२२/०५/२०२०

Water shortage and careless employees of local governing bodies

सर्व गाव टँकर घेते तर मग कशाला हवा पाणी पुरवठा विभाग ?
पाणी प्रश्न हा खामगांवकरांच्या पाचवीलाच पुजला आहे. कोर्ट परिसरात तर नेहमीच नळ येत नाही सतत काही ना काही अडचण असतेच. आता तर रस्ता दुरुस्तीचे कारणच मिळाले आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत व कोरोना मुळे सरकार सतत हात धुवा असे आवाहन करीत असूनही 15 - 15 दिवस नळ येत नाही. नळाला पाणी येत नसल्यामुळे नागरिकांच्या डोळ्यात पाणी यायची वेळ आली आहे. नागरिकांचे हजारो रुपये पाण्यावर खर्च होत आहेत. हे सांगितल्यावर, “टँकर तर सर्व गावच घेते” , “टँकर घेता तर नळ कनेक्शन बंद करण्याचा अर्ज करा” असे उत्तर मिळते. म्हणजे कहरच आहे. नागरिक करदाते असतात , त्यांच्या करातून कमर्चारी वेतन व इतर शासकीय खर्च शासन करीत असते. नागरिकांना सुविधा पुरवणे हे स्थानिक प्रशासनाचे कर्तव्यच आहे. रस्ता बांधकाम , पाईप लाईन फुटणे हे सर्व समजून घेण्या इतके नागरिक सुज्ञ आहेत. परंतू सतत अशा अडचणी येत असतील तर नागरिक उद्विग्न होतात , कुणीही होईलच. ज्याचे दु:ख त्यालाच कळते. नळ येत नाही अडचण मांडाली तर नळ कनेक्शन बंद करण्याचा उलटा सल्ला मिळतो. वा रे प्रशासन ! हि काय तऱ्हा ? कर्मचा-यांनी नागरिकांना असे बोलणे म्हणजे यांची नागरीकांप्रती काय भावना आहे , हे शासकीय कर्मचारी अर्थात जनतेचे सेवक असून त्याच जनतेशी योग्यप्रकारे बोलत नाही. अनेक भागात हजारो लिटर पाणी वाया जाते , काही भागांत मीटरच्या नवीन व जुन्या अशा दोन्ही जलवाहिन्यांतून पाणी पुरवठा होतो. बालाजी प्लॉट मधील कुणीही राहत नसलेल्या एका घरातील मीटरच्या नळातून सर्व पाणी वाया जाते , अशी कित्येक उदाहरणे आहेत. काही भागात लोक रस्त्यावर पाणी सोडून देतात इतका वेळ नळ सोडतात, काहींनी अवैध कनेक्शन , काहींनी थेट मुख्य जलवाहिनीतून कनेक्शन घेतलेले आहेत तर दुसरीकडे  मात्र काही भागातील नागरिकांना पाणी मिळत नाही किंवा अगदीच अत्यल्प पाणी पुरवठा केला जातो आणि 
त्यांना वरील प्रमाणे उत्तरे मिळतात. प्रामाणिकपणे कर भरणा-या नागरीकांची अडचण समजून न घेता त्यांना वरील प्रकारची उत्तरे देणे म्हणजे स्वत:वरील जबाबदारी झटकून देणेच होय. धरणात पाणी आहे तरीही नागरिकांंना पाण्याचा त्रास आहे. नवीन वाढीव पाणी पुरवठा योजना कुठे अडकली आहे देव जाणे? दिवाबत्ती , आरोग्य , पाणी पुरवठा , शिक्षण इ. सर्व नगर परिषदेची कार्ये आहेत व ती करण्यासाठी नियुक्त कर्मचा-यांची तरतूद असते. परंतू तेच कर्मचारी जेंव्हा नागरिकांकडे लक्ष देत नाहीत पाणी पुरवठा ठप्प झाला असता पाण्याबाबत विचारणा केली की , नळ कमी व उशिरा येत असल्याने पाण्यासाठी टँकर घ्यावा लागतो अशी व्यथा मांडली की , “टँकर तर सर्व गावच घेते” , “टँकर घेता  तर नळ कनेक्शन बंद करण्याचा अर्ज करा” अशी अजब उत्तरे नागरीकांना मिळतात. अशी उत्तरे मिळत असतील तर नागरीकांनी कुठे जावे ? आणि टँकर तर सर्व गावच घेते असे खुद्द न.प.कर्मचारीच म्हणतात तर मग कशाला हवा तो पाणी पुरवठा विभाग व कशाला हव्या स्थानिक स्वराज्य संस्था ?
ता. क. -- योगायोग असा की लेख पूर्ण लिहिला व आज ब-याच दिवसांनी पाणी आले , पाणी पुरवठा असाच सुरळीत राहो हीच ईश्वराजवळ प्रार्थना ( ईश्वरा शिवाय जनतेला दुसरा कोण वाली आहे ? )

२०/०५/२०२०

Why Nepal is angry over India's new road ? article about India-Nepal border dispute


नेपाळ सिमाप्रश्न नवीन डोकेदुखी 
स्वातंत्र्यप्राप्ती नंतर लगेचच फाळणी पुुर्वी 

जो पाकीस्तानच मुळी भारताचा भाग होता त्याच पाकड्यांनी    काश्मीरवर आपला दावा सांगत भारत पाकीस्तान सिमा वाद सुरु केला व तो  आजतायागत सुरु आहे. तत्कालीन पूर्व व पश्चिम पाकिस्तान व भारत या दोन देशांच्या सिमा निर्धारित करणा-या आयोगाचा अध्यक्ष रॅडक्लिफ हा इंग्रज अधिकारी होता. त्यापूर्वी म्हणजे 1914 मध्ये हेन्री मॅकमहोन या इंग्रज अधिका-याच्या अधिपत्याखाली भारत व चिन या देशांचे सिमा निर्धारण झाले होते. चिन या सिमा मानत नाही कारण तत्कालीन स्थितीत या सीमेसाठी झालेल्या सिमला करारात तिबेटचे प्राबल्य होते. आज खुद्द तिबेट चीनच्या अधिपत्याखाली आहे. चिन , पाकीस्तान या देशांच्या सिमा निर्धारित करण्यापूर्वी भारत- नेपाळ सिमा निर्धारित झाली होती. ईष्ट इंडिया कंपनी व नेपाळचे राजे यांच्यातील सुगौली करारानुसार हे निर्धारण झाले होते. त्यानंतर नेपाळ-भारत यांच्यात नेहमीच चांगले संबध राहिले आहेत. नेपाळ व भारत यांच्यातील सिमा या खुल्या आहेत. दोन्ही देशातील नागरिक विना पासपोर्ट व व्हिसा एकमेकांच्या देशात जाऊ शकतात, व्यापर करू शकतात. यानुसार नेपाळ व भारत या दोन्ही देशातील नागरिक परस्परांच्या देशात वास्तव्यास आहेत. तरीही आता कम्युनिस्ट पगडा असलेले व कम्युनिस्ट सरकारची सत्ता असलेल्या नेपाळने भारताशी सिमावादास प्रारंभ केला. चिन – भारत , पाकीस्तान- भारत, बांगलादेश- भारत असे सिमावाद वर्षानुवर्षे सुरु आहेतच यात भरीस भर म्हणून आपले मित्रराष्ट्र समजले जाणा-या व पूर्वी जगातील एकमेव हिंदुराष्ट्र असे बिरूद मिरवणा-या नेपाळने सुद्धा नेपाळ – भारत असा आणखी एक नवीन सिमावाद उपस्थित करून भारताची डोकेदुखी वाढवली आहे. उत्तराखंडातील लिपुलेख व कालापानी नदी या प्रदेशातून मानस सरोवराला कमी वेळात जाण्यासाठी भारताने रस्ता निर्माण केल्यावर नेपाळने त्यावर आक्षेप घेतला आहे. नेपाळने हा भाग नेपाळचा असल्याचा दावा केला असून तसा नकाशा सुद्धा सादर केला आहे. भारताने नेपाळच्या जागेत अतिक्रमण केल्याचे सुद्धा
नेपाळचे म्हणणे आहे. नेपाळच्या मंत्री मंडळाने सुद्धा त्यास मंजूरी दिली आहे. विशेष म्हणजे या भागात नेपाळ, चिन, भारत या तिन्ही देशांच्या सिमा मिळतात. नेपाळने 805 किमी सिमेत बदल करून उपरोक्त काही भाग हा आपलाच प्रदेश असून नवीन आंतर्राष्ट्रीय सिमा निर्धारित करण्याची मागणी केली आहे. वास्तविक पाहता कालापानी हा भाग भारताचा असल्याचे 1929 मध्ये नेपाळने मान्य केले होते तरीही आता नेपाळने हा सिमावाद का सुरु केला असावा ? हा वाद सुरु होताच नेपाळने आपले सैन्य सुद्धा सिमेवर तैनात केले. नेपाळच्या भागातील जमिनी भाडेपट्ट्यावर घेतलेल्या शेतक-यांनी जेंव्हा त्यांच्या शेतात जायचे होते तेंव्हा त्यांना नेपाळची सिमा ओलांडण्यास मनाई केली. नेपाळ पोलीसांनी शेतक-यांवर गोळीबार सुद्धा केला. लॉक डाऊन सुरु असतांनाही हे शेतकरी नेपाळ,मध्ये प्रवेश करीत होते तसेच त्यांनी सिमा सुरक्षा चौकीवर सुद्धा हल्ला केला म्हणून गोळीबार केला परंतू त्यात कोणाच्याही जीविताला काही हानी झाली नाही.
      हे सर्व पाहता भारतासोबत सर्व शेजारी देशांचे सिमावाद का आहेत ? असा प्रश्न पडतो. याचे आपण विशेषत: आपल्या राजकारण्यांनी आत्मचिंतन करणे गरजेचे आहे. एकतर 70 वर्षांपासूनचे मिळमिळीत धोरण , नेहरूंकरवी चीनने बळकावलेला भारताचा भूभाग चीनला देऊन टाकणे , पाकीस्तान युद्धात  पकडलेले युद्धबंदी सोडण्याची घाई,  येथील मणिशंकर अय्यर सारख्या नेत्यांचे पाकिस्तानात जाऊन भारत विरोधी बरळणे, राहुल गांधींनी चीनच्या दुतावासात जाऊन भेटणे यांसारख्या कृतीने शेजारी व इतर देशांनी भारताचे राजकारण व इथले देशहितास बाजूला सारून स्वत: सत्ता कशी प्राप्त करायची निव्वळ याचाच हव्यास असणारे राजकारणी, त्यांची मानसिकता हे पुरते ओळखले आहे. म्हणूनच पाकडे सतत कुरापती काढतात , चिनचे सैनिक भारताच्या भूमीत घुसून भारतीय सैन्याशी लोटपोट करण्यास धजावतात ,बांगलादेशातून घुसखोरांचे लोंढे येतात , म्यानमार मधून रोहिंगे येतात व त्यांना देशात राहू द्यावे अशी मागणी येथील विरोधी पक्षीय करतात. हे असले राजकारणी ज्या देशात असतील त्या देशाशी शेजारी वाद उकरून काढणारच. देशातील सर्व राजकीय पक्ष  हिमालयसे लेके समुद्र पर्यंत भूमी का कण कण मेरा है और उसे अपनी गौरवशाली मातृभूमी कहनेका मुझे अधिकार है |” आपल्या देशाप्रती असा चाणक्यप्रमाणे विचार करून देशहिताच्या मुद्द्यावर जेंव्हा एकत्र यायला लागतील तेंव्हा भारताशी वाद निर्माण करण्याची कुणाची बिशाद होणार नाही.

०४/०५/२०२०

Article after permitting to open wine shops in Maharashtra during Corona Lockdown

दे दारू .... दे दारू

अखेर राज्यात सरकारच्या परवानगीने दारूची 
दुकाने उघडण्यास परवानगी मिळाली. “दे दारू 
... दे दारू बडे दिनो के बाद मिली है ये दारू“ 
या एका मद्याची भलावण करणा-या गीतातील ओळीप्रमाणे खूप दिवसांनी दारू मिळते आहे म्हणून मग दुकाने उघडताच मद्य प्रेमींच्या भल्या मोठ्या रांगा दुकाना समोर लागण्यास फार वेळ लागला नाही. देशातील अनेक मोठ्या शहरातील वाईन शॉप समोर physical distancing चे काहीही एक नियम न पाळता झालेली गर्दी पाहून त्या गर्दीत, त्या रांगांत महिलांचा सुद्धा मोठा सहभाग पाहून आश्चर्य वाटले शिवाय या गर्दीत 1 जरी कोरोना बाधित असेल तर काय हाल होईल ? या विचाराने धडकी सुद्धा भरली. दारूबंदी असावी हे सांगणा-या गांधीजींच्या तत्वांचे पालन करतो हे सांगणारे सध्या महाराष्ट्रात सत्तेत आहे. त्याच महाराष्ट्रात वाईन शॉप उघडण्याची परवानगी त्वरित मिळाली. दारू पासून मिळणारा मोठा महसूल हेच या परवानगीचे कारण होय. Lock Down सुरु झाल्यावर काही दिवसांनीच नुकताच दिवंगत झालेला अभिनेता ऋषी कपूर याने दारू दुकाने सुरु करण्याची मागणी केली होती. त्या नंतर राज ठाकरे यांनी सुद्धा तसे पत्र राज्य सरकारला लिहिले होते.कोरोनामुळे झालेल्या Lock Down च्या काळात दारू महात्म्य आवळले जात आहे.Lock down मुळे तळीरामांची मोठीच अडचण झाली. सोशल माध्यमातून मग त्याला वाचा फुटली. अनेक कवी, शीघ्रकवी यांनी कविता केल्या, लिखाण झाले. आता Lock down सुरु होऊन महिन्यापेक्षा जास्त दिवस लोटले. कोलमडलेली अर्थव्यवस्था, औषधी दुकानात सापडलेला दारू साठा, स्वत:च्याच बार मध्ये दारू चोरी झाल्याचा बनाव, तळीरामांची (यात अनेक सेलिब्रेटी सुद्धा आहेतच) अडचण आणि सर्वात मुख्य म्हणजे दारू व्यवसायातून मिळणारा महसूल हे सर्व हेरून राजसाहेब ठाकरे यांनी सुद्धा राज्यसरकारला पत्र लिहून दारूची दुकाने सुरु ठेवण्याची मागणी केली होती. दारूमुळे राज्य सरकारला 41.66 कोटी रुपयांचे अबकारी शुल्क दररोज तर महिन्याला 1250 कोटी आणि वर्षाला 15000 कोटी मिळतात. “Lock Down पुढे किती दिवस राहील ह्याचा अंदाज नाही ह्यावरून आपण किती महसूल गमावलाय आणि गमावू ह्याचा अंदाज येईल, ”असं राज यांनी म्हटलं होते. महाराष्ट्रात , आंध्रप्रदेशात मोठा महसूल मिळाला , दिल्लीला दारूवरील कर वाढवूनही रांगा चांगल्याच मोठ्या होत्या. कोरोना या विषाणूच्या आपत्तीमुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. सरकारला नागरिकांचे प्राण सुद्धा वाचवायचे आहेत तसेच राज्यशकट सुद्धा हाकायचा आहे. या राज्यशकटास दारू महसुलाचा सुद्धा आधार आहे.
     या टाळेबंदीमुळे सर्व आर्थिक व्यवहार ठप्प झाले. महसूल मिळावा म्हणून अखेर दारू दुकाने 
उघडली. एखाद्या पदार्थाचे व्यसन जडले व तो मिळाला नाही की व्यसनी माणसाची मोठी बिकट 
अवस्था होते. काही दिवसांपूर्वी अमली पदार्थ न मिळाल्यावर चिडलेल्या एका तरुणाने त्याच्या 
कुटुंबियांना केलेल्या मारहाणीची चित्रफित झळकलीच होती. संसार उध्वस्त करी दारू बाटलीस 
स्पर्श नका करू“ , “नशा  करी चालकाची दशा”  अशी घोषवाक्ये सरकारच ऐकवत असे. दारू दुष्परिणामांचे
माहितीपट” दाखवत असे. दारूचे व्यसन वाईट असते हे जे सरकार सांगते ते  सरकार 
चालवण्यासाठी मोठा महसूल सुद्धा दारू मुळेच मिळत असतो. या महसुला पोटीच ही दुकाने सरकारने 
उघडण्यास परवानगी दिली. मद्याशिवाय ज्यांना जमतच नाही अशांची ही गर्दी वाईन शॉप समोर 
जमा होण्यास काहीच वेळ लागला नाही.    

सरकारला मात्र आता अधिक काळजी घेणे अत्यंत महत्वाचे झाले आहे. या तळीरामांमुळे कोरोना 
पसरला तर महसूल गोळा करण्यासाठी जनता ही सर्वात खरी संपत्ती असल्याचे म्हणणा-या उद्धव 
ठाकरे यांना त्याच जनतेला कोरोना बाधित होतांना न पहावे लागो हीच सदिच्छा.

०३/०५/२०२०

What to be learn by politician from Ramayana

रामायणातून राजधर्म शिकणे अपेक्षित 
3 मे रोजी उत्तर रामायण संपले. दूरदर्शनने रामायण व उत्तर रामायण अशा मालिकांचे प्रासारण केले. या मालिकांना दर्शकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 7.7 कोटी लोकांनी ही मालिका पाहून एक उच्चांक प्रस्थापित केला. रामायण , महाभारत तसेच जैन, बौद्ध व इतर अस्सल भारतीय कथांतून अनेक बोधप्रद अशा गोष्टी आहेत. अशा मालिका, कथांतून जनता काही ना काही बोध निश्चितच घेत असतेच. रामायण पाहणा-या 7.7 कोटी जनतेपैकी किती राजकारणी लोकांनी हि सिरीयल पाहिली असेल देव जाणे. परंतू या मालिकेतून रामाने कसे राज्य केले?, राजधर्माचे कसे पालन केले, राजा रामचंद्र प्रजेप्रती किती समर्पित होते, त्यांच्या राज्यात सर्वत्र कसा आनंदी - आनंद  होता. आजही सुव्यवस्थित राज्य कारभाराचा दाखला द्यायचा असल्यास “रामराज्याचा” दाखला दिला जातो. राजकारणी लोकांनी रामायणातील पुढील दोन बाबींवर अवश्य विचार करून प्रजाहित दक्ष व दिलेल्या शब्दाप्रती वचनबद्ध राहणे याचा बोध रामायणातून घ्यायला हवा.
यातील प्रथम बाब म्हणजे प्रजा जेंव्हा राज्याच्या महाराणी बद्दल आक्षेप घेते तेंव्हा प्रभू राम सीतेचा त्याग करतात व देवी सिता वाल्मिकी यांच्या आश्रमात राहतात. राज्याच्या प्रजेसाठी प्रजाहितदक्ष राम असे करतात. कारण राजासाठी प्रजा म्हणजे पाल्याप्रमाणे असते. राम आपले स्वत:चे कौटुंबिक सुख बाजूला सारून प्रजाहित पाहतात.
दुसरी बाब म्हणजे रघुनाथाचे अवतार कार्य पूर्णत्वाच्या समीप येते तेंव्हा त्यांना ब्रह्मदेवाचा निरोप देण्यासाठी काल देवता येतात. ते त्यांना रामचंद्रांना संभाषणा दरम्यान कुणी येऊ नये व ते ऐकू नये असे सांगतात. तरीही कुणी आलाच तर त्याला प्राणदंड देण्याचे ठरते. आपल्या क्रोधासाठी प्रसिध्द असलेले ऋषी दुर्वास नेमके त्याच वेळी येतात. त्यांच्या क्रोध चांगलाच ज्ञात असलेला लक्ष्मण राघवरायांना निरोप देण्यासाठी म्हणून काल व श्रीराम असलेल्या कक्षात जातो. लक्ष्मणाला यांमुळे प्राणदंडाची शिक्षा मिळते. कुणाचा त्याग करणे हे त्याला देहदंड देण्यासारखेच असते यांमुळे दशरथनंदन मग आपल्या प्रिय बंधूचा आपल्या शब्दासाठी त्याग करतात. राजाज्ञेचा स्विकार करून लक्ष्मण शरयू नदीत जलार्पण करतो. 
आजच्या राजकारणात मात्र अगदी उलट स्थिती दिसते. स्वत:च्या आप्तांचा त्याग तर सोडा उलट त्यांना राजकारणात आणणे, विविध पदे देणे, पदे नसल्यास कुठल्यातरी खात्यातील महत्वाच्या जागा देणे, राज्यसभा , विधान परिषद  मध्ये वर्णी लावणे. एखाद्याला काही मिळालेच नाही की मग त्याचे रुसणे व थेट दुस-या पक्षात प्रवेश करणे हे असे सुरु आहे. यातूनच एकाच परिवारातील लोकांनी , पिढ्यांनी कशी सत्ता उपभोगली हे उभ्या देशाने पाहिले आहे. घराणेशाहीतून मग लायकी नसलेल्यांनाही जनतेच्या माथी मारले जाते. कौसल्यासुताने जनतेसाठी आपल्या प्राणप्रिय पत्नीचा त्याग केला , ज्या लक्ष्मणाने आपल्या जेष्ठ भावासाठी वनवास स्वीकारला त्याची वनांत सेवा केली , युद्धात मदत केली त्याच प्रिय लक्ष्मणाचा आपल्या एकवचनीपणामुळे त्याग केला. परंतू रामाचे अस्तित्वच मान्य न करणा-या कलीयुगातील राजकारण्यांना रामाचा हा राजधर्म कितपत पचनी पडेल? स्वत:चे भले करणे, स्वत:च्या पात्रात तूप ओढणे, नातेवाईकांची वर्णी लावणे , आपला शब्द न पाळणे , प्रजाहित बाजूला सारून स्वत:चे व परिवाराचे हित राजकारणातून कसे साधता येईल याकडे संपूर्ण लक्ष देणे व त्यातून मग कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार करणे, मोठ-मोठे बंगले बांधणे अशी कृत्ये करणे हाच आपला धर्म आहे असे मानणा-या राजकारण्यांनी नाही संपूर्ण निदान थोडातरी राजधर्म रामायणातून शिकावा. त्रेतायुगातील वाल्मिकींना भविष्यातील राजकारण्यांकडून हेच अपेक्षित असेल.