मतदार बुचकाळ्यात !
20 नोव्हेंबरला होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आता संपली आहे. खामगांव विधानसभा मतदारसंघात एकूण 26 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते, त्यातील चार अर्ज हे अपात्र ठरले त्यामुळे आता एकूण 22 उमेदवार हे खामगांव विधानसभा मतदारसंघाच्या रिंगणात उभे ठाकले आहे. राज्यातील यंदाची निवडणूक ही जरांगे आंदोलन, 70 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप झाल्यानंतर अजित दादांचे युतीत दाखल होणे, मविआचे आरोप आणि त्यांची आपापसात असलेली चढाओढ, लाडकी बहिण, कर्मचारी जुनी पेन्शन यांसारख्या मुद्द्यांमुळे जशी चांगलीच रंगणार आहे तशीच खामगांव मतदारसंघाची निवडणूक सुद्धा कधी नव्हे अशी रंगणार असे तूर्तास तरी दिसत आहे, खरे चित्र हे चार नोव्हेंबर नंतर स्पष्ट होईल कारण उमेदवारी अर्ज मागे घेण्याची ही अखेरची तारीख आहे. खामगांवात दाखल झालेले अर्ज पाहता सद्यस्थितीत तरी खामगाव मतदार संघातील मतदार हे बुचकाळ्यात पडल्यासारखे दिसत आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे हिंदुत्ववादी पक्ष भाजपकडून आकाश फुंडकर यांना उमेदवारी मिळाली तर विश्व हिंदू परिषदेचे विदर्भ प्रांत सह मंत्री राहीलेले आणि ब-याच काळापासून आमदार पदासाठी ईच्छूक असल्याचे म्हटले जाणारे अमोल अंधारे यांनी सुद्धा अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
बजरंग दलातून पुढे आलेले अमोल अंधारे हे उच्चविद्यावभूषित असून तरुणांमध्ये लोकप्रिय असा चेहरा आहे. मतदार संघातील विविध गावात बजरंग दलाच्या शाखा उघडल्यामुळे मोठा तरुण वर्ग त्यांच्या पाठीशी आहे. या तरुण वर्गात सर्वच जाती, धर्मातील तरुण आहेत हे सुद्धा उल्लेखनीय आहे.
दुसरीकडे विविध कारणांमुळे नेहमीच चर्चेत राहिलेले माजी आमदार दिलीपकुमार सानंदा हे सुद्धा दहा वर्षानंतर निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. नगरसेवकापासून तर आमदारापर्यंत पोहोचलेल्या सानंदा यांचा एक वेगळा चाहता वर्ग आहे तसेच त्यांची एक विशिष्ट मतपेढी आहे. उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी निघालेल्या त्यांच्या मिरवणूकीत कुण्या एका कार्यकर्त्यांनी शड्डू ठोकून एक प्रकारे भाजपाला आव्हानच दिले आहे. दहा वर्षानंतर निवडणुकीच्या रिंगणात येत असल्यामुळे सानंदा हे पूर्ण प्रयत्न करतील अशी चर्चा आहे.
त्याचवेळी दहा वर्षापासून आमदार असलेले ॲड.आकाश फुंडकर यांनी सुद्धा खामगाव मतदार संघात अनेक विकास कामे केलेली आहेत. सुशिक्षित, उच्चविद्याविभूषित, भाऊसाहेबांचा राजकीय वारसा, सुशिक्षित तरुण वर्गाचा पाठींबा, सुशिक्षित महिला वर्गात लोकप्रियता या जमेच्या बाजू असलेला हा चेहरा असून त्यांचा सुद्धा एक मोठा चाहता वर्ग मतदारसंघात तयार झाला आहे. सुरुवातीच्या कार्यकाळानंतर आकाश फुंडकर हे बरेच कार्यशील झालेले सर्वांनी बघितले आहे विधानसभेत सुद्धा त्यांनी अनेक वेळा विविध प्रश्न उपस्थित केले आहे.
वरील प्रमाणे या प्रमुख तीन उमेदवारांची स्थिती आहे. या तिघांव्यतिरिक्त बसपा, मनसे, एमआयएम, वंचित, रिपब्लिक सेना, मुस्लिम लीग अशा आठ पक्षांचे व अमोल अंधारे यांच्यासह 11 उमेदवार हे अपक्ष उभे आहेत. अशा प्रकारच्या उमेदवारीमुळे मतांचे विभाजन नक्कीच होणार आहे असे सद्यस्थितीत वाटत आहे.
अमोल अंधारे, दिलीप सानंदा आणि आकाश फुंड कर या तीन उमेदवारांमध्ये मोठी चुरस निर्माण होणार आहे. इतर 19 उमेदवार खामगांव मतदार संघात विशेष परिचित असे उमेदवार नाही. परंतु तरीही जातीपातीच्या धर्माच्या नावावर हे उमेदवार काही मते खातीलच अमोल अंधारे व आकाश फुंडकर हे दोघेही एकाच विचारधारेचे, त्यामुळे फुंडकरांच्या सगळ्याच नाही परंतू अनेक मतदारांसमोर पेच निर्माण झाला आहे. हिंदुत्ववादी उमेदवारास मत देतांना कोणास मतदान करावे हा संभ्रम तूर्तास तरी निर्माण झाला आहे. लोकशाहीत पात्र व्यक्तीस निवडणूकीत उभे राहण्याचा अधिकार आपल्या संविधानाने दिलेला आहे पण अमोल अंधारे व आकाश फुंडकर हे दोघेही एकाच विचारधारेचे आहे आणि तरीही अमोल अंधारे यांनी उमेदवारी अर्ज कसा काय दाखल केला असा प्रश्न नागरिक एकमेकांना विचारत असल्याचे आणि तशा चर्चा सर्वत्र होत असल्याचे दिसून येत आहे. खामगाव मतदारसंघाच्या निवडणुकीचे खरे चित्र उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या तारखेनंतर म्हणजेच चार नोव्हेंबर नंतर मतदारांना दिसणार आहे तोपर्यंत खामगाव मतदारसंघातील मतदार हे बुचकाळ्यातच पडलेले राहणार आहे.
👉 Picture used in article is edited by my daughter Shalaka