२८/०७/२०२२

Article about Arpita Mukherjee and Parth Chhaterjee

 पैसोसे क्या क्या तुम यंहाँ खरीदोगे?

अर्पिता मुखर्जी यांच्या घरून ED ने जप्त केलेले 29 कोटी 90 लाख रुपये

ज्या शिक्षण खात्यात विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी हेलपाटे घ्यावे लागतात, नाना कागदपत्रे गोळा करण्यासाठी, नाना कार्यालयांचे उंबरे या विद्यार्थ्यांच्या पालकांना झिजवावे लागतात. त्याच शिक्षण खात्यात हे भ्रष्ट लोक करोडो रुपयांची माया जमावतात ही आपली शोकांतिका आहे.

भ्रष्टाचार, लाचलुचपत,धाड, घोटाळे, भ्रष्ट नेत्यांकडील बेहिशेबी मालमत्ता आदींबाबत खरे तर कित्येकदा लिखाण झाले आहे. अनेक वृत्तपत्रे ,पत्रकार, स्तंभलेखक , वृत्तवाहिन्या यांवरून सुद्धा वरील बाबतीत कित्येकदा लिखाण, वृत्तांत सादर झाले आहेत. तरीही हे भ्रष्टाचार, घबाड सारखे विषय घेऊन  वारंवार लेखन करावे लागणे ही खरे तर आपल्या देशाची शोकांतिकाच म्हणावी लागेल. परंतु  दुर्दैवाने आजच्या लेखाचा विषय सुद्धा हाच वर ज्याचा उल्लेख केलेला आहे तोच आहे. बंगाल मधील अर्पिता मुखर्जी या महिलेच्या घरी शिक्षक घोटाळा प्रकरणी ईडीने छापेमारी केली असता त्या छाप्यात 20 कोटी रुपये रोख, सोन्याचे दागिने, सोन्याच्या विटा असे 29 कोटी रुपयांचे घबाड आढळून आले आहे यापुर्वी सुद्धा त्यांच्या दोन घरातून 40 कोटीपेक्षा अधिक रक्कम जप्त केली आहे. अर्पिता मुखर्जी ही महिला पश्चिम बंगाल मधील तृणमूल काँग्रेस पक्षाचे मंत्री असलेल्या पार्थ चॅटर्जी यांची निकटवर्तीय आहे. सध्या भारत भरात 1950 च्या दशकापासून अस्तित्वात असलेले अंमलबजावणी संचालनालय (ED) हे कधीही जितके सक्रिय नव्हते तितके आता सक्रिय झालेले दिसून येत आहे. ज्यांच्यावर  ईडीचे जाळे फेकल्या गेले आहे ते व त्यांचे समर्थक मात्र केंद्र सरकार ईडीचा गैरवापर करीत असल्याचा वारंवार पुनरुच्चार करीत आहे. सत्ताधारी पक्षातील कुणावरही ईडीची अद्याप का कार्यवाही नाही? अशीही कुजबुज होत आहे. अनेक लोक अशा कारवाया पाहून हुकूमशाही आल्याचे म्हणत आहेत.  भ्रष्ट मग ते नोकरशहा असोत वा लोकप्रतिनिधी त्यांच्यावर कारवाई होणे हे रास्तच आहे त्यामुळे हुकूमशाही आल्याचे म्हणणे योग्य नाही तसेच ज्यांची चौकशी ईडी करीत आहे त्यांचे समर्थन करणे, रस्त्यावर उतरणे हे कितपत योग्य आहे?याचा विचार सुद्धा समर्थकांनी करायला हवा. मुळात ईडी, सीबीआय , आयकर विभाग यांची धाड पडलीच नाही पाहिजे असे वर्तन भ्रष्ट कर्मचारी , नेते यांना का करावे वाटत नाही? एवढा भ्रष्टाचार का म्हणून ?  एवढा पैसा संपत्ती , सोने यांचा मोह का ? कुठे घेऊन जाणार एवढे ?  असे म्हणतात की या भ्रष्ट लोकांना पैस्याची नशा चढलेली असते. एकदा भ्रष्टाचार करण्यास सुरुवात केेली व ते जमले की मग त्याची पुनरावृत्ती हे लोक करत राहतात, त्यांची हाव वाढतच राहते. बंगाल मधील तृणमूल काँग्रेसचे पार्थ चॅटर्जी शिक्षण खात्याचे मंत्री होते. ज्या शिक्षण खात्यात विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी हेलपाटे घ्यावे लागतात, नाना कागदपत्रे गोळा करण्यासाठी, नाना कार्यालयांचे उंबरे या विद्यार्थ्यांच्या पालकांना झिजवावे लागतात. त्याच शिक्षण खात्यात हे भ्रष्ट लोक करोडो रुपयांची माया जमावतात. महाराष्ट्रात सुद्धा शिक्षण खात्यात TET घोटाळा झालाच आहे. पैस्याचा अतोनात मोह, हव्यास या भ्रष्ट नेत्यांना झाला असतो, या पैस्यांनी ते काय काय घेणार असतात? त्यांना या पैस्यांचा मोठा अहंकार सुद्धा झालेला असतो. काहे पैसे पे इतना गुरुर करे है ? या गाण्यातील 

पैसोसे क्या क्या तुम यंहाँ खरोदोगे, 

दिल खरीदोगे या के जान खरीदोगे ? 

इन जमिनोका मोल हो शायद 

आसमानो का मोल क्या दोगे ? 

बाजारोमे प्यार कंहाँ बिकता है, 

फुल बिक जाते है खुशबू बिकती नही , 

दिल के अरमान बिकते नही 

या अशा ओळी हे कधी ऐकतच नाही किंवा ऐकूनही पैस्याच्या नशेमुळे त्यांना पैसाच सर्वात अधिक प्रिय होतो व मग ते असा उदंड भ्रष्टाचार करतात. परंतू कुठेतरी व केंव्हा ना केंव्हा, कुणाच्या तरी माध्यमातून यांच्या या पापाचा घडा हा भरतोच व शेण उचलल्यावर जशी माती पण सोबत येते तसेच यांच्या पापरूपी पैस्याचेही होते. सध्या तरी बेहिशेबी मालमत्ता जमा करणा-यांचा पापाचा घडा भरण्याचे माध्यम हे माध्यम ईडीच्या रुपात दिसत आहे.

२१/०७/२०२२

Tribute article about singer #Bhupindersingh

भलेपणाला सोडू नको  

(करोगे याद तो  भाग 2 )


हे मराठी गीत ऐकतांना कुठेही एका परभाषिक व्यक्तीने ते गायल्याचे जाणवत नाही इतक्या लिलया रितीने भूपेंद्र यांनी हे गीत गायले आहे. हे गीत मानवी जीवनाशी निगडित अर्थपूर्ण असे आहे.

👉मागील भागापासून पुढे

त्यादिवशी बिघडलेले माझे स्वास्थ्य हे औषधाच्या प्रभावाने बरे झाले की भूपेंद्रच्या ऐकलेल्या गाण्यांनी या विचारात मी पडलो होतो आणि दुसऱ्याच दिवशी बालपणापासून संगीत शिकणाऱ्या आणि सद्यस्थितीत  बुलढाणा येथे शारदा संगीत विद्यालयच्या संचालक असलेल्या आमच्या मोठ्या वहिनी सौ नलिनी वरणगावकर यांची भेट झाली. त्यांनी माझा गायक भूपेंद्रवर आधारित करोगे याद तो या लेखाचा पहिला भाग वाचला होता त्यांनी लेख आवडल्याचे सांगितले."भाऊजी तुम्हाला भूपेंद्रचे मराठी गाणे माहित आहे का?" त्या म्हणाल्या. मी विचार करू लागलो पण मला काही ते आठवेना. "नाही" मी म्हणालो. गाणी, संगीत यांचे अफाट ज्ञान असलेल्या त्या म्हणाल्या, "थांबा मी तुम्हाला गाऊनच दाखवते आणि त्या भूपेंद्रच्या मराठी गाण्याच्या काही ओळी त्यांच्या सुरेल आवाजात गुणगुणायला लागल्या. त्यांनी सुरुवात करताच मला ते गीत आठवले. परंतु हे मराठी  गीत भूपेंद्र यांनी गायले असल्याचे माझ्या लक्षातच नव्हते. मी सुद्धा त्यावेळी हे गीत गुणगुणलो. नंतर निवांत क्षणी मी ते गाणे सर्च केले  आणि पूर्ण ऐकले. हे मराठी गीत ऐकतांना कुठेही एका परभाषिक व्यक्तीने ते गायल्याचे जाणवत नाही इतक्या लिलया रितीने भूपेंद्र यांनी हे गीत गायले आहे. हे गीत मानवी जीवनाशी निगडित अर्थपूर्ण असे आहे. हे गीत म्हणजे 

"अश्व नसे गज नसे पालखी, तेथे पायीच जाणे , 

भलेपणाला सोडू नको तू गा रे प्रभूचे गाणे"

वहीनींनी हे गाणे उद्गारल्या बरोबर मला आकाशवाणीच्या जळगांव केंद्राची आठवण झाली.  आकाशवाणीवर किती सुंदर कार्यक्रम प्रक्षेपित होत असत. आजही होत असतील परंतू आता आकाशवाणी पासून बरेच लोक दुरावले आहेत. आराधना हा सकाळी प्रक्षेपित होणारा भक्तिगीतांचा कार्यक्रम सुद्धा खूप श्रवणीय असे. या भक्ती संगीताच्या कार्यक्रमात मी बालपणी कितीतरी वेळा हे गीत ऐकले होते. मानवी जीवन कसे असते , त्याचा प्रवास कसं असतो , जन्म घेतांना मानुष्य मोकळ्या हातांनी येत असतो बालपणी हाताच्या मुठी बांधून आलेला असतो व ओठी रडणे असते . पुढे  

इथे धरेवर राहून वेड्या , उभारील्या गर्वाच्या माड्या

 माझे ...माझे म्हणून जमविले ओझे केविलवाणे  

या ओळींतून मनुष्य या धरतीवर राहतो , परंतू सत्ता , पैसा , लौकिक ज्ञान प्राप्त झाल्यावर तो कशा गर्वाच्या  माडया उभारतो , निव्वळ जमवत राहतो जे काही स्वत:जवळ आहे त्याचे केविलवाणे ओझे तो वाहत असतो. असे शांताराम नांदगांवकर यांनी किती यथार्थ वर्णन केले आहे. आयुष्याच्या उत्तराधार्त , अंतिम क्षणी मात्र 

जा आता तू असा एकला , आलेल्या शोधीत पाऊला

मुठी मोकळ्या नाही कटीला , फडके जुने पुराणे 

यानुसार मोकळ्या हातांनी जावे लागते , जमवलेले काहीच सोबत नसते , कंबरेला जुने पुराणे वस्त्र सुद्धा नसते. असे हे भुपेंद्र यांनी उत्कृष्ट पद्धतीने , त्यांच्या शैलीने व धीर गंभीर आवाजात , रसाळपणे गायलेल्या गीताचे स्मरण वहिनींनी करून दिल्यावर हे गीत अनेकदा ऐकले. अनेकदा ऐकल्यावर शैलेन्द्र लिखित  "सजन रे झुठ मत बोलो खुदा के पास जाना है , न हाथी है न घोडा है  वंहा पैदल ही जाना है " हे गीत  "अश्व नसे , गज नसे" या गीताशी साधर्म्य साधणारे आहे हे जाणवले. मानवाने जीवन हे क्षणभंगूर आहे हे सदैव स्मरण ठेवल्यास व या गीतानुसार आपल्या आयुष्यात मार्गक्रमण केल्यास त्याला निश्चितच सुख , समाधान प्राप्त होऊ शकेल. भुपेंद्र यांना जरी त्या मानाने कमी प्रसिद्धी मिळाली असली तरी या गुणी गायकाची गाणी मात्र चिरकाल स्मरणात राहतील अशीच आहे. भुपेंद्र यांना श्रद्धांजली.  

हे गीत ऐका 👇

परवा स्वर्गवासी झालेल्या प्रख्यात गायक भूपेंद्र यांचे जीवन तत्वज्ञान विषयक मराठी गीत ऐकायचे आहे, लिंकवर क्लिक करा👇

https://youtu.be/YG8KdKdMRkU

१९/०७/२०२२

Tribute article about singer #Bhupindersingh

"करोगे याद तो..." भाग 1 


...आज लिहतेवेळी मात्र छंदापेक्षाही  भूपेंद्रने गायलेल्या गीतांबद्दलचे प्रेमच अधिक होते. एव्हाना मला माझ्या दुुुखण्याचा विसर पडला होता, हा त्या सौ. ने दिलेल्या औषधाचा प्रभाव होता की स्मरण झालेल्या भूपेंद्रच्या त्या मधुर गीतांचा  ? ...

खरे तर काही करण्याच्या मनस्थितीत नाही. वातावरणात जरी सुखद गारठा असला तरी अंगात ताप आला आहे. आज सकाळी मोबाईल हाती घेतला आणि प्रख्यात गायक भूपेंद्र निवर्तल्याचे वृत्त वाचले. थोड्या वेळाने  भूपेंद्रविषयी लिहू लागलो. तसे पाहिले तर भूपेंद्र हा विस्मृतीत गेलेला गायक. विशी-तिशीतील तरुणांना ठाऊक असण्याची सुद्धा शाश्वती नाही, पण सिनेगीतांची आवड असणा-या रसिक श्रोत्यांना मात्र भूपेंद्र हमखासच  ठाऊक आहे. रफी, किशोर, मुकेश या त्रयींच्या काळात हिंदी चित्रपटसृष्टीत गायक म्हणून दाखल होऊन आपला वेगळा ठसा उमटवणे म्हणजे सोपे नव्हते पण आपल्या पहाडी आवाजाने भूपेंद्रने तो ठसा उमटवला. मूळचे पंजाबी असलेले गिटार वादनात निष्णात भूपेंद्र हे खरे तर गजल गायक. त्याकाळच्या चित्रपट संगीतात गजलचा समावेश अल्पसा होता परंतू हकीकत या युद्धपटातील मदन मोहन यांनी स्वरबद्ध केलेले "हो के मजबूर मुझे उसने भुलाया होगा" हे गीत भूपेंद्र यांनी गायले व रसिकांना आपला परिचय करून दिला. तत्कालीन चित्रपटात भूपेंद्र पठडीतील गीते तितकीशी नसत तो काळ म्हणजे शम्मी, जितेंद्र यांचा याहू, मस्त बहारोका मै आशिक टाईप गाण्यांचा त्यामुळे भूपेंद्रला वाट बघावी लागली. तो पर्यंत त्याने काही ध्वनिमुद्रिका प्रकाशित केल्या. 1970 ते 80 च्या दशकात, समांतर सिनेमा काळात मात्र त्यांनी अनेक चित्रपट गीते गायली जी आजही रसिकांच्या स्मरणात आहेत. "नाम गुम जायेगा" , "किसी नजरको तेरा", "दिल ढुंढता है", "दो दिवाने शहरमे", "कभी किसिको मुकम्मल जंहा" अशी अनेक गीते भूपेंद्रने आपल्या मधुर गायनाने अजरामर करून टाकली आहेत. आजही भूपेंद्र यांची गीते आवडीने ऐकली परंतू या गीतांचा गायक भूपेंद्र आहे हे मात्र ऐकणा-यांपैकी अनेकांना माहित नसते. भूपेंद्रचा विषय निघाला की मला आठवते ते "दो दिवाने शहरमें" हे गीत शहराच्या गर्दीत घर शोधणा-या जोडप्याचे गीत. तसेच संजीवकुमारवर चित्रीत "दिल ढुंढता है" हे गीत. या दोन्ही गीतांची sad versions सुद्धा आहे ती दोन्ही भूपेंद्र यांनी अप्रतिम गायली आहेत. गजल म्हटले की शांत, संथ असा प्रकार. 60 च्या दशकात आकाशवाणीच्या माध्यमातून पुढे आलेला हा गायक 80 च्या दशकात डिस्को दाखल झाल्यावर या गोंगाटापासून स्वत: दूर झाला.  भूपेंद्रने गायलेल्या गीतांची संख्या अल्प असली तरी गायन , गीतांची गोडी ही अवीट. गुणवत्ता म्हणावी ती हीच, क्रिकेटर राहुल द्रविडसारखी भरवश्याची. सिनेमा चालो की ना चालो भूपेंद्रची गाणी गाजतीलच हा विश्वास संगीतकार निश्चितच बाळगत असतील अशा आवाजाचा तो धनी. "किती वेळ मोबाईल पाहताय ?, तब्येत बरी नाही ना तुमची, आराम करा" सौ.च्या या वाक्याने भूपेंद्र तंद्री भंग पावली. मी गोळ्या घेतल्या. मनातूूून भूपेंद्र जात नव्हता. पडल्या-पडल्या "करोगे याद तो" हे त्याचे आणखी एक गीत आठवले. लता दिदी निवर्तल्या त्यावेळी त्यांच्या "नाम गुम जायेगा चेहरा ये बदल जायेगा मेरी आवाजही पहचान है" या गीताच्या ओळी माध्यमांनी शीर्षक म्हणून वापरल्या होत्या. या गीतात भूपेंद्र त्यांचे सहगायक होते. या ओळी त्यांना सुद्धा समर्पक आहेत. भूपेंद्रची गीते मला आठवत होती, मी टाईप करीत होतो. एखादा छंद जडला की असेच होत असावे तहान, भूक, थंडी, तापादी विसरून मनुष्य आधी छंद जोपासणाल्या अधिक प्राधान्य देत असावा असा विचार सुद्धा उगीचच मनाला स्पर्शून गेला. पण आज लिहतेवेळी मात्र छंदापेक्षाही भूपेंद्रने गायलेल्या गीतांबद्दलचे प्रेमच अधिक होते. एव्हाना मला माझ्या दुुुखण्याचा विसर पडला होता, हा त्या सौ. ने दिलेल्या औषधाचा प्रभाव होता की स्मरण झालेल्या भूपेंद्रच्या त्या मधुर गीतांचा  ?  मी पुन्हा विचारात पडलो .

१४/०७/२०२२

Article on the occasion of Guru Paurnima , a Indian festival

 गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने



गिरीशचे शाळेत येणे , आशुतोषचे आवर्जून फोन करणे मला पुन्हा विचारात पाडून गेले. बाहेर पावसाच्या धारा बरसत होत्या तर माझ्या डोक्यात विचारांच्या. 

गेल्या तीन दिवसांपासून अवघ्या महाराष्ट्रभर पाऊस सुरु आहे. कालच्या पावसात तो शाळेत आला. मला वाटले शाळेत काही काम असेल म्हणून आला असेल शिवाय त्याचे मामाही आमच्याच शाळेत कार्यरत. त्याने अभिवादन केले , मी संगणक कक्षात गेलो. थोडयावेळाने तो तिकडे आला एक  छान लांब दांडीचे लाल गुलाब पुष्प दिले, पुष्प देतांना खाली वाकत म्हणाला, “सर आज गुरु पौर्णिमा, आशीर्वाद द्या”, “अरे आमचे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहे” मला नंतर एकदम आठवले की दर गुरु पौर्णिमेला शाळेत येण्याचा सर्व शिक्षकांना नमस्कार करण्याचा त्याचा नेमच आहे. हा विद्यार्थी म्हणजे गिरीश देशमुख, आज त्याला शाळा सोडून किमान 7-8 वर्षे तरी झाली असतील. मी कौतुकाने त्याच्याशी संवाद साधला आणि आजच्या जमान्यातील जणू अत्यावश्यकच झालेला सोपस्कार पार पाडला , तो सोपस्कार म्हणजे सेल्फी (सोबत जोडला आहे). गिरीश आमच्या शाळेत दाखल झालेला ग्रामीण विद्यार्थी , शांत वृत्तीचा असा विद्यार्थी आपल्या कुटुंबास स्थिरस्थावर करण्यासाठी झटणारा, आता तर तो विवाहितही आहे परंतू आपल्या जीवनाच्या धकाधकीच्या रहाटगाडग्यात तो हमखास गुरु पौर्णिमेला शाळेत येतो. त्यानंतर गुरु पौर्णिमेच्या अर्थात व्यास पौर्णिमेच्या दोन कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा योग आला त्यामुळे भगवंत श्रीकृष्ण – सांदिपनी , आरुणी-धौम्य, कर्ण-परशुराम , अर्जुन- द्रोणाचार्य , कबीर- रामानंद , विवेकानंद- रामकृष्ण या अशा अनेक शिष्य गुरूंच्या जोड्यांपासून ते हल्लीच्या सचिन तेंडूलकर-रमाकांत आचरेकर सर या गुरु शिष्य जोडी पर्यंतच्या गुरु शिष्यांचे स्मरण होत होते , शाळेतून घरी जातांना गाडी चालवतांना भारताच्या या गुरु शिष्य परंपरेचे विचार मनात घोळत होते. शिक्षणाचे व्यवसायीकरण होत असलेल्या काळात , गतिमान अशा काळात विद्यार्थी हे क्लासेस , शाळांत येतात अनेक व्यापांसह त्यांना शिक्षण देण्याचे कार्य पार पडते व पुन्हा दुसरे विद्यार्थी दाखल होतात त्यामुळे पुर्वीसारख्या गुरु शिष्यांच्या जोड्या आता मात्र दिसेनास्या झाल्या. पुर्वीचा गुरु 

“ साई इतना दिजीये ज्या में कुटुंब समाय , 

मै भी भुका न रहु साधु न भुका  जाये” 

या वृत्तीने शिष्यांना ज्ञान दान करीत असे , त्याच्या सुख-दु:खात सहभागी होत असे व त्यामुळेच तो त्याच्या शिष्यांना प्रिय होत असे एवढेच नव्हे तर गुरुपत्नी ही शिष्यांची माता बनून त्यांच्यावर माया करीत असे. आज गुरु व शिष्यांमध्ये असे संबंध नाहीत. हे विचार सुरु असतांनाच फोन खणाणला स्क्रीनवर आशुतोष नांव दिसले , “बोल आशुतोष” म्हणत फोन रिसीव्ह केला परंतू नेटवर्क एरर मुळे माझाच आवाज मला परत येत होता ,”उद्या कॉल करतो” म्हणून आशुतोषला मेसेज टाकला. आशुतोष, आशुतोष शुक्ल , आशुतोष म्हणजे माझा संगणकाचा विद्यार्थी. साधासुधा , सिन्सियर नवोदय मध्ये शिकणारा, संगणक शिकण्यासाठी म्हणून खामगांवला येणा-या आशुतोषचे पिता हे संगीत शिक्षक आशुतोषला सुद्धा संगीताची चांगली जाण , मी मात्र संगणक शिक्षक त्यामुळे माझा सुरांशी संबंध नाहीच तरी आमचे सुर जुळले. एके प्रसंगी आशुतोषला अभ्यासाव्यतिरिक्त केलेल्या मार्गदर्शनामुळे त्याचे माझ्या कुटुंबाशी चांगले संबध प्रस्थापित झाले. आज आशुतोष रेडीओ सिटीचा एक लोकप्रिय RJ म्हणून प्रसिद्ध आहे , त्याचा मोठा चाहता वर्ग आहे. गुरु पौर्णिमेच्या शुभेच्छांसाठी   आशुतोषने तो कॉल केला होता हे बोलणे झाल्यावर कळले. “हैप्पी टीचर्स डे सर” असे टीचर्स डे ला म्हणून शिक्षकांप्रती प्रेम व्यक्त करण्या-या डे पेक्षा गुरु पौर्णिमा हा आपल्या हिंदू संस्कृतीचा आषाढ महिन्यातील पहिल्या पौर्णिमेला साजरा होणारा , महर्षी व्यासांचा जन्म दिवस असणारा, गुरूंप्रती आपल्या आदराच्या भावना व्यक्त करणारा हा दिवसच अधिक जवळचा, अधिक आत्मीय असा वाटतो. गुरु पौर्णिमा हा सण भारतीय उपखंडातील अनेक देशांत साजरा होतो. नेपाळ मध्ये तर या दिनी राष्ट्रीय सुटी असते. अशा या गुरु पौर्णिमेला गिरीश व आशुतोष या माझ्या दोन विद्यार्थ्यांनी माझ्याशी आठवणीने संपर्क केला , कुठे तरी सुखावलो परंतू असे प्रसंग जबाबदारी आणखी वाढवत असतात. गिरीशचे शाळेत येणे , आशुतोषचे आवर्जून फोन करणे मला पुन्हा विचारात पाडून गेले. एकीकडे पावसाच्या धारा बरसत होत्या तर माझ्या डोक्यात विचारांच्या. 

      या भारत वर्षात पुर्वीच्या गुरु-शिष्य परंपरेप्रमाणे पुनश्च गुरु व शिष्य यांच्यातील प्रेमाच्या ओलाव्याचे , सुहृद असे संबंध प्रस्थापित होवोत. नालंदा , तक्षशीला सारखी विद्यापीठे असणा-या, ज्ञान हे दान समजल्या जाणा-या भारतात तरी  त्यांच्यातील संबंध हे व्यापारी / ग्राहक यांच्यात जसे रुक्ष संबंध असतात तसे नसावेत. आजचा विद्यार्थी सुद्धा त्याच्या शिक्षकाशी सदैव जुळलेला असावा त्याच्यात व त्याच्या शिक्षकांत तसाच पूर्वीच्या गुरु-शिष्यांप्रमाणे प्रेम व आपुलीकीचा भाव प्रस्थापित व्हावा. असे झाले तर आजच्या काळात नानाविध कारणांनी, तंत्रज्ञानामुळे नको त्या गोष्टी त्याच्या अगदी हाताच्या बोटांवर आल्याने चिंतीत, व्यथित , गोंधळलेल्या , अंतर्मुख झालेल्या विद्यार्थ्यास कदाचित गुरु सोबतचे आत्मीय , सुहृद संबंधच तारतील असे वाटते. 

०७/०७/२०२२

Article about attacks on innocent and Indian Law

 सनदशीर मार्गाने विरोध करावा. 


भारतात नुकत्याच झालेल्या दोन निर्घुण हत्यांमध्ये एक समान धागा आहे जो सर्वश्रूत आहे. तर आणखी एक समानता आहे ती म्हणजे ज्यांच्यावर दोन वेगवेगळ्या ठिकाणी व वेगवेगळ्या दिवशी हल्ले झाले ती दोघे बेसावध होती , निशस्त्र होती. हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ले करून जनसामान्यात आपला धाक , भीती , दरारा प्रस्थापित करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. परंतू निशस्त्र, बेसावध , लहान मुले , स्त्री यांच्यावर शस्त्र चालवायचे नाही आणि सुर्यास्त झाल्यावर युद्ध न करण्याचा आपल्या अनादी अनंत काळापासून चालत आलेल्या भारतीय संस्कृतीत युद्धनीतीचा  दंडकच होता. या नियमामुळेच अर्जुनाने कर्णावर बाण सोडण्यास नकार दिला होता. परंतू ,”हे पार्था ज्याच्या जवळ शस्त्र नाही व म्हणून मी त्याला मारणार नाही असे तू म्हणतो तो अधर्मी आहे , त्याचा अधर्म तू विसरला का? “ असे भगवंताने स्पष्ट केल्यावर मग अर्जुनाने कर्णावर आपल्या गांडीवातून बाण सोडला होता. परंतू निशस्त्रास न मारण्याचा विचार आपल्या युद्धनीतीमुळेच धर्मप्रवण अर्जुनाने केला होता. याच युद्धनीतीमुळे  सुर्यास्त झाला युद्ध संपले आता आपला मृत्यू होणार नाही असा आनंद अभिमन्युला मारणा-या जयद्रथास झाला होता व तो लपलेला जयद्रथ समोर आला होता परंतू सुर्यास्त झालाच नव्हता, ती सुदर्शनधारीची लीला होती व अधर्मी जयद्रथास मारण्यात आले. अशी आपली युद्धनीती होती, शिवाजी महाराजांनी सुद्धा शत्रूच्या स्त्रीया , मुले आणि निशस्त्र यांना मारायचे नाही असे आदेश दिले होते. परंतू आपली युद्धनीती पार कोसळून टाकली ती परकीय आक्रमकांनी. बेसावध , निशस्त्रांवर हल्ले करणे, निर्घुण हत्या करणे, स्त्रीयांवर अत्याचार करणे हे सर्व आणले व तसाच प्रकार तशीच मानसिकता असलेल्यांकडून आजही आपल्या लोकशाही देशात देशांतर्गत युद्धे किंवा युद्धजन्य परिस्थिती नसतांनाही होतांना दिसतो. जरा कुणी व्यक्तिस्वातंत्र्यानुसार वक्तव्य केले की कर हल्ला , काप गळा हे काय चालले काय ? काय तालिबान आहे का ? आणि अशांनी  मात्र त्याच व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरेपूर फायदा घेऊन काहीबाही बोललेले चालते , कुणाचाही अपमान केलेला चालतो हे कसे काय ? हे योग्य नव्हे. हल्लेखोरांनी त्यांना पटत नसलेल्या घटनांबाबत कायदेशीर रितीने लढावे , आपल्या देशात बाबासाहेब आंबेडकर व त्यांच्या सहका-यांनी अथक परीश्रमाने आपली घटना लिहिली आहे. आपला कायदा हा सर्वांना समदृष्टीने पाहतो. इथे काही इतर राष्ट्रांसारखी बेबंदशाही नाही येथील लोकशाही , येथील कायदा हा सर्वांना समान मानतो व जे योग्य आहे त्यानुसारच न्याय मिळतो तरी असमाधान असेल तर सुप्रीम कोर्टापर्यंत लढता येते. गुन्हेगारासाठी आपले न्यायालय रात्री अवेळी सुद्धा उघडले गेले आहे, एवढे असतांना अशी क्रुरता मुळीच योग्य नाही. आपल्या सर्वांना बालपणापासून शांततेची शिकवण दिली जाते त्या शिकवणीचे अनुसरण व्हावे. शस्त्र उगारायचे असेल तर ते आपल्या देशबांधवावर नव्हे. शस्त्रे चालवण्याची खुप इच्छा असेल तर सैन्यात जावे व  देशाच्या शत्रूवर शस्त्र चालवावे, पराक्रम गाजवावा, गौरव सुद्धा होतो. या देशाइतकी सुरक्षितता कुठेही नाही , अमेरिकेत गत काही दिवसात झालेले गोळीबार सर्वांनी पाहिले , इतर देशांत बाहेरून आलेल्यांना अगदीच दुय्यम दर्जाची वागणूक दिली जाते ते ही आपणास ठाऊक आहे , पदोपदी कसे कस्पटासमान लेखले जाते ते सुद्धा जगजाहीर आहे. मग आपल्याला जिथे चांगली वागणूक मिळते , जेथील कायदा सर्वांना समदृष्टीने  पाहतो  त्या देशात आपण सुद्धा सनदशीर मार्गाने आपल्या मागण्या कराव्या , आपले म्हणणे मांडावे असे या हल्लेखोरांकडून अपेक्षित आहे. बेसावध, निशस्त्रास मारण्यात कसली आली शूरता ?