देवाभाऊ तुमी आले, जुनी पेन्शन बी आना.
देवाभाऊ राजेहो तुमच्या आमदार लोकाईच असते का असं शाळा कर्मचा-याईसारखं ? की कोनाले कमी आणि कोनाले जास्त मानधन ? मले तुमी सांगा यखादा आमदार 2005 च्या नंतर आमदार झाला तर मग त्याले काय कमी फॅसिलिट्या देते काय सरकार ?
23 नोव्हेंबर रोजी महायुती लयी मोठ्या मताईन निवडून आली. देवाभाऊ तुमी मराठी अन् हिंदी दोनी भाषेत पुना येईन असं म्हनलं होतं अन् तस तुमी आले बी. महायुतीन अन् पवार सायबाच्या महाआघाडी न बयनींसाठी योजनाईच आश्वासन देलतं या योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर लई तान पडला हाय असं बी हे ते तज्ञ कां कोन असतात ते लोक म्हनू रायले राजा. पण देवाभाऊ तुमी म्हनता की सरकारवर काईबी तान येनार नाई, सारं बरोबर होईन. बयनी बी लयी खुश हायेत. वाढीव पैसे भेटतीन न बापा आता. पन जे सरकारी कर्मचारी हायेत त्याईचं काय भाऊ ? सा-याईले पैसे भेटू राहिले कुन्या ना कुन्या योजनेतून. पन सरकारी कर्मचाऱ्याईला राजकारनी लोक काऊन दाटू रायले कोन जाने ? 17 नोव्हेंबर 2005 ले एक जी आर काढला अन् जुनी पेन्शन योजना लागे बंदच केली अन् सरकारी कर्मचाऱ्यांच्या हक्काच्या पेन्शनवर तवाच्या सरकारंन गदा आनली राजेहो. साऱ्या लोकायले तुमी लोक हे योजनाईतून फुकटछाप पैसे वाटता अन् लागे सरकारी कर्मचाऱ्याईचे पेन्शनच तुमाले म्हंजे तवाच्या सरकारले दिसलं बंद क-याले. काय तर म्हने त्याईच्यासाठी म्हंजे कर्मचाऱ्याईसाठी डीसीपीएस आणि यन. पी. एस. या योजना आनल्या. डीसीपीएसचा बदल बी लगे यनपीएस मदे केला. बाबू लोकाईले शाळेचे मास्तर इचारू लागले मी कायच्यात बसतो डीसीपीएस की यनपीएस मदे ? कोनी मास्तर म्हनते, "मी अजूक 20% वरच हाय राजेहो, मी रिटायर होईलोक 20% वरच राहील का हो बावा ? "काही पेन्शन भेटन की नायी तुम्हाले जवाईबापू" असं राजा सासरा बी विचारते मले, निरा परेशान झालो ना मी. कोनाले ईचाराव त त्यालेबी काई माहीत नसते. कोनी म्हनते ते शेयर बाजार का काय असते ना त्यात आपले पैसे टाकतात मंग यनपीएस न लय फायदा होते. भाऊले म्हनल नीरा कन्फुज करून टाकलं न हो ! एकपरी सा-या पार्ट्या संविधान-संविधान म्हनतात , सारा भारत यक हाय म्हनतात अन् दुसरीकडे एका राज्यात जुनी पेन्शन त एका राज्यात नवीन पेन्शन. कायची समानता हो ? बायको म्हनते तुम्हाले पेन्शन नायी पन मले मात्र माझ्या भावान चालू केले मले पैसे. आजकाल तर मास्तर लोकायले सारेच बोलून घेतात भाऊ. जो उठला तो मास्तरलेच बोलते. ते तुमचे कोन हाय ते आमदार प्रशांत बंब त्याईच्या आडनांवापरमानं बम बोलून घेतात मास्तर लोकायले. त्याईले हे दिसत नायी की त्याईले बी एका मास्तरनच शिकवेल हाय. अनुदानित शाळा मास्तरचा लयीच खार करते राजा हे बंब सायेब. देवाभाऊ तुमीच मले सांगा आता आमदार लोकाईले सारे लोक सारे कर्मचारी सारखेच हाय का नायी? तशी शपत बी घेतात ना ते ! मंग मास्तर लोकाईशी या बंब बुवाची कायच दुश्मनी हाय कोन जाने? या बंब भाऊले दुसर कायी दिसत नाही सदानकदा मास्तर लोकायईरुद्ध बोलत रायतात. माय म्हनन हे हाय की तुम्ही सा-याईले वाटू रायले त मंग कर्मचाऱ्याला काऊन दाटू रायले ? मले हे सांगा पयले कर्मचाऱ्याईन तुमचं काय घोडं मारल हो?कर्मचारी हा बिचारा गरीब असते अन् मास्तरची जात तर बेजाच गरीब. सरकारन काई नवं टुमन आनल की मास्तर भेते , त्याच्याच मागं लावतात न हो नवे टुमने. मास्तर हा घाबरते हे तुमाले चांगलं माहित आहे मंग देता त्याच्याच मागं लाऊन. राजेहो तुमच्यासारखा मानूस करू शकते हे पेन्शनच काम. तुमी यकदा म्हनलं बी होतं की, "जुनी पेन्शन आम्हीच देऊ शकतो" पायजा मागचा व्हिडिओ यखादा. बरं जुनी पेन्शन बंद केली तर केली त्यात अजून एक पॉईंट काढला ज्या शाळा 2005 च्या अगोदर अंशत: अनुदानावर हाय अन् नंतर शंभर टक्केवर आल्या त्या शाळा कर्मचा-याईले बी पेन्शन नायी, अन् पहिल्यापासून ज्या शंभर टक्के वर आहे त्याईले पेन्शन. हे असं काढणारा लयीच दिमागबाज दिसते मले. कुठून त्यांन हे आयडिया काढली कोन जाने. मले त वाटते त्याले साऱ्या कर्मचाऱ्याईन साष्टांग दंडवत घाल्याच एक आंदोलनच करावं. देवाभाऊ राजेहो तुमच्या आमदार लोकाईच असते का असं की कोनाले कमी आणि कोनाले जास्त मानधन ? मले तुमी सांगा एखादा आमदार 2005 च्या नंतर आमदार झाला तर मग त्याले काय कमी फॅसिलिट्या देते काय सरकार ? काय राजे हो संविधान म्हनते समानता हाय मंग कर्मचा-याईले अलग न्याय अन् आमदाराईले अलग? काही समजत नाही राजेहो. देवाभाऊ, तुमच्यावर लोकाईचा लयी ईश्वास हाय. विरोधी पक्षबी तुमाले मानते, मोदी शहा सायबाचे बी तुमी लाडके हाय, जमवा न मंग आमचं काम ! कायी बी म्हना तुमचा सोशिक स्वभाव लोकाईले समजला हाय. तुमाले लोकाईनं कायी-कायी श्या दिल्या, कायी बी बोलले पन तरी तुमी शांत रायले. तुमचा स्वभाव दुस-याला समजून घेनारा, दुस-याईच दु:ख समजून घेनारा हाय. आमचं बी दु:ख समजून घ्या. भाऊ बस जस तुमी पुना आले तस आमची जुनी पेन्शन बी पुना द्या आता. तुमाले साऱ्या कर्मचाऱ्याईच्या वतीन हात जोडून विनंती.
एकदम बरोबर भाऊ आमच्या वेदना तुम्ही समजून घेतल्या 🙏
उत्तर द्याहटवालै भारी लिवल भाऊ तुमी
उत्तर द्याहटवा