२५/०२/२०२१

An article about the childhood stories of Post Mortem house

चिरफाड बंगला

आता हे स्थान पुर्वीच्या ठिकाणी नाही पण का कोण जाणे, खामगांवातील भकास स्थानांचा विचार करतांना माझ्या डोळ्यासमोर हे जुने स्थान कित्येकदा आले पण अशी स्थाने ही कोणत्याच शहराची शान नसतातच म्हणूनच नुकत्याच संपुष्टात आलेल्या लेख मालिकेत या स्थानाचा अंतर्भाव केला नाही. मृत्यू अंतिम सत्य आहे. कविने “मौत तू एक कविता है” असे जरी म्हटले असले तरी मृत्यू व तत्संबंधीत बाबी या भकासच नाही का वाटंंत. हा लेख वाचतांना कदाचित काहींना ब-यावाईट, कटू प्रसंगाचे स्मरण होईल असे वाटले तेंव्हा त्यांना कुठेही दुखवण्याचा व वेदना देण्याचा मुळीच हेतू नाही हे जाणावे. असे झालेच तर त्यांनी क्षमा करावी. जेंव्हा आपण दुस-याचे अश्रू पुसू शकत नाही तेंव्हा निदान त्याच्या डोळ्यात अश्रू येतील  असे तरी काही करू नये हे ज्ञात आहे. केवळ एक स्थान व उपयोगातून निघून गेलेला शब्द म्हणून हा लेख लिहिला आहे.

संग्रहीत चित्र 

    भुतांचा वास असलेल्या टॉकीज बाबत मागील लेख लिहिल्यानंतर डोक्यात ब-याच वेळ भुतप्रेतादी खुप विचार आले. त्यातूनच चिरफाड बंगला आठवला. "चिरफाड बंगला" खुप दिवसानंतर वाचला असेल ना हा शब्द ? इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरु झाल्यापासून व त्यांचे स्तोम अगदी ग्रामिण भागापर्यंत पोहचल्यापासून अनेक मराठी शब्दांचा प्रयोग होणे बंदच झाले. त्यातलाच हा एक शब्द या शब्दातील बंगला हा शब्द सुद्धा हिंदी भाषेतून आलेला असावा. तसेच हिंदी व मराठी या बहिणीच असल्याने चिरफाड या शब्दातील चिर व फाड हे दोन्ही शब्द हिंदी व मराठी भाषेत उपयोगात आणले जातात. बंगल्यासाठी मराठीत वाडा हा शब्द प्रचलित होता. लहानपणी केंव्हातरी कुणाच्या मुखातून चिरफाड बंगला हा शब्द कानी पडल्याचे स्मरते. कोणत्या घटनेबाबत त्यांनी हा शब्दप्रयोग केला होता ती घटना काही आता लक्षात नाही परंतू हा शब्द काहीतरी वेगळा वाटला व म्हणूनच तो लक्षात राहिला. “चिरफाड बंगला“ म्हटल्यावर एक मोठे दोन मजली , आजूबाजूला ऐसपैस जागा असलेल्या घराचे चित्र माझ्या डोळ्यासमोर तरळले होते. चिरफाड काय ? कशाची चिरफाड ? हे बालवयात काही समजले नव्हते. परंतू पुढे या शब्दाचा अर्थ समजला. रेल्वे लाईनच्या पलीकडे जयपूर लांडे या गावाकडे जाणा-या जुन्या रस्त्यावर हा बंगला असल्याचे व तिथे अपघाती मृत्यू झालेल्यांच्या मृत शरीराची चिरफाड केली जाते व मृत्यू कशामुळे झाला याचे निदान केले जाते असे कळले. पुढे चिरफाड बंगल्याचे समानार्थी असे “शवविच्छेदन गृह”, इंग्रजीतील “पोस्टमार्टम हाऊस” या शब्दांची सुद्धा शब्दसंग्रहात भर पडली. कधीतरी एकदा हा चिरफाड बंगला पहिल्यांदा पाहीला , अर्थात बाहेरूनच आणि लहानपणी या बंगल्याचे जे चित्र माझ्या डोळ्यासमोर तरळले होते ते साफ बदलून गेले. बंगला कसला एक छोटी तीन, चार पाय-या असलेली कौलारू खोली होती ती. 35-40 वर्षांपुर्वीच्या खामगांवात रेल्वे लाईनच्या पलीकडे फार मोठी वस्ती म्हणून नव्हती. जयपूर लांडे नाक्याच्या पलीकडे त्यावेळी डाव्या बाजूने एक जुने घर होते व त्या समोर आमचे मित्र रोहणकार बंधू यांनी घर बांधले होते. रोहणकार व आणखी बोटावर मोजता येतील अशी काही घरे होती. समन्वय नगर , झिया कॉलनी , क्रीडा संकुल त्याच्या आजूबाजूची वस्ती हे काही नव्हते त्या काळातील ही गोष्ट. आमचे घर हे समन्वय नगरच्या समोरच्या भागात परंतू रेल्वेलाईनच्या पश्चिमेकडील भागात असल्याने समन्वय नगराचा काही भाग आम्हाला दिसतो पण चिरफाड बंगला मात्र दृष्टीस पडत नसे. एखाद्या वेळी एखादी रुग्णवाहिका काळीज चिरणारा भेसूर सायरन वाजवत या भागात आली की नागरिकांत चर्चा होऊ लागे. मुलांच्या चर्चा काही औरच असत. “रात्री चिरफाड बंगल्यातून आवाज येतात बर !” , “अरे रात्री तिथे कोणी नसते पण लाईट लागतो व बंद होतो” , “एकदा मुडदा उठून बसला तर सर्व पळून गेले होते” , “अरे बाबा रात्री तिकडून कोणी नाही जात तू पण नको जात जाऊ” एखादा मुलगा सर्वांवर कुरघोडी म्हणून “अबे मला खिडकीतून कुणी तरी हात दाखवला होता” , "अरे एकदा मी तिकडून येत होतो तर माझ्या मागून कुणी तरी चालत होते, मागे पाहिले तर एक काळे कपडे घातलेला माणूस हवेत उडून गेला." अशा थापा ठोकून देई. याच थापा मग आणखी तिखट-मीठ लाऊन पुढे सांगितल्या जात असत. अशा स्वरूपाच्या त्या चर्चा असत.तिथल्या कर्मचा-याबाबत सुद्धा एकप्रकारचे भय लहान मुलांना वाटत असे किंवा मोठी मुले त्यांना घाबरवून देत असत. पण आम्हाला इंग्रजीत "Ghost Nonsense" हा पाठ होता. भुते नाही तर भीती माणसाला मारते असा त्याचा मतितार्थ होता. या धड्यामुळे वरील भाकडकथा या निव्वळ थापाच असल्याचे जाणवत असे.

    चिरफाड बंगल्याची उपयोगिता त्याकाळात कमी होती. आज वाढलेले वाहनांचे प्रमाण व त्यामुळे होणारे अपघात , भौतिक सुखांचे वाढलेले प्रचंड आकर्षण, अनावश्यक गरजा, ताण-तणाव, नैराश्य यांमुळे वाढलेले आत्महत्यांचे प्रमाण , वाढता हिंसाचार , शहरांतील टोळीयुद्ध , रोज होणा-या हत्या , सामुहिक हत्या हे जुन्या काळापेक्षा निश्चितच वाढलेले आहे. पुर्वी क्वचितच ऐकू येणारे ते भेसूर भोंगे नित्याचेच झाले आहेत. त्यातले भेसूरपण सुद्धा आता तितकेसे जाणवत नाही. लहानपणी पाहिलेल्या त्या चिरफाड बंगल्याचे स्थान त्याच्या आजूबाजूस वसाहत वाढल्यावर बदलले. चिरफाड बंगल्याचे स्थान भकास नसून चांगले असावे असे काही म्हणायचे नाही तथापी या अशा स्थानाची मुळी आवश्यकताच पडायला नको असे मात्र वाटते. कुणाचाही असा मृत्यू होऊ नये की ज्याचे कारण शोधण्याचे, निदान करण्याचे काम त्याच्या मरणोपरांत पडावे. परंतू असे या झपाट्याने बदलणा-या जगात , बदलत्या नैतिक मूल्याच्या काळात , मानवता , आध्यात्मिक वाचन लोप पावत जात असलेल्या काळात , भौतिक सुखासाठी एकमेकांचे खून पाडल्या जाणा-या , मोबाईल फोनसाठी  आत्महत्या  होणा-या , पूर्वीपेक्षाही वाढलेल्या जातीयवादाच्या या काळात मॉब लिंचिंग, ऑनर किलिंगच्या काळात हे घडू शकेल का ? या जगतात शांतता , सौहार्दता जो पर्यंत प्रस्थापित होणार नाही तो पर्यंत हे चिरफाड बंगले असेच राहतील का ? असे प्रश्न , अशा विचारांची चिरफाड डोक्यात होऊ लागली होती. तेवढ्यात एक रुग्णवाहिका तोच भेसूर आवाज घोंघावत वेगात जात असल्याचा आवाज माझ्या कानी आला. नुकत्याच डोक्यात येऊन गेलेल्या चिरफाड बंगला , अकाली, अपघाती  झालेले मृत्यू या विचारांमुळे आपल्या भारतीय संस्कृतीने दिलेला उपनिषदातील सर्वांच्या आरोग्यासाठीचा  

"सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चिद् दु:खभागभवेत " 

हा मंत्र आठवला आपसूकच सर्वांच्या कल्याणासाठी असलेला तो प्रार्थनारुपी मंत्र मनातल्या मनात म्हटल्या गेला व मी टाईप करणे थांबवले.

२३/०२/२०२१

Article about Hon Chief Minister of Maharashtra addressing to public of state

शिस्त काय फक्त जनतेसाठी 

नेत्यांसाठी नाही ?

सरकारने शिस्तपालन करणे प्राधान्याचे ठरते तितकेच जनतेला सुद्धा स्वत:ची व स्वत:च्या परिवाराची काळजी घेणे सुद्धा गरजेचे आहे. परंतू शिस्तपालन करणे हे जनतेचे जेवढे कर्तव्य आहे तेवढेच किंवा त्यापेक्षाही अधिक ते नेत्यांचे सुद्धा आहे यावर सरकारने विचार करणे व आपल्या कृतीतून ते जनतेपुढे ठेवणे हे सरकारचे आद्य कर्तव्य आहे.

परवा मा. मुख्यमंत्री यांनी जनतेला संबोधित केले 'किंबहुना' कोरोनाच्या या संकटात करायलाच पाहिजे होते. मा. मुख्यमंत्र्यानी आपल्या संबोधनात ब-याच गोष्टी सांगितल्या. मास्क घालायला पाहीजे , काळजी घ्यायला पाहिजे , शिस्त पाळायला पाहिजे असे त्यांचे म्हणणे होते. जनतेत बरेच लोक असे आहेत की जे शिस्त पाळत नाहीत. पण शिस्त काय ती जनतेनेच पाळायची का ? असा प्रश्न मात्र मा. मुख्यमंत्री महोदयांना याप्रसंगी विचारावासा वाटतो. याचे कारण हे की सत्ताधारी पक्षाचे आमदार , मंत्री हेच मुळात कोरोना बाबतची दक्षता घेतांना दिसत नाहीत. कुणी शिवजयंतीच्या निमित्ताने शेकडो लोकांना काय जमवतो, कुणाकडे लग्न समारंभाच्या निमित्ताने कित्येक राजकारणी काय जातात. एल्गार परिषदेला सरकारने परवानगी दिली होती व त्यातून शर्जील उस्मान याने विघातक , धर्मव्देशी असे भाषण दिले , हिदू धर्म सडला आहे म्हणे. हे आपण कसे खपवून घेतले ? गुन्हा नोंदवण्यात दिरंगाई झालीच.  तसेच आज गेल्या कित्येक दिवसांपासून गायब असलेले मंत्री संजय राठोड माध्यमांसमोर प्रकट झाले व पूजा चव्हाण प्रकरणाबाबत स्पष्टीकरण दिले. येथे मोठा जमाव एकत्रित झाला होता. वरील प्रकारची आयोजने जेंव्हा सरकार मधील आमदार, मंत्री हेच करीत असतील , कोरोना बाबतच्या दक्षतेचे नियम स्वत:च धाब्यावर बसवत असतील तर मा. मुख्यमंत्री साहेब तुम्ही फक्त जनतेलाच कसे काय उपदेश करता ? उलट तुम्ही सरकार मधील सर्वांना कोरोनाची सर्व दक्षता घेण्याचे ठणकावून सांगा ना ! तसे तुम्ही सांगितले तर मग जनतेला तुम्ही केलेल्या कोरोनाची दक्षता घेण्याच्या आवाहनाचे पालन करावे वाटेल. पण सत्तेसाठी म्हणून एकत्र आलेल्या तुमच्या साथीदारांना तुम्ही ठणकावून तरी कसे सांगणार म्हणा कारण सरकार व्यवस्थित चालले पाहिजे याची चिंता सुद्धा तुम्हाला असेल म्हणून मग लोकांना तेवढे सांगायचे. सत्ताधारी आमदार व मंत्र्यांना काहीही न सांगता तुम्ही विरोधकांनी ,मंदिरे उघडायला लावली म्हणून कोरोनाच्या नव्या लाटेचे खापर विरोधक व जनतेच्या माथी फोडण्याचा प्रयत्न करीत आहात. आपण हे सुद्धा ध्यानात घ्यावे की काही दिवसांपुर्वी राज्यात ग्रामपंचायत निवडणुका सुद्धा झाल्या त्या निवडणुका सुद्धा कोरोनाच्या प्रसारास कारणीभूत ठरल्या असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तुम्ही सरकारच्या वतीने जनतेच्या भल्यासाठी जरी सांगत असला तरी हे उपदेशाच्या बाळकडूचे डोस प्रथम आपल्या शिलेदारांना द्यावे असे वाटते. एखादा सामान्य व्यक्ती बिना मास्क दिसला तर त्याला दंड आकारला जातो , ब-याच लोकांना मार खावा लागला आहे , मंगल कार्यालयांना दंड झाला आहे , वर- वधूच्या नातेवाईकांना दंड झालेला पाहिला आहे परंतू राज्यात राज ठाकरे यांच्या व्यतिरिक्त इतर कुण्या राजकारण्याला दंड झालेला दिसला नाही. मुख्यमंत्री या नात्याने आपले जनतेला उद्बोधन करणे योग्यच आहे त्याबद्दल वाद नाही परंतू सरकारच्या उक्ती आणि कृतीत एकवाक्यता असली पाहीजे ना. नेत्यांच्या 'किंबहुना' सरकारच्या उक्ती आणि कृतीत एकवाक्यता असेल तरच त्या नेत्याचा ,सरकारचा जनतेवर प्रभाव पडतो अन्यथा जनता असल्या उपदेशांकडे दुर्लक्ष करते व नंतर तर असे पोकळ सल्ले जनता ऐकणे सुद्धा सोडून देते. सरकार व जनता या दोघांनाही सध्या या संकटकाळी दक्षता घ्यायची आहे. बरेच लोकांचा मास्क हा नाकाच्या खाली असतो , काहींचा मास्क हनुवटीवर असतो , काही लोक मास्क काढून बोलतात , काहीना मास्क केंव्हा घालायचा व केंव्हा नाही हे अद्यापही कळलेले नाही. जरी प्रथम सरकारने शिस्तपालन करणे प्राधान्याचे ठरते तितकेच जनतेला सुद्धा स्वत:ची व स्वत:च्या परिवाराची काळजी घेणे गरजेचे आहे. परंतू शिस्तपालन करणे हे जनतेचे जेवढे कर्तव्य आहे तेवढेच किंवा त्यापेक्षाही अधिक ते नेत्यांचे सुद्धा आहे यावर सरकारने विचार करणे व आपल्या कृतीतून ते जनतेपुढे ठेवणे हे सरकारचे आद्य कर्तव्य आहे.

१८/०२/२०२१

Series of articles about old buildings, gardens etc of Khamgaon City - Part 11 (Last Part)

खामगांवची शान असलेली आताची भकास स्थाने , भाग- 11

अंतिम भाग

न. प.हायस्कूलच्या मैदानात फिरायला गेलो असता त्या बंद पडलेल्या शाळेची अवस्था पाहून एक लेख लिहिला व खामगांवातील इतरही अशी भकास झालेली स्थाने आठवली त्यातून ही लेख मालिका तयार झाली. आपल्याच गावातील भकास झालेल्या वास्तूंची माहिती वाचल्याने अनेकांना खेद झाला , जुन्या आठवणी जागृत झाल्या , त्या शाळा , “वो खेल वो साथी वो झुले” असे ते बगीचे यांचे वैभव पाहिलेल्यांना त्या स्थानांची आजची अवस्था समजली व वाईट वाटले. अनेक लोकांच्या प्रतिक्रिया या लेखमालिकेच्या निमित्ताने माध्यमांवर आल्या , अनेकांनी फोन केले , अनेकांनी काही स्थाने सुद्धा सुचवली , काहींना कटू सत्याचे प्रकटीकरण झाल्याने रुचले सुद्धा नसावे , काहींनी काय पडले आहे जुन्या गोष्टींना उगाळून असेही म्हटले. परंतू वृत्तपत्रासह लेख मालिका ब्लॉग वरून प्रकाशित झाली त्यामुळे वाचक संख्येची नोंद झाली व त्यावरून ही मालिका वाचकांना रुचली असेच स्पष्ट झाले. 

ब्लॉग व स्थानिक जननिनाद या सायं दैनिकात 9 डिसे 2020 पासून खामगांवची शान असलेली आताची  भकास स्थाने या सलग 10 लेखांच्या मालिकेचे आज समापन करीत आहे. दर गुरुवारी एका स्थानावरचा लेख अशी सलग 11 गुरुवार ही मालिका चालली. सहज म्हणून नगर परिषद हायस्कूलच्या मैदानात फिरायला गेलो असता त्या बंद पडलेल्या शाळेची अवस्था पाहून एक लेख लिहिला व खामगांवातील इतरही अशी भकास झालेली स्थाने आठवली त्यातून ही लेख मालिका तयार झाली. एक लेख प्रकाशित झाला की पुढील लेखात कोणत्या स्थानाबद्द्ल लिहायचे हा प्रश्न पडायचा. कित्येक स्थानी प्रत्यक्ष जाऊन आलो , फोटो काढले . मी हे का करत होतो ? यातून काही निष्पन्न होणार का ?  यावर वेळ खर्च करून काय मिळणार ? असे प्रश्न मनात कित्येकदा आले. परंतू वाचकांनी एक-एक करून लेख वाचल्यावर त्यांच्या आलेल्या प्रतिसादामुळे व त्यांना लेख वाचल्यावर आनंद होत आहे हे मला जाणवल्यावर पैशात तोलता येणार नाही असा मानसिक आनंद मला प्राप्त झाला व वेळ सत्कारणी लागला असे वाटले. ही आनंदाची अनुभूती मला या मालिकेने दिले हे काही थोडे नव्हे.आपल्याच गावातील भकास झालेल्या वास्तूंची माहिती वाचल्याने अनेकांना खेद झाला , जुन्या आठवणी जागृत झाल्या , त्या शाळा , “वो खेल वो साथी वो झुले” असे ते बगीचे यांचे वैभव पाहिलेल्यांना त्या स्थानांची आजची अवस्था समजली व वाईट वाटले. अनेक लोकांच्या प्रतिक्रिया या लेखमालिकेच्या निमित्ताने माध्यमांवर आल्या , अनेकांनी फोन केले , अनेकांनी काही स्थाने सुद्धा सुचवली , काहींना कटू सत्याचे प्रकटीकरण झाल्याने रुचले सुद्धा नसावे , काहींनी काय पडले आहे जुन्या गोष्टींना उगाळून असेही म्हटले. परंतू वृत्तपत्रासह लेख मालिका ब्लॉग वरून प्रकाशित झाली त्यामुळे वाचक संख्येची नोंद झाली व त्यावरून ही मालिका वाचकांना रुचली असेच स्पष्ट झाले. 9 डिसे 2020 ते 18 फेब्रुवारी 2021 पर्यंत जगभरातून सुमारे 5000 वाचकांनी  हे लेेेख इंटरनेट वरून वाचले हे नम्रतेने नमूद करावेसे वाटते. मालिकेतील सुरुवातीचे लेख अजूनही वाचले जात आहे हे सुद्धा ब्लॉगच्या स्टेट्स वरून लक्षात येते आहे. प्रत्येक लेखांची वाचक संख्या सुद्धा लक्षणीय होती ती येथे देण्याची विशेष आवश्यकता वाटत नाही ते आत्मप्रौढी मिरवल्यासारखे वाटेल. खामगांव शहरात अशी आणखी काही स्थाने सुद्धा आहेत त्यापैकी इंद्र बगीचा हा खाजगी बगीचा , फेडरेशन , इंग्रज अधिका-यांच्या कबरी यांसारखी भकास व भडभडी जीन सारखी नामशेष झालेली काही ठिकाणे आठवली सुद्धा  परंतू या ठिकाणांचे निश्चित संदर्भ नसल्याने या स्थानांना या मालिकेतून समाविष्ट केले नाही. आजकाल वाचन कमी झाले आहे असे सतत म्हटले जाते परंतू या लेख मालिकेला मिळालेला उदंड प्रतिसाद पाहून अजूनही वाचन होत आहे असेच वाटले केवळ वाचनाचे माध्यम तेवढे बदलले आहे. वाचनासाठी आजकाल मोबाईल , ई बुक यांचा वापर केला जातो. लेख मालिकेचा वाचक हा केवळ जेष्ठ नागरिक नसून तरुण वर्ग सुद्धा होता हे आलेल्या प्रतिक्रियांवरून कळले व आनंद वाटला. अनेक वाचकांच्या प्रतिक्रिया सुद्धा खुप बोलक्या होत्या. काही मित्रांनी सुद्धा अनेक स्थानांच्या आठवणी लेख प्रकाशित झाल्यानंतर सांगितल्या. वाचकांच्या प्रतिक्रिया व फोनमुळे लेख लिहिण्याचा उत्साह कायम राहीला. 
आपले गांव सुंदर दिसावे, येथील वास्तू , येथील वारसा , येथील उद्याने , येथील वैशिष्ट्ये , येथील कलाकार व त्यांचे कलागुण हे सर्व टिकून राहावे हा या लेखमालिकेचा एकमेेेव उद्देश होता , कुणाचे दोष दाखवण्याचा नव्हे. “हे जग मी सुंदर करून जाईन“ असा एक पाठ आम्हाला होता. आप-आपल्या परीने काहीतरी चांगले करावे व जगाच्या सौंदर्यात भर घालावी असे या पाठात सांगितले होते. आपले गांव सुद्धा सुंदर असावे , सुंदर राहावे , स्वच्छ असावे  ही एकमेव मनिषा या लेख मालिकेतून प्रकट केली. या लेख मालिकेत आलेल्या स्थानांच्या संबंधीत कर्मचारी , अधिकारी , जनप्रतिनिधी यांनी हे सकारात्मक दृष्टीकोन ठेवून जाणून घ्यावे. 

कल जहाँ बस्ती थी खुशियाँ, आज हैं मातम वहाँ वक़्त लाया था बहारें वक़्त लाया है खिजां

याप्रमाणे कालच्या "रौनक" असलेल्या शहराची शान असलेल्या मालिकेत आलेल्या या स्थानांच्या ठिकाणी गतकाळात चहलपहल , आनंद, हिरवळ , विविध कुसुमे यांचे वास्तव्य होते परंतू आज तिथे भकासपणा , उजाडपणा आहे. हा काळाचा महिमा आहे काळाने या स्थानांच्या ठिकाणी "बहारे" आणली होती आज काळानेच तिथे "खिजा" अर्थात भकासपणा आणला आहे. आज जी स्थाने सुस्थितीत आहेत ती सुद्धा  कदाचित भविष्यात भकास होऊ शकतात हे जाणून त्यांची जपणूक झाली पाहिजे. 

ही मालिका जरी संपली असली तरी आगामी काळात वाचकांना रुची वाटेल व काही सकारात्मक घडेल अशी एखादी लेख मालिका निश्चितच सुरु होईल. आपल्या सर्वांचेे आठवणीनेे प्रतिक्रिया देणे , ई मेल , फोन करणे यासाठी आभार व्यक्त करण्यास शब्द अपुरे पडत आहेत.  

     ज्या खामगांवप्रेमी जनतेचे हे लेख वाचणे राहून गेले असतील किंवा ज्यांना हे लेख आपल्या आप्तेष्टांना पाठवायचे असतील या करीता या लेख मालिकेतील सर्व लेखांच्या लिंक खाली देत आहे. जेणे करून येथूनच त्यांच्या आवडीच्या लेखाच्या पानावर जाता येईल. धन्यवाद !

लेख मालिकेतील सर्व लेखांच्या लिंक

मुन्सिपल शाळा

http://vinayvarangaonkar.blogspot.com/2020/12/series-of-articles-about-old-buildings.html

भारतरत्न राजीव गांधी उद्यान

http://vinayvarangaonkar.blogspot.com/2020/12/series-of-articles-about-old-buildings_15.html

जुने स्टँड

http://vinayvarangaonkar.blogspot.com/2020/12/series-of-articles-about-old-buildings_23.html

जि.प. कनिष्ठ महाविद्यालय

http://vinayvarangaonkar.blogspot.com/2020/12/series-of-articles-about-old-buildings_31.html

निमवाडी

http://vinayvarangaonkar.blogspot.com/2021/01/series-of-articles-about-old-buildings.html

माणसांचा दवाखाना

http://vinayvarangaonkar.blogspot.com/2021/01/series-of-articles-about-old-buildings_14.html

रेडिओ श्रवण केंद्र

http://vinayvarangaonkar.blogspot.com/2021/01/series-of-articles-about-old-buildings_21.html

पाण्याची टाकी

http://vinayvarangaonkar.blogspot.com/2021/01/series-of-articles-about-old-buildings_28.html

जनुना तलाव

http://vinayvarangaonkar.blogspot.com/2021/02/series-of-articles-about-old-buildings.html

10 एक हाँटेड स्थान,टॉकीज

http://vinayvarangaonkar.blogspot.com/2021/02/series-of-articles-about-old-buildings_11.html

समाप्त

११/०२/२०२१

Series of articles about old buildings, gardens etc of Khamgaon City - Part 10

खामगांवची शान असलेली आताची भकास स्थाने,भाग-10 

एक हाँटेड स्थान, टॉकीज

"...खामगांवातील नवीन पिढीला इथे भुतांचा वास असल्याचे किस्से सांगितले जाणारी 

वास्तू होती याची कल्पनाही नसेल, त्यांनी हा लेख वाचला तर 

प्रगत तंत्रज्ञान युगातील ही पिढी यावर विश्वास ठेवणार नाही. 

परंतू आपल्या गावात  अशीही एक वास्तू होती हे कळल्यावर त्यांना गंमत मात्र 

जरुर वाटेल. तसेच जुन्या काळाच्या तुलनेत आता भुतांचे प्रताप व किस्से ऐकू येण्याचे प्रमाण अगदीच नगण्य झाले आहे. सध्या माणसांचेच प्रताप एवढे वाढले आहे की ते पाहून भुते लुप्त झाली असावीत...."

संग्रहीत चित्र 

कास स्थानांच्या या लेख मलिकेत आजचे स्थान हे एक विलक्षण असे स्थान आहे. शहराची शान वगैरे नसेल परंतू खामगांवातील एकेकाळचे मनोरंजनाचे चर्चित असे ठिकाण असल्याने या लेखमालिकेत  या स्थानाचा अंतर्भाव करावासा वाटला. भुते आहेत की नाही ? यावर उहापोह नेहमीच होतो. मागे एकदा डिस्कव्हरी चॅनल वर भुत असल्याचे सांगण्यात आले होते. 
    
या लेखातून भुत असते असे म्हणण्याचा किंवा भुतांच्या गोष्टींना समर्थन देण्याचा मुळीच हेतू नाही हे सुरुवातीलाच स्पष्ट करतो म्हणजे श्रद्धा, अंधश्रद्धा समर्थन , निर्मुलन याचा काही प्रश्न उरणार नाही असे वाटते.
तसेच हा लेख ऐकीव माहितीवर आधारीत असून यातून कोणत्याही स्थानाचा अवमान किंवा बदनामी करण्याचा सुद्धा मुळीच हेतू नाही. म्हणूनच या ठिकाणाचा नामोल्लेख व स्थान सुद्धा लेखात कुठे येणार नाही याची दक्षता घेतली आहे. खामगांवकर पुर्वी जे बोलायचे त्याचे केवळ नवीन पिढीला किंवा ज्यांना ज्ञात नसेल त्यांना कळावे हा या लिखाणाचा उद्देश आहे. कुणाच्याही भावना दुखवायचा मुळीच उद्देश नाही.   

खामगांव शहरात मनोरंजनासाठी म्हणून चित्रपटगृहे कधी सुरु झाले हे काही माहीत नाही परंतू आमच्या लहानपणापासून खामगांव शहरात तीन चित्रपटगृहे असल्याचे माहीत होते. एक टॉकीज बंद पडली होती ती आता पुन्हा सुरु आहे. एक नवीन चित्रपटगृह सुरु झाले होते ते बंद पडले व पाडले सुद्धा. तिथे आता दुसरा व्यवसाय आहे. तसेच एक जुनी टॉकीज सुद्धा आता पाडल्या गेली आहे. सद्यस्थितीत शहरात दोन टॉकीज सुरु आहे. खामगांवातील एक टॉकीज चित्रपती व्ही. शांताराम यांच्या मालकीची होती असेही जुने लोक सांगतात. तसेच सुमारे 1950 च्या पुर्वी इथे आणखी एक अशी टॉकीज पण होती की जीचे बंद पडण्याचे कारण मोठे विलक्षण होते. ही टॉकीज जेंव्हा सुरु होती त्याकाळातील फारच थोडे लोक आता हयात असण्याची शक्यता आहे. परंतू ही टॉकीज जिथे होती ते ठिकाण व तिची जुनाट/पडकी इमारत मात्र आमच्या पाहण्यात आली आहे. आमच्या लहानपणी मग आम्हाला या टॉकिजबाबतच्या निरनिराळ्या कथा कळू लागल्या. या टॉकीजमध्ये म्हणे भुतांचा वास होता. आता भुतांना चित्रपट आवडतात म्हणून ते तिथे येत होते का हे एखाद्या भुताकडूनच कळू शकेल. ही टॉकिज व येथील भुतांबाबतच्या नाना गोष्टी खामगावात तेंव्हा चर्चिल्या जात. चित्रपट सुरु असतांना म्हणे दर्शकांच्या खुर्च्या विरुद्ध दिशेकडे वळून जायच्या, चित्रपट सुरु असतांना पडद्यावर चित्रे उलटी दिसू लागत, बाकडे वाजू लागत. या अशा घटनांमुळेच हे थिएटर बंद पडले. ते पुन्हा सुरु करण्यासाठी व पुन्हा भुतांचा त्रास न होण्यासाठी मग एक ब्रह्मास्त्र शोधल्या गेले ते म्हणजे देव. भुते फक्त देवांनाच घाबरतात म्हणून मग देवाचा सिनेमा लाऊन चित्रपटगृह पुन्हा सुरु केले गेले. हा चित्रपट काही दिवस चालला व गेला. परंतू ती टॉकीज पुन्हा बंद पडली. भुते जणू काही हात धुऊन या टॉकीजच्या मागेच लागली होती. देव जात नाही तोच म्हणजे देवाचा तो सिनेमा गेल्यावर भुते पुन्हा दाखल झाली व त्यांच्या करामतींनी पुन्हा टॉकीज बंद पाडलीच. 

या टॉकीजची भग्न वास्तू , वास्तू काय निव्वळ काही अवशेषच आज दिसतात. ही टॉकीज म्हणजे त्याकाळात  खामगांवातील सिनेरसिकांसाठी एक चांगली सुविधा म्हणून सुरु केली होती. अर्थात भुतांच्या या गोष्टींमुळे त्या ठिकाणी किती सिनेरसिक जात असतील हे एक प्रश्नचिन्हच आहे. भुतांच्या या घटनांमुळे या टॉकीजवर जे गंडांतर आले त्यातून ही टॉकीज कधीच सावरली नाही. आज खामगांवातील नवीन पिढीला इथे अशी भुतांचा वास असलेली वास्तू होती याची कल्पनाही नसेल , त्यांनी हा लेख वाचला किंवा त्यांना उपरोक्त कथा कधी सांगितल्या तर तंत्रज्ञान युगातील ही पिढी यावर विश्वास ठेवणार नाही. परंतू आपल्या गावात अशीही ही एक वास्तू होती याबाबत त्यांना कळेल व त्यांना गंमत मात्र वाटेल.

आधीच सांगितल्याप्रमाणे भारतात अशा भुताखेतांच्या कथांना अंत नाही. अनेक हाँटेड अशी ठिकाणे जगभरात आहेत. काही ठिकाणी तर आजही विशिष्ट वेळेनंतर कुणीही जात नाही. यामुळेच अनेक लेखकांनी भुतांबाबत लेख, पुस्तके लिहिली आहेत. व. पु. काळे यांचे एकबोटे आडनांव असलेल्या मदत करणा-या भुताची आवर्जून ऐकावी अशी मजेशीर कथा आहे, मराठीतील भुताचा भाऊ, हा खेळ सावल्यांचा आदी चित्रपट, हिंदीत तर कितीतरी चित्रपट निघाले , अनेक मालिका निघाल्या. रामसे बंधु या निर्माता, दिग्दर्शक बंधूव्दयांनी निव्वळ भुताचेच सिनेमे बनवले होते. त्यांचा एखादा भुताचा सिनेमा या टॉकीजमध्ये लावला असता तर त्यात भुतांनी खुर्च्या फिरवणे किंवा पडद्यावरची चित्रे उलटी करणे असे प्रताप दाखवले असते का ? तसेच जुन्या काळाच्या तुलनेत आता भुतांचे प्रताप व किस्से ऐकू येण्याचे प्रमाण अगदीच नगण्य झाले आहे. सध्या माणसांचेच प्रताप एवढे वाढले आहे की ते पाहूनच भुते लुप्त झाली असावीत. असे भुतांबाबत अनेक प्रश्न व विचार मनात घेऊन मी पुन्हा एखादे भग्न , भकास झालेले स्थान आठवू लागलो.

क्रमश:

०४/०२/२०२१

Series of articles about old buildings, gardens etc of Khamgaon City - Part 9

खामगांवची शान असलेली आताची 

भकास स्थाने , भाग- 9

जनुना तलाव 

भकास स्थानांच्या यादीतील या स्थानाबाबतचा लेख हा बहुप्रतिक्षित असावा. ही 

लेखमालिका सुरु केल्यापासून अनेकांचे दुरध्वनी येत आहेत व समाज 

माध्यमांवर प्रतिक्रिया सुद्धा येत आहेत त्यापैकी अनेकांनी जनुना तलाव या खामगांव 

व परिसरातील सर्वात लोकप्रिय व प्रेक्षणीय अशा स्थानाच्या आठवणी काढून त्याबाबत 

लिहावे अशी इच्छा प्रकट केली. त्यामुळे हा आजचा लेख. हा लेख म्हणजे जुलै 2014 

मध्ये प्रकाशित झालेल्या लेखाची सुधारीत आवृती आहे याची वाचकांनी नोंद घ्यावी.


प्रवेशव्दार 
 
भग्न शिल्पे वर  पक्ष्याचे शिल्प पडलेले दिसत आहे  


   

सहा नंबर शाळेत वर्ग चौथीत होतो तेंव्हा माझ्या वडीलांनी आमचे कुटुंबीय व त्यांच्या मित्रांचे कुटुंबीय असे सर्व सायकलवर डबा पार्टीस जाण्याचा बेत आखला होता. त्याप्रमाणे आम्ही निघालो. दुपारची वेळ आमच्यापैकी कुणी पायी तर कुणी सायकलवर असे निघालो. 1980 चे दशक होते ते. आजच्यासारखे खामगांव विस्तारीत झाले नव्हते , वाहने, वर्दळ अगदीच कमी असायची. मुख्य रस्ता सोडून आम्ही अरुंद अशा रस्त्याला लागलो येथे गर्दी नव्हती , सुनसान रस्ता त्यामुळे सर्वांच्या सायकली सुसाट निघाल्या. आता रस्त्याच्या बाजूला वडाची भली मोठी झाडे , त्यांच्या मोठ्या पारंब्या असे दृश्य दिसू लागले. आम्ही थांबून सायकलच्या कॅरीअरवर चढून पारंब्यांना लोंबू लागलो. आमच्यापैकी वयाने थोडी मोठी मुले सायकल चालवता-चालवता पारंब्यांना लोंबून सायकल सोडून देत. ती चालक विरहीत सायकल मग समोर जाऊन पडे. अशी गंमत करत पुढे गेल्यावर एक भव्य दरवाजा आम्हाला दिसला. बाप रे ! किती छान ! असे उद्गार आमच्या मुखातून बाहेर पडले. गेंडा , हरीण , मगर विविध पक्षी यांची मनमोहक शिल्पे असलेला तो मोठा दरवाजा आमच्या लहान दृष्टीस अधिकच भव्य वाटत होता. कुणीतरी म्हणाले आला जनुना तलाव. ही जनुना तलावाची पहिली भेट आजही लक्षात आहे व चिरस्मरणीय आहे. आत गेल्यावर पिंजरे , खुप झाडे-झुडपे व पुढे गेल्यावर तो खामगांवच्या तमाम जनतेला प्रिय असा जनुना तलाव. आता पोहण्यासाठी गेल्यावर या काठाहुन उडी मारल्यावर त्या काठापर्यंत कित्येकदा गेलो आहे पण तेंव्हा आम्हा लहानग्यांना किती मोठा वाटत होता तो तलाव. समुद्र पण तेंव्हा पाहिला नव्हता पण समुद्रासारखाच भव्य वाटला होता. खुप , खेळून बागडून डबा खाऊन आम्ही परतलो होतो. जनुना तलाव हे स्थान तेंव्हा सर्वप्रथम ज्ञात झाले. नंतर मग तिथे कित्येकदा जाणे झाले. पण जसे-जसे वय वाढत होते तशी तशी जनुना तलावाची दुर्दशा सुद्धा डोळ्यांना दिसत होती.

अलीकडेच एक दिवस अचानक जनुना तलाव उद्यानाचा विकास सुरु करण्याची बातमी ऐकली. कोट्यावधी रुपयांच्या निधीची तरतूद झाल्याचे ऐकले ही खामगांवकरांसाठी आनंदाची बातमी होती. खामगांवातील प्रचंड तापमानात अनेक उत्साही मंडळींची पाऊले पोहण्यासाठी म्हणून जनुना तलावाकडे वळतात. सकाळी पोहण्याच्या व्यायामामुळे येथे एक विशिष्ट प्रकारचा मानसिक आनंद मिळतो पण जनुना तलावाची दुर्दशा पाहुन दु:ख सुद्धा होते. जनुना तलाव म्हणजेच तलाव व उद्यान असे दोन्ही हे वाचकांनी समजावे. जनुना तलावावर आता बघण्यासारखे म्हणजे फक्त पाणी आहे तेही इंग्रजांनी बांधलेली भिंत असल्यामुळे. पुर्वी येथे बगीचा असल्याची काही चिन्हे आजही दिसतात. प्रवेशव्दारावरील व बगीच्यातील अंतर्गत व आकर्षक शिल्पे आम्हा लहान मुलांची नजर खिळवून ठेवत उद्यानात प्रवेश करतांनाच सर्वप्रथम हरणांचा पिंजरा होता. त्याच्या बाजूला कबुतरे, ससे यांचा एकच संयुक्त पिंजरा होता. त्याच्याजवळ उद्यानरक्षकासाठी घर, समोर गेल्यावर छोटे हौद ज्यात कमळे फुलायची. या हौदात सुद्धा मगर, बदके यांची शिल्पे होती. हे दोन्ही हौद आज कोरडे असतात. तलावाकडे जातांना डावीकडे एक छत्री व उजवीकडे एक छत्री आहे व आजही सुस्थितीत आहे.

      पुर्वी श्री पिल्ले म्हणून व्यक्ती उद्यान रक्षक म्हणून होते.जे अतिशय इमानेइतबारे उद्यानाची व प्राण्यांची काळजी घेत उद्यानात कुठेही काही वाजले की या पिल्लेंची शिट्टी वाजे त्यामुळे कुणी पानालाही हात लावण्याची हिम्मत करीत नसत. खामगांव नगरीचे शिल्पकार स्व. श्री शंकरराव बोबडे यांच्या कारकीर्दीत या उद्यानाची शान होती. संपूर्ण जिल्ह्यात तेंव्हा हे ठिकाण प्रसिद्ध होते. शंकरराव बोबडे हे स्वत: वृक्षप्रेमी असल्यामुळे त्यांनी खामगांवातील सर्वच उद्यान विकासात पुढाकार घेतला होता. उंचावर असूनही भारतरत्न राजीव गांधी उद्यान जे खामगांवात टॉवर गार्डन व यशवंत टॉवर या नावाने प्रसिद्ध होते येथे नटराज गार्डन विहिरीवरून पाणी सुविधा उपलब्ध करून हे उद्यान फुलवले गेले होते. आता या उद्यानाची सुद्धा दशा पाहवत नाही व त्याबाबतचा स्वतंत्र लेख या लेख मालिकेत येऊन गेला आहे. जनुना तलाव उद्यानात आजही गुलमोहर, आंबा आदी अनेक भली मोठी झाडे आहेत. मात्र उद्यानाची दुरावस्था पाहून, तेथील पुर्वीच्या रम्य वातावरणाऐवजी आताचा भकासपणा , उजाडपणा पाहून तिथे जाणा-या खामगांवकरांना त्यातल्या त्यात ज्यांनी या उद्यानाचे वैभव पाहिले आहे त्यांना निश्चितच मोठी खंत होत असेल. उद्यानाला कंपाउंड नाही , पिंज-याच्या जाळ्या तुटलेल्या आहेत (आता वन्यजीव धोरण बदलले असल्याने पिंजरे काढूनच टाकले आहेत) , तलावाच्या भिंतीवरील संरक्षक कठडे चोरट्यांनी काढून नेले आहेत. भिंतीवरून जातांना दोन्हीकडे खोल असल्याने भिंतीवरून जाणारा व्यक्ती खाली पडू शकतो, फुलझाडे नाहीत , मुलांना खेळण्यासाठी एकच तुटकी जंगलेली घसरगुंडी आहे, या घसरगुंडीच्याच ओळीत काही शिल्पे होती जी आता उध्वस्त झाली आहेत , शिल्पांसाठीची चबुतरे मात्र आहेत. शहराची फुफ्फुसे असणा-या उद्यानांना फुलवण्यासाठी खामगांव नगर परिषदेने सुनियोजित असा कार्यक्रम राबवण्याची नितांत आवश्यकता आहे. तलावाकडे जाणा-या रस्त्याबाबत जर म्हणाल तर साक्षात ब्रह्मदेवाने जरी सांगितले की येथे रस्ता होता तरी कुणाचा विश्वास बसणार नाही अशी या रस्त्याची स्थिती आहे. (आता निम्मा रस्ता चांगला झाला आहे ) या रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या वटवृक्षांची संख्या आता रोडावली आहे. (तलावाला पोहायला येणा-या व काही निसर्गप्रेमी मंडळीनी आता मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली आहे ) पुर्वी या तलावातून खामगांव शहरास पाणी पुरवठा होत असे. आजही व्यवस्था केली तर अर्ध्या खामगांव शहरास या तलावातून पाणी पुरवठा होऊ शकतो. आजकाल खामगांवातच नव्हे तर बहुतांश शहरात उद्याने उपेक्षित झाली आहेत. मोठया शहरातील उद्यानात तर आता लहान मुलांना घेऊन जाणे कठीण झाले आहे असे तरुणाईचे पराक्रम सुरु असतात.

     जनुना तलाव व उद्यान विकास सुरु होत आहे. ( काही बदल झाले आहेत  परंतू फुलझाडे , हिरवळ याऐवजी रस्ते , सिमेंटच्या छोट्या भिंती व जुना दरवाजा चांगला करण्याऐवजी त्याच्या समोर विनाकारण नवीन  कमान बांधण्यात आली आहे ). 2019 च्या उन्हाळ्यात जनुना तलाव पुर्ण आटला होता. ते दृश्य वेदनादायी होते. मी माझे मित्र धनंजय टाले , रितेश काळे असे तिघे तेंव्हा तिथे भर उन्हात , भर दुपारी गेलो होतो. तलावात कित्येकवेळा पोहलेलो आम्ही अक्षरश: भेगा पडलेल्या तलावाच्या तळातून चालत होतो तेंव्हा तलावात पाणी नव्हते पण आमच्या डोळ्यात मात्र होते.पण त्या चक्षूस्त्रवाने तलाव थोडी भरणार होता. आम्ही जड अंत:कारणाने तिथून निघालो होतो.ईश्वर कृपेने पावसाळ्यात तलाव पाण्याने पुनश्च काठोकाठ भरला, ओव्हरफ्लो झाला. परंतू जुन्या पाईपलाईन मधून लिकेज सुरूच असते व हजारो लिटर पाणी वाया जात असते ते पाणी उद्यानासाठी सुद्धा वापरत नाही. 

    खामगांव शहरातील या विरंगुळ्याच्या रमणीय , निसर्गसमृद्ध  ठिकाणास न.प. ने गतवैभव प्राप्त करून द्यावे तसेच तलाव रोड हा संबंधीत विभागाने दुरुस्त करावा, रस्त्यावरील वटवृक्षांचे जतन करावे अशी खामगांवातील जनतेची अपेक्षा आहे. खामगांव नगर परिषदेने आता येथे पुन्हा सुंदर बाग फुलवावी , राष्ट्रीय शाळेच्या निमित्ताने येथे कितीतरी शिल्पकार आहेत. नुकत्याच झालेल्या 26 जानेवारीच्या दिल्ली येथील पथ संचलनात खामगांवचे सागर एरंडोलकर यांनी बनवलेली काही शिल्पे होती. असे अनेक कलाकार आपल्याच शहरात आहेत अशा कलाकारांकडून येथील शिल्पे दुरुस्त करून घ्यावी काही नवीन लावावीत. श्री पिल्ले यांच्यासारख्या उद्यानप्रेमी व्यक्तीची येथील उद्यानरक्षक म्हणून नेमणूक करावी व जनुना तलाव उद्यानास पुन्हा रमणीय बनवावे. जनुना तलाव व तेथील उद्यान सुद्धा त्याला वैभव देणारे स्व. श्री शंकरराव बोबडे , कलाचार्य स्व.श्री पंधे गुरुजी , उद्यानरक्षक श्री पिल्ले आदींच्या स्मृती व स्वत:च्या वैभवाचे सुंदर दिवस आठवून ते सुंदर , सुखाचे दिवस त्याला कुणीतरी वापस आणून देण्याची प्रतिक्षा करीत “कोई लौटादे मेरे बीते हुये दिन” असेच म्हणत नसेल का ?

जनुना तलाव प्रेमी खामगांवकरांसाठी तलावाबाबतच्या जुन्या लेखांच्या लिंक, 👇

आवड असल्यास लिंक वर क्लिक करा   👇

1 तलावाने डोळ्यात पाणी आणले 

http://vinayvarangaonkar.blogspot.com/2019/04/januna-lake-dried-this-year-its-very.html

2 गाळमुक्त तलाव ... रोटरीचा दिलासा 

http://vinayvarangaonkar.blogspot.com/2019/04/blog-post.html

जय बाबा बर्फानी ... तालाबमे भर दे पानी 

http://vinayvarangaonkar.blogspot.com/2019/11/article-about-lake-overflow-power-of.html 


०२/०२/२०२१

Article about Sharjeel Usman wrong statement against Hindu

 ”...आम्ही सडलो” म्हणणारे काय कारवाई करणार?

“इतकी वर्षे आम्ही सडलो” जे स्वत:लाच पूर्वी सडलो असे म्हणत होते त्यांना आता “हिंदुस्थानमे आज का हिंदु समाज बुरी तरहसे सड चुका है | ” असे वाक्य काय बोचणार ! बोचले असते तर त्यांनी व त्यांच्या दिल्लीवासी शिलेदारांनी काही तर उद्गार काढले असते.



काही तरी परिषदा , संमेलने , सभा घेत राहायच्या आणि मुक्ताफळे उधळत राहायची अशी आता रीतच जणू रूढ झाली आहे. हार्दिक , कन्हैय्या , शर्जील इमाम , अकबरुद्दिन यांनी देशविरोधी अशी अनेक वक्तव्ये केली आहेत तसेच अनेक राजकारण्यांनी सुद्धा अशोभनीय अशी वक्तव्ये केली आहेत व नतंर सारवासारव , आत्मक्लेश वगैरे प्रकार केले आहे. परवा सुद्धा असाच एक "एएमयू"चा तरुण पुण्याला येऊन हिंदू धर्माबाबत बोलून गेला. आजचा हिंदू धर्म हा सडलेला आहे असे वक्तव्य त्याने केले. यावर माध्यमांवर अनेक प्रतिक्रिया येत आहे. विरोधी पक्ष सुद्धा आक्रमक झाला आहे व कारवाईची मागणी करत आहे. आता या अशा वक्तव्ये करणा-यांवर थातूरमातूर  कारवाई होते आणि मग ते प्रकरण थंडबस्त्यात चालले जाते. काहींचे असे म्हणणे असते की अशा लोकांना काय प्रतिक्रिया द्यायची , हे प्रसिद्धीसाठी , कुणीतरी भडकवल्यामुळे अशी वक्तव्ये करीत असतात. परंतू असे काही ऐकल्यावर स्वस्थही बसवत नाही. कुठेतरी, कुणीतरी काही तर बोलले पाहिजेच ना ! व्यक्त न होणे , गप्प राहणे , “काही बोलू नको बर बाबा , आपल्याला काय करायचे , आपल्याला आपले शिक्षण , नोकरी करायची , कुणाशी काही घेण-देण नाही “असे बाळकडू आपण तर लहानपणापासून पितच आलेलो आहोत, पुढील पिढीला सुद्धा तसेच पाजत राहायचे का ? हे असे बाळकडू आपल्या मुलांना मिळत असते शिवाय ही जात तशी , ती जात अशी , ही जात श्रेष्ठ ती कनिष्ठ असा आपल्या धर्मातील वाढता जातीभेद आहेच. मग काय ही अशी विखारी पिलावळ येते आणि काहीही बरळून जाते आणि आपण दुर्लक्ष करतो. आपले हे दुर्लक्ष म्हणजे आपली दुर्बलता असेच मग या विषारी सर्पांना वाटत असते. त्यामुळे मग त्यांना अधिकच जोर येत असतो. हा देश हिंदु सुर्य महाराणाप्रतापचा देश आहे , पृथ्वीराज चव्हाण यांचा देश आहे , भगतसिंगांचा देश आहे , परकीय सरकारला आपल्या अग्रलेखाने भंडावून सोडणा-या टिळकांचा देश आहे तसेच ज्या पुण्यात हा शर्जील बरळला ते पुणे औरंगजेबाला त्याच्याच दरबारात खडसावणा-या ज्या शिवाजी महाराजानी वसवले आहे त्या छत्रपतींचा हा देश आहे. तेंव्हा या अशा विखारी वक्तव्ये करणा-यां विरोधात देशाच्या एकतेसाठी कुणी बोलायला नको की तो ठेका काय फक्त कुण्या राजकीय पक्षाला अथवा कुण्या संघटनेला दिला आहे ? आपण शर्जीलच्या वक्तव्याबाबत त्याच्यावर कारवाई करण्याबाबत राज्य सरकारला एक हिंदु म्हणून किमान एक पत्र तरी पाठवू शकतो. राज्यातील तमाम हिंदूनी अशी पत्रे सरकारला पाठवली तर सरकारला हिंदूंची , हिंदुत्वाची जाणीव तर होईल. आपण जर असेच गप्प राहिलो तर हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ज्याला हिरव वादळ म्हणायचे त्यात आपल्या आगामी पिढ्या नष्टच नाही का होणार ? असे किंवा या स्वरूपाचे वक्तव्य शर्जीलच्या ऐवजी कुण्या हिंदुने इतर धर्माविरोधात केले असते तर काय झाले असते याचा विचार करावा. या देशातील या अशा व्यक्तीस्वातंत्र्याचा पुरेपूर गैरफायदा घेणा-यांना वेसण घातली पाहीजे. हे स्वत:ही जगत नाही व दुस-यालाही जगू देत नाही. यांच्या वक्तव्यांमुळे गदारोळ होतो व पुन्हा शासकीय यंत्रणांची उर्जा खर्च होते. शर्जील उस्मानी याच्या वक्तव्यावर राज्य सरकारने कारवाई करावी अशी मागणी होत आहे. पण त्यात दिरंगाई होत आहे. हे सरकार तरी काय कारवाई करणार म्हणा ? सरकार मधील प्रमुख पक्षाचे सर्वेसर्वां यांना आम्ही हिंदुत्व सोडले नाही हे सांगावे लागते. पुर्वी ज्या मित्र पक्षासोबत होते त्यांच्याशी फारकत झाल्यावर हे म्हणाले होते “इतकी वर्षे आम्ही सडलो” जे स्वत:लाच पूर्वी सडलो असे म्हणत होते त्यांना आता “हिंदुस्थानमे आज का हिंदु समाज बुरी तरहसे सड चुका है | ” असे वाक्य काय बोचणार ! बोचले असते तर त्यांनी व त्यांच्या दिल्लीवासी शिलेदारांनी काही तर उद्गार काढले असते. एरवी प्रत्येक बाबीवर माध्यमांवर बोलणारे हे शिलेदार आता मात्र गप्प का ? 

👉लेखन उपरांत वरील प्रकरणात गुन्ह्याची नोंद झाली असल्याचे वृत्त आले.