Click "Follow" Button below To Follow this Blog

११/०९/२०२५

Article about developing khamgaon

 दिल गार्डन गार्डन हो गया

खामगांवकरांचे हृदय बहरून येऊन त्यांची मनस्थिती दिल गार्डन गार्डन हो गया सारखी का झाली आहे ते या लेखात वाचा.

90 च्या दशकामध्ये गुलशन ग्रोवर हा खलनायक म्हणून प्रसिद्ध होता. वेगवेगळ्या सिनेमांमध्ये वेगवेगळ्या वेशभूषेत दिसणे ही गुलशन ग्रोवरची खासियत असे शिवाय त्याची आणखी एक खासियत म्हणजे त्याच्या सिनेमांमध्ये त्याच्या तोंडी एक विशिष्ट असा डायलॉग वारंवार दिलेला असे. जसे "गन्ना चुसके" , "गई भैंस पानीमे" , "बॅड मॅन" असे संवाद त्याच्या मुखी दिलेले असत.  प्रत्येक संवादामध्ये ठराविक अंतराने असे डायलॉग पालुपदासारखे तो पुन्हा पुन्हा म्हणतांना सिनेमात दिसत असे.  यातलाच एक डायलॉग म्हणजे 'दिल गार्डन गार्डन हो गया'. कुठल्यातरी एका सिनेमामध्ये त्याच्या तोंडी दिल गार्डन गार्डन हो गया असा संवाद होता त्याचा हा संवाद पुढे एवढा लोकप्रिय झाला की दिल गार्डन गार्डन हो गया असे एक गाणे सुद्धा कुण्या गीतकाराने लिहिले होते. 

      आता हे दिल गार्डन गार्डन हो गया आणि गुलशन ग्रोवर पुराण आज का बरं बुवा ? असा प्रश्न वाचकांना पडला असेल. या संवादाची आठवण होण्याचे कारण म्हणजे खामगांव शहरांमध्ये मा. ना. आकाश फुंडकर यांच्या कारकिर्दीमध्ये व नेतृत्वाखाली नगरपरिषदेने अनेक नवीन बागा निर्माण केल्या तसेच जुन्या बगीच्यांना नवीन स्वरूप दिले. सावरकर उद्यान , छकुली उद्यान यांसारखी इतरही अनेक नवीन उद्याने खामगांव शहरात निर्माण केली याशिवाय भारतरत्न राजीव गांधी उद्यान अर्थात टॉवर गार्डन याचे आणि शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले नटराज गार्डन या जुन्या उद्यानांचे नूतनीकरण केले गेले. या उद्यानांमुळे खामगांव शहराला कसा ' फ्रेश लुक ' आला आहे. तसे तर या नवीन आणि नूतनीकरण झालेल्या उद्यानांबाबत समाज माध्यमांवर अनेक व्हिडिओ पूर्वीच प्रसिद्ध झाले आहेत. नवीन निर्माण केलेली उद्याने चांगली तर आहेच परंतु टॉवर गार्डन आणि नटराज गार्डन यांची अवस्था फार खराब झाली होती नटराज गार्डन पेक्षाही टॉवर गार्डन अधिकच खराब झाले होते त्या उद्यानाकडे पाहवले सुद्धा जात नव्हते इतकी त्याची दुर्दशा झाली होती परंतु ऑगस्ट 2025 मध्ये या दोन्ही उद्यानांचे लोकार्पण झाले आणि खामगांवकर नागरिकांना एक सुखद धक्का मिळाला. आज जर का आपण टॉवर गार्डन आणि नटराज गार्डन मध्ये गेलो तर आपल्याला अतिशय आल्हाददायक, नयनरम्य शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असूनही प्राणवायूने परिपूर्ण असे वातावरण मिळते. शिवाय जागोजागी योग्य ती शिल्पे, भिंतींवरती सुंदर चित्रे, व्यायामासाठी जागा आणि साधने, फिरण्यासाठी जागा आणि साधने, लहान मुलांसाठी खेळणी, समाजाला, कुटुंबाला ज्यांच्या मार्गदर्शनाची, सल्ल्याची नेहमीच गरज असते अशा ज्येष्ठ  नागरिकांना बसण्यासाठी बाक, लॉन इत्यादी अनेक सुविधा या दोन्ही गार्डनमध्ये उपलब्ध करून दिल्या आहेत त्यामुळे आता सकाळी फिरणाऱ्यांची गर्दी आपल्याला या उद्यानांमध्ये दिसून येते. नटराज गार्डनच्या दुरावस्थेमुळे येथील भव्य नटराजाची मुर्ती सुद्धा उदास वाटत होती परंतु आज या नटराजाची मुद्रा कशी छान फुललेली दिसून येत आहे. त्याच्या समोरील पूर्वी जे छोटे कमळाचे टाके होते ते आता मोठे केले आहे. ही उद्याने रात्री सुद्धा खुप सुंदर दिसतात. जनुना तलावाच्या प्रवेशद्वाराप्रमाणे नटराज गार्डनचे प्रवेशद्वार जुन्या काळात बनवलेले आहे.  नूतनीकरण करतांना त्याच्या मूळ स्वरूपात काही बदल  न करता याच दरवाज्याला पुनश्च चांगले स्वरूप देण्यात आले हे फार चांगले झाले कारण या प्रवेशद्वारावरील मुर्त्या या स्थानिक राष्ट्रीय शाळेतील कलाकारांनी बनवलेल्या होत्या आणि त्या आजही खूपच सुंदर दिसतात म्हणून त्या तशाच राहू देणे गरजेचे होते आणि त्या तशाच राहू दिल्यामुळे व त्यांना रंग दिल्यामुळे नटराज गार्डनचे प्रवेशद्वार आता अधिक आकर्षक दिसते. रात्रीची रोषणाई सुद्धा बघणाऱ्याला सुखद अनुभव देते.

रात्रीच्या वेळेचे नटराज गार्डन

   मध्यंतरी खामगांवला उद्याने असूनही नसल्यासारखीच होती. खामगांवकरांचा एकमेव पिकनिक स्पॉट जनुना तलाव याची सुद्धा अवस्था चांगली नव्हती. त्यामुळे खामगांवात येणाऱ्या पाहुण्यांना कुठे घेऊन जाण्यासाठी चांगले ठिकाणास नव्हते आणि खामगांवकरांना मोकळा श्वास घेता येईल असे सुद्धा कोणतेही ठिकाण खामगाव मध्ये नव्हते. सर्वत्र गर्दी आणि अतिक्रमणांचा सुळसुळाट झाला होता परंतु आज मात्र नवीन निर्माण झालेल्या उद्यानांमुळे आणि जुन्या नूतनीकरण केलेल्या उद्यानांमुळे खामगांवकर नागरिकांना मोकळी जागा उपलब्ध झाली आहे. उद्याने म्हणजे शहराची फुफ्फुसे असतात. गतकाळात खामगांव  मतदारसंघाचे तरुण नेतृत्व मा. ना. आकाशभाऊ फुंडकर, खामगांव नगरपरिषद सीओ प्रशांत शेळके, यांनी मात्र खामगांव शहराचा कायापालट करण्याचा निश्चयच घेतलेला दिसतो. त्यामुळे अनेक चांगल्या गोष्टी खामगांवात होतांना दिसत आहे. यशवंत टॉवरवर बसवलेल्या घड्याळामुळे सुद्धा खामगांवकरांना मोठा आनंद झालेला आपण पाहिला, रस्ते सुद्धा चांगले होत आहेत. एक पाण्याची समस्या तेवढी दूर होणे आवश्यक आहे. ती सुद्धा लवकरच मार्गी काढण्यात येईल असे काही वरिष्ठ नेत्यांनी सांगितले आहे त्यामुळे तोही प्रश्न लवकरात संपुष्टात येईल अशी चिन्हे आहेत. 

 आज खामगांवकरांना घरी आलेल्या पाहुण्यांना दाखवण्यासाठी खामगांवतील अनेक गार्डन उपलब्ध आहे.  अशी गार्डन निर्माण झाल्यामुळे आणि एकूणच चांगले बदल होत असलेले बघतांना खामगांवकरांचे हृदय बगीच्या प्रमाणे बहरून येऊन त्यांची मनस्थिती दिल गार्डन गार्डन हो गया याप्रमाणे झाली आहे असे म्हणण्यास हरकत नाही.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा