२९/१२/२०२२

Article about Karnatak-Maharashtra border issue

हे तर भाषावार प्रांतरचनेचे फलित

एकीकडे "भारत माझा देश आहे , सारे भारतीय माझे बांधव आहेत" अशा प्रतिज्ञा घ्यायच्या , संविधान दिन साजरे करायचे आणि राज्या-राज्यात सीमा/ भाषा यांवरून वाद निर्माण करायचे. याला काय म्हणावे ?

गेल्या महिन्यात कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी महाराष्ट्राच्या काही गावांवर कर्नाटकचा दावा सांगितला आणि महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुनश्च उफाळून आला. मग राजकीय लाभ मिळवण्यासाठी नाना वक्तव्ये,मोर्चे, तोडफोड, जाळपोळ ही या दोन राज्यांच्या सीमाभागात सुरु झाली ती अजूनही सुरूच आहे. काल कर्नाटकच्या शिक्षण मंत्र्यांनी मुंबई केंद्रशासित करा अशी मागणी करून या भाषिक वादाच्या आगीत आणखीनच तेल ओतले. मुंबईत वीस टक्के कन्नडिग असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. बेळगाव केंद्रशासित करायचे असेल तर आम्हालाही मुंबई केंद्रशासित करण्याची मागणी करता येते, असेही ते म्हणाले. त्यांच्या अशा मागणी नंतर त्याचे पडसाद विधानसभेत उमटले. कर्नाटकचे उच्च शिक्षण मंत्री सी. एस. अश्वथ नारायण यांच्या निर्णयाचा विधानसभेत निषेध करण्यात आला त्यांना जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले. मुंबई महाराष्ट्राची असून कोणाच्या बापाची नाही, असे म्हणत केंद्रीय गृहमंत्र्यांकडे नारायण यांच्या वक्तव्याची तक्रार करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिल्यावर अजित पवार यांनी देखील मुंबई केंद्रशासित प्रदेश करण्याच्या मागणीचा निषेध केलामहाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी पत्र लिहून याचा निषेध व्यक्त केला पाहिजे, अशी मागणी विधानसभेत केली. खरे तर सी. एस. अश्वथ नारायण यांना अशी मागणी करण्याची काहीही एक गरज नाही परंतू कर्नाटक मधील आगामी निवडणूका लक्षात घेता हे सर्व सुरु आहे असे लक्षात येते. आताच हा वाद पुनश्च का उफाळून यावा ? हा वाद तसा अनेक वर्षे जुना आहे. बेळगावातील एकूण लोकसंख्येपैकी ७५% लोक मराठी भाषिक आहेत तरीही भाषावार प्रांतरचनेच्या वेळी बेळगावांस महाराष्ट्रापासून तोडून कर्नाटक सीमेत टाकल्या गेले त्यामुळे तेथील जनतेच्या भावना तीव्र आहेत. गेल्या सहा दशकापासून तेथील जनता सनदशीर व शांततामय मार्गाने लढा देत आहे. महाराष्ट्र एकीकरण समिती हा पक्ष बेळगाव महाराष्ट्रात सामील करण्यासाठी प्रयत्न करीत आहे, तर कर्नाटक शासन महाजन आयोगच्या शिफारसी लागू कराव्यात अशी मागणी करत आहे. बेळगावातील मराठी जनता कर्नाटक सरकार आपल्यावर अन्याय करत असून कन्नड भाषेची सक्ती करून मराठीची गळचेपी होत असल्याचा आरोप करते. हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात सुद्धा वर्ग झालेला आहे. का होतो आहे असा हा वाद ? आज आपल्या शेजारी देशांशी आपले सीमांवरून वाद आहे. पाकिस्तान , चीन यांची अरेरावी आपण पाहतच आहोत, बांगलादेशाच्या सीमेतून सर्रास घुसखोरी होत असते त्यातल्या त्यात आपला मित्र म्हणवल्या जाणारा, पुर्वी स्वत:ला हिंदू राष्ट्र म्हणवून घेणा-या नेपाळने सुद्धा आता आपल्याशी सीमावाद सुरु झाला आहे. आपण आपल्या देशाच्या एकतेचे, विविधतेचे मोठे गोडवे गात असतो आणि देशाच्या अंतर्गत भागात राज्यांच्या सीमांवरून भांडत असतो. महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रात सुद्धा आपण तुम्ही खान्देशी तसे, आम्ही व-हाडी असे ते मराठवाड्यातील तसे असेही वाद करतच असतो. एकीकडे "भारत माझा देश आहे , सारे भारतीय माझे बांधव आहेत" अशा प्रतिज्ञा घ्यायच्या , संविधान दिन साजरे करायचे आणि राज्या-राज्यात सीमा/ भाषा यांवरून वाद निर्माण करायचे. याला काय म्हणावे ? चंदीगड , पुर्वेकडील राज्ये यांसारखे अनेक वाद आज देशाच्या अंतर्गत भागात आहेत यांचा त्वरीत बिमोड व्हायलाच हवा. या आगीला हवा देणा-या नेत्यांना धडे शिकवायला हवे तर आपला देश हा ख-या अर्थाने सार्वभौम, प्रजासत्ताक , संगठीत , राष्ट्रीय एकात्मता असलेला आहे असे म्हटला जाईल. भारत स्वतंत्र झाल्यावर प्रांत रचनेबाबत अनेक बुद्धिजीवी व नेत्यांची मते मतांतरे होती.अनेकांना भाषावार प्रांत रचनेस विरोध होता तरीही भाषावार प्रांतरचना झाली. त्यासाठी अनेक समित्या, आयोग निर्माण झाले त्यावरही मोठा खर्च झाला तरी वाद मात्र कायमच राहीले. आम्ही मराठी ते अमुक ते ढमूक हे करण्याच्या नादात आम्ही सर्व भारतीय हे आपण विसरू लागलो.अनेक राजकीय पक्ष हे या प्रांतवाद , भाषावाद यांवर मोठे झाले. आज देशाच्या अंतर्गत भागात राज्या-राज्यात भाषांवरून व सीमांवरून होणारे वाद, कित्येक वर्षांपासून चिघळत असलेले प्रश्न, राज्याची अस्मिता, भाषेची अस्मिता यावरून निर्माण झालेले वाद हे भाषावार प्रांत रचनेचेच फलित आहे असे वाटते. 

     आज आपल्या देशासमोर अनेक समस्या आहेत. आपण आपल्यातील वाद सोडून त्या समस्या निराकरणास प्राधान्य द्यायला नको का ? सीमा, भाषा, प्रांतवाद करणा-या देशातील सर्व भागातील नागरिक व नेत्यांना आनंद बक्षी या गीतकाराने लिहिलेल्या मेरे देशप्रेमियो आपसमे प्रेम करो या गीतातील

पूरब, पश्चिम ऊत्तर दक्खन वालो मेरा मतलब है|

इस माटीसे पुछो क्या भाषा, क्या इसका मजहब है ?

या ओळींचे स्मरण ठेवायला नको का ?

२२/१२/२०२२

Article about hate statements of leaders

 तोल मोल के बोल

दोन शिक्षकांत चंद्र्कांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावरुन वाद निर्माण होऊन हाणामारी झाली. अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टनुसार  तक्रार दाखल  झाली आहे. या अशा घटना वाचाळवीर नेत्यांच्या वक्तव्यांमुळे होत आहेत.

नेत्यांची विधाने , जे मनात येईल ते जाहीररीत्या बरळणे व त्यातून नवीन वाद निर्माण होणे हे आता नित्याचेच झाले आहे. या विषयावर यापुर्वी अनेक लेख लिहून झाले आहे. "वाचाळवीर स्पर्धा असावी" हा लेख तर गत महिन्यातच लिहिला होता. इतर अनेकांनी सुद्धा या विषयावर भरपूर लिहिले आहे परंतू हे सर्व लिखाण हे स्वत:ला सुज्ञ समजणारे लोकप्रतिनिधी वाचतात की नाही देव जाणे ? एकाचे बोलणे झाले की दूसरा काही बरळतो याची एक वाकशृंखलाच तयार होत जाते. पुरुष तर पुरुष पण महिला लोकप्रतिनिधी सुद्धा यात मागे नाही. सुषमा अंधारे काय बरळत राहतात आपल्या बोलण्यातून संतश्रेष्ठांचा अपमान आपण करत आहोत याचे सुद्धा त्यांना भान राहत नाही. ज्या ज्ञानेश्वर माऊलींबाबत अवघ्या जनतेत व वारकरी संप्रदायात प्रचंड आदर आहे त्यांच्याबाबत भाष्य करण्याची या बाईंना विधान करण्याची काही आवश्यकता नव्हती व तशी त्यांची पात्रताही नाही, अधिकार वाणी तर नाहीच नाही. या नेते मंडळींनी खरे तर एकमेकांवर विकास , जनतेचे प्रश्न , बेरोजगारी , जनतेच्या जिव्हाळ्याचे प्रश्न या बाबतीत एकमेकांवर ताशेरे ओढावे. पण असे करणे सोडून हे एकमेकांनी केलेला भ्रष्टाचार, घोटाळे, खोके, पेट्या, तीनशे कोटी यांवरच भाष्य करीत असतात व असे बोलण्याच्या नादात हे काहीही बरळतात आणि मग आपण कसे बेधडक बोलतो हे सिद्ध करण्याच्या नादात यांची जीभ घसरते आणि नवीन वाद निर्माण होतो. छगन भुजबळ यांचे देश विदेशात पूजल्या जाणा-या विद्येची देवता सरस्वतीचे फोटो हटवण्याबाबतचे वाक्य, राहुल गांधी – सावरकरांबाबत , राज्यपाल कोश्यारी – नवीन आदर्श याबाबत , सुषमा अंधारे – माऊलींचे रेड्याकडून वेद वदवून घेतल्याबाबत, चंद्र्कांत पाटील – संस्थांसाठी भीक मागणे असे वक्तव्य करण्याबाबत आणि काल आमदार बांगर यांचे संजय राऊत यांना पिसाळलेला कुत्रा असे म्हणणे इ. या अशा नुकत्याच काही झालेल्या वक्तव्यांमुळे किती गदारोळ झाला. याचा परीणाम राज्याच्या विकास, विधी मंडळाचे कामकाज, जनता, निषेध मोर्च्यांमुळे  जनसामान्यांची होणारी रहदारीची समस्या, सुरक्षा यंत्रणेवर येणारा ताण अशा अनेक बाबींवर होत असतो. तसेच जनतेत सुद्धा अशा स्वरूपांच्या वक्तव्यांमुळे पराकोटीचे मतभेद निर्माण होत असतात. केवळ मतभेदच नव्हे तर कित्येकदा वाद, हाणामा-या सुद्धा होऊ लागतात. खरे तर जनतेने नेत्यांच्या या अशा वाचाळपणा वरून आपापसात वाद करू नये पण तरीही अशीच एक घटना 15 डिसे रोजी जळगांव जामोद तालुक्यात खेर्डा बु येथे घडली. येथील दोन शिक्षकांत  चंद्र्कांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावरुन वाद निर्माण होऊन हाणामारी झाली. यात पिडीत शिक्षकाच्या तक्रारीवरुन अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टनुसार एका शिक्षकाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या अशा घटना या नेत्यांच्या वक्तव्यांमुळे होत आहेत. तेंव्हा सन्मानीय नेते मंडळींनो आपण "आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने" असे म्हणणा-या तुकाराम महाराज, "स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे" हे सांगणा-या रामदास स्वामी यांच्या महाराष्ट्रात तसेच "शब्द बराबर धन नही" सांगणा-या संत कबीर यांच्या भारत देशाचे नागरिक आहोत याचे स्मरण ठेवा, तुमच्या वक्तव्यामुळे जनतेत मतभेद, हाणामा-या होत आहे हे लक्षात घ्या ज्यासाठी तुम्हाला निवडून दिले आहे त्या कामांना जरा प्राधान्य द्या आणि "घासावा शब्द, तासावा शब्द, तोलावा शब्द बोलण्यापुर्वी" या संत तुकाराम महाराज यांच्या उक्तीप्रमाणे जरा "तोल मोल के बोलत" चला.

                            विनय वि.वरणगांवकर© 

                                        खामगांव

१५/१२/२०२२

Article about actor Dharmendra on the occasion of 8 Dec , his Birthday

  साधा,सरळ, रांगडा धर्मेंद्र

जनसामान्यांचे अफाट प्रेम मिळालेला धर्मेंद्र हा एकमेव अभिनेता आहे हे त्याच्या ८७ व्या वाढदिवशी दिसून आले. जनतेचे त्याच्यावरील प्रेम आणि लोकप्रियता पाहून तो "पिपल्स ॲक्टर" असल्याचे वक्तव्य शत्रुघ्न सिन्हा याने केले होते. एक ग्रामीण भागातून आलेला साधा , सरळ , रांगडा युवक बिकट स्थितीत आपले ध्येय साध्य करतो "पिपल्स ॲक्टर" बनतो हे ग्रामीण भागातील युवकांना सुद्धा त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात चिवटपणे कार्यरत राहून यशप्राप्तीसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे.       
खरे तर आजच्या लेखाचे हे शीर्षक मी फार पुर्वी वाचलेल्या धर्मेंद्र बाबतच्या एका लेखाचे आहे. त्या लेखकाचे नाव मात्र स्मरणात राहिले नाही. म्हणून सर्वप्रथम त्या अज्ञात लेखकाचे या शीर्षकासाठी आभार प्रकट करतो. परंतु धर्मेंद्र या अभिनेत्याच्या लेखासाठी हेच  शीर्षक मला सर्वात जास्त समर्पक वाटले आणि म्हणून मी सुद्धा त्या अज्ञात लेखकाची क्षमा मागून त्याने दिलेले हेच शीर्षक आजच्या लेखासाठी वापरले आहे हे प्रांजळपणे कबूल करतो. गत गुरुवारी म्हणजेच आठ डिसेंबरला धर्मेंद्र या सिनेसृष्टीतील सर्वात देखण्या अशा अभिनेत्याचा 87 वा वाढदिवस साजरा झाला. नेहमीच प्रकाशझोता पासून दूर राहत असलेल्या धर्मेंद्रचा यंदाचा वाढदिवस मात्र मोठ्या जल्लोषात साजरा झाला. 1960 च्या दशकात पंजाब मधून धरमसिंग देओल हा मुंबईत दाखल झाला. सिनेसृष्टीत अभिनेत्यांना घ्यायचे आहे अशा आशयाची जाहिरात त्याने कुठेतरी वाचली होती. ती जाहिरात पाहून दिलीपकुमारला आदर्श मानणारा व सिनेसृष्टीची प्रचंड आवड असणारा धर्मेंद्र त्या सिनेसृष्टीतील जाहिरातदारांच्या निवड समिती पुढे हजर झाला. तत्पुर्वी त्याला "देखणा व्यक्ती" हा पुरस्कार सुद्धा प्राप्त झाला होता. परंतू सिनेसृष्टी काही सहजासहजी कोणाला स्विकारत नाही. त्यात धरम प्राजी म्हणजे पंजाबच्या खेड्यातून आलेला यमला जट, हट्टा कट्टा, पहेलवान पठडीतील पठ्ठ्या. त्यामुळे सडपातळ व बेताचीच अंगकाठी असलेल्या नायकांच्या त्या जमान्यात बॉडी बिल्डर, बांका जवान अशा धर्मेंद्रला कोणीही चित्रपटात घेत नव्हते. निर्मात्यांच्या दारी तो चकरा मारत असे. काहींनी त्याला तू चांगला हट्टा कट्टा आहे तर कुस्ती खेळ, तर काहींनी फुटबॉल संघात दाखल हो असे सल्ले त्याला दिले. पण शोले सिनेमात बसंतीला प्राप्त करण्यासाठी पाण्याच्या टाकी वरून उडी मारण्यास जाणा-या चिवट विरु प्रमाणे धर्मेंद्रने सुद्धा सिनेसृष्टीत यश प्राप्त करण्याचे चिवटपणे ठरवूनच टाकले होते. तो माघारी फिरायला तयार नव्हता. शेवटी त्याला अर्जुन हिंगोरानी या निर्मात्याने पहिला ब्रेक दिला. त्याचा पहिला चित्रपट दिल भी तेरा हम भी तेरे  प्रदर्शित झाला. अर्जुन हिंगोरानी व धर्मेंद्र हे समीकरण जुळले. या द्वयीने अनेक हिट सिनेमे दिले. ब्लॅक अँड व्हाईट जमान्यात धर्मेंद्रचे सुरुवातीचे चित्रपट काही विशेष चालले नाही. पण 60 च्या दशकात त्याला काही प्रथीतयश अशा दिग्दर्शकांसोबत काम करण्याची संधी मिळाली. त्यात एक बिमल रॉय होते. बिमल रॉय यांच्या बंदिनी मध्ये धर्मेंद्रला भूमिका मिळाली.  दिल ने फिर याद किया, अनपढ, आकाशदीप अशा कृष्णधवल सिनेमातून त्याने भूमिका केल्या. सुमधुर संगीत असणारे हे त्याचे चित्रपट गाजले होते. फुल और पत्थर मध्ये तो उघड्या अंगाने दिसला व त्याची पीळदार शरीरयष्टी पाहून फिटनेस प्रेमी तरुण व अनेक तरुणी त्याचे फॅन झाले. मीनाकुमारी सोबत त्याने चित्रपट केले. हळूहळू धर्मेंद्र स्थिरावला आणि रंगीत सिनेमाच्या काळात त्याचे अनेक चित्रपट हिट झाले. रामानंद सागर यांचा आंखे, शिकार, आया सावन झुमके, आये दिन बहार के, आयी मिलन की बेला, हकीकत असे त्याचे अनेक चित्रपट या काळात हिट झाले. 60 च्या दशकानंतर दुसरे दशक म्हणजे सत्तरच्या दशकात धर्मेंद्र व हेमामालिनी ही जोडी रसिकांना खुप भावली. धर्मेंद्र आणि हेमामालिनीचे वीस पेक्षा जास्त चित्रपट हिट झाले. यात शोले, जुगनू, आजाद, आसपास, तुम हसीन मै जवान, दिल्लगी या चित्रपटांचा समावेश आहे. धरम व हेमा या जोडी एवढी लोकप्रियता इतर कुण्या जोडीस मिळाली नाही. आजही एखादी एकमेकांना शोभून दिसणारी विवाहित जोडी दिसली की लोक धर्मेंद्र व हेमामालिनी सारखी जोडी आहे असे म्हणतात. त्याच काळात धर्मेंद्रने ऋषिकेश मुखर्जी या प्रथीतयश दिग्दर्शकाच्या चुपके चुपके, सत्यकाम सारख्या सिनेमात काम केले. सत्यकाम, नया जमाना यातील त्याचा अभिनय वाखाणल्या गेला होता. याच काळात कर्तव्य, माँ सारख्या सिनेमातून त्याने वाघ आणि सिंह यांच्यासोबत लढाईची दृश्ये साकारली. असे म्हणतात की कर्तव्य सिनेमात सिंहाशी लढताना धर्मेंद्रने डमी वापरला नव्हता. सहसा तो डमी वापरत नसे असे म्हणतात.  मेरा गांव मेरा देश , प्रतिज्ञा सारख्या अनेक देमार सिनेमांमध्ये धर्मेंद्र शोभू लागला आणि त्याला "गरम धरम", "हि मॅन" असे संबोधले जाऊ लागले. "कुत्ते कमीने मै तेरा खुन पी जाऊंगा" असे खलनायकाला

त्याने म्हटल्यावर थिएटर मध्ये दर्शकांच्या मुठी आवळत असत. देव-राज-दिलीप नंतर राजेंद्र कुमार, शम्मी कपूर, राजेश खन्ना, अमिताभ बच्चन अशा जुबलीस्टार, सुपरस्टार यांच्या झंझावातात सुद्धा धर्मेंद्र याने आपला वेगळा ठसा उमटवला, सिनेसृष्टीत घट्ट पाय रोवून उभा राहिला. त्याचे चाहते भारतभर त्याच्या सिनेमांना प्रतिसाद देत होते. 70 च्या दशकात शोले, सीता और गीता, चाचा भतीजा, यादों की बारात 80 च्या दशकात नोकर बीबी का,  गुलामी, आग हि आग , बटवारा, हुकूमत, ऐलान ए जंग, व इतर ॲक्शन सिनेमांमध्ये त्याने ॲक्शन मध्येही तो कमी नसल्याचे दाखवून दिले ॲक्शनसाठी तोच योग्य असल्याचे सिद्ध केले 80 च्या दशकात तर सनी देओल या त्याच्या मुलासोबत त्याचे सुद्धा सिनेमे पडद्यावर झळकत होते. श्रीदेवी, डिंपल कपाडिया, अमृता सिंग, माधुरी दीक्षित सारख्या त्याच्या मुलाच्या सहनायिकांचा तो सुद्धा नायक म्हणून शोभला. ९० च्या दशकात सुद्धा त्याने काही सिनेमे केले. काही चित्रपटांची निर्मिती केली. अपने , यमला पगला दिवाना सारख्या सिनेमात काम करून तो आज ही तो कार्यरत आहे व आगामी सिनेमात सुद्धा दिसणार आहे. बालपणी कोणत्यातरी सिनेमात तो दिसला बहुदा शोलेच असावा आणि तो आवडू लागला पुढे तो डाऊन टू अर्थ आहे, भावनाप्रधान आहे , मदतीस घाऊन जाणारा आहे , शायर आहे , आजही शेती त्याची गुरे ढोरे सांभाळून जमिनीशी नाळ जोडून आहे तसे त्याचे व्हिडीओ माध्यमातून येत असतात, प्रचंड पैसा नावलौकिक मिळवूनही तो साधा आहे, सरळ आहे , रांगडा आहे  हे कळल्यावर त्याचे दुसरे लग्न त्यासाठी धर्म बदलणे हे सर्व माहित असूनही न जाणे का पण अनेक लोक त्याचे चाहते आहे. इतकी वर्षे सिनेमात राहूनही त्याला फिल्मफेअर पुरस्कार मात्र कधी मिळाला नाही. व तो पुरस्कार प्राप्त करण्यासाठी करावे लागणारे सोपस्कारही त्याने काही केले नाही. मात्र नंतर त्याला नंतर पद्मविभूषणसह इतर अनेक पुरस्कार प्राप्त झाले. तो व त्याची पत्नी दोघेही भाजपाचे खासदार झाले, पत्नी आजही विद्यमान खासदार आहे. जनसामान्यांचे अफाट प्रेम मिळालेला धर्मेंद्र हा एकमेव अभिनेता आहे हे त्याच्या ८७ व्या वाढदिवशी दिसून आले. जनतेचे त्याच्यावरील प्रेम आणि लोकप्रियता पाहून तो "पिपल्स ॲक्टर" असल्याचे वक्तव्य शत्रुघ्न सिन्हा याने केले होते. एक ग्रामीण भागातून आलेला साधा , सरळ , रांगडा युवक बिकट स्थितीत आपले ध्येय साध्य करतो "पिपल्स ॲक्टर" बनतो हे ग्रामीण भागातील युवकांना सुद्धा त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात चिवटपणे कार्यरत राहून यशप्राप्तीसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे.                                                                                                         विनय वि.वरणगांवकर© 
                                                खामगांव      

०८/१२/२०२२

Article about divorce, old hindi songs etc

जीवन मे पिया तेरा साथ रहे 


घटस्फोटाचे प्रमाण प्रचंड वाढलेले आहे, विवाहाच्या काही दिवसातच पती-पत्नी विभक्त होत आहेत, पत्नीपीडितांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे न्यायालयामध्ये घटस्फोटांची अनेक प्रकरणे प्रलंबित आहे. ही इतकी प्रकरणे आहेत की न्यायालय व न्यायाधीशांची संख्या सुद्धा अपुरी पडते आहे. हे असे का घडते आहे ?

        सद्यस्थितीत आपण बघतो की, घटस्फोटांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे.  80 च्या दशकानंतर एक सुशिक्षित पिढी तयार होऊ लागली आणि या सुशिक्षित तरूणांत  मुलींची  सुद्धा मोठी संख्या निर्माण झाली. स्वातंत्र्यपुर्व काळात राजा राममोहन राय, भगिनी निवेदिता, महर्षी धोंडो केशव कर्वे,  महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आदी अनेक समाज सुधारकांनी महिला उत्कर्षासाठी वाखाणण्याजोगे कार्य व घेतलेली मेहनत महिलांच्या शिक्षणासाठी केलेले अपार कष्ट या सर्वांमुळे सुशिक्षित महिलांचे प्रमाण वाढू लागले. हळू हळू या महिलांना सरकारी क्षेत्रामध्ये व  खाजगीकरण वाढल्यानंतर खाजगी कंपन्यांमध्ये नोकऱ्या मिळू लागल्या. विविध तांत्रिक, वैद्यकीय, व्यवसायिक महाविद्यालयांमध्ये मुली शिकू लागल्या. परंतु हे सर्व होत असताना तत्कालीन मुली या कौटुंबिक व्यवस्था टिकण्यास अनुकूल होत्या. एकत्र कुटुंब व ज्येष्ठ नागरिकांसह वाढलेल्या या मुली माहेर व सासर दोन्ही सांभाळत असत. परंतु नव्वदच्या दशकानंतर स्वतःच्या पायावर उभ्या राहणाऱ्या मुली यांना  पाच आकडी, सहा आकडी पगार येऊ लागला या रग्गड पैसा कमवणाऱ्या मुली मग स्वतःच्या स्वतंत्र अशा शैलीने जगू लागल्या , निर्णय घेऊ लागल्या त्यांना त्यांच्या जीवन व इतर कार्यात त्यांच्या पतीचा वा पित्याचा सहभाग, सल्ला याची निकड उरली नाही. आज आपण बघतो की घटस्फोटाचे प्रमाण प्रचंड वाढलेले आहे, विवाहाच्या काही दिवसातच पती-पत्नी विभक्त होत आहेत, पत्नीपिडितांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे न्यायालयामध्ये घटस्फोटांची अनेक प्रकरणे प्रलंबित आहे. ही इतकी प्रकरणे आहेत की न्यायालय व न्यायाधीशांची संख्या सुद्धा अपुरी पडते आहे. हे असे का घडते आहे ? हे शोधू जाता नाना कारणे आहेत. आजच्या तरुण मुला-मुलींकडे जुन्या काळातील आदर्श, नितीमूल्ये, वाचन,  गीत,  संगीत,  सिने संगीत असे काहीच नाही आहे. वरील सर्वांतून नकळत होणारे संस्कार आता मिळत नाही त्यामुळे उच्चशिक्षित होऊनही या तरुणांमध्ये कुटुंब व ज्येष्ठांशी कसे वागावे, नवदांपत्यांनी एकमेकांशी कसे वागावे याचा अभाव आढळून येत आहे. जुन्या काळातील चित्रपट व त्यातील गीते यामुळे सुद्धा तत्कालीन तरुण-तरुणी, नवदांपत्य यांना एकमेकांविषयी प्रेम, कुटुंबाविषयी ममत्व भावना, एकमेकांप्रती आदर अशा भावना त्यांच्यात आपसूकच वृद्धिंगत होत असत "जीवन मे पिया तेरा साथ रहे" असे जेव्हा  नायिका  पडद्यावर म्हणत असे तेव्हा समाजातील अनेक तरुणींना सुद्धा  त्यांना त्यांच्या जीवनसाथीची सोबत , सहवास आयुष्यभरासाठी असावा असे वाटत असे. त्या नायिकेचा नायक प्रतिसादात जेव्हा "हातो मे तेरे मेरा हात रहे" असे उत्तर देई तेव्हा तत्कालीन तरुण सुद्धा त्या नायकाप्रमाणे  त्याच्या जीवनसंगिनीचा हातात घेतलेला हात  कधीही न सोडण्याचे मनोमन ठरवत असे. दुसरे गीत "तुझे जीवन की डोर से बांधलीया है" ;  या गीतात सुद्धा "तेरे जुल्मोसितम सर आंखोपर" असे नायकाने म्हटल्यावर प्रतिसादात नायिका सुद्धा "मेरे जीवन की अनमीट कहानी है तू मेरी तकदीर और जिंदगानी है तू"  असे म्हणतांना पाहून / ऐकून अनेक नवनवपरिणीत दाम्पत्य प्रभावित होत असत व आपल्या जीवनात सुद्धा तसे वागत असत व तडजोड करून आयुष्यभर सोबत राहत असत. "सारा प्यार तुम्हारा मैने बांध लिया है  आंचल में" , "हे मैने कसम ली नही होंगे जुदा हम" , "एक प्यार का नगमा है,मौजो की रवानी है, जिंदगी और कुछ नही, तेरी मेरी कहानी है|" अशी कित्येक जुनी गीते आहेत ही गीते सुद्धा निश्चितच कुठेतरी कुटुंबव्यवस्था टिकवण्यात हातभार लावत असत. दुर्दैवाने आता अशी गीते , अशा कथा तरुणांच्या समोर येत नाही , कौटुंबिक चित्रपट निर्माण होत नाही. असे चित्रपट, गीते जर का पुन्हा येऊ लागली , लेखकांनी अशा कथा पुन्हा लिहिल्या तर त्याचा सुद्धा निश्चितच चांगला परीणाम आजच्या तरूणांवर होईल असे वाटते. आज दिवस निघत नाही तर "माझ्या नव-याची दुसरी बायको" सारख्या मालिका व दोन दोन नायिकांना फिरवणा-या शाहरुख टाईप नायकाचे चित्रपट, 2001 मध्येे आलेल्या अक्षयकुमारच्या अजनबी या चित्रपटासारखे चित्रपट तरुण पाहत आहेत व तसेच अनुकरण समाजात होताना दिसत आहे. अर्थात आजही  अनेक तरुण-तरुणी उपरोक्त केलेल्या भाष्यास अपवाद सुद्धा आहेत अशा अपवाद असणाऱ्या तरुण तरुणींनी कृपा करून यातून स्वत:स वगळावे. नवोदित लेखक ,कवी,गीतकार,चित्रपट कथा लेखक यांनी कुटुंब व्यवस्था टिकून राहील अशा "जीवन मे पिया तेरा साथ रहे",  "तुझे जीवन की डोरसे बांध लिया है" व लेखात आलेल्या इतर गीतांसारख्या गीत रचना केल्यास, चांगल्या कौटुंबीक कथा लिहिल्यास त्याचा तरुणाईवर निश्चिचितच सकारात्मक परिणाम होईल व मोडकळीस आलेली कुटुंब व्यवस्था पुन्हा प्रस्थापित होईल अशी आशा वाटते.

०१/१२/२०२२

Article about Dr. Hedgewar Pathology Lab Khamgaon, Social Project of Datta Upasak Mandal

डॉ. हेडगेवार  पॅथॉलॉजी  ; दत्तोपासक मंडळाचा स्तुत्य उपक्रम


बरेच दिवसांपासून या लेखाचा विचार मनात घोळत होता. परंतू म्हणतात ना योग्य वेळ आल्यावरच कामे बरोबर मार्गी लागतात. तशीच हा लेख लिहिण्यास योग्य वेळ आज आली, ती अशी की आजपासून दत्त जन्मोत्सव सप्ताहास सुरुवात झाली आहे व ज्या डॉ. हेडगेवार पॅथॉलॉजीबाबत या लेखातून भाष्य करणार आहे ती खामगांवला सुरू झालेली पॅथॉलॉजी ही खामगांव अर्बन या नामांकीत बँकेच्या स्थापनेउपरांत काही दिवसातच दत्त उपासक मंडळाची स्थापना झाली. वरील पॅथॉलॉजीचे स्थापनकर्ते सुद्धा दत्तगुरुचेच उपासक आहे. म्हणूनच या लेखासाठी हा चांगला योग जुळून आला आहे. दत्त उपासक मंडळाने  खामगांवला  डॉ. हेडगेवार  रुग्ण सेवा प्रकल्प या सेवा संस्थेच्या सहयोगाने ही पॅथॉलॉजी सुरू केली. देशातील नागरिकांचे आरोग्य चांगले असावे याकडे सरकारचे नेहमीच लक्ष असते. देशातील अनेक संस्था सुद्धा आरोग्य क्षेत्रात अनेकप्रकारची चांगली मदत, सेवा करतांना दिसून येतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सुद्धा स्थापनेपासूनच सेवा कार्यात सतत अग्रेसर राहिला आहे यात दुमत नाही. कोरोना काळात आपण मृत्यूचे सावट व अपु-या आरोग्य सुविधा अनुभवल्या. हा अनुभव सर्वांसाठीच मोठा दु:खदायी, भयावह असा अनुभव होता.  अनेक लोक मृत्यूमुखी पडले, आरोग्य सुविधा , उपकरणे अपुरी होती त्यांची मोठी निकड निर्माण झाली होती , तपासणी प्रयोगशाळा कमी पडत होत्या. असेच सर्वत्र चित्र होते. या सर्व संकटाच्या काळात सर्वसामान्य नागरीकांची , तळागाळातील आपल्या देशबांधवांची मोठी परवड झाली. याच काळात बिकट स्थितीतही आपल्याच देशात लस निर्मिती हा एक भीम पराक्रम आपल्या देशाने करून दाखवला. केवळ निर्मितीच नव्हे तर इतर देशांना लस पुरवठा सुद्धा केला. कोरोनाच्या बिकट स्थितीत  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सर्वत्रच वस्त्या वस्त्यातून अन्नधान्य पुरवठा केला , सरकारी दवाखान्यात कोरोना रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला. हे सर्व पाहून खामगांवच्या दत्तउपासक मंडळास सुद्धा आरोग्य क्षेत्रात काहीतरी सेवाकार्य करण्याची प्रेरणा मिळाली व त्यांनी यासाठी डॉ. हेडगेवार रुग्ण सेवा प्रकल्प संस्थेशी संपर्क करून  खामगांव व परीसरातील नागरीकांसाठी  डॉ. हेडगेवार  पॅथॉलॉजी सुरू करण्याचे ठरवले. तद्नंतर जागा , मनुष्यबळ, साहित्य , अत्याधुनिक तपासणी यंत्रे  इत्यादी अनेक सोपस्कार पार पाडल्यावर  दि 4 एप्रिल 2022 रोजी प्रांत संघचालक रामजी हरकरे यांच्या हस्ते या  पॅथॉलॉजीचे उद्घाटन संपन्न झाले. शेवटच्या घटकापर्यन्त आरोग्य सुविधा पोहचावी ही संकल्पना व व्याधीने ग्रस्त असलेल्या सर्व घटकातील जनते पर्यन्त पोहचून त्यांच्यासाठी चांगल्यात चांगले कार्य करण्याचे ध्येय  या पॅथॉलॉजी आहे. या पॅथॉलॉजीत सर्वच प्रकारच्या तपासण्या करण्याची सुविधा आहे. या तपासण्या सुद्धा अल्प दरात केल्या जातात. म्हणजे तपासणी शुल्क हे अत्यल्प असून 50 टक्क्यांपर्यन्त सवलत दिली जाते. या  डॉ. हेडगेवार पॅथॉलॉजी  लॅबचा आजरोजी पावेतो म्हणजेच 8 महिन्यात 1500 हून अधिक रुग्णांनी लाभ घेतला आहे.  या पॅथॉलॉजी लॅबला अनेक मान्यवरांनी भेटी देऊन येथील कार्याची वाखाणणी केली आहे. या मान्यवरात राम माधवजी , विश्व हिंदू परिषदचे केंद्रीय मंत्री मिलिंदजी परांडे ,  अरुणजी नेटके विश्व हिंदू परिषद यांचा समावेश आहे. दिनदयाल उपाध्याय यांच्या "अंत्योदय" या संकल्पनेला अनुसरून हे कार्य आहे. स्वामी विवेकानंद यांनी सुद्धा " मै उसिको महात्मा समझता हूं जिसका हृदय गरीबोके लीये रोता है |" असे म्हटले होते. या वाक्यास अनुसरण्याची प्रेरणा बाळगून ही पॅथॉलॉजी सुद्धा समाजातील तळागाळातील जनतेसाठीच आहे. या पॅथॉलॉजीस खामगांवातील अनेक तज्ञ डॉक्टर मंडळींचे सुद्धा मोठ्या प्रमाणात सहकार्य व आवश्यक ते मार्गदर्शन, सल्ला प्राप्त होत आहे. त्यांच्या सहकार्याशिवाय हा आरोग्य सेवेचा गोवर्धन उचलणे शक्य नव्हते. उपरोक्त सर्व कार्यात दत्तउपासक मंडळ व डॉ. हेडगेवार  रुग्ण सेवा प्रकल्प  चे कार्यकर्ते तत्पर असतात. खामगांव व परीसरातील गरजू जनतेने या पॅथॉलॉजी  लॅबचा  अवश्य उपयोग घ्यावा व याबाबात सर्वांना माहिती द्यावी जेणे करून  दिनदयाल उपाध्याय यांना अभिप्रेत अशा तळागाळातील जनतेला या आरोग्य सेवेचा लाभ घेता येईल व "अंत्योदय" होईल. आजपासून दत्त सप्ताहास सुरुवात झाली आहे व आजच्याच दिवशी द्त्तोपासक मंडळाच्या या सेवा कार्याबाबतचा लेख लिहिल्या गेला ही भगवान दत्तात्रयांची कृपाच म्हणावी लागेल. जय गुरुदेव दत्त !     

       

२४/११/२०२२

Article about statements of leaders

वाचाळवीर स्पर्धा असावी. 


लोकप्रतींनिधींसाठी “वाचाळवीर स्पर्धा” का असू नये असेच वाटू लागले आहे. ही स्पर्धा 
घेतल्यावरही वाचाळवीर कोण ठरेल हेही सांगता येत नाही कारण? वाचाळपणात हे 
एकमेकांपेक्षा तसूभरही कमी नाही.                    

बालपणापासून वक्तृत्व स्पर्धा , वादविवाद स्पर्धा तुम्ही सर्व ऐकत , वाचत आले असालच परंतू आता आणखी एक स्पर्धा सुरू करण्याची वेळ आली आहे. परंतू ही स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी नसून लोकप्रतिनिधींसाठी असावी असे वाटते. असे सुचवण्याचे कारण हे की देश/राज्य चालविण्याऐवजी सांप्रतकालीन लोकप्रतिनिधी हे त्यांचे मुख्य कार्य सोडून , विकासादी विषयांबाबत भाष्य करणे सोडून  विविध मुद्दे खास करून जुन्या , ऐतिहासिक गोष्टी , राष्ट्रपुरुष , क्रांतीवीर , क्रांतिकारक यांच्याविषयी विनाकारणची , उपटसूंभ अशी वक्तव्येच जास्त करीत बेभान सुटले आहे. 

आताचे नुकतेच उदाहरण म्हणजे राहुल गांधी यांची भारत जोडो ही यात्रा चांगली सुरळीत सुरू होती, त्यांची भाषणे ही विशेष प्रभावी नसली तरी व्यवस्थित होती. महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर आल्यावर मात्र त्यांची जीभ घसरली आणि त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी विनाकारणची वक्तव्ये केली जी त्यांनी यापुर्वी सुद्धा केली आहेत. त्यांच्या वक्तव्यानंतर त्यांचा सर्वत्र तीव्र निषेधच झाला आणि तो होणे अपेक्षितच आहे कारण सावरकरांना अवघ्या महाराष्ट्रात मोठे सन्मानाचे स्थान आहे. महाराष्ट्रातील जनतेच्या हृदयात ज्या सावरकर यांना विशेष जागा आहे त्या सावरकरांविषयी राहुल गांधी यांच्या मनात एवढा द्वेष का आहे हे ही एक कोडेच आहे ? त्यांना सावरकर यांच्याविषयी काही तरी ज्ञान आहे का ? खरे तर कुण्याही लोकप्रतीनिधीने कोणत्याही स्वातंत्र्यसंग्राम सैनिकाविषयी द्वेष बाळगायलाच नको. सावरकर यांच्याविषयी बोलल्यानंतर टिका व्हायला लागली तेंव्हा बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यातील भाषणांत ते बॅकफुटवर आल्यासारखे वाटत होते. “हमे किसीसे नफरत नही” वगैरे सारख्या सारवासारव करणा-या वाक्यांसारखी वाक्ये ते बोलले. त्यांचे सावरकर यांच्याविषयीच्या वाक्याचे धुमारे धूसर होत नाही तोच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिवाजी महाराज यांची तुलना शरद पवार व नितीन गडकरी यांच्याशी करून आणखी एक वाद उपस्थित केला. राहुल गांधी , कोश्यारी , संजय राऊत यांच्यासह इतर सर्वच लोकप्रतिनिधी आता कमी अधिक प्रमाणात विनाकारणची वक्तव्ये करून नाहक वाद निर्माण करीत असतात. म्हणूनच या लोकप्रतिनिधींसाठी एखादी वाचाळवीर स्पर्ध्याच का असू नये असेच आता वाटू लागले आहे. महाराष्ट्रात तर हल्ली निव्वळच बोलघेवडेपणाच सुरू असतो. राज्यशकट कसा काय हाकला जातो आहे देव जाणे ? खोके , गद्दार आणखी नाना शब्दप्रयोग करून एकमेकांना डिवचणे सुरू असते. लोकप्रतिनिधी महिला सुद्धा यात काही कमी नाही पेडणेकर बोलतात  काय ? चित्रा वाघ संतापतात काय ? , नवनीत राणा पोलिसांशी अरेरावी काय करतात? अंधारे पक्ष बदलताच किती पलटी मारतात. तर या वाचाळपणात महिला सुद्धा मागे नाही. गुलाबराव पवार , राणे , खडसे , महाजन मंडळी अशी सर्वच निव्वळ एकमेकांवर चिखलफेक , एकमेकांशी शाब्दिक चकमकी करत असतात.  कोणत्याही पक्षातील नेत्यांनी जुन्या स्वातंत्र्यसेनांनी बाबत अवाक्षरही काढू नये अशीच अपेक्षा जनतेला आहे. जनतेला त्यांचे प्रश्न सोडवून हवे आहेत जुनी पेन्शन, होमगार्ड , अंगणवाडी, पाणी अशा अ नेक समस्यांचे निराकरण जनतेला हवे आहे त्यांना वृथा वलग्ना नकोत.

      लोकप्रतींनिधींनो तुमची नाहक वक्तव्ये ऐकून जनतेचे कान अगदी किटून गेले आहेत. जनतेने तुम्हाला निवडून दिले आहे ते राज्य चालवण्यासाठी तुमचा वाचाळपणा ऐकण्यासाठी नव्हे. तुमच्या वाचाळपणानंतर जनतेमध्ये सुद्धा हेवेदावे होऊ लागले आहे. खरे तर लोकप्रतिनिधी यांच्या वाचाळपणाबद्दल यापुर्वीही कित्येकदा लिहिले आहे परंतू याविषयावरचे लिखाण कधी संपेल असे वाटतच नाही एवढा यांचा वाचाळपणा हल्ली सुरू असतो आणि म्हणूनच लोकप्रतींनिधींसाठी “वाचाळवीर स्पर्धा” का असू नये असेच वाटू लागले आहे. ही स्पर्धा घेतल्यावरही वाचाळवीर कोण ठरेल हेही सांगता येत नाही कारण? वाचाळपणात हे एकमेकांपेक्षा तसूभरही कमी नाही.

१७/११/२०२२

Article on shraddha murder case Delhi

मुलींनो समाजातील आफताब ओळखा


आपल्या मुला-मुलींना आपल्या आदर्श नायकांच्या कथांचे, पौराणिक कथांचे, उपनिषद, पृथ्वीराज चौव्हाण, धर्मवीर संभाजीराजे यांच्या कथांचे, चित्तोडवर मुस्लिम आक्रमकांच्या हाती लागू नये म्हणून जोहार करणा-या राजपूत स्त्रियांच्या कथांचे बाळकडू मिळायला हवे.  या बाळकडूपासून आजच्या शिक्षणपद्धतीमुळे, चांगले वाचन नसल्याने, पालकांच्या व्यस्त जीवनपद्धतीमुळे, आजी आजोबांचा सहवास नसल्याने, दुर्दैवाने ते वंचीत झालेले आहे व सुयोग्य जोडीदार निवडण्यात त्यांची फसगत होत आहे.

परवा श्रद्धा वालेकर हत्येचे वृत्त धडकले आणि सुन्न झालो, अवघा देशच सुन्न झाला. काय ती हत्या करण्याची निर्घुण  त-हा , हत्येनंतर देहाचे तुकडे तुकडे करून फ्रिज मध्ये ठेवणे , त्यासाठी नवीन फ्रिज घेणे , हत्या केल्यानंतर एक-एक पिशवी करून तुकडे जंगलात फेकणे या सर्व घटना ऐकून देश हादरला. कोणती ही विकृती ? , काय हा क्रोध ?  एखाद्याच्या देहाची शक्ले करून करून त्याला मारणे म्हणजे आफताब ने क्रौर्‍याची परिसीमाच गाठली. क्रौर्य, क्रूरकर्मा, काळिमा अशाप्रकारचे शब्द सुद्धा या घटनेसाठी थिटे पडू लागले. का होते आहे हे असे ? का वारंवार घडतात आहेत मुलींना जाळ्यात फसवून ठार मारण्याच्या घटना ? याला काही पायबंद आहे की नाही ? कायद्याचा धाक आहे की नाही ? यात चुकते कुठे आहे? कोण चुकते आहे? मुली, पालक, समाज, प्रशासन, शिक्षक, ओढून ताणून जबरीने प्रेम प्राप्त करणे हे दाखवणारे चित्रपट, की कमी अधिक प्रमाणात हे सारेच ? असे एक ना अनेेेक प्रश्न श्रद्धाच्या हत्येनंतर मनात घोळतच आहेत. श्रद्धासोबत जसे घडले तसे अनेक मुलींसोबत यापुर्वी सुद्धा घडले आहे पण अत्याचाराचे प्रकार मात्र वेगळे आहेत. या मुलींना प्रेमजालात फसवणारी ही कोण मुले आहेत ? मुली यांच्या प्रेमजालात  फसतात तरी कशा ? एवढ्या फसतात की आई वडीलांचा , कुटुंबीयांचा कायमचा त्याग करून  या आफताबसारख्या मुलांसह पळून जाण्याइतपत त्यांची मानसिक तयारी होते किंवा करवली जाते. त्या लिव्ह इन मध्ये राहतात लग्नाची मागणी केल्यावर ही मुले चालढकल करतात, त्या मागणीचा तगादा लावल्यावर हे आफताब त्यांना जीवे मारण्यासही मागे पुढे पाहत नाही. संत कबीराने म्हटले आहे "जैसा भोजन वैसा मन" या कबीरोक्ती नुसार त्यांचे मन व कृत्ये होत असतात. काय झाले आहे या श्रद्धासारख्या मुलींना ? प्रेम आंधळे आहे असे म्हटले जाते पण आपण कुणाच्या प्रेमात आपण पडतो आहे , प्रेमात पडल्यावर वाहवत काय जातो आहोत याचे काही एक भान या मुली का ठेवत नाही ? यांच्यावर काय जादू होते? आपण कुठे कमी पडत आहोत ? आपण अतिशय पुरोगामी विचारांचे, सुधारलेले, मॉडर्न, धर्मनिरपेक्ष असे काही स्वत:ला दाखवण्याचा का प्रयत्न करीत आहोत ? तसे दाखवण्याच्या नावाखाली आपण आपला स्वधर्म , आपले संस्कार , आपले रितीरीवाज यांचा हळू हळू त्याग करू लागलो आहोत. आपणच संस्कार , परंपरा चालीरिती यांना आपल्या पाल्यांसमक्ष तुडवत असू तर पाल्य तरी ते कुठे पाळतील ?   ते तर आणखी तुडवण्याचीच शक्यता अधिक. इतर अनेक धर्मात मात्र असे आढळत नाही ते कितीही मॉडर्न झाले, सुधारले तरी त्यांचे संस्कार, रिती, परंपरा सोडत नाही, आपण मात्र का कोण जाणे आपले संस्कार सोडत आहोत. (जे सन्मानीय अपवाद आहेत त्यांनी स्वत:ला वगळावे ) लग्न हा सुद्धा एक संस्कारच आहे परंतू हा संस्कार आता सेलिब्रेशन मध्ये लिव्ह इन मध्ये पालटला आहे. उच्चविद्याविभूषित मुली या आत्मनिर्भर झाल्या आहेत त्यामुळे त्यांना आता कुणाचेही , कशाचेही बंधन नको आहे. शिक्षणामुळे त्यांना  आपल्याला खूप समजते असे वाटू लागले आहे त्या स्वत:ला पुरुषांप्रमाणे समजू लागल्या आहेत. मग त्या श्रद्धासारखे आपल्या वडीलांना "मला आपली स्वत:ची मते आहेत, मला माझे समजते" अशाप्रकारची उत्तरे देऊन घराचा त्याग करतात. याअर्थी मुलींनी शिकू नये असा मुळीच नाही. जरूर शिकावे परंतू ज्या मातापित्यांनी आपल्याला सांभाळले, शिकवले , मोठे केले त्यांचे काही तर म्हणणे ऐकायला नको का ?  "प्यार किया नही जाता हो जाता है " असे आपल्या तरुणांना आपल्या हिंदी चित्रपट सुष्टीने शिकवले. पण तुम्ही कोणत्या मुलीवर / मुलावर प्रेम करत आहात ? तिच्या/ त्याच्या घरचे कोण ? , घराची पार्श्वभूमी काय ? ,   तिच्यावरचे / त्याच्यावरचे संस्कार कसे ? याचा विचार या तरुण मुलामुलींवर काही एक होतांना दिसत नाही आणि मग प्रेमाच्या मोठ-मोठ्या आणाभाका घेतलेले हे जीव अल्पावधीतच विभक्त होण्यापर्यन्त येऊन पोहचतात. श्रद्धासारखे इतर मुलींसोबत घडू नये म्हणून पालक, समाज, प्रशासन, शिक्षक सर्वांनाच सखोल विचारमंथन करावे लागेल. आफताबसारख्या मुलांच्या कचाटातून या मुलींना सोडवायचे असेल तर या मुलींना मुलींनाच नव्हे तर मुलांनाही आपल्या आदर्श नायकांच्या कथांचे, पौराणिक कथा, उपनिषद, पृथ्वीराज चौव्हाण, धर्मवीर संभाजीराजे यांच्या कथांचे, चित्तोडवर मुस्लिम आक्रमकांच्या हाती लागू नये म्हणून जोहार करणा-या राजपूत स्त्रियांच्या कथांचे बाळकडू मिळायला हवे. ते त्यांना आता दुर्दैवाने कमी मिळते आहे किंबहुना मिळतच नाही असेच चित्र आज दिसत आहे.  या बाळकडूपासून आजच्या शिक्षणपद्धतीमुळे, चांगले वाचन नसल्याने, पालकांच्या व्यस्त जीवनपद्धतीमुळे, आजी आजोबांचा सहवास नसल्याने,दुर्दैवाने ते वंचीत झालेले आहे आणि म्हणूनच  त्यांच्याकडून आत्महत्या , अयोग्य संस्कारहीन जोडीदार निवडणे अशा गोष्टी घडत आहेत. चुकीच्या जोडीदाराची निवड केली जात असल्याने आज घटस्फोटांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आही. न्यायालयापुढे घटस्फोटांची हजारो प्रकरणे प्रलंबीत आहेत. मुलींनो केवळ आपल्या पदव्या वाढवून , आचार्य वगैरे होऊन चालणार नाही जीवनात अनेक प्रसंग , चढ उतार पाहिलेल्या, तुमच्यासाठी पैशाची तजवीज करणा-या आपल्या मातापित्यांचे म्हणणे सुद्धा स्विकारणे शिका. डोके ठिकाणावर ठेवा, स्वधर्मातील चांगली पुस्तके वाचा,  आपल्या धर्मात सांगितलेल्या  निदान एखाद्या तरी बाबीचे अनुसरण करा. देश-विदेशातील वृत्तांवर नजर ठेवा, "अखंडी सावध राहावे" या संतोक्ती नुसार कुणीही तुम्हाला प्रलोभने देत असेल , आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत असेल , जवळीक साधण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्वरीत त्याला जाणा व त्याला आपल्या जीवनातून हद्दपार करा. मुलींनो आपल्या सुखी जीवनासाठी आपल्या माय-बापासाठी, बंधू भगिनींसाठी परीवारासाठी, समाजातील हे असे नतद्रष्ट , क्रूरकर्मा , निर्घुण, पाशवी, बाहयांगाने सुंदर भासणारे परंतू अंतरंगाने पशू असणारे  आफताब ओळखा व त्यांना थारा देऊ नका.

१०/११/२०२२

Article about Bhide Guruji Statement about Bindiya, Indian ladies holy symbol.

 तेरी बिंदीया रे ....



हल्ली बिंदीया, झुमका व अस्सल भारतीय आभूषणे लुप्त होत चालली आहेत. लग्न , समारंभ व फोटो काढण्यापुरता तेवढा त्यांचा उपयोग होतो. आभूषणांसह लज्जा हे स्त्रीचे नैसर्गिक आभूषण सुद्धा लुप्तप्राय होत चालले आहे. 
        साम टीव्हीच्या महिला पत्रकार रुपाली बडवे जेंव्हा शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान संघटनेचे नेते भिडे गुरुजींना प्रश्न विचारायला गेल्या असता , "तू पहिले कुंकू लाव , मग तुझ्याशी बोलेल" असे उत्तर भिडे गुरुजींनी दिले. महिलांनी कुंकू , टिकली लावावी की नाही ? यावर भिडे गुरुजींच्या वक्तव्यानंतर बराच ऊहापोह व गदारोळ सुरु झाला. अद्यापही सुरुच आहे.  तसा आपल्या देशात आता गदारोळ सुरु होण्यास काहीच वेळ लागत नाही. तोंडातून एक एक शब्द उच्चारतांना किंवा लिहितांना दहा वेळा विचार करावा लागतो. आपल्या बोलण्याचा कोण काय अर्थ काढेल , काय विपर्यास करेल याचा काही  नेमच आताशा  राहिलेला नाही. म्हणूनच या लेखात कुणाचे समर्थन अथवा कुणाचा अपमान यावर भाष्य करण्यापेक्षा कुंकू , कुंकू लावणा-या पूर्वाश्रमीच्या स्त्रिया , कुंकू संबंधीत गीत, कुंकुवाची परंपरा  यावर भाष्य केले आहे. 

        मी व माझ्या पिढीतील प्रत्येकानेच त्यांच्या आई , आजी व इतर महिला नातेवाईकांना ठसठसीत कुंकू लावलेले पाहिलेले आहे, त्या लावायच्या म्हणून आम्ही पण लावलेच पाहिजे का ? या प्रश्नाचे उत्तर देऊन पुढे अधिक वाद वाढवण्यापेक्षा मी उत्तर न देणेच पसंद करेल. पण कुंकू/ टिकली स्त्रियांच्या सौंदर्यात अधिक भर घालेल असाच सौभाग्यालंकार आहे. माझी आज्जी कपाळाला मेण लाऊन मग त्यावर कुंकू लावत असे. माझ्या मोठ्या मामींचे कुंकू सुद्धा एकदम मोठे, ठसठसीत असे. ठसठसीत भारदस्त कुंकू लावणा-या स्त्रिया ह्या मला बालपणी रुबाबदार व करारी अशा भासत असत. त्यात नऊवारी नेसली असेल तर त्यांच्या रुबाबात अधिकच भर पडत असे. बालपणी सर्वच कुंकू लावलेल्या स्त्रिया पाहिलेल्या मला महाविद्यालयात गेल्यावर सहपाठी मुली ह्या टिकली लावलेल्या दिसत असत आणि हल्ली तर  टिकली पण गायब झाली आहे. हल्लीच्या मुलींना टिकली लावाविसी वाटत नाही त्यांना सांगूनही त्या तसे करीत नाही हा जनरेशन गॅॅप आणि काळाचा महिमा आहे. उच्च शिक्षण घ्यावे, आधुनिक व्हावे पण रिती-रिवाज, धार्मिक मूल्ये परंपरा का सोडाव्या? असे म्हटल्यावर स्त्रिया सुद्धा पुरुषांच्या पोशाखाबाबत बोलायला कमी करणार नाही. नामांकित लेखिका , ब्रिटनच्या पंतप्रधानांच्या सासूबाई , नारायण मूर्ती यांच्या भार्या सुधा मुर्ती धनिक, उच्चविद्याविभूषित असूनही किती साध्या राहतात म्हणूनच त्यांची एक वेगळीच छाप पडते. परवा भिडे गुरुजींना त्यांनी लवून नमस्कार केल्यावर त्यांच्यातील संस्कार व नम्रता दिसून आली. इकडे आपण पाश्चात्यांचे अनुसरण करीत आहोत आणि तिकडे विदेशातील अनेक तरुणी मात्र साड्या , कुंकू असा भारतीय पेहराव पसंत करीत आहेत. भारतीय संस्कृतीत  जे नऊ रस सांगितले आहेत त्यातील शृंगार रसात कुंकाचाही समावेश आहे व म्हणूनच कुंकू आधारीत अनेक गीते, चित्रपट सुद्धा निघाले आहेत. 70 च्या दशकात अमिताभ व जया भादुरी यांचा अभिमान हा चित्रपट झळकला होता. गायक पती पत्नीतील समान व्यवसायामुळे होणारे हेवे दावे , स्वाभिमान दुखावणे असा हा चित्रपट होता. "तेरी बिंदीया रे" हे रफी व लता चे कर्णमधूर असे गीत यात आहे. यात नायकाने नायिकेला उद्देशून असे  "तेरी बिंदीया रे" असे म्हटल्यावर "सजन बिंदीया ले लेगी तेरी निंदिया रे" असे म्हणते. आपल्या पत्नीच्या कपाळावरील बिंदीया अर्थात कुंकू हे चंद्र व ता-यांप्रमाणे भासते मग तो  "तेरे माथे लगे है युं जैसे चंदा तारा" असे म्हणतो. पुढे नायिकेच्या झुमका , कंगन या आभूषणांचे कौतुक सुद्धा तो आपल्या गाण्यात करतो. मजरूह सुलतानपुरी ने किती छान, सर्वांगसुंदर असे नायिका व तिच्या आभूषणांचे वर्णन या शृंगार गीतात केले आहे. परंतू हल्ली बिंदीया, झुमका व अस्सल भारतीय आभूषणे लुप्त होत चालली आहेत. लग्न , समारंभ व फोटो काढण्यापुरता तेवढा त्यांचा उपयोग होतो. आभूषणांसह लज्जा हे स्त्रीचे नैसर्गिक आभूषण सुद्धा लुप्तप्राय होत चालले आहे. एका नववधूस मी भर लग्न मंडपात अमिताभ बच्चन प्रमाणे सर्व उपस्थितांच्या नजरेला नजर देत चौरंगावर उभे राहिलेले पाहिले आहे. लहानपणापापासून अनेक लग्नात "नववधू प्रिया मी बावरते"  याप्रमाणे अनेक वधूंना  पाहिलेल्या मला ही डॅशिंग नववधू वेगळीच भासली होती. हा सर्व काळाचा महिमा आहे. 

    कुणी काय घालावे वा घालू नये हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न असला तरी भारतीय वस्त्रे, आभूषणे ल्यालेली व कुंकू लावलेली  स्त्री  इतकी सुंदर, सोज्वळ, इंप्रेसिव्ह वाटते की गीतकारास मग आपोआपच तेरी बिंदीया रे हे गीत व त्यातील तेरे माथे लागे युं जैसे चंदा तारा सारख्या ओळी स्फुरतात.  

२०/१०/२०२२

Article about Mohasin Butt visit to India on the occasion of Interpol Summit.

मोहसिन बट यांची बरेच काही सांगून जाणारी चुप्पी

 


  इंटरपोल संघटना, इंटरपोल महासभा, त्या अनुषंगाने भारतात आलेले पाकिस्तानचे सिमा सुरक्षा , गुन्हा अन्वेषण , व गुप्तचर संघटनेचे प्रमुख मोहसिन बट व  पत्रकारांच्या प्रश्नांवरची त्यांची चुप्पी यांबाबत थोडेसे 

परवा इंटरपोलच्या (Interpol) महासभेचे उद्घाटन झाले. मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या महासभेचे उद्घाटन झाले. तर केंद्रीय गृह मंत्री अमित शाह हे शुक्रवारी या महासभेच्या समापन समारोहात उद्बोधन करणार आहे. 1997 नंतर ही बैठक भारतात होत आहे. प्रगती मैदान, दिल्ली येथे होत असलेली ही 4 दिवसीय महासभा  इंटरपोलची 90 वी वार्षिक महासभा आहे. या महासभेच्या अनुषंगाने दिल्लीतील वाहतूक सुद्धा इतर मार्गानी वळ्वण्यात आली आहे. चार दिवसांच्या कार्यक्रमात 195 देशातील प्रतिनिधी उपस्थित राहणार आहे. पंतप्रधान कार्यालया कडून आलेल्या माहितीव्दारे या प्रतींनिधींमध्ये सदस्य देशांचे  मंत्री, पोलिस प्रमुख, केंद्रीय ब्यूरोचे प्रमुख आणि वरिष्ठ पोलिस अधिकारी यांचा समावेश आहे. पीएमओ ने दिलेल्या माहितीनुसार महासभा म्हणजे  इंटरपोलची सर्वात महत्वपूर्ण अशी सभा असते जी वर्षातून एकदा संपन्न होत असते. या बैठकीत इंटरपोलच्या कामकाजा बाबत समीक्षा होत असते तसेच अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले जातात. या बैठकीत अनेक आर्थिक घोटाळे, भ्रष्टाचाराच्या विभिन्न प्रकरणावर चर्चा केली जाणार आहे. या महासभेच्या उद्घाटनपर भाषणांत बोलतांना मोदी यांनी भ्रष्टाचारी, दहशतवादी, मादक पदार्थांचे तस्कर, शिकार करणा-या टोळ्या, संघटीत गुन्हेगार  यांना कोणत्याही देशाने आश्रय देऊ नये व दहशतवादाविरुद्ध सर्व राष्ट्र एकजूट असावे. असे आवाहन केले. याप्रसंगी इंटरपोलचे अध्यक्ष युनायटेड अरबचे अहमद नासीर अल रईसी हे उपस्थित होते. मोदी आणि त्यांच्या हस्ते 100 रुपयांच्या नाण्याचे विमोचन झाले.            आता प्रथम  इंटरपोल बाबत जाणून घेऊ व तद्नंतर या महासभेत पाकिस्तानच्या प्रतींनिधीची कशी फजिती झाली ते पाहू. 

 इंटरपोल या आंतर्राष्ट्रीय संघटनेची स्थापना ही 7 डिसेंबर 1923 रोजी व्हीएन्ना, ऑष्ट्रीया येथे झाली असून या संघटनेचे मुख्य कार्यालय फ्रांस देशातील लीऔं (लियॉन)  येथे स्थित आहे.  इंटरपोल अनेक गुन्हेगारी संबंधीत प्रकरणांमध्ये सदस्य देशांना सहकार्य करीत असते. आंतर्राष्ट्रीय गुन्हे, दहशतवाद, सायबर क्राईम रोखण्याबाबत प्रशिक्षणे सुद्धा आयोजित करीत असते. या संघटनेच्या व्यापक कार्यक्षेत्रात बालकांवर होणारे लैंगिक अत्याचार, अमली पदार्थ, राजकीय भ्रष्टाचार, बौद्धिक संपदा चौर्य हे सुद्धा येतात असे या संघटनेबाबत संक्षिप्तरित्या सांगता येईल.

 इंटरपोलच्या याच महासभेच्या अनुषंगाने पाकिस्तानी सिमा सुरक्षा, गुन्हा अन्वेषण, व गुप्तचर संघटनेचे प्रमुख मोहसिन बट हे सुद्धा भारतात आलेले आहे. पाकिस्तान हे राष्ट्र दहशतवाद पोसते आहे हे जगजाहीर आहे. बायडेन यांनी सुद्धा नुकत्याच पाकिस्तानला कानपिचक्या दिल्या होत्या. पाकिस्तान मध्ये अंतर्गत प्रश्न अनेक असूनही , तेथील अर्थव्यवस्था डबघाईस गेली असूनही हे राष्ट्र निव्वळ भारत विरोधासाठी दहशतवादरूपी भस्मासुराला पोसत आहे. हा भस्मासुरच एक दिवस पाकिस्तानच्या डोक्यावर हात ठेऊन त्याची राखरांगोळी निश्चित करणार आहे व तशी वेळ जवळ आल्याची चिन्हे दिसतच आहे. दहशतवाद, दाऊद सारख्या डॉनला आश्रय देणे, इतर दहशतवादी संघटनांच्या म्होरक्यांना अभय देणे, आश्रय देणे हे आज जरी पाकिस्तानला चांगले वाटत असले तरी भविष्यात या कुरापतखोर राष्ट्राचा घात करणार आहे. मोहसिन बट प्रमुख असलेली पाकिस्तानी फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी  ही गुप्तचर संस्था  इंटरपोलशी समन्वयाचे काम करीत असते. बट प्रगती मैदान येथील हॉल मध्ये आले असता पत्रकारांनी त्यांना दाऊद, जैशे मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहर तसेच मुंबई वरील हल्ल्याचा सुत्रधार हाफिझ सईद यांच्या बाबत तसेच त्यांचा ठावठिकाणा कुठे आहे हे बट यांचेकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी चुप्पी साधली होती. तत्पूर्वी त्यांनी पत्रकारांना टाळण्याचा प्रयत्न केला व भोजन कक्षातच घुटमळत राहिले. पंतप्रधान मोदी यांच्या आगमनाची घोषणा होताच त्यांनी सभास्थानी प्रवेश केला परंतू पत्रकारांच्या प्रश्नांना ते उत्तर देऊ शकले नाही,  बट यांची ही चुप्पी बरेच काही सांगून गेली.  

१३/१०/२०२२

Article about Karwa Chauth , a hindu festival

करवा चौथ 


आज करवा चौथ, पुर्वीचे हिन्दी चित्रपट म्हटले की  गाजर का हलवा , मुली के पराठे , एक पियानो  व पियानो गीत तसेच करवा चौथचा एक  प्रसंग असे समीकरणच असायचे. यातील करवा चौथ या सणाविषयी थोडेसे...

हिंदू संस्कृती म्हणजे नाना प्रकारचे उत्सव, सण , व्रत वैकल्ये साजरी करणारी संस्कृती. झाडे , पशू , पक्षी , जल पूजन करणारी व पंचमहाभूतांप्रती आदर बाळगणारी जगातील एकमेव अशी संस्कृती , एक विचारधारा. भारताच्या सर्वा दिशांत निरनिराळे सण साजरे केले जातात, असाच एक  सण म्हणजे करवा चौथ. कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला साजरा केला जातो. भारताचा उत्तर भागात व पश्चिम भागात हा  सण साजरा केला जातो. करवा चौथ हा हिंदूंचा एक प्रमुख सण आहे. भारताच्या  जम्मू कश्मीर , हिमाचल प्रदेश, पंजाब , उत्तर प्रदेश , हरियाणा , मध्यप्रदेश व राजस्थान या राज्यांत मुख्यत: हा सण साजरा केला जातो. करवा चौथ या सणाची माहिती देशभरातील जनतेला ठाऊक झाली ती मुख्यत्वे 80 च्या दशका पर्यन्त आलेल्या हिंदी चित्रपटातून. माझ्याप्रमाणेच अनेकांना करवा चौथ हा सण चित्रपटांनीच लक्षात आणून दिला आहे. पत्नी आपल्या पतीसाठी चाळणीतून चंद्राकडे पाहते एवढीच काय ती करवा चौथ या सणाबाबतची माहिती. चित्रपटातील नटी आपल्या पतीला "आज मैने तुम्हारे लिये  करवा चौथ का व्रत रखा  है | असे म्हणत असते नट मात्र कुठेतरी नशेत किंवा इतर कुणाच्या प्रेमात पडलेला असा असतो , थिएटर मध्ये लेडीज स्टॉल मध्ये अश्रूंच्या धारा लागतात , चित्रपटात मग नट पुन्हा नटीला भेटतो व मग नंतर सर्व सुरळीत होते  थिएटर मध्ये सुद्धा हास्य फुलते असा मेलोड्रामा अनेक हिन्दी चित्रपटातून पाहिला व करवा चौथ ची माहिती झाली. पुर्वीचे हिन्दी चित्रपट म्हटले की  गाजर का हलवा , मुली के पराठे , एक पियानो  व पियानो गीत व एक करवा चौथ प्रसंग असे समीकरणच असायचे. असो ! परंतू पुढे करवा चौथ या सणाची माहिती झाली. हा सण ग्रामीण तथा शहरी स्त्रिया मोठ्या उत्साहाने साजरा करतात (आज काल इंस्टाग्राम , फेसबुक , व्हाट्स अप यावर फोटो शेअर करण्यासाठी म्हणून जरा जास्तच उत्साह असतो) शास्त्रानुसार करवा चौथ हे व्रत कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला करायचे असते. पतिच्या दीर्घायु ष्यासाठी व अखण्ड सौभाग्यासाठी म्हणून या दिवशी भालचन्द्र गणेशाचे पूजन केले जाते.  संकष्टी चतुर्थी प्रमाणे उपवास ठेऊन रात्री चंद्राला अर्घ्य दिल्यानंतर मग भोजन करायचे असते. प्रत्येक घरी त्या-त्या घरच्या रिती रिवाजानुसार महिला हा सण साजरा करतात. स्त्रिया चन्द्रोदयापर्यन्त उपवास ठेवतात. कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला कारक चतुर्थी असे म्हणतात तसेच करवा म्हणजे मातीचे पसरट भांडे व भांड्यांची सुद्धा पुजा केली जाते.  स्त्रिया या भांड्यांची आदान प्रदान सुद्धा करतात  त्यावरून करवा-चौथ हा शब्द रूढ झाला. या दिवसाची एक  कथा सुद्धा सांगितली जाते. एकदा एका स्त्रीने आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी चंद्रोदया पर्यन्त उपवास ठेवला ,काहीही खाल्ले नाही तेंव्हा तिच्या भावांना तिची चिंता वाटली तेंव्हा भावांनी एक युक्ती केली पिंपळाच्या झाडावर चाळणी व दिवा घेऊन चढले व दिव्याचा प्रकाश चाळणीतून बहिणीला दाखवला खाली असलेल्या भावानी बहिणीला आवाज दिला व तो प्रकाश दाखवून चंद्रोदय झाला असे सांगितले तिने भोजन केले. भोजन झाल्यावर तिचा पती मरण पावला. राणीने तिला तू  व्रत तोडले म्हणून पती मरण पावला असे सांगितले व पुन्हा वर्षभर हे व्रत पालन कर असे सांगितले. तिने तसे केल्यावर तिचा पती जिवीत झाला म्हणून हिंदू महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हा सण साजरा करीत असतात. हा सण केवळ विवाहित स्त्रियाच साजरा करीत असतात. कोणत्याही जाती, वर्ण, संप्रदायातील स्त्रीला हा दिन साजरा करण्याचा अधिकार आहे. 12 किंवा 16 वर्षांनंतर या व्रताचे उद्यापन केले जाते किंवा ज्या स्त्रियांना आजीवन हे व्रत करण्याची इच्छा असेल तर त्यांना तशी अनुमती आहे. सध्या अनेक दिवस साजरे केले जातात त्यानुसार आजकाल करवा चौथ या दिवसाला  पती दिवस असे संबोधले  जाते.  महाराष्ट्रातील अनेक हिन्दी भाषिक हिंदू महिला गेल्या कित्येक वर्षांपासून हा सण उत्साहाने  साजरा करत असतात. महाराष्ट्रातील मराठी भाषिक जनतेला या सणाची माहिती मात्र अल्पशीच आहे त्यासाठीच हा लेख. करवा चौथची ही "साठा उत्तरी कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण"॰

 ✍️विनय वि.वरणगांवकर©



०४/१०/२०२२

Article about Ram Madhav ji on the occasion of Vijayadashmi and his Khamgaon city visit.

राम माधव यांचे व्याख्यान; 

खामगांवकरांनो वैचारीक सोने लुटा


राम माधवजी यांच्या सारख्या नामांकित, प्रभावी वक्त्याच्या, राष्ट्रीय व आंतर्राष्ट्रीय स्तरावर कार्य करणा-या नेत्याच्या
 सभेला सुज्ञ खामगांवकर जनतेने सहपरिवार उपस्थित राहावे व यंदाच्या  विजयादशमीचे वैचारीक सोने लुटावे.

        राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सहा उत्सवांपैकी विजयादशमी उत्सवास विशेष महत्व आहे. संघ हा उत्सव देशभर साजरा करत असतो. देशात अनेक ठिकाणी या अनुषंगाने देशहित, देशाच्या समस्या, देशकार्य याबाबत लाखो वक्त्यांची बौद्धिके होत असतात. सरसंघचालकांच्या बौद्धिकाकडे तर जनता, माध्यमे व संपूर्ण जगाचे लक्ष केन्द्रित झालेले असते. यंदा विजयादशमी उत्सवाच्या अनुषंगाने आपल्या खामगांव नगरीत 8 ऑक्टोबर रोजी नॅशनल हायस्कूलच्या मैदानावर राम माधवजी प्रमुख वक्ते म्हणून येणार असल्याचे वृत्त काही दिवस आधी स्थानिक वृत्तपत्रात झळकले होते. 

        राम माधवजी म्हणजे एक वैचारिक क्षेत्रातील  मोठे मानले जाणारे नांव. बालपणीच संघ संस्कार रुजलेले, अनेक वर्षे पत्रकारितेत घालवलेले असे ते नेते आहेत. "भारतीय प्रज्ञा" या मासिकाचे ते संपादक आहे,  त्यांनी अनेक पुस्तकांचे इंग्रजी व तेलगु भाषेत लेखन सुद्धा केले आहे."पार्टिशंड फ्रिडम, "अनइजी नेबर्स  इंडिया अँँड चायना आफ्टर 50 इअर्स ऑफ वॉर " सारखी त्यांची ग्रंथसंपदा आहे.  2003 ते 2014 या काळात ते संघाचे प्रवक्ते होते तदनंतर भाजपा सरचिटणीस व आता पुन्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या केंद्रीय कार्यकारणीत ते आहे. भाजपा सरचिटणीस पदाच्या कार्यकाळात (2014 ते 2020) त्यांनी काश्मीर मध्ये राजकीय स्थिती हाताळली तर  उत्तर पुर्व भारतात पक्ष विस्तार केला. 1981 पासून ते संघाचे पुर्णवेळ स्वयंसेवक आहे. 370 कलम हटविण्यापुर्वी ते काश्मीरला प्रभारी होते. "इंडीया फाऊंडेशन" म्हणून नवी दिल्ली येथे असणा-या राजकारण, देश विकास आदी बाबत कार्य करणा-या "थिंक टँक" म्हणून ओळखल्या जाणा-या संस्थेचे ते संस्थापक सदस्य आहे. तसेच "व्हिजन इंडीया फाऊंडेशन" या युवकांमधून सामाजीक क्षेत्रात नवीन नेतृत्व निर्माण करणा-या संस्थेचे ते पालक म्हणून काम पाहतात, भारताच्या विदेश नीती मध्ये सुद्धा त्यांची भूमिका असते. कॅॅनडा , चीन , थायलंड  व इतर अनेक  देशांत ते विविध शांतीपूर्ण चर्चांसाठी गेलेले आहे. राम माधवजी यांचा  जन्म 22 ऑगस्ट 1964 रोजी आंध्र प्रदेशात झाला. त्यांनी इलेक्ट्रिक इंजिनिअरिंगची पदविका व राजशास्त्राची पदव्युत्तर पदवी असे त्यांचे शिक्षण झाले आहे.

        राम माधवजी यांचा असा मोठा परीचय आहे. आपल्या खामगांव  नगरीचे भाग्य असे की स्वातंत्र्यपुर्व व स्वातंत्र्योत्तर काळात इथे अनेक मोठ-मोठे नेते व अमोघ वक्तृत्व शैली असलेले वक्ते येऊन गेले आहेत. खामगांवकर जनतेने नेहमीच अशा वक्त्यांच्या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहून दाद , प्रतिसाद दिला आहे व त्यांच्या अमुल्य विचारांचा ठेवा जतन केला आहे.  टिळक स्मारक मंदिर , विदर्भ साहित्य संघ यांसारख्या खामगांवातील अनेक संस्थांनी अनेक वक्त्यांना आमंत्रित केलेले आहे. येथील नामांकित महाविद्यालयांच्या स्नेहसंमेलनात सुद्धा अनेक नामांकित वक्ते येऊन गेले आहेत. असेच आता  राम माधवजी सुद्धा आता येत आहे. राम माधव हे स्वातंत्र्योत्तर काळात जन्मलेले असून त्यांनी आपली पत्रकारीता व लिखाण तसेच आपल्या वैचारीक भूमिकेने सर्वदूर आपली छाप पाडली आहे. दिनांक 8 ऑक्टोबर 2022 रोजी त्यांची खामगांव येथील नॅॅशनल हायस्कूलच्या मैदानावर सायं 6 वा 15 मि. सभा संपन्न होणार आहे. राम माधव हे जेष्ठ व विविध ठिकाणी कार्य केलेले असल्याने त्यांचा व्यापक दृष्टीकोन आहे त्यांचे विचार ऐकणे म्हणजे एक पर्वणीच ठरेल. अध्यात्मिक उन्नतीसाठी श्रवण, मनन, निधीध्यासन जसे महत्वाचे आहेत त्याचप्रमाणे लौकिक जगात , प्रपंचात सुद्धा श्रवणाला महत्व आहेच. त्यामुळे खामगांवकर जनता व विशेष करून युवक वर्गाने ही संधी सोडू नये व त्यांचे व्याख्यान जरूर ऐकावे.  तसेच या निमित्ताने एक स्मरण होते एकदा खामगांव येथे बाबासाहेब पुरंदरे व्याख्यानासाठी आले असता उपस्थित श्रोत्यांना उद्देशून म्हणाले होते की , " थोर पुरुषांचा इतिहास ऐकण्यासाठी आलेली ही खामगांवकर जनता म्हणजे खामगांव शहराचे भूषणच आहे" अशी त्यांनी खामगांवकर जनतेची स्तुती केली होती. राम माधव यांच्या सारख्या नामांकित, प्रभावी वक्त्याच्या सभेला सुद्धा सुज्ञ खामगांवकर जनतेने सहपरिवार उपस्थित राहावे व  यंदाच्या  विजयादशमीचे वैचारीक सोने लुटावे. बाबासाहेब पुरंदरे यांनी ज्या खामगांवकर जनतेची तारीफ केली होती ते खामगांवकर नागरीक व युवा राम माधव यांच्या विचारांचे सोने लुटायला नक्की येतील अशी खात्री आहे. सर्वांना विजया दशमीच्या हार्दिक शुभेच्छा ! 

✍️विनय वि.वरणगांवकर ©

०३/१०/२०२२

Article about renowned , beautiful bollywood actress of 1960s, 70s Asha Paresh

 ... मुझसा कोई कहाँ ?

आशा पारेख तेंव्हा आणि आता

...हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक जोड्या गाजल्या परंतु आशा पारेख या अभिनेत्री बाबत असे म्हणता येईल की कोणत्याही नटासोबत त्यांची जोडी जमून दिसत असे...

   सुप्रसिद्ध अभिनेत्री आशा पारेख यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आणि परवा त्यांना तो पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांना पुरस्कार जाहीर झाल्याचे कळतात सर्वप्रथम त्यांच्याच गाण्याची ओळ आठवली. जिद्दी चित्रपटात आशा पारेख यांच्यावर चित्रित झालेले एक गाणे आहे "रात का समा झुमे चंद्रमा" या गाण्यांमध्ये अभिनेता नायक जॉय मुखर्जीला उद्देशूूून आशा पारेख म्हणतात "तेरी तरह जा रे जा बहुत देखे मुझसा कोई कहाँ".  तशा तर त्या काळात अनेक सुंदर व अभिनय संपन्न अशा अभिनेत्री होत्या परंतू आशा पारेख यांच्यात काहीतरी वेगळेपण निश्चितच होते व म्हणूनच त्यांना त्यांच्याच गाण्यातील मुझसा कोई कहा ही ओळ लागू पडते. खरे तर आशा पारेख यांंनी अभिनेत्री म्हणून 60 च्या दशकात रुपेरी दुनियेत पदार्पण केले, म्हणजे आमच्या पिढीच्या कित्येक वर्षे आधीच्या त्या अभिनेेत्री. पण 30/35 वर्षांपूर्वी दूरदर्शनवर जुने चित्रपट मोठ्या प्रमाणावर दाखवत असत, तसेेेच टॉकीजमध्ये सुद्धा पुन: प्रदर्शीत होत असत. शिवाय गणेश उत्सव असला की गल्लोगल्ली व्ही. सी. आर. (व्हीडिओ कॅसेट रेकॉर्डडर) आणून सिनेमा दाखवण्याचा कार्यक्रम होत असे त्यामुळे अनेक जुन्या कलाकारांची ओळख झाली त्यातीलच एक आशा पारेख. ही ओळख झाली ती एन.सी.सी.च्या कॅम्पमध्ये. त्या काळात एन.सी.सी.च्या कॅम्प मध्ये कॅडेट्सला मनोरंजन व्हावे म्हणून सिनेमा दाखवत असत. आम्ही जेव्हा कॅम्पला गेलो होतो तेव्हा आया सावन झुमके हा सुमधुर गीतांचा, ही मॅन हिरो धर्मेंद्र सोबतचा आशा पारेख यांचा चित्रपट दाखवला होता. हा सिनेमा व त्यासोबतच आशा पारेख सुद्धा लक्षात राहून गेल्या. पुढे असेच जब प्यार किसी से होता है, आये दिन बहार के, तिसरी मंजिल, आन मिलो सजना, कटी पतंग, दो बदन, कन्यादान (त्यावेळी मिटकरी असते तर त्यांनी कन्यादान या चित्रपटावर आक्षेप घेतला असता, असो !) आशा पारेख यांचे असे अनेक चित्रपट पाहण्यात आले. धर्मेंद्र सोबतचा शिकार हा सुद्धा एक लक्षात राहिलेला चित्रपट आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक जोड्या गाजल्या परंतु आशा पारेख या अभिनेत्री बाबत असे म्हणता येईल की कोणत्याही नटासोबत त्यांची जोडी जमून दिसत असे. आशा पारेख यांच्यावर चित्रित झालेली गीते सुद्धा खूप लोकप्रिय झालेली आहेत. जब चली थंडी हवा जब उठी काली घटा मुझको ये जाने वफा तुम याद आये, अच्छा तो हम चलते है, ओ हसीना जुल्फोवाली, कितना प्यारा वादा, आजा पिया तोहे प्यार दु, जिया हो जिया कुछ बोल दो, महल चित्रपटातील देवानंद सोबतचे आंखो आंखोमे हम तुम हो गये दिवाने अशी अशी कितीतरी हिट गाणी त्यांच्यावर चित्रित झालेली आहेत जी आजही ऐकली जातात. 80 च्या दशका नंतर आशा पारेख या चित्रपटातून दिसणे बंद झाले. कालिया चित्रपटात त्यांनी अमिताभ बच्चनच्या वहिनीची भूमिका केली होती आणि त्यानंतर त्या बॉलीवूड पासून दुरावल्या. अनेक अभिनेत्यांना जशी चरित्र भूमिका करण्याची संधी मिळते तशा दमदार भूमिका आशा पारेख यांना मात्र मिळाल्या नाहीत आणि त्या बॉलीवूड पासून दूर झाल्या. 90 च्या दशकात त्यांनी काही मालिकांची निर्मिती केली होती. त्यांना पद्मश्री पुरस्काराने सुद्धा सन्मानित केले गेले आहे व फिल्मफेअरचा जीवन गौरव पुरस्कार सुद्धा त्यांना मिळाला आहे. दमदार अभिनयाच्या भूमिका आशा पारेख यांना काही फार मिळाल्या नाही. त्यांचे सिनेमे म्हणजे नटीला शोभेची बाहुली सारख्या भूमिका असलेले होते पण तरीही कटी पतंग, मेरे सनम, दो बदन, मै तुलसी तेरे आंगन की, सारख्या चित्रपटातून आशा पारेख यांचा सुंदर अभिनय रसिकांना पाहायला मिळाला आहे. त्यांच्या बद्दल आणखी एक उल्लेख आवर्जून करावासा वाटतो की त्यांचे कुणाशी अफेअर असल्याचे कधीही ऐकिवात, वाचनात आले नाही किंवा ताशा वावड्याही कधी उठल्या नाही.अविवाहित आशा पारेख या जरी आता चित्रपटातून दिसत नसल्या तरी त्या अनेक चित्रपट रसिकांच्या स्मृतीत मात्र आहे व कायम राहतील. आशा पारेख यांची अभिनय क्षेत्र , सेन्सॉर बोर्ड, दूरदर्शन आदीतील कामगिरी पाहून केंद्र सरकारने त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित केले आहे त्यांंना शुभेच्छा व त्या सिने पडद्यावर पुनश्च दिसोत हि "आशा"

✍️विनय वि.वरणगांवकर ©

२९/०९/२०२२

Article about Chagan Bhujbal Statement on Goddess Saraswati

भ्रष्ट नेत्यांचे फोटो सुद्धा कुठे झळकू नयेत.

देवी देवतांचे फोटो हटवण्याची मागणी जर रास्त समजली असेेे गृहीत धरले तर त्या अनुषंगाने जनतेने सुद्धा आता एक मागणी लावून धरायला हवी. ती मागणी म्हणजे भ्रष्ट राजकीय नेते, तुरुंगाची हवा खाऊन आलेले, जमानतीवर असलेले नेते यांचे फोटो हटवण्याची.

 परवा यशवंतराव चव्हाण सभागृह , मुंबई येथे छगन भुजबळ यांनी विद्येची आराध्य देवता म्हणून अनादी अनंत काळापासून मान्यता असलेल्या व भारत तसे अन्य अनेक देशात पूजल्या जाणा-या सरस्वती देवीचे फोटो शाळांतून काढून टाकावे असे विधान केले. कोणाला काय वाटेल ते आपल्या देशात बोलण्याचे स्वातंत्र्य आहे आणि या स्वातंत्र्याचा  पुरेपूर फायदा अनेक लोक उचलत असतात. राजकीय नेते याच स्वातंत्र्याचा उपयोग करून आपल्या मतपेढ्या राखत असतात व जनतेत दुही पसरवत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेतून पुरस्कार केलेल्या समानतेची पायमल्ली करत असतात.  हिंदूच्या देवी, देवता , धार्मिक चाली रिती , पूजा पद्धती यांवर  तर अनेक राजकीय नेते सतत आघात करीत असतात. हे करतांना सुनियोजित पद्धतीने ते इतर धर्मियांना खुश करून आपल्याकडे सत्ता कशी टिकून राहील , आपले राजकीय अस्तित्त्व कसे टिकून राहील याची सोय ते करीत असतात.  भुजबळांनी सरस्वती मातेचा  फोटो हटवण्याचे विधान करतांना तीन टक्के लोकांना सरस्वती मातेने शिकवले असल्याची शक्यता असल्याचे विधान करून कोणता समाज त्यांना खुपतो हे स्पष्ट केले व सभागृहात उपस्थितांच्या मनात हेतुपुरस्सररीतीने दुही पेरण्याचे काम केले. भुजबळ ज्या तीन टक्के समाजाचा उल्लेख करतात त्या समाजाच्या किती शैक्षणिक संस्था आहेत किती इंजिनिअरिंग व मेडिकल कॉलेजेेस आहेत, हे सुद्धा त्यांनी सांगावे राजकीय नेते एका पक्षातून दुसऱ्या पक्षात कोलांटया उड्या मारतात राजकीय प्रभावाने शिक्षण सम्राट बनतात व  जाती-जातीत तेढ पसरवण्याचे कार्य करतात. हिंदू समाजातील देवी देवता , वृक्ष पूजा , जल पूजा  हयांंत अनेक प्रतिकांची सुद्धा पूजा होत असते. निसर्गाप्रती सन्मान, सर्व समाजातील लोकांना रोजगार मिळावा अशा पद्धतीच्या या पूजा विधी आहेत. परंतू हिंदू समाजाला कसे फोडता येईल याकडेच कित्येक राजकीय नेत्यांचे लक्ष लागलेले असते. ज्या सावित्रीबाई फुले यांनी "काव्यफुले" या आपल्या कवितासंग्रहातील कवितेत शाळेला "सरस्वतीचा दरबार" असे संबोधले आहे त्याच सरस्वतीचे फोटो आपण हटवण्याची विनाकारण मागणी करता ? देवी देवतांचे फोटो महाराष्ट्रातील शाळांतून तुम्ही काढायची मागणी करता , ते काढले तरी अवघे जग व भारतातील इतर राज्ये येथील सरस्वतीचे फोटो व मुर्त्या तुम्हाला हटवणे शक्य आहे का ? तुम्हाला सरस्वती माता इतकीच जर का खुपत असेल तर ज्या इंडोनेशिया मध्ये तुमची 30 कोटींची कोळशाची खाण असल्याचे बोलले जाते त्या देशाला तुम्ही अमेरिकेत असलेल्या त्यांच्या दूतावासातील सरस्वतीची मूर्ती हटवण्याची मागणी नेटाने कराल का ?  तुमची देवी देवतांचे फोटो हटवण्याची मागणी जर रास्त समजली असेेे गृहीत धरले तर त्या अनुषंगाने जनतेने सुद्धा भ्रष्ट राजकीय नेते, तुरुंगाची हवा खाऊन आलेले, जमानतीवर असलेले नेते यांचे फोटो सुद्धा हटवायला हवेत देवी देवतांचे फोटो हटवण्याची मागणी जर रास्त समजली असेेे गृहीत धरले तर त्या अनुषंगाने जनतेने सुद्धा आता एक मागणी लावून धरायला हवी. ती मागणी म्हणजे भ्रष्ट राजकीय नेते, तुरुंगाची हवा खाऊन आलेले, जमानतीवर असलेले नेते यांचे फोटो हटवण्याची. या अशा लोकांचे फोटो दिवस निघताच माध्यमांवर, वृत्तवाहिन्यांवर, मोठमोठ्या होर्डिंग वर झळकत असतात. अशा भ्रष्ट नेत्यांचे हे फोटो पाहून सजा झालेल्या व सजा भोगत असलेल्या नेत्यांचा होणारा मान पाहून देशातील तमाम विद्यार्थी, बालक, युवक यांच्या मनावर काय परिणाम होत असेल? त्यांना तर वाटत असेल की दुष्कृत्ये करुनही जर फोटो झळकत असतील तर ते त्यांनी सुद्धा करायला काय हरकत आहे ? ही बाब तमाम सुज्ञ बुद्धिवाद्यांनी, विचारवंतांनी, जनतेनी लक्षात घ्यायला हवी. देवी देवतांनी तरी आदर्श प्रस्थापित केले आहेत किंवा तुम्ही जर त्यांना मानत नसाल तर देवी देवतांच्या आदर्शांच्या कथा सर्वश्रुत आहेत आहे असे म्हणू पण भ्रष्ट नेत्यांचेेे कोणते आदर्श आहेत?    देवी देवतांचे नाना आदर्श , त्यांनी घालून दिलेले आदर्श यांना समाजमान्यता आहे असे असूनही त्यांचे फोटो हटवण्याची मागणी होते तर मग देशातील जनतेने भ्रष्ट नेत्यांचे फोटो सुद्धा हटवण्याची मागणी आता लावून धरायला नको का?

✍️विनय वि.वरणगांवकर ©

२४/०९/२०२२

G S College, Khamgaon Celebrating 75 years (Platinum Jubilee), article about memories of G.S.College

"जी.एस." एक यादों की बारात

खरे तर यादों की बारात हे एका जुन्या गाजलेल्या चित्रपटाचे शीर्षक, या लेखाला हे शीर्षक देतांना  एखाद्या लग्नाच्या वरातीप्रमाणे आठवणींची प्रचंड गर्दी मनात झाली होती व म्हणून यादों की बारात चे स्मरण झाले व तेच शीर्षक या लेखाला द्यावेसे वाटले. ही आठवणींची गर्दी होण्याचे कारण म्हणजे त्या दिवशी व्हॉट्स अ‍ॅप वर आलेला कॉलेजने 75 वर्षे पुर्ण केल्याबद्दल आयोजित केलेल्या माजी विद्यार्थी मेळाव्याचा एक संदेश. संदेशात जुन्या विद्यार्थ्यांना नोंदणी करण्याचे आवाहन केले होते तसेच माजी विद्यार्थ्यांकडून महाविद्यालयीन जीवनातील त्यांच्या आठवणींबाबत लेख आमंत्रित केले होते. हा संदेश मी वाचला आणि माझ्या काही मित्रांना पुढे पाठवला. रात्री बिछान्यावर पडल्यावर मला त्या संदेशाची आठवण आली व टाईम मशीन प्रमाणे मी गतकाळात जाऊ लागलो. जी. एस. मधील अनेक किस्से मला स्मरू लागले. मला आठवले मी एस.एस.सी उत्तीर्ण झालो आजच्या पिढीसारखा शैक्षणिक awareness त्यावेळी नव्हता. त्यामुळे मित्रांनी म्हटले ,”अरे आपण जी.एस मध्ये प्रवेश घेऊ” मग काय “जिधर दोस्त उधर अपन”. या वयात दोस्ती म्हणजे सबकुछ असते. मग काय घेतला प्रवेश जी.एस. अर्थात गोविंदराम सक्सेरीया कॉलेज या बुलढाणा जिल्ह्यातील नावाजलेल्या महाविद्यालयात. गो.से. महाविद्यालय हे त्या काळापासून ते आजतायागत विदर्भात प्रसिद्ध असलेले असे कॉलेज आहे. विद्यार्थी वर्ग मात्र कॉलेजच्या लघु नावाचाच अधिक वापर करतो ते म्हणजे जी. एस. तसे तर माझे वडील , काका, जेष्ठ बंधू भगिनी यांच्याकडून मी लहानपणापासून जी.एस. बद्दल ऐकत आलो होतो. कारण आमच्या घरची सर्व जेष्ठ मंडळी ही जी. एस. मध्येच शिकलेली. आई, काकू या मात्र अपवाद कारण त्या त्यांच्या माहेरी शिकलेल्या. घरातील जेष्ठ मंडळी ही जी. एस चे विद्यार्थी असल्याने 1960, 70,80 च्या दशकातील जी. एस. मध्ये घडलेल्या अनेक घटना , तेथील प्राध्यापक , वसतीगृह , बटालियन , एन.सी.सी. आदींबाबत मी बाल्यावस्थेपासूनच ऐकत आलो होतो. त्यामुळे जी. एस कॉलेज म्हणजे भव्य-दिव्य असे वाटत असे, तसे ते आहे सुद्धा. येथील प्राणीशास्त्र विभागाच्या त्या भल्या मोठ्या खिडक्या याची साक्ष देतात. त्यामुळे इथेच शिक्षण घ्यावे असे कुठेतरी मनात पक्के बसून गेले होते त्यामुळे “जी एस मध्ये प्रवेश घेऊ” मित्राच्या तेंव्हाच्या त्या हाकेला त्वरीत होकार भरला होता. जी. एस. बद्दलच्या आठवणी लिहू गेल्यास अनेक आठवणी होतील त्यामुळे हा लेख प्रदीर्घ होण्याची शक्यता मला वाटत आहे. कारण यात आमच्या बॅचच्याही कितीतरी वर्षे आधी इथेच शिकलेल्या माझ्या वडीलधारी व जेष्ठ बंधू भगिनी या मंडळींकडून सांगितल्या गेलेल्या सर्वच नाही परंतू काही आठवणींचा सुद्धा समावेश या लेखात केला आहे किंबहुना तो केल्यावाचून राहवले नाही. 

Ex student and NCC Cadet of    G. S. College

        1960 च्या  दशकात आमचे तिर्थरूप जी.एस. चे विद्यार्थी होते. "एन. सी. सी. शिबीरादी असले  की आम्ही खिशात पु-या घेऊन जात असू, त्या काळात आजच्यासारखे पॅकिंग पदार्थ थोडी मिळत होते, मग परेड करता करता पु-या खात असू. एक मेजर माने म्हणून एन.सी.सी. अधिकारी होते, जितेंद्रचा फर्ज हा बॉण्डपट गाजला होता त्यातील "चाहे तू माने चाहे ना माने " हे गीत सुद्धा गाजले होते, यातील माने हा हिंदीतील शब्द मराठी माने अडनावाशी साधर्म्य साधत असल्याने मेजर माने यांना "चाहे तू माने चाहे ना माने" या गाण्याच्या चालीत "कॅप्टन माने, मेजर माने"  असे चिडवणे , इतिहासातील अनंगपाळाच्या हत्ती विषयी शिकल्यावर एकाजाडजूड सहपाठीस अनंगपाळाचा हत्ती असे चिडवणे", आमच्या स्नेहसंम्मेलनाच्या वेळेस पृथ्वीराज कपूर या अभिनेत्यास बोलावले होते.(आजच्या पिढिसाठी एक अनावश्यक परंतु द्यावासा वाटला असा Extra Shot पृथ्वीराज कपूर म्हणजे आताच्या रणवीर कपूर या नायकाचे पणजोबा)"  अशा कितीतरी आठवणी त्यांच्या कडून ऐकल्या आहेत.

तद्नंतर 70, 80 च्या दशकातील जेष्ठ बंधू व भगिनी यांच्या सुद्धा अनेक आठवणी आहेत. त्यातली एक ठळक म्हणजे 80 च्या दशकाच्या अखेरीस स्नेहसंमेलनास मुकेश खन्ना (महाभारत मालिकेत भीष्माची व शक्तिमान मध्ये शीर्षक भूमिका साकारणारा कलाकार) आला होता त्याच्या समोर कॉलेज मधील दोन गटात भांडणे झाली होती त्यावर तुमने तो मेरे सामने महाभारत शुरू कर दीअसे उद्गार त्यांनी काढले होते व भांडणे थांबली होती. पुर्वी सायकलने कॉलेजात येणारी मुले आता 80 च्या दशकात वाहनांनी येण्यास सुरुवात झाली होती , यातील काही बहाद्दर कॉलेजच्या व्हरांड्यातून स्कूटर चालवत असत. अशा कित्येक जुन्या आठवणी आहेत.   

आम्ही 90 च्या दशकात इथे शिकलो या दशकापर्यन्त खामगांवात मुले-मुली यांच्यात फार काही संभाषण किंवा मैत्री वगैरे हा प्रकार नव्हता परंतू त्यातही एक वेगळा गोडवा होता. कॉलेजच्या मैदानात एन.सी.सी. परेड होत असे एरवी कशीही परेड करणारी मुले, मुली व्हरांड्यात बसलेल्या असल्या की एकदम तालेवार चालत. ऑफिसर, अंडर ऑफिसर यांना “पैर उठाके मारो , एडी पे चलो “ अशा ऑर्डर देण्याचे काम पडत नसे. एन.सी.सी. च्या ड्रेसमध्ये कॉलेजात आले की आपली एक वेगळीच छाप पडते आहे असे या कॅडेटसला मनोमन वाटे. देसाई सर , सिंग सर यांच्या तासिकेच्या वेळी पुर्ण वर्ग भरलेला असे. इंग्रजीवर प्रभुत्व असलेले देसाई सर इंग्रजीतील एखादा कठीण शब्द सांगत व त्याचा अर्थ शोधून आणण्यास सांगत ते इंग्रजी अत्युत्कृष्ट शिकवतत्यांना पाश्चात्य शैली आवडत असे. सिंग सरांच्या तासिकेला तत्वज्ञानावर खूप छान चर्चा होत असे. "जिथे धूर आहे तिथे अग्नि आहे" असे सरांनी शिकवल्यावर मागे कुजबूज सुरू झाली , “काय आहे रे “ सर म्हणाले “सर मोटर सायकल मधून धूर येतो पण आग तर नसते“ अशी कोटी एका मुलाने केली वर्गात हशा पिकला सरांनी त्यावर मोटर सायकल मध्ये अग्नी कसा सुप्तरित्या दडलेला असतो हे सांगितले होते. 

जी. एस. मधील आठवणींबाबत लिहू जाता लेखन मर्यादेचे भान वेळोवेळी ठेवावे लागत आहे. इतक्या आठवणी की जणू यादो की बारातच. त्यात आम्ही म्हणजे सर्वच ठिकाणी स्पोर्ट ,एन.सी.सी., युथ फेस्टिव्हल , स्नेह संमेलन सा-याच इंव्हेंट मध्ये जात असू. कनिष्ठ महाविद्यालयातील आमची हँडबॉलची चमू म्हणजे राज्यस्तरावर जाणारी आजतायागतची एकमेव चमू , ध्यानचंदप्रमाणे आम्ही सुद्धा विना बुटाने सराव करायचो साहित्याची उपलब्धता कमी व घरून सुद्धा पैसे बेताचेच मिळत. पण कॉलेज झाल्यावर नोकरी चे दडपण येऊ लागल्यावर खेळही मागे पडला अन खेळात ध्यानचंदसारखे पुढे जाणेही. एन.सी.सी.च्या शिबीरात आमच्यापैकी काही मुले मांसाहारी होती ती मुले जाणून किचनकडे स्वत:ची डयुटी लाऊन घेत कारण काय? तर रात्री तिथे खायला उरलेले मटन व रस्सा प्यायला मिळायचा. हे गुपित आम्हाला उशिरा कळले अर्थात आम्हाला त्याचा उपयोगही नव्हता म्हणा. आमचा एक मुस्लिम मित्र लालबुंद गोरापान होता. तो एन. सी. सी. ड्रेस मध्ये पक्का "विलायती बाबू" दिसत असे धनंजय टाले या मित्राने त्यास "ब्रिटिश सोल्जर" अशी उपाधी दिली होती. त्या काळात पिंपळगांव राजा येथील अनेक मुस्लिम मुले आमच्या सोबत जी. एस. मध्ये होती. त्यातील रहबर, अशफाक, शेख शब्बीर, सलीम बेग आदी मुस्लिम मुलांशी आमची चांगली मैत्री जडली होती. आजही क्वचित काही भेटतात. जी.एस. ला जिल्हाभरातून मुले शिकायला येतात त्यामुळे जळगांव जामोद, नांदुरा, शेगांव, वरवट बकाल व इतर काही गांवे येथील मुलांशी मैत्री झाली व ती आजही टिकून आहे. नवीन आलेल्या प्राध्यापकांच्या गमती, नकला, गाणी, अशी खूप धम्माल होत असे. प्राचार्य जावंधीया सरांचा खुप दरारा होता. कित्येक आठवणी आहेत. इथे काही जणांचे जुळले तर काही नेहमीसाठी दुरावले.

अबके हम बिछडे तो शायद कभी ख्वाबोमे मिले 

जिस तरह सुखे हुये फूल किताबोमे मिले 

याप्रमाणे अनेक जण आज दुरावले आहेत परंतू फेसबुक ,व्हॉट्स अ‍ॅप च्या कृपेने अनेक दोस्त पुन्हा भेटलेही आहेत त्यांची reunion सुद्धा होत आहे. विकासाभिमुख संस्था, कार्यकारिणी व प्राचार्य तसेच उच्चविद्याविभूषित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांमुळे आज आमचे जी. एस. कॉलेज खुप प्रगत झाले आहे त्याला  NAAC चे चांगले मानांकन सुद्धा प्राप्त झाले आहे जीम , तरण तलाव आहे , अनेक कोर्सेस आहेत. इथून जे विद्यार्थी शिकून गेले त्यांच्या मनात मात्र येथील आठवणी सदैव तेवत राहतील , शैक्षणिक व महाविद्यालयीन जीवन हे सर्वांना प्रिय असते म्हणून जी. एस. त्यांच्या सदैव स्मरणात राहील. हे विद्यार्थी आपआपल्या क्षेत्रात नांव काढत असतील त्यांना नवीन मित्र सुद्धा मिळाले असतील पण  

गुजरे हुये जमाने दुबारा नही आते, 

आते है नये लोग पुराने नही आते |    

अनेक माजी विद्यार्थी कॉलेजला 75 वर्ष होत आहेत म्हणून मेळाव्यास येतील. देश सुद्धा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहे हा एक योगायोग आहे या मेळाव्याच्या निमित्ताने माझ्यासह अनेक माजी विद्यार्थ्याना येथील अनेक आठवणी येत असतील एक यादो की बारातच जणू आज प्रत्येकाच्या हृदयाच्या व्दारात आली आहे व आजीवन हृदयात राहणार आहे. 

   स्वतंत्रता प्राप्तीच्या पुर्वीच्या लोकांना शिक्षणाप्रति तळमळ होती , शिक्षणाचा दर्जा चांगला होता, नितीमुल्यांना महत्व होते, लोक शाळा कॉलेजसाठी राजीखुषीने करोडोच्या जागा दान देत. त्याच पिढीतील लोकांनी स्थापन केलेल्या आमच्या जी.एस. कॉलेजची वाटचाल अशीच प्रगतीपथावर होत राहो, प्रगतीचे शिखर हे महाविद्यालय गाठो हीच सदिच्छा.

✍️विनय वि.वरणगांवकर ©