३०/०१/२०२१

Article about Belgaon border dispute and Maharashtra CM , Karnataka Deputy CM statements

...शुभारंभ आपण करावा

"कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावदी यांनी मुंबई कर्नाटकला जोडावे अशी मागणी केली उद्या आपलाच कुणी वॉशिंग्टनची सुद्धा मागणी करायला व त्याला केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करण्याची मागणी करायाला मागे पुढे पाहणार नाही. बेळगांव प्रश्नी मा. मुख्यमंत्र्यानी सुद्धा मराठी माणसातील दुहीबाबत भाष्य केले ती दुही मिटवण्याचा शुभारंभ त्यांनीच करावा याबाबतचा लेख"

“महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद संघर्ष आणि संकल्प”या शासकीय पुस्तकाचे मुंबईत प्रकाशन झाले. मा. मुख्यमंत्र्यांनी याप्रसंगी कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद , बेळगांवला उपराजधानी बनवणे, नामांतर करणे , भाषावार प्रांतरचना मराठी एकीकरण समितीमध्ये फुट पडणे आदी बाबींवर भाष्य केले. बेळगांव प्रश्न फार जुना आहे आणि राज्या-राज्यातील सीमावादाचे प्रश्न हे नेहरूंच्या भाषावार प्रांतरचनेमुळे निर्माण झाले. हे प्रश्न खरेतर फार पुर्वीच निकालात निघणे आवश्यक होते. परंतू प्रश्न लवकर मार्गी न लावणे हा जणू आपल्या देशातील राजकारणाचा एक शिरस्ताच बनला आहे. प्रश्न कायम ठेवायचे आणि आपला राजकीय स्वार्थ साधत राहायचा. असेच मराठी बहुल बेळगांव प्रश्नाचे आहे. उद्धव ठाकरे यांनी बेळगांव प्रश्न निकाली लागेपावेतो हा प्रदेश केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करण्याची मागणी या प्रकाशन सोहळ्यात केली याच मुद्द्यावरून कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावदी यांनी मुंबई कर्नाटकला जोडावी व जोपर्यंत हे होत नाही तो पर्यंत मुंबई केंद्रशासित प्रदेश घोषित करावा अशी केंद्र सरकारला विनंती केली. याला आता काय म्हणावे ? बेळगांव हे सीमेवर आहे आणि तेथे मराठी भाषिक लोक मोठ्याप्रमाणात आहे त्यांची सुद्धा महाराष्ट्रात येण्याची इच्छा आहे. परंतू मुंबईला कसे कर्नाटकशी जोडणार ? कर्नाटक आणि मुंबई यांचा भूगोल , भाषा , इतिहास या अनुषंगाने काहीच संबंध नाही. उद्या आपलाच कुणी वॉशिंग्टनची सुद्धा मागणी करायला व त्याला केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करण्याची मागणी करायाला मागे पुढे पाहणार नाही. काहीही वक्तव्ये करायची त्याला  तोंडात येईल तसे प्रत्युत्तर द्यायचे हे असे सांप्रत कालीन राजकारणी आहेत. सावदी यांचे मुंबईला कर्नाटकशी जोडण्याचे व केंद्रशासित म्हणून घोषित करण्याचे हे विधान हास्यास्पद आहे. मुंबई हे महाराष्ट्राची राजधानी आहे आणि ती महाराष्ट्राचाच भाग राहील हे सुर्यप्रकाशाइतके स्पष्ट आहे. केंद्र सरकारने कर्नाटक व महाराष्ट्र दोन मुख्यमंत्री ,जनप्रतिनिधी यांना सर्वांना बोलावून बेळगांव प्रश्न मार्गी लावणे गरजेचे आहे. यासाठी तेथील मराठी भाषिकांचे मत सुद्धा ध्यान्यात घेतले पाहिजे. असे कित्येक वर्षांपासूनचे चिघळत असलेले प्रश्न भारताच्या सार्वभौमतेसाठी, एकात्मतेसाठी त्वरीत मार्गी लावणे गरजेचे आहे.

वरील पुस्तक प्रकाशन सोहळ्यात मा. उद्धव ठाकरे जे बोलले तेसुद्धा विचार करण्यास भाग पाडणारे आहे. मराठीला दुहीचा शाप आहे, भाषावार प्रांतरचनेमुळे मराठी माणसे आपल्यापासून दुर गेली असे मा. मुख्यमंत्री म्हणाले. मराठी अस्मिता , मराठी माणूस या विषयावर शिवसेना लढली , सत्तेत आली. मराठीला दुहीचा शाप आहे हे मुख्यमंत्री म्हणतात परंतू या शापातून मुक्त व्हायचे असले तर मुख्यमंत्र्यांनी स्वत:पासूनच सुरुवात करायला नको का? राज ठाकरे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हयातीतच शिवसेनेतून बाहेर पडले. पुढे बाळासाहेबांच्या निधनानंतर राज यांचे व्यतिरिक्त इतर भावंडांत निर्माण झालेली दुही सुद्धा जनतेला समजलेली आहे. हे सर्वानी पाहिले आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी टाळीसाठी हात पुढे केला होता त्यावरचे आपले तत्कालीन उत्तर सुद्धा जनतेने ऐकले आहे. एका मराठी भाषिक राज्यातील मराठी मुद्दा व इतर अनेक समान मुद्दे असलेले मराठी पक्ष एकत्र आले तर महाराष्ट्रातील मराठी भाषिक जनतेसाठी ते आनंददायीच ठरू शकेल. पण तशी चिन्हे दुर-दुर पर्यंत दिसत नाहीत. मराठी माणसातील दुही मिटवायची असले तर त्याचा शुभारंभ आपण पुढाकार घेऊन करून दाखवू शकतात. जनतेला दुही मिटवण्याचा सल्ला देण्याआधी आपणच तशी कृती केली तर आपले राजकीय मोठेपण व परीक्वता जनतेला दिसेल व आपला सल्ला मानण्यास ते अधिक प्रवृत्त होतील व मराठी माणसांना तसेच बेळगांवातील मराठी एकीकरण समितीला सुद्धा दुही मिटवण्याची प्रेरणा नक्कीच मिळेल. तेंव्हा मराठी माणसातील दुही मिटवण्याचा शुभारंभ हा आपणापासूनच व्हावा असे तमाम मराठी भाषिक जनतेला सुद्धा अपेक्षित आहे.       

२८/०१/२०२१

Series of articles about old buildings, gardens etc of Khamgaon City - Part 8

खामगांवची शान असलेली आताची भकास स्थाने , भाग- 8

पाण्याची टाकी

    भकास स्थानाचे नांव आणि ते सुद्धा पाण्याची टाकी हे कसे काय ? असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. शिवाय हा सुद्धा लेखाचा विषय असू शकतो का ? असेही वाटले असेल. पण भकास झालेल्या खामगांव शहरातील स्थानांची माहितीची ही लेख मालिका असल्याने या पुर्वीच्या निसर्गरम्य व पालक पाल्यांचा राबता असलेल्या या ठिकाणाचा अंतर्भाव सुद्धा या लेखमालिकेत होणे गरजेचे वाटले.

रुक्ष झालेला अंतर्गत भाग 
 
दूरदर्शन केंद्राच्या बाजूने असलेले प्रवेशव्दार 

    आजचे हे ठिकाण पाण्याची टाकी याच नावानेच ओळखल्या जात असे. या भागात जायचे असल्यास पाण्याच्या टाकीवर चाललो , पाण्याच्या टाकीवर गेलो होतो असेच बोलले जायचे जायचे. आजही काही प्रमाणात तसे बोलले जाते. व खामगांवकरांच्या हा शब्दप्रयोग इतका अंगवळणी पडला आहे की त्याचा शब्दश: अर्थ सुद्धा कुणी घेत नाही. शहरातील सर्वात उंच भाग वामन नगर, समता कॉलनी परिसरातील टेकडीवर एक पाण्याची टाकी आहे (ही नवीन) पुर्वी येथे एक जुनी भली मोठी टाकी होती, माझी आठवण जर बरोबर असेल तर ती लोखंडाची होती. या टाकीच्याच नावाने हा परिसर ओळखल्या जाऊ लागला. काही वर्षांपुर्वी खामगांव शहराला पाणी पुरवठा करणारी ही एकच टाकी होती म्हणून या भागाला, येथील छोट्याश्या बगीच्याला पाण्याच्या मोठ्या टाकीमुळे “पाण्याची टाकी“ याच नावाने ओळखले जात होते. आज काही नवीन टाक्यांची भर पडली आहे. नवीन टाक्या जरी झाल्या असल्या तरी खामगांवकरांची पाण्याची तहान मात्र तशीच आहे , पुर्वीसारखी , धरण ओव्हरफ्लो , जनुना तलाव ओव्हरफ्लो पण नळाला पाणी मात्र 8 दिवसांनी कधी कधी त्याहीपेक्षा जास्त दिवसांनी येते असा पाण्याचा प्रश्न मात्र कायमच आहे.

रेल्वे गेट मधून सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालया समोरून समता कॉलनी कडे गेल्यावर पाण्याची टाकी व त्या टाकीच्या परिसरात छोटीसी बाग. खामगांवातील विविध ठिकाणांबाबत लेख लिहितांना मी नकळत गतकाळात चाललो जातो. वडीलांसह आम्ही भावंडे म्युन्सिपल हायस्कूलच्या मागच्या टेकडीवरून या पाण्याच्या टाकीवर गेलो होतो अशी दृश्ये मग डोळ्यासमोर तरळू लागतात. पाण्याच्या टाकीवर गेलो होतो म्हणजे प्रत्यक्ष टाकीवर चढलो असे नाही तर तेथील बगीच्यात गेलो होतो हे आता सांगण्याची तशी आवश्यकता नाही. या बाजूने पाण्याच्या टाकीच्या स्थानी गेले की एका कोप-यातून बगीच्यात जाता यायचे येथे ज्यातून पाणी अविरत वाहत असायचे असा नळ होता. अविरत वाहणा-या पाण्यामुळे खालील उतारावर पाणथळ जागा झाली होती. या जागेत पाणथळीच्या ठिकाणी उगवणा-या अनेक छोट्या वनस्पती उगवल्या होत्या. आत गेल्यावर चारीही बाजूंनी मेंदीच्या झाडांचे कुंपण , आता विविध झाडे , लहान मुलांना क्रिकेट खेळता येईल अशी छोटीसी खुली जागा. याच बाजूने म्हणजे दूरदर्शन केंद्रा समोरून गेल्यावर आता एक भव्य प्रवेशव्दार झाले आहे. या टाकीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ही टाकी खुप उंच अशा खांबांवर नव्हती कारण उंच टेकडीवर असल्याने तशी काही गरज नव्हती. छोट्या सिमेंटने बांधलेल्या अनेक ओट्यांवर ती होती. या टाकीखाली लहान मुलांना सहज जाता येईल अशी जागा होती.  

30-35 वर्षांपूर्वी खामगांवातील महिलांना, पालकांना आपल्या  मुलांना घेऊन जाता येईल असे पिकनिक स्पॉट नव्हते. दोन बगिचे , जनुना तलाव व पाण्याची टाकी. कित्येक वेटाळातील महीला एकत्र येऊन सोबत डबे घेऊन आपल्या मुलांना येथे घेऊन जात असत. तेंव्हा या भागात आजच्या इतकी वस्ती झाली नव्हती. येथून “बर्डस आय व्ह्यू“ प्रमाणे खामगांव शहराचे विहंगम दृश्य दिसत असे , आजही दिसते पण पुर्वीच्या आणि आताच्या दृश्यात मोठा फरक आहे.पुर्वी एक मजली घरे व खुप झाडे दिसत तर आता मोठ्या मोठ्या इमारती व मोबाईल टॉवर दिसतात झाडे आहेत पण पुर्वीच्या तुलनेत कमी. आता इथे मुलांना घेऊन जाऊन ते दृश्य दाखवण्याची कुणाकडे सवड नाही.

काही वर्षांपूर्वी या बगीच्याला भिंतीचे कुंपण करण्यात आले, शाहु महाराजांचे नांव येथील बगीचाला किंवा त्याच्या प्रवेशव्दाराला देण्यात आले होते का देण्याचे ठरले होते असे काहीसे स्मरते. पुर्वीप्रमाणे आता येथे पालकांचा आणि त्यांच्या मुलांचा राबता नसतो, बागही आता पुर्वीसारखी नाही. कुंपणाची भिंत , प्रवेशव्दार हे मात्र चांगले आहे. संध्याकाळी पाण्याच्या टाकी शेजारील टेकडीवर काही लोक फिरायला मात्र येत असतात.  

कित्येक खामगांवकरांची तहान भागवलेली जुनी टाकी आता नाही परंतू ती असल्याच्या तुरळक खुणा मात्र दिसतात. बाहेरील वळणाच्या रस्त्याने जातांना बगीच्याचा अंतर्गत भाग नीटसा दिसत नाही. भिंतीमुळे बाह्यस्वरूप चांगले दिसत असले तरी आतील स्वरूप मात्र विशेष असे नाही. पुनश्च या भागात करंज सारखी सदाहरित वृक्ष लागवड केली , फुलबाग , कारंजे केले तर खामगांवातील जनतेला हिल स्टेशनवर आल्यासारखे वाटेल. परंतू खंत ही आहे की आपल्या देशात जे आहे ते टिकवून ठेवले जात नाही व नवीन केलेल्या गोष्टी गुणवत्तापुर्ण नसल्याने टिकत नाही. त्याप्रमाणे पाण्याची टाकी व तेथील बाग हा पिकनिक स्पॉट काळाच्या ओघात खामगांवकरांच्या विस्मृतीत गेला. 

क्रमश:

२७/०१/२०२१

Tractor parade raid on Capital ...article about this Kisan Rally

 दंगेखोरांच्या सर्व सवलती रद्द व्हाव्यात

दिल्लीच्या या घटनेतून धडा घेऊन भविष्यात सार्वजनिक स्थळी सरकारी मालमत्तेचे नुकसान करणा-या , पोलीस तसेच लष्करी निमलष्करी जवानांवर हल्ले करणा-या , तिरंग्याचा अपमान करणा-या , महिला पोलिसांवर हल्ले करणा-या , जीवे मारण्याच्या हेतूने रस्त्यावर बेदरकारपणे जनतेच्या व पोलिसांच्या अंगावर वाहने आणणा-या तसेच अशी तत्सम कृत्ये करणा-या लोकांच्या सर्व सवलती जसे स्वस्त धान्य , प्रवासातील सवलत , शासकीय योजनांतून प्राप्त वीज जोडणी , कर्ज , घर , अनुदाने,  यांच्या पाल्यांना मिळणा-या शैक्षणिक सवलती , यांना व यांच्या पालकांना मिळणारे पेन्शन व इतर आणखी ज्या काही सरकारी सवलतींचा हे उपभोग घेत असतील हे सर्व बंद करावे. असा कायदा केला तर हे असे दंगे करण्याला पायबंद बसू शकतो. सरकारने सर्व पक्षातील नेत्यांना विश्वासात घेऊन जनतेला , सुरक्षा जवानांना , विचारवंताना सोबत घेऊन असे करावे. असे केल्याने या अशा देशद्रोही कृत्यांना अटकाव होईल असे वाटते.

काल राजधानी दिल्लीतील प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम पार पडला आणि तिकडे शेतक-यांची ट्रॅक्टर रॅली दिलेल्या वेळेच्या आधीच सुरू झाली. पोलिसांनी सांगितलेल्या मार्गाने न जाता दुस-या मार्गाने ही रॅली निघाली. हळू-हळू रॅलीने लाल किल्ल्याकडे मोर्चा वळवला. पोलिस सुरक्षा रक्षकांनी अडवण्याचा प्रयत्न केल्यावर जमावाने उग्र रूप धारण करून पोलिसांवरच हल्ला चढवला. ट्रॅक्टर चालक त्यांचे ट्रॅक्टर मन मानेल तसे फिरवू लागले , पोलिसांच्या अंगावर आणू लागले, अनेक पोलिसांना लाल किल्ल्यातील बाजूच्या खंदकात ढकलले. याबाबत आता अधिक सांगण्याची गरज नाही कारण कालची भारताच्या लोकशाहीवर हल्ला करणारी ही दृश्ये काल उभ्या जगताने पाहिली. ही दृश्ये पाहतांना प्रचंड क्रोध व दु:खाचे आवेग येत होते. इंग्रजांच्या विरोधातील “लेखण्या मोडा व बंदुका हाती घ्या” हे वाक्य या देशद्रोह्यांविरोधात कृतीत आणावेसे वाटत होते.  

      शांततेने आंदोलन सत्याग्रह करणा-या गांधीजींच्या देशात आज-काल विविध मागण्या करणा या  अनेक संघटनांची आंदोलने, मोर्चे यांचा उच्छाद होत असतो. या आंदोलकांचे नेते नंतर मात्र जबाबदारी घेत नाहीत. आमचे लोक नव्हते असे म्हणून अंग काढून घेतात. शाहीनबाग , किसान मोर्चा , एल्गार ही उदाहरणे ताजी आहेत. जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून आपण मिरवत असतो परंतू याच लोकशाहीचा पुरेपूर दुरुपयोग हे असे आंदोलक करू लागले आहेत. यावर सखोल विचार केला असता हेच स्पष्ट होते की स्वत:च्या राजकीय पोळ्या शेकण्यासाठी आपलेच नेते जनतेला पेटवून देत असतात. विद्यमान सरकारला कचाट्यात पकडता येईल असा एकही मुद्दा नसल्यामुळे “उद्रेक होईल”, “सरकारने चर्चा करायला पाहिजे होती” अशी वक्तव्ये ज्यांनी आर्थिक गैरव्यवहार केले आहेत , ज्यांच्या ईडी  चौकशी सुरु आहे असे नेते करतात. जनतेला चीड  येईल अशीच कालची दृश्ये होती. सार्वजनिक संपत्तीला हानी पोहचवली तर त्याची वसुली आंदोलकांकडून होईल असा कायदा असूनही क्षुब्ध जमाव  हानी करतोच. का होते आहे हे ? देशाच्या इतर राज्यातील शेतक-यांचा समावेश या आंदोलनात अगदीच अल्प प्रमाणात आहे. आंदोलकांनी त्यांच्या मागण्या सनदशीर मार्गाने करणे अपेक्षित आहे, कुणाच्या म्हणण्यात न येता कायदा काय आहे हे सुद्धा समजून घेणे जरुरी आहे. लोकशाहीत आंदोलने व्हावीत परंतू आपल्याच देशाच्या प्रतिमेला हानी पोहचेल अशी कृत्ये करावीत का ? कालच्या या शेतकरी ट्रॅक्टर रॅलीतील लोक हे खरेच शेतकरीच होते का ? याची चौकशी आता होईलच व्हायलाच पाहिजे. आंदोलनाच्या आडून दंगे करणा-यांच्या, आपल्याच रक्षकांवर म्हणजे पोलिसांवर हल्ले करणा-यांच्या कालच्या या अशा संविधानविरोधी कृत्याने देशाचा , संविधानाचा अपमान नाही होत का ? शेतक-यांच्या या देशात शेतक-यांमध्ये भ्रम फैलावणारे हे कोण आहेत , यांना विदेशातून कसा पाठींबा मिळतो , यांनी लाल किल्यावर तिरंग्याचा अपमान करून विविध झेंडे लावल्यावर त्याचा पाकीस्तानात कसा आनंद व्यक्त होतो ? याचा विचार करणे आवश्यक आहे.

      दिल्लीतील या अराजकामुळे भविष्यात सार्वजनिक स्थळी सरकारी मालमत्तेचे नुकसान करणा-या , पोलीस तसेच लष्करी निमलष्करी जवानांवर हल्ले करणा-या , तिरंग्याचा अपमान करणा-या , महिला पोलिसांवर हल्ले करणा-या , जीवे मारण्याच्या हेतूने रस्त्यावर बेदरकारपणे जनतेच्या व पोलिसांच्या अंगावर वाहने आणणा-या तसेच अशी तत्सम कृत्ये करणा-या लोकांच्या सर्व सवलती जसे स्वस्त धान्य , प्रवासातील सवलत , शासकीय योजनांतून प्राप्त वीज जोडणी , कर्ज , घर , अनुदाने,  यांच्या पाल्यांना मिळणा-या शैक्षणिक सवलती , यांना व यांच्या पालकांना मिळणारे पेन्शन व इतर आणखी ज्या काही सरकारी सवलतींचा हे उपभोग घेत असतील हे सर्व बंद करावे. असा कायदा केला तर हे असे दंगे करण्याला पायबंद बसू शकतो. सरकारने सर्व पक्षातील नेत्यांना विश्वासात घेऊन जनतेला , सुरक्षा जवानांना , विचारवंताना सोबत घेऊन असे करावे. असे केल्याने या अशा देशद्रोही कृत्यांना अटकाव होईल असे वाटते परंतू आपल्याच देशातील जनता याला सुद्धा विरोध करेल. भविष्यात आपल्या देशाची प्रतिमा खराब होऊ नये म्हणून सर्वच पक्षातील जेष्ठ नेत्यांनी एकत्र येऊन यावर मार्ग काढणे जरुरी आहे नाहीतर आपल्याच देशातील हे असे मुठभर दंगेखोर आंदोलक हे आपल्या देशाच्या प्रगतीच्या मार्गातील अडसर ठरतील.              

२१/०१/२०२१

Series of articles about old buildings, gardens etc of Khamgaon City - Part 7

खामगांवची शान असलेली आताची भकास स्थाने , भाग- 7

रेडिओ श्रवण केंद्र

"...कुणी असेही म्हणेल की , जे ठिकाण आता अस्तित्वातच नाही व भविष्यात कधी सुरूही होऊ शकणार नाही अशा कायम बंद झालेल्या तसेच अस्तित्वाची एकही खुण शिल्लक नसलेल्या स्थानाची कथा सांगण्याचे काय प्रयोजन ? परंतू आपण ज्या शहरात राहतो त्या शहराचा इतिहास , तेथील ठिकाणे हे आपल्याला ठाऊक असेल तर आपल्याला कुठेतरी आपल्याच शहराबद्दलची आत्मीयता वृद्धिंगत होऊ लागते...."

      आजचे हे ठिकाण अस्तित्वातच नाही त्यामुळे भकास असण्याचा प्रश्नच नाही. केवळ खामगांवात असे ठिकाण होते हे ज्यांना ज्ञात नाही त्यांना ज्ञात व्हावे म्हणून आजचा लेखमालिकेत या ठिकाणचा समावेश करावासा वाटला.

“इयं आकाशवाणी संप्रती वार्ता: श्रुयंताम” काही वर्षांपुर्वी या ओळी ऐकून अनके कुटुंबाच्या दिवसाची सुरुवात  होत असे. मार्कोनीने रेडिओचा शोध लावला. भारतात रेडिओला येण्यास खुप काळ लागला. पोर्टेबल टीव्हीच्या किंवा त्याहुनही मोठ्या आकाराचे रेडिओ अनेकांच्या दिवाणखान्याची शोभा वाढवीत असत. एक वैभवाचीच निशाणी होती ती. रेडिओ भारतात आल्यावरही जुनी हिंदी चित्रपट गीते ही “सिलोन” अर्थात श्रीलंकेतून प्रसारित होत असत. ती भारतातून प्रसारित होण्यास सुद्धा बरेच कष्ट करावे लागले होते. तो तर एका स्वतंत्र लेखाचा विषय होईल. भारतातून पुढे बातम्या , विविध विषयांची माहिती , श्रवणीय गाणी इत्यादी अनेक कार्यक्रम प्रसारित होणे सुरु झाले. “बिनाका गीतमाला” मुळे अमीन सयानी हे नांव सर्वांना परिचित झाले. “सैनिकोके लिये जयमाला” हा कार्यक्रम सुद्धा लोकप्रिय होता. मुंबई केंद्र , जळगांव केंद्र , पुणे केंद्र , इंदोर केंद्र अशी अनेक केंद्रे आजच्या भाषेत चॅनल हे रेडिओचे गोलाकार बटन फिरवले की लागत असत. रेडिओ पुराण तसे खुप मोठे आहे. रेडिओ हे त्याकाळातील महागडी अशी गोष्ट होती. ती सर्वांना "परवडेबल" अशी नव्हती. म्हणून त्याकाळात अनेक शहरात सार्वजनिक रेडिओ श्रवण केंद्र असायचे. एका ठिकाणी सरकारी रेडिओ लावला जायचा व एक कर्मचारी ठराविक वेळी तो लावायचा. मग रेडिओ प्रसारण , बातम्या आदी ऐकण्यासाठी गावातील माणसे त्या ठिकाणी जमा होत असत. वेळ संपली किंवा प्रसारण बंद झाले की घरी रवाना. हो प्रसारण बंद होत असे. दुरदर्शन वरील प्रसारण सुद्धा बंद होत असे. आजसारखे 24*7 असा काही प्रकार नव्हता.

असेच एक सार्वजनिक रेडिओ श्रवण केंद्र आपल्या खामगांवात सुद्धा होते. खामगांव शहरात हे केंद्र फरशी भागातील हनुमान मंदिरासमोर व अग्रवाल यांच्या घरासमोर रस्त्याच्या मध्ये जी मोकळी जागा आहे त्या जागेत होते. अशा स्मृती शहरातील अनेक वृद्ध नागरिक सांगतात. या भागात सध्या एक पाणपोयी व सार्वजनिक गणेश उत्सवात जय संतोषी माँ गणेश मंडळाचा गणपती बसतो. या पाणपोयीच्याच ठिकाणी एक खोली होती. या खोलीत एक रेडिओ लावलेला होता. ठराविक वेळी प्रशासनातील नियुक्त व्यक्ती येऊन तो रेडिओ लावत असे व प्रक्षेपण संपल्यावर बंद करीत असे. ही गोष्ट 1950-60 च्या दशकातील किंवा त्या अलीकडील-पलीकडील असेल. त्यामुळे हे केंद्र प्रत्यक्षात पाहिलेले लोक अगदीच कमी असतील.

कुणी असेही म्हणेल की , जे ठिकाण आता अस्तित्वातच नाही व भविष्यात कधी सुरूही होऊ शकणार नाही अशा भकास काय तर कायम बंद झालेल्या तसेच अस्तित्वाची एकही खुण शिल्लक नसलेल्या  सार्वजनिक रेडिओ श्रवण केंद्राची कथा सांगण्याचे काय प्रयोजन ? परंतू आपण ज्या शहरात राहतो त्या शहराचा इतिहास , तेथील ठिकाणे हे आपल्याला ठाऊक असेल तर आपल्याला कुठेतरी आपल्याच शहराबद्दलची आत्मीयता वृद्धिंगत होऊ लागते. शहर अधिक सुंदर व्हावे , शहरातील अशा उपरोक्त व या लेखमालिकेत समाविष्ट केलेल्या स्थांनांसारख्या ठिकाणी स्वच्छता असावी , सौंदर्यीकरण असावे असे वाटते, शिवाय नवीन पिढीला सुद्धा शहराचा इतिहास कळू शकतो व या संबंधित लोकांना इथे पुन्हा काही चांगले करावे असे वाटण्याची शक्यता आहे म्हणून हा उहापोह. पुढे सिनेमाचे प्रस्थ वाढले गावोगावी सिनेमागृह झाले व रेडिओची पिछेहाट होऊ लागली , टीव्ही आल्यावर तर अनेकांचे रेडिओ अडगळीत पडले. तसेच खामगांवातील हे सार्वजनिक रेडिओ केंद्र सुद्धा बंद पडले. 

आज अनेक “दर्दी” लोकांकडे रेडिओ आहे. मोबाईलमध्ये सुद्धा रेडिओ आहे, एफ.एम.वाहिन्या व ऑनलाईन रेडिओ ऐकल्या जात आहे. नवीन कार्यक्रम प्रसारित करून जुनी रेडिओ  केंद्रे सुद्धा कार्यान्वित आहेत. मा. पंतप्रधानांचा जनसामान्यांना उद्बोधन करण्यासाठी म्हणून असलेला “मन की बात” हा कार्यक्रम सुद्धा अनेक लोक रेडिओवर ऐकतात. ज्या सुभाषचंद्र बोस यांची 125 वी जयंती देश साजरा करणार आहे त्या नेताजींनी सुद्धा जर्मनीमध्ये  आझाद हिंद रेडिओ केंद्र स्थापन केले होते व त्या काळात या माध्यमाचा वापर भारतीयांना उद्बोधित करण्यासाठी मोठ्या खुबीने केला होता. असा हा रेडिओ आजही अस्तित्व टिकवून असला तरी सार्वजनिक रेडिओ श्रवण केंद्रे मात्र काळाच्या ओघात व वाढत्या तांत्रिक प्रगतीमुळे लुप्त झाली. कधीकाळी अशी केंद्रे सुद्धा होती यावर आता कुणाचा विश्वास सुद्धा बसणार नाही. इति वार्ता: !

                                           क्रमश:

१४/०१/२०२१

Series of articles about old buildings, gardens etc of Khamgaon City - Part 6

खामगांवची शान असलेली आताची भकास स्थाने , भाग-6

माणसांचा दवाखाना

    "आजच्या स्थानाला अंशत: भकास स्थान असे म्हणता येईल हे सुरुवातीलाच स्पष्ट करतो कारण या स्थानाच्या काही भागात लायन्स क्लबच्या सहाय्याने सेवा कार्य सुरु आहे. 

"...असे सांगितले जाते की टाटा उद्योगसमूहाने ही जागा दवाखान्याच्याच

 उपयोगाकरिता म्हणून मागितली होती. असे झाले असते तर एक प्रसिद्ध सर्व सुविधांनी

  युक्त व अल्प मोबदल्यात सेवा देणारे असे रुग्णालय मात्र खामगांवात नक्कीच उभे 

राहीले असते.." 

वैद्यकीय अधिका-याचे निवासस्थान होते.
               
                     जीर्ण झालेले डॉक्टरांचे निवासस्थान 

या भागात नेत्र रुग्णालय आहे 

    1980 च्या दशकात आम्ही बाल्यावस्थेत असतांना खामगांवात खाजगी रुग्णालये तशी फारच कमी होती. दवाखाना म्हटला की लेडीज हॉस्पिटल म्हणजे आताचे सरकारी रुग्णालय व नगर परिषद मेन्स हॉस्पिटल अर्थात माणसांचा दवाखाना. हो याच नावाने हा दवाखाना ओळखल्या जात असे. या दोनच रुग्णालयांची नांवे तेंव्हा जास्त ऐकिवात होती. अनेक नागरिक याच रुग्णालयात उपचारासाठी जात असत. त्यात कमीपणा वगैरे कुणी मानीत नसे. तेंव्हा इतर पर्याय सुद्धा कमी होते आणि आता लोक  सरकारी रुग्णालयात का जात नाही हा एक मोठा विषय आहे. खामगांवचे हे माणसांचे रुग्णालय जी.एस.टी. कार्यालयाच्या अगदी समोर व एका बाजूने लोकमान्य टिळक शाळा क्रमांक 6 च्या समोर आहे. 6 नंबर शाळेच्या बाजूने कर्मचा-यांची निवासस्थाने व रुग्णालयात जाण्यास छोटासा रस्ता आहे. आज तो दुकानांच्या गर्दीत हरवला आहे. ही पुर्ण कौलारू व प्रशस्त इमारत खामगांव व परीसरातील रुग्णांचा आधार होती त्यामुळे त्यादृष्टीने ती सुद्धा खामगावचे एक वैभवच होती. समोरून जाण्या-या राष्ट्रीय महामार्गावरून ती दिसत असे. आता दुकानांच्या मागे लपली आहे. अद्यापही ही इमारत      ब-यापैकी सुस्थितीत आहे. या रुग्णालयाच्या बाजूला उपविभागीय अधिकारी यांचे निवासस्थान आहे. या बाजूने वैद्यकीय अधिका-याचे निवासस्थान व त्याच्या मागील बाजूचा कक्ष कुष्ठरोग्यांवर उपचारासाठी वापरला जात असे. आज या जागा खितपत पडल्या आहेत. वैद्यकीय अधिका-याचे निवासस्थान तर आता मुख्य रस्त्यावरून दिसत सुद्धा नाही. ही बाजू अत्यंत घाण झाली आहे, अतिक्रमणाच्या विळख्यात आहे. उपविभागिय अधिका-याच्या अधिपत्याखाली उपविभाग म्हणजे दोन तालुके असतात त्या अधिका-याच्या बंगल्याच्याच बाजूने इतकी घाण व अतिक्रमणे असतील तर सामान्य नागरिकांची व त्यांच्या वस्त्यांची काय गत असेल. या रुग्णालयाच्या मागील बाजूस असलेल्या बालाजी प्लॉट भागातील मुले उपविभागीय अधिकारी व वैद्यकीय अधिकारी यांच्या निवासस्थानाच्या मागे पुर्वी पतंग उडवीत असत. आता या मैदानात घाणीचे मोठे साम्राज्य आहे. या रुग्णालयात ब-यापैकी सुविधा तेंव्हा होत्या. माझ्या आजोबांना या दवाखान्यात भरती केले होते तेंव्हा या दवाखान्यात सर्वप्रथम गेलो होतो. एका कौलारू खोलीत आजोबांचा बेड होता. एक कुटुंब सहज राहू शकेल अशी दोन लहान-लहान खोल्यांची मिळून एक प्रशस्त, हवेशीर, मागे प्रसाधन गृह असलेला तो रुग्ण कक्ष होता. या दवाखान्यात डॉक्टरांसाठी सुद्धा एक निवासस्थान होते. पुढे हे रुग्णालय बंद झाले. का बंद झाले हे तेंव्हा लहानपणी काही कळले नव्हते. लहानपणी एकदा बहिणीच्या पायाला लागले असता ड्रेसिंग करायला तिथे गेल्याचे आठवते. घाटोळ काका म्हणून एक रुग्णसेवक तिथे होते. चांगले ड्रेसिंग करणारे म्हणून ते ओळखले जात. आनंद सिनेमातील ललिता पवार या मायाळू नर्ससारख्या वत्सलाबाई नावाच्या प्रेमळ व सुस्वभावी नर्स होत्या. त्यांचे आडनांव आता आठवत नाही. घाटोळ काका , वत्सलाबाई हे लोक आता हयात नाहीत. कुठे असतील त्यांचे कुटुंबीय कोण जाणे ? जुन्या काळातील डॉक्टर व नर्स यांच्या प्रेमळ व आपुलकीच्या वागणुकीनेच अर्धे दुखणे पळून जात असे. मंत्र्यांच्या पी.ए. बाबत बोलतांना मागे एकदा नितीनजी गडकरी म्हणाले होते, "हे मंत्र्यांचे पी.ए. म्हणजे चहापेक्षा किटली गरम" असेच अनेक रुग्णालय व तेथील कर्मचा-यांबाबत आज म्हणता येईल.

    ब-याच वर्षानी माझ्या मुलाला पोलिओ डोस देण्यासाठी म्हणून या रुग्णालयात गेलो होतो. थोडा उशीर होता म्हणून सर्वदूर निरीक्षण केले तर आत प्रवेश केल्यावर डाव्या बाजूला जिथे या दवाखान्यातील मुख्य डॉक्टर राहात असत ते निवासस्थान मोडकळीस आलेले आहे. मागील बाजूला असलेल्या रुग्ण कक्षात आता निवासस्थाने आहेत. काही ठिकाणी पडझड झालेली व भंगार सामान पडलेले दिसले. नाही म्हणायला लायन्स क्लब येथे नेत्र रोग्यांवर उपचाराचे चांगले कार्य करीत आहे. निदान या कार्यामुळे तरी हे रुग्णालय आपले जुने स्वरूप थोड्याप्रमाणात का होईना पण टिकवून आहे. या दवाखान्याच्या आजूबाजूने झालेल्या दुकानांच्या मागच्या बाजूस म्हणजे रुग्णालयाच्या आतील बाजूस अस्वच्छता आहे. गतवर्षी झालेल्या पावसाळ्यात थोडेफार वृक्षारोपण झाले आहे. पुर्वी येथे जनसामान्यांचा आरोग्यसेवेकरिता राबता असायाचा. कर्मचारी , डॉक्टरांची निवासस्थाने असल्याने या दवाखान्यात प्राण असल्याचे दिसायचे. 

    रुग्णांना बरे करणारा हा दवाखाना व येथील निवासस्थाने आज स्वत:वरच उपचार होण्याच्या प्रतीक्षेत आहे. असे सांगितले जाते की टाटा उद्योगसमूहाने दवाखान्याच्याच उपयोगासाठी ही जागा मागितली होती. यात कितपत तथ्य आहे हे ठाऊक नाही परंतू असे खरेच झाले असते तर एक प्रसिद्ध सर्व सुविधांनी युक्त व अल्प मोबदल्यात सेवा देणारे असे रुग्णालय मात्र खामगांवात नक्कीच उभे राहिले असते. आज पुर्वीच्या लेडीज हॉस्पिटल मध्ये म्हणजेच आताच्या सरकारी रुग्णालयात अनेक सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. रग्गड उपचार शुल्क घेणारी खाजगी रुग्णालये आहेत परंतू नगर परिषदेचा हा माणसांचा दवाखाना मात्र खराब अवस्थेत , आजूबाजूला घाण , अस्वच्छता घेऊन आपल्या जुन्या, चांगल्या दिवसांच्या आठवणीत खितपत पडला आहे, समोर झालेल्या दुकानांच्या मागे दुर्लक्षित असा जीव मुठीत धरून उभा आहे.

                                                                            क्रमश:

०७/०१/२०२१

Series of articles about old buildings, gardens etc of Khamgaon City - Part 5

 खामगांवची शान असलेली आताची भकास स्थाने , भाग-

निमवाडी

     "....निमवाडीतील मित्रांच्या चर्चाकडूनिंबाच्या छायेतील निवांतासाठी सायकलवर टांग मारून पुढे गाड्या आल्यावर पेट्रोल खर्च करून चहानाश्त्यासाठी गावातून निमवाडीत जाणे, ”वो जिंदगीमे कल क्या बनेगा” अशी तरुणांची ध्येये, मित्रांनी पाहिलेली स्वप्ने,प्रेम कहाण्या,या हॉटेल मध्ये मुली क्वचितच येत. पण आमच्या एका मित्राने (नांवाचा उल्लेख मुद्दाम टाळला) एकदा त्याला भावलेल्या एका मुलीला या हॉटेल वरील पो-याला सांगून तिच्या टेबलवर चहा पाठवला होता. असे कितीतरी किस्से आहेत. 
आज निमवाडीतील झाडे , सावली, सकाळची वर्दळ लुप्त झाली आहे.
तसे या स्थानाबद्दल "निमवाडीची रया आणि कडुनिंबांची छाया गेली" या शिर्षकाखाली दोन वर्षांपुर्वी लेख लिहिला होता. हे स्थान सुद्धा चांगले होते म्हणून याचा सुद्धा समावेश या लेखमालिकेत करावासा वाटला.तरीही कालानुरूप काही बदल केले आहेत."

निमवाडी पुर्वीची

निमवाडी रस्ता रुंदीकरणावेळची 
कडुनिंब नसलेली आताची निमवाडी

याच मोकळ्या जागेतील हॉटेलवर पुर्वी गर्द छायेत अनेक लोक चहा , नाश्त्याचा आस्वाद निवांतपणे घेत असत.

    आजचे हे ठिकाण म्हणजे सुद्धा खामगांव शहराची शान वगैरे नव्हते. परंतू विद्यार्थी , कर्मचारी , कामगार यांच्या असलेल्या वर्दळीमुळे याला मित्रत्वाच्या , मानवी संबंधांच्या आपुलकीच्या ओलाव्यामुळे या ठिकाणाला शान होती असे नक्कीच म्हणता येईल. तेथील वृक्ष विपुलतेमुळे हे ठिकाण एक आल्हाददायक असे ठिकाण होते. 

    खामगांव शहर म्हटले की पंचक्रोशीतील कित्येकांना जी.एस.कॉलेज हमखास आठवतेच. खामगांव पंचक्रोशीतील या कॉलेजच्या लगतच सुटाळा ग्रामपंचायत हद्दीत राष्ट्रीय महामार्गावर निमवाडी नावाचा परीसर आहे. अगदी आता दोन-तीन वर्षांपूर्वी कडुनिंबाच्या गर्द,थंडगार छायने आच्छादित असा हा एक छोटासा भाग होता. होय ! होताच. येथील भले मोठे कडुनिंबाचे वृक्ष वाटसरूंना सावलीचा दिलासा देत. कडुनिंबांच्या अनेक झाडांमुळे या परिसराला निमवाडी हे नांव पडले होते. याच परिसरात कडुनिंबाच्या छायेत एक झोपडीवजा उपहारगृह होते. आता ते नाही. हे उपहारगृह म्हणजे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा ठिय्या होता. जी.एस. कॉलेज मधील गेल्या कित्येक वर्षातील विद्यार्थ्यांचा हाच कट्टा होता. या हॉटेलला नांव होते की नाही माहित नाही कारण पाटी काही कधी दिसली नाही. तासिका बुडवून येथील चहाइतर पदार्थ यांवर गप्पांसोबत ताव मारला जात असे. क्वचित प्रसंगी काही महाभाग धुरांच्या रेषाही हवेत काढत. समोर भट्टीत्यामागे बनियान टोपी वाले चालक-मालक त्यांच्या मागे काचेचे दोन कपाट, त्यात शेव, चिवडा , शंकरपाळे असत. काउंटर म्हणजे एक टेबल त्यावर एक ताट चील्लरचे तर दुसरे बालुशाहीचे असे. कुडाच्या भिंतीवर अनेक देवी देवतांचे फोटोलाकडाचे बाकटेबलएक छोटा टी.व्ही. ज्याकडे कुणाचे लक्ष नसे पण तरीही तो सुरु असे.  कोप-यात कांदे व इतर साहित्य पडलेले, एखाद-दोन खाटा. या उपहारगृहाचे आणखी एक वैशिष्टय म्हणजे याला दरवाजा नव्हता, रात्री पडदे टाकून हे बंद होत असे. अशा या उपहारगृहात फावल्या वेळात प्राध्यापककर्मचारीवृंद सुद्धा येत. प्राध्यापक किंवा इतर कर्मचारी उपहारगृहात आल्यावर व्यत्यय नको म्हणून धुरांच्या रेषा काढणा-यांसाठी मागील बाजूस कडुनिंबाच्या सावलीतच दोन बाकड्यांची पर्यावरणपूरक अशी खुली केबिनसुद्धा होती. निमवाडीतील हे उपहारगृह एकांतात असल्याने खामगावातील अनेक मित्र मंडळी कडूनिंबाच्या छायेतील या निवांत ठिकाणाचा आधार घेत होते. परंतू हळू-हळू शहर वाढले , रस्ते रुंद होऊ लागली, वाहनांची संख्या वाढल्याने रुंद रस्त्यांची गरज अत्यावश्यक झाली. परंतू वृक्ष लागवड व संगोपन सुद्धा जरुरी आहे. नवीन रस्त्यांच्या कडेला सुद्धा वृक्ष लावली जात आहेत. त्यांचे संगोपन मात्र झाले पाहिजे. सरकारच्या भरवश्यावर न राहता प्रत्येकाने वृक्ष लागवड संगोपन करण्याचा वसा घ्यावा. आपल्या पुर्वजांनी वृक्षे लावलीत्यांचे संगोपन केले त्यामुळे आपल्याला फळे, छाया मिळाली. आपण आपल्या पुढील पिढीसाठी काय ठेवणार आहोत दोन-चार प्लॉट किंवा शहरात एखादा मोठा फ्लॅॅट , बँक बॅॅलन्स ? हे सुद्धा अगदी नकोच असेही नाही परंतू वृक्ष लागवड व पर्यावरण रक्षणासाठी आपण निदान खारीचा वाट तरी उचलला पाहीजे. 

    खामगावातील याच निमवाडीतून जाणा-या महामार्गाचे सुद्धा आता रुंदीकरण झाले. निमवाडी, सुटाळ्यातील मूकनिशस्त्रकडूनिंब या रुंदीकरणाचे बळी झाले. निरपराधसदैव दुस-यांना काही ना काही देणा-या या कडूनिंबांच्या व इतर अनेक वृक्षांवर यांत्रिक करवती कराकरा फिरल्या आणि बघता-बघता ती शेकडो वर्षे जुनी, भली मोठी झाडे एका पाठोपाठ एक धारातीर्थी पडली. कुणास ठाऊक का परंतू निरपराध,निशस्त्रांवर गोळीबार झालेले जालियानवाला बाग आठवलेत्यांना मारणारा जनरल डायर आठवला. त्याने बेछूटपणे माणसांवर गोळीबार केला. आज त्याचप्रमाणे सर्वत्रच बेछूटपणे वृक्ष कापली जात आहेत. आज निमवाडीतील हिरवळ, दिवसाची वर्दळ लुप्त झाली आहे. रात्री मात्र वर्दळ असते. मन हेलावलेगतकाळात गेलेनिमवाडीतील मित्र मंडळींच्या बैठकाचर्चाकडूनिंबाच्या छायेतील निवांतासाठी सायकलवर टांग मारून, गाड्या आल्यावर पेट्रोल खर्च करून चहानाश्त्यासाठी गावातून निमवाडीत जाणे, ”वो जिंदगीमे कल क्या बनेगाअशी तरुणांची ध्येये, मित्रांनी  पाहिलेली स्वप्ने , प्रेम कहाण्या, 80-90 च्या काळापर्यंत खामगांवात मुला-मुलींची मैत्री नसायची. बोलणे सुद्धा अगदी माफक असे. तसे या हॉटेल मध्ये मुली क्वचितच येत. आमच्या एका मित्राने (नांवाचा उल्लेख मुद्दाम टाळला) त्याला भावलेल्या एका मुलीला हॉटेल वरील पो-याला सांगून तिच्या टेबलवर चहा पाठवला होता. कारण तेंव्हा थेट सोबत चहा प्यायला घेऊन जाणे शक्य नव्हते किंवा "चल चहाला" असे म्हणण्यापर्यंत त्या मित्राचीच काय कुणाचीही बिशाद नव्हती. या ठिकाणी मुलेच मुलांचा पत्रलेखनाचा पिरेड घेत असत. ती कोणती असत हे काय सांगणे लगे ? कॉलेजच्या निवडणुका असल्या की, निमवाडीच्या हॉटेलात उत्साही उमेदवार व त्याचा कंपू "अपने को जिताना रे पोट्टो" म्हणत चहा पाजत असे व कचो-या खिलवत असे. चहाला कुणी प्रायोजक नसला की TTMM (तुझे तू माझे मी) असा खर्च करणे किंवा काटाकाटी अंतर्गत चहापानाचा कार्यक्रम होत असे.हा काटाकाटी खेळ कागदावर अंक लिहून एक एक जण नंबर सांगत असे व ते एक मित्र काटत (खोडत) असे.शेवटी ज्याने नंबर सांगितला परंतू सर्व नंबर काटले गेलेले असले की बिल ज्याचा नंबर कटला नाही त्याला भरावे लागे, चहाची उधारी व त्या गमती सुद्धा खूप घडायच्या. TTMM , काटाकाटी चा शोध कुणी लावला कुणास ठाऊक परंतू खिशात पैसे कमी असल्याने त्यांचा शोध लागला असावा. तेंव्हा पॉकेटमनी सुद्धा एखाद्यालाच मिळत असे तो ही मोठ्या मुश्कीलने. कडुनिंबाच्या जशा अनेक निंबोळ्या पडतात तशा अनेक आठवणी येत होत्या पण त्या कडुनिंबाप्रमाणे कडु नसून मधुर  होत्या.

   दोन वर्षांपूर्वी जेंव्हा निमवाडीतील वृक्ष तोडले तेंव्हा त्या ठिकाणी गेलो होतो. सोबतीला बालपणीपासूनचा सहपाठी मित्र विशाल देशमुख होता. मित्र मंडळीच्या गलक्यात निमवाडीत जाणारे आम्ही यावेळी मात्र दोघेच होतो. नेहमी हिरवेगारदाट वृक्ष पाहिलेल्या व आता उजाड, भकास झालेल्या त्या जागेची छायाचित्रे टिपण्याची काही ईच्छा होत नव्हती. तरीही कसे-बसे काढलेच. नेहमी सुरु असणारे उपहारगृह सुद्धा बंद होते. उजाड,पुर्वी नैसर्गिक छायारम्य वातावरण असलेल्या निवांत निमवाडीतून चहा नाश्ता व त्याहीपेक्षा जास्त आनंददायी अशा पुनश्च रिक्रियेट करणा-या गप्पा यांनी ताजे-तवाने होऊन आम्ही परतत असू. यावेळी मात्र आम्हाला तिथे चहा घ्यायला जागाच नव्हती, सावलीचा पत्ताच नव्हता, पुर्वीच्या निमवाडीच्या स्मृती घेऊन आम्ही तिथून काढता पाय घेतला.

    आज निमवाडीतून जातांना गुळगुळीत रस्ता आहे .नवीन व्यक्तीला येथून जातांना चांगलेच वाटेल. परंतू वर्ष 2018 पुर्वी येथे चहा , नाश्त्यासाठी गेलेल्या किंवा येथुन गेलेल्या वाटसरूंना जिथे कधी भले मोठे कडुनिंब , दाट सावली , सुखद नैसर्गिक थंडावा होता ते सर्व हरवलेले हे ठीकाण भकासच नाही का वाटणार ? 

(धुम्रपान आरोग्यास घातक व जीवघेणे आहे)

क्रमश: