मुखी घास घेता करावा विचार...
ॐ ब्रह्मार्पणं ब्रह्म हविर्ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतं ब्रह्मैव तेन गन्तव्यं ब्रह्म कर्म समाधिना'
हा भोजन मंत्र, रामदास स्वामींनी म्हटलेले
अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदरभरण नोहे जाणिजे यज्ञ कर्म
अशा कितीतरी ऋचा, मंत्र, श्लोक यातून आपणास अन्नाची महती कळते. परंतू काळ झपाट्याने पुढे सरकला. पंक्ती बसण्याऐवजी उभ्याने जेवण करण्याची इंग्रजी पद्धत अगदी ग्रामीण भागात सुद्धा रूढ झाली. वेगवान जीवनशैलीमुळे घरोघरी जेवणाला बसण्यापूर्वी म्हटले जाणारे उपरोक्त भोजन मंत्र, श्लोक हे आता कालबाह्य होत चालले आहेत. भोजनापूर्वी अन्नास नमस्कार करून व चित्रावती घालून जेवणास आरंभ केला जात असे. या चित्रावतीत शेतकरी, अन्न बनवणारी गृहिणी व उपाशी लोक, कृमी कीटक यांची आठवण करून काही शिते ताटाच्या बाजूला ठेवली जात. परंतू आता मात्र भारतात अन्नाला पुर्वी जसा सन्मान होता तसा सन्मान राहिलेला नाही असेच दुर्दैवाने म्हणावे लागते. आज मुलांना पानात अन्न टाकले तर काहीही म्हटले जात नाही, वडीलधारी मंडळी त्यांना हटकत नाही. पुर्वी चांगले तूप अगदी निपटून खायला लावत, तूप मोरीत गेले नाही पाहिजे असे सांगत. अशी काही कारणे सांगून मुलांना पानातील सर्व अन्न संपवण्याचे शिकवले जायचे. आमचे आजोबा जेवतांना आमच्यासोबत कुणाच्याही ताटात एकही शीत उरले नाही पाहिजे अशी शर्यत लावत व म्हणून मग आम्हाला पानात न टाकण्याची सवय जडली, जी आजही कायम आहे. आता मात्र हे सर्व लुप्त होत चालले आहे. पुर्वी पैसा कमी असायचा त्यामुळे वस्तू , अन्न, पाणी सुनियोजित पद्धतीने वापरले जायचे. आज लोकांच्या हाती पैसा आहे , अपत्य एकच आहे त्यामुळे मग चैन आणि उधळपट्टी होत आहे. बाहेर खाण्याचे प्रमाण वाढले आहे. लग्न व इतर कार्यात बुफे जेवण पद्धती असते. या इंग्रजी पद्धतीत हल्ली यजमान नाना प्रकारची व्यंजने ठेवतात. आमंत्रित लोक सर्वच पदार्थ पानात वाढून घेतात आणि मग एवढे सारे अन्न पदार्थ खाणे मोठे मुश्कील होते आणि अन्न पानात टाकून दिले जाते. बुफे जेवण पद्धतीचा सर्वात मोठा दोष म्हणजे या पद्धतीत अन्नाची मोठी नासाडी होते. ब-याच लग्न कार्यालयात
उतनाही लो थालीमे की व्यर्थ न जाये नाली मे |
अशाप्रकारची घोषवाक्ये अन्न वाया घालवू नये म्हणून लावलेली असतात. पण या घोषवाक्यांकडे साफ कानाडोळा केला जातो, ती केवळ नावापुरतीच असतात. ज्या भारतात अन्नाला भगवंत समजले जाते, ज्या देशात अन्नास, अन्न पिकविणा-यास, अन्न बनवणा-यास मोठा सन्मान दिला जातो त्याच देशात आज अन्नाची मोठ्या प्रमाणात नासाडी होताना पाहून खंत वाटते. आजही या देशात अनेक लोक एकच वेळ जेवतात , त्यांना दोन वेळचे भोजन मिळत नाही. अनेकांना संतुलित आहार मिळत नाही व त्या अभावी ते कुपोषित राहतात, दुर्गम भागात कुपोषणामुळे बालकांचे मृत्यू होतात. हा चिंतेचा विषय आहे. 1981 पासून FAO अर्थात फुड अँड अँग्रिकल्चर ऑर्गनायझेशन ही संस्था जागतिक अन्न दिन साजरा करीत आहे. अन्न, आहार, कुपोषण आदींबाबत जागृती म्हणून हा दिवस साजरा करतात. भारतातील लोकांना जरी अन्नाचे महत्व असले, अन्नात ते भगवंत बघत असले तरी संतुलित आहाराबाबत ते निष्काळजी आहेत. कुपोषणाबाबत त्यांना म्हणावी तितकी चिंता नाही. नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात कॉफी, समोसे, चिप्स आदी पदार्थांचे भारतात मोठ्या प्रमाणात सेवन केले जाते व त्यामुळे भारतात मधुमेहींची संख्या झापाट्याने वाढत आहे असा निष्कर्ष निघाला आहे. अन्न दिनाच्या पार्श्वभूमीवर आपण भारतवासियांनी यावर विचार करणे क्रमप्राप्त आहे. शेगांव या गजानन महाराजांच्या भूमीत महाप्रसाद बारीत भली मोठी अन्नपूर्णेची मुर्ती आहे ,
गजानन महाराज उष्ट्या पत्रावळीवरील शिते वेचून खात आहे अशी प्रतिमा आहे. तरीही अनेक भक्त हल्ली पानात प्रसाद टाकून देतांना दिसून येतात. ज्या गजानन महाराजांनी अन्न वाया घालवू नये त्याचा सन्मान करावा असे आपणास शिकवले आहे त्याच गजानन महाराजांच्या शेगांवात लोक अन्न वाया घालवतांना पाहून दु:ख होते. इतरही अनेक तीर्थस्थळी, भांडारे, महाप्रसाद, लग्नकार्ये यात मोठ्या प्रमाणात अन्न वाया जाते. जागतिक अन्न दिन हा शाळा, महाविद्यालये यातून सुद्धा साजरा करण्यात यावा जेणे करून विद्यार्थ्यांना अन्नाचे महती पटेल. शाळांतून जे मध्यान्ह भोजन वितरीत केले जाते यात सुद्धा अनेक विद्यार्थी खिचडी पानात टाकून देत असतील. अन्न दिन जर शाळेत साजरा झाला तर मध्यान्ह भोजनाची सुद्धा नासाडी होणार नाही असे वाटते. जागतिक अन्न दिनाच्या पार्श्वभूमीवर अन्नग्रहण हे देशसेवेसाठी सुद्धा व्हावे असे सांगणा-या खालील ओळी सुद्धा स्मरतात
मुखी घास घेता करावा विचार ,
कशासाठी हे अन्न मी सेवणार
घडो माझिया हातून देशसेवा
म्हणूनी मला शक्ती द्यावी देवा.
जागतिक अन्न दिनापासून आपण सर्व अन्नाचा सन्मान करण्याचा, अन्न वाया न घालविण्याचा आणि नवीन पिढीला सुद्धा अन्नाची महती पटवून देण्याचा संकल्प करूया.
Khup chhan aahe
उत्तर द्याहटवाAgadi barobar aahe santulit jevan ruchakar jevan shaktivardhak jevan sarva ghya pan fast food band kara aani kami kha pan balanced kha Jay Gajanan
उत्तर द्याहटवा