२९/०४/२०२१

Memories of a tea stall , where owner was called as Tailor.

 टेलरचा चहा

संग्रहित चित्र 

कॉलेज मध्ये जाता-येता आम्ही कित्येकदा याच हॉटेलवर कचोरी, चहा घेण्यासाठी म्हणून थांबत असू. खुप गप्पा व धमाल होत असे. यात हॉटेल मालकाचा सुद्धा सहभाग असे. हळू-हळू मालकाशी परिचय वाढत गेला. मैत्रीचे संबंध प्रस्थापित झाले. कधी काळी त्यांनी आयोजित भोजन कार्यक्रमात सुद्धा जाणे झाले. कॉलेज जीवनातील हा आमचा कट्टा होता.

     सध्या जगभर कोरोना महामारी आहे. वाहिन्यांचे सततचे नकारात्मक बातम्यांचे प्रक्षेपण करणे, राजकारण्यांचे भीषण परिस्थितीतही चालले असलेले राजकारण या सर्वांमुळे मानसिक स्थिती ढासळते आहे. मनाला जर चांगले खाद्य मिळाले तर त्याने सुद्धा प्रसन्न चित्तवृत्ती होऊन आपण संकटांचा सामना करण्यास सिद्ध होतो. दिवसातील कितीतरी वेळ नकारात्मक बातम्यांचेच चिंतन आपसूकच होत असते. आज गुरुवार लेख लिहिण्याचा दिवस. मनात वरील सर्व बाबी होत्याच तेवढ्यात सौ ने चहा आणला. चहाच्या घोटा सोबत शून्यात पाहत काय लिहावे असा विचार सुरु होता. चहाचा कप हातातच होता चहाची वाफ माझ्या चष्म्यावर आली , काहीही दिसले नाही. कुण्यातरी प्रथितयश अशा व्यक्तीने सुध्दा मित्रांसोबत टपरीवर चहा घेण्यात जी मजा आहे त्याची सर इतर कुठे चहा घेण्यात नाही असे वक्तव्य केल्याचे मला स्मरण झाले आणि तो क्षण मला गतकाळातील मित्रांसह घेत असलेल्या चहाच्या आठवणीत घेऊन गेला. होय त्याच टेलरच्या चहाच्या आठवणीत.  

गो से महाविद्यालय खामगांव येथे नुकताच प्रवेश घेतला होता. त्याच काळात नांदुरा रोड जवळील बी एस एन एल च्या कार्यालया जवळ एक चहाची टपरी सुरु झाली होती. कॉलेज जीवनात चहा म्हणजे सर्वात लोकप्रिय पेय. सहज म्हणून एक दिवस आम्ही या दुकानात चहासाठी म्हणून थांबलो. चहा चांगला होता. तेंव्हा हे हॉटेल थोडे खड्ड्यात होते. आता रस्ता रुंदीकरणामुळे ते रस्त्यास समतल असे आहे. “राजेंद्र मुखशुद्धी कॉर्नर” असे नांव होते. चहा चांगला वाटला. मग कॉलेज मध्ये जाता-येता आम्ही कित्येकदा याच हॉटेलवर कचोरी, चहा घेण्यासाठी म्हणून थांबत असू. खुप गप्पा व धमाल होत असे. यात हॉटेल मालकाचा सुद्धा सहभाग असे. हळू-हळू मालकाशी परिचय वाढत गेला. मैत्रीचे संबंध प्रस्थापित झाले. कधी काळी त्यांनी आयोजित भोजन कार्यक्रमात सुद्धा जाणे झाले. एक दिवस या हॉटेल मालकाला कुणीतरी टेलर म्हणून संबोधल्याचे ऐकले. टेलर संबोधन कशामुळे होते , का होते या भानगडीत आम्ही काही पडलो नाही व आजही ते माहित नाही. पण मग आम्ही सुद्धा त्यांना टेलरच म्हणू लागलो. दुकान चहा, नाश्त्याचे पण मालक टेलर असे ते अजब समीकरण होते ते. कॉलेज जीवनातील हा आमचा कट्टा होता. काही विद्यार्थी तर असे होते की त्यांचे सापडण्याचे ठिकाण म्हणजे ही टपरी होती. ते सदा न कदा इथेच दिसत. इथे तास न तास ते का बसत याची कारणे सुद्धा निराळीच होती. हे हॉटेल कॉलेजच्या हमरस्त्यावर असल्याने येणारे जाणारे सर्वच विद्यार्थी येथून दिसत असत. त्यामुळेच मग “किसी की एक झलक पानेके लिये" हे तास न तास बसतात असे त्यांच्याच कंपूतील एकाने सांगितले होते. याच काळात या टेलरच्या चहाची एक गंमत सुद्धा आठवते. तेंव्हा विवेक नावाच्या माझ्या मित्राकडे आम्ही गटाने अभ्यास करीत असू. एक दिवस अभ्यास झाल्यावर संध्याकाळी चहा पिण्यास जाण्याचे ठरले तेंव्हा “आजी कोणी आले तर आम्ही टेलर कडे गेलो म्हणून सांग” विवेक म्हणाला व आम्ही रवाना झालो. एक मित्र विवेक कडे गेला “आजी कुठे गेले सर्व ?” मित्र , “अरे ते सर्व शिंप्याकडे गेले” आजी उत्तरल्या. हा मित्र एक क्षण गोंधळला. एक तर या विवेकचे घर म्हणजे तेंव्हा गावाबाहेर होते आता कोणत्या शिंप्याकडे गेले सर्व असा प्रश्न त्याला पडला. पण दुस-याच क्षणी त्याची “दिमाग की बत्ती जल गयी” व त्याने आम्हाला बरोबर शिंपी अर्थात टेलरच्या टपरीवर येऊन गाठले होते. त्यानी आम्हाला हा किस्सा सांगितल्यावर एकच हशा पिकला होता.           

   आज खामगांवात चहाची अनेक दुकाने उघडली आहेत. आकर्षक , सजावट , अंतर्गत रचना state of the art असा लुक असलेली. पण टपरीवरचा चहा तो टपरीवरचा चहा हे अनेकांना पटते. याचे कारण कुणास ठाऊक काय आहे ? तो चहा काही स्वस्त असतो असेही नाही पण मनसोक्त बसता येते, नैसर्गिक वातावरण असते, आपुलकीने विचारणा होते ही कदाचित टपरीच्या चहाच्या पसंतीची कारणे असतील. कालांतराने सर्व मित्र आपआपल्या प्रपंचात व्यस्त झाले , इतस्तत: विखुरले , टेलरच्या टपरीवर जाणे आपोआप कमी झाले पण आजही खामगांव सोडून गेलेले मित्र खामगांवला येतात, येण्याआधी किंवा आल्यावर फोन करतात. भेटण्याचे ठिकाण मात्र तेच पुर्वीचे असते. ते म्हणजे टेलरचे चहाचे दुकान मग चहाच्या घोटासोबत अनेक आठवणी व गप्पांचे घोट सुद्धा रिचवले जातात. या गप्पांमध्ये टेलर सुद्धा सामील होतात.

सद्यस्थितीत तर आपल्या सर्वांनी घरीच राहणे हाच एक चांगला उपाय आहे. कोरोना विषाणू मुळे आज जरी पुर्वीसारखे मोकळेपणे कुठे जाता येत नाही, मित्रांना भेटता येत नाही तरी आज जर काळजी घेतली तर आपला आगामी काळ सुखाचा होणार आहे व नंतर चहा पित बसलेल्या मित्रांच्या गप्पा , दडपण रहित फुललेल्या बाजारपेठा असे चित्र दिसू लागेल. 

२४/०४/२०२१

Why closed Municipal Highschool can't be used as hospital in corona pandemic , article about this

 म्युनसिपल हायस्कुलचा रुग्णालय म्हणून उपयोग व्हावा. 

सध्या कोरोना संक्रमणाची दुसरी मोठी लाट आली आहे , रुग्णांच्या संख्येचा आलेख चढता आहे. रुग्णालये अपुरी पडत आहेत त्यामुळे कोरोना संबंधित उपचारासाठी या जागेचा चांगला उपयोग करता येईल. 

    मुन्सिपल हायस्कूल अर्थात नगर परीषदेची शाळा. आम्ही शालेय जीवनात असतांना या शाळेचे नांव इंदिरा गांधी मुन्सिपल हायस्कूल असे बदलण्यात आले होते. खामगांव नगर परीषदेची स्थापना ही 1869 या वर्षातील म्हणजेच काही वर्षानंतर या शाळेची स्थापना झाली असेल. आता एक-दोन वर्षापुर्वी पर्यंत ही शाळा सुरु होती. आता ती पटसंख्ये अभावी बंद पडली. शाळा , शाळेचे स्वरूप , शिक्षण यात बदल करायचा असतो नांव बदलून काय होणार ? परंतू ज्यात बदल करायचा ते सोडून आपल्या देशात भलतेच बदल केले जातात. बदलत्या काळात मुन्सिपल शाळा काही बदलली नाही. हळू-हळू विद्यार्थी संख्या घटत जाऊन ती बंद पडली. 
         एकदा मी या शाळेच्या मैदानात फिरायला गेलो असता इंग्रजकालीन ती कौलारू इमारत सुद्धा खिन्न उभी असल्यासारखी वाटत होती. मोडलेले दरवाजे, खिडक्या असलेले वर्ग ब-याच दिवसांपासून विद्यार्थ्यांचा कोलाहल न ऐकल्याने आपल्या भकास स्वरूपाने त्रस्त भासत होते. सर्वत्र धुळ, पक्षांची विष्ठा व पिसे, असे घाणीचे साम्राज्य असलेल्या ज्या वर्ग खोल्यात येथील विद्यार्थी कधी-काळी नमस्कार करून प्रवेश करीत असतील त्या विद्येच्या मंदिराचे हे असे स्वरूप मी पाहत होतो.एकेकाळच्या खामगांव शहरातील या दिमाखदार ईमारतीची आज ही अशी अवस्था झालेली आहे. प्रशासनाने येथे सेमी इंग्रजी शाळा का काढू नये ? येथे इस्पीतळ किंवा सरकारी रुग्णालयाचा एखादा विभाग सुद्धा बनवता येईल, सरकारी रुग्णालय येथून जवळच आहे.  सध्या कोरोना संक्रमण दुसरी मोठी लाट आली आहे , रुग्णांच्या संख्येचा आलेख चढता आहे. रुग्णालये अपुरी पडत आहेत त्यामुळे कोरोना संबंधित उपचारासाठी या जागेचा चांगला उपयोग करता येऊ शकणार नाही का ?
     सरकारी मालमत्ता या सुरक्षित का राखल्या जात नाही ? प्रशासनाच्या असे काही विचाराधीन आहे की नाही ? कदाचित असेलही , नसल्यास कुणीतरी चांगला अधिकारी असा विचार करेल का? त्याला राजकारणी साथ देतील का ? की पुर्वाश्रमीची ग्रामीण भागातील , आर्थिक क्षमता नसलेल्या विद्यार्थ्यांना समावून घेणारी व त्या विद्यार्थ्यांना घडवणारी ही मुन्सिपल हायस्कूल आता अशीच राहील का ? ती अजून खचत जाऊन केवळ भग्नावशेष शिल्लक राहतील का , स्टेडीयम स्वरूपासारखी बनवलेली भिंत तर आताच खचली आहे. असे प्रश्न माझ्या मनात निर्माण झाले होते.
      आज कोरोना पिडित रुग्ण , त्यांचे नातेवाईक यांची हालत त्यांची मनस्थिती पाहून मन हेलावले आहे, शोकग्रस्त झाले आहे , या रुग्णांवर आलेल्या अवस्थेची कल्पना आपण करू शकत नाही तेंव्हा मायबाप सरकारने या शाळेचा या महामारीच्या संकटात रुग्णसेवे करिता उपयोग करून घेतला तर अनेक रुग्णांची सोय , गरिबांची सोय होऊ शकेल व पैस्यात तोलता येणार नाही असे त्या रुग्णांचे आशीर्वाद मिळतील.

२२/०४/२०२१

Article about the incident of 24 Covid Patients Death by Disrupting Oxygen Supply due to Tank Leakage

तडफडून मरणारे जीव आणि नाकर्ते शासन  




  सरकार कार्यक्षम असल्याचे चित्र जनतेला दिसणे अपेक्षित आहे परंतू याच्या अगदी उलट चित्र आहे लोक तडफडून मरत आहेत , महामारीच्या काळातही भ्रष्टाचार व काळाबाजार अशी प्रकरणे घडत आहेत. सरकार जरी कसे-बसे टिकून असल्याचे दिसत असले तरी मंत्री सहकारी पक्षातील आमदार हे आपल्याच पक्षातील नेत्यांची, मंत्र्यांची वक्त्यव्ये खोडत असतांना दिसत आहे त्यांना घरचा आहेर देतांना दिसत आहे. वरवर जरी सरकार दिसत असले तरी भ्रष्टाचार , काळाबाजार , तडफडून मरणारे जीव जातांना पाहून हे शासन नाकर्ते असल्याचे जनतेला स्पष्ट झाले आहे.

महाराष्ट्रात हे काय सुरु आहे.जगभरात कोरोना महामारी सुरु आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्रात  सुद्धा  कोरोनाच्या दुस-या लाटेने धुमाकूळ घातला आहे. रुग्णालये भरली आहेत , औषधांचा मोठा तुटवडा व काळाबाजार सुरु आहे. सत्ताधारी व विरोधक हमरीतुमरी वर येऊन भांडत आहेत. बोगस कोरोना रुग्णालये , बोगस डॉक्टर गल्ले भरून घेत आहेत. लॉकडाऊन , लॉकडाऊन करता करता मुख्यमंत्री लाइव्ह येण्याची हौस भागवून घेतात व लॉकडाऊन साठी दोन-दोन दिवसांची मुदत वाढवून घेतली. नेत्यांच्या घरी जाऊन लस टोचली जात आहे तर काही नेत्यांचे नातेवाईक वयाच्या मर्यादेचे बंधन तोडून लस घेत असल्याची वृत्ते येत आहे. जनता कोरोनाच्या , मृत्यूच्या सावटाखाली वावरत असतांना नेते मात्र स्वत:च्या पात्रात बरोबर तूप ओढून घेत आहे. दिशा सालीयानी , सुशांत सिंग यांची हत्या की आत्महत्या , रक्षकच भक्षक होत चालले असल्याचे शंभर कोटींची वसुलीचे प्रकरण , भंडारा अग्नितांडव , सरनाईक इडी चौकशी , संजय राऊत यांच्या पत्नीची इडी चौकशी अशा घटनांवर हळू-हळू पडदा पडत आहे किंवा योजनाबद्धरित्या पडदा टाकल्या जात आहे . या सर्व प्रकरणात मौन साधून उद्धव ठाकरे यांनी मौन साधण्यात मनमोहनसिंग यांचा विक्रम मोडला आहे. यातच काल नाशिक येथे झाकीर हुसेन रुग्णालयातील प्राणवायू गळतीची घटना होऊन योग्य दाबाने प्राणवायू न मिळाल्याने 20 पेक्षा अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नाशिकची ही घटना सरकारची व सरकारी यंत्रणांची नाचक्की करणारी घटना आहे. कोरोना रुग्णांसाठी तत्परतेने सोयी उभारण्याचा प्रत्यन केला जात आहे ते योग्य सुद्धा आहे. परंतू तत्परतेने ही कामे करतांना त्या कामाची गुणवत्ता तपासली जात आहे की नाही ? त्यात कुठे पाणी मुरते आहे का ? साधनांची गुणवत्ता चांगली आहे का ? साधने पुरवणारे कंत्राटदार , जोडणी करणारा कंत्राटदार योग्य पद्धतीने कामे करीत आहेत की नाही ? की नजराणे मिळाल्यावर काहीही तपासले जात नाही व कशी तरी कामे उरकली जात आहे ? नाशिक येथील घटनेबाबत मुख्यमंत्री , आरोग्यमंत्री यांनी शोक प्रकट केला आहे. परंतू आधी भंडारा , आता नाशिक आणखी असे किती घटनांवर शोक व्यक्त करणार आहे सरकार ? मुख्यमंत्री महोदय आपले सरकार केवळ शोकच व्यक्त करणार की रुग्णालयात आग , प्राणवायू गळती सारखी कालची घटना या घटनांना जबाबदार कोण आहे याची शहनिशा करून त्यांना कठोरात-कठोर शासन सुद्धा करणार ? भंडारा रुग्णालयातील अग्नि तांडवास जबाबदार कोण ? त्याची चौकशी कुठपर्यंत आली हे काहीही अद्याप पुढे आलेले नाही ? नाशिक येथील घटनेबाबत नाशिक महापालिका व सरकार अशी दोघांनीही मदत जाहीर केली आहे. ते योग्यच आहे. परंतू गेलेले जीव परत येतील का ? मृतकांच्या आप्तांची न भरून निघणारी हानी तुमच्या आर्थिक मदतीने कदापीही भरून निघणार नाही. महाराष्ट्रात योग्य उपचारा अभावी अनेक कोरोना मृत्यू झाले आहेत , भंडारा येथील रुग्णालयात झालेल्या अग्नितांडवात बालकांवर अकारण मृत्यू ओढावल्या गेला होता. काल नाशिक येथे सुद्धा प्राणवायू गळतीमुळे अनेक परीवारांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कित्येक कोरोना रुग्णांचा  रुग्णालयात सोयी नसल्याने , प्राणवायू उपलब्ध नसल्याने , रेमडीसिवीर सारख्या इंजेक्शनचा व इतर औषधांचा काळाबाजार होत असल्याने झालेल्या अनुपलब्धत्यामुळे सुद्धा मृत्यू होत आहे. कोरोना महामारीच्या काळात अनेक आत्महत्या सुद्धा होत आहेत. या आत्महत्येची कारणे सुद्धा कोरोना मुळे रोजगार , आर्थिक चणचण , मानसिक तणाव हे असण्याची दाट शक्यता आहे. या काळात खरे तर शासन गरीब जनतेला दिलास देत आहे , धीर देत आहे, केवळ बोलघेवडेपणा न करता योग्य ते निर्णय झटपट निर्णय घेऊन कार्यक्षम असल्याचे चित्र दिसणे अपेक्षित आहे परंतू याच्या अगदी उलट चित्र आहे लोक तडफडून मरत आहेत , महामारीच्या काळातही भ्रष्टाचार व काळाबाजार अशी प्रकरणे घडत आहेत. सरकार जरी कसे-बसे टिकून असल्याचे दिसत असले तरी मंत्री सहकारी पक्षातील आमदार हे आपल्याच पक्षातील नेत्याची, मंत्र्यांची वक्त्यव्ये खोडत असतांना दिसत आहे त्यांना घरचा आहेर देतांना दिसत आहे.. वरवर जरी सरकार दिसत असले तरी भ्रष्टाचार , काळाबाजार , तडफडून मरणारे जीव जातांना पाहून हे  शासन नाकर्ते असल्याचे जनतेला स्पष्ट झाले आहे.  

२०/०४/२०२१

Article about hatred speeches of leaders rather working in filed in this corona pandemic

 ...त्यापेक्षा गरीबाच्या तोंडात घास भरा


एखादा कोरोना बाधित होईल असे काही त्याच्या तोंडात भरण्यापेक्षा या कोरोना विषाणू महामारीच्या कठीण समयी जे दुर्बल आहेत, गरीबीने त्रस्त आहेत अशांच्या तोंडात घास भरा. त्याने तुम्हाला जनतेचा आशीर्वाद तर मिळेलच शिवाय ज्या लोकप्रियतेसाठी तुम्ही प्रयत्नशील असता तशी लोकप्रियता सुद्धा तुम्हाला प्राप्त होईल. 

     आपल्या देशातील नेते हे काय बोलतील याचा काही नेम नसतो. याबाबत कित्येकदा लिहून झाले आहे तरीही वारंवार लिहावेच लागते. रेमडीसीवीर , त्याचा काळाबाजार यावरून सत्ताधारी व विरोधक यांचे आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. याच पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याविरोधात सुद्धा अतिशय हीन असे वक्तव्य करण्यात आले. त्यावरून पुन्हा खडाजंगी सुरु झाली. “मुंहमे आया बक दिया” याप्रमाणे तोंडात येईल ते बोलून द्यायचे , नंतर सारवासारव करण्याचा केविलवाणा प्रयत्न करायचा , कार्यकर्त्यांना भडकवून द्यायचे , त्यांच्यात भांडणे लावून द्यायची , आपला नाकर्तेपणा लपवण्यासाठी जनतेचे लक्ष भलतीकडे वळवून द्यायचे. हे असे यांचे उपद्व्याप असतात. जनतेला उपदेशाचे डोस पाजणारे , युं करू त्यूं करू अशी पोकळ आश्वासने देणारे हे नेते काहीही विधायक कृती न करता , विकासाभिमुख कार्य धीम्या गतीने करत प्रक्षोभक , दर्जाहीन अशी वक्तव्ये करून कार्यकर्त्यांच्या पुढे आपण किती थेट बोलणारे आहोत असे दाखवण्याचा प्रयत्न करीत असतात. सध्या कोरोनाचे भीषण संकट आहे. या संकटात खरे तर शत्रूला सुद्धा कोरोना होऊ नये अशी सर्वांची मानसिकता झाली आहे तेंव्हा एखादा कोरोना बाधित व्हावा असे चिंतणा-या व्यक्तीची मानसिकता किती भयंकर असेल याची कल्पना येते. तसे पाहिले तर या कोरोना विषाणूच्या संकटाच्या काळात सर्वच पक्षांनी एकत्र येऊन जनतेला धीर देणे आवश्यक आहे , जनतेसाठी त्यांच्या सुविधेसाठी झटणे आवश्यक आहे. ते राहिले बाजूला आणि हे आपआपसातच लढत आहेत. जनता आधीच त्रस्त झाली आहे , व्यापा-यांची दुकाने बंद असतात , उद्योगधंदे ठप्प आहेत , अनेकांचा रोजगार गेला आहे , गरीबांवर उपासमारीची वेळ आहे. गत एक वर्षापासून जनता घरीच असल्याने मानसिक स्थिती सुद्धा ढासळत चालली आहे. या सर्वांकडे लक्ष देण्याऐवजी नेत्यांना मात्र आपसात लढणे सुचत आहे. तसेच हे दुस-या पक्षाच्या जेष्ठ नेत्याला कोरोना बाधित करण्याच्या संधीच्या प्रतीक्षेत आहे. या कठीण काळात अनेक संस्था , NGO हे जनतेच्या मदतीला धाऊन गेले आहेत. नेते मात्र जनतेच्या मदतीला धाऊन जात असल्याचे अभावानेच दिसते आहे. जनतेला बेड मिळत नाही , ऑक्सिजनचा तुटवडा आहे , रेमडीसीवीर सारख्या कोरोनांच्या औषधांचा तुटवडा आहे , काळाबाजार होत आहे , रुग्णांची व त्यांच्या रुग्णाच्या आप्तांची काय अवस्था आहे हे तेच जाणतात. या अशा परिस्थितीत खरे तर जाणत्या नेत्यांना नसेल काही मदत जमत तर निदान जनतेला धीर वाटेल अशी कृती करणे , अशी वक्तव्ये करणे अपेक्षित आहे परंतू यांचे सर्व लक्ष मात्र या भीषण परिस्थितीतूनही राजकारण कसे करता येईल याकडे लागलेले आहे. अनेक नेते थोर पुरुष , संत यांचे दाखले भाषणप्रसंगी देत असतात, त्यांच्या नावांनी भवने उभारत असतात. “शब्द बराबर धन नही” म्हणणारे संत कबीर , “आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने” असे म्हणणारे संत शिरोमणी तुकाराम महाराज यांनी जी चांगले बोलण्याची, चांगले शब्द वापरण्याची शिकवण दिली आहे ती मात्र हे नेते अंगिकारत नाही. या कोरोना आपत्तीच्या काळात नेत्यांनी एकत्र येऊन कोरोना विरुद्धच्या लढाईत अग्रेसर होणे गरजेचे आहे , जनतेला आधार देण्याची गरज आहे ते न करता निव्वळ “उचलली जीभ अन लावली टाळूला “ याप्रकारची वक्तव्ये देशभरातून नेते करतांना दिसत आहे. संत गाडगेबाबांनी “भुकेलेल्याला अन्न द्या” अशी जी शिकवण महाराष्ट्रवासियांना दिली आहे त्या शिकवणीला स्मरून , ही अशी वक्तव्ये टाळून एखादा कोरोना बाधित होईल असे काही त्याच्या तोंडात भरण्यापेक्षा या कोरोना विषाणू महामारीच्या कठीण समयी जे दुर्बल आहेत, गरीबीने त्रस्त आहेत अशांच्या तोंडात घास भरा. त्याने तुम्हाला जनतेचा आशीर्वाद तर मिळेलच शिवाय ज्या लोकप्रियतेसाठी तुम्ही प्रयत्नशील असता तशी लोकप्रियता सुद्धा तुम्हाला प्राप्त होईल. 

१७/०४/२०२१

Article on the sad demise of Pro Sumant Tekade a renown orator , public and motivational speaker

 प्रा सुमंत टेकाडे:- एका शिवदीपस्तंभाचे जाणे

भरकटलेल्या जहाजांना जसे दीपस्तंभ किना-याची दिशा दर्शवितो तसे आपल्या लेखणी व वाणीतून तरुणांना व समाजाला शिवाजी महाराजांचे गुण त्यांचा प्रेरणादायी असा इतिहास सांगून दिशा दाखवणा-या प्रा सुमंत टेकाडे या शिवदीपस्तंभास ही शब्द सुमनांची श्रद्धांजली.

आज सकाळी प्रा सुमंत टेकाडे निवर्तल्याची तीव्र क्लेशदायक अशी बातमी समाज माध्यमाव्दारे कळली. वर्ष 2019 मध्ये खामगांव येथील टिळक स्मारक मंदिराच्या शताब्दी महोत्सवा निमित्त सुमंतजी टेकाडे हे खामगांव येथे व्याख्यान देण्यास आले होते. टेकाडे यांची दर रविवारी तरुण भारत पुरवणीत प्रकाशित होणारी शिवदीपस्तंभ ही शिवाजी महाराज यांच्या इतिहासाबद्दलची लेख मालिका त्यावेळी वाचत होतो. त्यामुळे सुमंतजी यांच्या व्याख्यानाला जायचेच असे ठरवले होते व गेलो होतो. काय आवेशपुर्ण व्याख्यान होते ते. त्या वक्तादशसहस्त्रेशु अशा सुमंतजीनी श्रोत्यांना खिळवून ठेवणारे व्याख्यान दिले होते. प्रत्येक व्याख्यानानंतर ते शिवाजी महाराजांचा जयघोष करीत असत, शिवाजी महाराज दरबारात येतांना त्यावेळी जी मानवंदना दिल्या जात असत ती सुद्धा जशीच्या तशी अशी ते आवेशात देत असत. आजही त्यांची अनेक व्याख्याने त्यांच्या youtube चॅनलवर आहेत. अनेक तरुणांचा त्यांच्या या चॅनलला उदंड प्रतिसाद आहे. त्यांच्या या आकस्मिक जाण्याने महाराष्ट्रातील त्यांच्या चाहत्यांना मोठा आघात पोहोचला आहे. त्यांच्या देहत्यागानंतर त्यांच्या अनेक स्मृती तरळून गेल्या. खामगांव येथील व्याख्यानानंतर मी त्यांचेशी जुजबी असे संभाषण केले होते. त्यांनी अत्यंत मधुरभाषेत व विनम्रपणे सर्वांशी संवाद साधला होता. पुढे त्यांच्याशी त्यांच्या मोबाईल क्रमांकावर संवाद साधला होता. त्यांच्या व्याख्यानाबद्दल “कर्णतृप्त करणारे व्याख्यान” असा लेख लिहिला होता. तो त्यांनी वाचल्यावर आनंदाने मला आभार प्रकट करणारी प्रतिक्रिया पाठवली होती. व्याख्यानातील मुद्दे लेखात वाचल्यावर त्यांना खुप चांगले वाटल्याचे त्यांनी कळवले होते. मग त्यांचेशी अनेकदा संवाद होत गेला. कवि भूषण बद्दल त्यांनी लिहिलेल्या लेखावर मी पुनश्च लिहिल्यावर ते सुद्धा त्यांना आवडल्याचे त्यांनी कळवले होते. “राष्ट्रीय विचारावर लिहित रहा” असा सल्ला त्यांनी दिला होता. गत वर्षी त्यांनी “कोरोना विरुद्ध हर हर महादेव” अशी एक चित्रफित सुद्धा प्रसारित केली होती. तरुण भारत मध्ये आलेला माझा “भ्रमरहित पार्थ” हा लेख सुमंतजी यांनी पेपर प्रकाशित झाल्यावर रात्रीच मला पाठवला होता. नुकताच प्रभू श्रीराम विशेषांक “रामार्पण” यात सुद्धा माझा लेख आल्याचे त्यांनीच अंकाच्या अनुक्रमणिकेचे पान पाठवून मला सर्वप्रथम कळवले होते. अभ्यासू , व्यासंगी , चतुरस्त्र असे ते होते. अल्प अशा परिचया नंतर पुढे सुमंतजी व माझा संपर्क दृढ झाला होता. त्यांचे येणारे व्हिडीओ , कार्यक्रम यांची माहिती ते आवर्जून कळवत असत. एकदा त्यांच्या एका ऑनलाईन कार्यक्रमात मी सहभागी झालो होतो. प्रश्नोत्तराच्या वेळी माझा व्हिडीओ बंद होता पण मी प्रश्न विचारणे सुरु करताच “विनयजी बोला” असा त्वरीत प्रतिसाद त्यांनी मला दिला होता. एवढे मोठे वक्ते , लेखक , शिवचरित्राचे गाढे अभ्यासक , मोटीव्हेशनल स्पिकर असूनही ते तितकेच विनम्र होते. आता काही दिवसांपूर्वी मला शिवाजी महाराज यांच्या मुस्लिम अधिका-यांची भली मोठी नांंवे असलेला एक संदेश आला असता मी मार्गदर्शन म्हणून सुमंतजींना विचारले होते. त्यावर शिवाजी महाराज यांच्या एकूण 95 अधिका-यांमध्ये केवळ 2 मुस्लिम असल्याचे त्यांनी उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे सांगतिले होते. शिवाजी महाराजांचे वास्तववादी चित्रण ते आपल्या व्याख्यानातून करीत असत ,  शिवाजीराजांच्या ज्या गोष्टींचे पुरावे उपलब्ध आहेत त्याच बाबींचा उल्लेख ते आपल्या व्याख्यानातून करीत असत. काळाने असा वक्त्तादशसहस्त्रेशु हिरावून नेल्यामुळे प्रचंड अशी सामाजिक हानी झाली आहे. त्यांची अमोघ वाणी अनुभवाला आली , त्यांनी केलेले लेखन वाचनात आले हे त्यांच्या तमाम चाहत्यांचे भाग्य आहे.  हे काही जाण्याचे वय नव्हते. आज सुमंतजी जरी देह त्यागून गेले असले तरी त्यांच्या अनेक दृकश्राव्य चित्रफितींच्या माध्यमाने ते आपल्यातच आहेत. तरीही त्यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबीयांची व त्यांच्यावर प्रेम करणा-या अनेकांची न भरून निघणारी अशी हानी झाली आहे. ईश्वर त्यांच्या कुटुंबीयांना या धक्क्यातून सावरण्याचे बळ देवो. भरकटलेल्या जहाजांना जसे दीपस्तंभ किना-याची दिशा दर्शवितो तसे आपल्या लेखणी व वाणीतून तरुणांना व समाजाला शिवाजी महाराजांचे गुण व त्यांंचा प्रेरणादायी असा इतिहास सांगून दिशा दाखवणा-या प्रा सुमंत टेकाडे या शिवदीपस्तंभास ही शब्द सुमनांची श्रद्धांजली.

१५/०४/२०२१

Letter to Muncipal CO for water problem

मा. मुख्याधिकारी साहेबांना अनाहूत पत्र 

ज्ञानगंगा धरणाचे संग्रहित चित्र , 


प्रामाणिक करदात्यांना पाणीपुरवठ्यासारख्या सुविधा प्रशासनाने देणे हे प्रशासनाचे कर्तव्य आहे.  तसे पाहिले तर गेल्या दोन वर्षापासून खामगावला पाणी पुरवठा करणारे ज्ञानगंगा धरण हे पूर्णपणे भरले जात आहे. कित्येक वृत्तपत्रांनी गेल्या दोन वर्षांपासून धरणातील विपुल जलसाठ्याच्या बातम्या फोटोसह प्रकाशित केल्या आहेत. धरणात पाणी असूनही नागरिकांच्या घशाला मात्र कोरडच असते. ही मोठी शोकांतिका आहे.

मा. महोदय , 

खामगाव येथे गेल्या काही वर्षांपासून सात दिवसानंतर पाणीपुरवठा होत असतो या हिशोबाने पाहिल्यास. दर महिन्यास 4 वेळा असा हा पाणीपुरवठा होत असतो. हा पाणी पुरवठा हा कमी अधिक कालावधीचा असतो. महिन्यात चार वेळा नळ म्हणजे वर्ष भरात 48 वेळा नळाला पाणी येते. यातही कित्येकदा कधी विद्युत पुरवठा  अडचण तर कधी पाईप लाईन फुटणे याप्रकारच्या अडचणींमुळे पाणी पुरवठा होत नाही. कित्येक नागरीकांनी या  संदर्भात तक्रारी केल्या आहेत. नळाच्या पाण्यावर अवलंबून अशी कित्येक घरे आपल्या शहरात आहेत. शिवाय हे सर्व लोक प्रामाणीकपणे कर भरणारे आहेत. पुर्वी सर्वच भागात दैनंदिन पाणी पुरवठा होत असे . मला आठवते मी जेंव्हा जिजामाता मार्ग या सत्र न्यायालया जवळील परिसरात राहायला आलो होतो तेंव्हा विना मोटर 8 ते 10 फुट उंची पर्यंत पाणी चढत असे. परंतू 2000 दशकाच्या सुरुवातीच्या वर्षात मोठी टंचाई निर्माण झाली होती. त्या वेळेस पासून दैनंदिन होणारा पाणी पुरवठा जो बंद पडला तो कायमचाच. आता 7 दिवसांनी नळाला पाणी येते. करदात्या नागरिकांच्या समस्यांकडे कानाडोळा केला जातो. आता वर्ष 2021 च्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. प्रशासनाला उन्हाळ्यात  एप्रिल पासून ते जून पर्यंत असे एकूण केवळ बारा वेळा पाणी पुरवठा करायचा आहे. तेंव्हा निदान उन्हाळ्यात तरी पाणीपुरवठ्यात  खंड न पडावा अशी नागरिकांची इच्छा आहे. सध्या पाणी पुरवठा तसा सुरळीत आहे पण नळाला पाणी येणाच्या कालावधीत मोठे अंतर असते. निदान उन्हाळ्यात तरी सात दिवसांनी होणारा पाणीपुरवठा चार दिवसांनी करावा असे वाटते. खामगावातील अनेक भागात अनेक प्रामाणिक करदाते आहेत या प्रामाणिक करदात्यांना पाणीपुरवठ्यासारख्या सुविधा प्रशासनाने देणे हे प्रशासनाचे कर्तव्य आहे.  तसे पाहिले तर गेल्या दोन वर्षापासून खामगावला पाणी पुरवठा करणारे ज्ञानगंगा धरण हे पूर्णपणे भरले जात आहे. कित्येक वृत्तपत्रांनी गेल्या दोन वर्षांपासून धरणातील विपुल जलसाठ्याच्या बातम्या फोटोसह प्रकाशित केल्या आहेत. धरणात पाणी असूनही नागरिकांच्या घशाला मात्र कोरडच असते. ही मोठी शोकांतिका आहे. अनेक ठिकाणी लिकेजेस आहेत . ज्यातून हजारो लिटर पाणी वाया जात असते. घाटपुरी रोडने तर असे कित्येक लिकेजेस आहेत. एका लीकेजच्या  ठिकाणी तोट्या असलेले नळ आहेत परंतू तिथेही पाणी वाया जाते. तेंव्हा अशा सर्व बाबींवर माय-बाप सरकारने विचार करावा आणि निदान उन्हाळ्यात तरी पाणीपुरवठा खंडित न होईल याकडे लक्ष द्यावे तसेच तो चार दिवसांनी व्हावा अशी  काही उपाययोजना करावी. साहेब आपण या सर्व परिस्थितीचा सखोल अभ्यास करावा खामगावातील जुन्या-जाणत्या राजकारणी , पत्रकार तसेच जेष्ठ नागरिकांची याबाबत याबाबत बैठक बोलवावी महिलांना सुद्धा समाविष्ट करावे  . कोरोना मुळे भौतिक दुरतेचे पालन करायचे असल्यामुळे आपण झूम किंवा गुगल मिट वर अशी बैठक घेऊ शकता. असेही ऐकिवात आहे की खामगाव पाणीपुरवठा विभागात मनुष्यबळाची कमतरता आहे तेव्हा हे मनुष्यबळ कसे उपलब्ध करता येईल याचा सुद्धा विचार करणे आवश्यक आहे प्रशासनाला अडचणी नाहीत असे आमचे म्हणणे नाही परंतु नागरिकांसाठी तसेच इमानेइतबारे आपली पदरमोड करून कर भरणाऱ्या नागरिकांसाठी निदान पाणीपुरवठा तरी सुरळीत असावा, विपुल असावा अशी या करदात्यांची अपेक्षा असते. घरात पाणी नसले तर करमत नाही ,  नळाला पाणी  न येण्यामुळे कित्येकदा  महिला वर्गाच्या डोळ्यात मात्र पाणी असते  त्यामुळे स्थानिक प्रशासनाने या बाबतीत सखोल चिंतन करावे या लेखात जी मागणी केली आहे त्या मागणीला सकारात्मक दृष्टीकोनाने पाहावे व उन्हाळ्यात तसेच इतर वेळी इतर वेळीही विपुल व सुरळीत पाणीपुरवठा करावा हीच गेल्या अनेक वर्षापासून ची खामगाववासियांची  इच्छा आहे. 

        मी आजरोजी पावेतो खामगांवच्या पाणी समस्येबाबत अनेक लेख लिहिले आहेत ते माझ्या ब्लॉगवर उपलब्ध आहेत्त , अनेक पक्क्या पाण्याच्या विहिरी  खामगांवात आहेत त्यातून सुद्धा त्या विहिरी असलेल्या भागात पाणी पुरवठा केला जाऊ शकतो. त्या विहिरींची यादी सुद्धा ब्लॉग वरील लेखात मिळू शकते.  

            आपण वरील पत्रावर सकारत्मक विचार करून खामगांवकर नागरिकांना लवकरात लवकर सुयोग्य ,  विपुल व कायमस्वरूपी पाणी पुरवठा करावा अशी समस्त नागरिकांच्या वतीने आपणास नम्र व कळकळीची विनंती. 

लोड शेडींग च्या वेळा, दोन्ही टाक्या कशा भरल्या जातील यासाठी महावितरण अधिकारी यांचेशी समन्वय साधावा.

धन्यवाद 

११/०४/२०२१

Article about black market of Covid-19 medicine

 ये दुनिया है कालाबाजार

रेमडीसीवर या इंजेक्शनचा काळाबाजार सुरु आहे. ग्राहकांना हे इंजेक्शन उपलब्ध नसल्याचे सांगून मूळ किमतीपेक्षा चढ्या दराने विक्री होत आहे. या इंजेक्शनची मूळ किमंत ही 1200 रुपये असून ते 4000 पेक्षाही जास्त किमतीत विकल्या जात आहे. हेच इंजेक्शन पिंपरी येथे 11000 रुपयात विकतांना काही जण पकडल्या गेले आहेत. ठाणे येथे सुद्धा काही काळा बाजार करणा-यांना पकडले आहे. देश सध्या भीषण संकटातून जात आहे. राष्ट्रीय आपत्ती आहे. महाराष्ट्रात कोरोनाचा हा:हाकार माजला आहे. काल अहमदनगर येथे एकाच वेळेस 42 अंतिम संस्कार करण्यात आले. लोक हवालदिल झाले आहेत. ही अशी स्थिती असूनही या लोकांना स्वत:च्या तुमड्या भरणे सुचते आहे.  

आपला देश मोठा अजब देश आहे , राष्ट्रीय सणांच्या दिनी येथे राष्ट्रभक्तीच्या संदेशांची मोठ्याप्रमाणात आदान-प्रदान केली जाते , समाज माध्यमांवर स्टेट्स , स्टोरी , पोस्ट केल्या जातात चौका-चौकात रांगोळ्या काढून देशभक्तीपर गीते लावली जातात. परंतू नंतर लगेच दुस-या दिवशी पासून हा जोम ओसरतो मग आपल्याच देशबांधवाला कसे लुबाडता येईल याचा विचार सर्वच भ्रष्ट नोकरदार, नेते, व्यवसायी करू लागतात. या भ्रष्ट आचरणाची प्रचिती सध्या देशावर आलेल्या कोरोना माहामारीच्या राष्ट्रीय आपत्तीत येत आहे. कोरोना विषाणूची लागण झाल्यावर त्यावर गुणकारी अशा रेमडीसिवीर या इंजेक्शनची आवश्यकता रुग्णाला असते. परंतू या इंजेक्शनचा सध्या मोठ्याप्रमाणावर तुटवडा भासत आहे. देशावर , महाराष्ट्र राज्यावर सध्या कोरोनाचे भीषण सावट पसरले आहे. या अशा कठीण परिस्थितीत मात्र कोरोना विषाणूवर उपयुक्त असलेल्या रेमडीसीवर या इंजेक्शनचा काळाबाजार सुरु आहे. ग्राहकांना हे इंजेक्शन उपलब्ध नसल्याचे सांगून मूळ किमतीपेक्षा चढ्या दराने विक्री होत आहे. या इंजेक्शनची मूळ किमंत ही 1200 रुपये असून ते 4000 पेक्षाही जास्त किमतीत विकल्या जात आहे. हेच इंजेक्शन पिंपरी येथे 11000 रुपयात विकतांना काही जण पकडल्या गेले आहेत. ठाणे येथे सुद्धा काही काळा बाजार करणा-यांना पकडले आहे. महाराष्ट्रात इतरही अनेक ठिकाणी असे होत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. देश सध्या भीषण संकटातून जात आहे. राष्ट्रीय आपत्ती आहे. कोरोनामुळे नोक-या गेल्या आहेत, लोक भीतीच्या सावटाखाली वावरत आहेत , रोग्यांची मानसिक स्थिती सुद्धा ढासळते आहे , नातेवाईकांवर मोठे दडपण आले असते. देशभरात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. महाराष्ट्रात कोरोनाचा हा:हाकार माजला आहे. काल अहमदनगर येथे एकाच वेळेस 42 अंतिम संस्कार करण्यात आले. लोक हवालदिल झाले आहेत. ही अशी स्थिती असूनही या लोकांना स्वत:च्या तुमड्या भरणे सुचते आहे. राज्य व देशावर ही आपत्ती ओढवली असतांनाही हा असा काळाबाजार सुरु आहे. संकटात सुद्धा या भ्रष्ट व्यवसायिकांना लुबाडणूक सुचते आहे. एखाद्याचा नातेवाईक जर दवाखान्यात भरती झाला तर सर्व कुटुंब हवालदिल होते. नातेवाईक बिचारे औषधपाणी , घरची कामे , कामाचा व्याप सांभाळून मेटाकुटीला येतात . त्यांच्यावर काय ताण-तणावा असेल , काय परिस्थिती असेल याचा विचार इतर कुणीही करू शकत नाही. कोरोना हा संसर्गातून पसरत असल्याने आता तर कुणाला मानसिक आधार देण्यास सुद्धा जाता येत नाही. या सर्व परिस्थितीचा विचार या अशा काळाबाजार करणा-यांच्या मनात येत नसावा काय ? हे असे मरणाच्या दारात असलेल्या रूग्णाकडून पैसे उकळून काय मिळवणार आहेत हे नतद्रष्ट ? असे पैसे कमावून हे काय अँटीलिया सारखी ईमारत उभी करणार आहे काय ?  कुठे घेऊन जाणार आहेत हे पैसे अरे “तुम्हारे महल चौबारे , यंही रह जायेंगे सारे “ याचे तरी भान ठेवा. कुठून आपल्या तिजोरीत जास्त पैसे येतील सतत हाच विचार या अशा काळाबाजार करणा-यांच्या मनात येत असावा. मार्ग कोणता का असेना मला जास्त पैसे मिळाले पाहिजे मग “कोई जिये या मरे क्या हमको बाबू“,  या ओळींप्रमाणे यांची वृत्ती होते. सरकारी धान्य असो, औषधे असो , गुटके असो , अंमली पदार्थ असो कसा काळाबाजार करता येईल व आपल्या तुमड्या कशा भरता येतील याचाच जणू यांनी ध्यास घेतला आहे. देशातील गरीब जनतेची पिळवणूक होते व हे असे काळाबाजार करणारे धनदांडगे होतात. धनाच्या जोरावर हे आणखी काळी कामे करू लागतात. यांच्या धनामुळे हे प्रसंगी सत्तेलाही झुकवू पाहतात. संपूर्ण जगातच ही अशी काळाबाजार करणारी एक मोठी जमात आहे जी गरीबांची पिळवणूक करून गबर होत चालली आहे. यांना रोखण्यासाठी कडक शासन तर हवेच शिवाय उच्च नैतिक मुल्यांची शिकवण बाल्यावस्थेपासून देणे जरुरी आहे. या जगातील उदंड होत चाललेला काळाबाजार, कोरोना महामारीतही होत असेलली लुबाडणूक हे पाहून  “ये दुनिया है कालाबाजार” असे जे कुण्या कवीने म्हटले आहे ते वास्तव आहे असे वाटते.

०८/०४/२०२१

Article about two examples of moral responsibility

 नैतिकता


एकीकडे नेत्यांनी कोट्यावधी रुपयांच्या वसुलीचे आदेश देणे , त्यांचे सरकारी तिजोरीवर डोळा ठेवणे , त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होऊनही त्यांनी नैतिकतेचा मोठा आव आणणे तर दुसरीकडे गजानन महाराज संस्थान शेगांव ने निस्वार्थ , निरपेक्ष , निस्पृह भावनेने कार्य करीत प्राप्त निधीतून उरलेली रक्कम ही जनतेची आहे याचे भान ठेवत ती सरकार तिजोरीत जमा करण्याची कृती करून नैतिकतेचे भान समाजापुढे ठेवणे. या दोन उदाहरणातून नैतिकता ती काय असते हे जनतेच्या समोर स्पष्टपणे आले आहे.

     नैतिकतेची संकल्पना ही स्थळ आणि काळ यांवर अवलंबून आहे. एखाद्या समाजात एखादी बाब ही अनैतिक असेल तर कदाचित दुस-या समाजात ती नैतिक असू शकेल. परंतू काही नैतिक तत्त्वे मात्र सार्वकालिक आणि वैश्विक असायलाच हवीत. जसे भ्रष्टाचार हा सर्वदूर नैतिक नाहीच. इतरही नैतिकतेच्या अशा अनेक बाबी आहेत ज्या वैश्विक दृष्ट्या समान आहेत . महाराष्ट्रातील दोन घटनांमुळे जनतेसमोर नैतिकता काय असते हे प्रकट झाले आहे. या दोन घटना खालील प्रमाणे आहे.   

    मुकेश अंबानी यांच्या घरासमोर जिलेटीन असलेली गाडी आढळून आल्यानंतर एकापाठोपाठ एक अशा घटना उजेडात येऊ लागल्या. वाझे , मनसुख हिरेण , परमवीर सिंग यांचा लेटर बॉम्ब , या पत्रात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी 100 कोटी वसूल करून आणण्याचे सांगितले असा झालेला आरोप , “वाझे लादेन आहे का ?” या वाक्यानंतर पुढील सर्व प्रकरणाबाबत मुख्यमंत्र्यांचे चुप्पी साधणे या सर्वांमुळे महाराष्ट्र व देशाचे राजकारण ढवळून निघाले. अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी होऊ लागली , विरोधी पक्षाने राज्यभर आंदोलन केले परंतू त्यांनी राजीनामा दिला नाही. परमवीर सिंग व जयश्री पाटील यांच्या याचिकेनंतर हाय कोर्टाने या प्रकरणात सी बी आय चौकशीचे आदेश दिले. या निर्णयानंतर "या पदावर राहणे आता नैतिकदृष्ट्या योग्य वाटत नाही" असे आपल्या राजीनाम्यात अनिल देशमुख यांनी म्हटले. खरे तर त्यांच्यावर आरोप झाल्यावर त्यांनी राजीनामा दिला असता तर त्या राजीनाम्याला नैतिक जबाबदारी स्विकारून दिलेला राजीनामा असे म्हटले गेल्या असते. परंतू कोर्टाने  आदेश दिल्यानंतर राजीनामा द्यावा लागला तरीही नैतिक जबाबदारी समजून राजीनामा देत आहे असे अनिल देशमुख यांच्या म्हणण्याने जनतेला देशमुखांची नैतिकता कळून चुकली आहे. ही झाली पहिली घटना.

100 कोटींच्या या प्रकरणाच्या धामधुमीतच एक दुसरी घटना सुद्धा समोर आली. ती म्हणजे गजानन महाराज संस्थानचे निधी परत करण्याची घटना. सरकार कडून संत गजानन महाराज शेगांव संस्थानला कोविड रूग्णालयाच्या उभारण्यासाठी म्हणून 10 कोटी रुपयांचा निधी आला होता. संस्थान ने कोविड रुग्णालय उभारले व त्यासाठी संस्थानला 2 कोटी रुपयांचा खर्च आला. 8 कोटी रुपये शिल्लक राहिले. गजानन महाराज संस्थान हे देशभरात एक नामांकित संस्थान म्हणून ओळखले जाते. दर्शन , महाप्रसाद , स्वच्छता कोरोना काळात दर्शनाची केलेली सुनियोजित व्यवस्था , लाखो लोकांना होत असलेली वैद्यकीय सेवा इत्यादी अनेक कामे गजानन महाराज संस्थानात अगदी “Systematic” पद्धतीने होतात. या सर्वांमागे शिवशंकरभाऊ पाटील या कर्मयोगी व्यक्तीचे नेतृत्व , संस्थानाप्रती त्यांची आत्मीयता , तळमळ हे आहे. संस्थान आपल्या कृतीतून अनेकदा आपला आदर्श जनतेपुढे प्रस्थापित करीत आले आहे. तसे कित्येक दाखले आहेत. कोविड रूग्णालय उभारणीत प्राप्त झालेल्या 10 कोटींच्या निधीतील शिल्लक राहिलेले 8 कोटी रुपये संस्थान ने सरकारला साभार परत केले आहे. संस्थानच्या नैतिक वाटचालीत ही आणखी एक जमेची बाजू झाली आहे. गजानन महाराज यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या शेगांव नगरीबाबत देशातील कित्येक भाविकांना आस्था आहे, महाराजांवर त्यांची प्रगाढ श्रद्धा आहे. याबरोबरच गजानन महाराज संस्थानच्या कार्याचा मोठा प्रभाव जनमानसावर पडला आहे. संस्थान पासून अनेकांना प्रेरणा मिळत आहे. उरलेला 8 कोटी रुपयांचा निधी परत करून संस्थानने आपली नैतिक वाटचाल दाखवली आहे, आपला नैतिक आदर्श पुनश्च प्रकट केला आहे.

उपरोक्त दोन घटनांचा निष्कर्ष पुढीलप्रमाणे काढता येईल. आपल्या पदाचा , सत्तेचा दुरुपयोग करून निलंबित वाझेला पुन्हा कर्तव्यावर घेणे , त्याला घेतल्यावर त्याला मुंबईतील 1650 बार कडून लाखो रुपयांची वसुली करण्यास सांगणे या सर्व प्रकरणात नाचक्की झाल्यानंतरही नैतिकतेचा आव आणणे याला काय म्हणावे ? हे जे आरोप होत आहे यातील सत्य , असत्य काय हे पुढे येईलच परंतू ' यत्र धूमः तत्र वन्ही ' अर्थात जिथे धूर आहे तिथे आग असतेच. या लेटरबॉम्बच्या विस्फोटातून जो आरोपांचा जो धूर निघत आहे याचाच अर्थ तिथे नक्कीच भ्रष्टाचाराची मोठी आग असेलच. ऐन कोरोना महामारीत गरीब जनता त्रस्त असतांना , व्यापर उदीम ठप्प असतांना , अनेकांच्या नोकरीवर गदा येत असतांना नेत्यांचे हे असे भ्रष्टाचाराच्या क्लृप्त्या शोधणे , वसुलीचे आदेश देणे मुळीच योग्य नव्हे. एकीकडे नेत्यांनी कोट्यावधी रुपयांच्या वसुलीचे आदेश देणे , त्यांचे सरकारी तिजोरीवर डोळा ठेवणे , त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होऊनही त्यांनी नैतिकतेचा मोठा आव आणणे तर दुसरीकडे गजानन महाराज संस्थान शेगांव ने निस्वार्थ , निरपेक्ष , निस्पृह भावनेने कार्य करीत प्राप्त निधीतून उरलेली रक्कम ही जनतेची आहे याचे भान ठेवत ती सरकार तिजोरीत जमा करण्याची कृती करून नैतिकतेचे भान समाजापुढे ठेवणे. या दोन उदाहरणातून नैतिकता ती काय असते हे जनतेच्या समोर स्पष्टपणे आले आहे.

०४/०४/२०२१

Article about the raising health problem by leaders, officers after allegation of corruption on them.

  मले बी मंत्री करून टाका.

मायी साखर कायी कमी होत नायी , छातीत बी कय येतच रायते , कोन्या औषधानं फरक नायी पडून रायला. या नेत्याईच्या तब्येती पदावर गेल्यावर कशा टनाटन होत्यात. म्हनून म्या मंग डॉक्टर ले म्हनल “डॉक्टर मले बी मंत्री करून टाक्याच पायजा , मंत्री झालं की बादच हालत सुधारते. पायजा कायी जुगाड जमते का ? म्या अस म्हनल त डॉक्टर मले हासे. ते हासत त म्या म्हनल “सायब या गोया कायी काम नायी करत , तब्येत कायी सुधरून नायी रायली नीरा पैसा खर्च होऊ रायला.” सामान्य मानसाले बिमा-या खाऊ रायल्या अन हे वाझे अन मंत्री संत्री याईले बिमा-या बराबर आरोपातून सटकाईले मदत करू रायल्या. 

वडीलांना कोरोना लस देण्याच्या निमित्ताने रुग्णालयात गेलो होतो. लस घेतल्यानंतर थोडावेळ बसायला सांगितले होते म्हणून आम्ही शारीरिक दूरतेचे पालन करीत बसलो होतो. भोवताली ग्रामिण भागातील बरेचसे लोक होते. त्यांच्या आपआपसात चर्चा रंगल्या होत्या. आम्हाला बसायचेच होते म्हणून मी शांत बसून त्यांचे बोलणे ऐकत होतो. साठी ओलांडलेला एक जेष्ठ नागरीक त्याच्या सोबत्याशी गप्पा मारत होता. राजकारण , कोरोना , प्रकृती यांबाबत ते बोलत होते. पहिला जास्त बोलत होता. तो म्हणाला , “ त्या वाझेले पकडलं बुवा , त्याची चौकशी करनं लावल म्हने त्या ‘यनआयये’ का काय व्हय त्या दिल्लीच्या  अधिका-याईनं. कायी हाय का त्या चौकशीत पडेल ? त्याची तब्येत खराब होऊ रायली म्हने आता. मले सांगा हा गडी पार्टीचे काम करे , अंबानीच्या घरासमोर जिलेटीन न भरेल गाडी उभी करे , त्या हिरेन ले मा-याचा कट करे तवा याच्या तब्येतीले काऊन कायी झालं नायी ? आता तं लय ब्लॉकेज हाय म्हनते, साखर बी हाय म्हनते. इतलेच ब्लॉकेज व्हते, साखर होती, त कायले या जिलेटीनच्या फंदात अन हिरेनले मा-याच्या नांदी लागला बे हा ? अन कायलेच पुन्हा आला कामावर. बरा व्हता न निलंबित, आराम क-याचा. मग दुसरा म्हणे “वसुली क-याले आनल अशीन त्याले”. अशा त्यांच्या गप्पा सुरु होत्या . 

     पहिला ट्वेंटी-ट्वेंटी सारखा जलद बोलत होता तर दुसरा कसोटी क्रिकेट सारखा निचंतीने बोलत होता मी मूक दर्शक होतो केवळ श्रवण करीत होतो. त्यांचे बोलणे अगदी खरे होते. आपल्या देशातील राजकारण हे किती खालच्या स्तराला गेले आहे व तळागाळातील जनतेला ते सर्व ठाऊक आहे. राजकारण्यांना वाटते की डोळे मिटून दुध पितांना त्यांना कुणीच पाहात नाही. पण “ये जो पब्लिक है ये सब जानती है” असा विचार त्या दोघांची चर्चा ऐकून माझ्या मनात येऊन गेला. 

     तेवढ्यात पहिला पुन्हा बोलू लागला, “तुम्हाले सांगतो बाळासाहेबाची गोष्टच अलग होती भाऊ, त्याईच्या  सारख कोनी नायी होऊ शकत. जे अशीन ते अस हाय तुम्हाले पटल तर ठीक नायी पटल तर नायी अस होत त्याईच काम. एरीच कायी लोकाईन त्याईले डोक्यावर घेतलं नव्हत. आता तर त्याईच्यासारखा “ जे हाय ते हाय , जे नाय ते नाय “ अस बोलनारा कुनीच नायी. दुसरा म्हने “ तुम्हाले सांगतो भाऊ तो जुना जमाना गेला आता , आता सा-याईले पायजे मलाई , नसन भेटत त लागे तो जाते दुस-या पार्टीत. बाळासायबाले बी त सोडून जायेल हायेत कायी लोक, अन त्या लोकाईच्या संग बाळासायबाची पार्टी हाय आज, या लोकायीले जनतेच कायी घेन-देन नायी न वो”. “हाव न राजेहो” पहिला पुन्हा बोलू लागला “आता बगा सायच्या याईच्या तब्येती खराब वकत आला की लागे खराब होत्यात अन चांगला वकत आली की लागे सुधारतात बी. असं कसं अशीन भाऊ हे ? अन हे पोलीसाले, कोर्टाले लक्षात नसन येत का ? डॉक्टर मले म्हनते की तुमची ते साखरेची बिमारी आता कधीच बरी व्हनार नायी , छातीत कय आलती एक दोन खेप त म्हने तुम्ही सा-या गोया टायमावर घेत जा अन ते साखरेची सुई टोचून घेत जा. मी म्हनल सायीच हे गनित हाय तरी कसं ? आपल्या तब्येती कशा सुधरत नायी ? अन नेत्याईच्या त टनाटन होत्यात. भ्रष्टाचार केलता त यक नेता जेलात गेला व्हता. तठी त्याची किती तब्येत खराब होत जाय बापा. पेपरात त्याच्या तब्येतीच्या बातम्याच्या बातम्या येत. अन आता पायसान त असा फिरते , असा बोलते , असा कामाचा हिरक दाखवते की जस कायी होयेलच नायी. अन जेलाच्या वक्ती त लयच बिमार असल्याच्या बातम्या येत बापा. तुम्हाले म्हटल भाऊ मले त कायी समजत नायी. सामान्य मानसाले कशी तकलीफ सुरु झाली की सुरूच रायते अन या नेत्याइची , अधिका-याइची पदावर असले की कायीच तकलीफ नसते अन जेलात जायची बारी आली की लागे बराबर तकलीफ सुरु होते. आता आपल्याले त जेलात जायाच कायी कारन नायी भाऊ , आपन कायी करेलच नायी पन सायीचं मायी साखर कायी कमी होत नायी , छातीत बी कय येतच रायते , कोन्या औषधानं फरक नायी पडून रायला. या नेत्याईच्या तब्येती पदावर गेल्यावर कशा टनाटन होत्यात. म्हनून म्या मंग डॉक्टर ले म्हनल “डॉक्टर मले बी मंत्री करून टाक्याच पायजा , मंत्री झालं की बादच हालत सुधारते. पायजा कायी जुगाड जमते का ? म्या अस म्हनल त डॉक्टर मले हासे. ते हासत त म्या म्हनल “सायब या गोया कायी काम नायी करत , तब्येत कायी सुधरून नायी रायली नीरा पैसा खर्च होऊ रायला.” सामान्य मानसाले बिमा-या खाऊ रायल्या अन हे वाझे अन मंत्री संत्री याईले बिमा-या बराबर आरोपातून सटकाईले मदत करू रायल्या. डॉक्टर म्हने भाऊ आपल्याले गोयाच घेन हाय. ते राजकारन आपल्या बसच हाय काय ? त्याईचा इचार करून आखीन साखर अन बी पी वाढवसान. मी बसलो बा चूप मंग. दुसरा म्हने “जाऊ द्या राजेहो या अशा लोकाईचा न्याय देव करते , चाला झाला आपला टाईम” 

     मी पण भानावर आलो. खरेच आरोप झाले की तब्येत खराब व जमानत मिळाली किंवा चौकशीतून मुक्त झाले की तब्येत चांगली, प्रकृती कारणास्तव सवलत मिळवणे, सहानुभूती मिळवणे भ्रष्ट नेत्यांच्या व अधिका-यांच्या या असा वर्तणूकीवर काही उपाययोजना , कायदेशीर तरतूद ही असलीच पाहिजे. त्यांच्या प्रकृतीची सत्यता पडताळणी कशी करता येईल ? खरेच त्यांची प्रकृती खराब असेल तर त्यांना किमान पाच वर्षे पर्यंत पुनश्च पद बहाल न करणे. जेणे करून त्यांना प्रकृती कारणास्तव जेल मध्ये किंवा घरी आराम करता येईल अशी सुद्धा कायद्यात तरतूद व्हावी. असे विचार घरी परततांना माझ्या मनात येत होते.  

०१/०४/२०२१

Article about a very beautiful movie Bawarchi released in 1972

  कुटुंब जोडणारा "बावर्ची"

 कुटुंबातील सदस्य एकमेकांच्या निकट आहेत का ?  त्यांच्यातील संवाद हरवला आहे का  ?  आजही काही सुखवस्तू कुटुंब जरूर आहेत पण विस्कळीत होत चाललेल्या कुटुंबांच्या बातम्या तशा खटल्यांंच्या आकडेवा-या हे सारे निराशादायी आहे. आजच्या कुटुंबांना पुन्हा एकत्र आणण्यासाठी बावर्ची चित्रपटातील रघुसारखा कुणी कुटुंब जोडणारा बावर्ची येईल का ? 

सध्या मी दररोज संध्याकाळी आमच्या आंगणात पायी फिरत असतो. परवा संध्याकाळी  घरातून जुन्या सिनेमाच्या पठडीतील संगीत ऐकू आले. सौ. ला विचारले तर म्हणे “बावर्ची” सुरू आहे. मी तात्काळ फिरणे थांबवले व टी.व्ही. समोर बसलो. अशांती असलेल्या घरात जाऊन शांती प्रस्थापित करून देण्याचे कार्य या “बावर्ची” अर्थात “स्वयंपाकी” ची भूमिका वठवणा-या राजेश खन्ना म्हणजे रघुनंदन ने अंगिकारले असते. रघु केवळ बावर्ची नसतो तर कुटुंब जोडणारा बावर्ची असतो. अशाच एका फक्त नावालाच  “शांती निवास” असलेल्या पण अजिबात शांती नसलेल्या शर्मा यांच्या घरात तो अचानकपणे दाखल होतो. या घरातील माणसे तशी साधीच परंतू प्रत्येकाच्या व्यापामुळे काहीशी त्रस्त झालेली असतात. रोज-रोजच्या राहाटगाड्याने एकमेकांप्रती असलेल्या त्यांच्या जिव्हाळ्यावर सुद्धा जंग चढला असतो. या घराच्या कुटुंबप्रमुखाची , मालकाची भूमिका वठवली आही हरिन्द्र्नाथ चटोपाध्याय या जुन्या साहित्यिकाने. हा लेख तसा बावर्ची सिनेमा बद्दल आहे परंतू थोडे हरिन्द्र्नाथ यांच्याबद्दल सांगावेसे वाटते. हरिन्द्र्नाथ म्हणजे सरोजिनी नायडू यांचे कनिष्ठ बंधू. कवी, नाटककार, अभिनेता , संगीतकार असे हरिन्द्र्नाथ राज्यसभेचे सदस्य सुद्धा होते. योगायोगाने उद्या त्यांची जयंती आहे. आता पुन्हा बावर्ची या आजच्या विषयाकडे जाऊया.

     सतत कुरबुरी , तंटा असलेल्या शर्मा कुटुंबात एक दिवस रघु दाखल होतो. स्वयंपाकी म्हणून तो घरात शिरतो. सर्वांना त्याच्या मोठ्या मोठ्या उपदेशांनी , ज्ञानानी, संस्कृत सुभाषितांच्या दाखल्यांनी तसेच मोठ-मोठ्या ठिकाणी कामाला असल्याच्या बतावणींनी स्तंभित करून टाकतो. रघु केवळ स्वयंपाकच नाही तर घरातील इतर अनेक कामे पण करीत असतो त्यामुळे सर्वच त्याच्यावर खुश असतात. दादुजींच्या खाटी खाली असलेल्या कुलूपबंद दागिन्यांच्या पेटीकडे अधून मधून रघूची नजर जात असते. रघु “अपना काम तो सब करते है लेकीन दुसरोका काम करनेमे जो आनंद है वो कैसी भी चीजमे नही“ अशाप्रकारच्या संवादानी कुटुंबातील सर्व सदस्यांत पुन्हा प्रेम , आपुलकी निर्माण करतो. हृषीकेश मुखर्जी यांचा चित्रपट आहे त्यामुळे मध्यमवर्गीय जीवन नात्यातील अटॅचमेंट खुप सुरेख चितारली आहे. दुर्गा खोटे , ए. के हंगल , उषाकिरण , असरानी, जया भादुरी या सर्वांचा नैसर्गिक अभिनय दर्शकांना चित्रपटात गुंतवून टाकतो. कृष्णाची भूमिका वठवणा-या जया भादुरीला हा हरहुन्नरी रघू नृत्य शिकवतो , स्पर्धेत ती पहिली येते. या कुटुंबातील भाऊ , जावा यांना तो त्यांच्यातील गुणकथन करून त्यांचे नाते पुन्हा घट्ट करतो. हि रघुची सकारात्मक कान भरणी दिग्दर्शकाने चांगली दाखवली आहे. तपन सिन्हाचे कथानक प्रभावी आहे. चित्रपटात गाणी दोनच आहेत परंतू मदन मोहन यांच्या संगीत दिग्दर्शनात मन्नाडे यांनी गायलेली ती गीते कर्णसुखद आहेत.  

 एक दिवस दादूजींची कुलूपबंद पेटीची चोरी होते. रघु सुद्धा गायब असतो. घरातील ते सर्व सदस्य जे रघुवर आत्यंतिक खुश असतात ते सर्व आता रघुला कोसु लागतात. ती पेटी कृष्णा म्हणजे जया भादुरीला आवडणारा तरुण पुन्हा “शांती निवास” मध्ये आणतो व रघुचे रहस्य सर्वा समक्ष उलगडतो. रघु कोण असतो , तो बावर्ची का बनतो हे सगळे तो स्वत:च कथन करतो. ते सर्व पडद्यावर पाहण्यात खरी मजा आहे. पण आता असे सर्वांग सुंदर चित्रपट टी.व्ही. वर क्वचितच पहायला मिळतात. 

आजची कुटुंबं व्यवस्था आपण पाहातच आहोत. एका ठिकाणी जरी राहात असले तरी कुटुंबातील सदस्य एकमेकांच्या निकट आहेत का ?  त्यांच्यातील संवाद हरवला आहे का  ? सासू , सासरे , लेकीं सुना, नातवंडे  असा गोतावळा जमतो का ? अशा व इतर तत्सम प्रश्नांची उत्तरे शोधू जाता त्यांची उत्तरे नकारार्थीच येण्याची शक्यता अधिक. आजही काही सुखवस्तू कुटुंब जरूर आहेत पण विस्कळीत होत चाललेल्या कुटुंबांच्या बातम्या तशा खटल्यांंच्या आकडेवा-या हे सारे निराशादायी आहे. आजच्या कुटुंबांना पुन्हा एकत्र आणण्यासाठी बावर्ची चित्रपटातील रघुसारखा कुणी कुटुंब जोडणारा बावर्ची येईल का ?