लोकप्रतिनिधींना झाले तरी काय ?
गेल्या काही दिवसांमध्ये लोकप्रतिनिधींची अचाट कृत्ये महाराष्ट्रवासीयांना चकित करून सोडत आहेत. कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारणे, कार्यकर्त्यांनी हाणामाऱ्या करणे , बेताल वक्तव्ये करणे, सभागृहात ऑनलाईन रमी खेळण्याचा वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल होणे, लोकप्रतिनिधींनी पोलीस अधिकाऱ्यांशी योग्य पद्धतीने न बोलणे असे हे प्रकार आहे.
खरे तर या विषयावर अनेक वेळा लिखाण झालेले आहे परंतु जसे जसे आपण पुढे जात आहोत विकास करीत आहोत तसे असे राजकारण मात्र गढूळ होत चालले आहे. त्यामुळे पुन्हा-पुन्हा त्याच- त्याच विषयावर लिखाण करावे लागते. कर्मचाऱ्यांना मारणे, गलिच्छ भाषा वापरणे असे कित्येक प्रकार लोकप्रतिनिधींकडून होत असतात. पुर्वी महाराष्ट्राचे राजकारण हे देशभरात सुसंस्कृत राजकारण म्हणून ओळखले जात असे महाराष्ट्रात होऊन गेलेले अनेक संतपुरुष तसेच अनेक प्रथित यश नामांकित असे लेखक कवी, नाटककार यामुळे महाराष्ट्र इतर राज्यांमध्ये उठून दिसत होता. महाराष्ट्राची भारतभरात एक वेगळी छाप होती, पण दुर्दैवाने आता मात्र तशी परिस्थिती राहिली नाही.
गेल्या काही दिवसांमध्ये लोकप्रतिनिधींची अचाट कृत्ये महाराष्ट्रवासीयांना चकित करून सोडत आहेत. यात खाद्यपदार्थाचा दर्जा चांगला नव्हता म्हणून मंत्रालयातील कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारणे, विधानभवनातच कार्यकर्त्यांनी हाणामाऱ्या करणे एकमेकांना शिवीगाळ करणे, कृषीमंत्र्यांनी बेताल वक्तव्ये करणे आणि सभागृहात ऑनलाईन रमी खेळण्याचा त्यांचा वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल होणे, लोकप्रतिनिधींनी पोलीस अधिकाऱ्यांशी योग्य पद्धतीने न बोलणे असे अनेक प्रकार घडले.
खाद्यपदार्थाचा दर्जा चांगला नव्हता म्हणून मंत्रालयातील कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारताना हा सुद्धा विचार केला नाही की आपण कोणत्या अवतारात आहोत आणि काय करत आहोत. तुम्हाला जेवण चांगले मिळाले नाही तर एवढा राग येतो पण तुम्ही राज्य करत असलेल्या राज्यातील जनतेला जेवणासाठी काय मिळते आहे ?, त्यांना जेवण मिळत आहे की नाही ? मिळत असल्यास त्याचा दर्जा चांगला आहे की नाही ? शाळांमध्ये विद्यार्थ्यांना खिचडी चांगल्या दर्जाची मिळते आहे की नाही ? हे याची सुद्धा जाणीव लोकप्रतिनिधींना असली पाहिजे. जनतेला जर पौष्टिक धान्य, दोन्ही वेळचे जेवण मिळत नसेल तर ते कसे मिळेल याच्यावर विचार करायला पाहिजे. परंतु स्वतःला चांगले पदार्थ मिळाले नाही याची भयंकर चीड येते पण जनतेला काही मिळते आहे की नाही ? त्यांना उपाशी झोपावे लागते आहे का? याबद्दल मात्र काहीही काळजी नाही.
याचप्रमाणे कार्यकर्त्यांच्या हाणामारीबद्दल सुद्धा म्हणता येईल. कार्यकर्ते हे असे कसे असतात की यांना आपण कुठे आहोत काय करत आहोत याचे सुद्धा भान राहात नाही. यांच्या अंगात एवढा जोर कसा येतो की हे विधान भवन सुद्धा मारामारी करायला धजावतात ?
महाराष्ट्रवासियांना सर्वात जास्त आश्चर्य वाटले जेंव्हा मंत्री महोदयांचा सभागृहात ऑनलाइन रमी खेळतांनाचा व्हिडिओ माध्यमांवर झळकू लागला. जनता तुम्हाला कशासाठी निवडून देते तुम्ही तिथे जाऊन काय करता, तुमची योग्य खाते मिळाले नाही म्हणून नाराजी आहे तर म्हणून काय जे खाते मिळाले तेथे चांगले काम करायचे नाही आणि बेताल वक्तव्य करायचे असे असते का ?
त्याचप्रमाणे पोलिसांना कायदा व सूव्यवस्था राखायची असते. त्यामुळे पोलिसांची भाषा ही रफ झालेली असते. कायदा व सुव्यवस्था राखतांना पोलीस मोठ्या आवाजात बोलले तर लोकप्रतिनिधींना ते सहन होत नाही मग हे लोकप्रतिनिधी पोलिसांशी सुद्धा व्यवस्थित बोलत नाही जनतेच्या रक्षणासाठी जे पोलीस आहेत त्यांना सुद्धा हे दटावतात त्याचे सुद्धा व्हिडिओ समोर आले आहे. यावेळी पोलिसांची मानहानी होत असते आणि जनतेच्या नजरेतून पोलिसांचा मान कमी होत असतो.
अशी ही लोकप्रतिनिधींची वर्तणूक बघून जनसामान्य आश्चर्यचकित झाले आहे. आपण ज्यांना निवडून दिले ते लोक कसे आहेत याची प्रचिती जनतेला येत आहे. सत्ता, खुर्ची मिळाली की मीच सर्वस्व आहे आणि मी काहीही केले तरी चालते असे लोकप्रतिनिधींना वाटता कामा नये. पण नेमके तसेच होते. जनतेने लोकप्रतिनिधींना सत्ता दिली आहे, खुर्ची दिली आहे तेव्हा ती खुर्ची त्यांना हे राज्य सांभाळण्यासाठी दिली आहे, जनतेच्या हिताचे कार्य करण्यासाठी दिली आहे. एकमेकांशी भांडणासाठी, मारामाऱ्यांसाठी, शिवीगाळ करण्यासाठी दिलेली नाही. परंतु याचे भान ठेवतील तर ते लोकप्रतिनिधी कसले ? काल माननीय मुख्यमंत्र्यांनी उपरोक्त कृत्ये केलेल्या सर्व संबंधित मंत्र्यांची आमदारांची कान उघडणी केली असल्याचे वृत्त आले आहे. तसेच उपमुख्यमंत्र्यांनी सुद्धा कृषिमंत्र्यांना दटावले आहे. परंतु असे जरी केले तरी लोकप्रतिनिधींची वागणूक ही पुन्हा जैसे थे अशीच राहते. त्यामुळे इथे हेच म्हणणे आहे की लोकप्रतिनिधींनी हे सदैव ध्यानात ठेवावे की त्यांना सत्ता जनतेमुळे मिळालेली आहे. जनतेची सेवा करण्यासाठी मिळालेली आहे. त्या अर्थाने ते जनतेचे सेवक आहे. पंतप्रधान मोदी यांनी सुद्धा प्रथमच निवडून आल्यानंतर ते प्रधानसेवक असल्याचे म्हटले होते. तेव्हा देशाच्या पंतप्रधानांचे अनुसरण करून आपण जनतेच्या सेवेसाठी निवडून आलेलो आहोत हे भान लोकप्रतिनिधींना ठेवायला पाहिजे. सत्ता डोक्यात न जाऊ देणे किंवा डोक्यात जाणार नाही हे सदैव ध्यानात ठेवले पाहिजे.