुध्दा त्याने डावावर लावले. तो हरला आणि मग पुढचे महाभारत घडले. जे सर्वांना ज्ञात आहेच. आज-काल रामायण महाभारतातील कथा अनेकांना भाकड कथा वाटायला लागल्या आहेत.  त्या कथांना क्षणभर भाकडकथा असे जरी मानले तरी त्या कथांमधील घटनांची साक्ष देणारे काही पुरावे आजही सापडतात शिवाय या कथांतून अनेक दाखले, उपमा आजही देता येतात आणि लिखाण, अध्यापन करतांना उपमा देणे तर आवश्यकच आहे. कालीदास इतक्या सुंदर उपमा देत असे की “उपमा कालिदासस्य” अशी म्हणच रूढ झाली. उपमा देण्यासाठी म्हणून या कथा नितांत उपयोगी आहेत. म्हणून मग गर्वाबाबत बोलतांना हनुमानाने केलेले भीमाचे गर्वहरण आठवते. मोह झाल्यावर सीता कशी सुवर्णमृगाच्या मोहात पडून नंतर रावणाच्या ताब्यात गेली होती हे आठवते. व्यंगावरून कुणाचा अपमान करू नये हे द्रोपदीने दुर्योधनाच्या केलेल्या अपमानामुळे आठवते. म्हणूनच आज नशेमुळे घडलेल्या एका घटनेमुळे युधिष्ठीराचे द्युत व्यसन आठवले. बुद्धिमान युधिष्ठीराच्या दयुताच्या नशेची आठवण होण्याचे कारण म्हणजे काल एका युधिष्ठीराप्रमाणे बुद्धिमान तरुण विद्यार्थ्यांचं उज्ज्वल भविष्य व्यसनामुळे कसे उद्धवस्त झाले ही मुंबईत घडलेली घटना. अंधेरी पूर्व परिसरात राहणा-या व व्यवसायाने डॉक्टर असलेल्या ओमप्रकाश सिंग यांच्या जयकिशन या विज्ञान शाखेत गुणवत्तेचा उच्चांक गाठ्लेलेया मुलाला काल वाहनचोरी प्रकरणात अटक झाली. आता हा गुणवंत विद्यार्थी वाहनचोरी प्रकरणात कसा काय अडकावा? वाहनचोरी करण्याचे कारण म्हणजे हा जयकिशन नशेच्या जाळ्यात अडकला होता. त्याला अमली पदार्थ अर्थात ड्रग्जचे व्यसन जडले होते. हे व्यसन पूर्ण करण्यासाठी पैसे हवेत म्हणून मग दुचाकी लंपास करायची व OLX या संकेतस्थळावर ती दुचाकी विकायची आणि आपली व्यसनाची गरज भागवायची. जयकिशन हा महाराष्ट्रातील बारावीच्या विज्ञान टॉपरपैकी एक असून त्याला 2015-16 मध्ये बोर्डाच्या परीक्षेत 98.50% गुण मिळाल्याचा दावा, त्याच्या पालकांनी केला आहे. जयकिशन ओमप्रकाश सिंग गाडी चोरुन ती निर्जनस्थळी ठेवायची. त्यानंतर त्याचा फोटो काढून तो ओएलएक्सवर शेअर करायचा आणि ती विकायची, अशी त्याची कार्यपद्धती होती. अंधेरीच्या एमआयडीसी पोलिसांनी त्याला पकडले. तपासात त्याला “बटन” नावाच्या ड्रग्जचे व्यसन जडले होते हे समजले. व्यसनामुळे गुणवंतांच्याही जीवनाची कशी वाताहत होते हे पुन्हा एकदा निदर्शनास आले आहे. विद्यार्थी मित्रांनो सुरुवातीचा एक झुरका किंवा एखादा घोट हळू- हळू वाढत जाऊ देऊ नका. पालकांनी सुद्धा आपल्या पाल्यांच्या केवळ गरजा पूर्ण केल्या म्हणजे जबाबदारी संपली असे समजू नये. मान्य आहे आज-कालचे जीवन धकाधकीचे आहे परंतू त्यातून थोडा वेळ तरी आपल्या प्रिय पाल्यांना द्या. पौगंडावस्थेतील पाल्यांकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. एक व्यसन तर सर्वांना जडले आहे ते म्हणजे भ्रमणध्वनी वापरण्याचे. आताची मुले कुणाकडे गेली तर बोलण्याऐवजी केवळ मोबाईल मध्ये मान टाकून असतात. या मोबाईल मधून सुद्धा त्यांना “अतिशय” ज्ञानप्राप्ती होत आहे. त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष असणे जरुरी आहे, त्यांना मित्र बनवून समजावणे जरुरी आहे. आज जयकिशन  सिंगचे जीवन ज्याप्रमाणे नशेमुळे बिघडले आहे तसे इतर कुणाचेही न बिघडो. जयकिशन सुद्धा यातून पुन्हा एकदा बाहेर येवून यशाचे शिखर गाठो ही सदिच्छा

०१/०६/२०१७

Some people beaten Lord Hanuman picture ...artile related to that

 बल,बुद्धी, विद्या देहु ...   
     घारीने दशरथाच्या राणीच्या हातावरील प्रसादाचा काही भाग उचलून नेला आणि तो भाग अंजनी वानरीच्या हातात पडला. अयोध्येत दशरथाच्या घरी चार पुत्र जन्मले आणि तिकडे अंजनीच्या पोटी सुद्धा एक बाळ जन्मले जे सूर्याला एक फळ समजून जन्मल्या बरोबर सूर्याकडे झेपावले. कारण हे बाळ म्हणजे काही साधे सुधे बाळ नव्हते “चपळांग पाहता मोठे महाविद्यूलतेपरी” असे ते चपळ होते.त्या बाळाने सूर्याला फळ समजले होते आणि त्याला खाण्यासाठी म्हणून ते वानरीचे बाळ गेले देवलोकात हाहाकार झाला. या वानराच्या पिल्लाने कधी जगाला प्रकाशित करणा-या सूर्याला गिळंकृत केले तर सर्वत्र अंध:कार होईल,जग बुडेल. देव चिंताग्रस्थ झाले. हनुमान सूर्याच्या अगदी जवळ आला तेंव्हा इंद्राने त्याच्यावर त्याचे आयुध वज्र फेकले, ते त्या शिशु वानराच्या हनुवटीवर लागले. शिशु पुनश्च पृथ्वीवर आला परंतू त्याच्या हनुवटीवर वज्राचा आघात झाल्याने त्याच्या हनुवटीचा आकार बदलला आणि तेंव्हापासून या शिशु वानरास हनुमान म्हणून ओळखले जाते. आता ही आख्यायिका म्हणा की थोतांड म्हणा परंतू संपूर्ण भारतात सर्वाधिक लोकप्रिय देवता कुणी असेल तर ती म्हणजे वनारी सुत हनुमान. उत्तरेत गोस्वामी तुलसीदास तर महाराष्ट्रात संत रामदास यांनी ‘हनुमान चालीसा’ आणि ‘ हनुमान स्तोत्र’  अशी काव्ये रचली आहेत. अनेक गीते लिहिल्या गेली आहेत. हनुमंताची मंदिरे भारतात सर्वदूर आढळतात. “अणूपासून ब्रह्मांडा एवढा होत जात असे” असे समर्थांनी वर्णन केले असल्याने कुठे छोटी तर उठे भव्य अशा या भीमरूपी महारुद्राच्या मूर्ती आढळतात. तुलसीदासाने या रामदूताचे अतुलितबलधामा,ज्ञानगुणसागर असे वर्णन केले आहे. ‘कुमती निवार सुमती के संगी” दुष्ट बुद्धीचा नाश करणारा म्हटले आहे. परंतू परवा काही लोकांना अशी काय ‘कुमती’ झाली की त्यांनी अशा हनुमंताच्या चित्रावर जोडे हाणावे? हनुमंताच्या चित्रावर चपला-जोडे मारण्याचा व्हीडीओ माध्यमांमध्ये प्रसारित झाला होता. तो कितपत खरा आहे हे समोर येईलच व त्याची सत्य-असत्यता पडता ळून पहिली जाणारच आहे परंतू आपला देश सर्व धर्मियांचा आदर करणारा देश आहे ना ! मग असे का घडले ? ज्यांनी ज्यांनी हा व्हीडीओ पहिला त्या सर्वांना यातना झाल्या. आपल्या देशात लोक असे का वागत आहे ? माध्यमांसमक्ष हनुमंताच्या तसवीरीस जोड्याने मारणे, गाय कापणे यात कोणती मर्दुमकी आली ? मर्दुमकी गाजवायची असेल तर सीमेवर जावे आणि पाकडयां विरोधात नाही लढून निदान बोलून तर दाखवावे. हनुमानाच्या मूर्तीवर जोडे मारण्यापेक्षा नवाज शरीफ किंवा एखाद्या अतिरेक्याच्या , फुटीरतावाद्यांच्या चित्रावर जोडे मारा किंवा एखाद्या कट्टर धर्मियांच्या धार्मिक वास्तू किंवा चित्रावर वार करून दाखवा ना ! हे असे घडते कारण तुम्हाला माहीत आहे की काही होत नाही, अटक झाली तर लगेच जमानत आहे. कायदा सौम्य मग काय काहीही करा. प्रभू रामाने सुद्धा ज्याचा “पुरुषोत्तम” म्हणून उल्लेख केला आहे ज्या हनुमंताच्या तसवीरीवर तुम्ही प्रहार करण्यात कोणते शौर्य आहे?  तुम्ही त्याच्या तसवीरीवर प्रहार करण्यापूर्वी तो कसा ‘जीतेन्द्रीय” आहे “बुद्धीमतांमध्ये वरिष्ठ” आहे हे आठवा. त्याच्या तसविरीवर प्रहार काय करता त्याने स्वत: प्रत्यक्ष इंद्राच्या वज्राचा प्रहार झेलला आहे. तुम्ही तुमची जात आणि धर्म घरात देवून मग बाहेर निघत जा व घराच्या बाहेर निघाले की केवळ भारतीय अशी भावना वृद्धिंगत करा.अजून किती दिवस असे खुळचट उपद्व्याप करणार आहात ? तुम्हाला ज्यांनी मुख्य प्रवाहात आणले ते यासाठीच आणले का ? तुम्ही त्यांचे नाव घेऊन त्यांचे फलक घेऊन असली कृत्ये करत असला तर त्यांच्या आत्म्याला सुद्धा स्वर्गात दु:ख होत असेल. तुलसीदास या केसरीनंदन , तेज्प्रतापी हनुमंताजवळ “बल बुद्धी विद्या देहु मोहे” अशी याचना करतात. तसवीरीला जोडे मारणा-यांनो तुम्हाला हा विद्यावान गुणी, अतीचातुर बल, विद्या देवो किंवा न देवो परंतू बुद्धी मात्र अवश्य प्रदान करो हीच त्याच्याजवळ प्रार्थना.