आठवणी नानाशास्त्रींच्या
जलंब - भाग १
![]() |
| नानाशास्त्री वरणगांवकर यांचा वाडा या ठिकाणी होता. |
![]() |
| सुवर्ण व्यवसायी वर्मा यांचे जलंब मधील 1922 मध्ये सुरू केलेले दुकान. |
![]() |
| नानाशास्त्री वरणगांवकर यांच्या जागेचे सध्याचे मालक श्री घोपे काका |
काही जुनी, काही नवीन झालेली घरे बघत मार्गक्रमण करत असतांना, आजोबा, आजी माझ्या वडिलांचे, चुलत्यांचे, आत्याचे, बालपण इथे कसे व्यतीत झाले असेल असे विचार माझ्या डोक्यात येत होते. "ही होती तुमची जागा" या अनिलभाऊ वानखेडे यांच्या वाक्याने मी भानावर आलो.
"जलंब ग्रामाबद्दल मला बालपणापासून जिव्हाळा, आकर्षण आहे." जलंबला हिंदू संमेलनात प्रमुख वक्ता म्हणून गेलो असता व्याख्यानाच्या सुरुवातीलाच वरील वाक्य आपसूकच माझ्या मुखातून निघाले. त्याचे कारण माझे आजोबा 1940-50 च्या दशकात जलंबला वास्तव्यास होते, वैद्य असल्याने जलंब, खामगांव परिसरात ते नानाशास्त्री म्हणून प्रसिद्ध होते. व्याख्यानापुर्वी हनुमान मंदिराच्या जवळच राहणाऱ्या वानखेडे यांच्याकडे आम्हाला चहापाण्यास आमंत्रित केले होते. पु. ल. देशपांडे यांचे एक वाक्य आहे की एखादे जुने गांव, जुनी वास्तू दिसली की एखादा जुना मित्र भेटला की जसा आनंद होतो तसा आनंद वाटत असतो. जलंबला आलो असल्याने माझ्या मनात सुद्धा मला माझे वाडवडील राहत असलेली जुनी वास्तू बघण्याची तीव्र इच्छा जागृत झाली असल्याने मी अनिल भाऊ यांचे जवळ माझे आजोबा इथे राहिलेले आहे, इथे आमचे घर होते, ते मला पाहायचे आहे असे सांगताच त्यांनी त्यांच्या वृद्ध वडीलांना विचारल्यावर त्यांचे वडिलांनी नानाशास्त्री वरणगांवकर कुठे राहत होते आणि आता तिथे कोण राहते ते सांगितले. तरी खात्रीसाठी म्हणून अनिल वानखेडे मला म्हणाले चला आता आमच्या गावाची इत्यंभूत माहिती असलेल्या "सायंटिस्ट"कडे घेऊन जातो. सायंटिस्ट म्हणजे खूप माहिती असलेले असे त्यांचे म्हणणे होते हे कळायला मला वेळ नाही लागला. त्यांच्या काकांकडे ते घेऊन गेले. माझे आजोबा जलंबला राहत होते हे म्हटल्यावर काही वेळातच त्यांना मी आपलासा वाटू लागलो. ते माझ्या सोबत अनवाणीच निघाले, मी त्यांना चप्पल घाला असे म्हटल्यावरही त्यांना मला माझ्या पूर्वजांचा वाडा दाखवण्याची घाई झाली होती, जलंबशी माझे नाते असल्याचे पाहून मी त्यांचा ग्राम बंधू वाटल्याने त्यांच्या अंगी सुद्धा उत्साह संचारलेला दिसला. वानखेडे यांच्या काकांना नानाशास्त्री म्हटल्याबरोबर "नानाशास्त्री काय भारदस्त माणूस होता. मी त्यांना पाहिलेले आहे. मोठ्या मिशा, चहे-यावर तेज, टोपी, गोरापान वर्ण, उंचेपुरे. जलंब गावात असा रुबाबदार माणूस एकच होता. त्यांच्याकडे बंदूक होती, नेमबाज. होते, परवाना धारक शिकारी तर होतेच, शिवाय वैद्य होते" एका दमात काकांनी माझ्या आजोबांचे वर्णन केले. ते तसेच होते. मी नानाशास्त्रींचा नातू आहे असे म्हटल्यावर त्यांना आनंद झाला त्यांनी कौतुक सुद्धा केले, चहापाण्याचा खूप आग्रह केला परंतु वेळ कमी असल्याने फक्त त्यांचे आशीर्वाद घेऊन आम्ही वाड्याच्या दिशेने जाऊ लागलो. काही जुनी तर काही नवीन झालेली घरे बघत मार्गक्रमण करत असतांना, आजोबा, आजी माझ्या वडिलांचे, चुलत्यांचे, आत्याचे बालपण इथे कसे व्यतीत झाले असेल असे विचार माझ्या डोक्यात येत होते. माझी आत्या सांगत असे की आजोबा त्यांना खामगांवला खेळ (सिनेमा) पाहण्यासाठी बैलगाडीत घेऊन येत असत आणि अंजुमन शाळेच्या चारमिनार जवळ ते शिदोरी खात असत. हे मला आठवले. "ही होती तुमची जागा" या अनिलभाऊ वानखेडे यांच्या वाक्याने मी भानावर आलो. खुप वर्षांपूर्वी मी माझ्या मित्रासोबत जलंबला गेलो होतो. त्याचे वडील सुद्धा जलंबला राहत असत. ते माझ्या वडिलांचे बालमित्र होते. म्हणून आम्ही दोघे त्यावेळी जलंबला गेले होतो. त्यावेळी ते घर आजोबांच्या वेळी जसे होते तसेच होते पण आता मात्र ज्यांच्या मालकीचे ते घर आहे त्यांनी बरेच बदल केले आहे. मी नानाशास्त्रींचा नातू आहे हे ऐकल्यावर आमच्या घराचे आताचे मालक घोपे काका यांनी आमचे खूप आदराने स्वागत केले. घोपे काकांनी तर मला पुन्हा एकदा आमंत्रित केले आणि नानाशास्त्री यांचा मळा सुद्धा दाखवण्याचे आश्वासन दिले. तो मळा अजूनही तसाच आहे हे सुद्धा त्यांनी सांगितले. माझा जलंब गावाशी अगदी जुजबी संबंध, कधीकाळी आजोबांनी वास्तव्य केलेले पण आजही त्या गावात एवढे प्रेम, माया, आपुलकी, आदर कसे काय मिळत होते ? तर जे पेराल ते उगवते या उक्ती नुसार माझ्या आजोबांनी येथे लोकांना चांगली वैद्यकीय सेवा दिली होती, आपुलकीने आयुर्वेदिक औषधे दिली होती, वन्यप्राण्यांच्या संकटातून त्यांना वाचवले होते त्यामुळे आजही त्यांचे नांव अनेक ज्येष्ठ जलंब ग्रामवासी जाणून आहे. तीन वेळ संध्या, नित्यपूजा आणि गणपतीवर नितांत भक्ती असणा-या माझ्या आजोबांनी काय कमवून ठेवले ते मला कळले.
माझे व्याख्यान चांगले झाले, परतीच्या प्रवासात माझ्या मनात जलंब भेटीमुळे आजोबांच्या अनेक स्मृती तरळत होत्या. त्यात मला आजोबांचे मित्र त्यांनी भेटी दिलेली छोटी छोटी गांवे आठवली त्यातले एक लांजूड गांव आठवले. पण तूर्तास एवढेच लांजूडचा किस्सा व इतर आठवणी या लेख मालिकेत लवकरच वाचायला मिळतील...ब्लॉग वाचत राहा, इतरांना शेअर करा, टिप्पणी देण्यास विसरू नका.
✍️विनय वि. वरणगांवकर©
खामगांव



