बिबटे उदंड जाहले
गत बुधवारी नागपूरच्या पारडी भागात बिबट्याने पाच ठिकाणी हल्ला केला. या हल्ल्यात सात लोक जखमी झाले. महाराष्ट्रात आणि देशातही गेल्या काही वर्षांपासून शहरांमध्ये, गाव-खेड्यांमध्ये बिबटे घुसण्याचे प्रमाण वाढले आहे. गत एक दोन वर्षात तर हे प्रमाण फारच वाढले आहे. काही अभ्यासकांचे तर असेही म्हणणे आहे की, प्रत्येकच शहरात दररोज रात्री बिबटे येत असतात आणि उकर्ड्यावरचे मांसाचे तुकडे, कोंबड्या, शेळ्या खात असतात. अनेक ठिकाणी कुत्र्यांना सुद्धा त्यांनी फस्त केले आहे. यावर संपूर्ण राज्यात, विधानसभेत गदारोळ सुरू आहे. जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत लक्षवेधी सुद्धा मांडली. परंतु बिबट्या हा प्राणी केंद्रीय सुचीत येत असल्याने राज्याला त्याबाबत निर्णय घेण्यास मर्यादा येतात. तरीही केंद्राने काही बिबट्यांची नसबंदी करण्याचे आदेश दिले.शहरात बिबट्या आल्याच्या बातम्या आता नित्याच्याच झाल्या आहे.बिबट्यांची संख्या वाढण्याचे कारण असेही सांगितले जाते की मादी बिबट ही वर्षातून दोन वेळा पिल्ले देते आणि बहुतांश वेळी ऊसाच्या शेतात पिल्ले दिल्यामुळे ती पिल्ले सुरक्षित राहतात आणि त्यांचे जगण्याचे प्रमाण सुद्धा वाढले आहे त्यामुळे बिबट्यांची संख्या वाढली आहे. बिबट्यांच्या शहरात घुसण्याच्या प्रकारावर उपाययोजना म्हणून नाना प्रकारचे उपाय सुचवले जात आहे. उदाहरणार्थ बिबट्यांची नसबंदी, जंगलामध्ये शेळ्या सोडणे हा सुद्धा एक अजब उपाय सांगण्यात आला, भिंती/कुंपण घालणे असे उपाय अभ्यासक, लोक सुचवत आहेत. विद्यार्थी सुद्धा त्यांच्या शालेय प्रकल्पांमध्ये वन्य प्राण्यांपासून शेतीचे व मानवांचे संरक्षण कसे करावे या प्रकारचे प्रकल्प बनवत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा बिबट्यांची संख्या कशी वाढते आहे यावर त्यांच्या शैलीमध्ये भाष्य केले, तसेच काल बिबट्यांच्या धुमाकूळाकडे लक्ष वेधण्यासाठी आमदार शरद सोनवणे हे विधानसभेत बिबट्याच्या वेषात दाखल झाले होते. आधीच नागरिकांना बिबट्याची भीती, त्यात ज्यांचा वचक असतो ज्यांचेकडे अधिकार असतात ते लोकप्रतिनिधी सुद्धा बिबट्याच्या वेशात आले तर मग हा वचक किती वाटेल हे विचारूच नका. म्हणून मग सभापतींनी त्यांना समज दिली. असो ! वरील विविध उपाययोजना बिबट्यांना रोखण्यासाठी अनेकांकडून सुचवल्या गेल्या. जंगलात शेळ्या सोडणे हा ही एक उपाय त्यात आला, पण त्या फुकटच्या शेळ्या पकडून माणसेच तर त्यावर ताव मारणार नाहीत ना ! अशीही भीती आहे. वन्यजीव शहरात घुसण्याचे एक कारण म्हणजे लोकसंख्या वाढ आणि सोयीस्कररित्या मिळणारे गृह कर्ज यामुळे घरे बांधण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे आणि मनुष्य वस्ती वाढत चालली आहे त्यामुळे जंगलांचे प्रमाण घटत आहे मग ते वन्यजीव कुठे जातील ? कोणे एकेकाळी जंगलाने व्याप्त असलेल्या प्रदेशाच्या ठिकाणी आज मानवाने अतिक्रमण केले आहे. त्या ठिकाणी आता मनुष्य राहायला लागला आहे, शेती करू लागला आहे. त्यांच्या हक्काची जागा मनुष्यानेच हिरावून घेतलेली आहे आणि आता जें व्हा ते मनुष्यवस्तीत येत आहे तेव्हा आपण ते वन्यजीव आपल्या वस्ती झाल्याची तक्रार करीत असतो. बिबट्यांप्रमाणेच हरणे आणि रोही सुद्धा शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात येत असतात आणि पिके उद्ध्वस्त करीत असतात.
या सर्व उपाययोजना व अशी पार्श्वभूमी असतांना खालील काही उपाययोजना सुचावाव्याशा वाटतात
१. महानगरपालिका/ नगरपालिका क्षेत्रात प्राणिसंग्रहालयांना परवानगी दिल्यास अनेक बिबट्यांना त्यात ठेवता येईल व बिबटे आटोक्यात येतील , त्यांच्यासाठी पिंजरे सुद्धा प्रशस्त ठेवावे.
२. ज्याप्रमाणे आपण विदेशातून चित्ते आणले त्याप्रमाणे कुण्या देशाला बिबट्यांची आवश्यकता असेल तर त्यांना आपण बिबटे पाठवले पाहिजे.
३. अन्य राज्यात जिथे मांसभक्षक प्राणी कमी असतील व शाकाहारी वन्यजीव जास्त असतील अशा राज्यातील जंगलात बिबटे सोडणे.
उदंड जाहलेल्या या बिबट्यांच्या संख्येमुळे व त्यांच्या शहरात येण्यामुळे न घाबरता, त्यांना न घाबरता सकारात्मक पद्धतीने त्यांना त्यांच्या अधिवासात सोडणे, आवश्यक ती काळजी घेणे हेच नागरिकांना करावे लागेल असे वाटते. याप्रसंगी वरील काही उपाय मनात आले त्यावर राज्य सरकार , केंद्र सरकार यांनी यावर विचार करावा असे वाटते.

.jpeg)


