२५/११/२०२१

Part 4- Rabadi, Food Culture of Khamgaon

 खामगांवची खाद्य संस्कृती भाग-4

स्वादिष्ट रबडी

...रबडीचा शोध कसा लागला ? बासुंदी आणि रबडी यातील फरक काय ? रबडीची पाळेमुळे शोधू गेल्यास फार मागे जावे लागेल.  खामगावात मात्र 1955 पासून मिळत असलेली स्वादिष्ट रबडी ही 66 वर्षांपासून एकमेवाद्वितीय अशी आहे...

मागील भागापासून पुढे...

मागील लेख हा अंबिका हॉटेलच्या पेढ्याविषयी होता तो लिहितांना खामगांवात पुर्वी खुप प्रसिद्ध  असलेल्या रबडीची सुद्धा आठवण होत होती. एक दिवस विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. थोडे ढग जमा झाले व वा-याचा वेग जराही वाढला की आपल्याकडे सर्वात प्रथम काय होत असले तर ते म्हणजे विद्युत पुरवठा बंद होणे व तसेच यावेळी झाले होते. मुलांना करमत नव्हते म्हणून बाहेर फिरायला घेऊन गेलो , थेट फरशीवर गेलो व गुप्ता यांच्या हॉटेल मध्ये तीन दुध ऑर्डर केले. मुलांना खुप आवडले. “येथील रबडी सुध्दा खुप चांगली असते” मी म्हणालो. दुध गरम असल्याने मुले निवांतपणे पीत होती आणि मला गतकाळ आठवत होता. पायजामा , कुर्ता, काळी टोपी घातलेले आजोबा व त्यांच्यासह नातवंडे पायी पायीच जात असल्याचे दृश्य गरम दुधाच्या पेल्यातील वाफेच्या आडून माझ्या नेत्र पटलावर तरळू लागले. दुध व दुग्धजन्य रबडी या पदार्थामुळे तसेच बालपणापासून पहात असलेल्या व बाकडे, दरवाजा, कपाटे, हौद इ. अगदी वर्षानुवर्षे जसेच्या तसेच असलेल्या त्या हॉटेलमुळे माझ्या आजोबांची आठवण मला येत होती. आजोबा नानासाहेब वरणगांवकर वैद्य व परवानाधारक शिकारी सुद्धा होते. त्यांना जलंब परिसरातील लोक नाना शास्त्री म्हणून ओळखत. वैद्य असल्याने आहाराबाबत ते दक्ष असत. त्यांचा आहार खुप संतुलित व सुयोग्य असा होता. चहाची चवच त्यांना माहित नव्हती. ते दुध घेत असत. कित्येकदा ते आम्हाला याच गुप्तांजींच्या हॉटेल मध्ये दुध पिण्यास नेत असत. या स्मृती विश्वात मी पुरता गुंतलो होतो. “चला बाबा” हा मुलांचा आवाज मला त्यातून बाहेर काढण्यास निमित्त झाला व मी पुन्हा वर्तमानात आलो. घरी परतलो. घरी आल्यावर निजतांना दुध व रबडीच्या आठवणी येतच होत्या. रबडी बाबतीतील एका गीताचा गमतीशीर प्रसंग सुद्धा आठवला तेरे जियो नइयो लबड़ी” अशा ओळीचे अमिताभ परवीन बाबीवर चित्रित एक गीत त्याकाळी खुप गाजले होते. तेरे जियो नइयो लबड़ी ” या ओळी मला "तेरे बिन मै रबडी" अशाच ऐकू यायच्या व रबडी हा खाद्य पदार्थ या गाण्यात कसा काय आला ? असा प्रश्न पडायचा. त्या ओळीचा अर्थ पुढे समजला खाण्याच्या रबडीशी त्याचा काहीही एक संबंध नव्हतातेरे जियो नइयो लबड़ी ” या पंजाबी ओळीचा अर्थ होतो "तुझ्या शिवाय जीव लागत नाही" बालवयात जीव लागत नाही वगैरे काय कळणार ? तेंव्हा खाणे, पिणे , झोपणे , खेळणे हेच माहित असते. त्यामुळेच मग त्या गाण्यातील लबडी हा शब्द अगदी काही दिवस अगोदरपर्यंत रबडी असाच ऐकू यायचा. ही शब्दांची गंमतहे फिल्मी गीतपुराण फक्त रबडी व लबडी या शब्दांतील लहानपणी झालेल्या गोंधळामुळे सांगावेसे वाटले. दुस-या दिवशी या जुन्या स्मृतीतून निघून फरशी वरील गुप्ता यांच्या हॉटेल मधील रबडी बाबत लिहू लागलो. 

    गुप्ता यांचे फरशी वरील हे हॉटेल आजही ग्राहक सेवेत आहे. 1955 पासून असलेले हे एक खामगांव शहरातील जुने हॉटेल आहे. फरशी म्हणजे खामगांव शहरातील मध्यवर्ती ठिकाण. जुन्या काळात नदीवर फरशांचा अथवा फरशीवजा असा छोटा पुल असे. या भागातून बोर्डी नदी वाहते (आता नाला) त्यावर असा फरशीवजा पुल होता असे सांगितले जाते व म्हणून हा भाग फरशी याच नावाने ओळखला जाऊ लागला असावा. याच भागात म्हणजे शिवाजी वेस कडे जातांना पुलाच्या अगदी समोर हे गुप्ताजींचे हॉटेल आहे. गुप्ता यांचे एक बंधू होते भगवान गुप्ता. यांचे सुद्धा शाळा क्र 6 जवळ तृप्ती हॉटेल होते. तृप्ती हॉटेल मध्ये दही खूप चांगले मिळत असे. रबडीसाठी मात्र फरशी वरील गुप्ताच प्रसिद्ध.

      रबडी हा पदार्थ कधी बनला , त्याचा शोध कसा लागला? बासुंदी आणि रबडी यातील फरक काय? अशी रबडीची पाळेमुळे शोधू गेल्यास फार मागे जावे लागेल. मोहेंजोदडो व हडप्पा संस्कृतीत बैलाचे चित्र/खेळणे सापडले होते. त्याअर्थी गाय सुद्धा पाळीव असेलच व तीचे दुध सुद्धा उपयोगात आणले जात असेल म्हणजे दुग्धजन्य पदार्थ बनवणे त्याकाळात मानवाला ज्ञात असण्याची शक्यता नाकारता येत नाही. खामगावातील गुप्ता यांची रबडी मात्र 1955 मध्ये सुरु झाली, 66 वर्षांपासून खामगांवकर तीची चव चाखत आहेत. ही रबडी आपल्याला घरी आणायची असेल तर एक दिवस आधी जाऊन ऑर्डर द्यावी लागते तरच रबडी मिळते. ऐन वेळेवर गेल्यास उपलब्ध नसते. खामगांवातील अनेक हॉटेल मध्ये सुद्धा ही गुप्ताजींचीच  रबडी मागवली जाते. अशी ही खामगांवातील लोकप्रिय रबडी आहे. स्वभावत:च मला खाद्य पदार्थ कसे बनवायचे त्याची रेसिपी यापेक्षा ते खाण्यातच अधिक रस आहे परंतू रबडी ही बासुंदीपेक्षाही अधिक घट्ट व सायीची I mean दुधाच्या सायीची बनवतात. दुधाच्या सायीची असे लिहावे लागले कारण ग्रामिण भागात सायीची/सायीचा असे म्हटले की निराळाच अर्थ होतो. तर रबडी ही दुधाच्या सायीची बनलेली असते. मंद आचेवर दुध दीर्घकाळ आटवले की रबडी बनते. कुणास ठाऊक का परंतू आताच्या पिझ्झा, बर्गर, मोमोज खाणाऱ्या पिढीला दुध हे पौष्टिक जरी असले तरी दुधाची व दुग्धजन्य पदार्थांची आवड कमी आहे. दुध तरी आता पुर्वीसारखे कुठे आहे? लोकांनी नकली दुध बनवण्यासाठी रासायनिक सूत्र शोधून काढले आहे. जनतेच्या जिविताशी खेळणा-या भेसळखोरांच्या युगात अस्सल पदार्थ व त्यांची चव लुप्त होत चालली आहे. फरशी वरील गुप्ताजी यांची रबडी मात्र आजही तीची पुर्वीची चव टिकवून आहे. गुप्ता यांच्या हॉटेल मधील घट्ट व सायीचे गोळे असलेली स्वादिष्ट रबडी डबा उघडून वाटीत टाकेतो tempting feel आणून देते व त्या मधुर रबडीचा आस्वाद घेतल्यावर तृप्तीचा ढेकर येतो परंतू खाणा-याची स्थिती मात्र "पेट तो भर गया लेकीन मन नही भरा" अशी हमखास होते. एव्हाना माझे लिखाण संपले होते. "अहो, चहा घेताय ना ?" सौ.चा आवाज आला. "नाही दुध", चहाचा भोक्ता असलेला मी दुध, रबडी या उहापोहामुळे दुध घेतो असे आपसूकच म्हणालो.  इतके पदार्थ, हॉटेल आज खामगांवात आहे तरीही आजही खामगांवात  रबडी आणायचे काम पडल्यास अनेकांची पावले मात्र फरशी वरील गुप्ता यांच्या हॉटेलकडेच वळतात.

                                                   क्रमश:

👉 नवनवीन व स्वादिष्ट पदार्थांच्या रेसिपी साठी नक्की बघा 👇

https://youtube.com/c/OnlyVeg

 रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनल ला subscribe करायला विसरु नका 🙏

१८/११/२०२१

Part 3- Pedha, Food Culture of Khamgaon article series- Ambika Hotel

खामगांवची खाद्य संस्कृती भाग-3

एक अनोखा पेढा

एकदा शाळेचा निकाल लागल्यावर वडील पेढे घेऊन आले होते. किती टक्के मिळाले याऐवजी उत्तीर्ण झाले म्हणजे पेढे आणणे हा त्यांच्या शिरस्ताच होता. मिळालेले यश साजरे करावे व पुढे जावे असे त्यांचे म्हणणे असते. त्यावेळचा तो पेढा पाहून मात्र आश्चर्य वाटले होते. खाकी रंगाचा तो भला मोठा, अनोखा पेढा पाहून आम्हा भावंडाना आश्चर्य वाटले होते. “हा कोणता पेढा ? “असे सहज उद्गार बाहेर पडले.

स्व. श्री हिराचंद वेलजी मैसेरी

मागील भागापासून पुढे 

बहुदा तिखट, चटपटीत पदार्थ हे जास्त लोकप्रिय असतात. आनंद भुवनची चकली ही त्यापैकीच एक होती. तिखट, चटपटीत पदार्थ जरी जास्त आवडत असले तरी गोड पदार्थांची महिमा सुद्धा अगाध आहे. आगामी दोन लेखात खामगांव शहरात प्रंचड लोकप्रिय झालेल्या दोन गोड पदार्थांबाबतची माहिती आहे. “साखरेचे खाणार त्याला देव देणार” अशी जुनी म्हण आहे पण काळ झपाट्याने बदलला , जीवनशैली बदलली , ताण-तणाव वाढले व आता “साखरेचे खाणार त्याला मधुमेह दणका देणार” अशी परिस्थिती आहे. भारतात सुद्धा मधुमेहींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. पण तरीही शरीराला सर्व रसांची आवश्यकता ही असतेच व म्हणूनच मधुर रसाचे सुद्धा महत्व आहेच. गोड पदार्थामध्ये सर्वात जुना पेढाच असावा. कारण दुधा पासून खवा व नंतर पेढा बनला असावा. परंतू त्या इतिहासात जाण्याऐवजी खामगांवातील एका अनोख्या पेढ्या बाबतच पाहूया नाहीतर पदार्थांच्या इतिहासात डोकावले तर रसगुल्ला या पदार्थाहून ओडीसा व पश्चिम बंगाल मध्ये जसे वाद आहेत तसा एखादा वाद न उदभवो.

      एकदा शाळेचा निकाल लागल्यावर वडील पेढे घेऊन आले होते. किती टक्के मिळाले याऐवजी उत्तीर्ण झाले म्हणजे पेढे आणणे हा त्यांच्या शिरस्ताच होता. मिळालेले यश साजरे करावे व पुढे जावे असे त्यांचे म्हणणे असते. त्यावेळचा तो पेढा पाहून मात्र आश्चर्य वाटले होते. खाकी रंगाचा तो भला मोठा अनोखा पेढा पाहून आम्हा भावंडाना आश्चर्य वाटले होते. “हा कोणता पेढा ? “असे सहज उद्गार बाहेर पडले. “हा अंबिकाचा पेढा आहे, शुुध्द खवे का कच्छ का पेढा" वडील उत्तरले. तेंव्हा अंबिका नावाचे हॉटेल माहित झाले.

सर्वांन तो मोठ्या आकाराचा पेढा खूप आवडला होता. त्यानंतर तो पेढा बरेचवेळा खाल्ला. मोहन टॉकीज (आता मोहन मॉल) समोर अंबिका हॉटेल आहे. या हॉटेल मध्ये नंतर अनेकदा गेलो. या हॉटेल मालकाचे आडनांव मैसेरी होते. मैसेरी कुटुंबीय आता शहा या आडनावाने सुद्धा ओळखले जाते. हिरासेठ मैसेरी वडीलांचे चांगले मित्र होते व त्यांचे आमच्या घरी येणेजाणे होते. अनेक बाबतीत ते माझ्या वडिलांचा सल्ला घेत. हिरासेठ यांच्या वडीलांनी म्हणजे वेलजीभाई मैसेरी यांनी हे हॉटेल सुरु केले होते. मैसेरी हे गुजराथी कुटुंब. सुस्वभावीपणा, टापटीप , स्वच्छता, व्यवसायिक कौशल्य अशी गुजराथी लोकांची वैशिष्ट्ये आहेत. म्हणूनच देश विदेशात कित्येक यशस्वी असे गुजराथी लोक आहेत. उपरोक्त वैशिष्ट्यां नुसार अंबिका हॉटेलचे सुद्धा स्वच्छता व टापटीप हे एक मोठे वैशिष्ट्य. या हॉटेलचे किचन सुद्धा खुप स्वच्छ असते. तेंव्हा हिरासेठ काका “खाने की चिजें अपने घर के लोग खुद बनाते" व “अपनेही हॉटेल मे लेडीज और  फॅमिली आती" असे ते अभिमानाने सांगत. आजही अंबिका हॉटेल म्हणजे खामगांव शहरातील अनेक प्रतिष्ठीत व्यक्तींच्या सकाळच्या नाश्त्यासाठीचे आवडते ठिकाण आहे. हिरासेठ काकांना याचा मोठा अभिमान होता. पेढ्याप्रमाणे येथील उपवासाची बटाट्याची भाजी अप्रतिम असते व इतर पदार्थ सुद्धा चविष्ट असतात. खामगांवात दक्षिणात्य पदार्थ सर्वात प्रथम अंबिका हॉटेल मध्येच सुरु झाले अशी माहिती आहे. अंबिकाचा पेढा मात्र सर्वांनाच आवडत असे. कालांतराने या पेढ्याचा आकार कमी झाला. पण चव तीच होती. अस्सल खव्याचा हा पेढा होता. आता अस्सल खवा दुर्मिळ होत चालला आहे. गृहिणींनी एखाद्या वेळी शुद्ध दुध घरी आटवून अस्सल खव्याची चव स्वत: चाखावी व आपल्या मुलांना सुद्धा द्यावी म्हणजे त्यांना खरा खवा काय असतो हे कळेल. अर्थात हा न मागता दिलेला सल्ला आहे.

      वर्ष 2014 मध्ये आनंद भुवनच्या शताब्दी समारोहा बाबत लेख लिहिला होता तेंव्हा हिरासेठ काका म्हणाले होते “अपने अंबिका के बारेमे भी लिखो कुछ” पण त्यावेळी लिहिणे झाले नाही. हिरासेठ काका इहलोक सोडून गेले. आज हा लेख लिहितांना त्यांची आठवण होत आहे. ज्या हॉटेलसाठी त्यांनी आयुष्यभर मेहनत घेतली, झटत राहिले, मालक असूनही हॉटेलमधील अनेक कामे करायला त्यांनी कधीच मागेपुढे पाहीले नाही. दर रविवारी हॉटेल बंद ठेवत व त्या दिवशी दिवाळीत जशी साफसफाई करतात तसे हॉटेल साफ करीत. अंबिका हॉटेल बाबत लेख प्रकाशित झालेला पाहून त्यांना मोठा आनंद वाटला असता.  

                                                  क्रमश:

👉 नवनवीन व स्वादिष्ट पदार्थांच्या रेसिपी साठी नक्की बघा 👇

https://youtube.com/c/OnlyVeg

 रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनल ला subscribe करायला विसरु नका 🙏

१५/११/२०२१

Article about sad demise of Eminent Historian Babasaheb Purandare

सह्याद्री हादरला महाराष्ट्र हळहळला

शिवाजी महाराजांचा खरा इतिहास जाणण्यासाठी व तो घराघरात पोहोचवण्यासाठी त्यांनी घेतलेले अपार कष्ट त्यांची धडपड महाराष्ट्रवासियांच्या सदैव स्मरणात राहील. तसेच त्यांच्या बोलण्यातील माधुर्य , त्यांची शांत वृत्ती हे सुद्धा नेहमी प्रेरणादायी राहिल.

शंभराव्या वर्षात पदार्पण केल्यावर कात्रज येथे झालेल्या सत्कार समारंभात बोलताना बाबासाहेब म्हणाले होते की, "शंभर वर्षे पूर्ण झाल्यावरच व शिवसृष्टी साकार झाल्यावरच मी जाईल" परंतु काळाने जुमानले नाही शिवाजी महाराज ज्याप्रमाणे शत्रूवर अचानक छापा घालीत त्याप्रमाणे काल काळाने बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर घाला घातला. कालपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. घरात पडल्यावर त्यांना न्यूमोनिया झाला व त्यांची प्रकृती खालावत गेली. आज कार्तिकी एकादशीला भल्या पहाटे त्यांचे निधन झाले. आपले संपूर्ण जीवन छत्रपती शिवाजी राजांच्या जीवनाच्या अभ्यासामध्ये व्यतीत करणाऱ्या बाबासाहेब पुरंदरे यांनी राजा शिवछत्रपती तसेच महाराजांच्या विषयी अनेक पुस्तकांचे लेखन केले आहे. राजा शिवछत्रपती या पुस्तकात त्यांना माहिती कुठून मिळाली याचे संदर्भ सुद्धा दिले आहेत. जाणता राजा हे त्यांचे शिवाजी महाराजांवरील महानाट्य जगभर गाजले आहे व त्याचे कित्येक प्रयोग झाले आहेत. 2015 या वर्षी बारा हजार पाचशे आसन क्षमता असलेल्या लंडन येथील वेंबले सभागृहात सुद्धा हे महानाट्य प्रदर्शित झाले. जा गोर्‍यांचा कावा सर्वप्रथम शिवाजी महाराजांनी ओळखला होता व त्यांना कधीही डोके वर काढू दिले नव्हते, प्रसंगी तुरुंगातही टाकले होते त्याच गोर्‍यांच्या देशात जाणता राजा हे महानाट्य मोठ्या दिमाखात दाखविले गेले. छत्रपतींचे चरित्र जनसामान्यांपर्यंत पोहोचवणाऱ्या या महानाट्याचे वीस वर्षांपूर्वी अमेरीकेत सुद्धा प्रयोग झाले आहेत. आपण महाराष्ट्रीय अस्मिता व महाराष्ट्र राज्य सुसंस्कृत असल्याचा मोठा अभिमान बाळगत असतो परंतु जातिभेदासारखे कित्येक वादग्रस्त मुद्दे निव्वळ उगाळत बसतो. शिवाजी महाराजांच्या सूरत लुटी सारख्या घटना व त्यामुुळे शिवाजी महाराज यांच्या प्रती गुजराथी जनतेत असलेली भावना, गैरसमज , या सर्व समजुतींना बाजूला सारून गुजरात पर्यटन विभाग व बँक ऑफ बडोदा यांनी मात्र जाणता राजा हे महानाट्य लंडन येथे आयोजित केले होते. बाबासाहेब पुरंदरे यांना ज्यावेळी महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याचे ठरले होतेे त्यावेळी अनेकांनी आक्षेप घेतला होता, नाके मुरडली होती त्यावेळी "महाराष्ट्र भूषण नव्हेे तर विश्वभुषण" असा एक लेख मी लिहिला होता. अमेरिका, इंग्लंड या देशात जाणता राजा महानाट्य आयोजित झाले इतरीही देशात होईल आणि मग कोणी विदेशी संस्था बाबासाहेबांना विश्वभुषण सारखा एखादा पुरस्कार देईल आणि मग आम्हा भारतीयांना महाराष्ट्रवासीयांना बाबासाहेबांच्या कार्याची महती कळेल असे बाबासाहेबांच्या पुरस्कारावर आक्षेप घेतला गेला होता म्हणून त्या लेखात लिहिले होते. कारण आपली सवयच आहे की, परकीयांनी काही सांगितले की मग आपल्याला ते पटतेे. शिवाजी महाराजांची किर्ती अनेक देशात पसरविणारे बाबासाहेब पुरंदरे आज आपल्यामध्ये नाहीत. त्यांच्या निधनाने सर्वत्र शोक व्यक्त होत आहे. पंतप्रधान मोदी, नितीन गडकरी व कित्येकांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक प्रकट करून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. शिवाजी महाराजांचा खरा इतिहास जाणण्यासाठी व तो घराघरात पोहोचवण्यासाठी त्यांनी घेतलेले अपार कष्ट त्यांची धडपड महाराष्ट्रवासियांच्या सदैव स्मरणात राहील. तसेच त्यांच्या बोलण्यातील माधुर्य , त्यांची शांत वृत्ती हे सुद्धा नेहमी प्रेरणादायी राहिल. त्यांच्याबाबत लिहिलेला "जाणता माणूस" हा लेख जेव्हा त्यांना भेट म्हणून दिला होता तेव्हा त्यांनी म्हटले होते की , "कुणी काहीही म्हणो आपण शांततेने आपले काम करीत जावे" आज बाबासाहेब आपल्यात नाही परंतु जाणता राजा, राजा शिवछत्रपती त्यांचे इतर अनेक ग्रंथ हे व लवकरच साकार होत असलेली शिवसृष्टी याद्वारे ते नेहमीच आपल्यामधे राहणार आहे. बाबासाहेब पुरंदरे यांच्या जाण्याने सह्याद्री हादरला असून महाराष्ट्र हळहळला आहे बाबासाहेब पुरंदरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.



बाबासाहेब पुरंदरे यांचे बाबतचे लेख 👇

जाणता माणूस
https://vinayvarangaonkar.blogspot.com/2021/07/an-old-article-written-in-2015-on.html
2 खरंच दुर्दैव !
https://vinayvarangaonkar.blogspot.com/2017/08/raj-thakre-speech-on-occasion-of-95th.html


११/११/२०२१

Part 2- Chakli, Food Culture of Khamgaon article series-Anand Bhuvan

 खामगांवची खाद्य संस्कृती भाग-2

'आनंद'दायी चकली

इंग्रजांच्या काळात सुरु झालेल्या या हॉटेल मध्ये चकली, बटाटा वडा, मिसळ असे पदार्थ उपलब्ध असत. पण चकली हा पदार्थ मात्र सर्वात जास्त लोकप्रिय होता. बटाटा वडा सुद्धा आहे परंतू पुर्वी येथील चकली जास्त प्रसिद्ध होती असे असल्याचे ऐकले आहे. तशी ती आजही आपली प्रसिद्धी टीकवून आहे.जाड , मोठी खमंग चकली, सोबत घट्ट दही अशी ताटली डोळ्यासमोर आली की तोंडातील ग्रंथी स्त्रवत असत.

मागील भागापासून पुढे

राजाभाऊंचे हॉटेल फिरते होते पण त्यांच्याही आधीपासून खामगांवात हॉटेल्स होती. अशाच काही हॉटेल्स व त्यातील प्रसिद्ध पदार्थांचा ऊहापोह येथून पुढे होणारच आहे. पण सुरुवातीला आठवत आहे तो पदार्थ म्हणजे चकली. वर्ष 2014 मध्ये “शताब्दी महोत्सव”  असा मजकूर असलेली एक पत्रिका घरी आलेली दिसली. त्वरीत प्रेषक म्हणून कोण पाहण्यासाठी दृष्टी पत्रिकेच्या तळाशी गेली, 'हॉटेल गोखले आनंद भुवन’ हे नांव दिसले. पत्रिका पाहिल्यावर आनंद भुवन संबंधित कित्येक आठवणी ताज्या झाल्या. वडा, चकली, मिसळ अनेक पदार्थ डोळ्यासमोर आले. आनंद भुवनची जुनी इमारत , त्यातील वस्तू अर्ध्या चड्डीतील वेटर नंतर शेजारची इमारत पडली म्हणून दक्षता म्हणून बांधण्यात आलेली आनंद भुवनची नवीन इमारत. अशा अनेक घटना स्मृतीपटलावर उमटत गेल्या. खामगांव व परिसरातील कित्येक लोकांच्या अनेकविध स्मृती या आनंद भुवनशी नक्कीच निगडीत असतील.

      30-32 वर्षांपुर्वीची घटना आहे माझी मावशी तेंव्हा नंदुरबार येथे राहत होती. मावशी व काका एक दिवस आमच्याकडे आले होते. मी चौथी-पाचवीत असेन. वडील ऑफिसला निघून घेले होते. आईने मला बासुंदी आणण्यास पाठवले. ती आणण्यासाठी म्हणून मी आनंद भुवन अल्पोपहार गृहात गेलो. कधी-कधी वडिलांसोबत चकली खाण्यासाठी म्हणून गेल्याचेही आठवते. आजही मला आनंद भुवनची जुनी इमारत व अंतर्गत रचना स्पष्टपणे आठवते. मुख्य दरवाजा एखाद्या घराच्या दरवाजासारखा होता. आत प्रवेश केल्यावर दोहो बाजूंनी संगमरवरी असलेल्या टेबलांच्या दोन रांगांच्या मधून काऊंटरकडे जावे लागायचे. आजही हेच टेबल आनंद भुवन मध्ये आहेत. डाव्या बाजूला पाण्याचा हौद,भांडे धुण्याची जागा होती. या हॉटेलच्या भिंतींवर सुंदर , दुर्मिळ म्हणू शकू असे देवी देवतांचे अनेक फोटो होते. त्यावेळी खामगांवात उपहारगृहे कमी होती. कुणाच्याही घरी पाहुणे आले, मित्र मंडळी आली की त्यांच्यासह आनंद भुवनची भेट ठरलेली असे नाहीतर इथला पदार्थ घरी जात असे. "गोखले यांचे आनंद भुवन" या विदर्भात ख्याती असलेल्या हॉटेलची धुरा खामगांवातील प्रतिष्ठीत नागरिक पांडुरंग पाटील यांच्या खांद्यावर होती. श्री पांडुरंग पाटील (पातकळ) हे मुळचे अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील चापडगांवचे. ते नंतर खामगांवला स्थाईक झालेले. त्यांचेसह त्यांचे काही नातेवाईक सुद्धा खामगांवला स्थाईक झाले होते. सर्व कुटुंबीय हॉटेलसाठी झटत असे. श्री पांडुरंग पाटील यांचे पुत्र श्री जानकीराम पाटील हे व माझे वडील मित्र असल्याने व त्यांच्याशी घनिष्ट संबंध असल्याने आनंद भुवन या हॉटेलबद्दल एक आपुलकीची भावना मनामध्ये होती. श्री पांडुरंग पाटील हे स्वत: स्वच्छतेचे भोक्ते होते ते नेहमी पांढरा शुभ्र सदरा , पांढरे शुभ्र धोतर व काळी टोपी परिधान करित. लहानपणी त्यांना मी कित्येक वेळा पाहिले आहे. त्यांच्या घरासमोरच्या ओट्यावर ते खुर्ची घेऊन बसलेले असत. त्यांच्या हातात वेत असे. स्वत: स्वच्छ असल्याने ते हॉटेलच्या स्वच्छतेकडे बारकाईने लक्ष देत असत. हॉटेल मधील कर्मचा-यांना पाटील परिवार स्वत:च्या परिवारा प्रमाणेच वागणूक देत असे. इंग्रजांच्या काळात सुरु झालेल्या या हॉटेल मध्ये चकली, बटाटा वडा, मिसळ असे पदार्थ उपलब्ध असत. पण चकली हा पदार्थ मात्र सर्वात जास्त लोकप्रिय होता. 

बटाटा वडा सुद्धा आहे परंतू पुर्वी येथील चकली जास्त प्रसिद्ध असल्याचे ऐकले आहे. जाड, मोठी खमंग चकली सोबत आनंद भुवनची विशिष्ट अशी चटणी अशी ताटली डोळ्यासमोर आली की, तोंडातील ग्रंथी स्त्रवत असत. पुढे आनंद भुवन मध्ये अनेक नवीन पदार्थांची भर पडली. असा किस्सा सुद्धा ऐकीवात आहे की पुर्वी या हॉटेलमध्ये नाश्ता झाल्यावरच प्रवासी बस निघत असे (तेंव्हा राज्य परिवहन महामंडळ नव्हते व खाजगी बसेस आनंद भुवन जवळून सुटत असत) स्वतंत्रता पुर्व काळात मुलगा हॉटेलमध्ये गेला की तो बिघडला असे समजले जात असे म्हणून मग हॉटेलला पडदा लावलेला असे. तसा तो आनंद भुवनला सुद्धा होता व बसण्याची व्यवस्था पाटावर असे , टेबल खुर्ची साहेबांमुळे आली. या हॉटेलवर आधारीत योगिनी जोगळेकर लिखित “सुहृद” नावाची एक लघु कादंबरी सुद्धा काही वर्षांपुर्वी प्रकाशित झाली होती. तसेच काही वर्षांपुर्वी प्रत्येक गावातील खाद्य संस्कृती बद्दल एक सदर लोकसत्ता मध्ये प्रकाशित झाले होते. त्यात सुद्धा आनंद भुवन वर विस्तृत माहिती देण्यात आली होती. 2014 मध्ये आनंद भुवन 100 वर्षांचे झाले. शताब्दी समारंभासाठी विविध गांवातून लोक आले होते. खामगांवचे भूषण असलेले हे हॉटेल 100 वर्षांपासून खवय्यांना आनंददायी असलेल्या चकली व इतर खाद्य पदार्थांची सेवा येथील कर्मचारी पाटील परिवाराच्या देखरेखीखाली ग्राहकांना देत आहेत. गतकाळात मित्र मंडळीसह गप्पांसोबत गरम चकलीचा स्वाद घेणा-या खामगांवातील व आज खामगांव सोडून इतरत्र स्थायिक झालेल्या अनेकांना आनंद भुवन व तेथील चकली , वड्याची चव यांची स्मृती कायम राहीलच.     

                                                   क्रमश:

०९/११/२०२१

Article about S.T. employee strike in Maharashtra

 "बहुजन हिताय एस.टी.कर्मचारी सुखाय"

 सुरक्षितरित्या परिवहन मंडळाची मोटार हाकणारे चालक आणि वाहक यांची मेहनत खरच वाखाणण्याजोगी आहे. विदर्भ आणि खानदेशातील उन्हाळ्यात भर उन्हात सूर्य आग ओकीत असतांना मंडळाचे चालक व वाहक मोटारीच्या गरम संयंत्रा शेजारीच बसून गाडी चालवीत असतात. पिण्यासाठी बारदान्याच्या कपड्याने लपेटलेली बाटली असते शिवाय आगारामध्ये दुरुस्ती पथक सुद्धा राबत असते. अशा कर्मचा-यांची सुद्धा सरकारने इतर कर्मचा-यांप्रमाणे काळजी वाहणे आवश्यकच आहे.

 महामंडळ कर्मचा-यांचा वेतनासाठी संप सुरु आहे. आजपावेतो राज्यभरात 376 एस.टी. कर्मचारी निलंबित झाले आहे, त्यांच्या विरोधात अवमान याचिका दाखल झाली, कित्येक आत्महत्या झाल्या. श्रमाची किंमत, श्रमाला प्रतिष्ठा असायलाच  हवी. “सबको मिले मेहनत के मुताबिक अपना अपना हिस्सा” याप्रमाणे सर्वाना त्यांच्या कामाचा योग्य असा मेहनताना मिळायलाच हवा आणि तो देणे हे सरकारचे कर्तव्य आहे. थंडी, पाऊस आणि उन्हाळा या तिन्ही ऋतूत आपल्या संसाराचा गाडा हाकण्यासाठी प्रवाश्यांना सुरक्षितरित्या त्यांच्या गंतव्यस्थानी पोहचवण्यासाठी परिवहन मंडळाची मोटार हाकणारे चालक आणि वाहक यांची मेहनत खरच वाखाणण्याजोगी आहे. विदर्भ आणि खानदेशातील उन्हाळ्यात भर उन्हात सुर्य आग ओकीत असतांना मंडळाचे चालक मोटारीच्या गरम संयंत्रा शेजारीच बसून गाडी चालवीत असतात, सोबत वाहक सुद्धा असतोच. पिण्यासाठी बारदान्याच्या कपड्याने लपेटलेली बाटली असते शिवाय आगारामध्ये दुरुस्ती पथक सुद्धा राबत असते. अशा कर्मचा-यांची  सरकारने सुद्धा इतर कर्मचा-यांप्रमाणे काळजी वाहणे आवश्यकच आहे. याच कर्मचा-यांच्या संघटनेने त्यांच्या मागण्यांसाठी ऐन दिवाळीत  संप केला.नेमके जेंव्हा नागरिकांना फिरण्याचे जास्त काम असते तेंव्हाच हा संप झालेला आहे. खेड्यापाड्याच्या जनतेची तर फारच कुचंबणा होईल. दिवाळीच्या दिवसांत खाजगी प्रवाशी वाहतूकदार आपल्या वाहनांचे भाडे अव्वाच्या सव्वा वाढवितात. जनतेला नाहक भुर्दंड सोसावा लागतो शिवाय यांची वागणूक अरेरावीची. संप पुकारून आता बरेच दिवस लोटले आहेत. प्रशासनाने निलंबन व कारवाईचा इशारा दिला आहे. ऐन दिवाळीत कुणाचेही निलंबन न होवो. सरकारने व कर्मचारी संघटनेने सुद्धा जनता, कर्मचारी अशा दोघांचेही हित बघून लवकरात लवकर निर्णय घ्यावा. कित्येक कर्मचा-यांनी आत्महत्या सुद्धा केल्या. पण सरकार आर्यन, अमली पदार्थ, नावं गाणे, अंडी कशी उबवली इ बाबीतच  जास्त व्यस्त आहे. हा लेख प्रकाशित होईतो कदाचित संप मिटलेलाही असू शकतो. महामंडळाकडे पैसाच नाही असे ऐकिवात आले आहे. पैसेच नाही तर मग मंडळ नफ्यात येईल अशा काही उपाययोजना करा ना ! एकीकडे शासन फुकट पैसे वाटते, धान्य वाटते अनेक योजनांमधून जनतेला ऐदी बनवते तर दुसरीकडे मेहनत करणा-यांना मेहनतीचा योग्य तो परतावा देत नाही त्यामुळेच ऐन सणासुदीच्या काळात कर्मचा-यांना असा मार्ग निवडावा लागला. परंतू त्यांनी जर काळ्या फिती लावून काम केले असते तर जनतेच्या मनात त्यांच्या विषयी आदर वाढला असता. पण अशा करण्याने सरकारने त्यांच्याकडे कितपत लक्ष दिले असते हा सुद्धा एक मुद्दा आहे. हा संप दिवाळी नंतर करण्यास हरकत नव्हती असे प्रवाश्यांचे म्हणणे आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ ही तळागाळातील जनतेसाठी उपयुक्त अशी सुविधा आहे. त्यांना परिवहन मंडळाच्या मोटारीचा किती आधार असतो. ग्रामीण भागातील गरोदर महिला दवाखान्यात जाण्यासाठी याच मोटारीला प्राधान्य देतात. कित्येक वेळा तर महिलांची प्रसूती सुद्धा परिवहन मंडळाच्या मोटारीतच झालेली आहे. असे हे परिवहन मंडळ जनतेच्या सुविधेसाठी आहे. म्हणून “बहुजन हिताय बहुजन सुखाय” असे ब्रीदवाक्य मिरवणा-या महामंडळ कर्मचा-यांना ऐन दिवाळीत संप करावा लागणे हि मविआ सरकारची नाचक्की करणारी बाब आहे. ड्रग्ज, बॉम्ब फोडणे यापेक्षा सरकारने व माध्यमांनी या संपाकडे, एस टी कर्मचा-यांच्या मागण्यांकडे। लक्ष देणे अधिक अपेक्षित नाही का ? एस.टी. कर्मचारी संपामुळे सामान्य जनांची मात्र गोची झाली आहे. एस. टी. च्या  “बहुजन हिताय बहुजन सुखाय“ या ब्रीदवाक्याप्रमाणे बहुजन हिताय व एस.टी. कर्मचारी सुखाय असा काही सकारात्मक तोडगा  मेहरबान सरकारं , न्यायप्रणाली, कर्मचारी संघटना यांनी सर्वांनी मिळून काढून या दिवाळीत सर्वाना “जो जे वांछील तो ते लाहो”  असा काही निर्णय घ्यावा  हीच तमाम कर्मचारी वृंद व महाराष्ट्रीय जनतेची सदीच्छा आहे. 

०४/११/२०२१

Part 1- Dahiwada, Food Culture of Khamgaon article series- Rajabhau

खामगांवची खाद्य संस्कृती भाग-1  

 आज खाये दहीवडे ssssss 

राजाभाऊ हे असेच प्रेरणादायी ‘कॉमन मॅन’ होते. साठी उलटल्यावरही कार्यरत राहणे, व्यवसायात सचोटी, लहान-थोर सर्वांशी आपुलकीने, प्रेमाने बोलणे अशी राजाभाऊंची वागणूक सुद्धा नक्कीच प्रेरणादायी होती. आज चुटकीसरशी सर्व हाजीर होते, दोन मिनटात मॅगी, ऑर्डर दिल्यावर पिझ्झा त्वरीत हजर होतो परंतू त्याला “ आज खाये दहीवडेssssss ” अशी आरोळी देऊन जरी व्यवसाय करीत असले तरी आपुलकीने खाऊ घालणा-या राजाभाऊंच्या दहीवडे व इतर पदार्थांची सर मात्र नाही.

 बुलडाणा जिल्ह्यातील सर्वात मोठे शहर खामगांव. अनेक कार्यालये , मोठी बाजारपेठ, शैक्षणिक संस्था शेकडो जिनिंग प्रेसिंग फॅक्टरी या सर्व कारणांमुळे येथे गर्दी असे, नागरिकांची रेलचेल असे. आजही जिल्हाभरातून येथे लोक येत असतातच . बाहेर गावाहून, खेड्यापाड्यातून येथे येणा-या या लोकांना अल्पोपहाराची सुविधा देण्यास उपहारगृहे सुरु झाली. तसे त्या काळात अनेक लोक सोबत शिदोरी आणत असत पण हॉटेल मध्ये जाण्याची प्रथा मात्र सुरु झाली होती. त्या काळात सुरु झालेली अनेक उपहारगृहे आजही सेवा देत आहेत.

आजपासून आगामी 10 लेखात आपल्या आवडत्या खामगांवातील खाद्य संस्कृतीची आठवण , माहिती करून देणा-या 10 खाद्य सेवा देणा-यांंची म्हणजेच हॉटेल, फेरीवाल्यांची तसेच तत्सम व्यवसायांची माहिती करून घेऊ या. आजमितीस खामगांवात अनेक हॉटेल, भेळ, पाणीपुरी स्टॉल, आईस्क्रीम, कुल्फी , चहाचे स्टॉल इ विपुल प्रमाणात आहेत तरीही जुन्या हॉटेलचा दबदबा किंवा अरबीत आणखी एक चांगला शब्द आहे तो म्हणजे "रुतबा". या जुन्या उपहारगृहांचा रुतबा आजही कायम आहे. खाद्य संस्कृतीचा आजचा हा पहिला भाग.

बालपणीच्या मनावर कोरलेल्या अनेक घटना, अनेक व्यक्ती ह्या प्रत्येकाच्याच स्मरणात असतात. असाच एक लक्षात राहिलेला व्यक्ती, एक फेरीवाला आजपासून 30-35 वर्षांपुर्वी, त्याही आधीपासून खामगांव शहरांत दररोज खाद्य पदार्थ विक्री करीता येत असे. त्या काळी खामगांव आजच्या इतके विस्तारीत नव्हते. आज जितक्या खाद्य पदार्थांच्या गाड्या खामगांवात दिसतात तेवढ्या त्या काळात नव्हत्या. त्या काळात रुचीपालटाकरीता खामगांवकर या एका फेरीवाल्यावर व एखाददोन उपहारगृहांवर निर्भर होते. काळी टोपी, धोतर, सदरा घातलेल्या त्या व्यक्तीचे वय तेंव्हा 65 ते 70 च्या घरात असावे. संध्याकाळी “आज खाये दहीवडे ssssss” असली काहीतरी दात नसलेल्या तोंडाच्या बोळक्यातून त्याची आरोळी ऐकली की  “राजाभाऊ आले“ हे लोकांना समजायला वेळ लागत नसे. त्वरीत त्यांच्याभोवती लोकं, लहान मुले गोळा होत व पाणी पुरी, दहीवडे व इतर अनेक पदार्थांचा स्वाद घेत असत. एक फेरीवाला व त्याचे नांव राजाभाऊ एवढेच काय ते त्या माणसासोबतचे नाते. परंतू आजही तो स्मरणात का असावा? हे एक कोडेच आहे. परंतू कालपरत्वे राजाभाऊंचे येणे बंद झाले. त्यांचे न येण्याचे कारण काय हे कधी कुणाकडून ऐकले नाही किंवा बालवयात राजाभाऊ का येत नाही ? याची चौकशी करण्याचे कधी मनांतही आले नाही. रक्ताचे नाते असलेले कुटुंब असते आणि  मित्र, दैनंदिन परिचित फेरीवाले, परीट, भाजीवाले, चप्पल दुरुस्त करणारे, घरगुती सेवक, आपले पाळीव पशू  यांचा  समावेश असलेला तो आपला परिवार असतो. असे सरसंघचालक मोहनजी भागवतांनी 2018 मध्ये खामगांवला झालेल्या सभेत सांगितले होते. परंतू परिवारातील या लोकांची आपण दखल ती काय घेतो? आपल्या परिवारात असलेल्या या वरील लोकांना आपण किमंत ती काय देतो? विविध प्रसंगी आपणास त्यांचे स्मरण सुद्धा होत नाही. राजाभाऊंचे सुद्धा तसेच झाले. ते सुद्धा एक दैनंदिन परिचयाचे फेरीवाले होते. आपल्या परिवारातील होते. परंतू एका फेरीवाल्याचे येणे बंद झाल्याने कुणाला काही फरक पडला नाही. राजाभाऊ कुठे गेले, ते का येत नाही? याची कुणी चौकशी केली की नाही देव जाणे? कुणी चौकशी केलीही असेल तर ती बहुतांपर्यंत मात्र नक्कीच पोहोचली नव्हती. राजाभाऊ कोण होते, कुठले होते, जात काय, धर्म काय, आडनांव काय? हे आज खामगांवातील तत्कालिन तरुण आणि सध्याचे जेष्ठ नागरिक यांना सुद्धा ठाऊक नाही. जात- धर्म तर ठाऊक असण्याचे काही कारणही नाही. तसे राजाभाऊ हे काही फार मोठेही नव्हते, किंवा काही उल्लेखनीय सामाजिक कार्यकर्ते वगैरे सुद्धा नव्हते. परंतू जिभेवर साखर ठेऊन सचोटीचा व्यवसाय करणारे होते. केवळ व्यवसायच नव्हे तर त्यांच्या ग्राहकांची संतुष्टी होईल हा सुद्धा त्यांचा खाक्या होता. त्यांच्या सचोटीचा दाखला देण्यासाठी त्यांची एक गोष्ट आठवते. शुक्रवार असला की राजाभाऊ त्यांचा खाद्य पदार्थ विक्रीचा व्यवसाय असून सुद्धा ग्राहकांना " आज शुक्रवार आहे आंबट खाऊ नका" अशी आठवण करून देत. त्यांची ती लहानपणी नेहमीच ऐकू येत असलेली “आज खाये दहीवडे ssssss” ही आरोळी लक्षात राहून गेली. आजही दहीवडे खातांना राजाभाऊंचे स्मरण  अनेकदा होते व खामगांवकर समवयीन व जेष्ठांना सुद्धा तसे होत असावे. प्रेरणा घेण्यासाठी नेहमीच काही नावाजलेल्या,फार मोठ्या व्यक्तींची गरज नसते. प्रसंगी एखादा ‘कॉमन मॅन’ सुद्धा प्रेरणादायी असतो. राजाभाऊ हे असेच प्रेरणादायी ‘कॉमन मॅन’ होते. साठी उलटल्यावरही कार्यरत राहणे, व्यवसायात सचोटी, लहान-थोर सर्वांशी आपुलकीने, प्रेमाने बोलणे अशी राजाभाऊंची वागणूक सुद्धा नक्कीच प्रेरणादायी होती. आज चुटकीसरशी सर्व हाजीर होते, दोन मिनटात मॅगी, ऑर्डर दिल्यावर पिझ्झा त्वरीत हजर होतो परंतू त्याला “आज खाये दहीवडे ssssss” अशी आरोळी देऊन जरी व्यवसाय करीत असले तरी आपुलकीने खाऊ घालणा-या राजाभाऊंच्या दहीवडे व इतर पदार्थांची सर मात्र नाही.

वास्तविक पाहता राजाभाऊं बाबतचा हा लेख वर्ष 2018 मध्येच लिहिलेला आहे. खाद्य संस्कृतीची लेख मालिका असल्याने या मालिकेत हा लेख सर्वात प्रथम द्यावासा वाटला. त्यावेळी लेख प्रसिद्ध झाल्यावर. एक दिवस सायंकाळी माझा भ्रमणध्वनी खणाणला. अनोळखी नंबर होता. पलिकडून एक महिला हिंदी भाषेत बोलायला लागल्या " आपने हमारे ससूरजी के बारेमे लेख लिखा, हम सबको बहोत अच्छा लगा आपका बहोत बहोत धन्यवाद " योगायोगाने तेंव्हा राजाभाऊंचे भाऊ सुद्धा आलेले होते ते सुद्धा बोलले , अंतिम दिवसांत राजाभाऊ त्यांच्याकडेच म्हणजे ग्वाल्हेर येथे होते असे सांगून त्यांनी सुद्धा आभार व्यक्त केले. राजाभाऊंची कुणीतरी घेतलेली दखल पाहून त्यांच्या नातेवाईकांनी केलेले  आभार प्रकटन मला राजाभाऊंच्या आशीर्वाद प्राप्तीचा व एखाद्या पुरस्कार प्राप्तीचा आनंद देऊन गेले.

                                          क्रमश:



                                           :