३०/०६/२०२४

Article on Raju.

... अरे राजू रिटायर्ड पण झाला !

समय का पहिया चलता है, दिन ढलता है रात आती है |

यानुसार काळ झपाट्याने पुढे सरकत असतो इतका वेगाने की बऱ्याच वर्षांपूर्वी घडून गेलेल्या घटना सुद्धा अगदी काल-परवा घडून गेल्यासारख्या वाटतात. मी शाळकरी विद्यार्थी असतांना राजू महाविद्यालयीन जीवनात होता. वयाने माझ्यापेक्षा आठ वर्षांनी जेष्ठ. आम्ही सर्वच बहिण भावंडे एकमेकांशी मित्रत्वाने वागत असू, खेळीमेळीने राहत असू.

कई साल हमने गुजारे यंहां 

यंही साथ खेले हुये हम जवान

था बचपन बडा आशिकाना हमारा

आमचे बालपण पण असेच रम्य म्हणून या ओळी आम्हाला पण लागू पडतात.  हायस्कूलमध्ये गेल्यावर राजूने एकदा विज्ञान प्रदर्शनासाठी पाणचक्कीचे युनिट बनवल्याचे मला आठवते. तेव्हाच मला राजू म्हणजे खूप हुशार मुलगा असे वाटू लागले आणि तसा तो आहे सुद्धा. गणितामध्ये एकदम हुशार म्हणून त्याने विज्ञान शाखा निवडली होती. त्याचे हस्ताक्षर एकदम वळणदार. त्याची पेन पकडण्याची लकब सुद्धा एकदम निराळीच. तो चार बोटांनी पेन पकडतो, करंगळीचा सुद्धा आधार असतोच. अशा पद्धतीने पेन पकडून लिहिणारे लोक अगदी विरळच आहेत. राजू एन.सी.सी. मध्ये अंडर ऑफिसर होता. बऱ्याच वेळा मी त्याला बुटाला पॉलिश करतांना, बेल्ट आणि बॅजला ब्रासो लावतांना न्याहाळात बसत असे. एकदा काँग्रेस भवन वरील झेंडावंदनाच्या कार्यक्रमाला तो पायलट (प्रमुख पाहुण्यांना ध्वजारोहण करण्यासाठी घेऊन जाणारे राष्ट्रीय छात्र सेनेचे जवान)  झाला होता आणि मी जूनियर डिव्हिजन मध्ये परेडला होतो. तेव्हा मी माझ्या मित्रांना अभिमानाने सांगितले होते की, "तो बघा तो पायलट झालेला मुलगा आहे ना तो माझा मोठा भाऊ आहे." पुढे पोलीस खात्याचे अधिकारी त्याला ध्वजारोहणासाठी घेऊन जाऊ लागले. आमच्या भावंडांमध्ये ऑफिसर बनवण्याची त्याची एकट्याचीच प्रबळ इच्छा/जिद्द होती आणि तो झाला सुद्धा. Not failure but lower aim is crime ही म्हण मला राजूनेच सांगितल्याचे स्पष्ट स्मरण आहे. तो नेहमी स्पर्धा परीक्षांच्या तयारीत मग्न असे. त्या काळात त्याला इतर नोकऱ्या आवडत नसत. त्याचे इंग्रजीवर पण प्रभुत्व आहे. वृत्तपत्र बातम्या यातील मर्म तो व्यवस्थित समजून घेतो. त्या काळी तो दस्तुर रतनजी ग्रंथालयाचा वाचक सभासद होता. बऱ्याच वेळा तो त्याच्या मित्रांकडे मला त्याच्या लॅम्ब्रेटा स्कूटरवर घेऊन जात असे. त्याच्या स्पर्धा परीक्षेच्या तयारी करण्यामुळे मला सुद्धा स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याची प्रेरणा मिळाली होती. पण कदाचित मी ते कार्य म्हणावे तितके समर्पित होऊन केले नसेल म्हणून दुसरीकडे वळावे लागले. शारीरिक तंदुरुस्तीसाठी आम्ही दोघे रोज सायंकाळी गो.से.महाविद्यालयात धावणे, गोळा फेक यासाठी जात असू. अनेक विषयांवर चर्चा व अनेक बाबी आम्ही एकमेकांशी 'शेअर' करीत असू. तो नागपूर, औरंगाबाद या ठिकाणी स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी जेव्हा जायचा तेव्हा मला मोठे कौतुक वाटायचे तिथे सुद्धा त्याने नाटक वक्तृत्व यांमध्ये भाग घेऊन त्याचा ठसा उमटवला होता. वक्तृत्व गुण तर त्याच्यामध्ये बालपणापासूनच आहे. बालपणी त्याने अनेक भाषण स्पर्धात बक्षिसे प्राप्त केली आहे. राजू सुरुवातीपासूनच टापटीप राहण्याकडे आणि शारीरिक स्वच्छतेकडे लक्ष देत आलेला आहे. हस्त प्रक्षालन आणि मुख प्रक्षालन याचे महत्त्व त्याने बालपणापासूनच जाणले आहे. त्याचे हे गुण व एकूणच व्यक्तिमत्त्व हेरून आमच्या मोठ्या वहिनींचे वडील स्वर्गवासी बाबुराव डांगे हे त्याला तो नोकरीला लागायच्या आधीपासूनच तहसीलदार साहेब म्हणत असत. त्यांचे वचन खरे ठरले, पुढे तो तहसीलदार झालाच. तहसीलदार होण्यापूर्वी तो खामगावला अल्पबचत अधिकारी होता. अल्पबचत अधिकारी असतांना त्याने अनेक लोकांना बचत खात्यांचे एजंट होण्यास प्रेरणा दिली होती. ते लोक आजही मला भेटले की वरणगांवकर साहेबांनी आम्हाला खूप सहकार्य केले आहे असे सांगतात. उदा सौ. चितलांगे आणि श्री झोपे. तो खामगांवला अल्पबचत अधिकारी असतांना बरेचदा अनेक लोक मलाच अल्पबचत अधिकारी समजून माझ्याशी बचत खाते वगैरेची चर्चा करायला सुरुवात करत मग मी त्यांना तो मी नसून माझा भाऊ आहे असे सांगत असे. मग त्या अनोळखी लोकांशी माझा परिचय होऊन गेला व आजही आहे. त्याला खाद्यपदार्थ तेही उत्तम प्रतीचे खाद्यपदार्थ खाण्यात, फळे खाण्यात मोठा रस आहे. त्याच्या आणि माझ्या बऱ्याच आवडीनिवडी मध्ये साम्य आहे. पोहणे आम्हाला दोघांना प्रचंड आवडते. तो नोकरीला लागल्यापासून ज्या-ज्या ठिकाणी त्याने नोकरी केली आहे त्या-त्या सर्व ठिकाणी देवीची प्रख्यात मंदिरे आहेत असे माझे निरीक्षण आहे. मुंबई ते महागाव पर्यंत प्रत्येक ठिकाणी सुप्रसिद्ध अशी देवीची मंदिरे आहेत. यांमुळे त्याच्यावर देवीची कृपा असल्याचे वाटते. तहसीलदार म्हणून त्याची कारकीर्द ज्या ठिकाणी तो होता त्या प्रत्येक गावी गाजली आहे. अनेक ठिकाणी त्याने अवैध रेतीवाल्यांवर कारवाई केल्यामुळे, त्यांचे ट्रॅक्टर स्वतः चालवत आणून जप्त केल्याने, त्यांचा पिच्छा करून त्यांना पकडल्याने त्याला "दबंग तहसीलदार" असे संबोधन प्राप्त झाले. कार्यालयीन शिस्त, कामकाजात शिस्त ठेवण्याचा त्याचा प्रयत्न असे. वेळे प्रसंगी शेरोशायरी करून हास्यविनोद करून तो त्याच्या कर्मचाऱ्यांकडून काम करून घेत असे. त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सुद्धा त्याने व्यवस्थित संबंध ठेवले. वरिष्ठ त्याच्या कामगिरीवर खुश असत. त्याच्या कामकाजाच्या शैलीने जनतेला प्रभावित करून सोडले होते. राजू जेंव्हा अल्पबचत अधिकारी म्हणून नियुक्त झाला होता त्यात सुमारास राजू बन गया जेंटलमॅन  हा सिनेमा प्रदर्शित झाला होता आणि त्या चित्रपटात 

"अपना राजू हिरो है 

और हम सब उसके फॅन 

की राजू बन गया जेंटलमेन" 

असे गाणे होते या योगायोगामुळे जणू सर्व वरणगांवकरांच्या मनातील भावना या गाण्यातून व्यक्त झाली होती. आजकाल सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाचा मोठा समारंभ केला जातो. खानदेशात ही प्रथा फार पूर्वीपासून आहे तिथे तर सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांची मिरवणूक सुद्धा काढतात. म्हणूनच राजूच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाला जाण्याचे कुठेतरी मनात वाटत होते परंतु पारिवारिक अडचण व उन्हाळ्यानंतर शाळेचा पहिलाच दिवस असल्याने ती इच्छा काही पूर्ण झाली नाही. वडील नायब तहसीलदार आणि भाऊ तहसीलदार असल्याने मी महसूल विभागाला जवळून अनुभवले आहे. हल्ली गढूळ झालेल्या या विभागात जनतेची कामे करणारे,  वाम मार्गाने न जाणारे असे अधिकारी क्वचितच आढळतात. तशा कर्तव्यदक्ष अधिका-यांतील एक अधिकारी राजू , आज तो सेवानिवृत्त होत आहे ही शासनाची सुद्धा हानीच म्हणावी लागेल. परंतु सेवानिवृत्तीनंतर तो निश्चितच काही तरी वेगळे व चांगले करेल अशी खात्री आहे. ज्यांना-ज्यांना मी राजू रिटायर्ड होतो हे सांगितल्यावर त्यांनी "अरे राजू रिटायर्ड पण झाला !" असे आश्चर्य कारक उद्गार काढले , समय का पहिया इतक्या वेगात पुढे सरकला हे त्यांच्या पण लक्षात आले नाही.  

    आगामी वाटचालीसाठी, निरोगी व उदंड आयुष्यासाठी राजूला शुभेच्छा ! आणि ही लेखरुपी छोटीसी भेट.

लिहावेसे असे खुप आहे परंतु लेख प्रदीर्घ होईल नव्हे झालाच आहे. करीता विराम देतो. राजूला कविता/शायरी हे आवडतात म्हणून या स्वरचित ओळी 

ये सफर मैने तय किया

मेरी अपनी अदा से|

आगे भी और कुछ करूँगा 

आपके प्यार और साथ से |

✍️ विनय वि.वरणगांवकर©

30/06/24

२७/०६/२०२४

Article about tolerance of Khamgaon citizens

खामगांव, एक सहिष्णू शहर 

खामगांवकर नागरिक हे मोठे सहिष्णू आहेत आणि त्याही पुढे जाऊन असे म्हणावेसे वाटते की सिल्वर सिटी, कॉटन सिटी याप्रमाणेच आता Most Tolerate City अर्थात सहिष्णू शहर म्हणून सुद्धा खामगांवची ओळख करून दिली तर काही वावगे होणार नाही.

काही वर्षांपूर्वी भारतातील सहिष्णूतेबाबतच्या चर्चा देशभर झाल्या होत्या. मोठा उहापोह तेंव्हा झाला होता. सहिष्णू देश म्हणून भारताची ओळख जुनी आहे स्वामी विवेकानंदांनी सुद्धा भारताने जगाला सहिष्णूतेचा संदेश दिला आहे असे म्हटले आहे. याच अनुषंगाने आपले खामगाव शहर सुद्धा सहिष्णू शहर आहे असे म्हणावेसे वाटते. केवळ  सहिष्णू नव्हे तर जगातील सर्वात सहिष्णू शहर आहे असे आता वाटायला लागले आहे. याची कारणे अनेक आहेत आणि ती सर्वपरिचित सुद्धा आहेत. तरीही इथे त्या कारणांची पुनरोक्ती करणे क्रमप्राप्त आहे.

खामगाव शहरातील सर्वात जुनी समस्या व नागरीक ज्या समस्येबाबत पुर्णपणे सहिष्णू झालेले दिसतात ती म्हणजे पाण्याची समस्या. खामगाव शहराला पूर्वी जनुना तलावावरून पाणीपुरवठा होत असे. ती पाईपलाईन अद्यापही आहे, ती कार्यान्वित सुद्धा होऊ शकते व शहराच्या अगदी लगतचा मोठ्या जलसाठ्याचा लाभ खामगांवकरांना होऊ शकतो. पण त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. सध्या  ज्ञानगंगा धरणातून खामगावला पाणीपुरवठा सुरू आहे. आता खामगावची लोकसंख्या वाढली, पाण्याची मागणी अधिक होऊ लागली आहे.  पण पंधरा-वीस वर्षांपूर्वी खामगावला भीषण पाणीटंचाई निर्माण झाली होती म्हणून तेंव्हा  आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा होऊ लागला तो आजतायागात कायमच आहे. त्यातच कधी बूस्टर पंप खराब होणे तर कधी पाईपलाईन फुटणे, विद्युततारांवर झाडे कोसळल्याने किंवा फांद्या कोसळल्याने धरण परिसरातील विद्युत पुरवठा खंडित होणे व त्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत होणे, तर कधी बिबट्याच्या धाकाने कर्मचाऱ्यांचे पाणीपुरवठा कार्यासाठी न जाणे अशा अनेक समस्या खामगावचा पाणीपुरवठा करताना येत असतात. त्या जाहीर झाल्यावर खामगावचे सहिष्णू नागरिक मूकपणे आपली-आपली पाण्याची व्यवस्था करतात. कुणी टँकर, कोणी कॅन तर कुणी लीक झालेल्या व्हॉल्व वरून आपली पाण्याची गरज भागवतात. पूर्वी पाणी नसले की घागर मोर्चा, महिलांचा मोर्चा असे किमान ऐकू तरी यायचे,  वृत्तपत्रातून पिण्याच्या पाण्याच्या समस्यांच्या बातम्या वाचनात यायच्या, सुरळीत पाणीपुरवठा व्हावा असे गा-हाणे मांडले जायचे पण आता खामगांवकरांना विस्कळीत पाणी पुरवठा इतका अंगवळणी पडला आहे की उपरोक्त मागण्या सुद्धा आताशा होणे बंद झाले आहे. 

     खामगांवकर नागरिकांच्या सहिष्णूतेच दुसरे उदाहरण म्हणजे महावितरणचे. दरवर्षी पावसाळा येण्यापूर्वी महावितरण विद्युत तारांच्या आजूबाजूच्या वृक्षांची छाटणी करतात जेणेकरून पावसाळ्यात काही समस्या निर्माण होवू नये.  हे त्यांचे कार्य चांगलेही आहे व ते नियमितपणे होत सुद्धा असते. परंतु पावसाळा सुरू झाला की, अत्यल्प पाऊस पडणाऱ्या खामगांवात वारं-उधाण , पाऊस नसतांना थोडी जरी हवा सुटली की लगेच विद्युत पुरवठा खंडित होण्याचा चांगलाच अनुभव आहे. खामगांव शहरात कमी पाऊस पडतो त्यामुळे इथे जून महिन्यात सुद्धा प्रचंड गर्मी असते. नागरिकांना मोठ्या उकाड्याला सामोरे जावे लागते पण तरीही पाऊस, वारा, वादळ नसतांना  आणि विजा सुद्धा चमकत नसतांना खामगावला विद्युत पुरवठा खंडित होतो. कालचेच उदाहरण काल संध्याकाळी पाऊस सुरू होण्यापूर्वी एक तास विद्युत पुरवठा खंडित होता. तो का खंडित होता याचे कारण सुद्धा सांगितले जात नाही. मागे  विद्युत पुरवठा खंडीत होणार असला की एसएमएस पाठवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती, ती सुद्धा आता कार्यान्वित नसल्याचे दिसते. तक्रारीच्या दूरध्वनीवर तक्रार करण्यासाठी नागरीक गेले असता तो दूरध्वनी कोणीच उचलत नाही असा अनुभव कित्येक नागरिकांना आलेला आहे व येत असतो. नागरीक तक्रार करण्यासाठी प्रत्यक्ष गेले असता तिथे तक्रारीची नोंद रजिस्टर मध्ये केली जाते आणि त्यांची बोळवण केली जाते. याही उदाहरणात खामगावचे सहिष्णू नागरिक विद्युत पुरवठा पुन्हा सुरू होण्याची प्रतीक्षा करत निमूटपणे घरी बसलेले असतात. पण एक जरी विद्युत बील भरण्यास विलंब झाला तर महावितरणचे कर्मचारी लगेच घरी येतात.

    आता खामगांवकरांच्या वाहतूक सहिष्णूते बाबत बघू. खामगांव  शहर आता खूप विस्तारित झाले आह गृह कर्ज सोपे झाल्यामुळे लोक मोठ्या प्रमाणात बांधकाम करून राहिले आहेत. तसेच सुलभ कर्ज सुविधामुळे मोठ्या प्रमाणात दुचाकी व चार चाकी वाहने खरेदी होत आहेत. या वाहनांमुळे जुन्या अरुंद रस्त्यांच्या भागात, जिथे बाजारपेठ आहे तिथे खूप गर्दी असते. परवाचेच उदाहरण द्यायचे झाले तर भगतसिंग पुतळ्याजवळ कुण्या एका नागरिकाने गाडी रस्त्यातच उभी केली होती. व तो दुकानात गर्दी असल्याने प्रतीक्षेत उभा होता. लोक हॉर्न वाजवत जात होते. थोड्या वेळाने एक चार चाकी वाहन आल्यावर मात्र त्या वाहनाला जाण्यास अपुरा रस्ता होता त्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली. अनेकांनी हॉर्न वाजवून ध्वनी प्रदूषण पण सुरू केले परंतु तरीही तो गाडीवाला बहादुर काही गाडी हटवण्यास तयार नव्हता. शेवटी लोक ओरडायला लागले "अरे किसकी गाडी है, किसकी गाडी है?" तेव्हा तो महाभाग गाडी सरकवण्यास बाहेर आला व वाहतूक पुन्हा सुरू झाली. परंतु खामगांवच्या आम्हा सहिष्णू नागरिकांनी किंवा रहदारीतील सहिष्णू जनांनी त्या माणसाला एकाही शब्दांनी गाडी रस्त्यात का उभी केली किंवा बाजूला का उभी केली नाही असे काही म्हटले नाही. तसेच  वाहतूक, अतिक्रमण यांबाबत कुणी काही वाच्यताही करीत नाही, मग ते अधिका-यांच्या सरकारी निवासस्थाना समोर का असेना.

     तीच गत सरकारी कार्यालयांची सरकारी कार्यालयामध्ये खामगांवकर नागरिक गेले असता अनेक वेळा त्यांना कर्मचारी जागेवर नसल्याचे दिसते. ते कर्मचारी इतरत्र कुठे गेलेले असतात त्याही प्रसंगी सहिष्णू खामगावकर नागरिक एक तर त्या कर्मचाऱ्यांची वाट पाहत बसतात किंवा थकून घरी जातात व पुन्हा दुसऱ्या दिवशी आपले कामकाज करण्यासाठी कार्यालयाची चक्कर मारतात. 

     अशी इतरही काही उदाहरणे आहेत, निवडणूकांत सुद्धा मोठी उदारता, सहिष्णूता खामगांवकर पूर्वी पासूनच दाखवत आले आहे असे नागरिकच बोलत असतात. वरील काही उदाहरणांवरून असे लक्षात येते की खामगांवकर नागरिक हे मोठे सहिष्णू आहेत आणि त्याही पुढे जाऊन असे म्हणावेसे वाटते की सिल्वर सिटी, कॉटन सिटी याप्रमाणेच आता Most Tolerate City अर्थात सहिष्णू शहर म्हणून सुद्धा खामगांवची ओळख करून दिली तर काही वावगे होणार नाही.

२०/०६/२०२४

Article about Nalanda University inauguration by PM Modi

हम करे राष्ट्र आराधन !

बख्तीयार खिल्जी विद्यापीठ पेटवत आहे, सर्वत्र हाहा:कार माजला आहे, प्रचंड ग्रंथसंपदा पेटल्याने धुराचे लोट उठत आहे, त्या धुरातून जणू मोठा ज्ञानाचा खजिना आकाशात विलीन होत आहे, सर्वत्र आक्रोश होत आहे असे दृश्य  माझ्या डोळ्यासमोर तरळत होते.

आता काही दिवसांपूर्वी टीव्हीवर काही विशेष कार्यक्रम नसल्यामुळे मी झी क्लासिक ही जुन्या सिनेमांची वाहिनी लावली. पडद्यावर नालंदा स्टेशन दिसले. "ओ मेरे राजा खफा ना हो ना" हे गीत पडद्यावर सुरू होते. हे गीत नालंदा विद्यापीठात चित्रीत झाले आहे. गीतात नालंदा विद्यापीठाचे अवशेष पाहून मला ते गौरवशाली विद्यापीठ, तिथे विदेशातून आलेले विद्यार्थी, तिथले भव्य बहु मजली ग्रंथालय, तिथले विहार, ध्यान केंद्रे, तिथे चालणारी चर्चासत्रे, तिथले ज्ञानदान करणारे शिक्षक, हो ज्ञानदानच तर होते तेंव्हा ! आता तर "advance fee भरावी लागेल" असे वाक्य नर्सरी ते पिजी पर्यंतच्या सर्वच शैक्षणीक ठिकाणी ऐकू येते. ज्ञानदान हा केवळ शब्द उरलेला आहे. पुढे मला नालंदा येथील ज्ञानदान करणा-या श्रेष्ठ शिक्षकांचे स्मरण झाले. हे जगविख्यात ज्ञानकेंद्र, हे विद्यापीठ, या भारतभूमीचा गौरव वाढवणारे हे शांतीचे, विद्यार्जनाचे स्थान उध्वस्त करणारा, जाळून टाकणारा तो कृरकर्मा तुर्क-अफगाणिस्तानचा सुलतान बख्तीयार खिल्जी पेटवत आहे, सर्वत्र हाहा:कार माजला आहे, प्रचंड ग्रंथसंपदा पेटल्याने धुराचे लोट उठत आहे, त्या धुरातून जणू मोठा ज्ञानाचा खजिना आकाशात विलीन होत आहे, सर्वत्र आक्रोश होत आहे असे दृश्य माझ्या डोळ्यासमोर तरळत होते. तत्क्षणी मला कुणी पाहिले असते तर त्याला मी मस्त चित्रपट गीत एन्जॉय करतो आहे असे वाटले असते, परंतु माझी नजर केवळ पडद्यावरील त्या गीताकडे होती  परंतु मनात मात्र नालंदा विद्यापीठाचा गौरवशाली इतिहास व ते उध्वस्त होणे हे उपरोक्त विचार पडद्यावरील त्या गीतात दिसलेल्या नालंदा विद्यापीठाचे अवशेष पाहून येत होते. 

    काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नालंदा विद्यापीठ पुनर्निर्माण करून राष्ट्राला समर्पित केल्यामुळे वरील प्रसंगाची आठवण झाली. नालंदा विद्यापीठाचे हे पुनरुज्जीवन करणे हे एक मोठे कार्य झाले आहे. स्वा. सावरकरांचे एक वाक्य आहे की "ज्या देशातील लोक त्या देशाचा इतिहास विसरतात त्या देशाचा भूगोल बिघडतो" या वाक्याचा आपल्याला चांगलाच अनुभव आलेला आहे. भारताचा भूगोल अनेक वेळा बिघडला आहे, भारताचे अनेक तुकडे पडले आहेत. आजही आपल्याला आपला गौरवशाली इतिहास म्हणावा तितका ठाऊकच नाही आणि म्हणूनच नालंदाचा जीर्णोद्धार होणे ही समस्त भारतवासीयांसाठी आनंदाची, गौरवाची बाब ठरली आहे. गुप्त साम्राज्याच्या काळात मगध राज्यात पाचव्या आणि सहाव्या शतकात कुमारगुप्त या गुप्त वंशातील राजाच्या काळात नालंदा विद्यापीठाची स्थापना झाली. नालंदाचा अर्थ ना+अलम+दा अर्थात "ज्ञानाची भेट देणारे" असा होतो. हा एक महाविहारच होता. या महाविहारातील श्रेष्ठ, ज्ञानी शिक्षक हे विद्यार्थ्यांना व्याकरण, वेद, औषधी शास्त्र, ग्रहताऱ्यांचे शास्त्र इत्यादी विषय शिकवत असत. इथल्या महाग्रंथालयात संस्कृत भाषेतील अनेक ग्रंथ होते, जे विदेशी विद्यार्थ्यांनी त्यांच्यासोबत नेल्याचे सांगितले जाते. ह्यू-एन-त्संग हा चिनी प्रवासी सुद्धा नालंदा विद्यापीठाचा विद्यार्थी होता. हा सुद्धा अनेक ग्रंथ आपल्या सोबत घेऊन गेला असे म्हटले जाते. राजगृह आजचे राजगीर येथे हे नालंदा विद्यापीठ आता पुन्हा कार्यान्वित होणार आहे ही जरी आनंदाची बाब असली तरी नालंदा व देशातील इतरही विद्यापीठात पूर्वीप्रमाणेच ज्ञानदानाचे कार्य निष्ठेने होणे अपेक्षित आहे.  आज आपण शिक्षणात झालेले बाजारीकरण, व्यापारीकरण पाहत आहोत. बहुतांश लोक या  अविरत पैशाचा ओघ सुरू राहतो या हेतूने या व्यवसायात आल्याचे चित्र आज दिसते आहे. शिक्षण महर्षी जाऊन शिक्षण सम्राट निर्माण झाले आहेत. यातूनच मग पेपर फुट,  परीक्षेआधी पेपर खरेदी करणे, परीक्षेला दुसरे विद्यार्थी बसवणे असे गैरप्रकार घडत आहेत. नुकत्याच झालेल्या नीट परीक्षांमध्ये गैरप्रकार झाला. यात तीस लाख रुपयांमध्ये नीट चा पेपर विकला गेल्याचे उदाहरण ज्या बिहार राज्यात नालंदा विद्यापीठ आहे त्याच बिहारात घडले आहे. नालंदा विद्यापीठाच्या पुनर्निर्माणाच्या औचीत्याने सरकारने, संस्थाचालकांनी व सर्वांनीच भारतातील शैक्षणिक वारसा टिकवून ठेवण्याचा, या क्षेत्रातील निष्ठा, पावित्र्य जपून ठेवण्याचा संकल्प करायला हवा असे म्हणावेसे वाटते. भारतामध्ये शिक्षणाची गौरवशाली परंपरा आहे. येथे महान गुरु शिष्य होऊन गेले आहे, येथील गुरूंनी निस्पृहतेने  ज्ञानदानाचे कार्य केले आहे.  प्राचीन काळातील शिक्षकांनी उत्कृष्ट असे विद्यार्थी घडवले. इथे ज्ञानाचे दान होत असे, पैसा दुय्यम होता. असा आपला शैक्षणिक वारसा आहे. काल पंतप्रधान मोदींच्या हस्ते नालंदा विद्यापीठ राष्ट्राला समर्पित होत असतांना मनास आनंद वाटत होता. या प्रसंगी 17 देशांचे राजदूत उपस्थित होते. ही बातमी आता जगात सर्वत्र पसरली असेल. आज जगात सुद्धा भारताचा दबदबा निर्माण झाला आहे. आक्रमकांनी उध्वस्त केलेली आपली स्वस्ती स्थाने पुनश्च निर्माण होत आहे, या निमित्ताने राष्ट्र नवनिर्माणच होत आहे. हे सर्व टिकवून ठेवण्यासाठी राष्ट्रीय विचारांच्या जनतेला एकत्र राहणे, सुयोग्य उमेदवार निवडून देणे याकडे सजग राहून पुढे येणे ही काळाची गरज आहे. तमाम जनतेने राष्ट्र प्रथम अशी विचारसरणी ठेऊन राष्ट्र आराधना जर केली तर पुन:श्च नालंदा सारखी एक काय अनेक दर्जेदार विद्यापीठे स्थापन होतील, जगात या देशाचा पुन:श्च  गौरव होईल म्हणूनच याप्रसंगी "हम करे राष्ट्र आराधन" हे गीत आठवते.

१३/०६/२०२४

Article about Ganesh Damodar Savarkar

भगूरचे बलराम


स्वातंत्र्यवीर सावरकर व बाबाराव सावरकर आणि  श्रीकृष्ण व बलराम या बंधुंमध्ये लहान्याने मोठ्यापेक्षा उत्तुंग भरारी मारलेली दिसते.

आज 13 जून एका जुन्या पोस्टची फेसबुकने आठवण करून दिली. ती पोस्ट होती गणेश उपाख्य बाबाराव दामोदर सावरकर यांच्या जयंतीची. बाबाराव सावरकर म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे ज्येष्ठ बंधू. सावरकर कुटुंबीय हे आपल्या देशातील एकमेवाद्वितीय तसेच देशभक्तीने, त्यागाने ओतप्रोत असलेले असे कुटुंब आहे. त्याच परिवारातील सर्वात ज्येष्ठ व्यक्ती म्हणजे बाबाराव सावरकर. बाबारावांचा जन्म  नाशिक जिल्ह्यातील भगूर या ठिकाणी झाला.  लहानपणापासूनच त्यांच्या अंगी सुद्धा संघटनात्मक चातुर्य होते, तल्लख बुद्धिमत्ता होती. त्यातूनच स्वातंत्र्यवीर सावरकरांसोबत मित्रमेळा, अभिनव भारत या संघटनांच्या स्थापनेमध्ये त्यांचाही पुढाकार होता. त्यांनी विपुल लेखन सुद्धा केले आहे. हिंदुराष्ट्र - पूर्वी-आता-पुढे, शिवरायांची आग्र्यावरील गरुडझेप, ख्रिस्त परिचय अर्थात ख्रिस्ताचे हिंदुत्व यांसारखी त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांचे वाचन अफाट होते. ते व्यासंगी होते तबला, फलज्योतिष, औषधीशास्त्र यातही त्यांना आवड होती. स्वातंत्र्यवीर सावरकरांना  शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे, त्यांच्या शिक्षणासाठी स्वतः कष्ट करणे, प्लेगच्या साथीत परिवाराची देखभाल करणे ही जबाबदारी बाबारावांनी घेतली लहान बंधू नारायणराव हे  प्लेगग्रस्त असतांना रुग्णालयात भरती होते तेव्हा त्यांची देखभाल बाबारावच करत होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांना महाविद्यालयीन शिक्षण, क्रांतिकार्य, विदेशात जाणे यासाठी सुद्धा बाबारावांनी प्रेरणा व पाठबळ दिले. त्यांच्या पत्नी येसूबाई यांचा सुद्धा कुटुंबासाठी खूप मोठा त्याग आहे. बाबाराव आणि येसूबाई यांनी खूप कष्ट सहन केले आहेत. बाबाराव व स्वातंत्र्यवीर सावरकर दोघेही बंधू इंग्रजांच्या ताब्यात असतांन  त्यांच्या घरावर जप्ती आली होती तेव्हा येसूबाई व  स्वातंत्र्यवीरांच्या पत्नी यमुनाबाई दोघींनाही अपरिमित असा त्रास, असे कष्ट झाले होते की जसे की ज्याची तुलना नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी जेव्हा 1857 चे स्वातंत्र्य समर हे ब्रिटिशांनी बंदी घातलेले पुस्तक भारतामध्ये पाठवले तेव्हा त्या पुस्तकाच्या प्रति वाटत असतांना बाबाराव सावरकरांना अटक झाली व त्यांना अंदमान येथे काळ्या पाण्याची शिक्षा भोगण्यास पाठवण्यात आले. या सर्व गोष्टींपासून स्वातंत्र्यवीर सावरकर अनभिज्ञ होते. पुढे मार्सेलिस बंदरावर फ्रान पोलिसांनी पकडून ब्रिटिशांच्या ताब्यात दिल्यावर स्वातंत्र्यवीर सावरकरांची सुद्धा अंदमानला रवानगी करण्यात आली. तिथे एक दिवस स्वातंत्र्यवीरांना त्यांच्या जेष्ठ बंधूंचे ओझरते असे दर्शन अन्दमानच्या तुरुंगात झाले. दोघाही बंधूंना आश्चर्य वाटले बाबाराव तुम्ही सुद्धा इथे कसे? असा प्रश्न सावरकरांना पडला. पुढे सर्व स्पष्ट झाले. काही वर्षानंतर दोघांचीही मुक्तता झाली. पुन्हा सामाजिक कार्यात दोघेही मग्न झाले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना मोठी लोकप्रियता लाभली त्यामानाने बाबाराव सावरकर मात्र मागे पडले. नुकत्याच झळकलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर या चित्रपटात एक दृश्य खूप काही सांगून जाणारे आहे. या दृश्यात स्वातंत्र्यवीर सावरकरांची लोक मिरवणूक काढतात त्या मिरवणुकीत बाबाराव सावरकर मात्र एका बाजूला एकटेच पडलेले दिसतात, त्यांच्याकडे गर्दीतील कुणाचेही लक्ष नसते. हे दृश्य पाहून प्रेक्षकांचे मन द्रवित होते. आजही बाबाराव सावरकरांबद्दल समाजामध्ये उदासीनता आहे. त्यांच्याबद्दल अनेकांना अल्पशी माहिती आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरां प्रमाणेच बाबारावांना सुद्धा अंदमानात काथ्या कुटणे, कोलू फिरवणे अशी यमयातनादायी कामे करावी लागली होती. ते आजारी असताना सुद्धा जेलर बारी त्यांच्याकडून काम करून घेत असे. स्वातंत्र्यवीर सावरकर, बाबाराव सावरकर तसेच कित्येक क्रांतीकारकांनी या देशासाठी हालअपेष्टा  सोसल्या परंतु त्यापैकी अनेकांची नांवे आज लोकांना ठाऊक सुद्धा नाही. महाराष्ट्रातील क्रांतिकारकांबद्दल सुद्धा अत्यल्प अशी माहिती लोकांना आहे.  हल्लीची नेते मंडळी नेहमी त्यांच्या मतपेट्या सुरक्षित रहाव्या म्हणून काही ठराविक लोकांचाच महाराष्ट्र आहे असे वारंवार म्हणत असतात. ज्यांची नावे ते मते मिळावीत म्हणून वारंवार घेतात त्या महान प्रभृती प्रमाणेच  महाराष्ट्रात, देशात इतरही अनेक थोर पुरुष,शिक्षण तज्ञ व क्रांतिकारक होऊन गेलेत मग हा महाराष्ट्र त्यांचा सुद्धा  नाही आहे का ? असा प्रश्न अनेकांना पडत असतो. अनेक थोर पुरुष क्रांतिकारक यांच्या नावाचा समाजाला पडत असलेला विसर पाहून तीव्र वेदना होतात. बाबाराव सावरकर सुद्धा त्यांपैकी एक उपेक्षित असे क्रांतीवीर आहे.  16 मार्च 1945 मध्ये बाबारावांचे निधन सांगली येथे झाले. त्यांची प्रकृती खालावली असल्याचा संदेश जेंव्हा स्वातंत्र्यवीरांना मिळाला तेंव्हा धीर गंभीर धीरोदात्त अशा कनिष्ठ बंधूनी जेष्ठाला जे अंतिम सत्य आहे त्यास समर्पित होऊन जावे असे सुचित केले होते. यावरून या दोघाही भावांची महत्ता लक्षात येते. सांगलीला बाबारावांचे स्मारक आहे श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांनी त्याचे अनावरण केले आहे. त्या ठिकाणी पंचधातूंची बाबारावांची मूर्ती सुद्धा आहे. आज त्यांच्या जयंती निमित्त हा लेख लिहिण्याची स्फूर्ती झाली हा सुद्धा एक योगच म्हणावा किंवा त्यांच्याविषयी लिहिण्याचे भाग्यच म्हणावे लागेल. आज आपल्या युवा पिढीला आदर्श अशा थोर पुरुषांच्या कथा त्यांचे गुणगान, त्यांचा त्याग, त्यांचे देश प्रेम, त्यांची निस्वार्थी वृत्ती हे सर्व सांगण्याची मोठी गरज निर्माण झाली आहे. आज आपल्या युवा पिढीसमोर भौतिक सुखांची रेलचेल आहे ती नसावी असे सुद्धा नाही परंतु या भौतिक सुखांसोबतच त्यांना बाबारावांसारख्या थोर पुरुषांची पुस्तके किंवा त्यांच्याबद्दलची माहिती सुद्धा उपलब्ध करून द्यावी हेच आज बाबाराव सावरकर यांच्या जयंतीदिनी सांगावेसे वाटते. 

    शेवटी इथे नमूद करावेसे वाटते की, भगवान श्रीकृष्णाचे कार्य कितीही मोठे असले तरी बलराम सुद्धा तितकेच पूजनीय व महान आहे.  स्वातंत्र्यवीर सावरकर व बाबाराव सावरकर आणि  श्रीकृष्ण व बलराम या बंधुंमध्ये लाहन्याने मोठ्यापेक्षा उत्तुंग भरारी मारलेली आहे.  सावरकरांची स्वातंत्र्य चळवळीतील कामगिरी जितकी उत्तुंग आहे , तितकेच  बाबरावांचे  कार्य सुद्धा महान आहे तसेच स्वातंत्र्यवीरांना जी प्रेरणा मिळालेली दिसते त्या मागे सुद्धा बाबरावच आहे. म्हणूनच बाबारावांना भगूरचे बलराम असे म्हणण्यात काही वावगे वाटत नाही. बाबारावांना विनम्र अभिवादन.

०६/०६/२०२४

Article about 2024 election result.

श्रीराम का रुसले ?

भाजपाने महाराष्ट्रात ज्यांच्यावर पुर्वी घोटाळ्यांचे आरोप केले होते त्यांनाच सत्तेत सामावून घेतले. घोटाळ्यातही जे "आदर्श" ठरले अशांना पक्षात घेणे तसेच इतरही अनेक पक्षातील लोकांना स्वतःच्या पक्षात "सिंचना"ने सामावून घेणे हे पक्षांतर्गत व्यक्तींना तसेच जनतेलाही रुचले नव्हते. 

परवा 2024 च्या लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. "अबकी बार चारसौ पार"  हा नारा काही प्रत्यक्षात आला नाही. भाजपला 242 जागांवर यश मिळाले. म्हणजे सर्वात जास्त जागा मिळवणारा पक्ष जरी भाजपा झाला असला तरी स्वबळावर बहुमत मात्र त्यांना नाही. एनडीए आघाडीला मात्र स्पष्ट बहुमताचा कौल मिळाला आहे. काँग्रेस व त्यांच्या पक्षाने गत निवडणुकांपेक्षा चांगली कामगिरी करून दाखवलेली यावेळेस दिसली. तरीही सत्तेपासून ते दूरच राहण्याची चिन्हे आहेत. भाजपाने अनेक कार्ये 2014 पासून करून दाखवली असल्यामुळे त्यांना मोठ्या विजयाची खात्री होती परंतु तरीही तसे झाले नाही. काश्मीर मधून 370 हटवले, मुस्लिम महिलांसाठी हितकारक असा तीन तलाक म्हणून जे घटस्फोट  होत असत ते बंद केले, उज्वला योजना, प्रधानमंत्री आवास योजना,  हर घर नल, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे देणे अशा अनेक हितकारक योजना राबवूनही भाजपा बहुमताचा आकडा काही गाठू शकली नाही याच्या अनेक प्रकारच्या कारण मिमांसा जनता तसेच राजकीय विश्लेषक आणि विविध वाहिन्या व्यक्त करीत आहेत. 2014 पासून सत्तेत असल्यामुळे आणि त्यामुळे निर्माण झालेल्या  अति आत्मविश्वासामुळे भाजपने अशा अनेक गोष्टी केल्या की त्या जनतेलाच काय तर  त्यांच्या  कार्यकर्त्यांना सुद्धा रचलेल्या नाहीत. "Party with Difference" म्हणून ओळखल्या जाणा-या भाजपाने महाराष्ट्रात ज्यांच्यावर पुर्वी घोटाळ्यांचे आरोप केले होते त्यांनाच सत्तेत सामावून घेतले. घोटाळ्यातही जे "आदर्श" ठरले अशांना पक्षात घेणे तसेच इतरही अनेक पक्षातील लोकांना स्वतःच्या पक्षात "सिंचना"ने सामावून घेणे हे पक्षांतर्गत व्यक्तींना तसेच जनतेलाही रुचले नव्हते. महाराष्ट्रात सुद्धा अनेक ठिकाणी तिकिटे देताना जुन्यांना डावलून नव्यांना तिकीटे दिली गेली. सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीच्या वेळी सुद्धा शिवतारे यांची नाराजी झाली होती. अमरावतीला नवनीत राणा यांना तिकीट दिले गेले.  अशा अनेक गोष्टी घडल्या  परंतु अरुणाचल प्रदेश, मध्य प्रदेश सारख्या राज्यात भाजपने अतुलनीय अशी कामगिरी करून दाखवली हेही विसरून चालणार नाही. केरळमध्ये सुद्धा भाजपाने एक जागा जिंकलेली आहे. यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे भारत जोडो यात्रा आणि इतर जनसंपर्क यामुळे आणि  सत्ताधाऱ्यां कडून घटना बदलवण्यात येईल हा भ्रम जनतेत यशस्वीरीत्या योग्य पद्धतीने जनतेत पसरवण्यात त्यांना यश मिळाल्यामुळे त्यांच्या जागा मोठ्या प्रमाणात वाढल्या. भाजपासाठी क्लेशदायक आणि तमाम भारतवासीयांना आश्चर्य वाटेल असा एक निवडणूक निकाल म्हणजे अयोध्येचा. प्रत्यक्ष ज्या ठिकाणी राम मंदिर झाले त्या ठिकाणी  जनतेने भाजपाच्या बाजूने कौल दिला नाही तिथे समाजवादी पक्षाचा उमेदवार निवडून आला. गेल्या अनेक वर्षापासून अयोध्येत भव्य राम मंदिराचे निर्माण हे भाजपच्या जाहीरनाम्यात असायचे. ते प्रत्यक्षात उतरले परंतु तरीही भाजपाला अयोध्येत मात्र विजय प्राप्त करता आला नाही ही मोठी शोकांतिकाच म्हणावी लागेल. ज्या अयोध्यावासियांना मोठे विकासाचे दालन उपलब्ध करून दिले गेले तिथेच सत्ताधाऱ्यांना पराभूत व्हावे लागले म्हणूनच श्रीराम रूसले असेच म्हणावेसे वाटते. येथून मोदींना पुढे चांगलीच कसरत करावी लागेल हे मात्र निश्चतच कारण आता त्यांचे बहुमत नाही, सोबत असलेल्यांना सांभाळून व टिकवून ठेवावे लागेल. धडाकेबाज निर्णय घेणे आता म्हणावे तितके सोपे राहणार नाही असे दिसते आहे. भाजपाला आता जुने कार्यकर्ते, निष्ठावंत यांना डावलून कोणालाही पक्षात सामावून घेणे टाळावेच लागेल, भ्रष्टाचारी लोकांची साथ सोडावी लागेल तेव्हाच प्रभू रामचंद्राचा आशीर्वाद खऱ्या अर्थाने प्राप्त होईल असे वाटते. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने योग्य पद्धतीने व कोणता उमेदवार निवडून येईल अशा रीतीने तिकिटे दिली नाही. याचाच परिणाम महाराष्ट्र उत्तर प्रदेशात झाला दोन्ही ठिकाणी अनेक दिग्गज व मंत्रीपदावर असलेल्या नेत्यांना हार मानावी लागली. तसेच भाजपाला हाही विचार करावा लागेल की एकच चेहरा समोर करून यापुढे चालणार नाही प्रत्येक ठिकाणचे उमेदवार हे सुद्धा कार्यक्षम असले पाहिजे, मतदारसंघाचा विकास करणारे, जनतेमध्ये लोकप्रिय व पारदर्शक व्यवहार असणारे, स्वच्छ प्रतिमा असलेले उमेदवार सर्वत्र असावे. मोदींच्या नावावर निवडून येणे हे यापुढे कठीण जाईल. काँग्रेस पक्ष जरी या निकालास मोदींची हार मानत असला तरी संख्याबळ हे निश्चितच भाजपचे जास्त आहे. इतर अनेक देशांनी मोदींचे अभिनंदन सुद्धा केले आहे हे नाकारता येणार नाही. काँग्रेसच्या जागा निश्चितच वाढल्या आहेत परंतु आगामी काळात त्यांनाही चांगला विरोधी पक्ष बनून राहावे लागेल. संसदेमध्ये केवळ गोंधळ घालून चालणार नाही. 2024 च्या लोकसभा निवडणुकांच्या अशा निकालामुळे अनेक मते मतांतरे व्यक्त होत आहेत. भाजपाची जी पिछेहाट झाली, अयोध्येतही पिछेहाट झाली त्यावरून जरी ते सत्तेत येत असले तरी प्रभू श्रीराम कुठेतरी रुसलेलेच वाटत आहे. आगामी काळात भाजपा नेते, कार्यकर्ते यांनी जर 'ग' ची बाधा होऊ न देता  कार्य केले तर प्रभू श्रीराम हे नक्कीच प्रसन्न होतील, कृपा करतील.