२६/०८/२०२१

Article about leaders hatred statements about each other

 ...वो घाव नही भरता जो बना हो कडवी बोली से  


एकीकडे जनता  बिचारी कोरोना , बेरोजगारी , अवर्षण , पाण्याची टंचाई , शिक्षणाची झालेली वाताहत व इतर अनेक प्रश्न यांमुळे हवालदिल झाली आहे तर दुसरीकडे नेते एकमेकांशी भांडत आहेत, यांचे कार्यकर्ते कोरोनाचे सर्व नियम डावलून एकमेकांवर दगडफेक करीत आहेत व आपल्या नेत्यांकडून पाठ सुद्धा थोपटून घेत आहे. जनतेला कोरोना नियम पाळायला सांगायचे तेच नियम डावलून हिंसक आंदोलने करणा-यांचे कौतुक करायचे, वा रे वा !

स्वातंत्र्योत्तर काळाच्या सुरुवातीचे राजकारण कसे होते हे वाचनातून सर्वांपुढे आलेले आहे. उच्चविद्याविभूषित नेहरू पंतप्रधान तसेच त्यांचे विद्वान मंत्रीमंडळ असे नेते त्याकाळात होते तसेच विरोधी पक्षांचे नेते सुद्धा होते. तरुण अटलजींचे संसदेतील भाषण , त्यांच्या वक्तृत्वाने प्रभावीत होऊन नेहरूंनी अटलजी हे पुढे भारताचे पंतप्रधान होतील असे भाकीत केले होते व ते खरे ठरले होते. तसेच विरोधी पक्षाचे असूनही अटलजींनी बांगलादेश निर्मितीच्या वेळी दुर्गा अवतार म्हणून इंदिरा गांधी यांची स्तुती केली होती. नरसिंहराव पंतप्रधान असतांना त्यांनी युनो मध्ये अटलजींना भारताचा प्रतिनिधी म्हणून पाठवले होते. विरोधी पक्षातील नेता प्रतिनिधी म्हणून आलेला पाहून व भारताची प्रगल्भ लोकशाही पाहून जगातील नेते अवाक झाले होते. अटलजींनी तिथे तेंव्हा आंतर्राष्ट्रीय स्तरावर सर्वात प्रथम हिंदीतून भाषण दिले होते. अशी कित्येक उदाहरणे भारताच्या राजकारणात मिळतील, त्या काळात जी राजकीय प्रगल्भता होती ती मात्र जसे जसे कालोत्क्रमण होत गेले तशी-तशी लोप पावत जाऊ लागली व आता तर ती लयालाच गेली की काय असे वाटू लागले आहे. प्र.के.अत्रे , यशवंतराव , बाळासाहेब ठाकरे , वसंतराव असे नेते पाहिलेल्या महाराष्ट्राची राजकीय स्थिती किती रसातळाला गेली आहे याचे दाखले दररोज मिळू लागले आहे. जाहीर भाषणातून एकमेकांवर शाब्दिक वार करण्याची जणू प्रथाच महाराष्ट्रात हल्लीच्या नेत्यांनी सुरु केली आहे. सुरुवातीला प्र.के अत्रे व नंतर बाळासाहेब ठाकरे हे त्यांच्या भाषणातून त्यांच्या थेट , रोखठोक अशा शैलीत बोलत परंतू त्याला एक दर्जा होता , विनोदाची , व्यंगात्मक अशी त्यांची शैली होती. त्यांचा कित्ता गिरवण्याच्या नादात सांप्रतकालीन नेते बोलण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत स्वत:ची राजकीय उंची कमी करून घेत आहेत. कुणी म्हणते मारू , कुणी म्हणते थोबाड फोडू , कुणी कानाखाली आवाज काढू तर कुणी म्हणते चपला मारू , कुणी अरे-तुरे ची भाषा बोलते, कुुणी कुणाचा बाप काढते. एकीकडे जनता  बिचारी कोरोना , बेरोजगारी , अवर्षण ,  पाण्याची टंचाई , शिक्षणाची झालेली वाताहत व इतर अनेक प्रश्न यांमुळे हवालदिल झाली आहे तर दुसरीकडे नेते एकमेकांशी भांडत आहेत, यांचे कार्यकर्ते कोरोनाचे सर्व नियम डावलून एकमेकांवर दगडफेक करीत आहेत व आपल्या नेत्यांकडून पाठ सुद्धा थोपटून घेत आहे. जनतेला कोरोना नियम पाळायला सांगायचे व तेच नियम डावलून हिंसक आंदोलने करणा-यांचे कौतुक करायचे, वा रे वा !

नेत्यांच्या ही अशी वागणूक पाहून किती लिहायचे ? किती भाष्य करायचे ? या लिहिण्याचा काही उपयोग होतो की नाही? यांच्याकडे व यांच्या गलीच्छ राजकारणाकडे पाहून जनता पुरती कंटाळून गेली आहे. यापूर्वीही नेत्यांच्या अशा काहीही बोलण्या बद्दल “घासावा शब्द , तासावा शब्द ,तोलावा शब्द बोलण्यापूर्वी” हा लेख , तोंडात कोरोना विषाणू भरण्याचे उद्गार काढल्यावरचा “...त्यापेक्षा गरीबाच्या तोंडात घास भरा” हा लेख , “गाडी रेड लाईट ची भाषा रेड लाईट एरियाची” , अनुभवाचे बोल  असे कितीतरी लेख लिहिले आहेत तसेच अनेक  संपादक, राजकीय विश्लेषक, पत्रकार, लेखक यांनी या बाबत मोठे लिखाण केले आहे. मग हे कुणी वाचते की नाही ? हे नेत्यांपर्यंत पोहोचते की नाही ? की पोहचूनही आपल्या स्वार्थी राजकारणाकरीता हे आपले शाब्दिक हल्ले सुरूच ठेवत असतील. वैयक्तिक वा राजकीय वैमनस्यातून एकमेकांवर तोंडसुख घ्यायचे , ज्याची सत्ता असेल त्याने मग दुस-यावर कारवाई करायची व मग त्यानंतर कार्यकर्त्यानी एकमेकांशी भिडायचे बस हाच काय तो पोरखेळ सध्याच्या राज्कारणात सुरु आहे, राज्याचे व जनतेचे प्रश्न त्यांच्या समस्या या गेल्या घंटा गाडीत. यथा राजा तथा प्रजा ही जुनी म्हण आहे राजासारखे अनुकरण प्रजा करायला लागते. नेतेच जर सदैव मारठोकीची भाषा करीत असतील तर त्या राज्याची जनता सुद्धा त्याचेच अनुसरण करायला लागेल व नाहक न्यायव्यवस्था व सुरक्षा यंत्रणांचा बोजा वाढेल. सर्वच नेत्यांनी आपली राजकीय प्रगल्भता, आपली सौजन्यपुर्ण वागणूक , साधी राहणी, चांगली भाषा असे आदर्श जनतेपुढे ठेवायला पाहिजे व नेहमी चांगले बोलायला हवे. अनेक महाराष्ट्रीयन संत मंडळींनी शब्दांबाबत सांगितलेल्या ओव्या, श्लोक या सुद्धा लक्षात ठेवायला हव्या केवळ राजकारणा पुरता त्यांचे नांव घेऊ नये कारण,   

“भर जाता है गहरा घाव जो होता है गोलीसे पर वो घाव नही भरता जो बना हो कडवी बोली से तो मिठे बोल कहो”

१९/०८/२०२१

Article about municipal election and its president

 नगराध्यक्ष विकासशील असावा.

शहराचा अध्यक्ष हा काही केवळ ते पद विभूषित  करणारा नसावा तर त्याला शहराच्या समस्यांची तेवढी जाण असावी व त्या समस्यांचे कसे निराकरण होईल यासाठी तो प्रयत्नशील असावा.

गत काही दिवसांपासून खामगांव नगर परिषदेच्या आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर खामगांवचा नगराध्यक्ष हा मुस्लिम असावा हा विषय छेडल्या गेला. खामगांव नगर परीषद ही जिल्ह्यातील एक जुनी नगर परीषद असून स्थापनेपासून म्हणजे 1867 पासून ते आजपावेतो या नगर परीषदेच्या अध्यक्षस्थानी एकही मुस्लिम व्यक्ती विराजमान होवू शकला नाही. भारतीय संविधानाला अनुसरून कुणीही भारताची नागरीक व्यक्ती ही निवडणूका लढून त्यात जिंकल्यावर लोकप्रतिनिधी म्हणून कार्य करू शकते , विविध पदे भुषवू शकते याला कोणताही समाज , पंथ , धर्म आड येत नाही. याच न्यायाने आजपावेतो अनेक ठिकाणी अनेक धर्माच्या लोकप्रतिनिधींनी विविध पदे भुषवली आहेत. स्वातंत्र्यापासून पाहायचे झाले तर राष्ट्रीय पातळीवर मौलाना आझाद – स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री , फकरुद्दीन अली अहमद - राष्ट्रपती  , नजमा हेपतुल्लाह- राज्यसभा उपसभापती , ए पी जे अब्दुल कलाम- राष्ट्रपती, हमीद अंसारी –उपराष्ट्रपती, गुलाम नबी आजाद, शाहनवाज हुसेन, मुख्तार अब्बास नक्वी , तारिक अन्वर, अबू आझमी इ. विविध पक्षांच्या अनेक मुस्लिम व्यक्तींनी या भारत देशाची विविध संवैधानिक पदे विभूषीत केली आहेत. इतरही अनेक धर्मीयांनी सुद्धा भारतीय राजकारणात ठसा उमटवला आहे. गाव पातळीवर सुद्धा अनेक ठिकाणी मुस्लिम तथा इतर धर्मियांनी प्रतिनिधित्व केले आहे. या अनुषंगाने खामगांवचा नगराध्यक्ष मुस्लिम होत असेल तर त्यात वावगे असे कुणाला काही वाटणार नाही. आपले संविधान हेच मुळात सर्व नागरिकांना न्याय मिळेल असेच आहे. संविधानात सर्वांना सर्व क्षेत्रात समानता अपेक्षित आहे. त्यामुळे कुणीही निवडणूक लढवून जोड-तोड न करता, दल न बदलता कोणतेही पद प्राप्त करत असेल तर या लोकशाही भारतातील नागरिक त्याचा स्विकारच करतात हे सर्वश्रुत आहे.

    खामगांवात जरी आजपावेतो नगराध्यक्ष पदी कुणी मुस्लिम व्यक्ती पोहोचला नसला तरी उपाध्यक्षपद मात्र मुस्लिम व्यक्तीने भूषवले आहे. खामगांव शहराच्या बाबतीत बोलायचे झाल्यास खामगांव नगर परिषदेच्या स्थापनेवेळी असलेली शहराची लोकसंख्या व आताच्या लोकसंख्येत लाक्षणिक असा बदल झाला आहे. नविन राजकीय समीकरणे निर्माण झाली आहेत. पदाची महत्वाकांक्षा कुणीही निवडून आलेला राजकारणी ठेवू शकतो त्यात काहीही गैर नाही परंतू राजकीय पद मिळवायचे ते कशासाठी ? आज खामगांव शहराच्या कितीतरी समस्या आहेत , शहराचा अधिक विकास होणे गरजेचे आहे. सर्वात मोठी समस्या म्हणजे पाणी. शहरातील अनेक नव्या वस्त्यात अद्यापही नळ नाहीत, ज्यांच्याकडे आहेत त्यांना 9 दिवसांनी पाणी पुरवठा होतो , अनेक भागातील रस्ते खराब आहेत, अनेक ठिकाणी पथदिवे नाहीत , नाल्या तुंबलेल्या असतात , काही ठिकाणी सुशिक्षित लोकांनी सर्विस लाइन , रस्ते यांवर अतिक्रमण केले आहे , नगर परीषद शाळांची अवस्था बिकट आहे, डंपींग ग्राऊंड व तिथे जाळल्या जाणा-या कच-यामुळे त्या परीसरात होणारे प्रदूषण, नागरीकांच्या तक्रारींना दाखवली जाणारी केराची टोपली अशा नाना समस्या आहेत. या समस्या लक्षात घेता शहराचा अध्यक्ष हा काही केवळ ते पद विभूषित करणारा नसावा तर त्याला उपरोक्त समस्यांची तेवढी जाण असावी, त्या समस्यांचे कसे निराकरण होईल यासाठी तो प्रयत्नशील असावा. कोणत्याही जाती, धर्माच्या व्यक्तीने राजकीय पद प्राप्तीची आशा जरूर बाळगावी परंतू त्या पदावर आल्यावर जनतेला भेडसावणा-या त्यांच्या समस्यांकडेही तेवढेच लक्ष देणे अपेक्षित आहे. नगराध्यक्ष मुस्लिम असो वा हिंदू  किंवा आणखी कुण्या धर्माचा असो प्रथम तो विकासशील असा असावा. पंचायत राज व्यवस्था गांधींजींना यासाठी अपेक्षित होती की स्थानिक पातळीवर विकास झाला तर आपोआपच देश विकसित होण्यास हातभार लागेल आणि म्हणून हा देश विकसित करायचा असेल तर स्थानिक पातळीवरील नेते , नगरसेवक , नगराध्यक्ष , सरपंच , जि. प. सदस्य व अध्यक्ष , पं. स. सदस्य व अध्यक्ष हे स्थानिक स्वराज्य संस्थेतील लोक कुण्या का जाती धर्माचे असो त्यांनी प्रथम आपला देश, राज्य, जिल्हा , तालुका, शहर व ग्राम हे कसे विकसित करता येतील यालाच सदैव प्राधान्य देऊन आपआपल्या पातळीवर विकासाची पाऊले उचलणे आवश्यक आहे. हे पाहू जाता जो कुणी खामगांवचा नगराध्यक्ष होईल त्याने शहरप्रेमी, शहरासाठी झटणारा, व त्याची कारकीर्द खामगांवकरांच्या चिरकाल स्मरणात राहील असे जनहिताचे कार्य करणारा ,निर्णय घेणारा तसेच विकासशील असा असावा.

१४/०८/२०२१

An Article about school without student and memories of student.

 स्कुल कब आओगे ?

राज्याच्या शिक्षण मंत्र्यांनी “17 ऑगस्ट 2021 ला शाळा सुरू होणार” या राणा भीमदेवी थाटात घेतलेल्या निर्णयाचे सुद्धा असेच झालेमाशीला कोरोना होतो की नाही देव जाणे पण पुन्हा माशी शिंकलीचव शाळा सुरू होण्याचे लांबणीवर पडलेच. त्या दिवशी मी घरी जाण्याच्या वेळे अगोदर शाळेच्या मैदानात फिरत होतो. मार्च 2020 पासून कित्येकदा मला विद्यार्थी नसलेली शाळा ही खायला उठल्यासारखीच भासलेली आहे. मी मैदानातून एकेका वर्गासमोरून जात होतो. अनेक स्मृती जागृत होत होत्या.

   जरा कुठे शाळा सुरू होण्याच्या निर्णयापर्यन्त शिक्षण खाते पोहोचले व शाळा व्यवस्थापनाव्दारे शाळा स्वच्छ , सॅनिटाईझ वगैरे सोपस्कार करून सज्ज झाल्या रे झाल्या की पुन्हा कोरोनाची भीती , येणा-या कोरोना प्रादुर्भावाच्या लाटा, यांमुळे पहिले गंडांतर यायचे ते शाळांवर व पुन्हा शाळा , महाविद्यालये बंद. राज्याच्या शिक्षण मंत्र्यांनी “17 ऑगस्ट 2021 ला शाळा सुरू होणार” या राणा भीमदेवी थाटात घेतलेल्या निर्णयाचे सुद्धा असेच झाले, माशीला कोरोना होतो की नाही देव जाणे पण पुन्हा माशी शिंकलीच, व शाळा सुरू होण्याचे लांबणीवर पडलेच. मार्च 2020 पासून चीनी विषाणू कोरोना , त्यामुळे आलेली संचारबंदी , शाळा बंद , विशिष्ट दडपण, पारिवारीक काळजी , कोरोना रुग्णाच्या परीसरात झालेली कोरोना योद्धा म्हणून  शासनाने देखरेखीसाठी केलेली नियुक्ती अशा अनेक व्यापांमुळे कित्येक परीचीत व विद्यार्थ्यांशी संपर्क होईनासा झाला होता. शाळांमध्ये शिक्षक सध्या ऑनलाईन शिक्षण, सेतु अभ्यासक्रम आदी अनेक शैक्षणिक कार्ये करीत आहेतच. त्या दिवशी मी घरी जाण्याच्या वेळे अगोदर शाळेच्या मैदानात फिरत होतो. मार्च 2020 पासून कित्येकदा मला विद्यार्थी नसलेली शाळा ही खायला उठल्यासारखीच भासलेली आहे. मी मैदानातून एकेका वर्गा समोरून जात होतो. अनेक स्मृती जागृत होत होत्या. शाळेत निरनिराळ्या वेळी पार पडणा-या अनेक स्मृती मला होत होत्या. नित्याचे राष्ट्रगीत , रांगेत उभे राहणारे विद्यार्थी , दैनिक परीपाठ , उशिरा आलेल्या विद्यार्थ्यांना बाजूला उभे करून त्यांना रागे भरणे , नंतर वेगवेगळ्या तासिका , दिक्षा अ‍ॅप व्दारे इ-लर्निंग सुरू केल्यावर त्यांचे उजळलेले चेहरे, मुलांचा उत्तरे देण्यासाठीचा उत्साह , दुपारच्या दीर्घ अवकाशात “या न सर जेवायला” म्हणून त्यांनी प्रेमाने घातलेली हाक कानात घुमली. शिक्षक व विद्यार्थी यांनी लावलेली रोपटी अशा नाना स्मृती मी मैदानात फिरत असतांना माझ्या डोक्यात फिरत होत्या. राष्ट्रपुरुषांच्या जयंती , पुण्यतिथीला विद्यार्थ्यानी दिलेली भाषणे, उन्हाळ्यात कडूनिंबाच्या झाडाच्या दाट सावलीत घेतलेल्या व हिवाळ्यात सकाळच्या कोवळ्या उन्हात घेतलेल्या तासिका, शारीरीक शिक्षणाच्या तासिका त्यात बैठी पिटीच्या वेळी इतरांना वाकलेले पाहण्यासाठी न वाकलेले काही खोडकर मुले व त्यांना मिळालेली फटकार, संगणक क्लासच्या  वेळी विद्यार्थ्यांचे ते वर्गातून धावतच क्लाससाठी येणे असे कित्येक प्रसंग मला स्मरले. एकदा एक विद्यार्थीनी एक तासिका झाल्यावर शाळेत आली होती. “ काय ग किती उशिर ! “ मी तिला ओरडलो “आजीचे औषध पाणी करून मग शाळेत येते सर मी, म्हणून येण्यास उशिर झाला.” ,“जा वर्गात” म्हणून मी स्तब्ध झालो. “बेटा आजीची सेवा तर करायचीच आहे पण शाळेत सुद्धा वेळेवर यावे” असे म्हणून मी तिला काही पर्याय सुचवले होते व शांततेने समजावून सांगितले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या कित्येक अडचणी असतात हे मला जाणवले होते. मी तदनंतर उशिरा येणा-या विद्यार्थ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या होत्या. केवळ त्या जाणून घेतल्याने व प्रेमाने त्यांची चौकशी केल्याने अनेक विद्यार्थ्यांचे उशिरा येणे कमी झाले होते. विद्यार्थिनीचा अशाच प्रकारचा एक किस्सा ख्यातनाम लेखक प्रविण दवणे यांनी सुद्धा शिक्षण संक्रमण या मासिकात त्यांच्या लेखात उल्लेखिला होता तो वाचल्यावर मी त्वरीत त्यांना फोन करून वरील किस्स्या बाबत बोललो होतो. त्यांनी सुद्धा विद्यार्थ्यांच्या अडचणी , मानसिकता यांबाबत काही मोलाचे शैक्षणिक सल्ले मला दिले होते. मैदानात फिरता-फिरता मला अशा कित्येक आठवणी आल्या होत्या. हे सत्र 22 जून 2021 पासून सुरू झाले. वर्ग 8 ते 12 सुरू करण्याची परवानगी शासनाने गत महिन्यात काही अटींवर दिली होती परंतू सर्व वर्गातील विद्यार्थ्यांना अद्यापही शाळेत येण्यास परवानगी नाही. या वर्षी शासनाने सेतू अभ्यासक्रम सुरू केला व त्या अनुषंगाने अनेक विद्यार्थी टप्प्या-टप्प्याने शाळेत प्रश्नपत्रिका वगैरे घेण्यासाठी म्हणून येत आहेत. एक–एक करून विद्यार्थी शाळेत येऊ लागले. रोज त्यांना पाहणारा मी दीड वर्षांपेक्षा जास्त दिवसांनी त्यांना भेटत होतो, प्रत्यक्ष पहात होतो. ग्रामीण भागातील शाळा असल्याने बहुतांश विद्यार्थ्यांना ऑनलाइन सुद्धा पाहता येत नव्हते. काही विद्यार्थ्यांना प्रथम दर्शनी ओळखले नाही. नीट निरखून पाहिल्यावर त्यांना ओळखले. या सर्वांना भेटून , प्रत्यक्ष पाहून आनंद होत होता. “का रे आमची आठवण येत होती की नाही?“  विचारल्यावर “शाळेची खूप आठवण येते सर” सर्व विद्यार्थी हेच उत्तर देत होते. त्यांचे वेळापत्रकअभ्यास कसा सुरू आहे.  परीवाराची चौकशी केली. त्यांच्याशी बोलतांना एक वेगळाच आनंद मला होत होता, त्यांच्या नजरेतून ते खुप काही सांगत होते, शाळा, इमारत त्यांचा वर्ग निरखून पाहत होते. अनेक विद्यार्थी शाळा कधी सुरू होते सर ? सर्वच तर सुरू आहे मग शाळाच का नाही ? याला माझ्याकडे काही उत्तर नव्हते. “पाहू बेटा वाट, होईल सुरू” मी म्हणालो. कोरोना मुळे झालेला शिक्षणाचा खेळ खंडोबा , ग्रामीण भागातील मुलांना आलेल्या नेटवर्क व स्मार्ट फोनच्या अडचणी, दुकाने , खाजगी शिकवण्या सर्व काही सुरू आहे शिकवणीला पाठवण्यास पालकांनी सुद्धा संमती दिली आहे  50 कोटी लोकांचे लसीकरण सुद्धा झाले आहे , बसेस सुरू आहेत , पर्यटन स्थळी गर्दी आटोक्यात येत नाही मग फक्त शाळाच तेवढ्या का बंद ? असा अनेकांना प्रश्न पडलेला आहे.  या सर्व पार्श्वभूमीवर आता पालक, शिक्षक , विद्यार्थी, नागरीक सर्वांनाच शाळा सुरू होण्याची प्रतीक्षा आहे. शाळेत तर विद्यार्थी नाहीच परंतु 15 ऑगस्ट 2020, 26 जाने 2021, उद्याचा 15 ऑगस्ट 2021 हे राष्ट्रीय सण सुद्धा विद्यार्थ्यांविना साजरे होतांना पाहून भकास वाटते आहे.अर्थात कोरोनाची भीषणता व दडपण सुद्धा नाकारता येईल असे नाहीच. पण आता पालक, शिक्षक, विद्यार्थी सर्वांनाच शाळा सुरु व्हाव्यात असे वाटते आहे. 

     बॉर्डर चित्रपटात घरापासून दूर असलेले सैनिक त्यांच्या घरच्यांची मानसिकता “घर कब आओगे?” या "संदेसे आते है" या गाण्यातून व्यक्त करतात. विद्यार्थीहीन असलेल्या , “विद्यार्थ्या विना सुन्या-सुन्या असलेल्या शाळेत फिरतांना विद्यार्थ्यांची आठवण येऊन माझ्या सुद्धा मनात "स्कुल कब आओगे ?...तुम बिन ये स्कुल सुनी सुनी है ?” असा विचार वारंवार उपस्थित होत होता.

१२/०८/२०२१

Man known as ‘Yavatmal’s Rancho’ dies in rotor blade mishap, ar

 नियतीने का छाटले पंख ?

हेलिकॉप्टरच्या निर्मितीसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत त्याने कार्य केले व त्याने पाहिलेले स्वप्न पुर्ण सुद्धा केले. येत्या रविवारी म्हणजेच आपल्या स्वातंत्र्य दिनी , स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीत प्रवेश करतांनाच्या वर्षात तो आपल्या स्वनिर्मित हेलिकॉप्टरचे प्रात्यक्षिक करणार होता. या प्रात्यक्षिकासाठी त्याने 10 ऑगष्ट रोजी रात्री हेलिकॉप्टर परीक्षण करण्यासाठी म्हणून सुरु केले , ते सुरु झाले, इस्माईल पायलट सिटवर बसला तो आता उडान घेण्याच्या बेतात होताच परंतू नियतीच्या मनात काही वेगळेच होते.

इस्माईल व त्याने बनवलेले हेलिकॉप्टर 

काल सायंकाळी बातम्या पाहात असतांना एक बातमी मनाला चटका लावून गेली, कोणत्याही संवेदनशील भारतीयाचे हृदय पिळवटून टाकेल अशी ती बातमी होती. विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील वेल्डिंग तसेच कपाट , कुलर फ्रीज बनवण्याचे काम करणा-या युवकाने एक स्वप्न पाहिले व ते पुर्ण करण्याच्या ध्यास घेतला होता. इस्माईल त्याचे नांव. इस्माईल शेख. शेख इब्राहिम यांचा लहान मुलगा. अल्पशिक्षित परंतू हुशार व जिद्दी. काहीतरी वेगळे करण्याचा ध्यास असलेला. त्याने अल्पदरात मिळेल असे हेलिकॉप्टर बनवण्याचे स्वप्न पाहिले व त्याच्या निर्मितीचा ध्यास त्याने घेतला. दिवसभर दुकानात काम केले की रात्री इस्माईल हेलिकॉप्टर बनवण्याचे काम करीत असे. आज कित्येक तरुणांना मोबाईलचे व्यसन जडले आहे रात्र-रात्र ते मोबाईलवर मनोरंजन , वेब सिरीज पहात असतात. इतर तरुण जेंव्हा मनोरंजनात बुडलेले असत तेंव्हा इस्माईल आपल्या हेलिकॉप्टरसाठी झटत असे.   आपला राष्ट्रध्वज असलेल्या हेलिकॉप्टरला त्याने “मुन्ना हेलिकॉप्टर” असे नांव दिले होते. इस्माईलला मुन्ना या नावाने सुद्धा सर्व ओळखत असत. दुकानातील जुन्या साहित्यापासून त्याने हे हेलिकॉप्टर बनवणे सुरु केले होते. हेलिकॉप्टरच्या इंजीनसाठी त्याने जुन्या मारुती 800 या गाडीचे इंजिन वापरले. या हेलिकॉप्टरच्या निर्मितीसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत त्याने कार्य केले व त्याने पाहिलेले स्वप्न पुर्ण सुद्धा केले. येत्या रविवारी म्हणजेच आपल्या स्वातंत्र्य दिनी , स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीत प्रवेश करतांनाच्या वर्षात तो आपल्या स्वनिर्मित हेलिकॉप्टरचे प्रात्यक्षिक करणार होता. या प्रात्यक्षिकासाठी त्याने 10 ऑगष्ट रोजी रात्री हेलिकॉप्टर परीक्षण करण्यासाठी म्हणून सुरु केले , ते सुरु झाले, इस्माईल पायलट सिटवर बसला तो आता उडान घेण्याच्या बेतात होताच परंतू नियतीच्या मनात काही वेगळेच होते, अचानक मागील बाजूचा पंखा तुटून तो वरच्या पंख्यात अडकला व त्याचा तुकडा वेगाने इस्माईलच्या डोक्यावर आदळला, घाव वर्मी लागल्याने तो गंभीर जख्मी झाला व इस्माईलचा दुर्दैवी मृत्यू झाला. अत्यंत दुर्दैवी अशी ही घटना आहे. स्वामी विवेकानंदांना असेच इस्माईलसारखे जिद्दी, मनी काहीतरी चांगला ध्यास बाळगणारे तरुण अपेक्षित होते. असे तरुणच  आपल्या मातृभूमीसाठी कार्य करुन उत्कर्ष करू शकतात, हिंसक तरुण नव्हे. भारताला आत्मनिर्भर बनवण्यासाठी असेच इस्माईलसारखे अनेक तरुण हवे आहेत. इस्माईलच्या दु:खद निधनानंतर त्याचेच विचार मनात घोळत होते. असे का झाले असावे ? इस्माईल कुठे चुकला असेल ? अपघात न होण्यासाठी म्हणून दक्षता घेण्यात काही कसूर झाला काय ? इस्माईल ने सुरक्षेसाठी हेल्मेट का नाही घातले ? हेल्मेट घातले असते तर त्याचा नक्कीच बचाव झाला असता. घरी निर्मिती करण्याचा प्रयत्न करणा-या तरुणांना सरकारच्या माध्यमातून उद्योग क्षेत्र संबंधी कार्यालये सुरक्षेसाठी काय काळजी घेतली पाहिजे या संबंधित काही प्रशिक्षणे आयोजित करतात की नाही ? असे नानाविध विचार मनात आले. इस्माईलचा अर्थ शोधला. अरेबिक भाषेतील इस्माईल म्हणजे, प्रेषित अब्राहम आणि सारा या दाम्पत्याने पुत्रप्राप्ती व्हावी म्हणून जी याचना केली होती ती कळकळीची मागणी व ती ईश्वराने पुर्ण केली असा काहीसा होतो. शिवाय अरबी लोक त्यांचा संस्थापक इस्माईल नावाचाच होता असे मानतात, इस्माईलचा एक अर्थ धाडसी असा सुद्धा होतो. 

     फुलसावंगीचा हेलिकॉप्टर निर्मिती करून भरारी घेण्याचे स्वप्न मनी बाळगणारा इस्माईल शेख त्याच्या नावाप्रमाणेच धाडसी होता. त्याच्या वडिलांचे नाव पण इब्राहिमच आहे. या छोट्या गावातील इस्माईलने पाहिलेले स्वप्न त्याने जिद्दीने पुर्ण तर केले परंतू एका छोट्याशा बिघाडाने त्याचा घात करून एका धडाडीच्या ,निर्मितीचा ध्यास बाळगणा-या जिद्दी , होतकरू तरुणाला मात्र काळाने आपल्यातून हिरावून नेले. स्वनिर्मिती करण्या-या तसेच भारताला आत्मनिर्भर बनवण्यासाठी पुढे येणा-या तरुणांना निर्मिती करतांना बाळगायची सुरक्षा याबाबत सरकारने निश्चितच प्रशिक्षणे वा तत्सम काहीतरी करण्याची नितांत आवश्यकता आहे. इस्माईलने जिद्दीने जुन्या , टाकाऊ साहित्यापासून बनवलेल्या हेलिकॉप्टरचा पंखा तुटला खरा , तो पंखा तर जुळेलही परंतू नियतीने मात्र एक मोठी झेप घेऊ पाहणा-या तरुणाचे पंख मात्र कायमचेच का छाटावे ? असा प्रश्न त्याचे आप्तजन व समस्त नागरिकांना त्याच्या दु:खद निधनानंतर पडतो आहे. आज 12 ऑगस्ट विश्व युवक दिवस आहे , इस्माईलसारख्या युवकाबाबत आजच्या दिनी शोकप्रद  लेख लिहिण्यापेक्षा 15 ऑगस्टला त्याच्या हेलिकॉप्टरच्या यशस्वी भरारीनंतर लिहिता आले असते तर किती बरे झाले असते. पण नियतीपुढे कोणाचे चालते? इस्माईलपासून अनेक युवा प्रेरणा घेतलीच हीच आशा आता बाळगूया.  युवा इस्माईलच्या कार्याला, त्याने केलेल्या निर्मितीला सलाम व त्याला भावपुर्ण श्रद्धांजली.   

०५/०८/२०२१

PART - 6 MAD, MTDC

वेडयांच्या विश्वात - भाग 6

एम टी डी सी

माझा मित्र खोडकर होता “मोठ्याने MTDC म्हणून दाखव बरं" तो मला म्हणाला. मी त्याची आज्ञा शिरसावंद्य मानत “Msss Tsss Dsss Csss “ असे मोठ्याने म्हणालो. आणि त्याने मला तसे का म्हणायला लावले हे मला समजायला क्षणही लागला नाही. 

मागील भागापासून पुढे... 

बावरी वेडी होती पण ती कमी बोलत असे. सुमा कुणाशी काही बोलत नसे फक्त खाऊ च्या मागणीचे गीत गुणगुणत चहे-यावरील नैसर्गिक करूण भाव घेऊन फिरत असे. पण आजची कहाणी थोडी निराळी आहे. एम. टी. डी. सी. म्हणजे ते नाही जे तुमच्या मनात आले असेल. महाराष्ट्र टुरीझम विकास प्राधिकरणा बद्द्द्ल या लेखाचा काहीही एक संबंध नाही. "ये एम. टी. डी. सी. तो कोई और है |" बालपणी मी व माझे मित्र खेळत होतो. तेवढ्यात समोरून एक लुगडे नेसलेली सडपातळ बाई झप-झप पाऊले टाकत काही-बाही पुटपुटत चालली होती. तिचा चालण्याचा वेग एखाद्या हळू सायकल चालवणा-यास सुद्धा मागे टाकेल इतका गतिमान असावा, पळणे व चालणे या दोन क्रियांच्या मधील म्हणता येईल अशी तिची वेगवान चाल होती. माझा मित्र खोडकर होता “मोठ्याने MTDC म्हणून दाखव बरं" तो मला म्हणाला. मी त्याची आज्ञा शिरसावंद्य मानत “Msss... Tsss... Dsss... Csss... “ असे मोठ्याने म्हणालो आणि त्याने मला तसे का म्हणायला लावले हे मला समजायला क्षणही लागला नाही. MTDC तील D उच्चार करेतो अत्यंत गलीच्छ, अर्वाच्य शिव्या ती बाई द्यायला लागली. तिच्या शिव्यांची गती सुद्धा तिच्या चालण्याप्रमाणे तेज होती. त्या गलीच्छ, अर्वाच्य शिव्या मी पहिल्यांदाच ऐकत होतो. त्या शिव्यांचा अर्थ काय वगैरे चौथी-पाचवीत असलेल्या मला माहित सुद्धा नव्हते. पण त्या बाईचा क्रोध मात्र कळला. तिला MTDC म्हटले की ती चिडते व रागाने शिव्यांची लाखोली वाहते हे पण स्पष्ट झाले. शिव्या देऊन ती दिसेनाशी झाली. माझा मित्र माझ्याकडे  मोठ्या विजयी मुद्रेने पाहत हसत होता. त्या दिवशी नंतर ती बाई बरेचदा दिसायची मुले तिला चिडवायची. खरीखुरी MTDC म्हणजे पर्यटन विभाग हे कळण्यापुर्वी मला ही शिव्यांची सफर करवून आणणारी MTDC मात्र कळली. मी त्यानंतर तिला पुन्हा कधी MTDC म्हणण्याचे धैर्य केले नाही. विनाकारण कशाला कुणाच्या शिव्या ऐकून घ्यायच्या. 

     या बाईचे खरेखुरे नांव काय , कुठे राहायची , काय करायची हे कधी काहीच कळले नाही. MTDC म्हटल्यावर ती का चिडत असावी ? MTDC म्हटल्यावर चिडून शिव्या देणा-या या बाईबाबत कुणाला सांगितले तर हसण्यावारी तो विषय नेला जायचा पण MTDC म्हटल्याने इतका क्रोध का यावा की अत्यंत गलीच्छ शिव्यांचे वमन मुखातून व्हावे हे एक कोडेच राहून गेले. MTDC विभागामुळे किंवा तेथील कुण्या व्यक्ती कडून तिची फसवणूक झाली असेल का ? तिला मानसिक त्रास दिल्या गेला असेल का ? असे प्रश्न माझ्या मनात त्यानंतर खुप वर्षांनी उपस्थित झाले होते. शिव्यांची लाखोली वाहणा-या या MTDC चे पुढे काय झाले काही कळले नाही. जशी ती अचानक दिसली होती तशीच अचानक गायब झाली. सुमारे 35 वर्षांपुर्वी दिसणा-या या बाईला लोक आता विसरले सुद्धा असतील. 

     कनिष्ठ महाविद्यालयात गेल्यावर कुणी शिवी दिली तर आपण ती स्विकारायचीच नाही या आशयाची गौतम बुद्धांची गोष्ट वाचनात आली होती. एकदा एक व्यक्ती गौतम बुद्धांना खुप शिव्या देतो गौतम बुद्ध मात्र शांतच असतात. शेवटी तो व्यक्ती थकतो तो व आपले शिव्या देणे थांबवून बुद्ध देवाला प्रश्न विचारतो मी तुम्हाला एवढे अर्वाच्य बोललो तुम्ही मात्र काहीच बोलले नाही. तेंव्हा ते उत्तरतात , एखाद्याने आपल्याला काही वस्तू दिली व आपण ती स्विकारली नाही तर ती वस्तू देणा-याकडेच राहते ना ? त्याप्रमाणे तू मला ज्या शिव्या दिल्या मी त्यांचा स्विकारच केला नाही त्यामुळे तू दिलेल्या शिव्या परत तुझ्याकडेच राहिल्या. यानुसार कुणी शिव्या दिल्या तर आपल्याला त्याचे काही वाटले नाही पाहिजे, त्या शिव्यांचा आपण मुळी स्विकारच करू नये. असा त्या कहाणीचा मतितार्थ होता. अर्थात प्रत्यक्ष जीवनात याप्रमाणे आचरण करणे मात्र अत्यंत कठीण आहे. 

MTDC ला चिडवल्यावर ती शिव्या देत असे लोक त्या हसून ऐकत पण स्विकारीत मात्र नसत. MTDC तर वेडी होती पण मानसिक स्वास्थ्य चांगले असलेल्या माणसाने क्वचित प्रसंगी शिव्या दिल्या तर आपल्याला दु:ख होईल, क्रोध अनावर होईल आपण प्रतिक्रिया देण्यास प्रवृत्त होऊ पण त्या शिव्यांचा स्विकार न करून शांत राहणे शक्य होईल का ? तर याचे उत्तर बहुतांश नाहीच येईल अशी शक्यता आहे कारण आजकाल जगातून शांतरस लुप्त होत चालला आहे. माझा लेखन प्रपंच सुरु असतांनाच नेमके त्याचवेळी  रस्त्यावर दोन विद्यार्थी गलिच्छ भाषेत बोलत होते. ती वेडी स्त्री MTDC तर वेडेपणात शिव्या देत असे परंतू हल्ली सुज्ञ, सुशिक्षित म्हणवणारी तरुणाई वाक्यापरत गलिच्छ शब्दोच्चारण करते, शिव्या देते यांचा हा वेडेपणा कसा सरणार ? या विचारात मी गढून गेलो.

                                                 क्रमश:

👉 या मालिकेतील लेखात आलेल्या व्यक्तींच्या मूळ नावाचा उल्लेख टाळलेला आहे. काल्पनिक नांवे वापरली आहेत. तरीही साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग आहे. 

     या मालिकेतील लेख हे केवळ माहितीस्तव आहे यातून कुणाच्या अथवा कुणाच्याही परिवाराच्या मानसिक स्वास्थ्याची अवहेलना करण्याचा हेतू नाही. कुणाचा अपमान करण्याचा किंवा कुणाला दुखावण्याचा उद्देश नाही हे नम्र निवेदन.