२७/०१/२०२२

Article in the memory of a super duper hit old movie Johny Mera Naam

जॉनी मेरा नाम 

(an unforgettable hindi movie )

"जॉनी मेरा नाम" हा चित्रपट प्रदर्शित होऊन  50 वर्षे पूर्ण झाल्याची पोष्ट वाचली व डोळ्या समोर हा सुपर हिट सिनेमा तरळून गेला. 2022 मधील तरुण पिढीस या चित्रपटाबाबत कितपत माहिती असेल याचा अंदाज नाही परंतू या चित्रपटाबाबत लिहिण्यास कुणास ठाऊक का पण बोटे शिवशिवू लागली व हाच विषय हाती घेतला.
भारतातील जनतेचे आवडते विषय म्हणजे क्रिकेट , राजकारण , खाणे-पिणे आणि सर्वात आवडीचा , ग्लॅॅमर , गॉसिप असलेला आणखी एक विषय  म्हणजे सिनेमा. राजा हरीश्चंंद्र ने सुरुवात झालेला भारतातील मूकपट पुढे आलमआरा या चित्रपटानंतर बोलका झाला, तदनंतर रंगीत झाला. इस्टमन कलर, ओखा कलर इ. रंगीत तंत्रज्ञान असलेली नांवे  चित्रपटाच्या नामावलीत दिसू लागली. सुमधुर संगीत , मेहनती संगीतकार आणि गोड गळ्याचे गायक-गायिका हे सिनेरसिकांच्या मनावर अधिराज्य करू लागले. देव-राज-दिलीप या तीन सुपरस्टारच्या काळात तर कितीतरी सुमधुर चित्रपट झळकले. राज कपूरच्या आवारा ने रशियन जनतेला भुरळ घातली. सिनेमा बहरत गेला. कित्येक ऐतिहासिक, पौराणिक चित्रपट गाजले. देशभक्तीपर, युद्धपटांंनी  जनतेच्या मनात देशभक्तीची भावना रुजवली. हे असे कितीतरी दाखले भारतीय सिनेमा व सिनेमाप्रेमी जनतेबाबत देता येतील. आज हे सर्व आठवण्याचे कारण म्हणजे, 
      त्या दिवशी फेसबुक वर "जॉनी मेरा नाम" हा चित्रपट प्रदर्शित होऊन 11 नोव्हे 2020 रोजी 50 वर्षे पूर्ण झाल्याची पोष्ट वाचली व डोळ्यासमोर हा सुपर हिट सिनेमा तरळून गेला. 2022 मधील तरुण पिढीस या चित्रपटाबाबत कितपत माहिती असेल याचा अंदाज नाही परंतू या चित्रपटाबाबत लिहिण्यास कुणास ठाऊक का पण बोटे शिवशिवू लागली व हाच विषय हाती घेतला. "अब बोल तेरा नाम क्या है ?" असे प्राण ने विचारल्यावर "जॉsssनी मेsssरा नाम" असे आपल्या नेहमीच्या आवाजाच्या चढ उताराच्या लकबेने मारामारीच्या दृश्यांच्या वेळी देव आनंदने दिलेले उत्तर आठवले. मारामारी करतांना देव आनंदला पाहणे म्हणजे सुद्धा एक गंमतच होती. एकदम ढिले शरीर करून त्याची मारामारी असे. पण देव साब सारखा देखणा , चिरतरूण, सदाबहार, चॉकलेट हिरो, इंग्रजीवर मोठे प्रभुत्व असलेला, MA इंग्रजी शिक्षण झालेला, स्टायलिश पेहराव असणारा, कामात स्वत:ला झोकून देणारा असा  दुसरा अभिनेता कुणी झाला नाही व होणारही नाही.  जॉनी मेरा नाम या चित्रपटाच्या गाण्यांची एक कॅॅसेट माझ्याकडे होती, नव्हे आहे. परंतू आता पेटीत पडलेली आहे. एकापेक्षा एक सरस गीते असलेला हा कल्याणजी आनंदजी यांनी संगीतबद्ध केलेला सिनेमा आहे. देव आनंद व राजेश खन्ना यांच्या चित्रपटांच्या गीतांच्या कॅॅसेटचे एक वैशिष्ट्य असे. यात गाण्याच्या सुरुवातीला या अभिनेत्यांचा एक संवाद सुद्धा असे.  मग गाण्यासह ते संवादही पाठ होऊन गेले. 
"जब दरवाजा खुला तो दो हसीन आंखे मेरी तरफ देख राही थी , दिल धडक धडक के कह रहा था , की जॉनी बेटे आज तेरी तकदीर खुलनेवाली है | लेकीन कंही अगर इनको पता चल गया की चोर है , उचक्का है , छोटी मोटी चोरीयोंंके बारे मे बार बार जेल जा चुका है | तो इन हसीन आंखो मे सिवाय नफरत के कुछ नही रहेगा |"
आणि मग किशोरकुमारच्या आवाजात गाणे वाजत असे "नफरत करनेवालो के सिनेमे प्यार भर दु|" असे संवाद , अशी गाणी मग डोक्यात फिटच होऊन गेली. माझ्या काकांकडे अँबेसॅॅडर होती, या कारने आम्ही खुप प्रवास केला. या कारवर सुरुवातीला बाळू भाऊ म्हणून एक चालक होता. याला हिंदी सिनेमातील गाणी म्हणायला आवडत असे.तो आमच्या घराच्या मागेच राहत होता. अनेकदा तो मोठ्या आवाजात गाणी गात असे या आम्हा भावंडांना त्याचे ते गाणे म्हणणे आवडत असे. 1970 च्या काळात महाविद्यालयीन तरुण असलेला बाळू भाऊ देव आनंद / किशोर कुमार हे कॉम्बिनेशन असलेली गाणी मोठ्या आवडीने गात असे. असेच एकदा आम्ही काही मित्र प्रवासात असतांना कारटेपवर गाणे लागले. चित्रपट हाच जॉनी मेरा नाम, गाणे होते , "ओ मेरे राजा खफा न होना , देर से आई , दुरसे आई फिरभी मैने वादा तो निभाया" नायक नायिकेचे  संवादात्मक असलेले हे गाणे सर्वांनाच आवडले मग काय पुन्हा रिव्हर्स , पुन्हा प्ले असे किती वेळा आम्ही ते गाणे ऐकावे ? कुणाला विश्वास वाटणार नाही परंतू त्यावेळी आम्ही 19 वेळा ते गाणे ऐकले होते. देव व हेमा हे मागावर असलेल्या पोलिसांना प्रेमाचा दिखावा करून गुंगारा देतात असे पहायला सुद्धा सुंदर असे हे गीत आहे. सर्वच अवीट मधुर गीते असलेला जॉनी मेरा नाम हा चित्रपट म्हणजे लोकांच्या दीर्घकाळ स्मृतीत राहिलेला सस्पेन्स , थ्रीलर  सिनेमा आहे.  "ओ बाबुल प्यारे" , कित्येक खिडक्या असलेल्या घरात चित्रित केलेले "पल भरके लिये कोई हमे प्यार करले झूठाही सही" , पद्मा खन्नावर चित्रीत "हुस्न के लाखो रंग" , आणि  " चुप चुप मीरा रोये" अशी गाणी व कथानक असलेला हा सिनेमा रसिकांनी डोक्यावर  घेतला होता.
    चित्रपटात प्राण व देव आनंद यांच्या वडिलांचा खून होतो मग पुढे लॉस्ट अँड फाउंड , प्रेमनाथ ने रंगवलेला "रुपयो के लिये देश को बेचनेवाला" रायसाब भूपिंदरसिंग हा खलनायक , सज्जन ने रंगवलेला अगतिक बाप , नवयौवना , ड्रीम गर्ल हेमा मालिनी , तिहेरी भूमिका करणारा आय .एस . जौहर , जीवन  अशी मोठी स्टारकास्ट असलेला हा सिनेमा म्हणजे हिंदी चित्रपट सृष्टीतील एक सुपरहिट सिनेमा आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शन वेळी म्हणजे 1970 मध्ये देव आनंद 50 वर्षांचा होता. राजेश खन्ना, अमिताभ, धर्मेंद्र, जितेंद्र यांचे सिनेमे गाजत असतानांही नेहमी अंग हालवत भूमिका करणारा देव आनंद मात्र वयाच्या पन्नाशीतही सिनेसृष्टीत घट्ट पाय रोवून उभा होता. 1970 मध्येच मेरा नाम जोकर हा सुद्धा सिनेमा आला होता. परंतू जॉनी मेरा नाम प्रंचड गाजला व मेरा नाम जोकर साफ कोसळला.  नांवात थोडेफार साम्य असल्याने जॉनी मेरा नामचा नवोदित निर्माता गुलशन राय यांच्यात व राज कपूर यांच्यात वाद सुद्धा झाला होता. 
    जॉनी मेरा नाम या चित्रपटात आपल्या आवडीच्या अभिनेत्यासह भूमिका मिळाल्याने हेमा मालिनी खुश होती. पुढे दोघांनी अनेक सिनेमे केले. जॉनी मेरा नाम चे विविध भाषांत रिमेक सुद्धा निर्माण झाले. जॉनी गद्दार या 2007 मध्ये आलेल्या सिनेमात सुद्धा जॉनी मेरा नाम मधील दृश्य वापरले होते. एका मालिकेत "पल भरके लिये" हे गाणे सुद्धा वापरले होते. मेहनतीने , झोकून देऊन कोणत्याही क्षेत्रात कार्य केले तर ते गाजतेच, यशाचे उच्चांक प्रस्थापित करते. जॉनी मेरा नाम या चित्रपटास प्रदर्शित होऊन 52 वर्षे झाली म्हणजे अर्धे शतक लोटले तरी रसिकमनावर आजही हा चित्रपट व यातील गाणी अधिराज्य करीत आहे. 
आता अनेक वाहिन्या आहे परंतू जुना सिनेमा या वाहिन्यांवरून हद्दपार झाला आहे. पण यु ट्यूब वर आपण ते पाहू शकतो. अनेक चांगले कथानक असलेले चित्रपट लिहिणा-या के.ए. नारायण यांनी लिहिलेला व विजय आनंद या प्रख्यात दिग्दर्शकाने दिग्दर्शित केलेला जॉनी मेरा नाम हा सुद्धा एक पाहण्यासारखा सिनेमा आहे. आज जमाना बदलला आहे "जुना पुराना सिर्फ भंगार वालोको ही चाहिये" पण तरीही जॉनी मेरा नाम सारखे जुने चित्रपट, काही जुन्या वास्तू, जुने कलाकार हे अधून-मधून साद घालतात व मग त्याबाबत लिखाण करण्यास कोणतीतरी अज्ञात शक्ती भाग पाडते.

२०/०१/२०२२

Part 12- Last Part ,Food Culture of Khamgaon

 खामगांवची खाद्य संस्कृती भाग-11

अंतिम भाग


खामगांव पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेल्या पदार्थांबाबत लिहावेसे वाटले व खामगांवची खाद्य संस्कृती ही मालिका साकारली. दर गुरुवारी एका हॉटेल बाबतचा लेख अशी सलग 11 गुरुवार ही मालिका चालली.  खामगाव तसे लहान शहर या शहरात खाद्यसंस्कृती अशी ती काय असणार ? परंतु एक-एक हॉटेल व तेथील परिसरात प्रसिद्ध असलेले पदार्थ, त्या हॉटेलची वैशिष्ट्ये हे डोळ्यासमोर येऊ लागले व तेच विचार शब्दबद्ध केले.

विविध विषयांवर लिहिता=लिहिता शहरातील काही भकास वास्तू पाहिल्यावर "खामगांवची शान असलेली आताची भकास स्थाने" तदनंतर वेड्या लोकां विषयीची  "वेड्यांच्या विश्वात" अशा लेखमालिका लिहिल्या. या दोन लेख मालिका लिहिल्यानंतर खामगावच्या खाद्यसंस्कृती विषयी लिहावेसे वाटले व त्यातूनच "खामगावची खाद्यसंस्कृती" ही लेखमालिका लिहिली. तसे पहिले तर लेख मालिका लिहिणे म्हणजे थोडे जिकरीचे काम अभ्यास,संशोधन करूनच लिहावे लागते, भेटींसाठी वेळ काढावा लागतो. पण लेखमालिका या वाचकांच्या पसंतीस उतरतात हे सुरुवातीच्या दोन लेख मालिकांमधून वाटले. म्हणूनच मग तिसरी लेखमालिका सुद्धा लिहिली. ब्लॉग व स्थानिक जननिनाद या सायं दैनिकातून 4 नोव्हे 2021 पासून खामगांवची खाद्य संस्कृती ही लेख मालिका प्रकाशित झाली. या सलग 11 लेखांच्या मालिकेचे आज समापन करीत आहे. 

       भारत देश म्हणजे विविध खाद्य पदार्थ चवीने खाणा-यांचा देश. मग खामगांव त्याला अपवाद कसे ठरेल ? यातूनच मग खामगांवातील जुन्या व प्रसिद्ध अशा उपहार गृहां बाबत व तेथील खामगांव पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेल्या पदार्थांबाबत लिहावेसे वाटले व खामगांवची खाद्य संस्कृती ही मालिका साकारली. दर गुरुवारी एका हॉटेल बाबतचा लेख अशी सलग 11 गुरुवार ही मालिका चालली.  खामगाव तसे लहान शहर या शहरात खाद्यसंस्कृती अशी ती काय असणार ? परंतु एक-एक हॉटेल व तेथील परिसरात प्रसिद्ध असलेले पदार्थ, त्या हॉटेलची वैशिष्ट्ये हे डोळ्यासमोर येऊ लागले व तेच विचार शब्दबद्ध केले व बघता बघता 11 लेख झाले. या लेखमालिकेत ज्या हॉटेल्स बद्दल लिहिले त्यातील बहुतांश हॉटेलमध्ये भेट दिली, मालकांशी संवाद साधला, फोटो घेतले तेव्हा आपल्या पूर्वजांनी स्थापन केलेल्या व आता बहरलेल्या खाद्यपदार्थ विक्रीच्या व्यवसायाची कुणीतरी घेतलेली दखल पाहून मालकांच्या चेहऱ्यावरील आनंद लपून राहिला नाही. जय भारत हॉटेल च्या मालकांनी त्यांच्या हॉटेल बद्दल लिहायचे असे सांगितल्यावर त्यांनी सर्वप्रथम प्रश्न केला "इस मे तुम्हारा क्या फायदा?" , "कुछ नही" असे मी उत्तरल्यावर ते काही क्षण स्तब्ध झाले होते. खिलोशियाचे राजेश खिलोशिया यांना त्यांच्या हॉटेलची माहिती सांगताना भरभरून आनंद झालेला दिसला. फरशी वरील गुप्ताजी यांची रबडी वर्षानुवर्षे खामगावात प्रसिद्ध आहे. त्या रबडी बद्दल प्रथमच कुणीतरी लिहीत आहे हे समजल्यावर कमी बोलणारे गुप्ताजी बोलते झाले व अनेक विषयांवर बोलले. नवीन पिढी आता असे मेहनत असलेले पदार्थ करेल की नाही अशी शंका त्यांनी व्यक्त केली. एका हॉटेलच्या वयोवृद्ध मालकाने सांगितले की आम्ही स्वतः  कारागिरांसोबत पदार्थ बनवायचो पण आताची मुले मात्र कपड्यांची इस्त्री मोडू देत नाही. काहींनी माल बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल हा आता पुर्वी सारखा चांगल्या प्रतीचा नाही, भेसळ वाढली आहे असे वास्तव कथन केले. हॉटेल व्यवसायातील माहिती व नाना मते समजली. काही मित्रांनी सुद्धा काही हॉटेल्स व ढाबे यांबाबत लिहावे असे सुचवले. यात भुसावळ चौकातील निलकमल, फरशी वरील विदर्भ, मिसळसाठी प्रसिद्ध असलेले कोर्टा जवळील हॉटेल प्रदीप आदींचा समावेश होता परंतू कार्यबाहुल्यामुळे त्यांची विस्तृत माहिती मिळण्यास असमर्थ झालो, लिहू शकलो नाही. निलकमल, विदर्भ व प्रदीप सुद्धा खुप जुनी व लोकप्रिय हॉटेल्स आहेत. अनेक लोकांच्या प्रतिक्रिया या लेखमालिकेच्या निमित्ताने आल्या, अनेकांनी फोन केले ,  4 नोव्हे 2021 ते 13 जाने 2022 पर्यंत जगभरातून अनेक वाचकांनी  हे लेेेख इंटरनेट वरून वाचले हे नम्रतेने नमूद करावेसे वाटते. खामगाव शहरात आजमितीस अनेक हॉटेल्स आहेत. यात आता काही नवीन हॉटेल्सची सुद्धा भर पडली. या नवीन हॉटेल्स बद्दल सुद्धा आगामी काळात लिहिण्याचा मानस आहे. या लेखमालिकेत तीस-चाळीस वर्षांपेक्षाही अधिक जुन्या असलेल्या हॉटेल्स बाबत लिहिले.

 भारत देश हा युगानुयुगे अन्नास देव मानत आलेला आहे. अनेक ऋषीमुनी व साधुसंतांनी अन्नाचे महत्त्व सांगितले आहे. आपण 

उदर भरण नोहे जाणिजे यज्ञ कर्म 

अशी रामदास स्वामींची शिकवण अनुसरत  आलेलो आहे. "वदनी कवळ" घेतांना आपण "श्रीहरीचे नाम" घेतो "जीवन करी जिवित्वा अन्न हे पूर्णब्रम्ह" हे आपण या संत शिकवणीतून शिकलो आहोत परंतु आजकाल बर्थ डे साजरे करतांना तरुणाई तोंडाला फासण्यासाठी केकची नासाडी करते, अन्नपदार्थ फेकते हे पाहून खंत वाटते अन्नाला देव मानणा-या आपल्या देशात हे काय चालले आहे याचे आश्चर्य वाटते. हॉटेलमध्ये गेल्यावर हे घेऊ की ते घेऊ या नादात खूप सार्‍या पदार्थांची ऑर्डर दिली जाते व त्यातील मोठा भाग हा टाकून दिला जातो.

ब्रह्मार्पणं ब्रह्महविर्ब्रह्माग्नौ ब्रह्मणा हुतम्।
ब्रह्मैव तेन गन्तव्यं ब्रह्मकर्म समाधिना।।
ॐ सह नाववतु। सह नौ भुनक्तु।
सह वीर्यं करवावहै|तेजस्विनावधीतमस्तु। 
मा विद्‌विषावहै॥ 

ॐ शान्ति: शान्ति: शान्ति:॥

असा मंत्र म्हणून आपण भोजनाला सुरुवात करीत असतो तेव्हा आपल्या देशात अन्नपूर्णा देवीचा, अन्नाचा सदैव सन्मान होणे हेच उचित आहे. अन्नाची नासाडी होतांना पाहून आपल्याला आपला बळीराजा आठवला पाहिजे,  दुःख व्हायला पाहिजे असे नाना विचार खाद्यसंस्कृतीवरची ही मालिका लिहितांना  मनात येऊन गेले. आपल्या सर्वांचेे आठवणीनेे प्रतिक्रिया देणे , ई मेल , फोन करणे यासाठी आभार व्यक्त करण्यास शब्द अपुरे पडत आहेत.  

     ज्या वाचकांचे "खामगांवची खाद्य संस्कृती" या लेख मालिकेतील लेख वाचणे राहून गेले असतील किंवा ज्यांना हे लेख आपल्या आप्तेष्टांना पाठवायचे असतील या करीता या लेख मालिकेतील सर्व लेखांच्या लिंक खाली देत आहे. जेणे करून येथूनच त्यांच्या आवडीच्या लेखाच्या पानावर जाता येईल. धन्यवाद !

लेख मालिकेतील सर्व लेखांच्या लिंक

आज खाये दहीवडे ssssss

https://vinayvarangaonkar.blogspot.com/2021/11/part-1-dahiwada-food-culture-of.html

'आनंद'दायी चकली

https://vinayvarangaonkar.blogspot.com/2021/11/part-2-chakli-food-culture-of-khamgaon.html

एक अनोखा पेढा

https://vinayvarangaonkar.blogspot.com/2021/11/part-3-pedha-food-culture-of-khamgaon.html

स्वादिष्ट रबडी

https://vinayvarangaonkar.blogspot.com/2021/11/part-4-rabadi-food-culture-of-khamgaon.html

ले लो भाई चिवडा ले लो

https://vinayvarangaonkar.blogspot.com/2021/12/part-5-chiwada-food-culture-of-khamgaon.html

जलेबी,फापडा 

https://vinayvarangaonkar.blogspot.com/2021/12/part-6-jilebi-food-culture-of-khamgaon.html

सुरेश कुल्फी

https://vinayvarangaonkar.blogspot.com/2021/12/part-7-ice-candy-food-culture-of.html

 ...51 साल पुरानी दुकान इधर है

https://vinayvarangaonkar.blogspot.com/2021/12/part-8-51-yr-old-hotel-food-culture-of.html

अमृत महोत्सवी "जय भारत"

https://vinayvarangaonkar.blogspot.com/2021/12/part-9-jay-bharat-food-culture-of.html

10 दुध है वंडरफुल 

https://vinayvarangaonkar.blogspot.com/2022/01/part-10-agrawal-cold-drinks-and-dharav.html

11 एक कोन,भूमि  तीचा नव्हे तर खाण्याचा 

https://vinayvarangaonkar.blogspot.com/2022/01/part-11-chat-cone-food-culture-of.html


१३/०१/२०२२

Part 11- Chat Cone ,Food Culture of Khamgaon

खामगांवची खाद्य संस्कृती भाग-11

एक कोन,भूमितीचा नव्हे तर खाण्याचा 

आपण सर्वानीच भूमिती या विषयाचे अध्ययन केले आहे विविध कोन आपण शिकलो , त्रिकोन , चौकोन , षटकोन इ. कोनांत मकवाना यांनी आणखी एक भर टाकली. पण, ती भर भूमितीत नसून खाद्य पदार्थात आहे. मकवाना यांनी खामगांवकरांसाठी कोणत्या कोनाची भर टाकली , हे अनेकांच्या लक्षात आले असेलच. विस्तृत माहिती वाचा....

मागील भागापासून पुढे... 

या लेखमालिकेच्या 9 व्या भागात आलेल्या जय भारत हॉटेलच्या अगदी समोर असलेले आजचे हे हॉटेल आहे. हे हॉटेल म्हणजे एक स्टॉल सारखेच आहे. अगदी छोट्या जागेत म्हणजे पान टपरीच्या आकाराच्या जागेत मालक मकवाना यांनी हे दुकान थाटले आहे. ग्राहकांना बसण्यासाठी समोर खुर्च्या व पाण्याची व्यवस्था केली आहे. बहुतांश ग्राहक तर उभ्या-उभ्याच खाऊन जातात. तसे हे हॉटेल म्हणजे खामगांवातील फार जुने असे हॉटेल नाही परंतू अल्पावधीत लोकप्रिय झालेले असे हे हॉटेल आहे. कचोरी , समोसा , भेळ , पाणी पुरी असे पदार्थ इथे उपलब्ध असतात. दिल्लीतील  चांदनी चौक , मुंबई, इंदोर येथील खाऊ गल्ली , ही ठिकाणे जशी खाद्य पदार्थांसाठी प्रसिद्ध आहेत तसेच खामगांव शहरात महावीर चौक, अग्रसेन चौक व गांधी चौक हा परिसर म्हणजे खवय्यांंसाठी उपयुक्त परिसर आहे. गांधी चौकातच मकवाना यांचे हे स्टॉलवजा हॉटेल आहे. या दुकानात नेहमी गर्दी असते. येथील पदार्थ सुद्धा फ्रेश व स्वादिष्ट असतात. हे हॉटेल खामगांवच्या खाद्य संस्कृतीत समाविष्ट होईल इतपत जुने असे हॉटेल नाही. हे हॉटेल 20 वर्षांपूर्वी सुरु झाले असावे असा अंदाज आहे. परंतू तरीही याचा समावेश या लेखमालिकेत करावासा वाटला याचे कारण म्हणजे "मकवाना चाट" यांनी एक नवीन पदार्थ आपल्या हॉटेलव्दारे खामगांवात लाँँच केला व तो सर्वांनाच आवडला. हा पदार्थच या हॉटेलचा अंतर्भाव या मालिकेत करण्यास कारणीभूत झाला. शालेय जीवनात आपण सर्वानीच भूमिती या विषयाचे अध्ययन केले आहे विविध कोन आपण शिकलो , त्रिकोन , चौकोन , षटकोन इ. या कोनांत मकवाना चाट यांनी आणखी एक भर टाकली, अर्थात ती भर भूमितीत नसून खाद्य पदार्थात आहे. मकवाना यांनी खामगांवकरांना एक नवीन कोन खाण्यासाठी उपलब्ध करून दिला, तो कोन म्हणजे "चाट कोन". मकवाना यांचा चाट कोन अल्पावधीत लोकप्रिय झाला. आईस्क्रीमच्या कोन सारख्या आकारात तळून त्यामध्ये भेळ सारखे मिश्रण एकत्र करून हा चाट कोन सर्व्ह केला जातो. हा कोन ग्राहकांच्या चांगल्याच पसंतीस उतरला व या चाट कोनला चांगलीच मागणी होऊ लागली. गरज ही शोधांची जननी असते असे म्हटले जाते. स्पर्धेच्या या युगात टिकून राहण्यासाठी, व्यवसायिकास ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी त्यांना टिकवून ठेवण्यासाठी म्हणून विविध कल्पना राबवाव्या लागतात, शक्कल लढवावी लागते. धोपट मार्गानेच गेल्यास पिछेहाट होते. तेच-तेच पदार्थ तर सर्वत्र उपलब्ध असतात त्या पदार्थांसह काही नाविन्यपुर्ण व चवदार असा एखादा पदार्थ आपल्याकडे ठेवल्यास नक्कीच ग्राहक आकृष्ट होतील हे जाणून मकवाना यांनी चाट कोन हा पदार्थ खामगांवकरांसाठी आणला. हा पदार्थ मुळचा कुठला, त्याची रेसिपी, खामगांवात इतरही ठिकाणी तो उपलब्ध असतो का ? "ये सब जानने के बजाय मैने पहले इस चाट कोन को खाना पसंद किया था |" या चाट कोना सारखी चाट कटोरी सुद्धा असते. मकवाना चाट हे अल्पावधीत लोकप्रिय झालेले खामगांव शहरातील हॉटेल आहे. उत्कृष्ट पदार्थांसह चाट कोन येथे उपलब्ध असतो. काही वर्षांपुर्वी खामगांवात "मकवाना वेफर्स" सुद्धा मिळत होते , आताशा दिसत नाही, मिळतात की नाही किंवा कुठे मिळतात काही कल्पना नाही. मकवाना वेफर्स सुद्धा खुप स्वादिष्ट होते. 

    मकवाना या आडनावाचे मला पकवान या शब्दाशी साधर्म्य वाटले. पकवान हा शब्द हिंदीत वापरला जातो , त्याची उत्पती कशी झाली माहित नाही कारण हिंदीत खाद्य पदार्थास व्यंजन हा शब्द वापरतात. पकवान हा शब्द पक्व + अन्न = पक्वान्न (पकवान) असा तयार झाला आहे. मराठीत पक्वान्न असे म्हणतात. हिंदीत वापरला जाणारा पकवान व आजच्या हॉटेलच्या संचालकांचे आडनांव मकवाना, अशा पकवान व मकवाना या दोन्ही शब्दात चार अक्षरे सारखीच आलेली आहेत. कदाचित यामुळेच अन्नपुर्णा देवीने मकवाना यांना चांगले स्वादिष्ट पकवान बनवण्याचा आशीर्वाद दिला असावा का ? पकवान व मकवाना या शब्दातील साधर्म्य हा निव्वळ योगायोग आहे पण का कोण जाणे वरील विचार मात्र माझ्या मनात चमकून गेला. 

                                                   क्रमश:

    


०६/०१/२०२२

Part 10- Agrawal Cold drinks and Dharav Tea Stall , Food Culture of Khamgaon

 खामगांवची खाद्य संस्कृती भाग-10

दुध है वंडरफुल 

 "होम डिलिव्हरी" ची सुविधा देणा-हॉटेलला नागरीक सुद्धा पसंती देतात. आजकाल तर ही सुविधा कित्येक निरनिराळे व्यावसायिक देतात. पण ही "होम डिलिव्हरी"ची सुविधा 60 वर्षे आधी पासून खामगांवकरांना देणारे आजचे हे हॉटेल म्हणजे खामगांव पंचक्रोशीतील एकमेव ठिकाण होते, आजही आहे...

मागील भागापासून पुढे...

मागील लेखात आलेल्या जय भारत हॉटेलकडे जाण्याच्या अगोदर म्हणजे पोलीस स्टेशन कडून महावीर चौकाकडे जाणा-या रस्त्यावरून गजानन टॉकीजकडे वळलो की आजचे हे ठिकाण आहे. तसे आजचे हे हॉटेल म्हणजे खाद्य पदार्थांचे हॉटेल नसून शीतपेय व चहा, दुध मिळणारे खामगांवातील खुप जुने व प्रसिद्ध असे ठिकाण आहे. लोकप्रियतेचे उच्चांंक गाठलेला शोले हा चित्रपट न पाहिलेला व्यक्ती जसा विरळा तसे खामगांवात हे हॉटेल माहित नसलेला मनुष्य सुद्धा विरळाच. हे ठिकाण म्हणजे "अग्रवाल कोल्ड्रिंक्स". गजानन टॉकीजला लागून इंग्रजी "कॅॅपिटल एल" या अक्षराच्या आकाराचे हे दुकान आहे. या एल ची उभी दांडी थोडी जाड आहे. याचे कारण म्हणजे या बाजूने एक लांबट फॅमिली रुम आहे. ही रस्त्याकडची बाजू आहे. तर खालच्या आडव्या रेषेप्रमाणे जी जागा आहे ती थोडी लहान आहे. हॉटेल मध्ये गेल्यावर स्वच्छता व नीटनेटकेपणा जाणवतो. मालकाच्या काऊंटरवर या तंत्र समृद्ध काळातही पाटी व लेखण छोट्या हिशेबासाठी म्हणून असते. हे हॉटेल म्हणजे "अग्रवाल कोल्ड्रिंक्स" 1963 च्या मार्च महिन्यातील 3 तारखेला म्हणजे भर उन्हाळ्यात रुपचंद अग्रवाल , ब्रिजमोहन गोयनका व गोवर्धनदासजी गोयनका यांनी भागीदारीत या व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली. भर उन्हाळ्यात थंड आईस्क्रीम , लस्सी अशा पदार्थांची सोय खामगांवकर नागरिकांना मिळाली. त्यातही एक विशेष सुविधा या हॉटेलने त्या काळात देणे सुरु केले. ती सुविधा होती "होम डिलिव्हरी"ची. आजकाल नागरिकांना "होम डिलिव्हरी" चे मोठे आकर्षण आहे व शहरांच्या वाढत्या आकारमानानुसार ते सोयीस्कर सुद्धा आहे. "होम डिलिव्हरी" ची सुविधा देणा-या हॉटेलला नागरीक सुद्धा पसंती देतात.आजकाल तर ही सुविधा कित्येक निरनिराळे व्यावसायिक देतात. पण ही "होम डिलिव्हरी"ची सुविधा 60 वर्षे आधी पासून खामगांवकरांना देणारे "अग्रवाल कोल्ड्रिंक्स" म्हणजे खामगांव पंचक्रोशीतील एकमेव ठिकाण होते, आजही आहे. पुर्वी येथे 20/25 माणसे कामाला असायची. जेन्ट्स सायकलच्या दांड्याला


अग्रवाल कोल्ड्रिंक्स अशी पाटी लिहिलेली सायकल घेऊन हि माणसे दिलेल्या लँँड लाईन फोनवर ऑर्डर आल्यावर खामगांव  शहराच्या हद्दी बाहेर सुद्धा ऑर्डर घेऊन जायची मग ती एक किंवा दोन कप चहाची ऑर्डर का असेना. लाकडाच्या आईस्क्रीम पॉट मध्ये बर्फ टाकून दुध , पावडर टाकून आईस्क्रीम त्या काळात बनवले जात असे. बदलत्या काळानुसार अग्रवाल कोल्ड्रिंक्स ने विविध प्रकारच्या लस्सी , दुध कोल्ड्रिंक्स व रात्री गरम दुध हे सुद्धा सुरु केले. पण काळ कुणासाठी थांबत नाही उपरोक्त भागीदार संस्थापक काळाच्या ओघात निवर्तले. गोवर्धनदासजी गोयनका यांचे तर गत महिन्यात 6 डिसेंबर रोजी दु:खद निधन झाले. आता गोवर्धनदासजी गोयनका यांचे सुपुत्र पत्रकार व शांत सुस्वभावी राजकुमार गोयनका यांचे समवेत ओमप्रकाश अग्रवाल व नवीन पिढी आता या हॉटेलची धुरा सांभाळत आहे. ज्या काळात आईस्क्रीम आदी पदार्थ खामगांव सारख्या शहरात दुरापास्त होते, आईस्क्रीमच्या विविध कंपन्या नव्हत्या त्या काळात खामगांवकरांना थंडगार आईस्क्रीम, लस्सी , दुध कोल्ड्रिंक्स असे पदार्थ उपलब्ध करून देणारे "अग्रवाल कोल्ड्रिंक्स" हे एकमेव होते. 
अग्रवाल कोल्ड्रिंक्स  येथे मँगो लस्सीचाआस्वाद घेतांना तीन मित्र.

आजही अनेक खामगांवकर येथील शीतपेये व चहाला पहिली पसंती देतात. रात्रीच्या वेळी
येेेथे गरम दुग्ध प्राशनाचा आस्वाद घेतात. येथील मँँगो आईस्क्रीम तर आजही प्रचंड लोकप्रिय आहे. अग्रवाल कोल्ड्रिंक्स स्पर्धेच्या आजच्या जमान्यातही उत्कृष्ट शीतपेये , उष्ण पेये , स्वच्छता , त्वरीत सेवा इ गुणांव्दारे घट्ट पाय रोवून उभे आहे.

    या लेखमालिकेतील प्रत्येक लेखात एकच प्रतिष्ठान घेतले आहे. परंतू आजच्या या लेखात "दुध" या समान विषयामुळे अग्रवाल कोल्ड्रिंक्सच्या अगदी समोरच असलेल्या धारव यांच्या चहा व दुध सुविधा देणा-या हॉटेलचा सुद्धा समावेश करावासा वाटतो. धारव टी स्टॉल हे तसे नवीन 35 वर्षांपुर्वीचे परंतु येथील गरम दुध सुद्धा प्रसिद्ध आहे. थोर सेवाव्रती बाबा आमटे कुटुंबियांशी पारिवारिक संबध असलेले धारव बंधूंचे टी स्टॉल सुद्धा प्रसिद्ध आहे.

    दुध हे आम्हा भारतीयांच्या जीवनातील अविभाज्य असा पदार्थ आहे. गोपालन करणारा मुरलीधर कृष्ण तमाम गवळी समाजासह आम्हा सा-या भारतीयांचे आराध्य दैवत आहे. बाल गोपाळांचा आवडता देव आहे. हाच मुरलीधर गीता सांगणारा भगवंत कृष्ण जेंव्हा सुदर्शन हाती घेतो तेंव्हा तो आम्हाला अन्याय झाल्यास आम्ही शस्त्र सुद्धा हाती घेऊ शकतो असे सांगणारा आहे. दत्त गुरूच्या पाठीशी सुद्धा गाय असते, कामधेनुला आम्ही मानतो, कित्येक सेवाधारी लोक गोरक्षण करतात. पुर्वी धारोष्ण दुध पिले जायचे अशा या आपल्या देशात दुधाची महती पुर्वीपासूनच ज्ञात आहे. योगायोगाने दुग्धजन्य थंड व गरम पदार्थ विक्रीच्या व्यवसायाची स्थापना करणा-या अग्रवाल कोल्ड्रिंक्सच्या दोन संस्थापकांची नावे सुद्धा त्या मधुसुदनाचीच एक ब्रिजमोहन तर दुसरे गोवर्धन.

     नवीन पिढीने सुद्धा त्यांच्या आहारात चांगल्या प्युअर दुधास समाविष्ट करणे जरुरी आहे. "दुध है वंडरफुल पी सकते है रोज ग्लास फुल दुध" अशी जाहिरात पुर्वी दूरदर्शनवर झळकायची. आज खामगांव शहरात अनेक हॉटेल , शीतपेये , गरम दुध मिळणारी चांगली ठिकाणे आहेत. पण दुध पिल्यावर "दुध है वंडरफुल" अशी भावना मनात उत्पन्न होते ती केवळ क्वालिटी दूध व इतर पदार्थ देणारे अग्रवाल कोल्ड्रिंक्स व धारव टी स्टॉल येथेच.

क्रमश: