२८/११/२०१८

Article about reservation in education, promotion in service and open category


अभ्यास कर....आपल्याला आरक्षण नाही 
    चार-पाच दिवसांपूर्वी समाज माध्यमांवर “चल उठ , अभ्यास कर आपल्याला आरक्षण नाही“ असा एक  सर्वसामान्य  #Open #GeneralCategory वर्गवारीप्रती  सहानुभूती, तसेच सर्वसामान्य वर्गवारीच्या विद्यार्थ्यांना वास्तवाची जाणीव करून देणारा, व त्यांना अभ्यासाशिवाय दूसरा कोणता पर्याय  नसल्याचे सूचित करून प्रेरणा देणारा संदेश झपाट्याने पसरला. हा संदेश वाचल्यावर अनेक प्रश्नांनी डोक्यात पिंगा घालायला सुरुवात केली. संविधानाने दिलेली समानता खरेच आहे का?,बुद्धिमान विद्यार्थ्यास जास्त गुण मिळाले असून कमी गुण प्राप्त विद्यार्थ्यास चांगल्या महाविद्यालयात  प्रवेश मिळताना पाहून किंवा नोकरी मिळताना पाहून काय वाटत असेलआरक्षणाचा टेकू घेऊन आपल्याहून कनिष्ठ सहका-यास बढती मिळताना पाहून कर्मचा-यास काय वाटत असेल? पात्रता नसलेले आरक्षणाच्या कुबड्या घेऊन उभे राहणारे या देशाचे आधारस्तंभ बनू शकतील का ? सर्वसामान्य वर्गवारीच्या विद्यार्थ्यांच्या मनातील भावना काय असतील? त्यांना नकारात्मक भावनेने,न्यूनगंडाने ग्रस्त केले असेल काय? त्यांच्या पालकांच्या मनात काय चलबिचल होत असेल असे नानाविध प्रश्न डोक्यातील विचारांचा गुंता वाढवीत होते. मुलांसमोर जातीपातीचा उल्लेख न करणा-या आपणास हल्ली आपली लहानगी मुलेच अमुक एक जात कोणती? अमुक एक आरक्षण कोणते? आरक्षण म्हणजे काय? अशा प्रश्नांनी भंडावून सोडत असतात. अस्सल भारतीय व्यक्तीस त्यांच्या या अशा प्रश्नांना सामोरे जाणे मोठे कठीण जाते.परंतू करणार काय? मतांच्या राजकारणासाठी समाजाला सदैव विभाजित  ठेवणा-या राजकारण्यांना काही मुद्दे हे असेच तेवत ठेवायचे आहेत. “अवघे विश्वची माझे घर” असा संदेश  देणा-या ज्ञानोबांच्या या महाराष्ट्रात चौथी पाचवीतील मुले “मी अमक्या जातीचा , तू ढमक्या जातीचा” असे संवाद करतांना दिसतात. हा संदेश माध्यमांवर आल्यापासून डोक्यातच फिरतच आहे. खरेच काय होणार आपल्या देशात सर्वसामान्य वर्गवारीचे ? सर्वसामान्य वर्गवारीस अभ्यासा व्यतिरीक्त दूसरा कोणताही पर्याय नाही. अनेक सर्वसामान्य गरीब आहेत त्यांच्याकडे शासनाचे लक्ष नाही. सविधानात सामाजिक,आर्थिक व राजनैतिक न्याय, दर्जाची व संधीची समानता असे म्हटले आहे. परंतू खरेच तसे आहे का ? सरकारने स्वत:च जाती भेद करू नका , आपण सर्व एक आहोत असे म्हणत जनतेला निरनिराळ्या वर्गवारीत वाटून जातिभेद तर मिटवलाच नाही केवळ त्याचे स्वरूप बदलले आहे. या असल्या प्रकाराने अपात्रांना पात्र करून पुढे आणल्याची फळे आगामी काळात भारताला निश्चितच भोगावी लागतील. मोठ-मोठ्या पदव्या घेतलेल्या डॉक्टर कडून चुकीची शस्त्रक्रिया होताना दिसते. नवीन बांधलेले पूल पडतात. कर्मचारी साधे पत्र लिहू शकत नाही. रस्ते उखडतात, शिक्षण क्षेत्राची दुरावस्था झालेली आहे. हे कशामुळे तर आरक्षणाच्या कुबड्या लावून आपत्रांना पात्र बनवल्यामुळे. येथे कुण्या जाती, धर्मा बाबत मुळीच आकस नाही. टीका आहे ती सरकारी यंत्रणाच जनतेला समानतेने पाहात नसल्या बाबतची. या देशातील उच्च गुणवत्ताधारक,पात्र विद्यार्थी मग तो कोणत्याही जाती धर्माचा असो त्याला त्याच्या जाती किंवा धर्मामुळे चांगल्या महाविद्यालयात प्रवेशीत होता येत नसेल तर ही आपल्या देशाची मोठी शोकांतिका आहे.सत्ताधारी, विरोधी व सर्व पक्षांनी सर्वसामान्य वर्गवारीकडे होणारे दुर्लक्ष या बाबत एकत्रीत चर्चा करणे अत्यावश्यक आहे. परंतू हे होणे कितपत शक्य आहे ? तसे होण्यास अनेक वर्षे जातील. तो पर्यन्त सर्वसामान्य वर्गवारीच्या पालकांना मात्र त्यांच्या पाल्यांना हेच सांगावे लागेल की, “बाबू उठ अभ्यास कर आपल्याला आरक्षण नाही”       

२२/११/२०१८

Consecration Ceremony of The Universal Temple of Shri Ramkrishna , Aurangabad. article enllight on this ceremony


अनुपम्य सुख सोहळा रे
     16,17,18 नोव्हेंबर रोजी रामकृष्ण ध्यान मंदिराचा लोकार्पण सोहळा औरंगाबाद येथे पार पडला. पाणचक्की, बिबीका मकबरा  दौलताबाद किल्ला,वेरूळ विविध संतक्षेत्रे इत्यादींनी समृद्ध असलेल्या औरंगाबाद परिसरात आता रामकृष्ण ध्यान मंदिराची सुद्धा भर पडली. मलिक अंबरने वसवलेल्या पूर्वाश्रमीच्या खडकी व आताच्या औरंगाबाद शहरात आणखी एक स्थान भाविक, पर्यटकांसाठी उपलब्ध झाले. सत्तरच्या दशकाच्या अखेरीस औरंगाबाद येथे श्रीमती सहस्त्रबुद्धे, बी. जी. देशपांडे, बिडवई आदींनी स्वामी रकानंदजी महाराज व नागपूरच्या रामकृष्ण मंदिराचे तत्कालीन अध्यक्ष व्योमानंदजी स्वामी यांच्या यांच्या प्रेरणेने शहरात दर रविवारी रामकृष्ण परमहंस यांच्या कथा , त्यांचे संदेश यांचे वाचन सुरु केले. श्री यत्नाळकर हे वरद गणेश मंदिरात रामकृष्ण मिशनची पुस्तके विक्रीचे कार्य संभाळत असत. पुढे 1985 मध्ये रामकृष्ण मंदिरासाठी जागेची पहाणी सुरु झाली. सध्याची जागा कम्युनिष्ट विचारधारेचे चौधरी यांनी बाजारमुल्यापेक्षा कमी भावात मंदिरासाठी दिली. पुढे लगतची दोन एकर जागा सुद्धा बाजारमुल्याने दिली. व औरंगाबाद शहरात रामकृष्ण-विवेकानंद समितीचे कार्य अधिक विस्तृत झाले. पुढे 2005 मध्ये औरंगाबादचे हे रामकृष्ण मंदिर बेलूर मठाशी संलग्नित झाले व सध्याची मंदिराची नूतन वास्तू उभारण्याचे कार्य 2009 या वर्षी सुरु झाले. बेलूर मठाच्या रचनेप्रमाणेच हे मंदीर सुद्धा उभारले गेले. बीड वळणमार्गावर, बजाज हॉस्पिटल शेजारी एका मोठ्या चौथ-यावर हे मुख्य मंदीर उभारले आहे. प्रवेशव्दारातून आत शिरल्यावर सुंदर,विलोभनीय अशी बाग,दोन्ही बाजूंनी कमल पुष्पे आहेत. दर्शनी भागावर समोरील दोन कळसांच्या मध्ये गणपती विराजमान आहे. गणपतीच्या खालील बाजूस दोन गजराजांच्या मध्ये रामकृष्ण मिशनचे बोध चिन्ह आहे. मागील बाजूस चारीही बाजूंनी वेढलेल्या 12 कळसांच्या मध्ये मंदिराचा मुख्य कळस आहे.भव्य प्रवेशद्वारातून आत प्रवेशित झाल्यावर रामकृष्ण परमहंस यांची भव्य मूर्ती व मूर्तीच्या दोन्ही बाजूस मॉं सारदा व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमा आहेत. प्रवेशव्दाराच्या वर आतील बाजूने पंढरीचा राजा विठ्ठल,महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय व संतांची मांदियाळी रेखाटली आहे. अत्यंत प्रसन्न वातावरण असलेल्या या मंदिराचे 17 नोव्हेंबर रोजी देश विदेशातून आलेल्या चारशेहून अधिक उच्च विद्याविभूषित संन्यास्यांच्या उपस्थितीत या रामकृष्ण ध्यान मंदिराचे पवित्र संस्कारीकरण करण्यात आले. मंदिर खुले होण्यापूर्वी सर्व संन्यासी वृंदांनी सकाळी 6.30 वाजता मंदिरास विविध भाषांत भजने गात परिक्रमा केली. त्यानंतर 7.30 वाजता श्रीमंत स्वामी वगीशानंदजी महाराज यांच्या करकमलांव्दारे या विश्वमंदिराचे पवित्र संस्कारीकरण पार पडले.कर्मयोग,राजयोग,राष्ट्रनिर्माण,नारी शक्ती,गृहस्थ व पित्याची कर्तव्ये अशा विषयांवर विविध संन्यास्यांच्या प्रवचनां बरोबरच विद्यार्थी व तरुणांसाठी संगीतमय नाटके सुद्धा होती. 20 ते 25 हजार प्रतिनिधी हा नयनरम्य ऐतिहासिक सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी देशभरातून उपस्थित झाले होते. काही विदेशी नागरीकांनी सुद्धा उपस्थिती लावली होती. दि.17 रोजी महाराष्ट्रातील संत परंपरेवर आधारीत सांस्कृतिक कार्यक्रम तर अत्यंत दर्शनीय श्रवणीय झाला. सर्व कार्यक्रम वेळेवर पार पडत होते, कुठेही काही कोलाहल,गडबड नव्हती. तात्पुरती प्रसाधन गुहे अगदी स्वच्छ होती, पिण्याच्या पाण्याची विपुल सोय होती. अत्यंत शिस्तबद्ध रीतीने सर्व सोहळा पार पडला. रामकृष्ण ध्यान मंदिराच्या या लोकार्पण कार्यक्रमावेळी भजनात दंग होऊन नृत्य परिक्रमा करतांना पाहून तुकोबांचा “खेळ मांडीयेला वाळवंटी घाई , नाचती वैष्णव भाई रे “ हा अभंग आठवला आणि त्यातीलच एक ओळ असलेल्या “अनुपम्य सुख सोहळा रे ” याप्रमाणेच औरंगाबादचा हा रामकृष्ण मंदिर अनावरण सोहळा अनुपम्य होता.  

१५/११/२०१८

चिडचिडेपणा का वाढतोय ?
निरनिराळ्या रंग, रूपासोबतच निरनिराळ्या स्वभावाच्या व्यक्ती समाजात वावरतांना आपण बघत असतो. या स्वभावास पुन्हा नाना त-हेचे पैलू सुद्धा असतात. ज्या वातावरणात , घरगुती संस्कारात व्यक्ती वाढलेल्या असतात त्याप्रमाणे त्याच्या स्वभावाची जडण-घडण होत असते. हसमुख , अबोल, बोलके , अंतर्मुख , शिघ्रकोपी अशा एक ना अनेक स्वभावाच्या व्यक्ती आपल्या भोवती वावरत असतात. व्यक्ती तितक्या प्रकृती असे त्यामुळेच म्हटले गेले आहे.परंतू हल्ली तरुण मुले ,शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी यांचा वाढता चिडचिडेपणा, त्रागा ही एक गंभीर व वाढती समस्या समाजात निर्माण होत आहे या समस्येने अनेक शालेय व महाविद्यालयीन तरुण, तरुणी सध्या ग्रस्त झाले आहेत. लहान-सहान कारणांवरून चिडून जाणे. कुणा दुस-याचा , कार्यालयातील घटनेचा राग मग आपल्या आप्तांवर निघत आहे. दुस-याचे भौतिक सुख पाहून तसे आपल्यालाही मिळावे हे सुद्धा एक कारण या चिडचिडेपणाचे असावे. म्हणूनच मोबाईल साठी खून, आत्महत्या , घरुन निघून जाणे अशा आशयाची वृत्ते वर्तमानपत्रातून येत असतात. का बरे ही चिडचिड होत असावी ? का हा चिडचिडेपणा वाढत आहे ? याचे मुळ तरुणाईने व पालकांनी शोधणे जरुरी आहे. कुण्या दुस-याची मित्राची अगर नातेवाईकाची विक्षिप्त वागणूक तुमच्या चिडचिडेपणास जबाबदार नाही ना ? तसे असल्यास त्यांचा राग तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तीवर काढणे कितपत योग्य आहे ? दिवाळीच्या सुटीत धनंजय टाले या माझ्या मित्राने असाच काहीसा विषय निघाल्यावर मला सांगितले की , “एखाद्या फलंदाजाकडे जसे विविध चेंडू गोलंदाज टाकतात त्यातील काही चेंडू फलंदाजाला लागतात परंतू लागल्यावरही पुन्हा हसतमुखाने पुढच्या चेंडूवर हसतमुखाने तो निष्णात फलंदाज चौकार किंवा षटकार ठोकत असतो. तो पूर्वीचा लागलेला चेंडू विसरून नवीन चेंडूचा चांगल्या रीतीने सामना करण्याची प्रतीक्षा करतो. त्याप्रमाणे आपल्यावर सुद्धा आपल्या आप्तांचे , मित्रांचे , सभोवतालच्या व्यक्तींच्या वक्तव्यांचे, वागणुकीचे विविध चेंडू येत असतात आपण सुद्धा त्यांना त्या निष्णात फलंदाजाप्रमाणे ते चेंडू टोलवायचे असतात.” इतरांची आपल्या सोबतची वागणूक या आपल्या चिडचिडेपणाच्या एका कारणा सोबतच सोशल मिडीया हे सुद्धा या वाढत्या चिडचिडेपणाचे एक कारण आहे. सध्या तरुण, तरुणी दोन विश्वात वावरत आहेत. एक आपले प्रत्यक्ष विश्व व सोशल मिडीयाचे आभासी विश्व. या आभासी विश्वामुळे , त्यावरच्या सततच्या ओंनलाइन राहण्याने , त्यावरील ज्ञात अज्ञात व्यक्तींमुळे सुद्धा आपल्या वागणुकीवर परिणाम होत असतो. तरुणांना सुद्धा आताशा मोबाईल नसले तर करमत नाही. एक चित्र फार मोठ्या कालवधी पर्यंत आपल्या स्मरणात राहत असते. सध्या तर आभासी जगत चित्र व चलचित्रांचा भडीमार होत असतो. आभासी जगतात सतत ओंनलाइन राहण्याने तसेच स्वचीत प्रसंगी त्याचा वापर खंडीत झाल्याने सुद्धा अस्वस्थता, चिडचिड वाढत असते. अनेक 4-5 वर्षाची अनेक बालके अशी आहेत की ज्यांना मोबाईल नाही दिला तर ते आकांड-तांडव करतात. इतक्या लहान वयातच त्यांची चिडचिड सुरु झाली आहे. ही बालके मोठी झाल्यावर काय करतील ? परंतू अनेक पालकांना ही समस्या न वाटता ते आपल्या बालकाचे हे कौतुक सांगत असतात. चित्तवृत्ती शांत अशी राहील ? शालेय,महाविद्यालयीन, तरुण,नवविवाहित यांनी व त्यांच्या पालकांनी , त्यांच्या गुरुजन वर्गानी याचा विचार करणे गरजेचे झाले आहे. तरूणांनी, पालकांनी, नागरीकांनी वेळीच जागरूक व्हावे. मोबाईलच्या या विश्वास , सोशल मिडीयाच्या आभासी जगतास व अन्य कुणा दुस-या व्यक्तीस आपल्या चिडचिडेपणाचे कारण न होऊ द्यावे.     

०६/११/२०१८

Article on the cutting of many Neem Trees of Nimwadi area of Khamgaon, Maharashtra


निमवाडीची रया आणि कडूनिंबांची छाया गेली
      खामगांव शहर म्हटले की पंचक्रोशीतील   कित्येकांना         जी.एस.कॉलेज हमखास     आठवतेच. पंचक्रोशीतील या कॉलेजच्या लगतच सुटाळा ग्राम परिसरात राष्ट्रीय महामार्गावर निमवाडी नावाचा परीसर आहे. आता काही दिवसांपूर्वी कडूनिंबाच्या गर्द,थंडगार छायने आच्छादित असा हा एक छोटासा भाग होता. होय ! होताच. कारण अगदी काल-परवा पर्यंत या भागातील भले मोठे कडूनिंबाचे वृक्ष वाटसरूंना सावलीचा दिलासा देत. कडूनिंबांच्या अनेक झाडांमुळे या परिसराला निमवाडी हे नांव पडले होते. याच परिसरात कडूनिंबाच्या छायेत एक झोपडीवजा उपहारगृह आहे. हे उपहारगृह म्हणजे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा ठिय्या होता. जी.एस. कॉलेज मधील गेल्या कित्येक वर्षातील विद्यार्थ्यांचा हाच कट्टा होता.तासिका बुडवून येथील चहा,इतर पदार्थ यांवर गप्पांसोबत ताव मारला जात असे.क्वचित प्रसंगी काही धुरांच्या रेषाही हवेत काढत.समोर भट्टी,त्यामागे बनियान टोपी वाले चालक-मालक त्यांच्या मागे काचेचे दोन कपाट,कुडाच्या भिंतीवर अनेक देवी देवतांचे फोटो,लाकडाचे बाक,टेबल,एक छोटा टी.व्ही, कोप-यात कांदे व इतर साहित्य पडलेले, एखाद-दोन खाटा. या उपहारगृहाचे आणखी एक वैशिष्टय म्हणजे याला दरवाजा नाही. अशा या उपहारगृहात फावल्या वेळात प्राध्यापक,कर्मचारी वृंद सुद्धा येत.प्राध्यापक किंवा इतर कर्मचारी उपहारगृहात आल्यावर व्यत्यय येऊ नये म्हणून धुरांच्या रेषा काढणा-यांसाठी मागील बाजूस

रस्ता रुंदीकरणामुळे वृक्षहीन रस्ते 
कडूनिंबाच्या सावलीतच दोन बाकड्यांची पर्यावरणपूरक अशी खुली केबिनसुद्धा होती. निमवाडीतील हे उपहारगृह एकांतात असल्याने खामगावातील अनेक मित्र मंडळी कडूनिंबाच्या छायेतील या निवांत ठिकाणाचा आधार घेत होते. परंतू हळू-हळू शहर वाढले, मान्य आहे आता रुंद रस्त्यांची गरज आहे परंतू वृक्ष  लागवड  व संगोपन सुद्धा जरुरी आहे.सरकारच्या भरवश्यावर न राहता प्रत्येकाने वृक्ष लागवड संगोपन करण्याचा वसा घ्यावा.आपल्या पूर्वजांनी वृक्षे लावली,त्यांचे संगोपन केले त्यामुळे आपल्याला फळे, छाया मिळाली.पुढील पिढीसाठी निव्वळ पैसा, जमीन जुमला जमा न करता आपण सुद्धा वृक्ष लागवड व पर्यावरण रक्षणाचा वसा हाती घेण्याची नितांत गरज आहे.खामगावातील याच निमवाडीतून जाणा-या महामार्गाचे सुद्धा रुंदीकरण सुरु झाले,ते सुद्धा गर्द वनराईच्या सुटाळ्यातून.मार्ग रुंदीकरण कार्याचा पहिला हल्ला होतो तो मूक,निशस्त्र, झाडांवर.निमवाडीत या निरपराध,सदैव दुस-यांना काही ना काही देणा-या या कडूनिंबांवर व इतर अनेक झाडांवर यांत्रिक करवती कराकरा फिरू लागल्या आणि बघता-बघता निमवाडीतील ती शेकडो वर्षे जुनी, भली मोठी झाडे एका पाठोपाठ एक धारातीर्थी पडू लागली.कुणास ठाऊक का परंतू निरपराध,निश्स्त्रांवर गोळीबार झालेले जालियानवाला बाग आठवले,त्यांना मारणारा जनरल डायर आठवला.मन हेलावले,गतकाळात गेले,निमवाडीतील मित्र मंडळींच्या बैठका,चर्चा,कडूनिंबाच्या छायेतील निवांतासाठी पेट्रोल खर्च करून चहा,नाश्त्यासाठी गावातून निमवाडीत जाणे,”वो जिंदगीमे कल क्या बनेगाअशी तरुणांची ध्येये,पाहिलेली स्वप्ने सर्व स्मृती डोळ्यासमोर चलचित्रपटाप्रमाणे झर-झर येत गेल्या म्हणूनच वृत्तपत्रातील निमवाडीतील वृक्ष तोडले अशा आशयाची बातमी वाचून त्याठिकाणी गेलो. सोबतीला बालपणी पासूनचा सहपाठी मित्र विशाल देशमुख होता.मित्र मंडळीच्या गलक्यात निमवाडीत जाणारे आम्ही यावेळी मात्र दोघेच होतो.नेहमी हिरवेगार,दाट वृक्ष पाहिलेल्या व आता उजाड, भकास झालेल्या त्या जागेची छायाचित्रे टिपण्याची काही ईच्छा होत नव्हती.तरीही कसे-बसे दोन फोटो काढले. नेहमी सुरु असणारे उपहारगृह सुद्धा बंद होते.उजाड,पूर्वी नैसर्गिक छाया,रम्य वातावरण असलेल्या निवांत निमवाडीतून चहा नाश्ता व आनंददायी चर्चा याने ताजा-तवाना होऊन आम्ही परतत असू.यावेळी मात्र तेथून परततांना मी व माझा मित्र विशाल दोघेही खिन्न होतो.

०१/११/२०१८

Article on Rahul Gandhis statement in Madhyapradesh on which he has to face defamation case also


कन्फ्युजनही कन्फ्युजन है सोल्युशन पता नही

     पाच राज्यातील व 2019 मधील आगामी लोकसभा निवडणुक. त्यातच नरेंद्र मोदी यांचा न ओसरलेला करिश्मा. भाजपच्या विजयी रथाच्या वारूला कसे  रोखावे ? याची सर्व विरोधी पक्षांना लागलेली चिंता व त्या चिंतेमुळे सुटलेले जिभेवरील नियंत्रण व गोंधळ जनतेला स्पष्ट दिसून  येत आहे. तिकडे वाचाळवीर , पत्नीच्या आकस्मिक मृत्यूच्या गुढाचे वलय भोवताली घेऊन फिरत असलेले शशी थरुर हे मोदींचा कुठल्यातरी पत्रकाराने केलेला महादेवाच्या पिंडीवरील विंचू या आशयाच्या ओळी वाचून दाखवतात. हसमुख आणि मनमेळाऊ राजकारणी , माजी मुख्यमंत्री , केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या काल राजकारणात आलेल्या कन्या प्रणिती शिंदे या मोदींना डेंग्यूचा डास म्हणतात. वडीलांच्या पुण्याईने राजकारणात प्रवेशित प्रणितीताईंना पंतप्रधान यांना असे संबोधणे योग्य नाही. पंतप्रधान मोदी यांनी राजकारणात स्वकर्तुत्वावर अघाडी घेत पंतप्रधान पदापर्यंत मजल मारली. तुम्हाला तो प्रवेश सहजासहजी मिळाला आहे याचे भान ठेवावे. देशाचे पंतप्रधान हे सर्वांचेच असतात. त्यांना असे बोलण्याने तुमची पात्रता काय आहे हे सुज्ञ जनांना कळत असते. थरुरांची तर मोदींबद्दल बोलण्याची पात्रताच नाही. परंतू यांची जिभ अशी का घसरते आहे ? यांना कन्फ्युजन का होत आहे ? कारण सत्ताधा-यांवर करण्यासाठी काही आरोपच नाहीत. ज्या काही एखाद दोन जुन्या मुद्द्यांवर गदारोळ माजवला जात आहे त्यात सुद्धा काही दम नाही. म्हणूनच मग हा गोंधळ, हे कन्फ्युजन. यामुळेच मग जिभ घसरते, शिव्यांची लाखोली वाहिली जाते,राहुल गांधी व्यापम म्हणायच्या ऐवजी पनामा पेपर्स म्हणतात. काय तर म्हणे मामाजींच्या मुलाचे नांव पनामा पेपर्स मध्ये आहे. मध्यप्रदेश मधील झाबुआ येथील प्रचारसभेत ते बोलत होते. असे उद्गार कुणाच्या बाबतीत आहे हे स्पष्टच आहे. मामाजी म्हणजे कोण हे मध्यप्रदेशात सर्वांनाच चांगले ठाऊक आहे. त्यामुळेच मग त्यांच्यावर मानहानीचा खटला दाखल झाला. आपली चूक नंतर लक्षात आल्यावर मग अनेक घोटाळे झाले आहेत त्यामुळे माझे कन्फ्युजन झाले असे ते म्हणाले. असे कन्फ्युज होऊन कसे चालेल? पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून तुम्ही स्वत:च स्वत:च्या नावाची घोषणा केली होती. त्याला तुमच्याच पक्षातील अनेक जेष्ठ नेत्यांचा विरोध आहे. उघड-उघड कुणी बोलत नसले तरी जनतेला व कार्यकर्त्यांना त्याचा अंदाज आला आहे. यत्कदाचित तुम्ही पंतप्रधान झालाच तर अनेक महत्वाच्या मुद्द्यांना कन्फ्युजन मुळे कसे हाताळाल काही नेम नाही. अनेक घोटाळ्यांमुळे तुम्ही कन्फ्युज होता तर देशात तर किती गंभीर समस्या आहेत. काश्मीर प्रश्न आहे, घुसखोर आहेत, नक्षलवाद आहे  अशा प्रश्नांवर एखादा कन्फ्युज्ड माणूस कसे काय निर्णय घेईल? तुम्ही सध्या पंतप्रधानांवर गंभीर आरोप करीत आहात. या आरोपांची सुद्धा एकदा पुनश्च खात्री करून घ्या नाही तर नंतर पुन्हा कन्फ्युज झालो होतो असे म्हणाल. सर्व विरोधकांकडे सत्तधा-यांना कात्रीत पकडता येतील असे मुद्देच नाहीत. त्यामुळे ज्यांची जिभ सैल सुटली आहे असे तोल सुटलेले नेते, कन्फ्युज्ड नेते जर भविष्यात सत्तेत आले तर जनतेवर आणि देशावर काय परिस्थिती ओढवेल याचा विचार जनतेने जरूर करावा. अनेक बाबींवर कन्फ्युजनही कन्फ्युजन असलेल्या नेत्याला नक्कीच सोल्युशन क्या है पता नही ? असे होऊ शकते व त्यामुळे जगात पुढे येत असलेला भारत पिछाडीवर जाऊ शकतो हे जनतेने ध्यानात घ्यावे.