२८/०३/२०१९

#MissionShakti , India tests its 1st anti-satellite missile system article elaborate it


छोडो कल की बाते ...
काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुपारी 11.45 ते 12.15 या वेळेत एक म्हत्वपूर्ण घोषणा करणार असे व्टीट केले. जनतेला पुनश्च आश्चर्य वाटले की आता कोणती घोषणा होणार ? नोटबंदी, सर्जिकल स्ट्राईक , एअर स्ट्राईक असे नाना विषय जनतेच्या मनात घोळू लागले. लोक एकमेकांना फोन , संदेश करू लागले. वृत्तवाहिन्यांचे एकापेक्षा एक कयास करणे सुरू झाले. शेवटी नरेंद्र मोदी यांनी “भारताने लो अर्थ ऑर्बिटला  अॅन्टी सॅटेलाईटने पाडले व भारत उच्च अंतरक्ष शक्ती असलेल्या तीन देशांच्या नंतर जागातील चौथ्या  क्रमांकाचा देश झाला” अशी घोषणा केली निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही घोषणा झाल्याने विरोधक हा विषय निवडणूक आयोगाकडे नेतील यात आश्चर्य नव्हते. विरोधकांनी #MissionShakti नंतर ही क्षमता पूर्वीपासून भारताकडे होती असा कांगावा सुरू केला. ही क्षमता भारताकडे पूर्वीपासून होती हे अमान्य करण्याचे काही कारण नाही. परंतू अशी क्षमता होती तर मग तीला दाबून का ठेवण्यात आले? सरकार कोणत्याही पक्षाचे असो देशाला मजबूत देश म्हणून जगाच्या पुढे आणणे, वैज्ञानिकांना प्रोत्साहन देणे, या गोष्टी व्हायलाच हव्यात. केवळ क्षमता होती, आम्ही हे केले होते हे आता सांगण्यात काही अर्थ नाही. पूर्वी अमेरिका भारतीय सावकाश संशोधन मोहीमेची खिल्ली उडवीत होती. इंग्लंडला भारत अप्रगत राहील असेच वाटत होते.परंतू सायकलवर, बैलगाडीवर अवकाश सामुग्री वाहून नेणारा भारत लवकरच अवकाश प्रक्षेपण, उपग्रह या क्षेत्रात एक सफल, सक्षम देश म्हणून उभा राहीला.आज अनेक देशांचे उपग्रह भारतातून प्रक्षेपीत केले जातात. भारताततून प्रक्षेपण करण्याचा खर्च सुद्धा कमी आहे.कालच्या या भारताच्या #MissionShakti  अभियानामुळे भारत आता लो अर्थ ऑर्बिटला मधील उपग्रह नष्ट करू शकणारा अमेरीका, रशिया ,चीन यांनंतर जगातील चौथा देश झाला. लो अर्थ ऑर्बिट मध्ये हेरगिरी करणारे उपग्रह असतात. त्यांना जर पाडायचे असेल तर अंतराळ क्षेपणास्त्र असावे लागते.त्याच संपूर्ण स्वदेशी क्षेपणास्त्राचा यशस्वी प्रयोग भारताने केला ही संपूर्ण भारतवासीयांसाठी निश्चित्च अभिमानास्पद अशी गोष्ट आहे. यासाठी #DRDO,भारतीय वैज्ञानिक यांचे सर्वातर्फे अभिनंदन होणे अपेक्षित आहे. विरोधकांच्या म्हणण्यानुसार हे तंत्रज्ञान जरी पूर्वीपासून भारताजवळ आहे तरी तंत्रज्ञानाचा वापर करून ते जगासमोर आणून आपल्या देशाला एक विकसित देश,सफल देश,सक्षम देश             म्हणून समोर आणणे सुद्धा आवश्यक असते. तसेच पक्षभेद सोडून समस्त भारतीयांनी  निदान देशहीतासाठी, सुरक्षेसाठी , तंत्रज्ञान समृद्धीसाठी तरी एकत्र येणे व जागाला आम्ही एक आहोत हे दाखवणे सुद्धा गरजेचे आहे कारण  
छोडो कल की बाते, कल की बात पुरानी
नये दौरमे लिखेंगे मिलकर नयी कहानी
हम हिंदुस्तानी   

२७/०३/२०१९

Why Gandhi family not visiting Firoz Gandhi grave? article e


इथे एक आहे समाधी जुनी...
     प्रयागराज हे हिंदूंचे पवित्रस्थान, ब्रह्मदेवाचे सुद्धा स्थान मानल्या जाणा-या या शहरात आनंद भवन ही वास्तू सुद्धा आहे.होय आनंद भवन, नेहरू कुटुंबियांचे निवासस्थान. नंतर ही इमारत भारत सरकारला सोपवण्यात आली. नेहरूंच्या याच इमारती पासून थोड्या अंतरावर पारशी समुदायाचे कब्रस्तान आहे. याच कब्रस्तानात नेहरूंचे जावाई व माजी खासदार फिरोज गांधी यांची कबर अर्थात समाधी आहे. हे सर्व आठवण्याचे कारण हे की प्रियंका गांधी यांना महासचिवपदी नियुक्ती देऊन त्यांना पूर्व उत्तरप्रदेशच्या 40 मतदारसंघांची धुरा सोपवण्यात आली. त्यांचे उत्तरप्रदेश दौरे सुरू झाले. विविध मंदिरे, गंगा पुजन, जलमार्गाने प्रवास असे हिंदू मतदारांना आकर्षित करण्याचे सोपस्कार पार पाडले व पार पाडणे सुरू आहे. याच दरम्यान त्या प्रयागराज येथे सुद्धा गेल्या परंतू आपल्या आजोबांच्या समाधीचे दर्शन घेण्यास मात्र त्या गेल्या नाही. तसे यापूर्वी सुद्धा गांधी परीवारातील कुणी सदस्य फिरोज गांधी यांच्या समाधी स्थळी गेल्याचे ऐकिवात नाही. इंदिरा गांधी यांचे पती फिरोज यांचा नामोल्लेख हेतुपुरस्सर टाळण्यात येतो. प्रियंका यांच चेहरा आजीशी मिळता जुळता आहे हे समजते परंतू फिरोज गांधी यांच्या  चेह-याशी साधर्म्य मात्र कुणी शोधत नाही. आपल्याच सास-याच्या सरकार मधील जीप घोटाळा उघडकीस आणणा-या फिरोज यांना कदाचित त्यामुळेच उपेक्षित ठेवण्यात आले असावे? की यातही पारशी समुदायाच्या मतांच्या मूल्यांचा विचार केला गेला असावा ? इंदिरा गांधी,राजीव गांधी यांच्या स्मृतीदिनी,जयंती दिनी त्यांना अभिवादन करण्यासाठी गांधी कुटुंबिय जात असतात परंतू फिरोज गांधी यांना मात्र कधीही कुणी अभिवादन करण्यास जात नाही. या बाबीकडे अनेकांनी अनेकदा लिहिले आहे लक्ष वेधले आहे.याच विषयावर काल तरुण भारत मध्ये चारुद्त्त कहू यांचा सुद्धा लेख प्रकाशित झाला. तो लेख वाचून कवी ना. घ. देशपांडे यांच्या कवितेच्या ओळींची आठवण झाली. फिरोज गांधी हे काही फार मोठे नेते होते किंवा भारताच्या विकासात त्यांची योगदान होते असे काही नाही परंतू माजी पंतप्रधान जामात, माजी पंतप्रधान पती, माजी पंतप्रधान पिता असूनही त्यांच्या जयंती किंवा पुण्यतिथी दिनी त्यांना अभिवादन करण्यास त्यांच्याच परीवारातील कुणीही त्यांच्या समाधीकडे फिरकत नाही. त्यांच्या उपेक्षित समाधीला कवी ना.घ. देशपांडे यांच्या कवितेच्या ओळी अगदी तंतोतंत जुळतात.           
या दूरच्या दूर ओसाड जागी किडे पाखरावीण नाही कुणी
हा भूमीचा भाग आहे अभागी इथे एक आहे समाधी जुनी
विध्वंसली काल हस्तांमुळे हिला या पहा जागोजागी फटा
माती खडे आणि आहेत काही हिच्या भोवती भंगलेल्या विटा
आहे जरी लेख हा छेद गेला जुन्या अक्षरातील रेघांमधुन
दुर्वांकुरे अन तरु खुंटलेला निघाला थरांतील भेगांमधुन
कोठून ताजी फुले बाभळीनी हिला वाहिले फक्त काटे कुटे
ही भंगलेली शलाका पुराणी कुणाचे तरी नांव आहे इथे
रानातला ऊन मंदावलेले उदासीन वारा इथे वाहतो
फांदीतला कावळा कावलेला भुकेलाच इथे तिथे पाहतो

१८/०३/२०१९

India lost a honest, workaholic, simple CM of Goa, ex- Defense Minister of India Manohar Parrikar


सदैव स्मरणीय कर्मवीर पर्रीकर
     मनोहर पर्रीकर गेले. असंख्य भारतीयांच्या हृदयाचा ठोका चुकला. गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर स्वादुपिंडाच्या कर्करोगाने पिडीत होते. खरे म्हंटले तर इतरांना ते पिडीत वाटत होते परंतू पर्रीकरांनी मात्र त्या भयंकर आजाराची पिडा मानली नाही. विदेशात उपचार घेऊन आल्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून तयार झालेला हा हाडाचा कार्यकर्ता पुनश्च कामाला लागला. नाकात नळी घेऊन राज्याच्या कार्यासाठी कधी विधान भवनात अर्थसंकल्प सादर करतांना , तर कधी पुलाची पाहणी करतांना तर कधी गंभीर व्याधीने ग्रस्त असूनही सभेत उपस्थितांना “How is the ‘Josh’ ?” असा प्रश्न विचारतांना देशातील जनता या सच्च्या नेत्याला , कामसू मुख्यमंत्र्याला अवाक होऊन पाहत होती. IIT मुंबई मधून अभियंता झाल्यावर राष्ट्रकार्यासाठी संघकार्य अंगिकारलेले पर्रीकर पुढे भाजपा मध्ये प्रवेशित झाले.गोव्याचे मुख्यमंत्री सुद्धा झाले. स्वातंत्र्योत्तर काळात इंग्रज भारतातून हद्दपार झाले तसाच राजकारणातून साधेपणा हद्दपारच झाला. ज्याप्रमाणे भारतातून पाकीस्तान वेगळा झाला त्याचप्रमाणे राजकारणातून साधेपणा, प्रामाणिकपणा सुद्धा वेगळा झाला (लालबहादूर शास्त्री व इतर काही तुरळक अपवाद वगळता) मनोहर पर्रीकर मात्र यास अपवाद ठरले. सरकारी बंगल्याचा कार्यालय म्हणून वापर , खाजगी काम असेल तर स्वत:ची स्कूटर व शासकीय कार्य असेल तरच सरकारी वाहन. विविध प्रसंगी सामान्य माणसाप्रमाणे रांगेत उभ्या राहिलेल्या पर्रीकरांना कित्येकांनी पाहिले आहे.बारा महिने तेरा त्रिकाळ हाफ शर्ट व पँट हाच पोशाख. त्यांच्या मुलाच्या लग्नात आमंत्रित सुटा-बुटात मिरवत आले होते परंतू पर्रीकर मात्र आपले शर्ट व पँट याच पोशाखात. त्यांच्या साधेपणाचे आणखी अनेक किस्से आहेत. साधे ग्रामपंचायत सदस्य, जि.प. सदस्य,न.प. सदस्य म्हणून निवडून आले तरी या सदस्यांचा केवढा बडेजाव असतो. गाड्या काय, त्यावर पदनाम काय . पर्रीकर मात्र साध्या स्कूटर तर कधी इनोव्हा गाडीत फिरत. विमान असले तर इकॉनामी क्लासने प्रवास , दिल्लीतील वातावरण थंड असूनही त्यांचा पहराव मात्र साधाच. उगीच नेता म्हटले की ते जॅकीट, कुर्ता- पायजामा असा दिखावा करण्याची त्यांना कधी गरज नाही पडली .संरक्षण मंत्री म्हणून अल्प काळातही पर्रीकरांनी आपला ठसा उमटवला. मग ते लष्कराची अत्याधुनिकता असो, सर्जिकल स्ट्राईक असो की वन रँक वन पेन्शन. पर्रीकरांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी म्हणून राहुल गांधी गेले परंतू कुणाच्या आजारपणाच्या भेटीचा सुद्धा गालिच्छ  राजकारणासाठी कसा उपयोग करायचा हे राहुल गांधींनी दाखवून दिले. परंतू चणाक्ष जनतेला राहुल गांधींचा हा कावा लक्षात आला. गंभीर आजार असूनही रजा न घेता कर्तव्यतत्पर राहून मनोहर पर्रीकरांनी जनतेला व नेत्यांना मोठी प्रेरणा दिली आहे. सतत कार्यशील राहणारे अगदी गंभीर आजाराने ग्रासले असले तरीही हार न मानणारे पर्रीकर खरे कर्मवीर आहे. ते जनतेच्या सदैव स्मरणात राहील. जनता , राजकारणी , नवीन पिढीतील नेते यांनी पर्रीकरांचा आदर्श बाळगला तर हा देश अल्पावधीत महासत्ता बनल्याशिवाय राहणार नाही.
“कर्त्यव्याच्या पुण्यापथावर मोहांच्या फुलबागा, मोही फसता मुकशील वीरा मुक्तिच्या वाटा ,
कर्तव्याने घडतो माणूस , जाणून पुरुषार्था“
श्रीकृष्णाने अर्जुनाला केलेला हा उपदेश या गीतांच्या ओळीत व्यक्त होतो या ओळींप्रमाणेच मनोहर पर्रीकर मोहांच्या फुलबागांत फसले नाही व कर्तव्याने ते घडले व अल्पायुषात पुरुषार्थ केला. यांमुळेच हे कर्मवीर मनोहर पर्रीकर जनतेच्या सदैव स्मरणात राहतील.

१४/०३/२०१९

Article on the occasion on World Consumer Rights Day 15 March

ग्राहक अधिकार व संरक्षण 
     आधुनिकीकरण , खुली अर्थव्यवस्था यामुळे  व्यापाराची पद्धत पार बदल झाला आहे. संपूर्ण जग ही एक मोठी बाजारपेठ बनली आहे. बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या आगमनामुळे जगातील सर्वच देशात नामांकित ब्रँडस् सहजपणे उपलब्ध होत आहेत. ऑनलाईन शॉपिंगकडे ग्राहकांचा कल वाढला आहे.  एका क्लिकसरशी ग्राहकांना त्यांच्या आवडीच्या वस्तू घरपोच मिळू लागल्या आहेत. बाजारातल्या या वाढत्या स्पर्धेमुळे ग्राहक राजा बनला आहे. परंतू याच राजाची अनेकदा फसवणूक सुद्धा होतांना दिसते. या ग्राहक राजाची फसवणूक होऊ नये याकरिता ग्राहक हक्क सरंक्षण व्यवस्था मजबूत असणे गरजेचे आहे. शिवाय ग्राहकाने सुद्धा जागरूक असणे व त्याला त्याच्या हक्कांची पुर्णपणे माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे. 15 मार्च हा जागतिक ग्राहक हक्क दिन म्हणून प्रतिवर्षी साजरा केला जातो.शासनाच्या वतीने सुद्धा जिल्हाधिकारी कार्यालय तसेच तालुका स्तरावर व तहसील कार्यालयात पुरवठा विभागामार्फत राष्ट्रीय व जागतिक ग्राहक दिन साजरे केले जात असतात.तसे शासनाचे निर्देश आहेत.15 मार्च 1962 मध्ये अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष यांनी सर्वप्रथम ग्राहकाच्या हक्कांबाबत भाष्य केले होते. या प्रसंगाची नोंद 1983 मध्ये घेतल्या गेली व त्यावर्षी पासून 15 मार्च हा जागतिक ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने आपल्या देशातील ग्राहक हक्क संरक्षण व्यवस्थेबाबत जाणून घेता येईल. ग्राहकहिताचे रक्षण करण्याकरिता विविध पातळ्यांवर कार्य केले जात आहे. ग्राहक तक्रार निवारण मंच हा याच व्यवस्थेचा एक भाग आहे. ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतूदीनुसार स्थापन करण्यात आलेल्या या मंचाच्या माध्यमातून ग्राहकांच्या समस्या सोडविण्याचे कार्य होत आहे. महाराष्ट्रात बिंदुमाधव जोशी यांनी 1974 साली ग्राहकांचे संघटन केले आणि अखिल भारतीय ग्राहक पंचायतीची स्थापना करण्यात आली. सुरूवातीला ग्राहक हक्क संरक्षण चळवळ क्षेत्रात खाजगी व स्वंयसेवी संस्थां ह्या प्रयत्न करीत होत्या. त्यांच्या प्रयत्नांच्या माध्यमातून ग्राहक चळवळीचा विस्तार देशभरात झाला. तद्नंतर ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी ग्राहक तक्रार निवारण मंच स्थापन झाला. सध्या ग्राहक मंच हा ग्राहकांना दाद मागण्यासाठी एक महत्त्वाचा पर्याय उपलब्ध आहे.पुढे देशात लोकाग्रहास्तव ग्राहक संरक्षण विधेयक मंजूर करण्यात आले. ग्राहक संरक्षण कायद्यामुळे सर्व ग्राहकांना सुरक्षेचा अधिकारउत्पादनाबाबतच्या माहितीचा अधिकार,निवडीचा अधिकार,तक्रार निवारणाचा अधिकार आणि ग्राहक शिक्षणाचा अधिकार प्राप्त झाला आहे.या आधारे एखाद्या उत्पादन सेवेबाबत जाणून घेणे त्याबाबत तक्रार असल्यास त्याचे निरसन करुन घेण्याचा हक्क नागरिकांना मिळू शकला.या कायद्यामुळे ग्राहकांचे हक्क जोपासण्याच्या द्ष्टीने महत्त्वाचे पाऊल टाकले गेले. यासाठी विविध पातळीवर ग्राहक मंचाची स्थापना करण्यात आली आहे.जिल्हा पातळीवर जिल्हा ग्राहक मंचाच्या माध्यमातून ग्राहक हक्काचे संरक्षण केले जात आहे. तिथे ग्राहकांचे समाधान झाले नाही तर राज्य किंवा राष्ट्रीय ग्राहक मंचच्या माध्यमातून ग्राहकाला न्याय मिळवून दिला जातो. ग्राहक चळवळीला बळ देण्यासाठी महाराष्ट्र ग्राहक संरक्षण (सुधारणा) नियम 2004 नुसार जिल्हास्तरावर ग्राहक संरक्षण परिषदेची स्थापना करण्यात आली आहे. ग्राहकांना आवश्यक मार्गदर्शन थेट मिळावं यासाठी राज्यात 15 सप्टेंबर 2011 पासून स्वतंत्र हेल्पलाईन कार्यरत आहे.ग्राहक 1800-22-2262 या क्रमांकावर हेल्पलाईनला फोन करुन आपल्या शंकाचे निरसन करु शकतात.ग्राहक हित जोपासणारी व्यवस्था असली तरच ग्राहक हा राजाहोऊ शकेल.

१२/०३/२०१९

Article on Rahul Gandhi's "Masood Azhar ji" remark.

पंतप्रधानांचा अनादर अतिरेकी मात्र आदरणीय  
आपल्या देशातील नेते काय बोलतील याचा काही नेम नसतो. यात सर्वच पक्षातील नेत्यांचा समावेश आहे. राहुल गांधी व त्यांच्या पक्षातील नेते सुद्धा कधी काय बोलतील सांगता येत नाही. शेकडो वेळा त्यांच्या काही-बाही बोलण्याची प्रचीती जनतेला आलेलीच आहे. त्यांच्या या अशा वक्तव्यातून त्यांची व पर्यायाने त्यांच्या पक्षाची विचारसरणी, मानसिकता तसेच देशहिताची त्यांना कितपत काळजी आहे हे दर्शवते. अशीच एक प्रचीती काल पुनश्च एकदा आली.काल काँग्रेस अध्यक्ष दिल्ली येथे बूथ कार्यकर्त्याच्या सभेत बोलत होते. यावेळी अझहर मसूद हा कसा सुटला होता या बाबत ते केंद्रातील तत्कालीन भाजपा सरकारवर टीकास्त्र सोडत होते. याबाबत भाष्य करतांना त्यांनी पुलवामा हल्ल्यामागचा सूत्रधार जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या म्होरक्याचा “मसूद अझहरजी” असा नामोल्लेख केला. काश्मीर मध्ये ज्या दहशतवादी संघटनेने कित्येक हल्ले करून आपले जवान, नागरिक यांचे बळी घेतले आहे अशा भेकड,भ्याड,नतद्रष्ट,बुद्धीभ्रष्ट अतिरेक्यांच्या म्होरक्याला आदरार्थी “जी” हे प्रत्यय लावून राहुल गांधीनी पुलवामा हल्ल्यात शहीद झालेले जवान,त्यांचे कुटुंबीय यांसोबतच सध्या दहशतवादी हल्ल्याने संतापलेल्या देशातील करोडो नागरीकांचा सुद्धा अपमान केला आहे. काँग्रेस पक्षात असे वक्तव्य करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी दिग्विजयसिंग या महाशयानी ओसामा बिन लादेन याचा “ओसामाजी” व हाफिज सईद चा “हाफिज सईद सहाब“ असा उल्लेख केला होता व जनतेच्या ते स्मरणात आहे. क्रूरकर्मा अतिरक्यांना हे असे आदरार्थी संबोधन का? राहुलजी तुम्ही देशाच्या पंतप्रधानांना चोर म्हणता आणि अतिरेक्यांना आदररार्थी संबोधता. तुमच्या या असे वक्तव्ये करण्याच्या त-हेने तुम्ही स्वत:चेच हसे करून घेत असता. मागे एकदा तुम्ही मोठ्या त्वेषाच्या आविर्भावात माजी पंतप्रधान मनमोहनसिंग सरकारने काढलेला अध्यादेश टरा-टरा फाडला होता. हे सुद्धा जनतेच्या लक्षात आहे. तुमच्या या अशा वागणुकीमुळे, तुमच्या व तुमच्या शिलेदारांच्या वक्तव्यांमुळे, तुम्ही कदाचित काँग्रेस पक्षाला अधिकच खोल गर्तेत घेऊन जाणारे अध्यक्ष ठराल असे आता जनतेलाच नव्हे तर तुमच्याच पक्षातील लोकांना सुद्धा हमखास वाटत असेल. लोकसभा निवडणुका नुकत्याच जाहीर झाल्या आहेत. राहुलजी तुमच्या पक्षातर्फे एकदा तुम्ही स्वत:च पंतप्रधान पदाचा उमेदवार असल्याची  घोषणा केली होती. परंतू भारताचा पंतप्रधान कसा असला पाहिजे हे भारतीयांच्या लक्षात आलेले दिसते. किंबहुना जनतेने ते ध्यानात घ्यावे. खंबीर नेतृत्व करणारा , जागतिक स्तरावर एक शक्तीशाली देश म्हणून भारतास पुढे आणणारा, देशाची अर्थव्यवस्था भक्कम करणारा , समस्त भारतीयांना समदृष्टीने पाहणारा , अतिरेक्यांचा व राष्ट्रविरोधी शक्तींचा नि:पात करणारा असा पंतप्रधान या देशाला हवा आहे. आपल्या जवानांचे बळी घेणा-या, निष्पाप नागरिकांना मारणा-या अतिरेक्यांना “जी” “सहाब” असे आदरार्थी संबोधणारा नव्हे.

०६/०३/२०१९

Number of death caused by Heart attack are increasing day by day , article en light on other causes of heart disease

दिलकी आवाज भी सून.....   

बदललेले जग, बदललेले सामाजिक व कौटुंबिक संबंध, वाढणा-या चिंता, मुलांच्या समस्या, आर्थिक परिस्थिती, आर्थिक विषमता, साधी राहणी सोडून सुख-चैन मिळवण्यासाठीची धडपड, इतरांकडे जे आहे ते मला सुद्धा हवेच अशी वाढती भावना या सर्वांचा नक्कीच आपल्या शरीरावर मुख्यत: आपल्या हृदयावर आघात होत असावा.  पूर्वी लोक व्यक्त होत, आपल्या समस्या एकमेकांना सांगून त्या हलक्या करीत परंतू आता तसे नाही.
परवा हैदराबाद येथे गोपी राजू या विद्यार्थ्याचा बारावीची परीक्षा सुरु असतांना एकाएकी निधन झाले. काल एका शरीर सौष्ठवपटूचे अवघ्या 35 व्या वर्षी निधन झाले. दोघांच्याही मृत्यूचे कारण एकच हृद्यविकाराचा  झटका. हृदयविकाराला आता वयाचे सुद्धा बंधन उरले नाही. आजच्या या धकाधकीच्या व ताण- तणावाच्या जीवनांत, प्रदूषणयुक्त काळात निरनिराळे आजार, व्याधी जडत आहेत.जराही वातावरण बदलले तर मुले आजारी,“व्हायरल” म्हणून डॉक्टर सांगतात.जगणे कठीण गुंतागुंतीचे झाले आहे. मनुष्य अधिकच्या लालसेत, भौतिक सुखाच्या मोहात स्वत:वर ताण-तणाव ओढवून घेत आहे? रुग्णांची, मानसिक रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे.मधुमेह, कर्करोग, हृदयरोग यांच्या संख्येत सुद्धा झपाट्याने वाढ होत आहे.हृदयाला रक्त पुरवठा करणा-या रक्तवाहिन्यांत रक्तरोध होत आहे.हृदयरोगी व हृद्यविकार असलेले कित्येक रुग्ण आहेत.कित्येकांना हृदयविकाराचे झटके येऊन गेले आहेत.आज चांगला धडधाकट दिसणारा, नियमित दैनंदिनी पाळणारा, नियमित व कमी आहार घेणारा, व्यायाम वगैरे सर्व करणारा व ज्याने वयाची पन्नाशीही पार केलेली नसते अशा व्यक्तीच्या हृद्यविकाराच्या झटक्याने आकस्मिक निधनाची वार्ता समाजात पसरते तेंव्हा सर्व जनांना तीव्र वेदना होते, हळहळ वाटते. का हा हृद्यरोग इतका बळावला आहे? का अल्पायुषी व्यक्ती हृदयरोगाने निधन पावत आहेत? याचे उत्तर कुणी हृदयरोग तज्ञच देऊ शकेल. तुम्ही-आम्ही काही वैद्यकीय क्षेत्रातील माहिती असलेले, शरीरशास्त्राची माहिती असलेले तज्ञ नाही. परंतू तरीही आपल्या हृदयाची काळजी मात्र थोड्या बहुत प्रमाणात घेता येऊ शकते. खाणे-पिणे कसे असले पाहिजे हे आपण आहारतज्ञा कडून समजून घेऊ शकतो, व्यायामाची माहिती निष्णातांकडून मिळवू शकतो व आपल्या हृदयाची काळजी घेऊ शकतो परंतू असे करूनही हृदयविकार असलेले किंवा हृदयविकाराचे झटके आलेले व त्याने हानी झालेले लोक आपण सर्वानीच पाहिले आहेत. मग याच्यावर उपाय तो काय? तर खालील गोष्टींकडे सर्वच दुर्लक्ष करतांना दिसतात. त्या म्हणजे आपले मानसिक आरोग्य सुदृढ हवे, आपली वर्तणूक, आपण कसे वागतो आहोत? याचा सुद्धा आपण विचार करणे जरुरी असते. कुठे काही चुकते आहे का? आपल्या काही अडचणी आपण कुणाजवळ व्यक्त करतो आहे की नाही? आपल्यामागे अनेक चिंता आहेत का किंवा आपण चिंता, व्याप वाढवले आहेत का? या सर्वांची उत्तरे जर होकारार्थी असतील तर मधुमेह, रक्तदाब किंवा हृदयरोग यांसारख्या व्याधी जडण्याची शक्यता बळावते. यासाठी आपण आपल्या हृदयाची हाक ऐकली पाहिजे. मुळात आपले हृद्य जर शांत असेल प्रेमळ असेल हृदयात सर्वांप्रती आपुलकी, प्रेम भावना असेल, ते निकोप असेल तर अशा “दिल”वाल्याला कदाचित झटका येणार नाही. सद्यस्थितीतील बदललेले जग, बदललेले सामाजिक व कौटुंबिक संबंध, वाढणा-या चिंता,मुलांच्या समस्या,आर्थिक परिस्थिती,आर्थिक विषमता,साधी राहणी सोडून सुख-चैन मिळवण्यासाठीची धडपड, इतरांकडे जे आहे ते मला सुद्धा हवेच अशी वाढती भावना या सर्वांचा नक्कीच आपल्या शरीरावर मुख्यत: आपल्या हृदयावर आघात होत असावा. हल्ली व्यायामाचे महत्व , योगासनांचे महत्व सर्वांना पटले आहे. सकाळ-संध्याकाळ व्यायाम करणारे लोक खूप दिसतात. परंतू “दिल को कौन संभाले?” अर्थात आपल्या मनाचे,आपल्या हृद्य्याचे आरोग्य कसे राखणार? लोक शरीर तंदुरुस्त ठेवत आहे परंतू मनाचे आरोग्य मात्र ढळत आहे पूर्वी लोक व्यक्त होत,आपल्या समस्या एकमेकांना सांगून त्या हलक्या करीत परंतू आता तसे नाही.कुणाला कुणासाठी वेळ नाही.जवळचे लोक दुरावत चालले आहे. अनेक लोक आतल्या आत कुढत बसतात. अनेक लोकांना गोष्टी लपवून ठेवण्याची खोड असते, अकारण भीतीपोटी ते असत्याचा आधार घेतात नंतर त्यांना ते स्मरणात ठेवावे लागते. याचा सुद्धा शरीरावर कुठेतरी परिणाम होत असतो. जाणते-अजाणतेपणी एखादी चूक घडते व नंतर त्या चुकीमुळे त्याचे मन त्याला खात असते. त्याच्या हृदयावर या बाबींचा नक्कीच परीणाम होतो व मधुमेह,रक्तदाब हृद्यरोगासारख्या व्याधी त्याच्या शरीरावर हल्ला चढवतात.हल्लीच्या जीवनशैलीने मानवी हृदयात वागणूक, नाना प्रकारच्या चिंता,तणाव अनेक भावनांची गुंतागुंत झाली आहे.आपले हृद्य आपल्याला आवाज देत असते की मनाची कवाडे उघडी ठेव,आनंदी वृत्तीने वाग,क्रोधाला लगाम घाल,जगाला प्रेम दे,सत्याची कास धर,पैश्याचा हव्यास टाळ,हृदयावरील भार हलका कर,जवळच्या व्यक्तींमध्ये वाढ कर,दुरावा कमी कर,कुणा जवळ तरी अगदी प्रांजळपणे व्यक्त हो, चांगले वाचन कर, मनाला आनंद शांती देणारे संगीत श्रवण कर. आपल्या ह्रदयाची ही साद, अशी “दिल की आवाज” जर आपण ऐकली व व्देष,मत्सर,ताण,रुसवे-फुगवे,मोह-माया,लोभ यांचा त्याग करण्याचा प्रयत्न केला तर कदाचित हृदयविकार जडण्याची शक्यता कमी होईल”.

०२/०३/२०१९

Contradictory statements by leaders and so called intellectuals after Pulwama attack

हे वागण बरं नव्हं !

पुलवामा हल्ला, त्यानंतरचे पाकिस्तानातील अतिरेकी तळांवर भारतीय वायुदलाचे हल्ले, पाकिस्तानची  विमाने भारतीय हवाई हद्दीत घुसणे, त्यांच्यावर मारा करतांना आपले पायलट विंग कमांडर अभिनंदन  पकडल्या जाणे, व त्यांचे पाकिस्तानातून सुखरूप परत येणे. या सर्व घडामोडी गेल्या 14 फेब्रुवारी नंतर घडल्या परंतू या घडामोडी सुरु असताना आपल्या देशातील तथाकथीत बुद्धीजिवी,काही नेते, व सोशल मिडीया वरील उपटसुंभ यांची कीव करावी अशी वक्तव्ये येत होती. हे सर्व केवळ मोदी विरोध म्हणून जिभ सैल सोडून वाटेल ते बरळत सुटले. या सर्वांत ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल, सिद्धू व आपले राजसाहेब, यांचा समावेश होता. पुलवामा घटनेचे राजकीय भांडवल केले जात आहे ,ममता बॅनर्जी यांची पुराव्यांची मागणी, सिद्धूला इम्रान खान शांतीदूत वाटायला लागला. राजसाहेब यांनी तर कहरच केला. राजसाहेब म्हणाले की की ”अजित डोवाल यांची चौकशी करा म्हणजे ते मोदींबाबत खूप काही सांगतील” यांसारखी वक्तव्ये पाकिस्तानी वृत्त वाहीन्यांवर दाखवली गेली. विशेष म्हणजे पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर हल्ले केल्या गेले याबाबत एकाही देशाने भारताची निंदा केली नाही परंतू आपले महाभाग मात्र केवळ मोदी विरोध म्हणून गरळ ओकत सुटले होते. हे असे आपले नेते, या अशा यांच्या त-हा. पक्षभेद दूर सारून बांगलादेश निर्मिती वेळी अटलबिहारी वाजपेयी यांनी इंदिरा गांधी यांना दुर्गा म्हणून त्यांचे कौतुक केले होते. सद्य स्थितीत विरोधी पक्षीय मोदींचे कौतुक तर सोडाच उलट पाकड्यांचे गोडवे गात आहेत व मोदींची निर्भत्सना करीत सुटले आहेत .याच दरम्यान पाकिस्तानच्या वृत्तवाहिन्या मात्र मोदींची तारीफ करतांना दिसत होत्या. तशा चित्रफिती सुद्धा प्रसारित झाल्या. तिकडे पाकीस्तानचे विरोधी पक्षनेते युद्धजन्य परिस्थितीत आपण एक आहोत आम्ही सरकारच्या पाठीशी आहोत असे विधान करीत होते आणि आपल्याकडील हे उपरोक्त लोक पाकड्यांची री ओढीत होते, “से नो टू वॉर”, “युद्ध नको बुद्ध हवा“ सारखे हॅश टॅग फिरवीत होते.यांना अतिरेकी आपल्या लोकांना,जवानांना मारतात ते दिसत नाही ,यांना बुद्ध गरजेपुरता तेवढा हवा.बुद्धाची शिकवण, बुद्धाच्या आज्ञा हे लोक कितपत अनुसरतात कुणास ठाऊक. ती शिकवण त्यांना ठाऊक तरी आहे का ? तिकडे अभिनंदन शत्रूच्या तावडीत होता आणि इकडे आपल्या काही वृत्तवाहिन्या त्याचे घर, नांव अशी इत्यंभूत माहिती रंगवून-रंगवून सांगत होत्या. आपल्या देशात हे असे लोक आहेत म्हणूनच आपण मागे आहोत, जगात आपली नाचक्की होत असेल,हसे होत असेल. राष्ट्रीय आपत्तीत इतर देशात सर्व जनता, पक्ष सरकारच्या पाठीशी असतात.पाकिस्तानने सुद्धा तेच दाखवून दिले. भारतात मात्र अजब तऱ्हा आहे. इतिहासात सुद्धा हेच झाले आहे. संभाजी राजांची माहिती आपल्याच लोकांनी औरंग्यास दिली होती आणि ते पकडले गेले. त्यापूर्वी जयचंदने घोरीस आमंत्रित केले होते. यासारखे इतरही अनेक दाखले आहेत. यावेळी आपले लोक असेच पाकड्यांच्या बाजूने झुकतांना पाहून दु:ख झाले.त्याहून दु:ख झाले ते राज ठाकरे यांच्या वक्तव्यामुळे.राज यांच्यावर महाराष्ट्रीय जनतेचे आजही प्रेम आहे परंतू त्यांच्याकडे काही कार्यक्रमच नसल्याने ते हल्ली गोंधळून गेल्यासारखे दिसत आहे. सरकार, मोदी यांच्यावर जरूर टीका करा .परंतू उचित प्रसंगी अटलजी जसे पक्षभेद विसरून कौतुक करीत त्याप्रमाणे कौतुक सुद्धा करायला हवे. सक्षम नेत्यास त्याने आणखी हुरूप येतो, शत्रूला एकता दिसते, जनतेला नेत्यांतील प्रगल्भता दिसते व जगाला देश मजबूत असल्याचे दिसून येते. देशातील युद्धजन्य परिस्थितीत या तथाकथित बुद्धीजीवींना, उपरोक्त नेत्यांना असे अजब वागतांना पाहून हे वागण बरं नव्हं ! हेच सांगावेसे वाटते.