पक्ष कार्यकर्ते की गुंडांची टोळकी ?
इथे एका गोष्टीचे मोठी खंत वाटते की, ज्या शिवरायांनी समस्त महाराष्ट्रीयन जनतेला अर्थात अठरा पगड जातींच्या लोकांना भगव्या झेंड्याखाली एकत्र आणले त्याच छत्रपतींच्या महाराष्ट्रात, त्यांच्याच किल्ल्यावर हिंदू लोकच एकमेकांशी झगडत होते.
राजकोट किल्ल्यावरचा आठ महिन्यांपूर्वी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते अनावरण झालेला छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळला आणि एकच गदारोळ महाराष्ट्रात सुरू झाला. ज्या छत्रपतींचे किल्ले अद्यापही शाबूत आहे त्याच छत्रपतींचा पुतळा इतक्या अल्पावधीत कोसळावा ही खरोखरच दुर्दैवी आणि महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी अशी गोष्ट आहे. हा पुतळा कोसळल्यावर तो कोणी उभारला ? मूर्तिकार कोण ? कंत्राटदार कोण ? लोखंड किती वापरले गेले होते ? आदी बाबींवर उहापोह होण्यास सुरुवात झाली. या गोष्टीचे राजकारण जर झाले नाही तर नवलच आणि ते राजकारण पण सुरू झाले. काल राजकोट किल्ल्यावर मोठे महानाट्य झाले. ठाकरे गट आणि भाजपा मध्ये राजकोटच्या पवित्र भूमीत मोठी हाणामारी झाली. राजकोटला प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी नारायण राणे, विजय वडेट्टीवार, आदित्य ठाकरे असे नेते पोहोचले. जयंत पाटील सुद्धा होते. या नेत्यांच्या गटांकडून महाराष्ट्राला अशोभनीय अशा अर्वाच्य भाषेत एकमेकांना , एकमेकांच्या नेत्यांना हिणवण्याचा प्रयत्न झाला. पेंग्विन, कोंबड्या चोर, अंगार, भंगार अशी घोषणाबाजी झाली. आमचा इतिहास ठाऊक नाही का ? ( या वाक्यात ते अप्रत्यक्षरीत्या स्वतःच सांगत आहे की ते कोण होते ) , एकाही घरात जाता आले नसते, घरात घुसून एकेकाला मारून टाकेन, शिवसेना राडे करूनच पुढे आली , उद्धव ठाकरे यांना काही समजत नव्हते , आदित्य शेंबडा होता. असेही राणे यांनी धमकावले व हिणवले. नारायण राणे यांनी आव्हान दिल्यावर आणखीनच तणावाची परिस्थिती निर्माण झाली. इथे एका गोष्टीचे मोठी खंत वाटते की, ज्या शिवरायांनी समस्त महाराष्ट्रीयन जनतेला अर्थात अठरा पगड जातींच्या लोकांना भगव्या झेंड्याखाली एकत्र आणले त्याच छत्रपतींच्या महाराष्ट्रात, त्यांच्याच किल्ल्यावर हिंदू लोकच एकमेकांशी झगडत होते. हा गदारोळ पाहून महाराजांच्या आत्म्याचा किती तळतळाट झाला असेल, त्यांना किती वेदना झाल्या असतील. बरं, महाराजांचा पुतळा कोसळला म्हणून हे कार्यकर्ते तिथे गोळा झाले होते त्याच ठिकाणी, महाराजांच्या राजकोट किल्ल्यावरच यांच्या हमरीतुमरीने, झटापटीमुळे, लोटपोटिने किल्ल्याची सुद्धा हानी झाली, मोडतोड झाली, किल्ल्याला क्षती पोहचली. या गोष्टीचे मोठे अप्रूप वाटते की, पुतळा कोसळला म्हणून तेथे एकत्र यायचे आणि किल्ल्याची हानी करायची. हे असे कसे यांचे छत्रपतींवरचे प्रेम ! जनतेने तमाम राजकीय पक्ष, कार्यकर्ते यांना आता पुरते ओळखले आहे म्हणून लोकसभेच्या गत निवडणूकीत मतदार मतदान केंद्राकडे फिरकलाच नाही. महाराष्ट्रातील सद्य परिस्थिती पाहता आगामी विधानसभा निवडणूकीत सुद्धा संमिश्र असे निकालच पाहायला मिळतील असे वाटते. पूर्वीच्या राजकारणात आणि आताच्या राजकारणात मोठा फरक आहे आताची पिढी ही हुशार आहे, त्यांना राडे नको आहे तर त्यांना विकास पाहिजे आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी आत्मपरीक्षण करायला हवे आणि आपल्या पक्षाची ध्येयधोरणे काय आहेत, देशाचा विकास करायचा आहे की निव्वळ फुकटचे पैसे वाटून मते मिळवायची आहेत आणि सत्ता उपभोगायची आहे यावर त्यांचे चिंतन होणे जरुरी आहे, कारण देशाचा खजिना लुटून मध्यमवर्गीयांनी आणि व्यापाऱ्यांनी भरलेल्या कराचे पैसे खुशाल उधळणे हे देशाच्या भवितव्याच्या दृष्टीने योग्य नाही. सत्तेसाठी महाराष्ट्रात चाललेले राजकारण सुज्ञ जनतेस पटलेले नाही याचे सर्वच पक्षाच्या नेत्यांनी चिंतन करायला हवे. त्यांनी संयमित राहणे जास्त शोभानीय आहे व त्यांनी संयमित भाषा वापरायला हवी, तोलून मापून बोलायला पाहिजे. जरांगेंनी जेष्ठ नेत्यांबाबत बोलतांना अरे-तुरेची भाषा वापरणे सुरू केले. आता सर्वच नेत्यांनी एकमेकांना अरे-तुरेत बोलणे सुरू केले आहे. सुसंस्कृत महाराष्ट्रात हे योग्य नव्हे. या अशा प्रकारच्या वागण्यामुळे नेत्यांच्या भाषेमुळे कार्यकर्ते सुद्धा भरकटले, नेत्यांची आजची एक भूमिका आणि उद्याची वेगळी यामुळे ते संभ्रमात पडत आहे. आपल्या नेत्याची तुला पाहून घेईल, तू राहशील नाहीतर मी या प्रकारची धमकीवजा वक्तव्ये पाहून या तरुण कार्यकर्त्यांचेही भान हरपत आहे, त्यांचे हात शिवशिवत आहेत. त्यांच्या अंगातील जोमाला, जोशाला आपले नेते गुंडगिरीकडे वळवण्याचे काम करीत आहेत. कालच्या राजकोटला सर्वच मोठ्या पक्षांच्या उपस्थिती झालेल्या राड्यामुळे महाराष्ट्रातील तमाम जनतेला हे असे राडे करणारे राजकीय पक्ष कार्यकर्ते आहेत की गुंडांच्या टोळ्या असा प्रश्न पडला आहे. या प्रश्नाचे उत्तर सुद्धा जनतेनेच त्यांच्या मतदानाच्या अधिकारातून आगामी निवडणुकीद्वारे या नेत्यांना दिले पाहिजे.