२५/०३/२०२१

Common mans views on 100 Crore extortion allegation by ex COP, Mumbai

 हे त कुबेरच असतीन भाऊ


इकास गिकास रायला न बे बाजूले अन याईचा तर सोताचाच इकास चालू असते गड्या. म्या तेच म्हनतो की सायीच याईच्या कडे इतल्या झकास गाड्या , अन हे मोठाले घर , ह्या जमिनी, कसच काय जमते ? सायीच आपन शेतीत घाम गायतो , आपल्याले कधी पीक येते तर कधी नाय , ना पिकाले भाव भेटते , लाख भर रुपये बी नायी पायले राजा म्या आजलोक अन हे सायीच शंभर करोड ऐकून त माये डोयेच फिरले न गड्या.

माझा एक खेड्यातील मित्र मला परवा संध्याकाळी घराजवळच फिरत असतांना भेटला. राम-राम झाल्यावर, थोडेफार ख्याली-खुशाली , राजकारण असे बोलणे झाले. मग तो म्हणाला "शंभर कोटी घेतात मंजे हे त कुबेरच असतीन भाऊ." तो बोलत होता मी ऐकत होतो. "अनिल भाऊ देशमुख याईच्यावर म्हने त्या परमवीरसिंगन लेटरबॉम्ब टाकला. म्या त अचंबितच झालो गड्या. कस काय करत असतीन हे जुगाड बे ? अरे याईले लेका निवडून देते लोक , कायच्यासाठी रे ? तो इकास गिकास रायला न बे बाजूले अन याईचा तर सोताचाच इकास चालू असते गड्या. म्या तेच म्हनतो की सायीच याईच्या कडे इतल्या झकास गाड्या , अन हे मोठाले घर , ह्या जमिनी, कसच काय जमते ? सायीच आपन शेतीत घाम गायतो , आपल्याले कधी पीक येते तर कधी नाय , ना पिकाले भाव भेटते , लाख भर रुपये बी नायी पायले राजा म्या आजलोक अन हे सायीच शंभर करोड ऐकून त माये डोयेच फिरले न गड्या. आमची बायडी म्हने पाय न जमते क्या तुमाले घुसा न राजकारनात. आता इले काय सांगता किती सतरंज्या उचला लागतात. काई काई त नीरा सतरंज्या उचलत रायतात अन हे पुढारी यायच्याच घरचा एखांदा पुढ करतात वक्तावर मंग आपल्या सारखा बसते न बोंबलत. फिरत रायते नीरा भैकान्यावानी मंग. ते म्हने मंग याईच जुगाड कसं काय जमते मंग ? मी म्हनल राजकारनात कायले जायचं व हा असा पैसा कमवायले का ? ते जाऊ दे तू च्या आन बर. तीनं च्या आनला गड्या मले त कपाची दांडी फुटेल . मी म्हनल च्या मारी आपल्या कडे च्याले कप नायी , सा-याइचे पोर लगे इंग्रजी शाळेत जातात आपल्या पोराईले झेड पी त जा लागते , त्याईले कपडे नायी , बायकोले साड्या नायी अन हे त करोडो त खेळून रायले न बे सांग न मले कायी गड्या." त्याचे बोलणे सुरुच होते मी निरुत्तर होऊन ऐकून राहिलो होतो. मान डोलवत होतो. "अरे बाबा आता काय बोलणार. सत्तेपुढे शहाणपण चालत नाही." मी उत्तरलो . "शानपन चालत नायी मंग आपन काय असच दलीनदरीत राह्याच अन याईनं श्यानशौक क-याचे का ? तो. मी पुन्हा गप्प. तो बोलतच होता , रागात होता ,वाड-वडीलां पासून गरीबीत जीवन जगलेला तो भ्रष्टाचार , खंडणी वसुलीच्या या बातम्या ऐकून वैतागला होता. त्याच्या मनातील पूर्ण भडास निघू द्यावी म्हणून मी केवळ शांतपणे त्याचे ऐकत होतो. "तू काऊन कायी बोलत नायी गड्या ?" तो म्हणाला. “अरे बाबा काय बोलणार तुला आठवते का आपण लहान होतो तेंव्हा हर्षद मेहताने पंतप्रधान नरसिंहराव यांना 1 करोड रु असलेली सुटकेस दिली होती. अरे भ्रष्टाचाराचे अशी कितीतरी उदाहरणे आपल्या देशात आहेत क्वचितच काही नेत्यांना शिक्षा झाली आहे. आता या शंभर करोड वसुली प्रकरणात सचिन वाझे हा जो आरोपी आहे हा निलंबित होता. तरी त्याला पुन्हा पोलीस खात्यात आणले गेले. तो मर्जीतला होता, एखादा सामान्य कर्मचारी होऊ दे बर निलंबित त्याला कोणी विचारत नाही. देशहीत कमी आणि स्वहित जास्त असे हे आताचे राजकारण आहे बाबा.” मी पुन्हा उत्तरलो. "पन लेका आपल्याले जे निवडून देतात त्या मतदाराईची काय गत आहे , त्याईची हालत कशी हाय याचा कायी इचार याईन करायले पायजे का नायी ? नीरा पैस्याच्या मागे लागून रायले न बे. अठी लेका मानूस गरीबीन परेशान त्यात हा करोना इषाणू , सॅॅनीटायझरच्या बाटल्या, मास्क यातच पैसा चालला अन हे या महामारीत बी करोडो कमाऊन रायले. बाबासाहेबाच , शाहू , फुले , सारख्या सा-याच मोठ्या लोकाईचे नांव घेऊ-घेऊ बंगले बांधून रायले , त्याची दुरुस्ती बी सरकारी पैस्यात करू रायले. कुटी घेऊन जानार बे इतल सारंं ? सायीच आपल्याले अडाणी मानसाले हे समजते याईच्या डोक्यात कुटून हे पैश्याच भुत घुसते काय ठाव?" त्याची ती उद्विग्नता , नैराश्य, नेत्यांचा थाट-माट, पैसा अन जनतेची गरीबी हे पाहून तो जे बोलत होता ते बोलणे अगदी सत्य होते पण करणार काय ? या देशात असे कितीतरी गरीब लोक आहेत बिचारे इमानदारीने जीवन व्यतीत करीत आहेत. मध्यमवर्गीय कराचा भरणा करीत आहे. परवा तर एका भिकारी स्त्रीने विद्युत बील भरले. ही बातमी ऐकून तर मला त्या भिकारी स्त्री बद्दल आदर निर्माण झाला. कुठे सरकारी निवासस्थान सोडायला सांगितल्या वर तिथे तोडफोड करणारे, विद्युत बिले थकवणारे हे नेते अन कुठे ती भिकारी स्त्री. शेवटी मी त्याला म्हटले "जाऊ दे बाबा काय करणार ?" तो म्हणाला "बर गड्या जाऊ दे " वर बोट दाखवून तो म्हणाला " पन हे भ्रष्टाचारान कुबेर होयेल हाय , हा पैसा पचत नायी , देव बरोबर करते , भरतेच न पापाचा घडा कधीना कधी, चाल जातो गड्या आता, उद्या बुडा बुडीले लस साठी आनतो सरकारी दावखान्यात" असे म्हणून तो जाऊ लागला व मी अनितीने पैसे कमावणारे  भ्रष्ट नेते, नोकरशहा व गरीबीत सुद्धा नितीने राहणारे लोक यांचा विचार करत घराकडे जाऊ लागलो.

२४/०३/२०२१

Article on sad demise of a friend due to Covid-19

 दिनुचे_जाणे 

सर्व मित्रपरिवार व कुटुंबियांना धक्का देणारी, वेदना देणारी बातमी म्हणजे दिनुच्या जाण्याची. माझ्या भाच्याने मला जेंव्हा त्याच्या निधनाचा मेसेज केला तेंव्हा मला मोठा धक्का बसला , दु:ख झाले. दिनु म्हणजे खामगांव डाक विभागात कार्यरत दिनेश बोडखे #DineshBodkhe . दिनुच्या आणि आमच्या परिवाराचा 40 किंवा त्याहुनही अधिक वर्षांपासूनचा परिचय. लहानपणी माझी व दिनुची फारशी मैत्री नव्हती. आमची मैत्री फार उशीरा झाली. तसा तो माझ्या काकांचा मित्र. दोघांच्या वयात मोठे अंतर असले तरी दृढ मैत्री होती. काकांबद्दल त्याला फार आदर होता. दिनुचे वैशिष्ट्य म्हणजे दिलखुलास व्यक्तिमत्व , चांगले संवाद कौशल्य , अनेकांशी मैत्री , कोणतेही काम यशस्वीतीकडे नेण्याचे कौशल्य, गाड्या चालवण्याची , प्रवास करण्याची प्रचंड आवड. राहणीमान एकदम टापटीप, डोळ्यावर गॉगल , पायात बुट, ड्रेस , राहणे अगदी एखाद्या हिरो सारखे होते. पोस्टाने त्याच्या उल्लेखनीय कामकाजाचा प्रमाणपत्र देऊन गौरव सुद्धा केला होता. दिनु सर्वांच्या मदतीस तत्पर असे. एकदा मला अकोट पोस्ट ऑफिस मध्ये महत्वाचे काम होते. लवकर पोहोचणे आवश्यक होते. दिनु म्हणे “चल न बे मै हुं ”. त्याने बरोबर दोन्ही ऑफिसमध्ये बोलणे केले व त्याच्या आवडत्या MAX 100 गाडीवर आम्ही अकोटला गेलो होतो. येण्यास रात्र झाली होती. तेंव्हा मोबाईलचे आगमन झाले नव्हते. बाईक वर किशोरकुमार , अमित कुमारची गाणी म्हणत आम्ही आलो होतो.तो   गाडी एकदम condition मध्ये ठेवत असे. नंतर त्याने बुलेट पण घेतली होती. हिंदी गाणी, प्रवास, ड्रायव्हिंग हे त्याचे व माझे समान आवडीचे विषय. त्याला भेटले की खुप गप्पा व अनेक किस्से तो सांगत असे. माझ्या काकांच्या मृत्यूनंतर त्याच्या व माझ्या भेटी गाठी कमी झाल्या. मला एक दिवस त्याची आठवण आली मी लगेच पोष्टात गेलो. "Good Morning , बोलो बॉस , कसा काय इकडे , काय काम आहे?" तो म्हणाला. "अरे फक्त तुलाच भेटायला आलो , काही काम नाही" असे मी म्हटल्यावर त्याला खूप आनंद झाला होता. त्याला केंव्हाही भेटलो की तो Good Morning म्हणत असे. खुप गप्पा-टप्पा झाल्यावर मी निघायला लागलो तर “अबे बस” तो अनेकदा असा आदेश दिल्यासारखा बोलत असे. मग आणखी थोड्यावेळ बसलो होतो. त्यानंतर मागच्या वर्षी माझ्या भाच्याला पोस्टाचे कॉल लेटर आले, भाचा बाहेरगावी होता तेंव्हा दिनुने ते पत्र त्याच्या पर्यंत पोहचवण्याची शक्कल काढून खूप मदत केली होती. त्यानंतर सर्व प्रक्रिया पार पडून भाचा पोष्टात रुजू झाला. आता काही दिवसांपुर्वी कोर्टासमोर आम्ही समोरा-समोर आलो. तो त्याच्या कार मध्ये मी बाईकवर मग आमचे फक्त स्माईल झाले होते. मला काय माहित हीच आमची दोन मिनिटांची भेट शेवटची भेट असेल. त्याचे व माझे अनेक मित्र common आहेत त्यामुळे अनेकांचे फोन आले , सर्वच त्याच्या जाण्याने शोकसागरात बुडाल्याचे जाणवले. दिनु अचानकपणे प्रवासाला जात असे. फोन केला की अरे मी इकडे आहे , मी गाडीत आहे असे उत्तर येई , कधी कार मधून सुसाट वेगाने जातांनाचा व्हीडीओ येई. त्याच्या या अशा अचानक प्रवासाला जाण्याचे अनेकदा आश्चर्य वाटे. आज सुद्धा अंतिम प्रवासाला जातांना त्याने तसेच केले. कोरोना विषाणूची लागण व त्याचे शरीरात मोठ्या प्रमाणात संक्रमित झाल्याने दिनु गेला. दिनुचे हे असे अचानक जाणे त्याच्या परिवारास समस्त मित्र परिवाराला मोठ्या वेदना व धक्का देऊन गेले. या धक्क्यातून सावरण्यास ईश्वर त्याच्या कुटुंबियांना बळ देवो. दिनुलाही शब्दरुपी श्रद्धांजली अर्पण 🙏



०६/०३/२०२१

Article about Hon. Chief minister speech in budget session

तुमचे हिंदुत्व जनतेला चांगलेच ठाऊक आहे. 

हिंदुत्व हे एकच आहे ते शेंडी जानव्याचे आणखी अमुक तमूकचे असे नाहीच या देशातील सर्व जाती धर्मांना जो आपले मानतो ,देशहित प्रथम असे जो मानतो तो हिंदू. तुमचे हिंदुत्व कसे आहे हे आता सर्वांनाच चांगलेच ठाऊक झाले आहे , जनता आगामी काळात तुम्हाला ते दाखवेलच. 

      सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. मा. मुख्यमंत्री यांनी सभागृहात भाषण केले. या भाषणात त्यांनी ब-याच गोष्टींवर भाष्य केले. राज्याच्या अर्थसंकल्पीय भाषणात महाराष्ट्र राज्या बाबत अत्यल्प व इतर बाबींवरच त्यांनी ऊहापोह केला. चीन समोर पळ काढला , विरोधी पक्षाची मातृसंस्था स्वातंत्र्य लढ्यात नव्हती अशी विधाने त्यांनी केली. स्वातंत्र्यलढ्यात असणे म्हणजेच देशभक्त असणे असे आहे का ? स्वातंत्र्य लढ्यात होते त्यांनी काय केले पुढे ? संरक्षण खात्यातील जीप घोटाळा , नगरवाला प्रकरण , सुटकेस , कोळसा , स्पेक्ट्रम , नॅशनल हेरॉल्ड कित्येक अशा घोटाळ्यांचे आरोप स्वातंत्र्य लाढ्यात असणा-यांवर व त्यांच्या पुढील पिढ्यांवर झाले हे सुद्धा तितकेच खरे आहे. विरोधी पक्ष नेत्यांनी या भाषणाचा “चौकातील भाषण” असा उल्लेख केला तो योग्यच वाटतो. या भाषणातील अनेक बाबी खटकल्या त्यातील एक वाक्य म्हणजे “आमचे हिंदुत्व हे शेंडी जानव्याचे हिंदुत्व नाही”. या प्रसंगी मा. मुख्यमंत्र्यांना पदावर आरुढ होतांना सर्व जनतेला समदृष्टीने पाहिल अशा आशयाची जी प्रतिज्ञा असते त्याचे विस्मरण झाल्याचे दिसले. त्यांच्या या वक्तव्यावर शिवरायांचे नाव घेणा-या त्यांना आदर्श मानणा-या तसेच आपल्या वक्तव्यातून जातीयवाद , सामाजिक तेढ निर्माण करणा-या तसेच एखाद्या विशिष्ट जाती बद्दल नेहमीच आकस बुद्धीने पाहणा-या तथाकथीत नेत्यांनी स्तुतीसुमने उधळली. स्वत: मुख्यमंत्री व त्यांचा पक्ष हा शिवरायांना आपला आदर्श मानतो. शिवरायांनी सर्वांना समदृष्टीने पाहिले अठरापगड जातींना भागव्या झेंड्याखाली एकत्र आणले. तुमच्या भाषेत बोलायचे तर त्यांच्या मंत्री मंडळात व सहका-यांत सुद्धा कित्येक शेंडी जानवी होतीच. ज्यांना तुम्ही आदर्श मानता ते स्वत: समस्त जातींना बरोबर घेऊन चालत होते व शेंडी जानव्याचा आदर करीत होते. असे मी नाही म्हणत तर असे इतिहासच सांगतो , याचे अनेक ऐतिहासिक दाखले आहेत. कविराज भूषणच्या कवितेतील ओळींमधून हेच प्रतीत होते

वेद राखे विनीत पुराण प्रसिद्ध राख्यो | रामनाम राख्यो अति रचना सुधीर मे |

हिंदून की चोटी राखी रोटी राखी है सिपहन की | कंधे पे जनेऊ राख्यो माला राखी कर मे |
मोडी राखी मोगल मरोडी राखी पातशाह | बैरी पिसी राख्यो वरदान राख्यो कर मे |
राजन की हद राखी तेजबल शिवराय | देव राखे देवल स्वधर्म राख्यो घरमे ||

तुम्ही सतत छत्रपती शिवाजी महाराजांचे दाखले देत राहता , त्यांच्या नावावर तुमचे राजकारण चालते , तुमचा पक्ष उभा राहिला. ज्या शिवरायांना तुम्ही तुमचे आदर्श मानता ते तर

हिंदून की चोटी राखी रोटी राखी है सिपहन की | कंधे पे जनेऊ राख्यो माला राखी कर मे | 

अर्थात शेंडी जानव्याचे रक्षण करणारे होते. या ओळींची आठवण करून देणे यासाठी क्रमप्राप्त ठरते की आपण राज्याचे प्रमुख आहात. आपल्याला सर्व जनता सारखी वाटली पाहिजे , आपण आज ज्याप्रकारे सत्तेत आलात त्यामुळे आपल्याला सतत हिंदुत्व सोडले नाही , आमचे हिंदुत्व कसे आहे हे सांगावे लागत आहे पण  हे सांगण्यासाठी आपण जातीवाचक उल्लेख करणे योग्य नव्हे. मनोहर जोशी , सुधीर जोशी , हेमचंद्र गुप्ते , माधव देशपांडे इ अनेक नेते आपल्याच पक्षाने दिली आहेत. हिंदुत्व हे एकच आहे ते शेंडी जानव्याचे आणखी अमुक तमूकचे असे नाहीच या देशातील सर्व जाती धर्मांना जो आपले मानतो ,देशहित प्रथम असे जो मानतो तो हिंदू. तुमचे हिंदुत्व कसे आहे हे आता सर्वांनाच चांगलेच ठाऊक झाले आहे , जनता आगामी काळात तुम्हाला ते दाखवेलच.

०४/०३/२०२१

Article about society support to misdoing by politicians

 धोकादायक पायंडा पडण्याची शक्यता

मागे एका अतिरेक्याच्या अंत्यविधीच्या वेळी मुंबईत मोठा जमाव गोळा झाला होता. देशविरोधी , अनेकांच्या हत्येचे पातक असलेल्याच्या मागे त्याचा समाज कसा काय उभा राहू शकतो किंवा एकत्रित येऊ शकतो ? गुंड जामिनावर सुटला की त्याची मिरवणूक निघते. एखाद्या व्यक्तीच्या संशयास्पद मृत्यूची सुई ज्याच्यावर येऊन थांबते त्याच्याही पाठीशी त्याचा समाज कसा काय उभा राहू शकतो? कायदेशीर प्रक्रियेने जर तो आरोपी निर्दोष आढळला तद्नंतर जर समाजाने त्याचे गुणगान केले , समर्थन केले तर ते समजू शकते.

गुन्हे हे अनादी अनंत काळा पासून घडत आले आहेत. काल परत्वे नियम , कायदे बदलत गेले व त्यानुसार शिक्षा सुद्धा बदलत गेल्या. शिवाजी महाराजांनी रांझाच्या पाटलाने बलात्कार केला म्हणून त्याचा चौरंगा केला होता. अशी शिक्षा आता होणे शक्य नाही. जरी तेंव्हा राजेशाही असली तरी रांझाच्या त्या आरोपीच्या मागे तेंव्हा त्याच्या समाजातील  कुणी उभे राहिले नव्हते. पुतण्याच्या हत्येच्या आरोपाखाली स्वत:च्याच पालनहाराला अर्थात रघुनाथरावांना देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा रामशास्त्री प्रभूणे यांनी ठोठावल्यावर रघुनाथरावाच्या समाजाने प्रभुणे यांना सल्ले दिले नव्हते. मात्र या झाल्या आपल्या गौरवशाली अशा ऐतिहासिक गोष्टी. एक म्हण आहे पुराणातील वानगी (वांगी नव्हे) पुराणातच. पुराणातील कितीही चांगले दाखले आपल्यासाठी असले तरी त्यातून शिकणारे , आदर्श घेणारे फार थोडे असतात. सद्य स्थितीतील राज्याच्या राजकारणात ही म्हण तंतोतंत लागू पडते हे आपल्याला काही लोकप्रतिनिधींच्या प्रतापावरून दिसूनच येत आहे. कुणी एखाद्याने काही टिप्पणी केली तर त्याला मारझोड करणे,  मेसेज फॉरवर्ड केला तर ठोकणे , काहींचे माहिलांशी नाव जोडले जाणे अशी एका पाठोपाठ एक प्रकरणे सुरूच आहेत. लोकशाहीचा पुरेपूर दुरुपयोग घेणे आता आपल्या देशात सुरु झाले आहे. म्हणूनच मागे एका अतिरेक्याच्या अंत्यविधीच्या वेळी मुंबईत मोठा जमाव गोळा झाला होता. देशविरोधी , अनेकांच्या हत्येचे पातक असलेल्याच्या मागे त्याचा समाज कसा काय उभा राहू शकतो किंवा एकत्रित येऊ शकतो ? गुंड जामिनावर सुटला की त्याची मिरवणूक निघते. एखाद्या व्यक्तीच्या संशयास्पद मृत्यूची सुई ज्याच्यावर येऊन थांबते त्याच्याही पाठीशी त्याचा समाज कसा काय उभा राहू शकतो? कायदेशीर प्रक्रियेने जर तो आरोपी निर्दोष आढळला तद्नंतर जर समाजाने त्याचे गुणगान केले , समर्थन केले तर ते समजू शकते परंतू त्याचे निर्दोषत्व सिद्ध होण्याच्या आधीच केवळ तो आमचा नेता आहे आमच्या समाजाचा आहे म्हणून दबाव आणणे हे कितपत योग्य आहे ? एखाद्या आरोपीच्या मागे उभे राहणे हे संवैधानिक आहे का ? लोकशाहीत समाजाचा आधार घेऊन विविध पदे प्राप्त केली जातात, राजकारणाच्या पाय-या चढल्या जातात, बंगले, तरण तलावा सारख्या सुविधा असलेले बंगले बांधले जातात , शेकडो एकर जमिनी खरेदी होतात व मोठी मालमत्ता प्राप्त केली जाते व नंतर त्याच समाजाला सत्ता व अर्थसत्तेव्दारे आपल्या दावणीला बांधले जाते. हे कसे काय होते ? राजकारणी लोक त्यांच्या स्वत:च्या जातीचा, समाजाचा आपल्या सत्ताप्राप्ती व तद्नंतर आपली दुष्कृत्ये लपवण्यासाठी  पुरेपूर उपयोग करून घेत आहेत. हे सध्याच्या राजकारणावरून दिसून येत आहे. निवडणूकीत प्रतिज्ञापत्र सादर करतांना सर्रास खोटी माहिती सादर केली जाते ते उघडकीस आल्यावरही कुणी काहीही बोलत नाही. एखाद्यावर आरोप झाल्यावर त्याच्यावर कारवाईची मागणी करणा-यांना सुद्धा इशारे दिले जातात. हे काय चालले आहे ? हे सर्व कशामुळे होते आहे तर अद्यापही आपल्या स्वार्थासाठी राजकारण्यांनीच टिकवून ठेवलेली जाती व्यवस्था , वर्गवारी. आपल्या मतपेढ्या बळकट करण्यासाठी राजकारण्यांनी जातीवाचक संघटना , विविध समाजांच्या संघटना, विविध जातींची समाज भवने इ. जातीभेद कायम राहील अशा अनेक गोष्टी निर्माण केल्या. शाळकरी मुलांना अगदी बालवयातच जात माहित होते. याच जातिभेदाचा फायदा हे राजकारणी आपल्या पोळ्या शेकण्यासाठी करतात व भोळा भाबडा समाज त्यांच्या मागे उभा ठाकतो. भारताला या जातिव्यवस्थेचा गंभीर परिणाम भविष्यात नक्कीच भोगावा लागेल असे आता वाटू लागले आहे. अगदी सुरुवातीपासूनच आरोपीच्या मागे उभे राहणे म्हणजे पुढील कायदेशीर बाबी , न्यायालयीन प्रक्रिया यावर सुद्धा त्याचा हमखास प्रभाव पडेल. यत्कदाचीत एखादा आरोपी यातून गुन्हा असतांनाही सहीसलामत सुटला तर त्याचा फायदा भविष्यात तत्सम कृत्य करणा-याला सुद्धा घेता येऊ शकेल. या सर्व बाबींचा समस्त सुज्ञ व सुशिक्षित जनतेनी, अधिकारी वर्गानी , हुशार व देशहितैषी राजकारण्यांनी विचार केला पाहिजे. आता असा विचार होणे अत्यंत गरजेचे झाले आहे. सरकारने या बाबतीत गांभीर्याने विचार करणे जरुरी आहे. अर्थात तसा होईल की नाही सांगता येत नाही याचे कारण सुद्धा वरील बाबींवरून लक्षात आलेच असेल. आपले राज्य , आपला देश यांचे भविष्य उज्वल झाले पाहिजे. आगामी पिढ्यांनी आपल्याला द्रष्टे , विकासाभिमुख , सच्चे देशप्रेमी म्हणून ओळखले पाहिजे असा विचार राजकारणी लोकांच्या मनात येतो की नाही देव जाणे. जनतेने नीरक्षीरविवेक बुध्दी जागृत ठेवावी. कुणाची पाठराखण करावी व कुणाची नाही याचा विचार तमाम जनतेने करायला हवा. अन्यथा धोकादायक पायंडा पडण्याची शक्यता आहे व त्याचे गंभीर परिणाम आपल्या देशाला व आगामी पिढ्यांना भोगावे लागतील.