२९/०४/२०१९

Political parties showing videos in their election rallies its remind a bio scope , a entertainment device to bring images of one's favorite movie, stars. Peppered with music from the Talkies in the decades of 1960s to 90s.


देखो,देखो,देखो बायोस्कोप देखो
    यंदाच्या निवडणूकीत राज ठाकरे यांनी त्यांच्या सभांमध्ये व्हीडीओ व्दारे पुरावे दाखवणे सुरू केले. यात त्यांनी मुख्यात: भाजपा ला त्यातही पंतप्रधान मोदी व अमित शहा यांना लक्ष्य केले. भाजपा ने दिलेली जुनी आश्वासने, डिजीटल गांव , भाजपाने केलेल्या व्हीडीओ जाहीरातीत काम करणारे व्यक्ती यांचा या पुराव्यांत त्यांनी समावेश केला. कुणाला निवडून द्या हे सांगण्यापेक्षा त्यांनी कुणाला निवडून नका देऊ हे ते सांगत होते. या राजकीय युद्धात राज ठाकरे सारखी “मुलुख मैदानी तोफ” चा वापर चांगला करता येईल हे जाणत्या राजाने बरोबर हेरून त्यांना सोबत घेऊन गनिमीकावा सुरू केल्या गेला. राज यांनी “लाव रे व्हीडीओ” असा नारा देऊन या व्हीडीओ हल्लाने भाजपा व शिवसेना यांच्यावर सुलतान ढवाच केला. आता या हल्ल्याला प्रत्युत्तर ते कसे द्यायचे या विचाराअंती मग “लोहा लोहे को काटता है”  याप्रमाणे भाजपा व शिवसेना यांनी या व्हीडीओ हल्ल्यास प्रती व्हीडीओ हल्ला हाच मार्ग निवडला. या दोन्ही पक्षांनी सुद्धा प्रचार सभांत व्हीडीओ दाखवणे सुरू केले उद्धव ठाकरे यांनी नाशिक येथे राहुल गांधी यांचा जुना व्हीडीओ दाखवला आशीष शेलार यांनी सुद्धा व्हीडीओ दाखवला. निवडणूक प्रचार धुमाळीत राजकीय पक्षांचे हे असे व्हीडीओ दाखवणे जोरात सुरू आहे. पूर्वी दूरदर्शन वगैरे नसताना एक माणूस एक भला मोठा त्याला उभे करण्यासाठी तिपाई असलेला एक मोठा डब्बा घेऊन यायचा. त्याला “बायोस्कोप”वाला असे म्हणत. या “बायोस्कोप”वाल्या जवळील त्या मोठ्या डब्ब्याला आजूबाजूने तीन-चार असे अल्युमिनीयमचे छोटे साखळी असलेल्या
झाकणाचे डब्बे लावलेले असायचे व त्यातून लहान मुलांनी पहायचे व तो बायोस्कोपवाला वरुन एक कळ फिरवत रहायचा व डब्ब्यातून मुलांना वेगवेगळी चित्रे दिसायची. सोबत एखादे गाणे वाजायचे. 10- 20 पैस्यात हा “शो” असायचा. शो झाला की बायोस्कोपवाला डब्बा उचलून दुसा-या भागात निघून जायचा.महाराष्ट्रातील राजकारणात सुरू असलेलेले हे व्हीडीओ हल्ले पाहून काळाच्या ओघात लुप्त झालेल्या या बायोस्कोपवाल्याची आठवण झाली. त्याच्या या व्यवसायातून त्याला पैसे मिळायचे व मुलांची करमणूक व्हायची. महाराष्ट्रातील या व्हीडीओ हल्ल्यातून जनतेचे मनोरंजन ही होते व बिदागी सुद्धा मिळतच असावी कारण तशी चित्रफीत सुद्धा नुकतीच झळकून गेली. राजकीय नेत्यांचे हे त्या बायोस्कोपवाल्या प्रमाणे व्हीडीओ दाखवत फिरणे कितपत यशस्वी ठरते हे आता 23 मे रोजीच कळेल. बायोस्कोपवाला निदान कुटुंबाचा चरीतार्थ चालवण्यासाठी हा व्याप करीत असे तर  राजकीय पक्ष मात्र देशहीताच्या  नांवाखाली  स्वत:ची पोळी शेकण्यासाठी हे व्हीडीओ तंत्रज्ञान  वापरत आहे. दुस-याचे उणे देणे असलेलेले व्हीडीओ दाखवण्यापेक्षा स्वत: काय केले याचे व्हीडीओ दाखवा ना ! जनता हुशार आहे त्या बायोस्कोपवाल्या जवळ मुले जशी मनोरंजनासाठी येत व निघून जात तसेच जनता तुमचे व्हीडीओ निव्वळ एक करमणूक म्हणून बघेल का ? आपली करमणूक करून घेऊन बटन मात्र विचारपूर्वक दाबेल का किंवा त्यांनी बटन विचारपूर्वक दाबले असेल का ? याचा निकाल   आता लवकरच कळेल. जर जनतेने तुमच्या व्हीडीओ ला नाकारले तर त्या बायोस्कोपवाल्याप्रमाणे तुम्हाला सुद्धा तुमचा व्हीडिओचा डब्बा उचलून जावे लागेल.

२५/०४/२०१९

A tourist and his guide were jointly fined 51,000 for allegedly pelting stones at a sleeping tiger in Ranthambore. Article elaborate on this


सोते हुये शेर को जगाया नही करते  
     सध्या निवडणूकींच्या धामधुमीत वाघ, सिंह यांचा प्रतिकात्मक उपयोग होतो आहे. त्यामुळे शेर को जगाया नही करते म्हटल्यावर त्याचा अर्थ कदाचित सद्यस्थितीतील राजकारणाशी आहे असे वाचकांना वाटू शकते परंतू “सोते हुये शेर को जगाया नही करते” हिंदीतील या म्हणीची  प्रचिती काल खरोखरच आली . राजस्थान येथील रणथंबोर अभयारण्यात काल काही पर्यटक गाईडसह वनभ्रमंती करावयास चालले होते. पिलीघाट या गेट जवळ एक वाघ दुपारच्या उन्हापासून विसावा मिळावा म्हणून छान वामकुक्षी घेत पहुडला होता. गाईडला पर्यटकांना वाघ दाखवण्याची अति उत्सुकता असते मग प्रसंगी त्यामुळे त्या प्राण्याला त्रास झाला तरी यांना त्याचे काही घेणे देणे नसते. या वाघाची
सुद्धा झोपमोड केल्या गेली.दुपारची वामकुक्षी सर्वांना प्रिय असते. काही लोक भ्रमणध्वनी बंद करून निद्रानंद घेतात. तर काहींंनी 4 वाजेपर्यन्त उठवू नका असे सेवकाला सांगून ठेवलेले असते. पुणेकरांची याबाबतीत नेहमीच खिल्ली उडवली जाते. यंदाच्या लोकसभा निवडणूकीत पुण्यात 40 टक्केच मतदान झाले. याचेही कारण कदाचित दुपारची ही वामकुक्षी हेच असावे. आता मानवाचा निद्राभंग झाला तर तो काही तरी करू शकतो. परंतू जंगली हिंस्त्र पशूचे काय ? त्याची निद्रा जवळ जाऊन भंग करण्याची हिम्मत कोण करेल ? समझा कुणी केलीच तर त्याचा दंड तो काय वसूल करेल हे स्पष्ट्च आहे. त्याची निद्रा भंग केल्याचा दंड तो त्या निद्राभंग करणा-याला चिरनिद्रा देऊनच वसूल करेल. तसाच राष्ट्रीय उद्यानातील छान झोपलेल्या या वाघाचा निद्रा भंग करण्याचा दंड गाईड व पर्यटक यांना सुद्धा चांगलाच महागात पडला. निद्रा भंग केलेला हा वाघ दूर अंतरावर होता व त्या गाईडने जिप्सीतून खाली उतरून  दगड मारून त्याला उठवले होते. आता त्या वाघाने तर त्याला काही दंड केला नाही. परंतू दगड मारण्याची ही कृती थर्मल इमेज कॅमे-यात कैद झाली. वाघाला झोपेतून उठवण्याचा दंड त्या गाईडला व पर्यटकास झाला. दंड थोडा-थोडका नव्हे तर तब्बल 51000 रुपयाचा दंड त्यांना ठोठावण्यात आला शिवाय तातडीने उद्यान सोडण्याचे आदेश सुद्धा देण्यात आले. दिवसभाराचे त्यांचे बुकींग सुद्धा रद्द झाले. गाईडच्या प्रवेशावर सुद्धा बंदी घालण्यात आली. कोणत्याही प्राण्याला विनाकारण त्रास देऊच नये. त्यातल्या त्यात हिंस्त्र पशूस तर मुळीच देऊ नये. परंतू आजकाल हुल्लडबाजी , गोंधळ करण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. जंगले , अभयारण्ये येथे सुद्धा धिंगाणा घालण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले.“सोते हुये शेर को जगाया नही करते” ही म्हण वाघ व सिंहाच्या हिंस्त्रपणामुळेच पडली आहे परंतू आता थर्मल इमेज कॅमेरे , सी सी टीव्ही कॅमेरे असे तंत्रज्ञान सुद्धा आले आहे यांमुळे सुद्धा तुमची कोणतीही कृती उघड होऊ शकते आणि म्हणूनच “सोते हुये शेर को जगाया नही करते” अन्यथा तो नाहीतर सरकार दोनपैकी कुणी ना कुणी निश्चितच दंड करेल.   

१८/०४/२०१९

Article on a common lady who is working hard since here childhood for her family

"पुष्प”संघर्ष                                                                                         
          1954 या वर्षात दोन भावांच्या पाठीवर तीचा जन्म झाला. दोन्ही भाऊ लहानपणीच वारल्यामुळे आजी-
आजोबा, आई-वडीलांची ती लाडकी झाली.तीचे नामकरण पुष्पा असे झाले. पुष्पा लहानपणापासूनच सहनशील त्यामुळे जास्त लाडाची झाली. बालपणीचा काळ सुखात व्यतीत झाला. जमा खर्चाची कामे करणारे वडील अत्यंत तुटपुंजा कमाईतून घर चालवत असत. त्यात पुष्पाला आता लहान बहीण झाली. तीची प्रकृती नाजूक असल्याने सतत दवाखाना सुरू झाला. पुष्पाचे वडील विश्वनाथ जाधव हे एकटेच कमावते. आई,पत्नी,अपंग बहीण दोन मुली, त्यातील एक सतत आजारी. हे पाहून आत्या व लहानगी पुष्पा सुद्धा वडीलांना हातभार म्हणून कामे करू लागल्या त्यानंतर पुष्पाला दोन भाऊ झाले. खाणा-या तोंडांमध्ये आणखी भर पडली. मग काय लहानग्या पुष्पावर जबाबदा-या येऊ लागल्या. छोटी पुष्पा शाळेतून घरी आली की आत्यासोबत कामावर जात असे.कामे करून,घासलेटच्या दिव्यावर अभ्यास करून पुष्पा वर्गात गुणानुक्रमाने उत्तीर्ण सुद्धा होत होती. लहान मुलीच्या वैद्यकीय खर्चाची निकड पुरी व्हावी म्हणून पुष्पाच्या वडीलांनी हॉटेलचा व्यवसाय थाटून पाहीला.पुष्पा व तिची आत्या हॉटेलवर राबू लागल्या.परंतू त्यामुळे पुष्पाची शाळा मात्र कायमचीच सुटली.नियतीने पुढे काय वाढून ठेवले असते कुणालाच ठाऊक नसते त्याचप्रमाणे सोनाजींचा लहान मुलगा सुद्धा सतत आजारी राहू लागला. आय कमी व व्यय जास्त, वैद्यकीय खर्च अधिक वाढला. नोकरी सोडून हॉटेल सुरू केलेले सोनाजी ठराविक मासिक उत्पन्नासाठी पुन्हा नोकरीकडे वळले.खडतर दिवस सुरू असतांनाच वयाच्या 14 व्या वर्षी पुष्पाचे लग्न झाले.आपला जावाई हा बहीणीकडे राहत असल्याने विश्वनाथरावांनी त्याला नोकरी लावून दिली. पुष्पा, तीचे यजमान व पुष्पाचे माहेरचे आता एकाच गावात म्हणजे खामगाव येथे राहू लागले. पुष्पाचा संसार सुरू झाला. परंतू तेच खडतर आयुष्य कायम होते. बालपणीपासूनच कष्टात दिवस काढण्याची सवय जडलेली पुष्पा पहील्या मुलाच्या वेळी गरोदरपणात सुद्धा कामे करीतच होती किंबहुना परिस्थितीमुळे करावी लागतच होती.एक दिवस मिरच्या कुटणीचे काम आटोपून घरी आल्यावर पहील्या मुलाचा जन्म झाला. कष्टमय जीवनाचा रहाटगाडगा सुरूच होता. पुढे दोन मुले व दोन मुली झाल्या. पतीच्या आजारपणात तर पुष्पाची कठीण परीक्षा ईश्वर घेत होता. रोज 10 किलोच्या पोळ्या,ते झाल्यावर सद-यांना काज-बटन शिवणे,घरची कामे,पतीची सेवा,मुलांची देखभाल सर्व एकाच वेळी पुष्पा तारेवरच्या कसरती प्रमाणे करीत होती. “जीवन कही भी ठहरता नही है“ याप्रमाणे दिवसामागून दिवस जात होते. पुष्पाची दोन्ही मुले कामावर जाऊ लागली, आता तीच्या मोठ्या मुलाचे मुलीचे लग्न झाले.पुष्पा चातकाप्रमाणे चांगल्या दिवसांची आतुरतेने वाट पाहत होती.तीला चांगल्या दिवसांचे मेघ दाटून आल्याचे दिसत होते परंतू त्यातून सुखाची वर्षा मात्र झालीच नाही. तीच्या पदरात निराशाच आली.पती हृदयविकाराच्या झटक्याने निवर्तले. पुष्पाला खूप आर्थिक भार सोसावा लागला.पुष्पा खचली नाही.दू:ख बाजूला सारून पदर खोचून पुन्हा पुष्पा नियतीला आव्हान देऊन उभी राहीली.लहान मुलगी व मुलाचे लग्न केले. दैव मात्र पुष्पाची किती परीक्षा घेणार होते कुणास ठाऊक.एक दिवस एका अपघातात पुष्पाच्या मुलाचा करूण अंत झाला.काही महीन्यांनी एका अपघातात लहान जावई वारले.दोन्ही तरुण माणसे गेल्यावर छातीवर दगड ठेवत पुष्पा पुन्हा सावरली.“आग मे जलके भी जो निखरे है वही सच्चा सोना” याप्रमाणे ही “सोनाजी” यांची पत्नी पुष्पा अनेक संकटरूपी आगेतून फिनिक्स पक्षाप्रमाणे पुन्हा संकटांचा सामना करण्यास सज्ज होतच होती. मुलाच्या मुली व मुलीच्या मुली म्हणजे आपल्या गुणी,हुशार नातींसाठी पुष्पाला पुन्हा सज्ज होणेच होते. परीवारासाठी लहानपणापासून परीस्थितीशी संघर्ष करीत असलेली पुष्पा आजही वयाच्या 64 व्या वर्षी मुलीच्या मुलाच्या संसारात आर्थिक हातभार लागावा,नातींचे चांगले शिक्षण व्हावे म्हणून अनेक संकटे झेलून,कठीण परीस्थितीशी लढा देत आपले पुष्पा हे नाव सार्थ करीत पुष्पा सोनाजी भारंबे या खंबीर स्त्रीचा हा रुक्ष जमिनीत कमी पाण्यातही फुलणा-या या “पुष्पाचा” जगण्यासाठीचा संघर्ष सुरूच आहे.                            

१३/०४/२०१९

Irregular water supply problem in city


इस शहरमे हर शक्स परेशानसा क्यूं है ?
दहा दिवासांनंतर नळ येणार म्हणून सकाळीच 5.30 ला उठलो. परिसरातील नागरिकही उठलेच होते. नळ कधी येणार किती वाजता येणार याची काही निश्चिती नाही. वाट पाहिली परंतू पाणी काही आले नाही. मुख्य जलवाहिनीचा कॉक जवळच असल्याने नळाचे पाणी सोडणारा दिसतो का म्हणून निघालो. जातांना महिला , पुरुष चिंताग्रस्त मुद्रेने नळाची आतुरतेने वाट पहात असतांना दिसत होते. काही एकमेकांना विचारपूस करीत होते. मी सुद्धा एक-दोन गृहस्थांशी बोलत कॉक पर्यंत गेलो असता तिथे पाणी साचलेले दिसले. “अरे ! जलवाहिनी फुटली वाटते ! “मी स्वगतच पुटपुटलो व माघारी फिरलो. पुन्हा परेशान नागरिकांना जलवाहिनी फुटली असल्याचे दिसले हे सांगत, पाणी समस्येबाबत थोडाफार संवाद साधून परेशान झालेला मी घरी पोहोचलो. मनात पाणी समस्ये बाबतचे नाना विचार घेऊन. आज रामनवमी समस्त भारतवासीयांच्या हृदयात विराजमान असलेल्या रामाचा जन्मदिवस आणि कित्येक नागरिकांच्या घरात आज पाणी नाही या विचारामुळे दु:ख झाले. शहरात रस्त्यांचे काम सुरु असल्याने जलवाहिनी फुटू शकते याकडे कुणाचे लक्ष असते की नाही? जेंव्हा रस्त्याचे काम सुरु असते तेंव्हा पाणी पुरवठा संबंधीत कर्मचारी तेथे हजर राहतात की नाही हे काही माहित नाही. परंतू त्यांनी जातीने हजर राहून जलवाहिनीची काळजी घेणे आवश्यक नाही का ? जलवाहिनी फुटल्यास त्वरीत दुरुस्त सुद्धा केल्या जात नाही. मजूर नाही, अमूक अडचण, तमूक अडचण सांगितली जाते. रस्त्याचे काम असो वा नसो नेहमी पाण्याच्या काही ना काही अडचणींमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. वर्षातून काही दिवस सुद्धा नियमित पाणी पुरवठा केल्या जाऊ शकत नाही? नळ येण्याची निश्चित वेळ ठरवल्या जाऊ शकत नाही? शहरातील विहिरीतून पाणी पुरवठ्याचे नियोजन होऊ शकत नाही काय ? रस्ते , पाणी , वीज, आरोग्य या सुविधांबाबत संबंधीत विभागांनी दक्ष असले पाहिजे. नागरिकांना मुलभूत सुविधाच जर का मिळत नसतील तर या स्थानिक स्वराज्य संस्थांचा उपयोग तो काय?  नागरिक वर्षभर टँकर घेतच आहेत. पाण्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च करीतच आहेत. काही नागरिक वर्षभर “लिकेज” च्या ठिकाणांहून दुरून-दुरून पाणी आणतच आहेत. वर्षानुवर्षे हेच सुरु आहे. घरात पाणी नसेल तर किती तारांबळ होते हे जाणा, गृहिणींच्या समस्या जाणा, करा एखादे सर्वेक्षण. अधिकारी , लोकप्रतिनिधी यांनी नागरिकांच्या समस्या विचारण्यास सुद्धा वेळोवेळी गेले पाहिजेअशी काही अपवादात्मक उदाहरणे सुद्धा असावीत. गेली कित्येक वर्षे ज्ञानगंगा धरणातून पाणी पुरवठा होतो. परंतू भविष्यकाळाचा विचार करून एखादा प्रकल्प आणखी होऊ शकतो का ? यावर काही नियोजन आहे की नाही? खामगांव शहरात पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.अनेक हातपंप नादुरुस्त होऊन पडले आहेत, त्याबाबत सांगूनही काही केले जात नाही.जनता पाण्यासाठी कासावीस आहे परंतू जनतेकडे साफ दुर्लक्ष होत आहे. खामगांव शहरात जवळपास सर्वच भागात नागरिक पाणी समस्येने त्रस्त झाले आहेत. ही समस्या जर अशीच राहेली तर आफ्रिकेतील केपटाऊनसारखी समस्या निर्माण होईल. लोक शहर सोडून जातील. एकेकाळी पाण्याने समृद्ध असलेले शहर आज भकास वाटते. नटराज गार्डन, जनुना तलाव बगीचा, राजीव गांधी उद्यान अतिक्रमणाने ग्रस्त व पूर्वीसारखे हिरवेगार दिसत नाही. एक गांधी बगीचा तेवढा थोडा बहुत रमणीय आहे. गेल्या काही वर्षात शहरातील लोक दिवस निघाला की चिंताग्रस्त दिसतात. त्यांच्या चे-यावर एक परेशानी असते. त्यांची ही चिंता ही परेशानी का आहे ? “इस शहरमे हर शक्स परेशानसा क्यूं है ?” असा प्रश्न पडतो व या प्रश्नाचे उत्तर शोधू गेल्यास त्यांच्या परेशानीचे कारण “पाणी” हेच आहे हे स्पष्ट होते. मेहेरबान प्रशासकीय अधिकारी , स्थानिक स्वराज्य संस्था यांना जर जनतेविषयी खरोखर आपुलकी असेल तर त्यांनी नागरिकांना भेटी दयाव्यात, त्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात. निदान एवढे जरी केले तरी त्यांची परेशानी थोडी हलकी होईल.

०७/०४/२०१९

Januna Lake dried this year but Rotary Club Khamgaon took initiative of cleaning this lake

गाळमुक्त तलाव....रोटरीचा दिलासा   
     जनुना तलाव आटला, खामगांवातील नागरिकांना दु:ख झाले. माध्यमांवर आटलेल्या जनुना तलावाची चित्रे आणि चित्रफित झळकली. सर्व खामगांववासी हळहळले. परंतू अल्पावधीतच  वृत्तपत्रात जनुना तलावातील गाळ रोटरी क्लब काढणार या आशयाची बातमी झळकली व गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर जनुना तलाव सफाई व गाळ काढण्याच्या मोहिमेची सुरुवात 
मा. जिल्हा संघचालक महादेवराव भोजने यांच्या हस्ते यंत्रांचे विधिवत पूजन करून तसेच स्थानिक आमदार आकाश फुंडकर, रोटरी क्लब सदस्य, जैन संघटना पदाधिकारी तसेच अनेक गणमान्य नागरीक यांच्या उपस्थितीत करण्यात आली. या गाळ उपस्यामुळे तलावाची साठवण क्षमता वाढेल शिवाय शेतक-यांना सुद्धा गाळ मोफत उपलब्ध होणार आहे. दिवसेंदिवस पाण्याची समस्या मोठी बिकट होत आहे. पाण्याची पातळी खालावत आहे. पाणी फाउंडेशनने या बाबत अभ्यासपूर्ण सर्वेक्षण केले आहे. त्यांचे कार्यकर्ते याबाबत जागरूकता निर्माण करीत आहेत. याच पार्श्वभूमीवर खामगांव नगर परिषदेने रोटरी क्लबशी संपर्क साधून जनुना तलाव गाळमुक्त मोहीम सुरु केल्याचे मुख्याधिकारी धनंजय बोरीकर यांनी कळवले आहे. ही मोहीम यशस्वी व्हावी म्हणून अनेक लोक पुढे सरसावले आहेत. जैन संघटनेने 2 जेसीबी व 1 पोकलँड मशीन विनामूल्य दिले आहे. केमिस्ट असोशिएशन कडून 1 लाख 11 हजार रुपये मदत दिली आहे. तलाव गाळमुक्त करण्याचे वृत्त येताच खामगांवकर सुखावले आहेत. जलसंधारण ही आता आवश्यक बाब आहे अन्यथा पुढील काळ मोठा बिकट असेल. आफ्रिकेतील केपटाऊन येथे आता पाणीच शिल्लक नाही. महाराष्ट्रात गतकाळात लातूर शहराला रेल्वेने पाणी पाठवले गेले होते.नागरिक, प्रशासन, लोकप्रतिनिधी यांनी सर्वानीच हे जाणणे अत्यावश्यक आहे. या बाबत कुणी काही सुचवत असल्यास त्याचा स्विकार होणे अपेक्षित आहे, जागरूकता निर्माण करीत असेल तर ती सकारात्मक पद्धतीने स्विकारणे आवश्यक आहे. आपले खेडे, आपले शहर यांच्या  विकासाच्या  प्रश्नावर सर्वानीच सुज्ञतेने, प्रगल्भतेने एकत्रित येऊन हा प्रश्न मार्गी लावणे जरुरी आहे. खामगांव शहरात सध्या काही तरुण स्वयंप्रेरित होऊन जनुना तलाव साफ सफाई मोहिमेत अग्रेसर झाले आहेत. या तरुणांचे हे कृत्य अनुकरणीय व प्रेरणादायी आहे. अजिंक्यतारा किल्ल्यावर याच पद्धतीने जलसंधारण, वृक्षारोपण केल्यावर किल्ल्याच्या पायथ्याच्या परीसरात पाण्याची पातळी वाढली आहे. जनुना तलाव गाळमुक्त करण्याची मोहीम दोन महिने चालणार असून दररोज 8 तास गाळ उपसा होणार आहे यासाठी अनेक मालवाहू गाड्या कार्यास लागल्या आहेत. संपूर्ण तलाव गाळमुक्त झाल्यावर तलावाची साठवण क्षमता दुपटीने वाढण्याचा कयास आहे. जनुना तलाव हा खामगांववासीयांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. येथे दररोज जाणारे अनेक नागरिक आहेत.येथे वर्षभर जलविहार करण्यास जाणारे सुद्धा अनेक आहेत. देवी व गणपती विसर्जनानंतर हे जलतरण करणारे लोक हा तलाव स्वयंस्फुर्तीने साफ करीत असतात. म्हणूनच तलाव आटल्यावर दु:ख झाले परंतू रोटरीच्या मोहिमेने दिलासा दिला.आगामी पावसाळ्यात या तलावात भरपूर पाणीसाठा होवो, त्या पाण्याचे जतन होवो, त्या पाण्याचा शहरासाठी उपयोग होवो हीच सदिच्छा. मृच्छकटिक नाटकात नायक चारुदत्त एक भरतवाक्य म्हणतो त्यातील सुरुवातीच्या ओळी आहेत
क्षीरीण्य: सन्तु गावो भवतु वसुमती सर्वसंपन्नसस्या
पर्जन्य: कालवर्षी सकलजनमनोनन्दिनो वान्तु वाता:
अर्थात :- “गायी खूप दुध देणा-या असोत. पृथ्वी सर्व प्रकारच्या धान्यांनी समृध्द असो. पाऊस वेळेवर पडो. सर्व लोकांच्या अंत:करणाला आनंदित करणारे वारे वाहोत.
                                             शेवटी सर्वांची हीच अपेक्षा असते. नाही का ?

100 years of Jallianwala Bagh massacre


हृदयद्रावक घटनेची 100 वर्षे  
     कित्येक ऐतिहासिक घटना अशा आहेत की त्या ऐकून आजही मन सुन्न होते, अंगावर सर्रकन काटा उभा राहतो, अत्याचार करणा-या परकीय आक्रमकांविरुद्ध , इंग्रजांविरुद्ध क्रोध उत्पन्न होतो. अशाच एका घटनेला येत्या शनिवारी म्हणजेच 13 एप्रिल 2019 रोजी शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. 13 एप्रिल 1919 चा तो दिवस होता.पंजाबातील अमृतसर येथे बैसाखी सण साजरा करण्यासाठी पंजाबी बांधव एकत्र आले होते.खालसा पंथाच्या  स्थापनेचा सुद्धा उत्सव होता. रौलेट कायद्याचा निषेध सुद्धा होताच अहिंसेच्या मार्गाने हे आंदोलन होणार होते. ठिकाण होते “जालियनवाला बाग”. सहा-सात एकराच्या परिसरात काही अरुंद प्रवेशव्दारे व चारही बाजूंनी दहा फुटाच्या भक्कम भिंतीनी वेढलेल्या या मैदानात पंजाबी बांधव एकत्र होत होते. ही संख्या हजारोच्या घरात पोहोचली. रौलेट अॅक्ट चा अंमल होता. परंतू नागरिक अनभिज्ञ होते. विक्रते, दर्शक असे अनेक लोक येथे हजारोच्या संख्येने दाखल झाले होते. परंतू थोड्याच वेळात तेथील प्रवेशव्दारावर जनरल डायर हा क्रूरकर्मा आपल्या सैनिकांना घेऊन दाखल झाला. 25000 हून अधिक लोक येथे एकत्र आले होते. क्रुरकर्मा डायरने अचानक आपल्या सैनिकांना गोळीबार करण्याचे आदेश दिले. फैरी झाडल्या जाऊ लागल्या. निशस्त्र नागरिकांना पळण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता, जाण्याचा मार्ग अरुंद होता व तेथूनच
गोळीबार सुद्धा होत होता. काही मार्ग बंद होते. जीवाच्या आकांताने सर्व सैरभैर पळू लागले. बागेतलीच एका विहिरीत कित्येकांनी उड्या टाकल्या. इंग्रज सरकारने 379 लोक मृत्यूमुखी पडल्याचे सांगितले तर काँग्रेसने 1000 लोक शहीद झाल्याचा आकडा दिला होता. कित्येक लोक जख्मी झाले होते. तसेच गोळीबारातून बचाव व्हावा म्हणून विहिरीत उड्या मारल्यामुळे 120 लोक मृत्यूमुखी पडले होते. जालान येथील हिम्मत सिंग कुटुंबियांची ही बाग. जालान येथील असल्यामुळे त्यांना जालानवाले असे नांव पडले. व त्यामुळेच हे स्थान जालियानवाला बाग म्हणून ओळखल्या जाऊ लागले. इंग्रज सरकारच्या एका सनकी अधिका-यामुळे निरपराध, निशस्त्र भारतीयांचे येथे हकनाक बळी गेले. पुढे या ठिकाणाला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्यात आले. इंग्रजाने केलेल्या या जुलमाच्या खुणा आजही येथील भिंतींवर दिसतात. ब्रिटनच्या संसदेत पंतप्रधान थेरेसा मे यांनी जालियानवाला बाग हत्याकांडा बाबत खेद व्यक्त केला आहे. यापूर्वीही 2013 मध्ये तत्कालीन पंतप्रधान डेव्हिड कॅॅमरून यांनी या घटनेला लज्जास्पद म्हटले होते. वरील दोहोंनीही माफी मात्र मागितली नाही. तेथील मजूर पक्ष मात्र ब्रिटीश सरकारने भारताची माफी मागावी अशी मागणी लावून धरली आही. या  घटनेला 100 वर्षे पूर्ण होत आहे. आपण सर्वानी देशासाठी आपले प्राण अर्पण केलेल्यांचे नेहमीच ऋणी असले पाहिजे. आज दुर्दैवाने भारतात पुनश्च जातीवाद, प्रांतवाद, धर्मभेद वाढीस लागला आहे. कुणी राजकीय पोळी शेकण्यासाठी आपल्या मनात काही भरले की आपण आपल्या सदसदविवेकबुद्धीने विचार न करता तसेच वागू लागतो. डायरच्या गोळीबार करणा-या सैनिकांत राजपूत , शिख तुकड्या होत्या. परंतू त्या तुकड्या इंग्रजांच्या अधीन होत्या. उद्या चालून कुणी आपल्या मनात जालियनवाला बाग येथे राजपूत व शिख सैनिकांनी गोळ्या झाडल्या म्हणून खूळ घालायला नको. जर घातलेच तर आपण त्यास थारा द्यायला नको. महाराष्ट्रात असे जातीय विष हेतूपुरस्सर पेरल्या गेले आहे. त्याचे भीषण परिणाम आपण नुकतेच पहिले आहेत. आपल्या इतिहासातून चांगले तेवढे घेणे जरुरी आहे. आजच्या पिढीला ऐतिहासिक घटना क्वचितच ठाऊक असतात. नवीन पिढीला परकीयांनी आपल्या राष्ट्रात कसे अत्याचार केले होते याची आठवण, जाणीव करून देणे जरुरी आहे. जनरल डायरला लेफ्टनंट गव्हर्नर मायकेल ओडवायर याने पाठवले होते. जालियानवाला बाग नरसंहाराचा प्रतिशोध उधमसिंगने 20 वर्षानंतर घेतला. मोजकेच स्वतंत्रता सेनानी, क्रांतिकारक यांची माहिती नवीन पिढीला आहे त्यामुळे उधमसिंग विषयी पुन्हा कधीतरी. जालियानवाला बागेतील नरसंहारात बळी पडलेल्या भारतीय बंधू भगीनींना विनम्र श्रद्धांजली.

०१/०४/२०१९

Januna Lake dried this year , its very sorrowful for Khamgaon natives , article describe this


तलावाने डोळ्यात पाणी आणले 
     आठ दिवसांपूर्वी माध्यमांवर आपल्या होय आपल्याच जनुना तलावाची विदारक , दु:ख आवेग रोखता येणार नाही अशी चित्रे आणि चित्रफित झळकली. जनुना तलाव म्हणजे खामगांवकरांच्या जिव्हाळ्याचा विषय. कित्येक वर्षे या तलावांनी खामगांवकरांची तहान भागवली. इंग्रज कालीन हा तलाव म्हणजे खामगांव शहराच्या वैभवाची साक्ष. “कॉटन सिटी” असलेल्या या शहरात अनेक विहिरी आणि जनुना तलाव यांमुळे वैभव व जल समृद्धी होती. परंतू इंग्रज गेले त्या नंतर हळू-हळू काळ बदलला , शहराची लोकसंख्या वाढली , दुरदृष्टीहीन राजकारण आले. प्रशासनाने खामगांव शहराची तहान भागवणा-या विहीरींकडे आणि अर्ध्या खामगांव शहराची तहान भागवेल अशा या जनुना तलावाकडे साफ दुर्लक्ष केले. अनेक विहिरी आज कचरा कुंड्या झाल्या आहेत. आणि आता जनुना तलाव कोरडा ठण 

पडला आहे. याला प्रशासनाकडे “तीव्र उन्हाळा” वगैरे अशी कारणे आहेतच. परंतू वर्षभर या तलावावर पोहायला म्हणून जाणारे आम्ही या तलावातून वाया जाणारे हजारो लिटर पाणी डोळ्यादेखत वाहून जातांना पहात होतो. या वाया जाणा-या पाण्या बाबत विचारणा केली तर “तलावात मोठा साठा  आहे त्यामुळे प्रेशर कमी होणे गरजेचे असते म्हणून हे पाणी सोडले जाते” असे सांगण्यात आले होते. लाखो लिटर पाणी वाया गेले. माझ्या लहानपणापासून म्हणजे गेल्या 40 वर्षात हा तलाव पहिल्यांदाच असा कोरडा ठण झालेला मी पहात आहे. त्यापूर्वी हा तलाव आटल्याचे जेष्ठ नागरिक सांगतात. कोरड्या तलावाची ती चित्रे पाहून सर्वांनाच अतीव वेदना झाल्या. अनेक मित्रांचे फोन आले. आमच्या शालेय जीवनात मोबाईल, टीव्ही असा विरंगुळा नव्हता त्यामुळे कित्येकदा तरी वाटेतल्या वडाच्या पारंब्याना लोंबकळत आम्ही जनुना तलाव गाठत असू. सुंदर रमणीय बगीचा, भव्य वृक्षांची दाट छाया, वन्य प्राणी पाहिले व तद्नंतर वन भोजन झाले की त्या तलावात आम्ही यथेच्छ डुंबत असू. कुणी नातेवाईक आले तर त्यांना सुद्धा शिल्पे असलेल्या भव्य प्रवेशव्दाराच्या या तलावाच्या बगीचात घेऊन जात असू. “पाणवठे जतन करावे, वने राखावी” असे सांगणा-या शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातील आम्ही व आमचे सांप्रत कालीन लोकप्रतिनिधी मात्र शिवरायांचे काय अनुसरण करीत आहोत? जे आहे ते सुद्धा आपण गमावण्याच्या मागे लागलो आहोत. जनुना तलावाची आपण उपेक्षा केली त्याचे तळ आज उघडे झाले आहे. त्याच्या भिंतीवरील लोखंडी पाईप काढून नेणारे आम्ही, उद्या कदाचित इंग्रजांनी बांधलेल्या त्या भक्कम दगडी भिंतीच्या फाड्या सुद्धा काढून घेण्यास कमी करणार नाही. प्रशासन ढिम्म आहे . विना मुख्याधिका-याची ही आपली नगर परिषद निव्वळ इमारतीच्या दुष्टीने समृद्द दिसते. नळाला पाणी नाही, कचरा कुंड्या झालेल्या विहिरी, आणि आता शुष्क झालेला खामगांव शहरात जल समृद्धी असल्याचा एकमेव पुरावा असलेला जनुना तलाव या सर्वांमुळे खामगांवकरांच्या डोळ्यात पाणी आले आहे. माध्यमांवरील जनुना तलाव शुष्क झाल्याचे ते फोटो पाहून खामगांवकरच नव्हे तर मुळचे खामगांवचे परंतू आता चरितार्थासाठी देश विदेशात गेलेल्या अनेकांच्या संवेदनशील प्रतिक्रिया आल्या , दुरध्वनी आले. परंतू या आटलेल्या तलावाबाबत प्रशासनास काही वाटले की नाही. या आटलेल्या तलावाचे खोलीकरण करावे, नाम किंवा पाणी फाउंडेशन यांच्याशी संपर्क करून काही करता येईल का हे त्यांच्या मनात आले की नाही देव जाणे ? स्थानिक प्रशासन , खामगांवकर , सर्व पक्षीय पदाधिकारी यांनी निरनिराळ्या प्रसंगी रॅल्या , मिरवणुका , प्रदर्शने करून आपली शक्ती दाखवण्यापेक्षा खामगांवच्या पाणी समस्येसाठी एकत्र येऊन भावी पिढीसाठी काहीतरी उपाययोजना करायला नको का ? नळाला पाणी येत नाही , मीटरचे नळ धूळ खात पडले आहे , ज्याच्याकडे पाहून “चला पाणी आहे” असा दिलासा  वाटत होता तो तलाव सुद्धा आता शुष्क झाला. खामगांवच्या नेत्यांनी या पाणी समस्येकडे जातीने लक्ष घालणे जरुरी आहे कारण पाणी समस्येमुळे नागरिकांच्या, गृहीणींच्या डोळ्यात आलेले पाणी भविष्यातील निवडणूकांत तुमच्या तोंडचे पाणी न पळववो.
ता.क.-हा लेख लिहून होतो न होतो तोच प्रश्नकाल या वर्तमानपत्रात "रोटरी क्लब लोकसहभातून जनुना तलावातील गाळ काढणार" ही गर्मीत थंडावा मिळावा तशी सुखावह बातमी वाचनात आली.