"मोठी विहीर"...श्रीकांत भुसारी यांच्या लेखाच्या निमित्ताने
![]() |
खामगांवची मोठी विहीर |
दिनांक 11 मार्च रोजी आमचे मित्र पत्रकार, समाजसेवक तथा पर्यावरणप्रेमी श्रीकांत भुसारी यांचा "आणि मोठी विहीर बोलायला लागली.... मला मोकळा श्वास घेऊ द्या ना" हा लेख वाचनात आला आणि अनेक विचार मनात घोंगावू लागले. मोठी विहीर ही जवळपास सर्वच खामगावकरांना परिचित आहे. खामगावकरच नव्हे तर पंचक्रोशीतील इतर गावकऱ्यांना सुद्धा ही मोठी विहीर परिचित आहे परवाचीच गोष्ट मी बालाजी प्लॉट भागातून जात असतांना एका सत्तरीतल्या व्यक्तीने मला एका दवाखान्याचा पत्ता विचारला मी त्याला पत्ता सांगत असतांना मध्येच "म्हणजे मोठ्या हिरी जवळ का भाऊ" असे ते गृहस्थ म्हणाले "अगदी बरोबर काका , तिकडेच जा , तुम्हाला सापडेल दवाखाना" मी म्हटले. यावरून सहज लक्षात येते की त्या ग्रामीण भागातून आलेल्या मनुष्याला मोठी विहीर माहीत होती. ती आहेच खूप जुनी. या विहिरीचा विचार करतांना माझ्या डोळ्यासमोर नेहमी चित्र तरळते की इंग्रजांच्या काळात कोर्टासमोर शेती असेल, त्यात ही मोठी विहीर असेल, या विहिरी जवळच जांभळाच्या भल्यामोठ्या झाडाखाली ( भाटे वकिलांच्या घरासमोर ) सुद्धा एक लहान गोड पाण्याची विहीर आहे. या दोन्ही विहिरींनी तेंव्हा लगतच्या शेतातील पिकांना, परीसरातील मनुष्यांना, जनावरांना जीवन दिले असेल. पुढे कोर्टासमोरच्या सर्व जागा तत्कालीन अधिवक्त्यांनी घेतल्या आणि मग या भागात वस्ती वाढली. अगदी काही वर्षे अलीकडेपर्यंत ही विहीर चांगल्या अवस्थेत होती. पण हळू-हळू ही विहीर खराब होऊ लागली. विहिरीवर जाळी लावलेली असूनही सुशिक्षित भागातील म्हणजे सिव्हील लाईन भागातील या विहिरीत निर्माल्य, कचरादी टाकले जाऊ लागले आणि या विहीरीची दुर्दशा होत गेली. माझ्या स्मरणानुसार 2002 च्या खामगांवच्या भीषण पाणी टंचाई काळात या विहिरीवर मोटार बसवून तात्पुरते नळ लाऊन पाणी पुरवठा केला गेला होता आणि त्या जल संकटाच्या काळात हीच माय माऊली मोठी विहीर अनेकांची तारणहार झाली होती. अशी ही आमची मोठी विहिर मी सर्वात प्रथम पाहिली तेव्हा तर माझ्या बालदृष्टीला खूपच मोठी वाटली होती. मला स्पष्ट आठवते मी त्या विहिरीत तेव्हा डोकावून पाहिले होते. आजही कोणतीही विहीर दिसली की त्या विहिरीत डोकावून पाहण्याची मला का कोण जाणे पण इच्छा होत असते आणि मी पाहतोच. मी अनेक लोकांना सुद्धा विहिरीत डोकावून पुढे जातांना बघितलेले आहे. लोक विहिरीत डोकावून पाहून मग पुढे जातात ते असे का करतात ? कारण विहिरीतले पाणी पाहिले की, "चला पाणी आहे बुवा" असा त्यांच्या मनाला दिलासा मिळत असावा. शेवटी मनुष्याला पाहिजे तरी काय असते ? तो सर्व उपद्व्याप करतो तरी कशासाठी ? तर अन्न पाण्यासाठीच आणि म्हणूनच जीवनावश्यक ते पाणी विहिरीत आहे की नाही ते पाहण्यासाठी विहिरीत डोकाऊन पाहण्याची सवय अनेकांना असते. बालपणी मी त्या मोठ्या विहिरीत डोकावून पाहिले होते तेव्हा मला स्पष्ट आठवते की नितळ पाणी आणि त्या पाण्यात आकाश आणि ढगांचे प्रतिबिंब दिसत होते. पुढे मग ही विहीर शिकवणीला वगैरे जातांना अनेकदा पाहण्यात आली. कधीकाळी त्यात मुलांना पोहतांना सुद्धा पाहिल्याचे स्मरते आणि पुढे चांगले दिवस पाहिलेल्या याच विहिरीची अवस्था अत्यंत खराब झालेली पाहण्याचे दुर्भाग्य सुद्धा माझ्या नशिबी आले.
आज देशात विकास कामांचा झपाटा लागलेला आहे रस्ते निर्माणाचा वेग अतिशय जोरात आहे परंतु हा विकास जसा जरुरी आहे तसेच जुने जलस्र्तोत टिकवून ठेवणे सुद्धा जरुरी आहे. फडणवीसांनी तशी योजना सुद्धा राबवण्याचे सुतोवाच केले आहे. मोठ्या विहिरीजवळून सुद्धा सिमेंटचा रस्ता निर्माण होत आहे. वाढती वाहन संख्या त्यामुळे वाढलेली वाहतूक यामुळे रुंद रस्ते आवश्यकच आहे परंतु मनुष्याला जगण्यासाठी जल, अन्न आणि प्राणवायू, तसेच चांगले बोलणे, वागणे यांची आवश्यकता आहे. या अनुषंगाने संस्कृत मधील एका सुभाषिताचे स्मरण होते.
पृथिव्यां त्रीणि रत्नानि जलमन्नं सुभाषितम् मूढैः पाषाणखण्डेषु रत्नसंज्ञा विधीयते'
अर्थात, पृथ्वीवर जल, अन्न, आणि चांगले बोलणे अशी तीन रत्ने आहेत , परंतू मूर्ख लोक दगडाच्या तुकड्याला रत्न संबोधतात.
आता नवीन रस्ता विहिरी जवळून जाणार आहे , विहिरीचे काय होणार माहित नाही ? पण बालवयापासून ही विहीर बघत आलो आहे त्यामुळे चिंता वाटते. भुसारी यांनी त्यांच्या लेखात खूप छान लिहिले आहे की , "माय म्हातारी झाली म्हणून मायच्या छातीवर पाय देऊन तिचा श्वास कोंडून केलेली प्रगती आम्हाला कशी काय लाभेल ? हे वाक्य वाचल्यावर मला सुद्धा लिहायची प्रेरणा झाली. खामगांव शहरात तर दोन मोठ्या माय आहेत. एक मोठी देवी आणि दुसरी ही मोठी विहीर. त्यामुळेच शहरातील, परिसरातील अनेकांना सुद्धा चिंता वाटत आहे. विकासाच्या आड कोणी नाही परंतू आपल्या पूर्वजांनी दिलेले हे जलस्त्रोत टिकवून ठेवणे हे सुद्धा आपले कर्तव्य आहे. मागे माहूर शहरात एक जुनी विहीर पुनश्च उपयोगात आणली गेली. आपल्या मोठ्या विहिरीच्या पाण्याचा उपसा होत गेल्यास आपोआप ती सुद्धा पुर्वीसारखी शुद्ध होईल. नुकताच जिजामाता मार्ग परीसरातील अशाच एका जुन्या विहिरीतील पाण्याचा राजीव गांधी उद्यानातील झाडांना पाण्यासाठी उपयोग झाला. मोठी विहीर वाचवण्यात, या विहिरीतून मागे एकदा पाणी पुरवठा करण्यात मोठी विहीर भागातील तरुण, नागरीक यांचे सुद्धा मोठे योगदान आहे अशी माहिती नुकतीच मिळाली तो उल्लेख इथे करणे क्रमप्राप्त आहे व त्यांचा तो प्रयत्न स्तुत्यच आहे.
मोठी विहीर ही पक्क्या पाण्याची विहीर आहे. मोठ्या देवी प्रमाणेच ती सुद्धा खामगांवकरांना जिव्हाळ्याची आहे. जीवनदायीनी आहे. ती राहावी, तिची अवस्था चांगली राहावी हेच नागरिकांना वाटत आहे. सिमेंटची जंगले, रस्ते, या सोबतच आगामी पिढीसाठी आपल्याला वने, शेती आणि जल हे सुद्धा जतन करून ठेवावे लागेल की नाही ? मायबाप सरकारने जनभावना, जुने जलस्त्रोत, विकास या सर्वांचा सुवर्णमध्य साधून ज्या पुण्यश्लोक अहील्यादेवी होळकरांनी जागोजागी विहिरी खोदल्या त्या अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रीशताब्दी जयंती वर्षात योग्य काय ते करावे हीच सर्व नागरीकांची मनीषा आहे.
टीप : वरील लेख वा लेखातील अंश हा लेखकाच्या संमती शिवाय वापरू नये. किंवा व्यावसायिक कारणासाठी त्याच्या वापर करू नये.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा