सडक पे मस्ती जान नही सस्ती
या लेखाच्या शीर्षका सारख्या अनेक पाट्या सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यांवरती लावलेल्या असतात. या पाट्या चालकाला सावध करीत असतात, वेग नियंत्रणात ठेवण्याचे आवाहन करीत असतात. परंतु या पाट्या सामान्यतः दुर्लक्षिल्या जातात. हल्लीचे तरुण तर या पाट्या वाचण्याकडे साफ दुर्लक्ष करत असतील. शिवाय मद्यधुंद अवस्थेतील चालक पाट्या वाचण्याचे तर सोडाच वाहन सुद्धा बेजबाबदार पद्धतीने चालवत असतात. लहान मुलांच्या हाती गाड्या देण्याचे प्रमाण सुद्धा प्रचंड प्रमाणात वाढलेले आहे. परवा पुण्यात झालेल्या अपघातामुळे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. यापूर्वी हिट अँड रन च्या अनेक केसेस झालेल्या आहेत, त्यातील सलमान खानची केस तर सर्वश्रुत आहे. सलमान खानने अशीच बेदरकारपणे गाडी चालवून ती फुटपाथवर झोपलेल्या लोकांच्या अंगावर नेली होती आणि सलमान त्या प्रकरणातून सहीसलामत बाहेर आलेला आहे. परवा पुण्याला विशाल अग्रवाल या बांधकाम व्यवसायिकाचा मुलगा हा सुद्धा रात्री दोन-दोन हॉटेलमध्ये पार्ट्या साज-या करून मद्यधुंद अवस्थेत (माध्यमांवर दाखवलेल्या व्हिडिओ नुसार) कल्याणी नगर परिसर पुणे या भागातून बेदरकारपणे पोर्शा कंपनीची मोटार गाडी चालवत जात होता व त्याने दोन दुचाकीस्वारांना उडवले. त्यात एक तरुण व एक तरुणी हे मृत्युमुखी पडले. Porsche हे एका जर्मन उद्योजकांचे आडनांव असून त्याच्या कंपनीची निर्मित ही कार आहे. Porsche या शब्दाचा पोशा असा उच्चार आहे) आपल्याकडे सर्व या गाडीला पोर्शे असे म्हणतात. ही गाडी दोन सेकंदात शून्यावरून 100 असा वेग पकडू शकते. या गाडीची किंमत अडीच कोटी आहे. ही झाली या गाडीची थोडक्यात माहिती. कोट्याधीश असलेल्या विशाल अग्रवाल ने त्याच्या मुलाला ही गाडी घेऊन दिली होती. स्वतः विशाल अग्रवालला सुद्धा निरनिराळ्या गाड्यांचा छंद आहे. विशाल अग्रवालचा मुलगा वेदांत हा 17 वर्षाचा असूनही मद्य पितो, मद्य पिऊन, RTO कडे नोंदणी न झालेली पोर्शा कार सर्व नियम धाब्यावर ठेऊन बेदरकारपणे चालवतो, म्हणजे मद्य पिण्यास तो पात्र नाही, त्यामुळे त्याच्याकडे मद्य पिण्याचा परवाना तर नसेलच, गाडी पण नोंदणीकृत नाही तरीही बेकायदेशीर कृत्ये काय करतो आणि पोलीस ठाण्यात नेल्यावर त्याला पोलीस शिक्षा म्हणून निबंध काय लिहिण्यास सांगतात, जमानत काय मिळते ? याचे तमाम जनतेला मोठे आश्चर्य वाटत आहे. असाच अपघात जर का एखाद्या सर्वसामान्य, मध्यमवर्गीय चालकांकडून झाला असता किंवा रिक्षा चालक किंवा टॅक्सी चालकाकडून झाला असता तर पोलिसांची त्याच्यासोबत वागणूक कशी राहिली असती ? असा प्रश्न पडतो. गरिबाला एक न्याय आणि श्रीमंतास वेगळा न्याय ही अतिशय लाजिरवाणी घटना आहे. या अपघातात जो तरुण आणि जी तरुणी दगावली त्यांच्या आप्तांवर काय प्रसंग ओढवला असेल याची कल्पना करवत नाही. आज आपल्या देशात सर्वत्र गुळगुळीत आणि मोठाले रस्ते होत आहेत. परंतु त्याच प्रमाणात अपघात सुद्धा होत आहेत. समृद्धी महामार्गावर सुद्धा गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात अपघात झालेले सर्वांनी पाहिले आहे. हे अपघात जर टाळायचे असतील तर वाहतूक अधिनियमाची अंमलबजावणी ही अत्यंत कठोर पद्धतीने होणे गरजेचे झालेले आहे. आज आपण पाहतो की वाहन चालक परवाना मिळण्याची पद्धत कशी झाली आहे. 1960 च्या दशकात एखाद्याला वाहन चालवण्याचा पक्का परवाना मिळवायचा असेल तर त्याला आरटीओ वेगवेगळ्या पद्धतीने वाहन चालवण्यास लावायचे. त्याच्या वाहन चालवण्याचे सूक्ष्म निरीक्षण केले जायचे. आज पक्का वाहन चालक परवाना मिळवतांना अशा काही परीक्षा घेतल्या जातात का? तर त्याचे उत्तर नकारार्थी येईल. केवळ स्टेरिंग वर बसून पंचवीस तीस फुटापर्यंत गाडी चालवून दाखवली की मिळाला वाहन चालक परवाना अशी पद्धत आहे. याबरोबरच पब, हॉटेल, बार हे सुद्धा प्रचंड प्रमाणात वाढले आहेत. हे सुरू करण्याचे परवाने सुद्धा इतके सहज कसे काय प्राप्त होतात? पुण्यासारख्या विद्येच्या माहेर घरात पहाटे तीन-तीन, चार-चार वाजेपर्यंत पुण्यात शिकायला किंवा नोकरीच्या निमित्ताने आलेले हे तरुण काय दिवे लावत असतात ? असे अनेक प्रश्न व अनेक विचार या अपघातामुळे जनतेच्या मनात निर्माण झाले आहेत. मायबाप सरकारने राज्य उत्पादन शुल्क विभाग, पोलीस प्रशासन, आरटीओ या सर्वच विभागाकडून कायद्याची कठोर अंमलबजावणी करवून घेणे जरुरीचे झाले आहे. केवळ तरुणांचा देश म्हणून गौरव मिरवण्यात काही अर्थ नाही. देशातील तरुण कसे आहेत याचा सद्धा विचार करणे आवश्यक आहे. पैसा आहे म्हणून मुलांना गाड्या देणे, ते कुठे जातात त्यावर लक्ष न देणे किंवा दुर्लक्ष करणे यामुळे पालकांवरच पुढे दुःख व संकट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशाल अग्रवाल यांनी मोठी संपत्ती मिळवली परंतु त्या पैशांचा उपयोग वेदांत कडून चुकीचा होत होता आणि त्यामुळे वेदांतच्या गाडीखाली निरपराध तरुण मुले दगावल्या गेली. या प्रसंगावरून सर्वच तरुण वाहन चालकांनी हे लक्षात घेणे आवश्यक आहे की वाहन हे मर्यादित वेगानेच व मद्य प्राशन न करता चालवले गेले पाहिजे तसेच पालकांनी सुद्धा आपल्या अल्पवयीन मुला-मुलींना गाड्या देऊ नये, पोलिसांनी सुद्धा अल्पवयीन वाहन चालकांना पकडून त्यांच्यावर कारवाई करून, त्यांच्याकडून दंड वसूल करून शासनाच्या तिजोरीत भर घालायला पाहिजे. तुम्ही वेगाने गाडी चालवता तेव्हा स्वतःचा तर जीव धोक्यात घालताच पण दुसऱ्यांचा जीव सुद्धा धोक्यात घालता याचे भान तरुणाईला असले पाहिजे. म्हणूनच तरुण वाहन चालकांनी आपल्या डोक्यात पक्के भरून घ्यावे की सडक पे मस्ती जान नही सस्ती.