Click "Follow" Button below To Follow this Blog

०३/११/२०२४

Article about Dastur Ratanji Library, Khamgaon

खामगांवचे "रतन"

ज्या पारशी समाजाला भारताने आश्रय दिला आणि तो समाज सुद्धा इथेच रमला, या देशाला त्यांनी आपले मानले इथे अनेक वैद्यकीय संस्था, उद्योग, इमारती, इतर संस्था उभारल्या, गरजूंना देणग्या दिल्या.  त्याच समाजाच्या एकाने  खामगांवला सुद्धा एक अमूल्य ठेवा दिला आहे, तो कोणता ठेवा आहे या लेखात वाचा.

गत आठवड्यात देशाचे थोर उद्योगपती तसेच समाजसेवेत अग्रेसर अशा रतन टाटा यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने समस्त भारतीयांना दुःख झाले. कोट्याधीश असूनही आपल्या साध्या राहणीने आणि दानशूरतेने त्यांनी समस्त भारतवासीयांना आकर्षित केले होते. त्यांच्या निधनाने भारताच्या औद्योगिक क्षेत्रात एक पोकळी निर्माण झाली. त्यांच्या निधनाचे वृत्त वाचल्यावर टाटा समूह आणि तो उद्योग उभा करणारे जमशेदजी टाटा आणि ते ज्या समाजाचे होते तो पारशी समाज त्या पारशी समाजातील चालीरीती, प्रार्थना मंदिर, अंतिम संस्कार पद्धती, पारशी समाजाने देशाच्या विकासात घातलेली भर या सर्व गोष्टींचे स्मरण झाले. त्याच अनुषंगाने आठवण झाली ती कधीकाळी खामगावात वास्तव्यास असलेल्या एका ग्रंथप्रेमी पारशी सदगृहस्थाची. इंग्रजांनी खामगावला जिनिंग प्रेसिंग सुरू केल्यानंतर खामगावच्या कायापालटास प्रारंभ झाला. 1870 चा तो काळ होता. इंग्रजांनी खामगावला नऊ जिनिंग प्रेसिंग मंडळे स्थापन केली. हा जिनिंग प्रेसिंग उद्योग सुरू झाल्यानंतर अनेक उद्योगपती, अधिकारी लोक खामगावात वास्तव्यास आले. उद्योग, व्यवसाय  वाढवण्यासोबत तत्कालीन लोक हे ज्ञान लालासी सुद्धा होते. अशा लोकांची बौद्धिक भूक भागवण्यासाठी त्यांना पुस्तकांचे खुप सहाय्य होत असे. त्यांच्यासाठी खामगांवात एक खाजगी ग्रंथालय त्या काळात उपलब्ध होते. हे ग्रंथालय होते दस्तूर रतनजी या पारशी सदगृहस्थाचे. परंतु या ग्रंथालयात फक्त उच्चभ्रू लोकांनाच प्रवेश होता. सर्वसाधारण नागरिकांना त्याचा काही उपयोग नव्हता. पुढे श्री दस्तूर रतनजी यांचे पुत्र माणेकशा दस्तूर हे खामगांव येथे उपविभागीय अधिकारी पदावर रुजू झाले. त्यांना त्यांच्या वडिलांचे चिरंतन, ज्ञानदायी असे स्मारक खामगावला असावे अशी इच्छा झाली. त्यांनी 1889 रोजी आपले खाजगी ग्रंथालय सार्वजनिक ग्रंथालयात परिवर्तित केले. हे वाचनालय उपविभागीय कार्यालयाच्या परिसरात होते. त्याकाळी महसूल विभागाचा दरारा होता. तहसीलदार , उपविभागीय अधिकारी यांच्यासमोर उभे राहण्यास सुद्धा लोक घाबरत असत त्यामुळे या वाचनालयात जाण्यास सर्वसामान्य लोक धजावत नसत. यावर तोडगा म्हणून काही उत्साही नागरिकांनी प्रताप वाचनालय खामगांव या नावाचे वाचनालय सुरू केले होते. ( हे वाचनालय सुरू करणारी कोण मंडळी होती ही माहिती तूर्तास तरी उपलब्ध नाही. ) 

1912 मध्ये पंचम जॉर्जच्या राज्यरोहणप्रसंगी खामगावच्या रेल्वे स्टेशन समोरील एक मोकळी जागा (आजच्या  डॉ बाबासाहेब आंबेडकर मैदानातील काही भाग) श्री दस्तुर रतनजी ग्रंथालयाकरिता शासनाकडून मिळवून दिली व कायमस्वरूपी अशी इमारत सुद्धा दिली. या कार्यात नागरिकांनी सुद्धा सहकार्य केले. 1912 मध्ये हे ग्रंथालय स्वतःच्या जागेत आले. 1913 मध्ये प्रताप वाचनालय व श्री दस्तुर रतनजी ग्रंथालय यांचे एकत्रीकरण झाले. प्रताप वाचनालयाचा मोफत वाचन विभाग सुद्धा श्री दस्तुर रतनजी ग्रंथालयात कायम ठेवण्यात आला. तो  अजूनही कार्यरत आहे. स्वातंत्र्योत्तर काळात वाचनालयाची घटना, निधी, इमारत बांधकाम, विविध गणमान्य लोकांच्या भेटी अशी वाटचाल करत श्री दस्तुर रतनजी ग्रंथालय हे बुलढाणा जिल्ह्यातील एक अग्रगण्य असे ग्रंथालय म्हणून नावलौकिक प्राप्त करते झाले. ग्रंथालयातील ग्रंथांची संख्या सुद्धा वृद्धिंगत होत गेली. मराठी, हिंदी, इंग्रजी तिन्ही भाषेतील साहित्य विपुल प्रमाणात येथे आजही उपलब्ध आहे. 1989 रोजी ग्रंथालयाने शंभर वर्षे पूर्ण केली या अनुषंगाने विविध कार्यक्रम तेंव्हा घेण्यात आले होते. ग्रंथालयाने शंभर वर्षे पूर्ण केल्यावर विविध मान्यवरांची पत्रे सुद्धा ग्रंथालयास आली. त्यात मेहकरचे कवी ना. घ. देशपांडे यांचे सुद्धा पत्र आहे. त्या पत्रात ना.घ. म्हणतात की, ते जेव्हा खामगावला शिकत होते तेव्हा श्री दस्तुर रतनजी ग्रंथालयात जात होते आणि या ग्रंथालयामुळेच त्यांच्यामध्ये साहित्य प्रेम व साहित्यिक भावना विकसित झाली. दस्तूर रतनजी ग्रंथालयाचे वैशिष्ट्य म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात जुने व सर्वात जास्त ग्रंथ संख्या असलेले असे हे ग्रंथालय आहे. येथील 125 चौरस फुटाहून अधिक जागा ही ग्रंथांनी व्यापलेली आहे. शेकडो संदर्भ ग्रंथ येथे उपलब्ध आहे. या ग्रंथालयाने खामगावकरांसाठी केलेले सर्वात मोठे काम म्हणजे या ग्रंथालयातील ग्रंथ तसेच येणारी विविध वृत्तपत्रे वाचून अनेक तरुणांना त्याचा फायदा  स्पर्धा परीक्षा देतांना झाला आणि ते तरुण अनेक विभागात विविध पदांवरती नियुक्त झाले. 1939-40 या कार्यकारणीचे अध्यक्ष खामगांवचे माजी नगराध्यक्ष व खासदार राहिलेले तसेच गो.से. महाविद्यालयाचे माजी अध्यक्ष शंकरराव बोबडे यांचे वडील श्री बाजीराव बोबडे हे होते. ते व्यवसायाने अधिव्याख्याता होते. त्यानंतर खामगावातील श्री साने, श्री एकबोटे, श्री मुंशी, श्री भट्टड इ. अनेक गणमान्य व्यक्तींनी या वाचनालयाचे अध्यक्षपद भूषवले आहे. तूर्तास या वाचनालयाचे अध्यक्ष श्री विठ्ठलभाऊ लोखंडकार हे आहेत. दस्तुर रतनजी ग्रंथालय हे आता 135 व्या वर्षात वाटचाल करीत असून खामगाव शहरात विविध बौद्धिक कार्यक्रम, उपक्रम आयोजित करीत असते. "ग्रंथ हेच खरे मित्र" अशी काही वाक्ये आपण ऐकत असतो ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा ग्रंथ कसे वाचावे याबद्दल सांगितले आहे. ते म्हणतात की ज्याप्रमाणे भ्रमर हा फुलातील परागकण हळूवारपणे शोषून घेतो त्याप्रमाणे ग्रंथ सुद्धा हळुवारपणे व नीट आकलन करून वाचले गेले पाहिजे. खामगावच्या ऐतिहासिक वाटचालीत महत्त्वाची भूमिका बजावत असलेले श्री दस्तुर रतनजी ग्रंथालय हे खामगावचे एक भूषणच म्हणावे लागेल. ग्रंथालयांनी अनेक वर्षापासून ग्रंथसेवा देऊन बौद्धिक चळवळ रुजवली आहे तसेच वेळेप्रसंगी वाचकांना आपल्या ग्रंथातून योग्य ते मार्गदर्शन करून साथ दिलेली आहे. म्हणूनच आज जरी मोबाईल इंटरनेटचा काळ असला तरी आपण सुद्धा या ग्रंथालयांना भेट देऊन त्याचे सभासद बनून त्यांच्या कार्यक्रमांना उपस्थित राहून साथ द्यायला नको का ? ज्या पारशी समाजाला भारताने आश्रय दिला आणि तो समाज सुद्धा इथेच रमला, या देशाला त्यांनी आपले मानले इथे अनेक वैद्यकीय संस्था, उद्योग, इमारती, इतर संस्था उभारल्या, गरजूंना देणग्या दिल्या.  त्यांपैकी एकाच्या म्हणजेच दस्तूर रतनजी यांच्या ग्रंथ संपदेतून खामगांवला सुद्धा एक भले मोठे, अद्ययावत असे ग्रंथालय निर्माण झाले. त्याच श्री दस्तुर रतनजी ग्रंथालयाने सुद्धा ज्याप्रमाणे दिवाळीतील दिवे जसे सर्वत्र प्रकाश पसरवतात तसेच 135 वर्षांपासून खामगांव शहरात ग्रंथरुपी पथदर्शक प्रदीप अर्थात ज्ञानदीप तेवत ठेवला आहे आणि म्हणूनच श्री दस्तुर रतनजी ग्रंथालयास खामगांवचे "रतन" असे म्हणणे यथार्थच ठरेल.

विनय वि. वरणगांवकर

खामगांव

7588416238

टीप - एवढा मोठा ठेवा खामगांवकरांसाठी ठेऊन जाणा-या दस्तूर रतनजी, माणेकशा दस्तूर यांचे छायाचित्र अद्यापपावेतो कुठूनही प्राप्त झाले नाही.

माहिती स्त्रोत - श्री दस्तूर रतनजी ग्रंथालय, खामगांव

७ टिप्पण्या:

  1. खुप छान.ज्ञानवर्धक लेख.

    उत्तर द्याहटवा
  2. Khup chhan mahiti dili aapan Vinay ji tasech Zunzunwala plots ha sudha parshi samajacha ek upkram hota maza address toch hota civil line Zunzunwala plots

    उत्तर द्याहटवा
  3. नमस्कार! सुप्रभात सर! अतिशय सुंदर मोलाची व ऐतिहासिक माहिती दिली.आपल्या खामगांव शहराचा लौकिक जसा कापसाची आशियातील मोठी बाजारपेठ,स्वातंत्र्यसंग्रगामाचे केंद्र आहे. तशीच शैक्षणिक केंद्र आणि वाचनसंस्कृती रुजविण्यासाठी अग्रणी शहर आहे! आपण ही ओळख अधोरेखित केली.नव्या पिढीला या गौरवशाली इतिहासाची ओळख करून दिली! धन्यवाद!

    उत्तर द्याहटवा
  4. खरंच खूप उपयुक्त माहिती दिली धन्यवाद...

    उत्तर द्याहटवा
  5. 👌👍🙏 खूप छान माहिती दिलीस विनय तू..मी सुद्धा १९८० पासून सभासद आहे या वाचनालयाची..

    उत्तर द्याहटवा
  6. १९८८ ते १९९८ पर्यंत मी खामगांव मध्ये शिक्षण निमित्ताने असताना व नंतर बेरोजगार चळवळीचे काम करत असताना जेव्हा जेव्हा वेळ मिळाला तेव्हा वाचन करण्याकरीता मी श्री दस्तुर रतनजी ग्रंथालय मध्ये जाऊन वाचन करत असे. त्या दिवसांत कथा, कादंबरी. उपन्यास आदी चे भरपूर वाचन झाले..तेव्हा पासून आता पर्यंत बराच कायापालट झाला असून अद्ययावत झाले असेल.

    उत्तर द्याहटवा
  7. उपयुक्त लेख दील्याबद्दल धन्यवाद.

    उत्तर द्याहटवा