कांबळेचा काला
आजची गोष्ट ही 35 वर्षे जुनी पण तरी आज स्मरण होण्याचे निमित्त ठरले ते गोकुळाष्टमीचे. नॅशनल हायस्कूल मध्ये आमच्या वेळी 5 , 6 चे वर्ग मुक्तेश्वर आश्रम या संत पाचलेगांवकर महाराज यांच्या मठातील खोल्यांमध्ये भरत असत. आज या ठिकाणी मुक्तेश्वर आश्रमाचे सभागृह आहे. याच ठिकाणी 6 वी इयत्तेत आमच्या वर्गात नवीन मुलगा आला होता. आजही मला त्याचा तत्कालीन चेहरा आठवतो. त्यावेळी कदाचित तो आमच्यापेक्षा वयाने थोडा मोठा असावा. दाट कुरळे पण तेल न लावल्याने राठ असलेले केस, स्थुल देहयष्टी, सावळा वर्ण असे त्याचे रूप होते. तो जरी मागील बेंचवर बसत असला तरी त्याची दोस्ती मात्र सर्वांशीच जुळली होती. त्याचे राहणीमान, पेहराव , रूप यांवरून तो सर्वच शिक्षकांना एक उनाड मुलगा वाटत असे परंतू तो तितका उनाडही नव्हता आणि अभ्यासात हुशारही. त्याच्या एकूणच रूपावरून काही मुले सुद्धा त्याच्याशी ठराविक अंतर राखूनच असत. माझे आणि आम्हा काही First Benchers पोरांचे मात्र त्याच्याशी सुर जुळले होते.
गोकुळाष्टमी म्हटले की काला आलाच. आजची गोष्ट त्याचीच. बालपणी आजी कृष्ण, पेंदया, त्यांचा काला या गोष्टी सांगत असे. लहान थोर घरची विविध मुले भगवंतासह एकत्र बसून काला खात असत. या आजीने सांगितलेल्या गोष्टींमुळे व विविध जाती धर्मातील मंडळी ही आजोबा व वडीलांचे मित्र असल्याने जात-पात कधी मनात आलीच नाही. गोपाळकाला माझा अत्यंत आवडीचा पदार्थ. गोपाळकाल्याच्या दिवशी योगायोगाने कधी माझ्या मुलांच्या शाळेत जाणे झालेच तर मला तिथे यथेच्छ काला मिळतो. आमच्या सौ. स्नेहल वरणगांवकर काकु सुद्धा मला डबा भरून काला पाठवत असतात. “गोपाळ काला गोड झाला गोपाळाने गोड केला” असा काला हा साक्षात भगवंताचा प्रिय असा पदार्थ त्याचा प्रसादच आहे, माझ्या दृष्टीने काला हा पिझ्झा, बर्गर, वेफर्स आदि पदार्थांपेक्षाही श्रेष्ठ असा आहे, “अमृतातही पैजा जिंके” असा हा काला आहे. या काला संबंधीत बाबींचे मला स्मरण झाले आणि त्यामुळेच 6वीत आमच्या वर्गात आलेल्या कांबळेचेही. कांबळे, अनिल अर्जुन कांबळे. आम्ही त्याला कांबळे या त्याच्या अडनांवानेच हाक मारीत असू. आमची शाळा सकाळी असे. डबा खाण्याच्या सुटीत आम्ही आप-आपले डबे उघडून खात असू, वाटावाटीही होत असे. हा कार्यक्रम होत असे तो आमच्या वर्गामागील संत पाचलेगांवकर महाराजांच्या मठात. हिंदू संघटन यज्ञ करणा-या पाचलेगांवकर महाराजांची कृपा झाली की काय कोण जाणे. एक दिवस “आपण सगळे घरून जे-जे आणतो ते एकत्र करून खात जाऊ , तू पेपर आण , मी तिखट मीठ आणतो , तू कांदा आण, तू लिंबू आण” असा हुकूमच कांबळेने सोडला आणि आम्ही तो शिरसावंद्य मानला. कांबळे जणू काही आमच्यातील कान्हाच झाला होता. कदाचित संत पाचलेगांवकर महाराजांनीच काल्याच्या निमित्ताने त्याला आम्हाला एकत्र आणण्याची बुद्धी दिली असावी असे आज मनात येते. दुस-या दिवशी सुटीत दोन पेपरवर सर्वांचे डबे एकत्र केले गेले , कांबळेंनी स्वत: पोळ्या कुस्करल्या त्यावर तिखट मीठ टाकले गेले आणि तो काल्याचा भला मोठा ढीग भराभरा संपू लागला.काला हा आमचा नित्याचाच कार्यक्रम झाला, शिवाय हा काला करणे आणि मग तो खाणे यात सुटीची वेळ सरून जात असे व म्हणून अनेकदा आम्हाला व आमच्यातील कांबळेला शिक्षक शिक्षाही करीत. कित्येकदा आम्ही या काल्यामुळे वर्गाबाहेर उभे राहिलो आहोत. पण आमच्याकडून तो चविष्ट काला काही सुटला नाही. जेंव्हा आमची शाळा दुपारी भरू लागली, मुले जेवायला घरी जाऊ लागली तेंव्हा ते काला करून खाणे बंद झाले. पुढे कांबळे सुद्धा शाळा सोडून कुठे गेला कुणास ठाऊक ? कुणी म्हणे तो मुंबईला गेला आणि कुणी आणखी काही परंतू ठोस असे काही त्याच्या बाबत कळलेच नाही. 80 च्या दशकात शाळेतील गीतमंचात
“जात कोणती पुसू नका , धर्म कोणता पुसू नका ,
उद्यानातील फुलास त्याचा
गंध कोणता पुसू नका
हे समूह गीत गाणारी आम्ही निरागस शाळकरी बालके होतो. आज मात्र राज ठाकरे म्हणतात त्याप्रमाणे शाळेतील मुले सुद्धा एकमेकांना जात विचारतात, विविध योजनांमुळे त्यांना त्यांची वर्गवारी कळते आणि मग हा आपला, तो अमुक, हा ढमुक हा जीवनभराचा खेळ सुरू होतो, जाती-पातीच्या चक्रात त्यांना शासनच ढकलते. त्यात मताच्या भिकेने आपली झोळी भरण्यासाठी नेते आणखी भर टाकत जातात. टीव्ही, सोशल मिडीया, मोबाइल ही सोहार्दापेक्षा विद्वेषच अधिक पसरविणारी माध्यमे तेंव्हा सुसाट सुटली नव्हती. आजीकडून कृष्णाच्या काल्याच्या गोष्टी ऐकलेली उच्चवर्णीय मुले, “जीवनातल्या मंदिरी बांधा पुजा समतेची अनुसरा शिकवण बुद्धाची” हे गौतम बुद्ध, महामानव आंबेडकर यांचे तत्व पालन करणा-या कांबळेचा काला खात होती. परंतू हा कांबळेचा काला म्हणजे त्या जन्माष्टमीच्या काल्यापेक्षा वेगळा म्हणजे पोळी भाजी व अन्य पदार्थ यांचे मिश्रण असे. तसा काला पुढे कधीच खाण्यात आला नाही. काळाने तो काला हिरावून नेला. तो काला माझ्यासाठी चिरस्मरणीय असाच आहे.
आजही कांबळेच्या काल्यासारखा काला कुण्या शाळेत होत असेल का ? कुणी कांबळे आजही बाल-गोपाळांना गोळा करून एकमेकांच्या डब्यातील पदार्थ एकत्र करून बनवलेला काला खात असेल का ? असे दृश्य असलेली शाळा आजही असेल का ? असल्यास मला काला करून खाणारी ती मुले पाहायची आहे. या सोबतच आमचा तो वर्गमित्र अनिल अर्जुन कांबळे कुठे असेल ? हा सुद्धा एक प्रश्न आहे. पण जिथेही असेल तिथे नानाविध जाती धर्मांच्या मित्रांचा गोतावळा मात्र निश्चितच सोबत बाळगून असेल याची खात्री आहे.
✍️विनय वि.वरणगांवकर ©