Click "Follow" Button below To Follow this Blog

२१/१०/२०२१

PART- 10 , MAD , LAST PART OF SERIES

वेडयांच्या विश्वात , भाग 10

अंतिम भाग

प्राथमिक शाळेत आमच्या वर्गात एक वेडसर मुलगा होता त्याचे वडील मोठे विद्वान होते परंतू हा मात्र प्रारब्धामुळे वेडसर निपजला होता. आजही तो मला दिसतो , तो दिसला की मला खिन्नता वाटते. 

परंतू डॉ.पालवे यांच्यासारखे सेवाभाव बाळगणारे काही लोक या वेडसर, उपेक्षित लोकांचे आधार बनले आहेत. कुणाला तरी आधार दिल्यामुळे असे सेवाभावी लोक आपल्या देशाचे खरे आधारस्तंभ आहेत.

मागील भागापासून पुढे...

जुलै 2021 च्या अखेरीस सुरु केलेली माझी वेडयांच्या विश्वात ही लेख मालिका ब्लॉग व सांज दैनिकातून प्रकाशित झाली. आज या मालिकेचा अखेरचा भाग. शाळेजवळ दिसलेला तो वेडा व त्याला पाहून आठवलेले इतर वेडे यावरून ही दुसरी लेख मालिका तयार झाली. कुणाच्याही खिजगणतीत नसणारे हे वेडे , यांच्या त-हा , त्यांच्या आठवणी झाल्या. अनेक वाचकांना या लेखात आलेल्या वेड्यांविषयीची माहिती रुचली. या मालिकेत आलेले व मी प्रत्यक्ष पाहिलेले वेडे हे वाचकांपैकी अनेकांनी सुद्धा पाहिले असल्याने त्या वेड्यांबाबतच्या इतरही काही आठवणी वाचकांनी whats app वर पाठवल्या. काही वाचकांनी या मालिकेत न आलेले इतरही वेडे सुचवले, त्यांच्या त-हांविषयी सुचवले परंतू त्यांच्याबाबत विशेष माहिती नसल्याने लिहिणे टाळले. वेडेपणा का येतो ?, मानसिक तोल का ढासळतो ?, वेडयांच्या मनात काय असते ? असेही अनेक प्रश्न या मालिके दरम्यान पडले तसेच पुर्वीपेक्षा आता वेड्यांची अनेक इस्पितळे , सेवाभावी संस्था उपलब्ध असल्याने वेड्यांना आता चांगले उपचार व सुविधा असल्याचे सुद्धा कळले. आज ही मालिका संपुष्टात येत असतांना सुद्धा काही वेड्यांचे स्मरण झाले. माझ्या शालेय व महाविद्यालयीन जीवनात सुद्धा काही वेडसर व्यक्ती मी पाहील्या  आहेत. त्यापैकी काहींचे डोके पुर्वी ठिकाणावर होते पण नंतर मात्र त्यांची मानसिक अवस्था खराब झाली व आजही त्यांची स्थिती खराबच आहे. शाळेत असताना एक बलदंड शरीरयष्टी असणारा, व्यायामाची आवड असणारा माझा समवयस्क मुलगा एका मुलीवरील एकतर्फी प्रेमाने व अपयशाने खचून गेला. त्याची मानसिक अवस्था जी ढासळली ती आजही ढासळलेलीच आहे. आज त्याला खंगलेल्या अवस्थेत पाहिले की  त्याचा तो पूर्वीचा गोरापान चेहरा, त्याचे मॉडेल सारखे व्यक्तिमत्व मला आठवते. अजूनही एखाद-दोन वेडी मुले माझ्या समरणात आहेत. प्राथमिक शाळेत आमच्या वर्गात एक वेडसर मुलगा होता त्याचे वडील मोठे विद्वान होते परंतू हा मात्र प्रारब्धामुळे वेडसर निपजला होता. आजही तो मला दिसतो , तो दिसला की मला खिन्नता वाटते. असे कितीतरी वेडे त्यांच्या आठवणी या मालिकेच्या निमित्ताने झाल्या. वेडया लोकांवर उपचार करणारे अनेक डॉक्टर व सेवाभावी लोक आता समाजात आहेत त्यामुळे वेडसर लोकांचा , त्यांच्या कुटुंबियांचा बराच फायदा झाला आहे. डिप्रेशन , ताण-तणाव यांवर व्यवस्थित इलाज झाला तर मानसिक रुग्ण बरे होऊ शकतात हे सिद्ध झाले आहे. 

    ही मालिका लिहित असतांनाच बुलडाणा जिल्ह्यात वेड्यांसाठी सेवाभावी वृत्तीने कार्य करणा-या डॉ. नंदकुमार पालवे या दांपत्त्याविषयी सुद्धा माहिती झाली. बुलडाणा जिल्ह्यातील उदयनगर (उंद्री) या गावाजवळील पळसखेड या छोट्याशा  ठिकाणी हे दांपत्त्य कार्य करीत आहे. या ठिकाणी जाण्याचा योग मात्र आला नाही. परंतू तिथे जाऊन आलेल्या अनेक मित्रांनी अनुभव कथन केल्यामुळे त्यांच्या या सेवाभावी कार्याची माहिती मिळाली. देशात याप्रकारे कार्य करणा-या अनेक सेवाभावी लोकांमुळे मनोरुग्ण, वेडसर , मतीमंद , गतिमंद या लोकांना व त्यांच्या कुटुंबियांना मोठा आधार व दिलासा मिळाला आहे. जेंव्हा अशा संस्था नव्हत्या तेंव्हा वेडसर लोकांसाठी त्यांचे कुटुंबीय तंत्र मंत्र , यात्रा , गंडेदोरे या प्रकारांचा आधार घेत असत. परंतू डॉ.पालवे यांच्यासारखे सेवाभाव बाळगणारे काही लोक या वेडसर, उपेक्षित लोकांचे आधार बनले आहेत. कुणाला तरी आधार दिल्यामुळे असे सेवाभावी लोक आपल्या देशाचे खरे आधारस्तंभ आहेत. विशेष म्हणजे डॉ. पालवे हे शासकीय मदतीशिवाय हे सामाजीक, सेवाभावी कार्य करीत आहेत. वेड्यांच्या विश्वात या मालिकेच्या निमित्ताने वेडे, मनोरुग्ण यांच्या वेदना काय असतील हे जाणवले. आपल्या विश्व कल्याणाच्या प्रार्थनेतील "सर्वे संतु निरामया" ही ओळ आठवली. मी टाईप करणे थांबवले गत तीन महिन्यांपासून शारिरीक नव्हे पण लेखांच्या माध्यमातून वेड्यांच्या विश्वात वावरणारा मी त्या भावविश्वातून बाहेर आलो.

                                    मालिका समाप्त

👉 या मालिकेतील लेखात आलेल्या व्यक्तींच्या मूळ नावाचा उल्लेख टाळलेला आहे. काल्पनिक नांवे वापरली आहेत. तरीही साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग आहे. 

     या मालिकेतील लेख हे केवळ माहितीस्तव आहे यातून कुणाच्या अथवा कुणाच्याही परिवाराच्या मानसिक स्वास्थ्याची अवहेलना करण्याचा हेतू नाही. कुणाचा अपमान करण्याचा किंवा कुणाला दुखावण्याचा उद्देश नाही हे नम्र निवेदन. 

👉 वेड्यांंच्या विश्वात या मालिकेतील 10 लेखांच्या लिंक 👇

1) "वेड्यांंच्या विश्वात - भाग 1"

http://vinayvarangaonkar.blogspot.com/2021/06/part-1-series-about-mad-persons-and.html?m=0

2)"काही आठवणी"

http://vinayvarangaonkar.blogspot.com/2021/07/part-2-mad-some-memories-article-series.html?m=0

3)"महादू"

http://vinayvarangaonkar.blogspot.com/2021/07/part-3-mad-mahadu.html?m=0

4)"बावरी"

http://vinayvarangaonkar.blogspot.com/2021/07/part-4-mad.html?m=0

5)"सुमा"

http://vinayvarangaonkar.blogspot.com/2021/07/part-5-mad-suma.html?m=0

6)"एम टी डी सी"

http://vinayvarangaonkar.blogspot.com/2021/08/part-6-mad-mtdc.html?m=0

7) "हक्का-बक्का"

http://vinayvarangaonkar.blogspot.com/2021/09/part-7-mad-hakka-bakka.html?m=0

8) "थैलीवाली बाई"

http://vinayvarangaonkar.blogspot.com/2021/09/part-8-mad.html?m=0

9) "हाय वे वरील वेडे"

http://vinayvarangaonkar.blogspot.com/2021/10/9.html?m=0

10) "अंतिम भाग"

http://vinayvarangaonkar.blogspot.com/2021/10/part-10-mad-last-part-of-series.html?m=0


०७/१०/२०२१

PART - 9, MAD, Mad on highway

वेडयांच्या विश्वात - भाग 9

हाय वे वरील वेडे


हाय वे वर तो वेडा दिसला व थोड्या वेळाने एका ट्रकच्या मागील बाजूस लिहिलेले वाक्य मला दिसले.पण हे वाक्य मात्र सत्य परिस्थिती व वेगवेगळ्या जीवनशैली , श्रीमंत-गरीब यांच्यातील दरी सांगणारे होते.

“अमीरोकी जिंदगी चाय-बिस्कुट पे, ड्रायव्हर की जिंदगी ब्रेक स्टेअरिंग पे”

“किती genuine वाक्य आहे” , मित्र म्हणाला. पण सततच्या प्रवासामुळे, एकाकीपणामुळे सुद्दा कुणाला वेडेपण येत असावे का ?


मागील भागापासून पुढे ..... 

कुण्या एखाद्या प्रसंगाचा, घटनेचा कुण्या व्यक्तीवर कसा व काय परिणाम होईल काही सांगता येत नाही. कोर्ट परिसरात कागदपत्रे घेऊन बडबडणा-या मागील भागात सांगितलेल्या त्या थैलीवल्या बाईवर कोर्ट कचेरीमुळे काही परिणाम झाला असावा का ? असा विचार करीत असता इतरही काही वेडे लोक आठवले उदा. काठीवाला म्हातारा ,दगडाला मोबाईल करून त्यावर इंग्रजीत बोलणारा वेडा इ. पण त्यांच्या बद्दल विस्तृत असे काही ज्ञात नव्हते किंवा कधी कुणाकडून काही कळले नाही. ही लेख मालिका जरी एका शहरातील वेड्यांपुरती मर्यादित होती तरी या जगतात तर अशा वेड्यांची संख्या फार मोठ्या प्रमाणात आहे. प्रवासात, इतर शहरांच्या भेटीत सुद्धा असे अनेक वेडे लोक दिसत असतातच. ही लेखमालिका लिहित असतांना अशाच अनेक वेड्यांची आठवणी मनात येऊन गेल्या. काठीवाला म्हातारा हातात काठी घेऊन फिरत असे, कुणी चिडवले  की त्याच्या अंगावर धाऊन जात असे, गाडीचे काच सुद्धा त्याने फोडले आहेत. दगडाचा मोबाईल करून त्यावर इंग्रजीत बोलणारा वेडा मनुष्य मात्र फार दिवस दिसला नाही. कुठे असेल तो आता ? इतर वेड्यांच्या विचार करता करता आजचा हा हाय वे वरील वेड्यांबाबतचा लेख लिहिण्याचे निमित्त असे झाले की, एक दिवस मी प्रवासात होतो एका उपहारगृहात चहासाठी म्हणून आम्ही थांबलो. हाय वे वरील वाहतूक थोडी धीमी झाल्याचे जाणवले त्याला कारण म्हणजे जवळच एक कळकट कपडे घातलेला , मळकट वेडा मनुष्य आपल्या डोक्यावरील मोठ्या विस्कटलेल्या केसांना सावरत दुस-या हाताने ट्रक व इतर वाहनांना हात दाखवत काहीबाही हावभाव करीत रस्त्यात उभा  होता, पुटपुटत होता. चहावाल्याला विचारले असता “ काय म्हाईत सायेब , इथला नायी त्यो ,आला कुटून तरी. कुनी देलं की खातो अन ट्रक , गाड्या बगत रायतो” तो चहावाला म्हणाला. चहाच्या एकेका घोटासोबत मझ्या मनात विचार मात्र अनेक येत होते. प्रवासात असतांना मी पाहिलेला हा काही पहिलाच वेडा नव्हता. कित्येक वेळा केलेल्या प्रवासात मला हाय वे वर अनेक वेडे दिसले आहेत. वेड्यांच्या प्रकारात हाय वे वरील वेडे हा सुद्धा एक प्रकार असावा. अनेकांनी सुद्धा हे हाय वे वर फिरणारे  वेडे पाहिले असतील. मी पाहिलेल्या उपरोक्त वेड्याप्रमाणेच अतिशय तेलकट झालेले कपडे , काळकट- मळकट असे हे हाय वे वरील वेडे  असतात. यांना उपद्रव करतांना मात्र मी तरी कधीच पाहिले नाही. एव्हाना चहा पिऊन झाले होते. “चलो बैठो” मित्र म्हणाला  गाडीत बसलो. आम्ही पुढील प्रवास करू लागलो. काही विषय नसल्याने काही वेळ मी व माझा मित्र दोघेही गप्प होतो. या शांततेत माझे विचारचक्र पण गाडीच्या चाकांसोबत फिरत होते. जसे आपण चिंतन करीत असतो तसेच  प्रसंग, व्यक्ती आपल्या जीवनात येत असतात असे कुठे तरी ऐकले होते. वेडयांच्या विश्वात या लेखमालिकेचे लेखन सुरु असल्याने डोक्यात या लेखांचे चिंतन सुरु आहेच त्यामुळे की काय म्हणा किंवा योगायोग म्हणा गाडीतील एफ.एम.वर सुद्धा " अब आप सुनेंगे  "पगला कंही का" इस फिल्म की कहानी" अशी उद्घोषणा झाली. शम्मी कपूर अभिनीत वेडेपण याच विषयाशी संबंधीत हा चित्रपट होता. RJ ती कथा सांगत होती परंतू माझ्या डोक्यात मात्र हे हाय वे वरील वेडे फिरत होते. 

    का फिरत असतील हे वेडे असे हाय-वे वर ? , हे ट्रक ड्रायव्हर , क्लिनर तर नसतील ? सतत आणि सतत प्रवास त्यांंच्या नशिबी.काही तर अगदी लहान वयात या क्षेत्रात आर्थिक चणचणीमुळे नाईलाजास्तव आलेले असतात. स्टेअरिंग , कल्च , ब्रेक ,ऐक्सलरेटर, गिअर दिवस रात्र हेच. बारा महिने तेरा त्रिकाळ घरच्यांपासून दूर , एकाकीपणा पण पोटासाठी ड्रायव्हिंग पाचवीला पुजलेले यांमुळे तर यांचे मानसिक स्वास्थ्य बिघडत नसेल ? व यांच्यापैकीच काही वेडे होत असतील का ? “I Am Not Mad, I Am Hurt” या वाक्याप्रमाणे हे कुणापासून दुखवल्या गेले असतील का ? असे प्रश्न मला पडत होते. तेवढ्यात आमच्या समोरील ट्रकच्या मागील बाजूस लिहिलेले वाक्य मला दिसले. ट्रकवाल्यांनी त्यांच्या ट्रक मागे लिहिलेली वाक्ये , शेर सुद्धा भन्नाट असतात. पण हे वाक्य मात्र सत्य परिस्थिती व वेगवेगळ्या जीवनशैली , श्रीमंत-गरीब यांच्यातील दरी सांगणारे होते.

“अमीरोकी जिंदगी चाय-बिस्कुट पे, ड्रायव्हर की जिंदगी ब्रेक स्टेअरिंग पे”

“किती genuine वाक्य आहे” , मित्र म्हणाला. सततच्या या प्रवासामुळे, एकाकी पणामुळे सुद्दा कुणाला वेडेपण येत असावे का? कोण असतील हे हाय-वे वर फिरणारे वेडे ? यांची कुणी दखल घेते अथवा नाही? सतत ब्रेक , स्टिअरिंग हाच विषय असल्याने यांच्या मतीचे स्टिअरिंग तर जाम होत नसेल ना ? यांच्या विचारशक्तीला ब्रेक तर लागत नसतील ना ? असे नाना विचार माझ्या मनात येत होते.आमचे गंतव्यस्थान समीप आले होते. त्यामुळे आता विचारांची दिशा आपसूक बदलली. हाय वे वर दिसलेला तो वेडा आता ट्रक जसे lay bye वर जातात तसा मेंदूतील lay bye वर गेला व आम्ही पुढील कामास लागलो.  

                                                    क्रमश:

👉 या मालिकेतील लेखात आलेल्या व्यक्तींच्या मूळ नावाचा उल्लेख टाळलेला आहे. काल्पनिक नांवे वापरली आहेत. तरीही साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग आहे. 

     या मालिकेतील लेख हे केवळ माहितीस्तव आहे यातून कुणाच्या अथवा कुणाच्याही परिवाराच्या मानसिक स्वास्थ्याची अवहेलना करण्याचा हेतू नाही. कुणाचा अपमान करण्याचा किंवा कुणाला दुखावण्याचा उद्देश नाही हे नम्र निवेदन.