वोही जीते है जो दुसरो के लिए जीते है |
मनुष्य आयुष्यभर जे काही जमा करतो ते सोबत घेऊन जात नाही पण पुण्यकर्म मात्र सोबत घेऊन जात असतो. आयुष्यभर इतरांसाठी घेतलेले कष्ट आणि धार्मिक कार्यासाठी दिलेल्या देणग्या यामुळे मामींना निश्चितच सद्गती मिळाली असेल.
बालपणी थोडे फार कळायला लागल्यावर "मामाच्या गावाला जाऊ या" हे वाचता / म्हणता येऊ लागले. मग कधीतरी आईसोबत मामाच्या गावाला जळगांवला मी गेलो असेल. त्या आठवणी तर आता खूपच धूसर झाल्या आहेत. मात्र त्या काळात नवी पेठ जळगांव खांदेश येथील रत्नपारखी चाळीतील तिस-या मजल्यावरील दोन खोल्यांचे प्रवेश करतांनाच स्वयंपाकघर असलेले, जाळीचा दरवाजा असलेले मागे गॅलरी असलेले छोटेखानी घर स्पष्टपणे स्मरणात आहे, आणि स्मरणात आहे त्या स्वयंपाकघरात आणि पुढे स्वत:च्या घरात नेहमी सर्वांसाठी कष्टत, झटत आलेल्या आमच्या मामी, प्रवरा मामी म्हणजेच प्रवरा प्रभाकर नाईक. कष्ट आणि मामी हे जणू समीकरणच होते पण इतके कष्ट करूनही ना कधी तक्रारीचा सूर आणि ना कधी उदासवाणा चहेरा. मामींना मी नेहमी हसतमुखच पाहिले. चार जूनला मामींच्या दु:खद निधनाची वार्ता आल्यावर मामींबाबतच्या अशा आठवणी झरझर डोळ्यासमोर येऊ लागल्या. त्यांच्या अंतिम दर्शनासाठी खामगांवहून निघालो. खामगांव ते जळगांव हा रस्ता तसा बालपणापासून परिचित पण यावेळी तो रस्ता, आजूबाजूंची गावे याकडे मुळी लक्षच गेले नाही. मनात येत होत्या त्या केवळ मामींच्या आठवणी.
बळीराम पेठेतील गरीब कुळकर्णी कुटुंबात जन्मलेली ही कन्या माझ्या अंदाजाप्रमाणे 60 च्या दशकात कोर्टात नोकरी करणा-या माझे मधले मामा प्रभाकर नाईक यांची पत्नी झाली. घरी खाणारी पाच सहा तोंडे होती, ईश्वराने मामींना काही अपत्य सुख दिले नाही पण पुतणी, पुतणे होते त्यांचा सांभाळ त्यांनी केला. आजोबांची तुटपुंजी पेन्शन, मामांचा पगार हे पुरेसे नव्हते म्हणून मामींनी आजी व मामांकडून नोकरीची अनुमती घेतली. आजी मोठी कडक सोवळ्याची होती "नोकरी करते म्हणून घरच्या पुजादी कामात हयगय चालणार नाही" या आजीच्या अटीवर ज्या शाळेत मामी शिकल्या होत्या त्याच विद्या विकास प्राथमिक शाळेत उपशिक्षिका म्हणून रुजू झाल्या, पुढे "जिस स्कुलमे तुम पढते हो हम उसके हेडमास्तर है" या फिल्मी डायलॉगप्रमाणे त्याच शाळेच्या मुख्याध्यापिका सुद्धा झाल्या. हाडाच्या शिक्षिका असलेल्या मामी त्यांच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या शिक्षिका तर होत्याच पण आम्हा सर्व भाचे, पुतणे मंडळीसाठी त्या जणू जीवनशिक्षण देणा-या चालत्या-बोलत्या विद्यापीठच होत्या. आम्ही उन्हाळ्यात मामींकडे गेलो की मामी शाळेतून लहान मुलांची पुस्तके घेऊन येत असत. गोष्टींच्या त्या पुस्तकांचा आम्ही फडशा पाडत असू. मामींनी आम्हाला खुप खाऊपिऊ घातले. सातूचे पीठ तर त्या अप्रतिम बनवत. आमची खाण्यापिण्याची तर चंगळ असे. जेवणात विविध पदार्थ, वरणावर घरचे साजूक तूप. "तूप मोरीत नाही गेले पाहिजे" अशी ताकीद असे त्यामुळे आम्ही तूप निपटून खात असू. मला बेरी आवडते म्हणून त्या आवर्जून माझ्यासाठी साखर घालून बेरी ठेवत असत. "मामाची बायको सुगरण" या गीत पंक्तीप्रमाणे त्या चांगल्या सुगरण होत्या त्यांच्या हातचे लाडू, त्यांचा हातचा चिवडा, भाज्या, साधे वरण सुद्धा अप्रतिम असे. कुकर ऐवजी त्या भांड्यातच भात शिजवत. अंतिम दर्शनासाठी जाताना गाडीत माझ्यासोबत मामींच्या भावजयीचे भाऊ सुद्धा होते त्यांनी चहाची आठवण काढली त्यामुळे आठवणींच्या गर्दीतून मी भानावर आलो आणि मला चहावरून मामींची चहा बनवण्याची निराळीच पद्धत आठवली. त्या भरपूर चहा देत असत त्यांनी चहाने शिगोशीग भरलेला कप आणला की, "एवढा चहा तर दिवसभर पुरेल" असे माझे वडील गमतीने म्हणत. आम्ही आणि आमच्या सोबत येत असलेल्या मामींच्या आठवणी असे जळगांवात दाखल झालो, मामींचे घर आले. त्या दिवशी जळगांवला प्रथमच आता देहरुपातून आणि त्यांच्या घरातूनही कायमच्या निघून गेलेल्या त्या "रामपद", 4-B, शंकरवाडी, जेडीसीसी बँके जवळ, रींग रोड जळगांव या पत्त्यावरील घरात मी येऊन पोहोचलो होतो. कदाचित त्या घराला ही शेवटचीच भेट असेल. माझ्या मामांनी चाळीस वर्षांपुर्वी मोठ्या हौसेने कोरीव अक्षरात लिहिलेले घराचे "रामपद" हे नांव न्याहाळले. मामीचे अंतिम दर्शन घेतले, त्या दिवशी सकाळपासून आभाळ पण रडत होते. "एक समय पर दो बरसाते एक बदलीसे एक नैनोसे " अशी सर्वांचीच गत झाली होती. मामींच्या घरात समोरच्या खोलीत बसल्यावर पुन्हा मला मी शिक्षण, नोकरी निमित्त जळगांवला राहत असतानाचे दिवस आठवले.
मी मामांकडे न राहता खोली करून मित्रांसोबत राहत असे. मी मामांकडे न राहिल्याने मला मामा, आजी आणि मामींनी रोज त्यांच्या घरी हजेरी लावण्याचा आदेश दिला होता. तो आदेश मी काटेकोर पाळला होता. माझ्या मित्रांसह मी मामांकडे जात असे, मामी रोज काही खायला देत, चहा करत मग गप्पा गोष्टी झाल्या की आम्ही खोलीवर परतत असू. मी रोज माझ्या मामाकडे मित्रांना घेऊन जातो म्हणून एकदा शेजारच्या खोलीतील एक मुलगा मला म्हणाला, "कोण आहे रे तुझे मामा मामी की जिथे तुम्ही रोज जाता ? मला पण त्यांना बघायचे" म्हणून एक दिवस तो पण आला समीर देसाई त्याचे नाव. त्या दिवशी समीरसाठी खास बेत केला होता. समीरची आणि त्यांची ओळख करून दिली. मामा-मामींनी केलेले यथोचित स्वागत आणि त्यांची आपुलकीची वागणूक बघून समीरला अतिशय आनंद वाटला होता. त्याला आम्ही तिथे रोज का जातो हे आता कळून चुकले होते. जळगावच्या तीन वर्षाच्या कालावधीत दरवर्षी मला मामींनी ड्रेस घेऊन दिला मला कधीही घरापासून दूर आलेलो आहे असे जाणवू दिले नाही.
मामा आणि मामी दोघेही तसे लढाऊ बाण्याचे होते मामी मुख्याध्यापिका म्हणून सेवानिवृत्त झाल्या परंतु तरीही त्यांची मान्यता काही आली नव्हती. ही एक मोठी चूक होती. हे जेव्हा कळले तेव्हा मामांनी कठोर परिश्रम घेऊन लोकायुक्त, मुंबई पर्यंत जाऊन त्यांची मान्यता आणून त्यांची पेन्शन सुरू करून दिली होती. मामा रोज सकाळी लवकर उठून संघाचा गणवेश घालून रिंग रोड परिसरातील अनेक सुविचार फलकांवर सुविचार लिहीत असत ऊन, वारा, पाऊस काहीही असो त्यांचा हा नियम होता. पुढे मामा वारल्यावर मामींनी त्या सुविचारांचे "परागकण" नावाचे एक पुस्तक छापले. मामींची अशी इच्छा होती की त्या पुस्तकाचे विमोचन तत्कालीन सरसंघचालक सुदर्शनजी यांच्याकडून करून घ्यावे योगायोगाने सुदर्शनजी जळगाव खान्देशच्या दौऱ्यावर आले होते मामींनी संघ कार्यकर्त्यांशी संपर्क साधला. विनंती केली व्यस्त कार्यक्रमामुळे वेळ मिळणे अवघड होते पण तरीही मामींनी जिद्द सोडली नाही आणि येनकेन प्रकारेण त्यांनी सुदर्शनजी यांच्याशी संपर्क साधला आणि मामांचे परागकण हे पुस्तक त्यांच्या हस्ते विमोचित करून घेतले आजही ते पुस्तक माझ्या संग्रही आहे.
मामा आणि मामी यांनी अनेकांना भरभरून मदत केली मग ते त्यांचे नातेवाईक असोत किंवा नित्यपरिचित लोक असोत. दूधवाला, भांडेवाली, भाजीवाली अशा सर्वांना त्यांनी भरपूर मदत केली. अखेरच्या दिवसात तर त्यांनी भांडेवालीला दर महिन्याचा पगार मोफत दिला कारण की मामी त्या काळात त्यांच्या भावजयीकडे राहण्यास गेल्या होत्या आणि ती भांडेवाली सुद्धा निराधार होती. मामांना स्वतःचे घर संघाला दान करावे असे खूप वाटत होते परंतु काही अडचणींमुळे तसे होऊ शकले नाही. मामी सर्वांसाठीच आयुष्यभर झटत राहिल्या. "इदं न मम" म्हणत सर्वांना सदैव देतच राहील्या, सर्वांना भरभरून प्रेमही दिले. अनेक अडचणी जीवनात आल्या तरीही त्यांना कधी नैराश्याने ग्रासले नाही त्या सदैव शांत आणि हसतमुखच राहिल्या. काळाचा महिमा बघा कसा असतो की मामी सर्वांसाठी झटत राहिल्या पण त्यांच्या अनेक आप्तांना आजकालच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे, व्यस्त कार्यक्रमांमुळे किंवा अन्य अडचणींमुळे मामींच्या अंतिम दर्शनासाठी सुद्धा येणे अशक्य झाले. स्वामी विवेकानंदांनी दिलेला "वोही जीते है जो दुसरो के लिए जीते है" हा संदेश मामा आणि मामींना अगदी समर्पक लागू पडतो. त्यांच्या निधनाच्या काही दिवस आधीच त्यांनी रामकृष्ण विवेकानंद सेवा संस्थेला सुद्धा भरघोस मदत निधी दिला होता. अध्यात्मिक, धार्मिक कार्यासाठी त्यांनी ज्या काही देणग्या दिल्या त्या सोबत घेऊन त्या इहलोक सोडून गेल्या. कारण मनुष्य आयुष्यभर जे काही जमा करतो ते सोबत घेऊन जात नाही पण पुण्यकर्म मात्र सोबत घेऊन जात असतो. आयुष्यभर इतरांसाठी घेतलेले कष्ट आणि धार्मिक कार्यासाठी दिलेल्या देणग्या यामुळे मामींना निश्चितच सद्गती मिळाली असेल. त्यांचा सर्वच नातेवाईकांना एक भावनिक असा आधार होता तो आधार कायमचा नष्ट झाला त्यामुळे जणू काही एखादा भला मोठा आधारवडच कोसळला असे वाटते आहे. मामींना साश्रू नयनांनी भावपूर्ण श्रद्धांजली. 🙏
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा