३१/१०/२०१९

A new research has found rising sea will sink Mumbai by 2050. Article describe about that,


ये बॉम्बे शहर हादसो का शहर है...
पूर्वाश्रमीच्या बॉम्बे म्हणून ओळखल्या जाणा-या मुंबई साठी सरकारने एखादी योजना तात्काळ राबवणे किंवा तसे अभियान त्वरीत हाती घेणे आता निकडीचे झाले आहे. मुंबई मध्ये नाना प्रकारच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. हजारो लोकांचे लोंढेच्या लोढे दररोज मुंबई मध्ये दाखल होत असतात. परिणामी एकट्या मुंबई शहराची लोकसंख्या ही एखाद्या छोट्या राज्याच्या लोकसंख्येच्या बरोबरीत आहे. प्रचंड प्रमाणात लोकसंख्या एकवटल्याने त्यांच्या राहण्याची , पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या आहे. तसेच सांडपाणी , झोपडपट्ट्या , डंपिंग ग्राउंड तेथे लागणा-या आगी , प्रदूषण , भूमाफिया व त्यांनी बेकायदेशीर निर्माण केलेली रहिवासी संकुले. समुद्र मागे हटवून बनवलेला मरीन ड्राइव्ह त्यामुळे पावसाळ्यात मुंबई मध्ये तुंबणारे पाणी , गटारात होणारे मृत्यू अशा कितीतरी समस्या आहेत. आताशा पालघर येथे वारंवार होत असणा-या जमीन हादरण्याच्या घटना ह्या समुद्र मागे हटवून त्यावर मानवाने केलेल्या अतिक्रमणाचाच परिणाम आहे. तरीही आता सरकार कोष्टल रोड करण्याच्या तयारीत आहेच . शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक समुद्राच्या प्रवाळ भागात निर्माण होत आहे. स्मारकास यत्किंचित विरोध नाही. परंतू कुठेतरी निसर्गाचा विचार सुद्धा केलाच पाहिजे. मुंबई व मुंबई शहराच्या समस्या आठवण्याचे कारण की , न्यू जर्सी , अमेरिकेतील क्लायमेट सेंटर या संस्थेनं एक शोधनिबंध सादर केला ज्यात एक धक्कादायक गोष्टी समोर आली आहे. या संस्थेच्या शोध निबंधात समुद्राची पातळी वाढत असल्याने 2050 पर्यंत जगातील काही महत्त्वाची शहरे समुद्राच्या पोटात जाण्याची शक्यता आहे. असे अनुमान काढले आहे. समुद्राच्या काठावर वसलेल्या शहरांमध्ये राहणाऱ्या करोडो लोकांना याचा फटका बसण्याची चिन्हं आहेत. व्हिएतनाम , बँकॉक, शांघाय या आशियातील
आर्थिक केंद्र असलेल्या शहरांचा बहुतेक भाग 2050 पर्यंत समुद्राच्या पाण्यात असेल. भारताची आर्थिक राजधानी असलेलं मुंबई शहर सुद्धा समुद्राच्या पोटात जाण्याची भीती आहे. 7 बेटांचं शहर असलेल्या मुंबईतील  कुलाबा हे  भविष्यात विरारचा भाग होईल. म्हणजे विरार पर्यंतचा सर्व भाग समुद्र गिळंकृत करेल. त्यामुळे भविष्यात सुरक्षित अशी नवी शहरं वसवण्यावर भर द्यावा लागेल. परंतू या सर्व बाबतची तसेच देशातील इतरही समस्यांबाबत विचार करण्यास इथल्या राजकारण्यांना वेळ मिळेल तेंव्हा ना ! येथे राजकारणाचा विशेष काही अनुभव नसतांना मुख्यमंत्री बनण्याची इच्छा , त्यासाठी चढाओढ , एका पक्षाने काही केले तर त्यात दुसरा पक्ष आडवी टांग करतो , एकाच पुलाचे दोन-दोन , तीन –तीन वेळा उद्घाटन, एकमेकांबाबत शिवराळ भाषेत चिखलफेक , सत्तेची हाव पूर्ण करण्यासाठी या पक्षातून त्या पक्षात कोलांट्याउड्या मारणे, निव्वळ आमची मुंबई आमची मुंबई करायचे आणि मुंबईसाठी प्रत्यक्षात करायचे मात्र काही नाही. या सर्व बाबींतून आपल्या राजकारण्यांना आपला देश , आपली शहरे त्यातील नागरिकांच्या समस्यांना फार कमी वेळ मिळतो. त्यामुळे 2050 पर्यंत सुद्धा त्यांना वेळ मिळेल की नाही याची निश्चिती नाही. तेंव्हा नागरिकांनीच दक्षता घेणे जरुरी आहे. मुंबईचा मोह टाळून इतर शहरांत रोजगाराचे पर्याय शोधावे. 2050 चा विचार केला तर हे नैसर्गिक संकट आता केवळ 25-30 वर्षंच दूर आहे. त्यामुळे धोकादायक अशा शहरांमधील लोकांनी इतरत्र स्थलांतरीत होण्याकडे लक्ष द्यावे. सरकार वर विसंबून राहू नये. 
        1661 मध्ये सात वेग-वेगळी बेटे असलेले हे शहर ब्रिटनच्या राजकुमारासह आपल्या कन्येचा विवाह लावून देतांना पोर्तुगिज राजाने आंदण म्हणून भेट दिले होते. तद्नंतर इंग्रजांनी या शहराची सुंदर रचना केली. महानगरपालिका ,रेल्वे स्थानक सारख्या वास्तुशिल्पाचा नमुना असलेल्या इमारती बांधल्या. आपण मात्र हे शहर विद्रूप बनवले. त्या विद्रूपतेने येथे नेहमीच काही ना काही धोके अर्थात हाद्से होत असतात. त्यातच आता येत्या काळात हा समुद्रात बुडण्याचा “हादसा” मुंबई मधे येण्याची शक्यता आहे. व तो टळो ही मागणी ईश्वरा शिवाय करणार तरी कोणाला ?

१५/१०/२०१९

Article about...NCP Chief Sharad Pawar's objectionable hand movements.

...तेरी जवानी तौबा तौबा...” 



1960 च्या दशकातील पारसमणी चित्रपटातील लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेली सर्वच गाणी गाजली होती. याच चित्रपटात “हसता हुआ नुरानी चहेरा ... तेरी जवानी तौबा तौबा ऐ दिलरुबा ” हे एक गीत होते.  हे गाणे परवा आठवले. गाणे आठवण्याचे कारण होते आपले जाणते राजे म्हणवल्या जाणारे शरद पवार. “अभी तो मै जवान हुं” असे काही सभांतून शरद पवार म्हणाले. वय जरी वाढले तरी माणसाने मनाने तरुण असावे हे खरेच आहे . बाळासाहेब ठाकरे सुद्धा तसेच म्हणत. परंतू मनाने तरुण असले, आनंदी उत्साही असले तरी हे तरुणपण व्रात्य तरुणांसारखे नसावे. विविध उच्चपदे, मुख्यमंत्रीपद, केंद्रीय मंत्रीपद यांसारख्या पदावर राहिलेल्या व्यक्तीने आपले तरुणपण प्रदर्शित करतांना भान ठेवले नाही तर ते विचित्र व हास्यास्पद ठरते.तसेच शरद पवारांचे झाले.बार्शी येथील सभेत “दिलीप सोपल यांनी इतकी वर्षे काय केले?“ असे विचारतांना त्यांनी आक्षेपार्ह असे हातवारे केले. जाहीर सभेत एका जेष्ठ नेत्याचे हे असे करणे सुसंस्कृत महाराष्ट्रवासियांना, सुज्ञ मतदारांना अजिबात रुचणारे नाही. “अभी तो मै जवान हुं” असे म्हणणा-या या जवानास असे करतांना पाहून “ये क्या हुवा है इस बांके जवान को ?” असा प्रश्न जनतेला पडला. ते झाल्यावर अकोला जिल्ह्यातील बाळापूर या मुस्लिम बहुल मतदारसंघात वाडेगांव येथील प्रचारसभेत सय्यद अझहरुद्दिन या तरुण, उच्चविद्याविभुषित कॉंग्रेस
पदाधिका-यास शरद पवार यांनी अभी तो मै जवान हुं या त्यांच्या वक्तव्याप्रमाणे ढोपर मारीत मागे ढकलले. शरद पवारांसारख्या जेष्ठ नेत्यासह फोटो निघेल म्हणून समोर आलेल्या या नगर परिषदेच्या स्विकृत सदस्यास त्यांनी आपल्या ढोपराने मागे ढकलले. याची चित्रफीत लगेच माध्यमांत पसरली. अजहरुद्दिन हे तरुण आहे. एखाद्या तरुण नेत्यास जेष्ठ नेता अशी वागणूक देतो आहे हे सुद्धा सुज्ञ मतदारांना रुचणारे नाही. याउलट शरद पवारांनी जर अझहरुद्दीन यांना जर पाठीवर हात ठेऊन स्वागताच्या त्या मोठ्या पुष्प्मालेत  घेतले असते तर शरद पवार यांची ती कृती मतदारांना अधिक भावली असती.फडणवीस यांच्या टीकेस उत्तर देताना त्यांनी पुन्हा “कुस्ती पहेलवानांशी होते या अशांशी होत नाही” हे म्हणताना सुद्धा हातवारे केले ते सुद्धा कॅमे-यात कैद झाले. एका कार्यकर्त्यास ढोपराने मागे ढकलणे, आक्षेपार्ह असे हातवारे करणे हे स्वत:ला तरुण म्हणवणा-या शरद पवार यांच्यासारख्या जेष्ठ नेत्यास उचित दिसत नाही. लोकसभा निवडणूकीत पार्थ पवार यांनी उभे राहू नये अशी पवारांची मनीषा होती. परंतू ते उभेे राहीले व पडले. सतत सत्ता, सत्तेची फळे उपभोगत आल्यावर आता सत्तेपासून वंचित रहावे लागत आहे. सहकारी पक्ष सोडून गेले आहेत. कौटुंबिक कलह असल्याच्या चर्चा आहे. आगामी निवडणूकीत सुद्धा सत्ताप्राप्तीची चिन्हे दिसत नाही. पक्षात राष्ट्रीय पातळीवरचे ते एकटेच नेते आहे. पी. ए. संगमा निवर्तले ,तारिक अन्वर पुनश्च स्वगृही म्हणजे काँग्रेस मध्ये गेले. पवारांंवर गुन्हे दाखल झालेे, काका-पुतण्या दोघांनाही ईडी च्या नोटीस आल्या. या सर्व पार्श्वभूमीवर पवार काहीशे हताश, निराश, हतबल झाले आहे. ख-या जाणत्या राजा सोबत प्राणपणाने , साथ देणारे निष्ठावंत मावळे होते. परंतू या जाणत्या राजा जवळचे निष्ठावंत , पुत्राप्रमाणे असल्याचे म्हणणारे मावळे मात्र राजास सोडून परांगदा झाले आहेत. त्यामुळे मी तरुण आहे म्हणत हा राजा युद्धास सामोरा जात आहे खरा परंतू राजा कडून एखाद्या गद्धे पंचविशीतील तरूणप्रमाणे घडणा-या हातवा-यांसारख्या कृतींमुळे “तेरी जवानी तौबा तौबा” असे कदाचित महाराष्ट्रातील सुसंस्कृत जनतेला वाटत असावे.

१४/१०/२०१९

Article about a typical rickshaw used in towns for promoting an upcoming or current movie.

आठवण चित्रपटांच्या जाहीरातीची   

      शाम टॉकीज मे रोजाना चार खेल....असा आवाज लाऊड स्पीकर वर ऐकला की कान देऊन ऐकण्याचे ते दिवस होते. कारण चित्रपटांना तेंव्हा चांगले दिवस होते. नवीन चित्रपट कोणता येत आहे याची मोठी उत्कंठा असे. चित्रपट चार-चार खेळात तूफान गर्दी खेचत असत. भारतात सिनेमा 40 च्या  दशकाच्याही पूर्वीपासून आला व 90 च्या दशका पर्यन्त त्याला चांगले दिवस होते. आमचे बालपण 80 च्या  दशकातले. टेलीव्हीजनचे आगमन होण्यापूर्वीचा किंवा आगमनाचा प्रारंभ होण्याचे ते दिवस होते. काही शहरांत ते आगमन झाले सुद्धा होते. नवीन सिनेमा टॉकीज मध्ये आला की त्याची जाहीरात रिक्षा फिरवून केली जात असे. सायकल रिक्षाच्या दोन्ही बाजूस सिनेमाचे पोष्टरआत लाऊड स्पीकर मशीनरिक्षाच्या छताच्या कोपर्‍यावर एक भोंगा टांगलेला. अशी ती रिक्षा सिनेमाची जाहीरात करीत फिरत असे. या जाहीरातीचा आवाज ऐकला कीकोणता सिनेमा लागला आहे या उत्सुकतेमुळे ती जाहिरात आबालवृद्ध लक्षपूर्वक ऐकत. सिनेमाची जाहिरात करण्याची ही अशी त-हा जवळपास सर्वच शहरांत होती. तशीच ती खामगांवात सुद्धा होती. खामगांवातील रिक्षाच्या भोंग्यावर भँवरअसे लिहिलेले असे. किंबहुना आजही असते. लहानपणी भँवरम्हणजे काय ? व ते का लिहिलेले असते हे काही समजत नसे. संपूर्ण लक्ष असे ते कोणता चित्रपट लागला त्याकडे. काही मित्र तर त्या रिक्षावाल्याला थांबवून पुन्हा-पुन्हा ती जाहिरात ऐकत.कारण ती जाहीरात करणा-याचा आवाज,त्याची जाहिरात म्हणण्याची शैली होतीच तशी. अगदी खामगांवातील "अमिन सयानी" म्हटले तरी अतिशयोक्ती होणार नाही. देखना ना भुलीये , "नसीब अपना अपना" , आप भी आईये पुरे परीवार को भी साथ लाईयेही ओळ ऐकली की महिला वर्गाच्या हट्टामुळे संपूर्ण परीवार थिएटरला रवाना होत असे. बाल्कनी 5 रु तिकीट होते , परंतू ते सुद्धा महाग वाटत होते. सिनेमाची जाहिरात ध्वनीमुद्रीत केलेली असल्याने ती म्हणणारा माणूस मात्र कोणाला दिसत नसे. तो कोण ? कसा दिसतो ?, कुठे राहतो हे थिएटरवाले व अपवादात्मक काही जणांना ठाऊक होते. चित्रपटाची माहिती मिळते आहे ना मग जाहीरात कुणी का करेना ! असे

 जनतेला वाटत असे. भोंग्यावर लिहिलेले ते भँवरहे अक्षर मात्र परमनंट मेमरीतकुठेतरी स्टोअर होतेच. चित्रपटाची जाहिरात ऐकून मग थिएटर मधील पोस्टर पाहण्यासाठी मुलांचे टोळके जात असे. जाहीरातीत केवळ वायस्कोके लिएअसे का असते काही कळत नसे व कुणाला विचारायची हिम्मत सुद्धा नसे. काही मुलांची ती जाहिरात पाठ होऊन जात असे. मग प्रौढांसाठी असलेल्या चित्रपटाच्या जाहीरातीतील नको त्याशब्दांसकट काही मुले ती जाहीरात सर्वांसमोर म्हणत व त्यानंतर घरात काही क्षण  एक प्रकारची नीरवता पसरे. अनेक चित्रपट पाहिले , जाहिराती ऐकल्याचित्रपट मध्येच बंद झाला किंवा काटला की थिएटर वाल्याचे नांव घेऊन केलला उद्धार ऐकला. चित्रपट पाहण्याची ती मजा कमी होतांना सुद्धा पाहिले. पीटातले प्रेक्षक कमी झालेले पहिले. चांगला प्रसंगसंवाद याला आता शिट्ट्याटाळ्या पडत नाही.  तसे संवाद लिहिणारे लेखक नाही व "डायलॉग किंग" राजकुमार सारखे नट सुद्धा नाहीत. कालांतराने व्हिडीओ ,टीव्हीकेबल टीव्ही , संगणक ,मोबाईल आले. शोले , शहंशहा , आराधना , बॉबी इ. सारख्या चित्रपटांच्या तिकीटासाठी लांब-लांब रांगा पाहिलेली थिएटरे सुनी-सुनी दिसू लागली. पुढे परमनंट मेमरीतअसलेले भँवरम्हणजे "भँवरलाल छांंगाणी" या नावातील भँवरअसे लघुरूप आहे हे कळले. अनेकांना ते आजही माहिती नसण्याची शक्यता आहे. त्या चित्रपट जाहिराती भँवरलाल स्वत: म्हणत असत. एकदा एका निर्माणाधीन भव्य मॉल समोरून बाजारात जात होतो. त्या ठिकाणी पूर्वी मोहन टॉकीज होती. तिथेच कुठल्यातरी रिक्षावर जाहिरात सुरु होती. चित्रपटाची नव्हे तर कुठल्यातरी सेलची. त्या जाहिरातीमुळे “भँवरलिहिलेला भोंगा असलेली रिक्षा , चित्रपटाच्या जाहिराती हे सर्व एखाद्या चित्रपटातील फ्लॅशबॅक प्रमाणे डोळ्यासमोर येऊन गेले.आजही खामगांवात भँवरयांची पिढी जाहिरातीच्याच व्यवसायात आहे. चित्रपटांचे सुगीचे दिवस सरले, त्यांच्या जाहिराती करणारे भँवरलाल छांंगाणीमात्र आजही भोंग्यावर लिहिलेल्या त्यांच्याच नावातील “भँवरया शब्दामुळे तसेच त्यांच्या आवाजामुळे खामगांवकर सिनेरसिकांच्या परमनंट मेमरीतमात्र कायम आहे.