०८/०२/२०२४

Article about Maharashtra state condition and gundaisam

महाराष्ट्र कुठे चालला आहे ?



गत काही काळापासून महाराष्ट्रात निव्वळ सत्तेचे डावपेच सुरू आहेत आणि महाराष्ट्राचा कारभार मात्र भगवंताच्याच हवाले केल्या गेलेला दिसतोय.

गतकाळात कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? हे वाक्य खूप गाजले होते. आता सुद्धा महाराष्ट्राची काय गती होते आहे?, महाराष्ट्र कुठे चालला आहे ? याचा विचार जनतेला पडत आहे. जनतेला हा प्रश्न पडावा अशा घटनाच मागील आठवड्यात घडल्या. कुठे गुंडलोक राजकारण्यांना भेटत आहेत , त्यांच्यासोबत फोटो काढत आहेत तर कुठे चक्क पोलीस ठाण्यामध्ये गोळीबार होतो आहे. जशा घटना पूर्वी उत्तरेकडच्या राज्यात घडायच्या तशा घटना आता सुसंस्कृत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात घडत आहेत. भर रस्त्यामध्ये टोळी युद्ध होत आहे, गुंड एकमेकांना मारत आहेत. चोरांचा सुद्धा सुळसुळाट झाला आहे. कालचीच गोष्ट घ्या ना !  काल मुंबई रेल्वे स्थानकावर नवीन उभारलेल्या शौचालयांमधील तसेच रनिंग रूम मधील चांगले, उच्च कोटीचे नळ चोरीला गेले. या सर्व नळांची किंमत जवळपास सव्वा लाखापेक्षाही अधिक आहे. जनतेच्या सोयीसाठी उभारलेल्या या रनिंग रूम व शौचालय मधील नळांची चोरी कशी काय होऊ शकते ? रेल्वे सुरक्षा बल किंवा संबंधित यंत्रणेचे त्याकडे लक्ष आहे की नाही ? चोरांना कायद्याचा काहीच धाक नाही आहे का ? गुंडांना सुद्धा कायद्याचा काहीच धाक नाही का ? असे प्रश्न जनतेच्या मनात निर्माण होत आहेत. परवा नागपूर येथे सुद्धा दुचाकी चोर पकडल्या गेला. या चोराने 111 दुचाक्या एकट्याने चोरल्या, त्यातील काही वरुड येथे सापडल्या आहेत. वरील तसेच इतरही अनेक घटना घडत आहेत की जनता संभ्रमात पडली आहे. या सर्व गोष्टींकडे शासनाने लक्ष द्यायलाच हवे ते त्यांचे कामच आहे. गुन्हेगारांच्या मनात कायदयाचा धाक निर्माण झाला पाहिजे. शासनकर्त्यांनी तसेच शासन चालवणे अपेक्षित आहे त्याकरता त्यांना जनतेने निवडून दिलेले असते याचे भान शासनकर्त्यांना असावेच लागते. गत काही काळापासून महाराष्ट्रात निव्वळ सत्तेचे डावपेच सुरू आहे आणि महाराष्ट्राचा कारभार मात्र भगवंताच्याच हवाले केल्या गेलेला दिसतोय. युतीमध्ये बिघाड झाला त्यात अनेक दिवस खर्ची पडले, नंतर आमदारांच्या अपात्रतेमध्ये भरपूर वेळ खर्ची गेला. खोके सरकार, पूतण्याने काकांना सोडणे यामध्ये पण भरपूर वेळ गेला व या काळात महाराष्ट्राचे जनतेचे, शिक्षकांचे, कर्मचाऱ्यांचे तसेच इतरही अनेक प्रश्न प्रलंबित राहिले याला जबाबदार कोण ? असा प्रश्न पडला आहे. गुंडासह सापडलेल्या फोटोमुळे व गतकाळात घडलेल्या अनेक दुष्कृत्यांमुळे "डॅमेज कंट्रोल" म्हणून काल पोलिसांना गुंडांची परेड घ्यावी लागली. या परेडमुळे सुद्धा काही फायदा होईल की नाही देव जाणे परंतु खलनिग्रहणाय या शब्दानुसार ते खलांचे निग्रहण खरेच कधी होईल की नाही ? ही सर्व गुंडमंडळी राजकारण्यांच्या इतकी संपर्कात कशी काय येते ? यांचे आणि त्यांचे काय लागेबंधे आहेत? मंत्रालयात रील बनवणे,  नेत्यांच्या मांडीला मांडी लावून बसणे हे कशाचे द्योतक आहे ? ज्या शिवरायांचे नाव हे राजकारणी लोक नेहमी घेत असतात पण महाराजांनी तर गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा बीमोड केला होता. सरकारला उपरोक्त सर्व बाबींचा विचार अतिजलद करणे अत्यावश्यक आहे. जनतेसमोर सर्व बाबी स्पष्टपणे आल्या पाहिजे. महाराष्ट्रासारख्या सुसंस्कृत राज्यात या प्रकारे गुंडाराज प्रत्यक्ष दिसत असल्याने जनतेच्या मनात मोठा संभ्रम , अनेक प्रश्न आणि खंत निर्माण झालेली आहे. नेत्यांची भाषा सुद्धा अत्यंत खालच्या दर्जाची झालेली आहे. जरांगे हे अल्पावधीत लोकप्रिय झालेले नेते ज्येष्ठ नेत्यांना अरे कारे करतात हे योग्य आहे का? जनता जेव्हा लोकप्रतिनिधींना निवडून देते तेव्हा त्या लोकप्रतिनिधीने आदर्श राज्य कारभार करावा असे अपेक्षित असते. त्या  लोकप्रतिनिधींची प्रतिमा सुद्धा चांगली असावी असे त्यांना वाटत असते. त्यामुळे समस्त लोकप्रतिनिधींनी याबाबत आत्मचिंतन करावे आणि गुंडांची संगत सोडून महाराष्ट्र राज्य कसे विकासाभिमुख बनेल, प्रगतिशील बनेल, देशात सर्वश्रेष्ठ ठरेल, येथील शेतकऱ्यांच्या आत्महत्या कशा थांबतील ? , येथील मराठी शाळांचा प्रश्न कसा सुटेल ? या सर्व बाबींचा तसेच महाराष्ट्रातील इतरही अनेक प्रश्नांचा सखोल विचार करणे हेच जनतेला अपेक्षित आहे. महाराष्ट्र राज्याकडे समस्त देश हा आशेने पाहत असतो तेव्हा कवींनी वर्णन केल्याप्रमाणे 

"बहु असो सुंदर संपन्न की महान,

प्रिय आमुचा एक महाराष्ट्र देश हा 

असाच तो नेहमी संपन्न व महान राहिला पाहिजे यासाठी लोकप्रतिनिधींनी विचार करायला हवा.

२ टिप्पण्या:

  1. विचार करण्यासारखा लेख आहे

    उत्तर द्याहटवा
  2. Band keliya marale jal hi shikvan shivrayani dili hoti pan aata Band keliya tari sodale jal ase zale pan ha sarva lokshahi cha mis use aahe aani hi pratha padanare pratham purush mhanje Sharad pawar no politics without power and power needs money aur paise bole to ashanti

    उत्तर द्याहटवा