३१/१०/२०१८

Article on the occasion of inauguration of "Statue of Liberty" of SArdar Patel in Gujrath, India


पुतळ्याप्रमाणेच राष्ट्राभिमान सुद्धा उंचावला
आज गुजराथ राज्यात , केवडीया गांवात सरदार वल्लभभाई जवाहरभाई पटेल यांच्या “स्टॅच्यू ऑफ युनिटी” अर्थात एकतेचे प्रतिक असलेल्या भव्य दिव्य पुतळ्याचे मा.पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. भारताच्या स्वातंत्र्यानंतर देशातील छोटी-मोठी संस्थाने भारतात विलीनीकरण करून घेण्याचे महत्कार्य सरदार पटेलांनी केले आहे. हैदराबादच्या नबाबाच्या रजाकारांनी अत्याचार, अन्यायाचा गदारोळ माजविला असतांना सरदार पटेल यांनी घेतलेल्या कणखर भूमिकेमुळेच हैद्राबाद, जुनागढ इ. अनेक संस्थाने भारतात विलीन झाली. पटेलांच्या देशहिताच्या निर्णय क्षमतेमुळेच त्यांना लोहपुरूष ही उपाधी सुद्धा मिळाली. सरदार पटेल स्वतंत्रता लढ्यात होते, गांधी नेहरूं प्रमाणे ते सुद्धा बॅरिस्टर होते. पंतप्रधान बनण्यास सक्षम, योग्य व अनेकांची सहमती असलेले नेते होते.परंतू दुर्दैवाने तसे झाले नाही. स्वातंत्र्योत्तर काळात सरदार पटेल यांचे कार्य म्हणावे तेवढे जनतेपर्यंत पोहोचलेच नाही. सरदार पटेल जयंती , पुण्यतिथी कधी असते हे सुद्धा अनेकांना आजरोजी पावेतो महित नव्हते. इतकेच काय तर काही वर्षांपूर्वी गुजराथ राज्यातच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना “सरदार पटेल कोण होते ?” असा प्रश्न एका वृत्त वाहिनीने विचारला असता अनेकांना त्याचे उत्तर सुद्धा देता आले नव्हते. संस्थानांचे विलीनीकरण, तत्कालीन सरकारचे पाठबळ नसतांनाही सोरटी सोमनाथ मंदिराचा केलेला जीर्णोद्धार अशी कार्ये पटेलांनी केली आणि आपली लोहपुरूष ही उपाधी सार्थ केली. अशा महापुरुषाच्या  जगातील सर्वात उंच पुतळ्याचे अनावरण होत आहे. या निमित्ताने देशातील जनतेला पटेल यांचे कार्य, त्यांची दूरदृष्टी,त्यांचे देशप्रेम,त्याग अवगत होणार आहे, प्रेरणादायी ठरणार आहे. सरदारांनी संस्थाने विलीन करून देशात एकता वृद्धिंगत केली परंतू आज प्रांतवाद उपस्थित करणा-या काही लोकांनी हे जाणून घ्यावे की लोकमान्य टिळकांच्या स्वराज्य फंडात मोठी रक्कम पटेलांनी गुजराथ राज्यातून उभारली होती. तसेच पटेलांचा हा सर्वात उंच पुतळ्याचे शिल्पकार श्रीराम कृष्ण जोशी यांचे शिष्य 93 वर्षाचे मूर्तिकार राम सुतार व त्यांचे पुत्र अनिल सुतार हे मुळचे महाराष्ट्रातील धुळे शहरानजीकचे आहेत. त्यांनी या पुतळा निर्मितीसाठी प्रंचड मेहनत केली आहे. पुतळा अनावरण प्रसंगी उभारण्यात आलेल्या सेटचे निर्माते नितीन देसाई हे सुद्धा मुंबईचेच. तेंव्हा सद्यस्थितीत मतांच्या समीकरणासाठी प्रांतवादाचे मुद्दे, वक्तव्ये करणा-या नेत्यांनी या देशाची एकता, अखंडता यासाठी झटलेल्या पटेलांचे सदोदित स्मरण ठेवावे. जगातील सर्वात उंच असलेल्या सरदार पटेलांच्या या स्मारकामुळे जगात देशाची आणखी एक ओळख निर्माण झाली आहे. या स्मारक ठिकाणी , संग्रहालय , पुतळ्यात लिफ्ट , प्रदर्शन हॉल, फुलांची घाटी हे सर्व असल्याने पर्यटनास मोठी चालना मिळणार आहे तसेच सरदार पटेलांनी गाठलेल्या मोठया उंचीमुळे निर्माण झालेला त्यांचा जगातील सर्वात उंच पुतळा हा भारतातील नागरीकांचा राष्ट्राभिमान नक्कीच उंचावणार ठरेल. 

२५/१०/२०१८

Article on meeting with renowned Mr Achyut Godbole, a writer and techno savvy


भेट किमयागाराची
     नव्वदच्या दशकाची अखेर असतांना नुकतेच संगणक प्रशिक्षण घेणे सुरू केले होते. घरी दै. लोकसत्ता होता. त्यात तंत्रज्ञान, संगणक यांबाबतचे एक माहीतीपूर्ण असे सदर प्रकाशित होत असे. हे  सदर अच्युत गोडबोले हे लेखक लिहीत असत. त्यांच्या लेखनाने मोठा प्रभाव टाकला. त्यांच्या सहज, सोप्या लेखन शैलीने तंत्रज्ञान, संगणक या बाबी स्पष्ट करण्यानेच  कदाचित संगणक व तंत्रज्ञाना  बाबत अधिकच आकृष्टता निर्माण झाली. त्यामुळे अच्युत गोडबोले यांचे लेख वाचत गेलो. त्यातील काही लेखांची कात्रणे आजही आहेत. त्यानंतर त्यांचे “बोर्डरूम” पुस्तक वाचले. कार्पोरेट जगत, कंपन्यांच्या जनमकथा, उद्योजकांचा झपाटलेपणा या सर्व कथा वाचकांना मोठ्या प्रेरणादायी ठरल्या व आजही आहेत. पुढे गोडबोले यांचे अनेक लेख वाचनात आले. त्यांची अधिक माहीतीही मिळत गेली.त्यांच्या लेखणीने व ज्ञानाने भारावून टाकले. गोडबोलेंची लिहिलेली पुस्तके चीन मधील विद्यार्थ्यांना क्रमिक अभ्यासासाठी आहेत अशीही माहीती मिळाली. संगणक,संगणकाचा इतिहास,संगीत,इतिहास अशा कितीतरी विषयांवर प्रभुत्व निर्माण करणारी त्यांची विलक्षण बुद्धिमत्तेने सर्व वाचक,ज्ञानोपासकांना प्रभावित करून सोडणारी आहे. बुलडाणा जिल्हा वासीयांचे भाग्य थोर की दि 21 ला अच्युत गोडबोले हे एका व्याख्यानाच्या निमित्ताने बुलडाणा येथे आले होते. तेथील व्याख्यानात त्यांनी फेसबुक,व्हॉटस र्अ‍ॅप, नवीन “युज अँड थ्रो“ विचारसरणीची पिढी, वाढते मानसिक आजार अशा आशयाचे त्यांच्या व्याख्यानाचे वृत्त वर्तमानपत्रात वाचून होते न होते तोच भ्रमणध्वनी खणाणला. तो घेतला तर जेष्ठ बंधू विचारते झाले “अरे मुक्तेश्वर कुळकर्णी यांचेकडे अच्युत गोडबोले येणार आहे, तू येतो का भेटीला?” ज्यांचे लेख, पुस्तके वाचली अशा 1972 मध्ये केमिकल इंजिनियर ही पदवी प्राप्त केलेल्या थोर लेखकाला तसेच पीसीस, एल अ‍ॅंड टी इ कंपन्यांत मोठी पदे विभूषित केलेल्या तसेच त्या कंपन्यांच्या उभारी मध्ये मोठा वाटा असलेल्या अच्युत गोडबोलेंना आपल्याच लहान गावात आयतीच चालून आलेली संधी सोडणारा अभागी कुणी विरळाच असेल. त्यामुळे बंधूंच्या प्रश्नाला त्वरीत होकार भरला व मुक्तेश्वर कुळकर्णी यांचेकडे वेळेत उपस्थित झालो. दिलेल्या वेळेवर लाल कुर्ता व पायघोळ पायजामा परीधान केलेल्या अनेक प्रथितयश पुरस्कार प्राप्त व किमयागार,संगणक युग,बोर्डरूम, नादवेध,गणिती,जिनीयस या पुस्तकांचे लेखक अच्युत गोडबोलेंचे आगमन झाले. त्यांना भेटण्यासाठी शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य प्रभूणे सर , तेथील व्याख्याते मंत्री सर, नॅशनल हायस्कूलच्या प्राचार्य प्रविणा शहा मॅडम, पोलिस अधिकारी वाकडे मॅडम, देशोन्न्तीचे संपादक राजेश राजोरे, संस्कृती संवर्धन प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच  इतर अनेक अभ्यासू व गोडबोले यांच्या पुस्तकांचे वाचक आवर्जून उपस्थित होते.याप्रसंगी गोडबोले यांच्याशी ग्लोबल वॉर्मिंग,सोशल मिडीयाचा होणारा चुकीचा व अतिरेकी वापर,वाचन,पुस्तके, यांबाबत तसेच “बखर संगणकाची” व चंगळवाद या विषयावरचे पुस्तक अशा आगामी पुस्तकांबाबत चर्चा झाली. गोडबोले यांची मृदूभाषा,साधी राहणी,विंनम्रता उपस्थितांना खूप भावली व अशा या किमयागार लेखकाच्या भेटीच्या स्मृती घेऊन त्यांचा निरोप घेतला.        

१७/१०/२०१८

Article on "Rajabhau", a food hawker of times in Balaji polt and some areas of Khamgaon, Maharashtra

“आज खाये दहीवडे ssssss”
  माणसाला देवाने दिलेली सर्वात मोठी देणगी म्हणजे विसरण्याची. वाईट गोष्टी विसरणे आणि जीवनक्रम व्यतीत  करणे हे जरी खरे असले तरी अनेक चांगल्या, वाईट स्मृती प्रत्येक व्यक्ती मनात जपतच असतो. बालपणीच्या मनावर कोरलेल्या अनेक घटना, अनेक व्यक्ती  ह्या प्रत्येकाच्याच स्मरणात असतात. असाच एक व्यक्ती, एक फेरीवाला आजपासून 30-35 वर्षांपूर्वी व त्याही आधीपासून खामगांव शहरांत दररोज खाद्य पदार्थ विक्री करीता येत असे. त्या काळी खामगांव आजच्या इतके विस्तारीत नव्हते. आज जितक्या खाद्य पदार्थांच्या गाड्या खामगांवात दिसतात तेवढ्या त्या काळात नव्हत्या. त्या काळात रुचीपालटाकरीता खामगांवकर याच एका फेरीवाल्यावर निर्भर होते. काळी टोपी,धोतर,सदरा घातलेल्या त्या व्यक्तीचे वय तेंव्हा 65 ते 70 च्या घरात असावे. संध्याकाळी “आज खाये दहीवडे ssssss” असली काहीतरी दात नसलेल्या तोंडाच्या बोळक्यातून त्याची आरोळी ऐकली “राजाभाऊ आले“ हे लोकांना समजायला वेळ लागत नसे. त्वरीत त्यांच्याभोवती लोक, लहान मुले गोळा होत व पाणी पुरी, दहीवडे व इतर अनेक पदार्थांचा स्वाद घेत असत.एक फेरीवाला व त्याचे नांव राजाभाऊ एवढेच काय ते त्या माणसासोबतचे नाते.परंतू आजही तो स्मरणात का असावा? हे एक कोडेच आहे. परंतू  कालपरत्वे राजाभाऊंचे येणे बंद झाले. त्यांचे न येण्याचे कारण काय हे कधी कुणाकडून ऐकले नाही किंवा बालवयात राजाभाऊ का येत नाही ? याची चौकशी करण्याचे कधी मनांतही आले नाही. रक्ताचे नाते असलेले कुटुंब असते आणि  मित्र, दैनंदिन परिचित फेरीवाले,परीट,भाजीवाले,चप्पल दुरुस्त करणारे, घरगुती सेवक, आपले पाळीव पशू  यांचा  समावेश असलेला तो आपला परिवार असतो. असे सरसंघचालक मोहनजी भागवतांनी खामगावच्या सभेत सांगितले होते. परंतू परिवारातील या लोकांची आपण दाखल ती काय घेतो?आपल्या परिवारात असलेल्या या वरील लोकांना आपण किमंत ती काय देतो? विविध प्रसंगी आपणास त्यांचे स्मरण सुद्धा होत नाही. राजाभाऊंचे सुद्धा तसेच झाले. ते सुद्धा एक दैनंदिन परिचयाचे फेरीवाले होते. आपल्या आपल्या परिवारातील होते. परंतू एका फेरीवाल्याचे येणे बंद झाल्याने कुणाला काही फरक पडला नाही. राजाभाऊ कुठे गेले, ते का येत नाही?याची कुणी चौकशी केली की नाही देव जाणे? कुणी चौकशी केलीही असेल तर ती बहुतांपर्यंत मात्र नक्कीच पोहोचली नव्हती.राजाभाऊ कोण होते,कुठले होते,जात काय, धर्म काय,आडनांव काय? हे आज खामगांवातील तत्कालिन तरुण आणि सध्याचे जेष्ठ नागरिक यांना सुद्धा ठाऊक नाही. जात- धर्म तर ठाऊक असण्याचे काही कारणही नाही.तसे राजाभाऊ हे काही फार मोठेही नव्हते, किंवा काही उल्लेखनीय सामाजिक कार्यकर्ते वगैरे सुद्धा नव्हते.परंतू जिभेवर साखर ठेऊन सचोटीचा व्यवसाय करणारे होते.केवळ व्यवसायच नव्हे तर त्यांच्या ग्राहकांची संतुष्टी होईल हा सुद्धा त्यांचा खाक्या होता.म्हणूनच त्यांचे स्मरण झाले किंबहुना दहीवडे खातांना हमखास होते.खात्री आहे की खामगांवकर समवयीन व जेष्ठांना सुद्धा तसे होत असावे.तसेच प्रेरणा घेण्यासाठी नेहमीच काही नावाजलेल्या,फार मोठ्या व्यक्तींची गरज नसते.प्रसंगी एखादा ‘कॉमन मॅन’ सुद्धा प्रेरणादायी असतो. राजाभाऊ हे असेच प्रेरणादायी ‘कॉमन मॅन’ होते. साठी उलटल्यावरही कार्यरत राहणे,व्यवसायात सचोटी,लहान-थोर सर्वांशी आपुलकीने, प्रेमाने बोलणे अशी राजाभाऊंची वागणूक सुद्धा नक्कीच प्रेरणादायी होती. आज चुटकीसरशी सर्व हाजीर होते, दोन मिनटात मॅगी, ऑर्डर दिल्यावर पिझ्झा त्वरीत हजर होतो परंतू त्याला “आज खाये दहीवडे ssssss” अशी आरोळी देऊन जरी व्यवसाय करीत असले तरी आपुलकीने खाऊ घालणा-या राजाभाऊंच्या दहीवडे व इतर पदार्थांची सर मात्र नाही.

११/१०/२०१८

Visited Dnyanganga Wildlife Sanctuary, Botha Dist Buldana, Maharashtra on the occasion of Wildlife week 2018

“रमणीय ज्ञानगंगा अभयारण्य”
     बुलढाणा व खामगांव या दोन 
शहरांच्या मध्यभागी ज्ञानगंगा अभयारण्य वसले आहे. बुलडाणा या जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्यास हाच सोयीचा रस्ता असल्याने कित्येकदा तरी या अरण्यातून येणे-जाणे झाले आहे. याच रस्त्यावर कित्येकदा बिबट,हरीण,नीलगाय,रोही,तडस यांनी दर्शन दिले आहे व त्या स्मृती आजीवन स्मरणीय केल्या आहेत. या जंगलात जाण्याचा योग मात्र कधी आला नव्हता. नाही म्हणायला देव्हारी जवळील गणेश तलाव, अस्वलीचा खोरा,चिंचीचा खोरा असे खामगांव-बुलडाणा रोडच्या लगतचा भाग तेवढा पहिला होता. 5 ऑक्टोबर रोजी मात्र वन्यजीव सप्ताहाच्या अनुषंगाने या जंगल सफारीचा योग आला. आजोबा नानासाहेब हे त्यांच्या काळात सरकारी परवानाधारक शिकारी, तसेच डिंकाचे व्यावसायिक असल्याने जंगलांचे ठेके घेत असत. लहानपणी त्यांनी सांगितलेल्या
जंगलातील गोष्टी, घरी पाळलेले मोर, हरीण, अस्वल या सर्वांमुळे वन्यजीव, वनसंपदा यांचे वेड आहेच. त्यामुळे उत्साहाने या सफारीसाठी निघालो. अगदी प्रवेश करतांनाच वनविभागाने ज्ञानगंगा अभयारण्याच्या आकर्षक स्वागत कमानीवर “मानवाच्या जगण्यासाठी- जंगल,प्राणवायू,पाणी,प्राणी “ असे लिहिलेले समर्पक वाक्य दृष्टीस पडले. अन्न, वस्त्र, निवारा यासोबतच वन्यजीव व जंगले ही सुद्धा मानवी जीवनासाठी आवश्यकच आहेत.परंतू मानव मात्र त्याच्या स्वत:च्या स्वार्थासाठी वन्यजीवांच्या हक्काच्या जंगलांवर अतिक्रमण करीत आहे, वृक्षतोड करीत आहे. परंतू जर का एखादा वन्यजीव शहरात आला तर त्याचा ठपका प्रशासनावर ठेवत आहे. या विचारात आमची चारचाकी मोटार नक्षत्र वनात प्रवेशित झाली. स्वागतास व आमच्या सफारीच्या नियोजनास मन:पूर्वक सहकार्य करणारे वनविभागाचे श्री गोरे तेथे पूर्वीच येऊन पोहोचले होते.त्यांची भेट झाल्यावर उभयता अधिकच आनंद झाला कारण आम्ही गो.से. महाविद्यालयात एन.सी.सी., शिबीर यात बरेच बराच मैत्रीपूर्ण काळ व्यतीत केला होता त्या आठवणी निघाल्या. आजकालचा अत्यावश्यक असा फोटोसेशनचा सोपस्कार झाला. भोजनांती पलढग धरणाकडे निघालो, आमच्या सोबत मेळघाटचे STPF चे महिला वनरक्षक पथक व वनविभागाची गाडी होती. माझ्या जंगलाच्या आवडीने मला आमच्या गाडीतून वनविभागाच्या गाडीत बसण्यास भाग पाडले. त्या गाडीत बसलो. सोबत वनरक्षक शारदा कसबेकर ,विलास दारशिम्बे इतर वनरक्षक व वन कर्मचारी होते. धरण येईतो त्यांच्याशी वन्यजीव, वृक्ष यांबाबत माहितीपूर्ण चर्चा झाली. मानवी हल्ल्याच्या बाबतीत सर्वात बेभरवशाचा प्राणी अस्वल असल्याचे त्यांच्याकडून समजले. रेंज फॉरेस्ट ऑफिसर श्री डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करीत असतो हे सुद्धा त्यांनी आवर्जून कथन केले. ही चर्चा सुरु असता कुठे काही प्राणी दिसतो का हे पाहण्यासाठी म्हणून नजर मात्र जंगलात खिळलेली होती. हे हेरून “आता काही दिसणार नाही,कारण तुम्ही जंगलात उशिरा दाखल झाले” असे वनरक्षकाचे शब्द कानी पडले. नागमोडी जंगली वाटेतून बळीराम भाऊ हे चालक निष्णातपणे गाडी चालवत होते. गाडी “फोर व्हील ड्राइव्ह” असल्याचे त्यांनी सांगितले. गाडी धरणाजवळ थांबली. धरणापासून ते एका कुटी पर्यंत पायी गेलो रस्त्यात अनेक झाडे, वन्यप्राण्यांच्या अस्तित्वाच्या खुणा दिसल्या. मुख्यत: साग व शिसम असलेल्या या जंगलात मोह,बेहडा,अंजन अशी भली मोठी वृक्ष दिसली. येथेच एका वृक्षाच्या छायेत विसावलो असता गौतम बुद्ध,समर्थ रामदास व अनेक ऋषी मुनींचे स्मरण झाले.त्यांच्या ज्ञान संपादनात,त्यांच्या तपश्चर्येत,त्यांच्या तत्त्वज्ञानात,त्यांच्या लेखणीत नक्कीच अरण्यातील ही नीरव शांतता सहाय्यकारी ठरली असल्याची जाणीव झाली. नोबेल पुरस्कार विजेते रवींद्रनाथ टागोर हे सुद्धा निसर्गातच वावरले होते. शांतीनिकेतन येथे आजही निसर्ग सानिध्यातच ज्ञानदान होते. आपण मात्र आपल्या पुढच्या पिढीला सिमेंट कॉंक्रीटच्या जंगलातच बंदिस्त करीत आहोत, बंदिस्त जागेत शिक्षण देत आहोत, त्यांना म्हणावे तेवढे निसर्गजवळ नेतच नाही. केवळ वृक्षारोपण करून तेवढे साध्य होणार नाही. निसर्ग शिबीर,अरण्ये भेटी आदी उपक्रम सुद्धा राबवणे जरुरी आहेत. त्याने नवीन पिढीला सुद्धा निसर्ग, वने, वन्यजीव यांचा लळा लागेल. वृक्षवल्ली, वनचरे ही आपली सोयरे आहेत,सहचरे आहेत अशी संतवचने काय उगीच आहेत? या विचारात मग्न असतांना गाडी उर्वरीतांना घेऊन आली. गाडीच्या आवाजाने तंद्री भंग झाली. परतीचा प्रवास सुरु झाला अदयाप वन्यजीव मात्र काही दृष्टीस पडला नव्हता. विद्यार्थ्यांना एखादा तरी वन्यजीव दिसावा असे मला वाटत होते तेवढ्यात एक नीलगाय गाडी समोरून पळत गेली. नीलगाय दर्शनाने प्रवासाचा सर्व क्षीण त्या नीलगायीच्या सारखाच धूम पळून गेला व त्या मुक्त वन्यजीव दर्शनाने सर्व सुखावले.मुक्त वन्यजीव दिसणे हे सुद्धा एक भाग्याचेच लक्षण असते. आपल्या शहरासमीप इतके सुंदर अभयारण्य आहे हे आपण आपले भाग्य आहे. तेथे सहकुटुंब भेट द्यावी. भेट देतांना जंगलात कुठेही प्लास्टिक, कचरा होणार नाही किंवा वन्य प्राण्यांना हानी होईल असले काही प्रकार,गोंगाट,गाणी वाजवणे हे प्रकार टाळावेत.अभयारण्याच्या स्वागत कमानीवरचे “मानवाच्या जगण्यासाठी-जंगल,प्राणवायू,पाणी,प्राणी” हे वाक्य सदैव स्मरणात ठेवावे.

०४/१०/२०१८

Article about showing simple living of political leaders


पात्र प्रक्षालनाने पाप प्रक्षालने होतील का ?
रवा महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री या दोन साधी जीवनशैली अंगिकारलेल्या महान नेत्यांची जयंती देशाने साजरी केली. महात्मा गांधींची ही 150 वी जयंती होती.
“वैष्णव जण तो तेणे कहिये जे पीड परायी जाणे रे”
नरसी मेहता रचीत या आपल्या आवडत्या भजनानुसार गांधीजीनी पर दु:ख़ जाणून साधी राहणी अंगीकारली. उन,वारा,थंडी,पाऊस असे बारा महिने तेरा त्रिकाळ गांधीजी केवळ पंचा नेसूनच आजन्म वावरले. आश्रमात साफ सफाई, बकरीचे दुध, साधे जेवण, साफ सफाई अशी जीवनशैली ठेवत बापू साधेपणा अक्षरश: जगले. स्वतंत्रतापूर्व गांधीजी व कॉंग्रेस यांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान कुणीही नाकारू शकतच नाही. स्वातंत्र्योत्तर काळात मात्र गांधीजींचा साधेपणा,त्यांची शिकवण त्यांनीच पुढे आणलेले नेते विसरले.साधेपणा जाऊन झकपक राहणी सुरु झाली. कपडे धुण्यासाठी विशिष्ट ठिकाण,पिण्याचे पाणी विशिष्ट ठिकाणचे, उंची वस्त्रे ,उंची गाड्या मिरवणे सुरु झाले आणि साधेपणा दिसू लागला तो केवळ गांधी जयंती व पुण्यतिथी याच दिवशी. अत्यंत साधेपणाचा आव आणत आश्रमात जाणे,समाधीस्थळी जाणे तेथील साधेपणाची छायाचित्रे प्रसारित करणे, याने साधी राहणी असल्याचा कितीही आव आणला तरी मुळात साधेपणा असणारा व्यक्ती व आव आणून साधेपणा दाखवणारा व्यक्ती यातील भेद चाणाक्ष जनता जाणत असते.सद्यस्थितीतील सर्वच नेत्यांना गांधीजींच्या 150 व्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर साध्या राहणीने जनतेच्या जवळ राहण्याच्या संकल्प करणे जरुरी आहे. नाहीतर आपली प्रतीक्षा करीत असलेल्या, आपल्याला अभिवादन करण्यास आलेल्या जनतेला गाडीचा काच खाली करण्याचे सौजन्य सुद्धा आता नेते दाखवत नाही. ऐन निवडणूकीच्या काळात झाडू हाती घेणे, भोजनपात्रे प्रक्षालित करणे असला साधेपणा कितीही जरी दाखवला तरी जनतेला या सर्व गोष्टींना निवडणूकीची झालर असल्याचे लक्षात आल्यावाचून राहत नाही. निवडणूकीच्या काळात परवा कॉंग्रेसचे अध्यक्ष त्यांच्या मातोश्री व इतर नेते भोजनपात्रे प्रक्षालित करीत असतांनाची छायाचित्रे झळकली. परंतू इतक्या वर्षात केलेल्या अनेक दुस्कृत्यांची,घोटाळ्यांची,भ्रष्टाचाराची यादी केली तर फार मोठी यादी तयार होईल. स्वातंत्र्यानंतर लगेच झालेला संरक्षण खात्यातील जीप खरेदी घोटाळा,नगरवाला प्रकरण, बोफोर्स ,हर्षद मेहता,ऑगष्टा वेस्टलँड, अगदी आता-आताचे 2 जी स्पेक्ट्रम,कोळसा हे घोटाळे, गांधी हत्येनंतर केलेल्या हत्या, इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर केलेल्या दंगली,निरुपयोगी जमीन म्हणून चीनला आपली जमीन देऊन टाकणे,वोट बँकेसाठी जाती धर्मात फुट पाडणे अशी कितीतरी पापे या देशातील जनतेने पाहिली आहेत. गंगेत स्नान केले तर पाप प्रक्षालन होते असे मानले जाते परंतू  या पूर्व उल्लेखित देशाचे अहित करणा-या पापांचे तर प्रक्षालन गंगाही करू शकणार नाही. महात्मा गांधी आजीवन साधे राहिले सर्वस्थितीत साधे राहिले. त्यांच्या साधेपणाचा त्यांनी कधी गवगवा केला नाही. साधेपणाचा दिखावा करणा-या परवाच्या भोजनपात्रे प्रक्षालित करण्याच्या छायाचित्रांनी मात्र अनेक घोटाळे,दंगली, त्या दंगलीतून निरपराधांचे शिरकाण,भ्रष्टाचार ही असली पापे प्रक्षालित होतील का ? असा प्रश्न मात्र जनतेला नक्कीच पडला असावा.